रव्याचा केक- पारंपारिक पद्धतीने

Submitted by प्रज्ञा९ on 4 July, 2013 - 08:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

दीड वाटी रवा. बारीक किंवा उपम्याचा- कोणताही.
एक वाटी दूध
एक वाटी गोड दही
एक ते दीड वाटी साखर
अर्धी वाटी तूप किंवा लोणी.
अर्धा टीस्पून खायचा सोडा
रंग, इसेन्स आवडीनुसार
सुकामेवा

क्रमवार पाककृती: 

-रवा हलका भाजून घ्या. उपम्याला लागतो तितका जास्त नाही, नीट गरम झाला, शेकला गेला की गॅस बंद करा.
-दह्यात साखर घालून फेटून घ्या. आधी एक वाटी साखर घालून थोडं चाखून मग हवी तर अजून साखर घाला. दही गोड असेल आणि केकचा गोडवा बेताचाच हवा असेल तर एक वाटी साखर पुरेल.
-दही नीट एकजीव झाल्यावर त्यात शेकलेला रवा, दूध, तूप, खायचा सोडा घालून नीट मिसळून अर्धा तास मिश्रण मुरवत ठेवा.
-अर्ध्या तासाने रंग आणि इसेन्स घालणार असाल तर घाला. सुकामेवा केकमधे हवा तर मिश्रणात घाला.
-नॉन स्टिक पॅनला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात ओता आणि मंद आंचेवर पॅन ठेवा. झाकण ठेवा. मधे मधे झाकण काढून जमा झालेली वाफ जाऊ द्या.
-खरपूस छान वास आला की केकमधे सुरी घालून बघा. सुरी कोरडी आली की केक तयार!

IMG_4472.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तसा! :)
अधिक टिपा: 

-मी हार्ड अ‍ॅनोडईझ्ड पॅनमधे केला. तो पॅन एकदा तापला की सगळीकडूनच छान भाजला जातो केक आणि लवकरही होतो असा माझा अनुभव. त्यामुळे केकसाठी लागणारा वेळ पॅनवरही अवलंबून आहे (तरी २०-२५ मिनिटं अंदाजे). मी दिलेला वेळ तयारीसकट मला लागलेला वेळ आहे.
-सुकामेवा मला पॅनच्या तळाशी नीट सजवून वर मिश्रण घालायचं होतं, पण आयत्या वेळी विसरले. आणि सजावट नीट झाली तरी मिश्रण ओतल्यावर ती फिसकटली तर दुरुस्तीचा(!!!) व्याप होईल अशी भीती, म्हणून पुन्हा केला तेव्हा अस्साच केला! वरून काजू लावले फक्त. त्यामुळे इथे तुम्ही तुमची कल्पकता वगैरे वापरालच! Proud त्याचे फोटो तुम्हीच टाका.
-ही अगदी बेसिक आणि तरीही खूप मस्त पाकृ आहे!

माहितीचा स्रोत: 
आई, रुचिरा हे पुस्तक, दिनेशदांची अधिक माहिती आणि मी केलेले थोडेफार बदल.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_4472.JPG

यात लोणी घालायचं आहे ते सॉल्टेड बटर नाही, घरगुती लोणी आहे. अनसॉल्टेड बटरचा अनुभव नाही.

केक छान दिसतोय. बारा गटगला आणला होतास तो हाच केक ना ? मिश्रण पॅनमध्ये घेतल्यानंतर केक तयार व्हायला साधारण किती वेळ लागतो ते लिही ना टिपांमध्ये

फोटो टाकला आहेस तो प्रतिसाद संपादित कर. इमेज टॅग कॉपी-पेस्ट करून पाककृतीत टाक.

छान झालाय .हा केक फार छान लागतो आणि बेकरीच्या केकना( आणि सर्वच खारी बिस्किटांना)जो एक बेकरीछाप वास येतो तो याला नसतो .आमच्याकडे पिकलेली केळी मिसळतो त्याने मुलायम होतो .बेदाणे मनुका भिजवून घालतो .

रंग वापरलाय का?>>> नाही. रंग, इसेन्स काही नाही. फक्त केशर दुधात खलून, वेलची कुटून आणि बदामाचे काप करून मिश्रणात घातले, वरून काजू लावले.

एकदम सह्ही दिसतोय केक !!! Happy

आई यात केळी किंवा सफरचंदाचे तुकडे कधी अक्रोड / बदाम घालायची...

आठवण करुन दिल्याबद्दल धन्स... आता करुन बघेनच Happy

केक एकदम तोंपासु दिसतोय.
एक प्रश्न - हा केक असा तू सांगितल्याप्रमाणे वाफेवरच करायचा का ओव्हनमधे केला तरी चालेल ? दोन्हीत नेमका काय फरक असेल?

मस्त! मीही असाच करते पण लोण्याऐवजी साजूक तूप घालते. त्याला मस्त खमंग स्वाद येतो त्यामुळे.

शुगोल, मी ओव्हनमधे कधी केला नाही. त्यामुळे ती सेटिंग कशी हवीत ते इथेच कोणीतरी सांगू शकेल. पण चवीत फरक नसावा. कदाचित गॅसवर केल्यामुळे खरपूस होत असेल इतकंच.

किती तरी दिवसांपासून या रेसिपी ची वाट पहात होते. तव्या वर होणाऱ्या केक ची . या वीकेंड ला नक्की करून बघेन.
Thanks
- सुरुचि

मस्त खरपूस झाला आहे.

हा ओव्हनमध्ये/ मावे ज्यात कन्वेक्शन मोड आहे त्यातही करता येतो. १८० डिग्रीवर २२-२५ मिनिटं लागतात.

नॉनस्टिक पॅन पारंपरिक आहे, होय गं! Proud टिपिकल अ‍ॅम्युमिनियमची केक पात्र असतात. तव्यावर वाळू पसरून त्या केक पात्रात केला जातो. बिनाअंड्याचा म्हणून आजी लोकांमध्ये एकदम लोकप्रिय! Happy

Pages