ग्रँडमॉम्स गोईंग स्ट्राँग!

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:41

काळ बदलला. साधनं बदलली. तंत्रज्ञान बदललं. एकंदर जीवनमान बदलत चाललंय तसं माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत चाललाय. पूर्वीची, तुमच्या- आमच्या काळातली छान छान गोष्टी सांगणारी, देवघरात वाती वळणारी, मुलं नातवंड सुना हेच एक विश्व मानणारी ही आजी तरी कशी ह्याला अपवाद असेल बरं?

एकीकडे नातवंडांना छान गोष्टी सांगत, त्यांच्याकडून इंटरनेटचे धडे घेणारी ही आजच्या काळातली आजी नव्या दमाने, नव्या उत्साहात आयुष्याच्या ह्या दुसर्‍या खेळीस सुरुवात करते. नोकरी /व्यवसायातून किंवा गृहिणीपदावरून निवृत्ती घेतल्यानंतर, घरातील जबाबदार्‍या पुढील पिढीकडे सुपूर्त केल्यानंतर पुन्हा एकदा आनंदाने जगण्याची उर्मी असणारी ही आजी. काही वेळेस जोडीदाराची साथ संपल्याने, मुलं आपापल्या घरट्यात रमल्याने आलेला एकाकीपणा, तब्येतीच्या कुरबुरी, नात्यांचे न सुटलेले अनाकलनीय गुंते, आयुष्यभरातील सुख- दु:खांचा हिशोब मांडताना हेलकावणारं मन, त्यातून क्वचित येणारं नैराश्य हे सगळं बाजूला सारून सकारात्मक दृष्टीकोनातून "आजीपण" उपभोगणार्‍या ह्या सगळ्या आज्यांना आज मातृदिनानिमित्त संयुक्तातर्फे अभिवादन!

स्वतःच्या आरोग्याबद्दल सतर्क राहून वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करून घेणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करणे, नवनवीन गोष्टी शिकण्यात उत्साही/ तत्पर असणे, अनेक वर्षांच्या धकाधकीच्या आयुष्यात मागे पडलेल्या एखाद्या जुन्या छंदाला पुन्हा आपलेसे करणे, नवीन व्यवसाय / उद्योगात झेप घेणे, सामाजिक उपक्रम राबविणे ह्या आणि अश्या नानाविध गोष्टींनी आपले जीवन हसत-खेळत जगणार्‍या अश्या अनेक आज्या आजूबाजूला दिसतात.
मोबाईल वापरायला शिकणे, एकटीने विमानप्रवास करणे किंवा परदेशगमन करणे, स्वतःच्या व कुटुंबीयांच्या विकासासाठी ह्या वयातही जागरूक असणे, समाजात सुधारणांना खतपाणी घालणे यांपैकी अनेक गोष्टी ही आजी करत असते. तुमच्या घरात/परिचयात असलेल्या आजींबद्दल इथे जरूर लिहा.
तुमच्या परिचयातील आजी ही शहरी वळणाची कदाचित नसेलही... पण पुरोगामी विचार व सुधारणांना आपल्या आयुष्यात मोलाचे स्थान देणारी, गावातल्या लोकांना, लेकीसुनांना आपल्या आचार-विचारांनी प्रेरित करणारी, त्यांना योग्य मार्ग दाखवणारी, कधी फटकारणारी आजी हीदेखील आजच्या युगातील आजी म्हणता येईल. अशा या आजीबद्दलही इथे लिहायला विसरू नका!

आणि हो, तुमच्यापैकी जर कुणी अशी "सुपर आजी" असाल तर तुमचे हे "आजीपणाचे" अनुभव सुद्धा नक्की लिहा!

aajji1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

माझी आई ही आजच्या युगातील आजी होती असं म्हणायला भरपूर वाव आहे.

तिचं अर्ध्याहून आधिक आयुष्य घर + शाळेच्या नोकरीत गेलेलं होतं . अर्थशास्त्र हा तिचा विषय असला तरी इंग्लिश मधे एम ए करण्याची तीव्र इच्छा तिने वयाच्या साठाव्या वर्षी पूर्ण करून घेतली. नाती बरोबर इंटरनॅशनल कुकिंग, बेकिंग चा कोर्स करून नवतरुणीच्या उत्साहाने घरात ओवन, मायक्रोवेव . गॅजेट्स विकत आणली आणी दररोज आजी -नात मिळून नवीन प्रयोग करत.
लग्न होऊन नात परदेशी गेली तेंव्हा तिच्याशी रोज संपर्क राहावा ही इच्छा मनात बाळगून नातीच्या जुन्या कंप्यूटर वर ई मेल करणे, स्काय पी डाऊन लोड करून तिच्याशी गप्पा मारणे इ. आजी आजोबा दोघांनी हिरीरीने शिकून घेतले.
मी परदेशी स्थायिक होताना लेकीला आई दादांजवळ सोडून निर्धास्त झाले होते.
आजी च्या सान्निध्यामुळे नातीला सर्वप्रकारचं परफेक्ट ट्रेनिंग मिळालं

अश्या आजीआजोबांबद्दल नातीच्या मनातलं स्थान अढळ आहे..
आता मीही आजी झाल्यामुळे माझ्या आईदादांचा वारसा आपसूकच पुढे चालत आहेच.. Happy

वर्षू नील, मस्तच! इंटरनेट्/काँप्युटर शिकणारी तुझी आई खरोखरच आजच्या युगातली म्हणायला हवी! आणि त्यांनी ६०व्या वर्षी एम ए केले हे फारच कौतुकास्पद आहे! सलाम!

वर्षू नील, तुझे 'आजी' म्हणुन असलेले अनुभव वाचायला आवडतील!

वर्षु, मस्तच.

आजी म्हणजे एकदम भारी रसायन असतं. इथे एक से बढकर एक आज्यांबद्दल वाचायला मिळेल अशी आशा.

थांकु थांकु मैत्रीणींनो..

अर्ली मॅरेज, अर्ली किड्स या गोष्टीचा नक्की फायदा झाला आम्हालातरी!!.. मुलगीही लौकर सेटल झाली
पर्यायाने आम्ही ४५ तच आजी आजोबा झालो.. त्यामुळे नातवंडाशी दिवसभर खेळायला लागणारी एनर्जी , मानसिकता आमच्यापाशी भरपूर आहे..
पोरगी सुट्टीत माहेरी आल्यावर Neil ला पूर्णपणे आमच्यावर सोपवून निर्धास्त भटकायला मोकळी असते. त्याचा अभ्यास्,आर्ट अँड क्राफ्ट, कंप्युटर गेम्स,थीम पार्क्स मधे त्याला राईड्स वर कंपनी देणे, किड्स ओरिएंटेड अ‍ॅक्टीविटीज, बोलिंग, बॅडमिंटन , स्वीमिंग ,गाणी, गोष्टी ,जेवण अश्या सर्वच गोष्टींत आमचा अ‍ॅक्टिव्ह पार्ट असल्यामुळे Neil पण एकदम खूश असतो.
आता त्याला कंप्यूटरवरून फोन लावणे/ स्मार्ट फोनवचे अ‍ॅप्स ( फ्रिंग, वायबर, फेस टाईम इ.इ.) वापरता येत असल्यामुळे रोजच आमच्याशी गप्पा मारल्याशिवाय त्याला आणी आम्हालाही चैन पडत नाही. शिवाय आमच्यातले सात समुद्रांचे अंतर ही झटक्यात नाहीसे होते..
मला माझा नवीन रोल खूप्पच आवडतो.. सिंपली लव इट!!! Happy
ओक्के, फक्त गुडीगुडी नाही हां.. पत्त्यात चीटिंग केल्यास भांडण सुद्धा होतं आमच्यात.. Proud

माझी उत्साहमूर्ती आजी

नीट चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी, काळ्या-चंदेरी केसांचा घातलेला सुबक अंबाडा, शांत-समाधानी चेहर्‍यावर फुललेलं स्मितहास्य. प्रसन्न व्यक्तिमत्त्व. अशी माझी आजी.

लहानपणापासून तिच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. ती म्हणजे चैतन्याचा खळाळता झरा. तिच्याशी बोललं की कसं छान वाटतं. मी आजवर कधी तिला कंटाळलेलं, थकलेलं पाहिलंच नाहिये. सदैव हसतमूख, उत्साही, बोलक्या स्वभावाची, आम्हा नातवंडांपेक्षाही तरूण अशी माझी आजी. सतत काही ना काही कामात व्यग्र. कित्येक वेळा तिच्या बरोबर काम करता करता आम्ही थकून जातो पण आजी मात्र अजिबात दमत नाही. म्हणून आम्ही तिला म्हातार्‍या नातवंडांची तरूण आजी म्हणतो Happy

असंच एकदा मी तिला विचारलं, "आज्जी, तूझ्या अखंड उर्जेच रहस्य काय?" तर ती म्हणाली "जेव्हापासून आम्हाला कळतं आहे तेव्हा पासून आम्ही कामचं करत आहोत. या सतत काम करण्यामूळचं आत्ताही एनर्जी टिकून आहे."

घरात एखादा कार्यक्रम असेल तर त्याची तयारी, मग कार्यक्रम, मग नंतरची आवरा-आवर, अशा वेळी कधी कधी खरचं असं होतं की घरातली सारी मंडळी थकून जातील, पण आजी मात्र कामं करूनही फ्रेश. आणि ती स्वतः भरपूर काम करत असली तरी सहसा दुसर्‍याला कामं सांगायची तिला फारशी सवय नाही. उलट कोणी आलं की स्वतः चहा करेल, सोबत डब्यातून खाऊ/बिस्किटं काढून डीशमध्ये देईल. हे खा, ते खा असा आग्रह करेल.

रिकाम्या वेळात ती रोजचा पेपर आवर्जून वाचते. रोजची आवडीची मालिका पहाते, त्याची स्टोरी (जणू काही त्यातली पात्रं खरीच आहेत या भावाने) आम्हाला सांगते Happy तिची स्वतःची एक छोटी डायरी ती मेंटेन करते ज्यात तिला लागणारे फोन नंबर, पत्ते तिने सुवाच्य अक्षरात लिहिले आहेत. आता तिचं थोडं जास्त वयं झाल्यामुळे काही गोष्टी तिच्या पूर्वीइतक्या लक्षात रहात नाहीत पण अगदी परवा-परवा पर्यंत सगळ्यांचे (मुलं, मुली, सूना, जावई, नातवंड) वाढदिवस लक्षात ठेवून प्रत्येकाला आजीचं पत्र किंवा फोन नक्की असायचा. आता लक्षात येइल तेव्हा फोन करते आणि वाढदिवशी प्रत्यक्ष भेट होणार असेल तेव्हा आजही काही ना काही खाऊ/भेट आवर्जून देते.

कूटंबातल्या प्रत्येकाची तिला काळजी असते. कोणाला काही दुखलं-खूपलं, कोणाची तब्येत बरी नाहीये अशा वेळी तिचही मन काळजीत असतं. ती तिथे असेल तर मग कुठे काढा करून दे, कुठे माहिती असलेले काही घरगुती उपाय सूचव असं करत रहाते आणि ती लांब असेल तर मग फोनवरून हे उपाय सांगते. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तिच्या परीने ती त्यावर सोल्यूशन सूचवत असते. वयोमानानुसार तिलाही दू़खतं - खूपतं असेल पण आजवर मी तिच्या तोंडून तब्येतीच्या तक्रारी फारशा ऐकल्या नाहीत. किंवा कोणालाही 'माझं डोकं चेपून द्या, बाम लावून द्या, पाय चेपून द्या' असं स्वतःहून सांगितल्याचं मला स्मरतं नाही.

एखादे गेटटूगेदर आम्ही कधी कुठे रेस्टॉरंटमध्ये ठरवले असता छानशी साडी नीट नेसून, केसांचा नीटनेटका अंबाडा घालून, हलकीशी पावडर लावून सगळ्यांबरोबर उत्साहाने येते. स्वत:साठी इडली-दोसा असे पचायला हलके पदार्थ मागवते. पण आम्ही आग्रह केला तर आम्ही मागवलेले (तिच्यासाठी) नवीन पदार्थही टेस्ट करते, जसं की पिझ्झा, पास्ता, नूडल्स वगैरे. कुठेच नव्या पिढीबद्दल तक्रारी नाहीत, आजकालची मूलं म्हणजे... असा सूर नाही. उलट प्रत्येक पिढीशी छान जूळवून घेते, छान मिक्स होते. ओपन माइंडेड आहे माझी आजी.

रूढी-परंपरांबद्दलही आजी काही प्रमाणात आधुनिक विचारांची आहे. आजोबांचं निधन झाल्यानंतर तिनं मंगळसूत्र घालणं सोडलं पण टिकली अजूनही लावते. छान रहाते. देवावर विश्वास आहे तिचा खूप. रोज देव-पूजा, स्तोत्र म्हणणे हे सगळ करते. पण ते स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःपुरतं. कशाचही अवडंबर नाही. दुसर्‍याला कशाचीही सक्ता नाही.

या माझ्या आजीशी बोलताना कधी आपल्याला जनरेशन गॅप वगैरे काही जाणवतं नाही. खरचं. ती अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत कोणाशीही सहजतेने संवाद साधते. जे जे कोणी तिच्या संपर्कात येते त्यांना ती काही भेटींमध्येच आपलसं करते. तिने खरं तर आयुष्याच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक बर्‍या वाईट घटना पाहिल्या, अनुभवल्या असतील, पण स्वभावात किंवा बोलण्यात कुठेही कटूता नाही, वैताग नाही. याचा अर्थ तिच्या वाट्याला दू:ख कधी आलेच नाही असं मूळीच नाही. पण त्या त्या प्रसंगी खंबीर होत तिने ते प्रसंग निभावून नेले आणि नेहमी आनंदी राहिली. कारण "आयुष्यात घडणार्‍या बर्‍या, वाईट सगळ्या घटना अ‍ॅक्सेप्ट करून पुढे जाणे, प्रॉब्लेम्स आले तर 'हे माझ्याच बाबतीत का झालं' असा विचार करत बसण्यापेक्षा त्यावर सोल्यूशन शोधणे, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहाणे" हे तिच्या जगण्याचं साधंसोपं सूत्र आहे. भूतकाळाबद्दल विचार न करता, भविष्याची काळजी न करता, वर्तमानात आनंदी रहाणं तिनं छान साधलं आहे.

तिला नवीन गोष्टी शिकायची खूप हौस आहे म्हणजे अगदी टी.व्ही. चा रिमोट कसा वापरायचा यापासून ते मोबाईलवरून फोन कसा लावायचा, कसा रिसिव्ह करायचा इथपर्यंत अनेक गोष्टी शिकण्यात तिला रस असतो. आणि हो, तिला बोलताना इंग्लिश शब्द वापरायचीही खूप आवड आहे. आम्हा नातवंडांच्या तोंडून एखादा नवीन तिला माहिती नसलेला इंग्लिश शब्द आला की ती त्याचा अर्थ विचारते आणि बरोबर लक्षात ठेवून पुढच्या वेळी योग्य ठिकाणी आठवणीने वापरते. कोणत्याही नवीन गोष्टी आत्मसात करणं तिला आवडतं. वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतर तिनं मावशीबरोबर पहिला विमानप्रवास केला, अजिबात न घाबरता. कौतूक वाटतं मला तिचं.

तिच्या काळी ती चौथीपर्यंत शिकली. त्यापुढेही तिला शिकवायचा तिच्या दादांचा आग्रह होता असं ती सांगते. "त्या लहान वयात शिक्षणाचं महत्त्व तितकं वाटलं नाही. शिकायचं म्हणजे एका जागी बसणं आलं आणि लहानपणी खेळण्याकडे खूप ओढा असतो ना, त्यामुळे नाही शिकले पुढे. पण शिकायला हवं होतं खर तरं" असं म्हणते. तिला पेटी वाजवायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं. वयाच्या ५०-५५ व्या वर्षी तिने गायनाची परीक्षा दिली आणि त्यात ती पहिली आली.

अशा माझ्या तरूण आजीला उत्तम आयूरारोग्य लाभो आणि अशी आजी सगळ्यांना मिळो हीच सदिच्छा.
तिच्याकडे पाहून मनोमनं मी हेच ठरवलं आहे की मी जेव्हा तिच्या वयाची होईन तेव्हा मी पण अगदी तिच्यासारखीच होण्याचा प्रयत्न करेन, सर्वांना हवीहवीशी वाटणारी हसतमूख आज्जी Happy

चेरी, मस्तच! आजीला आरोग्यपुर्ण दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा!
वर्षुआज्जी! सही है तुम!

वर्षुआज्जी तुम्ही आणि तुमच्या आई दोघिही सहीच....

छान लिहीलं आहे चेरी..हे वाचून तर अगदी माझी आज्जी आठवली. किती ती कामं आणि ह्या वयात कशी जमतात कोण जाणे. उत्साहाचा झरा आहे माझी अज्जी. कितीदा तरी आई साठी आणि आमच्या साठी भक्कम आधार ठरली आहे ती. मी दिड वर्षाची असताना आई ला नौकरी लागली. माझी आई (अता माझ्या लेकीची अज्जी :)) प्रचंड जिद्दी आहे. स्वत:च्या पायावर उभ रहायच हे तिने ठरवलच होतं. पण दिड वर्षाच्या मुलीला एकट सोडायचं म्हणल्यावर डळमळली. तेंव्हा फक्त अज्जी ने समजूत घातली आईची. आणि तिच्यामुळे आई आजपर्यंत नौकरी करतेय. आमचे खाण्यापिण्याचे लाड, सुट्टीत सांगितलेल्या गोष्टी, आमच्यासाठी शिवलेले कपडे असं काय काय केलय तिने. आणि अजूनही करत असते. तिचं एक वाक्य मी कधीही विसरत नाही. कायम घूमत असतं कानात 'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहीजे'. तिने ज्या असंख्य चांगल्या गोष्टी शिकवल्या त्यातली ही सर्वात महत्वाची माझ्या साठी.

मला मुलगी झाल्यावर तर पणती ला कुठे हेवू आणि काय करू असं झालं होतं तिला. तिचा आनंदी चेहेरा बघून मलाच समाधानी वाटलं होतं. Happy

दुसरी आज्जी म्हणजे माझी आई. आज्जी झाल्यावर पहिली गोष्ट शिकली ती ईंटरनेट. आई जरी बँकेत काम करत असली तरी तिला ईंटरनेट मधे मुळीच रस नव्हता. पण नात झाल्यावर नविन लॅपटॉप घरात आला. आणि मी तिथे होते तो पर्यंत सगळं शिकून घेतलं आईने. आता रोज नातीशी गप्पा होतात. कधी ऑनलाईन दिसली आई आणि आईला विचारलं की अत्ता काय करते आहेस तर आईचं उत्तर येतं अगं मोबाईल च बिल भरतेय. ईतकं छान वाटतं मलाच. Happy

http://www.maayboli.com/node/19311 इथे मी माझ्या आज्जीबद्दल (बाबांची आई) लिहिलं होतं पूर्वी.

माझ्या दुसर्‍या आज्जीबद्दल पण लिहायचंय, ते यानिमित्ताने लिहिन उद्यापर्यंत. Happy

अगदीच जिव्हाळ्याचा विषय. Happy इथे माहितीतल्या तीन आज्ज्यांबद्दल लिहिण्यासारखं आहे.
पहिली म्हणजे अर्थातच माझी आज्जी, माझ्या वडिलांची आई.
आज्जीचे माहेर नाशिकचं, तात्याराव सावरकरांच्या वाड्यात आज्जीचे वडिल भाडोत्री रहात असत. आज्जीच्या 'मॉडर्न आणि स्ट्राँग' पणाची लक्षणं त्या काळापासून दिसली होती. कल्पना करा ३० च्या दशकात, नाशिक सारख्या कर्मठ ठिकाणी १२-१४ वर्षांची एक मुलगी नऊवारी साडी नेसून मुलांच्या बरोबरीने गंगेत पोहायच्या शर्यतीत भाग घेऊन बिल्ले जिंकते आहे! ते बिल्ले (मेडल्स) आजही आमच्या घरी आहेत. फायनल म्हणजे सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर खानदेशातल्या 'भडगांव' नावाच्या खेड्यात लग्न होऊन गेली. तिथे एकत्र कुटूंब, कामाचा धबडगा. पण शिक्षण झालेलं असल्याने आणि सासुबाईंचा पाठिंबा असल्याने कादंबर्‍या, पुस्तकं वाचण्याचा छंद जोपासला. पुढे रेडियो आल्यावर चाळीस माणसांच्या घरात फक्त आज्जीला तो सुरु करता येत असे. पुढे चाळीसगावला रहायला आल्यावर वयाच्या पस्तिशी-चाळीशी नंतर बॅडमिंटन खेळायला सुरुवात करून त्यातही बक्षिसं मिळवली.
काही माणसं काळाच्या पुढचं पहातात. त्याचच उदाहरण म्हणजे आज्जीने साधारण ६०-६५ साली, 'पुण्याला एखादी जमीन घेऊन ठेवावी, नंतर उपयोगी पडेल' असा विचार केला. कधी नोकरी केलेली नाही, व्यवसायात सक्रिय सहभाग नाही, आयुष्य गेलेलं खेडेगावात, घरची शेतीवाडी असं असताना पुण्याला जागेत गुंतवणूक करण्याचं कसं काय डोक्यात आलं कोण जाणे! तेव्हा एकटीने पुण्याला येऊन सगळी पैशांची उठाठेव करून प्लॉट घेतला आणि आज तिथेच आमचं घर आहे. तेव्हाच्या काळात ही गुंतवणूक केली म्हणून अन्यथा आजच्या घडीला पुण्यात प्लॉट वगैरे घेणं जवळ जवळ अशक्य आहे!
पुढे आमच्या घरी व्हिसिआर आल्यावर ती तो ही वापरायला शिकली. आम्ही कोणीच घरी नसताना पहिल्या जागतिक मराठी परिषदेचं आणि स्मरणयात्रा कार्यक्रमाचं सगळं रेकॉर्डींग अगदी दोन/तीन व्हिडीयो कॅसेट वापरून करून ठेवलं होतं. आत्ता शेवटी आम्हांला सिडीवर गाणी लावून द्या वगैरे सांगत असे. टिव्हीवर नावं वाचून वाचून इंग्लिश शब्दांचे स्पेलिंग उच्चार वगैरेही करायला शिकली होती. नंतर माझ्या आत्याबरोबर अमेरिकेला गेली होती. अणि परत येताना पिट्सबर्ग ते मुंबई व्हाया न्यूयॉर्क भाषा येत नसताना विमानं बदलून एकटी आली होती. खाण्या पिण्याच्या बाबतीतही अतिशय चोखंदळ. पिज्झा, फ्राईड राईस, नुडल्स वगैरे स्वतः चवीन खाऊन घरीही बनवत असे.
दांभिक रुढी, परंपरा वगैरेंवरही तिचा अजिबात विश्वास नव्हता. आवडत नसतील तर दागिने, फुलं, गजरे बिजरे अजिबात घालू नका, साड्यांपेक्षा तुमचे ते ड्रेसच सुटसुटीत बरे असं ती सगळ्या सुनांना सांगत असे. आमच्या लग्नात रुखवत न ठेवणे, जावयाचे किंवा मुलाकडच्या इतर कोणाचे पाय न धुणे ह्या गोष्टींना तिचा पूर्ण पाठिंबा होता आणि शिल्पाच्या आईला "कोणी विचारलं तर मी नाही म्हणून सांगितलय असं सांगा.. मला येऊन विचारायची कोणाची हिंमत होणार नाही.." असं सांगून ठेवलं होतं.. सर्व प्रापंचिक जबाबदार्‍या संभाळून चित्रपट, नाटके, गाण्याचे कार्यक्रम, प्रवास, स्वयंपाक, खेळ, महिला मंडळे वगैरे सगळ्या गोष्टी तिने अगदी मनापासून एन्जॉय केल्या.

दुसरी मॉडर्न आज्जी म्हणजे तीन नातवंडाची आज्जी असलेली माझी आई. आई तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेली, वीस बावीस वर्ष नोकरी केलेली आजच्या जमान्यातली आज्जी. रीटायरमेंट नंतर आम्ही पुण्याला आल्यावर टू व्हिलर चालवायला शिकली आणि आता नातवंडांना घेऊन स्कुटीवर फिरत असते. आज नातवंडांचे अभ्यास, प्रोजेक्ट्स, इतर गोष्टी ह्यात तिचा सक्रिय सहभाग असतो. शिवाय सोसायटीतल्या लहान मुलांचे उन्हाळ्याच्या सुट्टीतले वर्ग घेणे, लेखन, वाचन शिवाय अनेक छंद जोपासणं, मैत्रिणींचा, नातेवाईकांचा गोतावळा जमा करून त्यांची सरबराई करणं हे उत्साहाने सुरु असतं. ती मध्यंतरी आमच्या सोसायटीतल्या एका लहान मुलीकडून पेपर क्विलिंग शिकली आणि आता क्विलिंगची सुंदर ग्रिटींग कार्डस आणि पाकिटं बनवत असते. एकंदरीतच पाहिलेलं स्वतःच्या हातानी बनवून पाहून त्यात अजून काहितरी वेगळं करून बघायचा खूप उत्साहं तिला आहे. आता फेसबूक वर अकाऊंट काढून त्यावर जुन्या मैत्रिणी, नातेवाईकांचे फोटो बघणं, अपडेट्स वाचणं हे ही नित्यनेमाने करत असते. बाकी घरातल्या सर्व जबाबदार्‍या, निर्णय हे ती बाबांच्या बरोबरीने किंवा कधी कधी एक पाऊल पुढेच जाऊन ती घेत असते. माझ्या भावाच्या मुलाने वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तिच्याकडे 'युएसबी ड्राईव्ह' मागितला आहे. त्यामुळे आमची मॉडर्न आज्जी आता स्कुटी घेऊन कॉम्प्युटरच्या दुकानात युएसबी ड्राईव्ह आणायला जाणार आहे!

अजून एका आज्जीबद्दल इथे लिहावसं वाटतं त्या म्हणजे माझ्या वहिनीची आई. मध्यंतरी वहिनीच्या वडिलांचं अल्पशा आजाराने अचानक निधन झालं. त्यातून खचून न जाता आज त्या खूप उत्साहाने रहात आहेत. ज्येष्ठ नागरीक संघाचे कार्यक्रम, सोसायटी मधले कार्यक्रम, मुलींच्या अंधशाळेमध्ये समाजसेवा शिवाय नाटके, चित्रपट पहाणे, ट्रिपला जाणे ह्या सगळ्यांमध्ये स्वतःला व्यग्र ठेवतात. शिवाय नातवंडाचे लाड करणं, पाहूणे वगैरे सुरुच असतं. त्यांनीही मध्यंतरी कॉम्प्युटर, मोबाईल वगैरे घेतला आणि आता तो वापरायला शिकून रेल्वेची तिकीटे बुक करण्यासारखी स्वतःची लहान सहान कामेही त्यावर करून टाकतात. स्वतःच्या प्रकृतीबाबात आणि वेगवेगळ्या काऊंट्सबाबत त्या इतक्या काटेकोर आहेत आणि काळजी घेतात की कधीकधी सगळेजण त्यांना चिडवतात.
ह्या वयात ह्या सगळ्या स्ट्राँग आज्ज्यांचे उत्साहं पाहिले की आम्हांला आपण भयंकर आळशी असल्याची जाणीव होते !

जबरजस्त आज्या आहेत!

पराग, तुझ्या आजीबद्दल वाचून त्यांचीपण भेट व्हायला हवी होती असं मनापासून वाटलं. अख्खं पोस्ट सुंदर लिहिलंय.

माझी आजी तारामती श्रीधर कापरे.
आजीचा जन्म १९२२ सालचा. ती करियर माईंडेड होती आणि तिनं त्या काळात स्वतःचं करियर केलंही..
माझे आजी आजोबा दोघही समाजकारणात होते. ह्याशिवाय आजोबा वकील, स्वातंत्र्यसैनिक, पुढे राजकारणात होते. त्यांचं व्यक्तिमत्व आऊटस्टँडिंग होतं, पण आजोबांच्या करियर आणि व्यक्तिमत्वाशिवाय आजीचं स्वतःच इन्डिपेंडट व्यक्तिमत्व त्या काळातही होतं.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आजोबा वाईतले अग्रणी स्वातंत्र्यसैनिक होते, तेव्हा त्या अनुषंगानं येणारे बाकी सगळे त्रास, पैशाची चणचण (कधीकधी स्वैपाकासाठीही सामान नसणं) अशा अनेक गोष्टी तिनं कुरकुरी शिवाय सोसल्याच, पण ह्याशिवाय तिचं स्वतःचं कामही चालूच होतं.

ती राष्ट्र सेवादलाची वाई शहराची प्रमुख. तिच्या सेवादलाच्या कामामुळे जयप्रकाश नारायण वाईला आले तेव्हा घरी येऊन गेले होते. ती स्कूलकमिटीची चेअरमन होती. वाईमधल्या ७-८ बायकांनी एकत्र येऊन महिला समाजाची शाळा काढायची ठरवली - त्या ७ बायकांमधे आजी होती. ही शाळा वाईतली आजपर्यंतची सगळ्यात चांगली मराठी शाळा आहे.

पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावरही आजीचं काम चालू होतच. ती वाई शहरातून २ वेळा नगरसेविका होती (त्या काळी महिलांसाठी आरक्षण वगैरे नव्हतं.)
पुढे तिनं राजकारण सोडलं तरी समाजकारण चालूच होतं.
पुढे एकदा नगरसेविका नसताना तिला एका मिटींगला निमंत्रण नव्हतं. यशवंतराव चव्हाण त्या मिटींगला उपस्थित होते, त्यांनी स्पेसिफिकली विचारलं की "कापरे वहिनी कुठे आहेत". मग माणसं घरी येऊन तिला मिटींगला घेऊन गेली.

हातावर पोट असणार्‍या बायकांच्या मुलांना सांभाळायला कुणीच नसतं - मग तीनं त्यांच्यासाठी झोपडपट्टीत पाळणाघर सुरू केलं आणि तिला शारिरिक दृष्ट्या शक्य होतं तोपर्यंत ते चालवलं.
भारत सरकारतार्फे पोस्ट ऑफिसात रिकरिंग अल्पबचत योजना सुरू झाली तेव्हा झोपडपट्टीतल्या लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून कमीतकमी पाच रुपये अशी सरकारची योजना होती.
पहिली अनेक वर्ष (५+) सगळ्यात जास्त खाती उघडण्याचं रेकॉर्ड आजीच्या नावावर होतं (जास्तीत जास्त रकमेची खाती नव्हेत, संख्येनं जास्त)
आणि ह्याचं कारण आम्हाला कळायला पुढे अनेक वर्ष जावी लागली - आजी गेली तेव्हा अनेक ओळखीच्या/अनोळखी बायकांनी येऊन "आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा आमच्याकडचे मिळेपर्यंत - आजीनं तिच्या पदरचे पैसे टाकून आमची वेळ भागवली" हे सांगितलं. हे फक्त रिकरिंग करताच नव्हे, तर इतर अनेक अडचणींकरता ऐकलं.. खरं तर तिच्याकडेही तिचं स्वतःचं खूप होतं असं नाही, पण आहे त्यात अनेकांची वेळ तिनं भागवली. जेव्हा ती गेली आणि शाळेतल्या मुलींकडूनही त्यांच्या आई/आजीला माझ्या आजीनं केलेल्या मदतीबद्दल ऐकलं तेव्हा ती आपल्याला माहित आहे असं वाटतानाही "नक्की आपल्याला किती माहित होती" हा प्रश्न पडला.

आजोबा आजीबद्दल बोलताना म्हणायचे "हिला पंतप्रधानांशी बोलायला पाठवलं तरीही ही छान शिष्टाई करून येईल". खरतर अगदी लहान असताना हे ऐकलं तेव्हा अर्थ नीट कळायचा नाही - पण पुढे स्वातंत्र्यलढ्यात आजोबांना अटक झाली तेव्हाची गोष्ट ऐकली आणि आमच्या बाबतीत एकदम प्रेमळ असणार्‍या आजीचा हा वेगळाच पैलू कळला. (अर्थात त्याशिवाय तिनं जेवढं काम केलं ते करणं अवघड होतं, पण ते कळायचं वय नव्हतं तेव्हा)
स्वातंत्र्यलढ्यात आजोबांना अटक झाली, तेव्हा त्यांच्या गाडीच्या मागे अनेक तरुण मंडळी धावत गेली. गावात दंगा सुरू झाला/होणार म्हणताना कर्फ्यु लागला.. कर्फ्यू मधे कुणी बाहेर दिसला तर गोळ्या घालायचे. आजी घराबाहेर तर पडलीच, पेट्रोलच्या मधून ताडताड चालत ती आजोबांच्या गाडीच्या इथे गेले आणि पेट्रोलमधल्या कुणीही त्याविरुद्ध बोलायचीही हिम्मत केली नाही.

स्वातंत्र्यलढा/वकिली ह्याबरोबरच आजोबांची धार्मिक कार्यही खूप असायची आणि ती खूप मोठ्या प्रमाणावर असायची. त्यांनी लक्षचंडी, गणेशयाग हे सगळं करताना गावात ३-३ दिवस चूलबंद - अशी गावजेवणही केलेली. आणि ह्या सगळ्यात आजीचा सहभाग अर्थातच घरातल्या कर्त्या स्त्रीचा असायचा.

वैयक्तिक नातेसंबंधातही तीचं नातं माणसांशी असायचं त्यांच्या पदांशी, त्यांच्याकडच्या पैशाशी नसायचं.
चुकलेल्या माणसालाही सांभाळून घ्यावं कारण सगळ्यांनीच त्याचा रागराग केला तर तो चुकीच्या वाटेवर आणखीनच ढकलला जातो अशी तिची फिलॉसोफी होती आणि ती लोकांशी त्याप्रमाणे वागायची.

तीचं करणही न बोलून असायचं. ती गेली तेव्हा रेडिओ, पेपर मधे आम्ही न देता आलेली बातमी, प्रचंड संख्येनं स्वतःहून जमलेले लोक, अनेक लोकांनी तीनं कशी मदत केली हे नंतर अनेक दिवस आम्हाला सांगत रहाणं, ह्या इतकीच - तिच्या सूनेची (माझ्या मामीची) प्रतिक्रिया बोलकी होती. दुसर्‍या दिवशी सकाळी मामी रडत होती, रडताना म्हणाली इतक्या वर्षात आज मी पहिल्यांदाच पहाटे उठून पाणी भरलं, एकूणच आज अचानक मोठं झाल्यासारखं वाटतय.

हे सगळं लिहिताना खरतर आजी ह्या विषयावर एक वेगळा लेखच लिहायला हवा असं फार प्रकर्षानं वाटलं. पण सध्या इथे तरी लिहिते. हा धागा आणि त्या अनुषंगानं आजीच्या वर आलेल्या आठवणी ह्याकरता संयुक्ता व्यवस्थापनाचे आभार! Happy

वा! मस्त अगदि सगळ्यांच्या आज्ज्या!
वर्षु तु आज्जी सुद्धा आहेस! वाटत नाहि तुज्या फोटो कडे बघुन अजिबात!

वा, सगळ्याच सुपरआज्ज्या आवडल्या ! Happy
नानबा, काय भाग्यवान आहेस गं अशी आज्जी लाभली तुला !! वेगळा, मोठा लेखही नक्की लिही!! Happy

कर्मठ ठिकाणी १२-१४ वर्षांची एक मुलगी नऊवारी साडी नेसून मुलांच्या बरोबरीने गंगेत पोहायच्या शर्यतीत भाग घेऊन बिल्ले जिंकते आहे! ते बिल्ले (मेडल्स) आजही आमच्या घरी आहेत. फायनल म्हणजे सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर खानदेशातल्या 'भडगांव' नावाच्या खेड्यात लग्न होऊन गेली. तिथे एकत्र कुटूंब, कामाचा धबडगा. पण शिक्षण झालेलं असल्याने आणि सासुबाईंचा पाठिंबा असल्याने कादंबर्‍या, पुस्तकं वाचण्याचा छंद जोपासला. पुढे रेडियो आल्यावर चाळीस माणसांच्या घरात फक्त आज्जीला तो सुरु करता येत असे. पुढे चाळीसगावला रहायला आल्यावर वयाच्या पस्तिशी-चाळीशी नंतर बॅडमिंटन खेळायला सुरुवात करून त्यातही बक्षिसं मिळवली
<<
हे प्रचंड इन्स्पिरेशन देणारय !
कसली स्मार्ट आज्जी !!!

Pages