आपले सण - बदलाची गरज

Submitted by मोहन की मीरा on 19 September, 2013 - 00:33

सध्याच गणपती उत्सव झाला. साधरण श्रावण आला की सणांचा हंगाम सुरु होतो. पण सध्या प्रत्येक सणाचं मार्केटिंग झाल्या मुळे सण म्हणजे वैताग, ट्रॅफिक, गर्दी हेच डोक्यात.

साधी मंगळागौर सुध्धा प्रोफेशनल बायकांचा चमु बोलावुन " साजरी" केली जाते. त्यात मग मंगळागौर असलेली मुलगी बजुलाच रहाते, त्या बायकाच त्यांचे ठरलेले "इव्हेंट" करुन जेवुन निघुन जातात. तो "खेळ" व "मेळ" नसुन फक्त एक पर्फॉर्मन्स फक्त उरतो.

तिच गत दहिहंडी आणि गणेश उत्सवा ची.... दहिहंडी तर काही लोकांनी अगदी "साता समुद्रा "पार नेली. किती तो गोंधळ, किती आरडा ओरडा... रस्त्यात अडवणूक.... भर रस्त्यात ठिय्या.... ठाण्यात तर सुप्रसिध्ध हंडी व हंडी कर्त्यांच्या मुजोरीला तोड नाही. सतत कलकल....

दहिहंडीच्या काळात असेच टि. व्ही. वर काहीतरी पहात होते. मुलगी मैत्रिणीलाफोन करत होती. मैत्रिण बहुदा घरात नव्हती. मग दुसर्‍या दिवशी तिने परत फोन केला. तेंव्हा कळले की ती मैत्रिण ठाण्यातल्या "त्या" सु(?) प्रसिद्ध हंडी जिथे बांधतात त्याच इमारती मधे रहाते. ज्या दिवशी हंडी असे त्या दिवशी ते सगळं कुटूंबं मुलुंडला त्यांच्या आजीकडे निघुन जातं..... का? कारण हादरे बसतिल असं संगित आणि भयानक आवाज, घाण, गर्दी. ह्या सोसायटीने कायदेशीर रित्या लढा देण्याचा प्रयत्न केला होता. पण आर्थातच तो विरुन गेला...

गणेशौत्सव हा ह्या सगळ्या गोंधळाचा राजा !!!! ११ दिवस उत आल्या प्रमाणे लोकं वावरतात. त्यात सिव्हिक सेंन्स नावाच्या गोष्टीचं भानच नाही. आमच्या एरियात ठाणे पालिकेची एक बस येते. गणपतीचा मंडप बस स्टॉप वरच बांधल्या मुळे ह्या कालावधीत ही बस आत येत नाही. ११ दिवस गणपती चे + मंडप बांधायला लागणारे पहिले २० दिवस+ मंडप काढायला लाग्णारे पुढले २०/२५ दिवस.... बरं गणपती मंडळचे सर्वेसर्वा माजीमहापौर..... मग बोलणार कोणाला......

आज योगेशने काढलेले लालबागच्या राजाचे फोटो पाहिले आणि एक कळ मनात उठली ( जिप्सी फोटो अप्रतिम आहेत रे!!!) . ह्या काळात दादर्/परळ्/लालबाग ह्या एरियात रहाणं म्हणजे शिक्षा आहे... ( लग्न होवुन जेंव्हा परळला गेले त्या वर्षी मजा वाटली नंतर मात्र घी देखा पण बडगा नही देखा अशी अवस्था झाली). माझं हे विधान अनेकांना पटणार नाही. पण हे खरं आहे. ही गणेशौत्सवाची गर्दी पाहिली की ३ वर्षां पुर्वी चा प्रसंग लख्ख आठवतो. आमचे मामा हिंदमाता जवळ रहातात. असेच उत्सवी दिवस. त्यांना घरात अस्वस्थ वाटु लागलं म्हणुन तातडीने त्यांना टॅक्सीने के.इ.एम. ला नेण्या साठी मामी निघाल्या. गर्दी अणि गोंगाटा मुळे हिंदमाता ते के.इ.एम. ह्या एरवी चालत १० मिनिटे लागणार्‍या अंतराला त्या दिवशी टॅक्सीने २५ मिनिटं लागली. आणि के.इ.एम ला मामांचं प्रेत पोहोचलं..... टॅक्सीतच ते ६१ वर्षांचे मामा वारले. बायकोच्या शेजारी!!!! त्या पुढचे हाल मी लिहित नाही.

एखाद्याचा जीव गमवावा लागणं ह्या पेक्षा सण साजरे करणं तेही जाहिर रित्या... गरजेचं आहे का. आपणच जर अश्या ठिकाणांना जाणं थांबवलं तर आपोआपच हे उपक्रम बंद पडतिल. हा गोंधळ, गडबड, आरोप, पैश्याची उधळण.... खरच गरज आहे का? आजच्या मंदीच्या काळात हे भान आपण नाही ठेवायचं तर कोणी? बाकी राजकारण आणि त्यातली माणसं ह्यांवर न बोलणंच बरं.....

मी स्वतः कधीच गर्दी मधे देवदर्शन करायला जात नाही. लोकांचं माहिती नाही पण आम्ही आमच्या कुटूंबा साठी अलिखित नियम बनवले आहेत.. सर्व संमतीने
१. जिथे कुठे गर्दी असेल अश्या ठिकाणी देव दर्शनाला न जाणे. उदा. सिद्धीविनायक, महालक्ष्मी, कोल्हापुर ची देवी, तुळजापुरची देवी ( आमची कुलस्वामिनी), हरिद्वार( आमचे खाजगी घाट तिकडे आहेत), तुरुपती, कोणताही सार्वजनिक गणपती जो रस्त्यात मंडप बांधुन बसवला आहे, रस्त्यांवरचा गरबा, कोणताही सार्वजनिक उत्सव. इ.इ.इ.

२. देवळात जायचेच असेल तर गावदेवी किंवा शांत अश्या एखाद्या मंदिरात जाणे.

३. आपले अध्यात्म आपल्या पुरते. आमच्या घरातल्या दिड दिवसाच्या गणपतीला साधारण ७० ते ८० माणसे येतात. त्या काळात आम्ही खुप खुश असतो. अगदी उत्सवाची मजा घेतो. मग उरलेले ४-५ दिवस रोज संध्याकाळी आम्ही खुप लोकांकडे जातो. खुप गंमत येते. ह्याकाळात या वर्षे दोन फार छान गाण्यांचे कार्येक्रम पदरी पडले. खुप मजा आली.

४. जिथे जिथे राजकिय पक्षांचा हस्तक्षेप आहे असे उपक्रम, उत्सव, स्पर्धा ( माझी मुलगी व्क्तृत्व आणि अभिनय स्पर्धां मधुन नेहेमेच भाग घेते), कार्येक्रम टाळणे.

५. शक्यतो जिकडे राजकारणी व्यक्ति आहेत अशा संस्थां ची कोणतीच कामे न करणं. ( मी स्वतः तीन चार समाजिक संस्थांचे ऑडिट विनामुल्य करते)

कदाचित माझे विचार तुम्हाला पटणार नहित. इकडे कोणा माणसावर टिका कींवा आरोप करायचे नहित. पण एकंदरच ह्या बाबतित काय विचार आहेत ते जाणुन घ्यायचे आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> नेत्यांना, संस्थांना, राजकारणाला, समाजकारणाला शिव्या देतो, कारण हे सारे माझ्या विरोधी गटाने-समुहानेच तयार केलेले आहेत, अशी माझी पक्की समजूत असते. <<<<<<

साजिराच्या पोस्ट मधिल हे वाक्य प्रकर्षाने जाणवले, अशीच काहीशी वैचारिक परिस्थिती "ब्राह्मण अन (हिंदू) धर्माबद्दल" शिव्या घालत बोलणार्‍यांचीही असतेच असते व ती तशी बनावी म्हणून विशेष प्रयत्न केले जातात.

तुर्रमखान यांचे हे वाक्यही महत्वाचे असले तरी आशय मला पटला नाही
>>>>> या उत्सवांच्या ज्यांना त्रास होतो ती पांढरपेशी उ(हु)च्च्भ्रु लोकं 'आहे रे' वर्गातली असतात. अशा उत्सवांमुळे 'नाही रे' वर्गातल्या लोकांना आपलं उपद्रवमुल्य दाखवता येतं. <<<<<
नालायकपणा/गुन्हेगारी/उपद्रव देण्याकरता आहे रे वा नाहिरे दोन्ही वर्गातील लोक सहभागि अस्तातच अस्तात. असलाच तर संख्यात्मक प्रमाणाचा फरक असेल. (इथे आहेरे/नाहिरे दोन्ही समसमान)

पण त्याचबरोबर, हिंदू धर्मातील इश्वराची भक्ति करणार्‍यातही आहेरे व नाहीरे दोन्ही वर्गातील लोक असतातच अस्तात, असलाच तर संख्यात्मक प्रमाणाचा फरक असेल.... (इथे नाहिरे वाले बहुसंख्य)

>>>> सामाजिक विषमता कमी करण्याचा दीर्घकालीन उपाय जरूरीचा वाटतो. <<<<
राजकारणी अन प्रशासन यान्चि चाललेली खाबुगिरी जेव्हा बन्द होईल तेव्हाच (आर्थिक) विषमता वगैरे कमी करणे शक्य होईल, पण तोवर आहे त्या असंतोषाचा फायदा घेऊन ब्रिगेडी/नक्षलीच येथे सत्ताधीश म्हणून प्रस्थापित झाले नाहीत म्हणजे मिळवली! आत्ताच एकतृतियांश भारतावर अधिराज्य त्यांचेच दिसते आहे!

इब्लिसा, उद्या लग्नाच्या मान्डववाल्यांबद्दल्/लग्नातील खर्चाबद्दलही असेच धागे निघतील, आधीच निघालेले असतीलही! चूकीचे उदाहरण देऊ नका.

मोकीमी, मी स्वतः गर्दी टाळतो, त्यातिल गलिच्छपणास नाके मुरडतो, पण म्हणून सरसकट गणेशोत्सव/मिरवणूका इत्यादी "नक्कोच" असे म्हणणे मला शक्य होणार नाही. ते सुधरवायचे, तर मला स्वतःलाही त्यातिलच एक भाग बनुन रस्त्यात उतरावे लागेल, न की दारेखिडक्या लावुन घरात कोन्डून घेऊन बाकी तमाम जन्तेच्या नावाने बोटे मोडीत बसणे योग्य. अन जोवर मी त्यात प्रत्यक्ष कृतीने उतरत नाही, तोवर अमक्यान्नी अमके केले पाहिजे वा तमक्यान्नी तमके केले पाहिजे असे उन्टावर बसुन शेळ्या हाकण्याचे सल्ले देणेही मला मानवत नाही.
माझ्या अनुभव अन अनुभूती शिवाय न बोलण्यामधे "प्रत्यक्ष कृती/कृतीची संभावितता" यांचाही समावेश आहेच आहे.

विसर्जित झालेल्या व भरतीच्या लाटेने पुन्हा वाहून किनारी आलेल्या गणेशमूर्तिंचे अवशेषांचे फोटो काढण्यास व जाहिर प्रसिद्ध करण्यास कायद्याने बंदी आहे. (कायदेविषयक जाणकार याबद्दलच्या अधिसूचनेची माहिती देऊ शकतील) दाभोळकरांचे देहाचा फोटो प्रसिद्धिकरता छापणे जितके अनुचित निषेधार्ह होते, तितकेच वर दिलेल्या लिन्क्स वरिल गणेशमूर्तिंच्या ध्वस्त अवशेषांचे फोटो देणेही अनुचित निषेधार्ह आहे. (अर्थात त्याचा निषेध हल्ली हल्लीच्या माबोवर होईल अशी आशा मला वाटत नाही)

लिंबूटिंबू,

तुमची काही मते मला आदर्शवादी वाटली. पटण्यासारखी असणारच कारण आदर्शवाद पटत नाही असा कोण असणार?

पण लार्जली सध्याच्या उत्सवांचे, सणांचे स्वरूप हे:

१. थाट मिरवणे
२. पैसा उधळणे
३. आवाज करणे
४. नृत्याच्या नावाखाली विकृतीचे उदात्तीकरण करणे
५. 'पब्लिक'ला त्रास झाला यात धन्यता मानणे

असे काहीसे झालेले आहे हे नाकारता येणार नाही.

अश्या वेळी काहींची आदर्शवादी मते थोडावेळ दूर सारून सरसकट सगळेच बंद केले जाणे हेच आवश्यक वाटू लागते.

>>>> असे काहीसे झालेले आहे हे नाकारता येणार नाही. <<<< सहमत.
पण यास कारण काय?
तर "अमके करा, ते योग्य, तमके करु नका, ते अयोग्य" असे सान्गू शकणारी / समुहाला दिशा देऊ शकणारी आदर्शवादी माणसे (अनेकविध कारणांनी) आपापल्या कोषात जाऊन बसली/त्यांना तसे बसावे लागले व स्वातंत्र्योत्तर काळात ही प्रक्रिया फारच वेगाने सर्वदूर झाल्याने निर्नायकी अवस्था प्राप्त होऊन तुम्ही म्हणता तसे होताना दिसते आहे.
हे बदलण्याकरता त्यापासून दूर पळून, वा त्यावर केवळ अन केवळ टीका करत राहून वा नै नै ते कायदे/वटहुकूम करुन उपयोग होणार नाही.
या प्रचंड उर्जेचा हा गुंता हळूवारपणेच सोडवावा लागेल.

पण यास कारण काय?
तर "अमके करा, ते योग्य, तमके करु नका, ते अयोग्य" असे सान्गू शकणारी / समुहाला दिशा देऊ शकणारी आदर्शवादी माणसे (अनेकविध कारणांनी) आपापल्या कोषात जाऊन बसली/त्यांना तसे बसावे लागले व स्वातंत्र्योत्तर काळात ही प्रक्रिया फारच वेगाने सर्वदूर झाल्याने निर्नायकी अवस्था प्राप्त होऊन तुम्ही म्हणता तसे होताना दिसते आहे.<<<

बहुतेक जाणीवपूर्वक किंवा कदाचित नकळत तुम्ही एका फारच मोठ्या विषयाला हात घालत आहात.

ही दिशा देऊ शकणारी माणसे स्वखुषीने कोषात जाऊन बसली हे मनाला पटत नाही. आदर्शवादाला होणारा विरोध सर्वच थरांमधून इतका व्यापक झाला की आदर्शवाद म्हणजे कमकुवतपणा असे समीकरणच जवळपास तयार झाले. किंबहुना, आदर्शवादी नसणे, उथळ, विलासी असणे व तसे वागणे हे सामर्थ्याचे चिन्ह होऊन बसले.

पुन्हा एकदा, साजिरांच्या पोस्टमधील 'कोणावरचा तरी कसला तरी राग, कसलेतरी असमाधान, कसलातरी कैफ आणि कसलीतरी अस्मिता' हीच शब्दरचना समर्पक वाटते.

काही गोष्टी त्वरीत बंद केल्या जायला हव्यातः

१ गणेशोत्सव अथवा कोणत्याही उत्सवात रेकॉर्ड्स लावणे, नृत्य करणे, रस्ते अडवणे, वीजेचा अतिरेकी वापर करणे, सार्वजनिक मालमत्तेस हानी पोहोचवणे व पाण्याचा अतिरेकी वापर करणे

२. रस्ते बंद करून, अडवून वा सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊन काहीही केलेले चालणार नाही.

३. वर्गणी मागणे (यात हल्ली जवळपास दमदाटीच होत आहे व असे अनुभवही आलेले आहेत).

इत्यादी स्वरुपाच्या गोष्टी!

व्होट बँक पोलिटीक्स!! एकाही नेत्याला सांगता येत नाही की हे बंद करा. हे सगळे अति होते पण हेच लोक पूजेची माळ कधी गोल टोपी घालून हा देव तो देव हा दर्गा करत बसले आहेत. त्यापेक्षा कायदा ११ वाजता आवाज बंद त्याआधी सगळे संपले पाहिजेल असे कोणालाही सांगायची धमक नाही आणि पोलिसांनी आणि न्यायालयाने सांगितले तर भावना दुखावतात म्हणून लोक टाहो फोडता आहेत. मग हे असेच चालायचे. चालता है अटीट्यूड नडते आहे.

>>मोकीमी, मी स्वतः गर्दी टाळतो, त्यातिल गलिच्छपणास नाके मुरडतो, पण म्हणून सरसकट गणेशोत्सव/मिरवणूका इत्यादी "नक्कोच" असे म्हणणे मला शक्य होणार नाही. ते सुधरवायचे, तर मला स्वतःलाही त्यातिलच एक भाग बनुन रस्त्यात उतरावे लागेल, न की दारेखिडक्या लावुन घरात कोन्डून घेऊन बाकी तमाम जन्तेच्या नावाने बोटे मोडीत बसणे योग्य. अन जोवर मी त्यात प्रत्यक्ष कृतीने उतरत नाही, तोवर अमक्यान्नी अमके केले पाहिजे वा तमक्यान्नी तमके केले पाहिजे असे उन्टावर बसुन शेळ्या हाकण्याचे सल्ले देणेही मला मानवत नाही.

+१००

[त्यातला त्यात सोपा मार्ग म्हणजे, 'माझ्यापुरते' मी हे सर्व टाळतो/टाळते हा बाफचा मूळ युक्तीवाद एकवेळ पटला तरी त्यातून फारसे काहीच बदलणारे नाही.]

खरा प्रश्ण हा कायदा व सुव्यवस्था आणि त्याहीपेक्षा अधिक सामाजिक बांधिलकी व जाणिवेचा आहे... त्या अनुशंगाने जोवर प्रयास व प्रबोधन होत नाही तोवर सर्वच ऊत्सवांचे हे 'असले' स्वरूप दिसतच राहील. जे पोलिस स्वतः देखिल वैयक्तीक पातळीवर बाप्पांच्या येण्याची आतुरतेने वाट पहात असतील त्यांनाच, विसर्जन झाल्यावर 'गेले एकदाचे' बाप्पा असा सुटकेचा श्वास घ्यावा लागत असेल तर यासारखे दुसरे सामाजिक दुर्दैव व विरोधाभास दुसरा नाही. भक्तीचे प्रदर्शन जितके केविलवाणे असते त्याहीपेक्षा त्याचा ऊपद्रव अधिक विघातक असतो. शेवटी ज्या समाजात सामान्य माणसाच्या डोक्यावर शेण व दगडांच्या डोक्यावर मुकूट असेल तो समाज रसातळाला गेल्याशिवाय रहाणार नाही असे मला वाटते. मुळात ज्या हेतूने लोकमांन्यांनी गणेशोत्सव सुरू केला त्याचे प्रयोजन आताच्या कालानुसार शिल्लक नसले तरी 'किमान' या एका ऊत्सवामूळे/ऊत्सवापुरता तरी समाज एकत्रीत आहे ही जमेची बाजू! तेव्हा त्याच्या मुळावर ऊठणे हे स्वता:च्या पायावर धोंडा मारण्यापेक्षा काही वेगळे नसेल. अन्यथा व्यक्ती, समाज, राष्ट्र यांत अक्षरशः प्रत्येक पायरीवर फूट पाडणारी आजची राजकीय व्यवस्था आधीच दुभंगलेल्या समाजाला एकएकटे चार भिंतीत पुरते गाडल्याशिवाय थांबणार नाही.

रच्याकने: कुणितरी म्हटले तसे "मी पंतप्रधान झालो तर.." हा असला विषय माबो वर निबंध स्पर्धा म्हणून घ्याच-- २०१४ च्या अनुशंगाने अगदीच योग्य ठरेल. गेला बाजार, २०१३ दिवाळी अंकासाठी तरी हा विषय ठेवा अशी संयोजकांना विनंती.

>>'कोणावरचा तरी कसला तरी राग, कसलेतरी असमाधान, कसलातरी कैफ आणि कसलीतरी अस्मिता' हीच शब्दरचना समर्पक वाटते.

साजिरा चा तो संपूर्ण लेख मला 'नकारात्मक' भावनेतून लिहीलेला वाटतो. गणेशोत्सवाला जाणारे अनेक जण सकारात्मक, श्रध्दा, भावना, कर्तव्य ई. जे काही आहे त्यासाठी देखिल जातातच. सर्वांनाच एकाच तराजूत तोलणारा तो लेख म्हणूनच अजीबात अपिल नाही झाला. मुद्दा योग्य असेल कदाचित जसा ईथे मोकीमी चा आहे पण दोन्ही लेख मांडताना मात्र निव्वळ दोषात्मक स्वरूपाने मांडले गेले आहेत. एरवी डॉ. व इस्पितळांच्या गलथान व भ्रष्टाचारी कारभारामूळे नाहक बळी जाणारे अनेक निष्पाप जीव असतातच.. म्हणून सर्वच ईस्पितळे 'बंद' करा हा युक्तीवाद होवू शकत नाही. ती फूट्पट्टी लावायची तर सगळीकडचे सर्वच बंद करून घरीच बसावे लागेल..
तेव्हा धर्म, भक्ती, ऊत्सव, प्रदर्शन, इ. सर्व बाजूला ठेवल्यास पुन्हा एकदा गाडी कायदा, सुव्यवस्था व सामाजिक बांधिलकी यावरच आली नाही का?

आदर्शवादाला होणारा विरोध सर्वच थरांमधून इतका व्यापक झाला की आदर्शवाद म्हणजे कमकुवतपणा असे समीकरणच जवळपास तयार झाले. <<
याचबरोबर आदर्श नक्की आदर्शच आहेत का हे तपासणेही सुरू झाले. त्यामुळे अनेक आदर्शांचे मोडतोड होणे अपरिहार्य ठरले.

असो.

याचबरोबर आदर्श नक्की आदर्शच आहेत का हे तपासणेही सुरू झाले. त्यामुळे अनेक आदर्शांचे मोडतोड होणे अपरिहार्य ठरले.<<<

हा मुद्दा योग्यच वाटला पण येथे थोडा अस्थानी वाटला. गणेशोत्सवांसारख्या सोहळ्यात सामान्य माणसाला होणारा त्रास आदर्श नाही याबद्दल कधी कोणाचे दुमत होणार नाही असे वाटते. किंवा, सार्वजनिक गणेशोत्सवात कोणालाच त्रास होऊ नये ही बाब आदर्श आहे की नाही यावर दुमत असू शकणार नाही असे वाटते.

अस्थानी आहेच कारण आदर्शांचा मुद्दा येथे येणेच मला थोडे अस्थानी वाटतेय.

गणेशोत्सवांसारख्या सोहळ्यात सामान्य माणसाला होणारा त्रास आदर्श नाही याबद्दल कधी कोणाचे दुमत होणार नाही असे वाटते. किंवा, सार्वजनिक गणेशोत्सवात कोणालाच त्रास होऊ नये ही बाब आदर्श आहे की नाही यावर दुमत असू शकणार नाही असे वाटते. <<
अर्थातच परंतू लिंटी जे आदर्श म्हणतो आहे ते यापेक्षा वेगळे असावेत असं वाटतं.
तसेच या मुद्द्यांबद्दल दुमत नाही पण "आम्ही अमुक एवढ्या स्पीकर्सची भिंत उभारतो म्हणून आम्ही जास्त भाविक. आणि भाविक आहोत म्हणून आम्हाला सगळं माफ" अशी वृत्ती कुठून येतेय?

"आम्ही अमुक एवढ्या स्पीकर्सची भिंत उभारतो म्हणून आम्ही जास्त भाविक. आणि भाविक आहोत म्हणून आम्हाला सगळं माफ" अशी वृत्ती कुठून येतेय?<<<

अशी वृत्ती येत आहे हे पटलेच.

कुठून येतेय<<< साजिराच्या पोस्टमध्ये एक मीमांसा आहेच. एकुणच संतापजनक आहे सगळे. साजिराची ती पोस्ट या लोकांना वाचायला दिली तर ती समजेल की नाही हाच प्रश्न वाटतो.

किमान' या एका ऊत्सवामूळे/ऊत्सवापुरता तरी समाज एकत्रीत आहे ही जमेची बाजू Uhoh
समाज एकत्रीत यावा यासाठी अशा पद्धतीचे उत्सव (??) साजरे करायचे??

आज एका चॅनेल वर दाखवत होते की 'लालबागच्या राजाच्या' विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा गैरफायदा घेऊन आंबटशौकिनांनी कशा प्रकारची कृत्ये केली. शी!! समाज एकत्रीत येण्यामागे हे नक्कीच अभिप्रेत नसावे नां ??

हो साजिर्‍याने केलेली कारणमिमांसा पटण्यासारखीच आहे. पण त्या असंतोषाचं मूळ आदर्श वागा सांगणारे व ऐकणारे लोक नाहीत यात आहे हा मुद्दा खूप ठिसूळ आणि different in each case असा वाटतोय.
असो. आत्ता जास्त वेळ नाही तेव्हा माझ्याकडून विराम.

हा फोटो बघा,,, मग बोला

असल काही होण्यापेक्षा बंद करा Angry

आता याचे समर्थन करणार असाल तुम्ही ----- आहात

उदयन, संतापजनक चित्रे, पण तुम्ही खाली लिहिलेला संदेश येथील कोणासाठी आहे?

अश्या गोष्टींचे कुठे कोण समर्थन करत आहे या धाग्यावर? उलट प्रत्येकाचेच मत हे आहे की हे सगळे बंद पडावे.

गणेशोत्सव/मिरवणूका इत्यादी "नक्कोच" असे म्हणणे मला शक्य होणार नाही. ते सुधरवायचे, तर मला स्वतःलाही त्यातिलच एक भाग बनुन रस्त्यात उतरावे लागेल, न की दारेखिडक्या लावुन घरात कोन्डून घेऊन बाकी तमाम जन्तेच्या नावाने बोटे मोडीत बसणे योग्य. >>

+1

तर "अमके करा, ते योग्य, तमके करु नका, ते अयोग्य" असे सान्गू शकणारी / समुहाला दिशा देऊ शकणारी आदर्शवादी माणसे (अनेकविध कारणांनी) आपापल्या कोषात जाऊन बसली/त्यांना तसे बसावे लागले >> परत +१

त्यामुळे जेंव्हा गणपतीच्या वेळेस देशात असेल तेंव्हा त्या गर्दीत सामिल झालो आहे. आणि कायदा / सुव्यवस्था पाळली आहे.

बंद करा हे म्हणने खूपच सोपे असते. (त्यामूळे फार तर भडास निघते) पण योगने वर लिहिल्यासारखे त्यातून काहीही फरक पडत नाही. दर गणपतीला असे बाफ निघतच राहितल. आणि भडासूंची संख्या ( बरेचदा मी ही तुमच्याच बोटीत सामिल असतो) वाढत राहिल पण त्याने काही फरक पडत नाही तर उलट आपण त्यांना तशी गर्दी वाढविण्याचे मोकाट रान देतो.

रुट कॉज जर नष्ट केला ( आर्थिक दरी, असंतोष) तर हेच सण / मिरवणूका खूप वेगळ्या प्रमाणात समोर येतील. लक्ष्मी रोड वरील मानाच्या काही गणपतींची मिरवणूक कधी रस्तावर येऊन बघीतली का? त्यात अजिबात हुल्लडबाजी नसते. तिथे असते मोस्टली गणपतीचे पवित्र वातावरण आणि खूप गर्दी. पण सगळं उत्तम.

दिवसेंदिवस मोठ मोठ्या होणार्‍या स्पिकरच्या भिंती पाहिल्यावर कोणीही नकारात्मक विचार करू शकते हे मान्य. पण उत्सव बंद करण्यापेक्षा त्या भिंती कायद्याने बंद करू शकतो. माझ्या मते मिरवणूकीतील गैरप्रकार ( खूप मोठ्या भिंती बंद, एका डेसिबल च्या पुढे वाजविण्यास बंदी, दारू वर बंदी ) बंद केले (खरोखर) तर ह्याच मिरवणूकी वेगळ्या भासतील. उदाहारणार्थ कसब्याची मिरवणूक पाहिल्यावर (सामिल होऊन) आणि तसे सण साजरे झाले तर मला वाटतं इथे नको म्हणणारे पण होच म्हणतील.

रोजगार हा मुद्दा फसवा आहे असे साजिराचे म्हणने वाचले. मला नाही पटत. सणांचे अर्थकारण बघितले तर डोळे फिरतील इतका पैसा असतो. आणि गणपती म्हणजे दहा दिवस असे नसते तर ते पूर्ण दोन महिन्यांच्यावरचे अर्थकारण आहे. त्यापुढे लगेच दसरा आणि दिवाळीचे महिने जोडले तर जुलै ते नोव्हेंबर लाखो माणसांना रोजगार मिळतो. हा फसवा आहे हे वाक्यच मला फसवे वाटते साजिरा. पण ते तुझे मत असू शकते हे मान्य.

इब्लिसांचे रोजगारावरील पोस्ट - सिरियसली इब्लिस?

मला खरे वाटत नाही. याचे कोणीही समर्थन करणार नाही उदयन, अर्थात, तुमचे म्हणणे आहे म्हणजे नक्कीच वेटेज असणार.

हा फोटो बघा,,, मग बोला

असल काही होण्यापेक्षा बंद करा राग

आता याचे समर्थन करणार असाल तुम्ही ----- आहात >>
उदयन,
हे करणारा माणूस गणेशोत्सव बंद झाल्यावर सुधारणार आहे का ?
फक्त एकदाच मी पुण्यात आल्यावर बायकोबरोबर बस मधे चढलो होतो .
आठवड्याच्या आत तिला स्कूटी घेऊन दिली.
मुंबईच्या ट्रेन तर बोलायलाच नको .

तुम्ही रूट कॉज समजून घेत नाही आहात.
गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन त्याने छेड काढली नाही तर
गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन त्याने छेड काढली

अरे सण/ उत्सव बंद करा असे कुणीच म्हणत नाहीये तर त्या आड येणारी ही विकृती बंद करा असे सर्वांचे म्हणणे आहे. मा. लो. टिळकांनी हा उत्सव सुरु करतांना कधीही अशी अपेक्षा केली नसेल की हा सण असा ( म्हणजे यातले वातावरण ) विकृतीकडे झुकेल. ते म्हणाले का की तुम्ही गणपती आणतांना आणी निरोपाच्या वेळी मोठ्ठाले डिज्जे घेऊन, दारु पिऊन अचकट विचकट नाचत बायकांची/ पोरीबाळीची छेड काढा.

केदार तुमचे बरोबर आहे. त्या मवाल्याने गर्दीचा फायदा घेतलाय, उत्सवाचा नव्हे.

मोहन की मीरा , अगदी मनातलं बोललात.

>> मी तर म्हणेन की हे पैसे जर विधायक कामा कडे गेले तर जास्त रोजगार उपलब्ध होइल.....+१०००००००००

साजिरा , अतिशय छान पोस्ट.

>>किमान' या एका ऊत्सवामूळे/ऊत्सवापुरता तरी समाज एकत्रीत आहे ही जमेची बाजू अ ओ, आता काय करायचं
समाज एकत्रीत यावा यासाठी अशा पद्धतीचे उत्सव (??) साजरे करायचे??

भ्रमर,
हा माझ्या पोस्टचा सोयिस्कर विपर्यास झाला.. Happy 'अशा' प्रकारचे ऊत्सव त्यासाठी साजरे करायचे असा अर्थ मला स्वप्नातही सुचला नसता. तुम्हालाही सुचणार नाही अशी आशा आहे. असो.

तेव्हा मूळ मुद्दा कायम ठेवून पुढे चलावे.. त्यापैकी एक आहे की 'विकृती' ही या अशा ऊत्सवाला लागलेली खोड्/कीड आहे. त्याचा ऊपाय करायला खरे तर 'सजग' नागरीक व प्रसंगी पोलिस दांडूक्याचा एक रट्टा बसेल एव्हडा किमान धाक देखिल पुरेसा आहे. पण.......................................

वरील काही पोस्टींतील मुद्देच मूळ मुद्द्यांना हात घालत आहेत बाकी बहुतांशी 'नको ही कटकट व अपव्यय' या भावनिक अनुशंगाने अधिक आहेत. केदार व लिंबू च्या पोष्टी संतुलीत वाटतात.

वाचते आहे. दरवर्षीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. पुण्यात सदाशिव पेठेतल्या वास्तव्यात चार खोल्यांतून ५ गणेशमंडळांचे आवाज पहाटे/ सायंकाळी/ रात्री उशीरापर्यंत यायचेच यायचे. गर्दी, कचरा, अस्वच्छता, गजबजाट हे तर होतेच. आता राहते त्या भागातही गणेशोत्सवात सकाळी - सायंकाळी - रात्री वेगवेगळ्या खोल्यांमधून वेगवेगळ्या गणपतींचे आवाज + मिरवणुकीसाठी केलेली ढोलताशाची महिना महिना प्रॅक्टिस + मिरवणुकीच्या वेळी कानठळ्या बसविणारी गाणी, स्पीकर्स भिंती, ढोल-ताशे, फटाके, रस्त्यावर कचरा, अस्वच्छता, गुलाल वगैरे हे असतेच असते!

कायद्याचे पालन करायला सांगणे किंवा तशी अपेक्षा करणे, कायद्याचा वचक असणे हा गणपतीमंडळांच्या बाबतीत एक विनोदच म्हणावा लागेल. अनेक गणपती मंडळांचे कोणा ना कोणा नगरसेवक/ खासदार/ आमदार अथवा राजकारणी इट्टुपिट्टूंशी, किंवा राजकारण्यांनी पोसलेल्या इमानदार लोकसेवकांशी - गावगुंडांशी लागेबांधे असतात. जर नसतील तर कोणा अशा 'बुजुर्गां'ना मानाचे स्थान देऊन गणेशमंडळ कमिटीत घेतलेले असते. त्यांचा वरदहस्त असल्यावर पोलिसांची काय तमा? कायद्याची काय भीती? पोलिसांनी कारवाई केली की 'वरून' फोन येतो. राजकीय हस्तक्षेप होतात. वातावरण तंग होणे, मारहाण इत्यादी प्रकार उत्सवाच्या काळात पोलिस यंत्रणेवर आणखी ताण आणतात. अपुरे पोलिस दल, त्यांच्यावर गणपती उत्सवाच्या दरम्यान १५-१५ दिवसांपासून असलेला ताण, कामाचे वेळापत्रक आणि कामाची व्याप्ती हे पाहिल्यावर मला तर मनापासून असे वाटते की पोलिस यंत्रणांनी अशा उत्सवांना, गणपती मंडळांना, मिरवणुकीला सुरक्षा देणेच थांबवावे. सध्याच्या काळात जर सार्वजनिक उत्सव करायचा असेल तर त्या प्रमाणात सुरक्षा हवी. आणि तशी ती कधीच नसते. एकीकडे अतिरेक्यांचे भय, दुसरीकडे खोळंबलेली वाहतूक, तिसरीकडे कमालीच्या गर्दीत-रेटारेटीत आणि चेंगराचेंगरीतही गणपतीबाप्पाचे ''दर्शन घ्यायचेच'' म्हणून घुसणारे बाप्ये-बाया-म्हातारे-लहान पोरे, चौथीकडे खिसेकापू-भुरटे चोर इत्यादी.... इतक्या तणावात ते कसं काय काम करतात याचंच नवल वाटतं!

आमच्या इथे रात्री १० / १२ च्या पुढे ढिंकच्यांग गाणी लाऊडस्पीकरवरून सुरु असतील तर मी लगेच पोलिस कंट्रोल रूमला फोन करते. आता आमचे संवाद आणि पोलिसांची कारवाई आणि त्यावर गणपती मंडळांची चलाखी हेही पाठ झाले आहे. तरी ते करत राहायचे. पोलिसांची गाडी दूरवर दिसली की गणपती मंडळाच्या लाऊडस्पीकरचा आवाज आपोआप कमी होतो. पोलिस येईपर्यंत तो खूपच कमी झालेला असतो. ते येतात, दटावतात, समज देतात वगैरे वगैरे. गस्त घालतात. पंधरा-वीस मिनिटे त्या परिसरात थांबतात. अर्ध्या तासाने त्यांची गाडी गेली की गाणी परत बुंगाट सुरूच! क्वचित प्रसंगी पोलिस लाऊडस्पीकर, सिस्टीम इत्यादी ताब्यात घेतात. दुसर्‍या दिवशी पहाटे कोठूनतरी दुसरीकडून तजवीज करून पुन्हा गाणी वगैरे सुरु... काही दिवसांत 'वरची' ओळख वापरून - दंड वगैरे भरून 'वरिजनल' सिस्टीम परत ताब्यात घेतली जाते. परिणाम? शून्य!!!

या संपूर्ण पोस्ट मध्ये धर्माचा उल्लेख करावासा वाटलेला नाही. कारण त्याचा आणि उत्सवांचा काही संबंध आहे असं वाटलंच नाही.. काय चालू आहे हेच फक्त लिहीतो.

एकोणीसशे नव्वद च्या दरम्यान अशाच एका मंडळात असताना आपण खूप काहीतरी महत्वाचे आहोत असं वाटत होतं. अर्ध्या चड्डीत पाहीलेल्यांनी जवळ येऊन महत्वाचे प्रश्न विचारावेत म्हणजे आपण काहीतरी जबाबदार पदावर आहोत असं वाटायचं. पण पुढे दंगली झाल्या नि प्रत्येक मंडळाच्या पदाधिका-यांना पोलीस स्टेशनला बोलावणं येऊ लागलं. कायदेशीर भानगडी खूप असतात हे लक्षात आल्यावर सुदैवाने ती नशा काही डोक्यात शिरली नाही आणि कॉलेजशिक्षण पार पडलं. मंडळात कायम राहीलेला एक मित्र वैफल्यग्रस्त आहे. काही निवडणुकीला उभे राहीले. त्यातला एक जण नगरसेवकही झाला होता. पण ती मुलं खूपच सौम्य होती. आताचं स्वरूप संपूर्ण वेगळं आहे. मंडळ म्हणजे त्या भागाटली यूथ हे पक्क माहीत असल्याने सगळेच पुढारी मंडळांना आकर्षित करायला पाहतात. आम्ही वेड्यासारखं फक्त क्रिकेटचं साहीत्य घेतलं होतं.. बरंच काही मिळू शकत असताना Lol शहराच्या मुख्य भागात कार्यकर्ते वेगळे आणि रहिवासी वेगळे असं समीकरणच झालंय. पूर्वी मदतीला धावून येणारे लोक असा मंडळांचा लौकिक होता. आता असंगाशी संग नको म्हणून त्यांची मदतसुद्धा नको असं म्हणतात.

टाऊनशीपमधे आल्यापासून मंडळ हे फक्त उत्सवासाठीच असतं हे कळलं. सगळेच कुटुंबवत्सल असल्याने न्युसन्स नाही. शहरालगतच्या भागात तर काही विचारूच नये. गुंठेमंत्र्यांकडे आलेला पैसा, त्यातून आलेली गुर्मी, न कळतं वय आणि स्पर्धा. एकच मंडळ सगळे सण करतं. प्रसिद्ध होणे हा एकमेव उद्देश असतो. इथे प्रत्येकाला निवडणूक लढवायची असते. तेव्हढी ताकदही असते आणि बाळकडूही. लहान लहान मुलांचे भले मोठे फ्लेक्स लागतात. एकजण तर फ्लेक्स लावून लावून युवा नेता बनलाय. चेहरा एकदम बावळटासारखा. पुढचे दोन दात बाहेर, खूप दिवस न धुतल्यासारख्या केसांचा कपाळावर बटा येणारा कट, गळ्यात काळा दोरा, ताईत, दाढीचे कोवळे पण अस्ताव्यस्त खुंट. दहावीचा निकाल लागला कि अभिनंदनाचा फ्लेक्स, परीक्षा आली सुयश चिंतनाचा फ्लेस. दहीहंडी, शिवजयंती, नवरात्र, दिवाळी, विठ्ठलभक्तांचे स्वागत हे तर असतातच. पण खरी लगबग असते ती गणेशोत्सवात. लोकांवर ओरडणे, गर्दीत फटकावणे, उगाचच रहदारी नियंत्रित करणे, रात्रीचा तरल बंदोबस्त ठेवणे इ.इ. अनेक कामं असतात.

स्वतःचं लग्न ठरलं त्याचा फ्लेक्स पण लागला होता. हाईट म्हणजे स्वतःच स्वतःच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. लग्नानंतर आभाराचा आणि हनिमूनला जात असल्याचा फ्लेक्सही होता. एकदा तर कसं काय मंडळी बरं आहे का ? अशी लाईन असलेला फ्लेक्स लावला होता. आम्ही बरेच दिवस विचार करत होतो, काय प्रयोजन असावं याचं. शेवटी हरलो म्हणून विचारलं तर मख्खपणे म्हणाला... सहजच !

तर हे असं पब्लिकच्या डोळ्यासमोर रहायचं तंत्र. बरं अक्कलशून्य म्हणावं तर स्वार्थ बरोब्बर कळतो. स्वार्थाचं घाणेरडं राजकारण इतकं कोळून पिलेले असतात कि आपण एव्हढे घोडे झालो पण फुकट गेला जन्म असं वाटतं.

हे असे लोक कर्तेधर्ते असतील तर कसल्या अपेक्षा ठेवणार ? बरं, उत्सवातली कंत्राटं गरीब मुलांना देऊन पुढं आणता येतील अशी कल्पना मांडली तर भ च्या भाषेत उद्धार ! आम्ही राबतो ही भावना.. आमच्यामुळे सगळं चाललंय ही कल्पना असते. आधीच गब्बर असलेले हे लोक पाच पैसे सुद्धा सोडत नाहीत. म्हणूनच उत्सवामुळे पैशाचं झिरपणं होईल वगैरे काही नसतं. जी कामं त्यांच्या आन, बान आणि शान के खिलाफ आहेत तीच इतरांना जातात. त्याचे पैसे मिळण्यासाठी अक्षरशः गयावया करावी लागते.

उत्सव म्हणजे नेमकं कुणाला आपण पोसतो हा विचार झाला तरी खूप्प. मी तर म्हणतो सध्याच या मंडळांना ( आणि आता जागोजागी निघत असलेल्या क्लब्जला ) वर्गणीची काही एक गरज नाही. त्यांचं अर्थशास्त्र डेव्हलप झालेलं आहे त्याचबरोबर समाजाभिमुख असणं लोप पावत चाललेलं आहे.

पोस्ट अवांतर वाटल्यास माफ करा. शेअर करावंसं वाटलं...

आमच्याकडे गणपती मंडळांनी वर्गणीसाठी येणं गेले २-३ वर्षे थांबवलं आहे. पण अनेक गणपती मंडळांना आजकाल खासगी प्रायोजकत्व असते. जवळच्या एका मंडळाने तीन लाख रुपये खर्च करून निम्मा रस्ता अडविणारा भव्य दिव्य चमचमणारा देखावा भर चौकात उभा केला होता. व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक आणि नगरसेवक वगैरेंच्या माध्यमातून बहुतांशी खर्च परस्पर निघाला.

मजा वाटते ती लहानशा गणपतीच्या मूर्तीसाठी भलाथोरला मांडव घालून रस्ता अडविला जातो तेव्हा! मंचावर इटुकल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीखेरीज काहीही नसते, पण सोबत भिंती हादरविणार्‍या स्पीकर्सच्या भिंती उभ्या राहतात, रात्री 'जागविल्या' जातात, मिरवणूक तर इतकी डामडौलात असते की बस्स!

उद्दाम हसेन>> १००००++ सदशिवातील किमान ५ एक मंडळांना एके काळी घासाघीस करून वर्गणी दिली पण ते लोक अडीअडचणीला पूर्वी मदतीला यायचे. आताचे इतके उन्मत्त आहेत की ज्याचे नाव ते. मांडवाखाली काय काय चालते हे एकदा वरच्या स्वामींना बघा म्हणावे म्हणजे कदाचित डोळे उघडतील. .

>>>>गणेशोत्सव सुरू केला त्याचे प्रयोजन आताच्या कालानुसार शिल्लक नसले तरी 'किमान' या एका ऊत्सवामूळे/ऊत्सवापुरता तरी समाज एकत्रीत आहे ही जमेची बाजू!<<<<

योग,
‘समाज एकत्रीत येवून? आणि हा एकत्रीत आलेला कुठला समाज आहे आताच्या काळात असा? बहकलेला, उर्मट, उन्मादाचा कैफ चढलेला समाज एकत्रीत येवून नक्की काय साध्य होते?( हजारांच्या तुलनेत काही मोजकेच अपवादीत मंडळे काही काम करत असतील तर ती सोडून..)
हे म्हणजे अगदी, असे सण आताच्या काळात नाही केले तर समाजबुडी होइल. लोकं एकत्रीत येण्याची भावना नष्ट होइल? असे संस्कृतीरक्षक टाईप वाटते. बरं, सामान्य माणसाच्या हातात फक्त बोटं मोडत घरीच बसायचे ऑपशन उरते कारण ह्या मंडळाला असलेले गुंड/नेत्याचा सपोर्ट.

तुम्ही सुद्धा आताच्या घडीला अश्या कोणा गणपती/नवरात्र मंडळाच्या प्रमुखाला भेटून तुमचे स्वप्नरंजित प्रबोधन केले असल्यास नक्कीच वाचायला आवडेल... कारण तुम्ही नुसतेच उंटावरच्या शेळ्या हाकणारे दिसत नाहीत (लिखाणावरून ..)
जोवर सामान्य नागरीक म्हणून असताना जबरदस्त वैयक्तिक लॉस/फटका(वरच्या उदाहरणात लिहिलेला, काका वेळेवर पोचु शकले नाहीत गर्दीमुळे... वगैरे) बसत नाही तोवर असले बरेच युक्तीवाद करणारी असतात... समाज बुडेल, धार्मिक भावना दुखावतील... वगैरे. वगैरे.
ह्या अश्या गर्दी निर्माण करून रोजचे जीवन आणखी कठीण बनवणार्‍या व काहीच सामाजिक बांधिलकी( आजारी माणसाला जायला जागा, स्पीकर कमी ) नसणार्‍या सो कॉल्ड एकत्रीत समाजाची चीडच येणार. आणि म्हणून वाटते की हे सणच बंद करावे सार्वजनिक रित्या तरी.

गणेशोत्सव हा जरी विनयभंग होण्याचं कारण नसले तरी काही नराधमांना आणखी एक ओपन संधी असते अशी गर्दीची ठिकाणं उपलब्ध करून देवून हे नसे थोडके. लक्ष्मीरोडवर चालताना इतका त्रास होतो ह्या काळात कारण असली टवाळ लोकं दर्शानाच्या निमित्ताने लोढें करून उभी असतात/चालत असतात. त्यातून मार्ग काढून बायकांनी जायचे. रिक्षावाले तसेही माजले असतातच...(करु दे तो ज्यास्तीचा धंदा.. पण एकही रीक्षावाला तयार नसतो गणपती दर्शनाच्या ठिकाणी नसेल जायचे तर... वगैरे..)

नुसते एखाद्या मंडळाला पर्यावरणाचा मुद्दा जरी कोणी समजावून सांगू शकतो का? इतकी गुंड प्रवृती आहे. काय्च्या काय मोठ्या मुर्त्या... डेकोरेशन... करून वाट लावलेले रस्ते....

>>>खरा प्रश्ण हा कायदा व सुव्यवस्था आणि त्याहीपेक्षा अधिक सामाजिक बांधिलकी व जाणिवेचा आहे... त्या अनुशंगाने जोवर प्रयास व प्रबोधन होत नाही तोवर सर्वच ऊत्सवांचे हे 'असले' स्वरूप दिसतच राहील.<<<<

वरती लिहिले तसे तुमचे समाज प्रबोधनाचे अनुभव वाचायला आवडतील.

तुम्ही, 'मी पंतप्रधान झाल्यावर ..' ह्या विषयावरच्या २०१४ निंबध स्पर्धेत भाग घेवू शकता, ते जाहीर आमंत्रण असेल. तेव्हा नक्कीच ह्या वरच्या प्रश्णाला कसा हात घालाल... व समाज प्रबोधन घडवून आणाल ते वाचायला आवडेल.
तुम्हाला शुभेच्छा!

Pages