आपले सण - बदलाची गरज

Submitted by मोहन की मीरा on 19 September, 2013 - 00:33

सध्याच गणपती उत्सव झाला. साधरण श्रावण आला की सणांचा हंगाम सुरु होतो. पण सध्या प्रत्येक सणाचं मार्केटिंग झाल्या मुळे सण म्हणजे वैताग, ट्रॅफिक, गर्दी हेच डोक्यात.

साधी मंगळागौर सुध्धा प्रोफेशनल बायकांचा चमु बोलावुन " साजरी" केली जाते. त्यात मग मंगळागौर असलेली मुलगी बजुलाच रहाते, त्या बायकाच त्यांचे ठरलेले "इव्हेंट" करुन जेवुन निघुन जातात. तो "खेळ" व "मेळ" नसुन फक्त एक पर्फॉर्मन्स फक्त उरतो.

तिच गत दहिहंडी आणि गणेश उत्सवा ची.... दहिहंडी तर काही लोकांनी अगदी "साता समुद्रा "पार नेली. किती तो गोंधळ, किती आरडा ओरडा... रस्त्यात अडवणूक.... भर रस्त्यात ठिय्या.... ठाण्यात तर सुप्रसिध्ध हंडी व हंडी कर्त्यांच्या मुजोरीला तोड नाही. सतत कलकल....

दहिहंडीच्या काळात असेच टि. व्ही. वर काहीतरी पहात होते. मुलगी मैत्रिणीलाफोन करत होती. मैत्रिण बहुदा घरात नव्हती. मग दुसर्‍या दिवशी तिने परत फोन केला. तेंव्हा कळले की ती मैत्रिण ठाण्यातल्या "त्या" सु(?) प्रसिद्ध हंडी जिथे बांधतात त्याच इमारती मधे रहाते. ज्या दिवशी हंडी असे त्या दिवशी ते सगळं कुटूंबं मुलुंडला त्यांच्या आजीकडे निघुन जातं..... का? कारण हादरे बसतिल असं संगित आणि भयानक आवाज, घाण, गर्दी. ह्या सोसायटीने कायदेशीर रित्या लढा देण्याचा प्रयत्न केला होता. पण आर्थातच तो विरुन गेला...

गणेशौत्सव हा ह्या सगळ्या गोंधळाचा राजा !!!! ११ दिवस उत आल्या प्रमाणे लोकं वावरतात. त्यात सिव्हिक सेंन्स नावाच्या गोष्टीचं भानच नाही. आमच्या एरियात ठाणे पालिकेची एक बस येते. गणपतीचा मंडप बस स्टॉप वरच बांधल्या मुळे ह्या कालावधीत ही बस आत येत नाही. ११ दिवस गणपती चे + मंडप बांधायला लागणारे पहिले २० दिवस+ मंडप काढायला लाग्णारे पुढले २०/२५ दिवस.... बरं गणपती मंडळचे सर्वेसर्वा माजीमहापौर..... मग बोलणार कोणाला......

आज योगेशने काढलेले लालबागच्या राजाचे फोटो पाहिले आणि एक कळ मनात उठली ( जिप्सी फोटो अप्रतिम आहेत रे!!!) . ह्या काळात दादर्/परळ्/लालबाग ह्या एरियात रहाणं म्हणजे शिक्षा आहे... ( लग्न होवुन जेंव्हा परळला गेले त्या वर्षी मजा वाटली नंतर मात्र घी देखा पण बडगा नही देखा अशी अवस्था झाली). माझं हे विधान अनेकांना पटणार नाही. पण हे खरं आहे. ही गणेशौत्सवाची गर्दी पाहिली की ३ वर्षां पुर्वी चा प्रसंग लख्ख आठवतो. आमचे मामा हिंदमाता जवळ रहातात. असेच उत्सवी दिवस. त्यांना घरात अस्वस्थ वाटु लागलं म्हणुन तातडीने त्यांना टॅक्सीने के.इ.एम. ला नेण्या साठी मामी निघाल्या. गर्दी अणि गोंगाटा मुळे हिंदमाता ते के.इ.एम. ह्या एरवी चालत १० मिनिटे लागणार्‍या अंतराला त्या दिवशी टॅक्सीने २५ मिनिटं लागली. आणि के.इ.एम ला मामांचं प्रेत पोहोचलं..... टॅक्सीतच ते ६१ वर्षांचे मामा वारले. बायकोच्या शेजारी!!!! त्या पुढचे हाल मी लिहित नाही.

एखाद्याचा जीव गमवावा लागणं ह्या पेक्षा सण साजरे करणं तेही जाहिर रित्या... गरजेचं आहे का. आपणच जर अश्या ठिकाणांना जाणं थांबवलं तर आपोआपच हे उपक्रम बंद पडतिल. हा गोंधळ, गडबड, आरोप, पैश्याची उधळण.... खरच गरज आहे का? आजच्या मंदीच्या काळात हे भान आपण नाही ठेवायचं तर कोणी? बाकी राजकारण आणि त्यातली माणसं ह्यांवर न बोलणंच बरं.....

मी स्वतः कधीच गर्दी मधे देवदर्शन करायला जात नाही. लोकांचं माहिती नाही पण आम्ही आमच्या कुटूंबा साठी अलिखित नियम बनवले आहेत.. सर्व संमतीने
१. जिथे कुठे गर्दी असेल अश्या ठिकाणी देव दर्शनाला न जाणे. उदा. सिद्धीविनायक, महालक्ष्मी, कोल्हापुर ची देवी, तुळजापुरची देवी ( आमची कुलस्वामिनी), हरिद्वार( आमचे खाजगी घाट तिकडे आहेत), तुरुपती, कोणताही सार्वजनिक गणपती जो रस्त्यात मंडप बांधुन बसवला आहे, रस्त्यांवरचा गरबा, कोणताही सार्वजनिक उत्सव. इ.इ.इ.

२. देवळात जायचेच असेल तर गावदेवी किंवा शांत अश्या एखाद्या मंदिरात जाणे.

३. आपले अध्यात्म आपल्या पुरते. आमच्या घरातल्या दिड दिवसाच्या गणपतीला साधारण ७० ते ८० माणसे येतात. त्या काळात आम्ही खुप खुश असतो. अगदी उत्सवाची मजा घेतो. मग उरलेले ४-५ दिवस रोज संध्याकाळी आम्ही खुप लोकांकडे जातो. खुप गंमत येते. ह्याकाळात या वर्षे दोन फार छान गाण्यांचे कार्येक्रम पदरी पडले. खुप मजा आली.

४. जिथे जिथे राजकिय पक्षांचा हस्तक्षेप आहे असे उपक्रम, उत्सव, स्पर्धा ( माझी मुलगी व्क्तृत्व आणि अभिनय स्पर्धां मधुन नेहेमेच भाग घेते), कार्येक्रम टाळणे.

५. शक्यतो जिकडे राजकारणी व्यक्ति आहेत अशा संस्थां ची कोणतीच कामे न करणं. ( मी स्वतः तीन चार समाजिक संस्थांचे ऑडिट विनामुल्य करते)

कदाचित माझे विचार तुम्हाला पटणार नहित. इकडे कोणा माणसावर टिका कींवा आरोप करायचे नहित. पण एकंदरच ह्या बाबतित काय विचार आहेत ते जाणुन घ्यायचे आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीरा, अगदी मनातले लिहिलेत.

स्वामीजी, घरादारावर तुळशीपत्र ठेवणे या वाक्प्रचाराचा तुम्ही लावलेला अर्थ सांगणार का?

स्वामीजींचा प्रतिसाद वाचताना डोक्यात विचार आला की आताच्या काळात वारकर्‍यांनी पायी जाण्याऐवजी एसटीने प्रवास केला तर काय बिघडेल?

इथेच विचारणे योग्य वाटले म्हणुन विचारत आहे...
आम्ही शाडु माती चे गणपती आणतो .. त्या मुर्ती नक्की एको फ्रेंडलि असतात ना?
कोकणात असतो आम्ही गणपती उत्सवात..

स्वामीजी,

फार मजेदार प्रतिसाद आहे. माफ करा पण मुळीच पटला नाही.

लोक मोक्षाची कामना करण्याकरिता देवाकडे जातात.
>>
हे असे रांगेत ढकलाढकली करुन, मोठ्मोठे पुतळे स्थापून आणि नंतर समुद्रात टाकून देऊन (हो, जरा नीट बघा कसे सोडतात ते, त्याला विसर्जन म्हणूच शकत नाही), मिरवणूकीत थयाथया नाचणे, यात्रांना जाऊन एकाद्या गावाची, शहराची अवस्था अगदी बकाल करणे ही मोक्षाची साधने आहेत?

बाकीच्यांनी घरी बसून हात जोडले तरी चालतात
>>
आम्ही तेच करतो.

तुम्हा भाविक भक्तांच्या आणि मंडळांच्या शिस्तप्रिय कार्यकर्त्यांच्या राड्यात निष्कारण देव आणि धर्म मात्र भरडल्या जातो
>>
देव आणि धर्म कसा भरडला जातोय ते सांगा.

अशा उत्सवात आपल्याला सहभागी होयाचं की नाही हे आपण ठरवुन शकतो.... आपण गेलो किंवा नाही गेलो तरी गर्दीला काहीच फरक पडणार नाही.... अशा उत्सावाच्या कारणाने लोक एकत्र येतात हेच महत्वाचे... नाहीतर काहीना उगाच आपल्या घरात कोंडुन घेण्याची सवय असते.... तसेच काहींना कोणत्याही गोष्टीचा त्रास होतो.. तसा त्यांचा स्वभावच बनुन जातो.... अशा उत्सावामुळे हजारोंना रोजगार मिळतो हेही विसरुन चालणार नाही... पुढे नवरात्री येत आहे....

लोकहो...

मस्त चर्चा चालली आहे. फेरफटका +१

स्वामिजी.... आपल्या प्रतिक्रिये वर एकच उत्तर

"आपलं आध्यात्म आपल्या कडे"

त्याचा बाजार कशाला? देवदर्शन धक्का बुक्कीत झालं कीच तो देव भेटतो का? शांत देवळात नाही का? मी तर म्हणीन ज्यांना असा देवळात देव शोधावा लागतो त्यांचीच अधात्मिक प्रगती झालेली नाही. ज्ञानेश्वरांनी भिंत चलवली म्हणुन ते मोठे नाहित, तर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जगणं शिकवलं, आणि कार्य संपल्यावर सुज्ञ पणे जीवन संपवलं सुद्धा... म्हणुन ते मोठे. त्यांनी आपल्या लिखाणात कुठेही देवळात जा, पुजा करा असे सांगितले नाही.... वारकरी परंपरा ह्याच ज्ञानेस्वर आणि तूकारामांना मानते ना.... दोघेही मानसिक भक्तीचाच पूरस्कार करतात.... जगण्याचं मर्म सांगतात... ते ही प्रपंचात राहुन.... इश्वर भक्ती सोपी नाही... हे तर उघड सत्य आहे. आज अनेक देवळांच्या बडव्यांनी ती विकत घेतल्या सारखे त्यांना वाटते.....

एकदा मनापासून एखाद्या देवाचं नामस्मरण करुन पहा.. मना पासून कोणाला तरी माफ करुन बघा.... बघा एक वेगळीच अनुभुती मिळेल....... देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेलच......

अशा उत्सावामुळे हजारोंना रोजगार मिळतो हेही विसरुन चालणार नाही... >>>>

मी तर म्हणेन की हे पैसे जर विधायक कामा कडे गेले तर जास्त रोजगार उपलब्ध होइल.....

आजच ह्या गणेशौत्सवातल्या विजेच्या उधळपट्टीचा आम्हाला फटका बसाला.... एका मंडळाने रस्त्यावरच्या गणपती साठी डायरेक्ट एरियातल्या मोठ्या इलेक्ट्रिकइलेक्ट्रिक्विज पूरवठा घेतला. पहाटे २.३० ला मोठी आग लागली. आमच्या बिलिंगच्या मागेच.... आगी चे दोन बंब बोलावले. एरिया चे लाइट २.३० ते ४.३० बंद होते. अत्ताही गेले २ तास लाइट नव्हते. एम.एस.सी.बी. मधुन मिळालेली माहिती.....

मीराजी, खुप छान लिहिलेत.

साजिरा, आपली पोस्ट पुन्हा टाकु शकाल कां??

अशा उत्सावामुळे हजारोंना रोजगार मिळतो हेही विसरुन चालणार नाही... >>>>

उत्सवांनिमित्ताने चालणार्‍या पालथ्या धंद्यांना रोजगार म्हणायचे असेल तर असेलही बुवा.
सरकारने खंडणी उद्योगासाठी रोजगार हमी योजना जाहीर करावी , अशी मी सोनियाजीना विनंती करतो.

मोकिमीचे मुद्दे सगळे योग्यच आहेत.

आरास, ढोलपथके, छोटेमोठे खादाडीचे स्टॉल्स हे सगळे पालथे धंदे आहेत हे नवीनच कळले.

मोकिमी... अगदी माझ्याच मनातील बोललात.

जिथे कुठे गर्दी असेल अश्या ठिकाणी देव दर्शनाला न जाणे.
आपले अध्यात्म आपल्या पुरते. >>>>>>>>>> +१११११११११

मोकिमी
अगदी मनातल बोललात. राखीसीजी यांनी पण त्यांच्या धाग्यावर चांगले विचार मांडले आहेत.लो.टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सावाचा हेतु समाज जागृती व समाजप्रबोधनाचा होता.आज ते स्वरुप दुर्दैवाने राहिले नाही. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली केलेला समूहउन्माद अशा स्वरुपात आज ते दिसते आहे. समूह उन्मादात सारासार विवेक व विचार नष्ट झालेला असतो.अशा काळात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलोस यंत्रणेला जिकिरीचे बनते

डॉ नरेंद्र दाभोलकर आपल्या गरज विवेकी धर्मजागराची [दैनिक सकाळ ३० आक्टोंबर २००७] या लेखात म्हणतात.....

"धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न जेथे झाला, त्या महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे...
कथित धर्मरूढी, प्रथा, परंपरा, पूजा, व्रतवैकल्ये, सणवार, कर्मकांडे यांना समाजजीवनात जणू उधाण आल्याचे दिसते आहे. याचा एक अर्थ यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणारे जे आहेत त्यांना यश लाभते आहे. दुसरा अर्थ आपले कल्याण होईल, असे मानून भ्रमचित्त समाज चुकीच्या मार्गाने चालला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या वातावरणाला प्रशासकीय कठोरपणाचे उत्तर पुरे होईल, असे मानले जाते आहे. परिस्थितीच्या गांभीर्याची जाण येण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे...................."
पुर्ण लेख http://www.aisiakshare.com/node/2044 इथे वाचता येईल

आरास, ढोलपथके, छोटेमोठे खादाडीचे स्टॉल्स हे सगळे पालथे धंदे आहेत हे नवीनच कळले.
<<

हुश्श!
म्हणजे सार्वजनिक उत्सव नसले तर हे खादाडी स्टॉल्स वाले उपाशीच मरणार.
अन मांडववाल्यांना लग्नसमारंभांतून उद्योग मिळणारच नाही.
ढोल पथके हौशी असतात असं ऐकून होतो.
हे,अन इतकेच मिळून उत्सव साजरा झाला असता तर सार्वजनिक उत्सवांबद्दल असले चिडचिड धागे निघाले नसते, हे देखिल नवीनच असावे.

गणपती सोडून इतर ३५५ दिवस काय करतात हो हे लोक? की गणपतीतच बक्खळ कमाई होऊन जाते वर्षभर पुरेल अशी?

पण एक बरं झालं, या निमिताने तुम्हाला नवनवीन कळते आहे. असेच यथाशक्ती नवनवीन सांगत राहीन, हे आश्वासन देतो. Proud

मंडप घालायला रस्ते खोदून ठेवतात, त्याचे काय?

रोषणाई, डीजे साठी वीज किती मंडळे अधिकृतपणे घेतात?

इब्लिस, तुम्हाला अर्थाचा अनर्थ करून नाचत सुटायचेय तर नाचा.
कधीतरी मी नक्की काय म्हणत होते हे तुम्हाला समजलं तर पुढे बोलू. अन्यथा इथे भेटलात इतर कुठेच भेटू नका हेच बरे राहील.

'उत्सवामुळे रोजगार' हा स्टिरिओटिपिकल, जुना आणि लाडका पण अत्यंत फसवा युक्तीवाद आहे. (पण इथं खरं तर तो मुद्दा नाहीच आहे. 'उत्सवांची नक्की गरज आणि विकृतीकरण' हा आहे. मिळेनाका त्या बिचार्‍यांना रोजगार).
--

भ्रमर, प्रीतीभुषण, हे आधी वाहतं पान असल्याने काही पोस्ट्स वाहून गेल्या. बॅकप माझ्याकडे नाही. पण त्यांतली माझी फेसबुकवरचीच पोस्ट विषयाच्या अनुषंगाने थोडे बदल करून इथे टाकली होती. ती पुन्हा पेस्ट करतो..

***

माझ्या देशातल्या सणा-उत्सवांचं स्वरूप दिवसेंदिवस इतकं गुंतागुंतीचं होत चाललं आहे, की सण आल्यावर उत्सव सुरू झाल्यावर नक्की काय करावं, काय प्रतिक्रिया द्यावी- तेच माझ्यासारख्या सामान्याला कळत नाही. पुर्वी काय असेल ते असो हे स्वरूप, नि काय असेल तो सिग्निफिकन्स, महत्व इ.इ., पण आता हे सारं कशासाठी- असा प्रश्न नक्की पडतो.

या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे आणि तटस्थ राहण्याचा प्रयत्न करून शोधू गेल्यास- भयंकर सापडतात. स्थूल.. सुक्ष्म.. तत्त्व.. अशा लॉजिकने विचार करू गेल्यास 'असंतोष' हे मुख्य कारण सापडतं. सार्‍या बाबतीत, सार्‍या थरांत असंतोष. काहीतरी मिळवायचं आहे, समोरच्यावर राग आहे, स्पर्धा आहे, असामाधान आहे, असुरक्षितता आहे, जुने हिशेब आहेत, मागे पडण्याची भिती आहे, वैफल्य आहे, वैयक्तिक जीवनात यश नाही, मी गरीब असूनही आजूबाजूला खूप सुबत्ता दिसते आहे. असं असमाधान असलं की मग माझा धीर सुटतो. मग मी ऋण काढून सण करतो. इतर जातीधर्मांचा, समाजांचा, गटांचा, समुहांचा माज पाहून माझ्या समुहाचा सण-उत्सव आला, की जंगी बेत करतो. घरात कितीही प्रश्न असू देत, पण सार्वजनिक चेहरा हा उन्मत्त आणि वरचढ दिसलाच पाहिजे याची काळजी घेतो. मग माझे कपडे कितीही फाटलेले असू देत, नि दाढीचे खुंट वैफल्यापोटी वाढलेले, पण स्वच्छ हिरवे निळे भगवे मांडव पडतात. ग्रँड रोषणाई केली जाते. चौक अडवतो, रस्ते खणतो. डोळे फाटतील इतकं अवाढव्य साजरेपण आणि कानाचे पडदे फाटतील इतके आवाज नाचासकट मी करतो. मग हळुहळू मी का आणि कुठच्या प्रसंगी नाचतो आहे, नक्की आनंद कशाचा होतो आहे- हे विसरून जाण्याइतका कैफ मला चढतो. हा कैफ हे अंतिम सत्य! हे गवसलं की विचारशक्तीची कवाडं बंद. हे अंतिम सत्य दाखवुन देणारा, त्याचा साक्षात्कार देणारा नेता माझा देव बनतो. माझ्यासारख्या अनेकांना गवसलेले कैफ- ही त्या नेत्याची आणि त्याच्या प्रदेशाची, त्याच्या संस्थानाची 'अस्मिता'!!

या कैफाचं मूळ असमाधान आणि असंतोषात आहे- हे मी कधीच विसरलेलो असतो. हा कैफ हळुहळू माझ्या रोजच्या जीवनात अलगद झिरपतो. मग मी पहिला मी राहत नाही. खरं तर तसा 'मी' न राहण्यासाठीच या गटात, समुहात मी जन्मलेलो असतो. ते रीतसर होतंच. रोजच्या माझ्या फाटक्या जगण्यात मी 'लाऊड' बनतो. चिडण्याचा, मोठ्याने बोलण्याचा, आवाज करण्याचा जन्मसिद्ध हक्क असल्याचं माझ्या डोक्यात केव्हाच ठसलेलं असतं. मला कुठेही वाट पाहायची नसते. मी 'हॉर्नी' होतो, आणि मग मोठ्याने हॉर्न वाजवत सुटणं ही तर फारच छोटी गोष्ट. मला बंडखोरही व्हायचं असतं. या व्यवस्थेवर राग असल्याने. मग मी बदला घेतल्यागत गाडी चालवतो, आवाज करतो, मुद्दाम थुंकतो, मुद्दामून रस्त्यावर घाण करतो. नेत्यांना, संस्थांना, राजकारणाला, समाजकारणाला शिव्या देतो, कारण हे सारे माझ्या विरोधी गटाने-समुहानेच तयार केलेले आहेत, अशी माझी पक्की समजूत असते.

कधीतरी हे सारं फोल आहे हे मला कळतंच. मग मी मंदिरांचा, देवांचा आधार घेतो. तिथं रांगा लावतो, गोंधळ घालतो, देणग्या देतो, शाली चढवतो. मी सुखी नसल्याचं देवाला सांगतो, विनवतो. असं सारं साग्रसंगीत झालं, की मला मनःशांती मिळते. एकदा का शांती मिळालीय- हे कन्फर्म झालं, की पुन्हा कैफ..! माझ्या देवाचे नि माझ्या धर्माचे ऋण फेडण्यासाठी मग मी पुढल्या उत्सवांची, सणांची बेगमी करायला सुरू करतो. त्यासाठी आणखी असंतोष आणि असमाधान कुठून मिळेल हे शोधत फिरतो.

मी आणि माझा देश पॅनिक आहोत. मलाही आता नीट उमजेनासं झालंय- कोण नि काय आहेत या नव्या भारतीय असंतोषाचे जनक..

***

मो कि मी, खुपच छान लेख, अगदी मनातले...

नेहमी रोमात असते, पण आज हा लेख वाचुन बोलावेसे वाटले.
मी तर म्हणेन की हे पैसे जर विधायक कामा कडे गेले तर जास्त रोजगार उपलब्ध होइल.....++++१११११

आणि यांना फक्त मंडपातले नवसाला पावनारे देवच पावतात का कळत नाही, घरातले देव पावत नाहि का?
तासन तास रांगेत उभे राहुन दर्शन घ्यायचे.. ते पण लहान मुलांना सोबत घेउन. आज काल तर सगळे राजे नवसाला पावनारे असतात. सगळिकडे बोर्ड असतो... .... चा राजा.. नवसाला पावनारा ...... सगळा खेळ आहे.

कलकलाट, गर्दि , कानठळ्या बसवनारा आवाज, काहि ठिकाणि गाणी तर अगदि कळस,..... मुळात लोंकाना शिस्त नाहि .... आणखि कळस म्हणजे ... पोस्टर्स... याच्या कडुन अभिनंदन, त्याच्याकडुन स्वागत... त्यात झाडुन सगळ्यानचे फोटो... बर हे उत्सव संपल्यावर लवकर उतरवतील... ते पण नाहि... कितीतरी दिवस ते तसेच असतात.. दहिहंडिचि पोस्टर्स ठाण्यात अजुन असतिल... अगदी हंडि देखिल असेल.. आहे.....

एकदा मनापासून एखाद्या देवाचं नामस्मरण करुन पहा.. मना पासून कोणाला तरी माफ करुन बघा.... बघा एक वेगळीच अनुभुती मिळेल....... देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेलच.....+++++++++++++++++१

मी सुध्दा उत्सवाच्या काळात देवदर्शनाला जात नाही, आजकाल नवरात्र गणपती ,श्रावण सोमवार रामनवमी अशा विविध सणावाराला चिक्कार गर्दी असते. साधे डोकेही टेकवु देत नाही तिथले लोक शिवाय लाईनमधील भांडणे यामुळे मधात केव्हातरी आपला दर्शनाला जाऊन येतो.

बाकी हे जे सध्या सुरु आहे ते बंद होणे शक्य वाटत नाही. उत्साच्या भरात काही लोक अरेरावी करतात .

साजिरा, प्रतिसाद विचार करण्यालायक आहे. लोक या समूह उन्मादात आपले प्रश्न विसरतात.

रस्ता हे सार्वजनिक ठिकाण आहे. सर्वधर्मियांचे, सर्व जातींचे सण पब्लिक प्लेस मध्ये सार्वजनिक रित्या करायला बंदी असावी. आता इंग्रजही गेले. संघटीत होण्याचं चांगलं उद्दीष्ट असेल असं दिसत नाही. यातून सर्व प्रकारच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, वाढदिवस, मेळावे, राजकिय कार्यक्रम, प्रचारसभा यांनाही सूट असू नये. लग्नाच्या वरातींना तरी कशाला परवानगी द्या ? अपवाद दु:खद प्रसंग.

सरकारने अशा कामांसाठी पुरेशा मैदानांची व्यवस्था करावी. सार्वजनिक उपक्रम तिथेच राबवावेत, त्यासाठी भाडं असावं आणि परवानगी घेण्यात यावी ज्यातून पोलीस बंदोबस्ताचा खर्चही वळता केला जावा.

राष्ट्रीय सण, राष्ट्रीय भावना वाढवणारे उपक्रम, सामाजिक एकोपा राखण्यास मदत करणारे उपक्रम यांना मात्र त्यातून सूट असावी.

नीधप | 20 September, 2013 - 13:51 नवीन
इब्लिस, तुम्हाला अर्थाचा अनर्थ करून नाचत सुटायचेय तर नाचा.
<<
कारण नसताना मला नडणे बंद करा.

अँड डू कीप अ सिव्हिल टंग इन युअर हेड. मला नुसते नाचताच नाही, नाचवताही येते.

मी जे काय लिहिले त्याचा एक्झॅक्ट अर्थ तुम्हाल नक्कीच समजला होता. उगं फोडलेले फाटे समजतात मला, अन सगळ्या पब्लिकला.

*

तुम्हाला इथेच काय कुठेच भेटायची इच्छा अजीबात नाही, माझे म्हणणे तुम्हाला कळेल अशीही आशा नाही.

अन हो. आता जावा 'अहो अ‍ॅडमिन' ची हाळी द्यायला.

***
धाग्याला अवांतर आहे, पण नाईलाज होता. क्षमस्व. (इतरांना)

काल कार्यालयातून येताना एका मिरवणुकी जवळून यावं लागलं. डॉल्बी पाच-सात मिटरच्या अंतरावर असूनही त्याच्या हादर्‍यांमुळे लपककन हृदय बाहेर पडतय का असं वाटत होतं तर त्या ट्रकमधल्या मंडळींना काय त्रास होत असेल त्याची कल्पना आली. पण आजुबाजूची पांढरपेशी मंडळी कानावर हात ठेउन जाताना बघताना त्या 'कार्यकर्त्यांना' आनंदाने उकळ्या फुटत होत्या. आश्चर्य म्हणजे सोसायटी संपल्यावर पुढच्या मोकळ्या रस्त्यावर मिरवणुकीचा वेग वाढला आणि आवाज देखिल कमी झाला. चांगल्या घरातल्या तरूण पोरीबाळींना इतरवेळी लांबूनच वखवखणार्‍या नजरेनी बघावं लागणार्‍यांनी गर्दीत धक्का मारून घेतला. एक-दोघींनी त्यांच्याकडे बघून काही बोलायला सुरवात करताच त्या तरुणांनी (त्यातला एक चांगला पंन्नाशीचा प्रौढ होता) स्वतःच्या पँट मध्ये हात घालून त्या संगितावर नाच सुरू केला. Sad

या उत्सवांच्या ज्यांना त्रास होतो ती पांढरपेशी उ(हु)च्च्भ्रु लोकं 'आहे रे' वर्गातली असतात. अशा उत्सवांमुळे 'नाही रे' वर्गातल्या लोकांना आपलं उपद्रवमुल्य दाखवता येतं. सामाजिक विषमता कमी करण्याचा दीर्घकालीन उपाय जरूरीचा वाटतो.

नडणे? काहीही. तुमच्यासारख्याला नडण्याइतका रिकामटेकडा वेळ नाही.
सिव्हिल टंग वगैरेबद्दल तुम्ही सांगणे हा कैक वर्षांच्यातला मोठ्ठा विनोद असेल.
मी कुठे कुणाच्या हाळ्या द्यायला जायचं नाही जायचं याबद्दल तुम्ही बोलायचा संबंध नाही.

वैयक्तीक कामानिमीत्त नासिकला गेले होते काही वर्षापूर्वी. नुकतेच नवरात्र झाले होते. ( मी दसर्‍यानंतरच गेले) तर बसमधुन पुलावर नजर गेली. पुलाच्याच जवळ पाण्यात देवीची भली मोठी मुर्ती वेडीवाकडी तरगंत होती. कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात नंतर येऊन पाहण्याचे सुद्धा कष्ट घेतले नसतील.

मुर्तीचा वरचा भाग पाण्यात डोलत होता. ते पाहुन खरच वाईट वाटले आणी रागही आला. अरे काय हे! जर एवढ्या श्रद्धेने तुम्ही देवी आणी गणपती पुजता, तर त्यांची अशी विटंबना का करता? वर बर्‍याच जणांनी लिहीले आहे, त्यात मी काय भर टाकणार. पण मोकीमीला अनुमोदन.

देव सर्वत्र असतो. मी सुद्धा अगदी गुरुवारीच स्वामींच्या किंवा साई बाबांच्या मठात/ देवळात गेले पाहीजे या मताची अजीबात नाहीये. स्वामी माझ्या मनात /हृदयात आहेत, ते कधीही भेटतीलच की. त्या साठी जनतेला का त्रास? उत्सवानिमीत्त आपण सगळे एकत्र येतो हे खरे, अगदी योग्य. पण त्यामुळे जर माणुसकीलाच कलंक लागत असेल तर काय उपयोग?

उत्सवानिमीत्त आपण सगळे एकत्र येतो हे खरे, अगदी योग्य. पण त्यामुळे जर माणुसकीलाच कलंक लागत असेल तर काय उपयोग?<<< +१

Pages