ग्रँडमॉम्स गोईंग स्ट्राँग!

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:41

काळ बदलला. साधनं बदलली. तंत्रज्ञान बदललं. एकंदर जीवनमान बदलत चाललंय तसं माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत चाललाय. पूर्वीची, तुमच्या- आमच्या काळातली छान छान गोष्टी सांगणारी, देवघरात वाती वळणारी, मुलं नातवंड सुना हेच एक विश्व मानणारी ही आजी तरी कशी ह्याला अपवाद असेल बरं?

एकीकडे नातवंडांना छान गोष्टी सांगत, त्यांच्याकडून इंटरनेटचे धडे घेणारी ही आजच्या काळातली आजी नव्या दमाने, नव्या उत्साहात आयुष्याच्या ह्या दुसर्‍या खेळीस सुरुवात करते. नोकरी /व्यवसायातून किंवा गृहिणीपदावरून निवृत्ती घेतल्यानंतर, घरातील जबाबदार्‍या पुढील पिढीकडे सुपूर्त केल्यानंतर पुन्हा एकदा आनंदाने जगण्याची उर्मी असणारी ही आजी. काही वेळेस जोडीदाराची साथ संपल्याने, मुलं आपापल्या घरट्यात रमल्याने आलेला एकाकीपणा, तब्येतीच्या कुरबुरी, नात्यांचे न सुटलेले अनाकलनीय गुंते, आयुष्यभरातील सुख- दु:खांचा हिशोब मांडताना हेलकावणारं मन, त्यातून क्वचित येणारं नैराश्य हे सगळं बाजूला सारून सकारात्मक दृष्टीकोनातून "आजीपण" उपभोगणार्‍या ह्या सगळ्या आज्यांना आज मातृदिनानिमित्त संयुक्तातर्फे अभिवादन!

स्वतःच्या आरोग्याबद्दल सतर्क राहून वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करून घेणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करणे, नवनवीन गोष्टी शिकण्यात उत्साही/ तत्पर असणे, अनेक वर्षांच्या धकाधकीच्या आयुष्यात मागे पडलेल्या एखाद्या जुन्या छंदाला पुन्हा आपलेसे करणे, नवीन व्यवसाय / उद्योगात झेप घेणे, सामाजिक उपक्रम राबविणे ह्या आणि अश्या नानाविध गोष्टींनी आपले जीवन हसत-खेळत जगणार्‍या अश्या अनेक आज्या आजूबाजूला दिसतात.
मोबाईल वापरायला शिकणे, एकटीने विमानप्रवास करणे किंवा परदेशगमन करणे, स्वतःच्या व कुटुंबीयांच्या विकासासाठी ह्या वयातही जागरूक असणे, समाजात सुधारणांना खतपाणी घालणे यांपैकी अनेक गोष्टी ही आजी करत असते. तुमच्या घरात/परिचयात असलेल्या आजींबद्दल इथे जरूर लिहा.
तुमच्या परिचयातील आजी ही शहरी वळणाची कदाचित नसेलही... पण पुरोगामी विचार व सुधारणांना आपल्या आयुष्यात मोलाचे स्थान देणारी, गावातल्या लोकांना, लेकीसुनांना आपल्या आचार-विचारांनी प्रेरित करणारी, त्यांना योग्य मार्ग दाखवणारी, कधी फटकारणारी आजी हीदेखील आजच्या युगातील आजी म्हणता येईल. अशा या आजीबद्दलही इथे लिहायला विसरू नका!

आणि हो, तुमच्यापैकी जर कुणी अशी "सुपर आजी" असाल तर तुमचे हे "आजीपणाचे" अनुभव सुद्धा नक्की लिहा!

aajji1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

securedownload[1].jpgसगल्यन्चे प्रतिसाद बघुन मला पन अगदि रहावत नाहिये. माझि आजि सुद्धा सगलयन्चा आजि सराखि active. तिला इतका प्रचन्द उत्साह कसा आहे ह्याचे अजुनहि सगल्यना कोडे आहे. तिचा गुणान्चे वर्नण करनारि कविता मझ्या आइने लिहिलि. ती इथे शेअर करावि वाट्लि.

चेरी, पराग आणि नानबा , खूप छान वाटलं तुमच्या सुपर आजींबद्दल वाचून.. Happy

प्रिया७ .. Happy नील ला ही नाही वाटत.. म्हणून त्याच्यासमोर कधी काळी ,'मी दमलेय' असे शब्द जरी वापरले तरी अजिबात पटत नाहीत Lol

वर्षू एकदम सुपरकूल आजी हां Happy

सगळ्यांनी किती मनापासून शेअर केलयं. चेरी, सुरेख लिहिलं आहेस.

पराग, नानबा तुमच्या आज्यांची व्यक्तिमत्त्व किती प्रेरणादायी आहेत.

वर्षुताई तुम्ही सुपर आजी आहातच.
चेरी, सोनल छान लिहिलय.

चुकलेल्या माणसालाही सांभाळून घ्यावं कारण सगळ्यांनीच त्याचा रागराग केला तर तो चुकीच्या वाटेवर आणखीनच ढकलला जातो अशी तिची फिलॉसोफी होती >>>> नानबा, हे खूप आवडले. खरेतर सगळंच आवडले.

पराग Happy सगळ्याच आजींअबद्दल छान लिहिलय. खूप आवडले. आजीचे खूप कौतुक वाटले. शिवाय तुझ्या आई आणि वहिनींच्या आईंचेही आजीपण आवडले.

संयोजक सगळेच उपक्रम आवडलेत. हळुहळू वाचतेय.

सगळ्यांच्या आज्या प्रेरणादायी आहेत!

माझ्या सासुबाई अलिकडेच पणजी झाल्या आहेत. पण 'सत्तर वर्षाची आजच्या युगातली तरुणी' अशीच त्यांची ओळख करुन द्यायला हवी.
अकरावीला शाळेत सर्वप्रथम आल्यानंतर पुढे शिकायची जबरदस्त इच्छा होती पण चार बहिणींची जबाबदारी असलेल्या गरीब भावाला बहिणींची लग्ने लावून देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता! पण माझ्या सासुबाईंची पुढे शिकण्याची जिद्द त्यांच्या भावाला ठाऊक होती. म्हणुनच लग्न ठरवतांनाच त्यांनी दादांकडून (माझे सासरेबुवा) आपल्या बहिणीच्या पुढील शिक्षणाचे वचन घेतले. कै. दादांनीही त्यांचे वचन पुर्ण केले.
अठराव्या वर्षी झालेल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासोबतच त्यांचे पुढील शिक्षण सुरु झाले. एस टी सी ते बी ए बी एड असे शिक्षण, अजुन दोन मुलांचा जन्म, नोकरीनिमित्त बदल्या, मोठे एकत्र कुटुंब अशा धबाडग्यात शिक्षिकेची नोकरीही सुरु होतीच.
दरम्यान विद्यार्थिनींबरोबर त्यांनी राष्ट्रीय स्तरावरची ड्रॉईंगची परीक्षा पण दिली. असं सगळं सुरु असतानाच वयाच्या ५० च्या आसपास त्यांना पुढील ८ वर्षांनी येणार्‍या रिटायरमेंटची चाहुल लागायला लागली होती. रिटायरमेंटनंतर लोकांशी संपर्क रहावा या म्हणुन त्यांनी ज्योतिष शिकायला घेतले. विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा उत्तमरीत्या पार करुन शास्त्री ही पदवी मिळवली. आता गेली १२-१३ वर्षे त्या ज्योतिषाचे काम करतात. खुप लोक येत असतात. अडचणीतल्या लोकांना त्या केवळ फलित न सांगता फार प्रभावीपणे काऊंसेलिंग करतात! उदा.एखाद्या मुलीला सासरी त्रास असेल तर त्या आधी त्या मुलीला स्वतःच्या पायावर उभे रहाण्यास सांगतात, त्या दृष्टीने कोणते कोर्सेस तिने केले पाहिजेत, जॉबसाठी कुठे अप्लाय करु शकते वगैरे माहितीही देतात. त्यांचे वाचन दांडगे असल्याने त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती असते. नसल्यास शोधून काढतात.

५८ व्या वर्षी त्यांनी युथ हॉस्टेलचा 'सारपास' ट्रेक एखाद्या तरुणीला लाजवेल असा हसत-हसत पुर्ण केला. नंतरही हिमालयातले १-२ ट्रेक्स केले.
मुले बाहेर पडायला लागल्याबरोबर इंटरनेट, काँप्युटर अगदी सहजरीत्या आत्मसात केले. काँप्युटरचा एक कोर्स अलिकडेच त्यांनी पुर्ण केला. आता तर स्मार्ट-फोनवर व्हॉट्स अ‍ॅपही वापरतात. आम्हाला सतत फोटो वगैरे पाठवतात, चॅटवर असतात.

रिटायरमेंटनंतर सगळा भारत बघायचा. जग फिरायचे असे आई-दादांचे स्वप्न होते. चार-पाच वर्षांपुर्वी त्या आणि दादा एका यात्राकंपनीसोबत ईशान्य भारताच्या ट्रीपवर गेले असता पहिल्याच मुक्कामात जगन्नाथपुरीला दादांना हार्ट अ‍ॅटॅक आला आणि ते गेले. १५ व्या मिनीटाला त्यांनी आम्हाला फोन केला. आमच्या फ्लाईटस, व्हीसे, रजा इत्यादी करायला ताबडतोब सुरुवात करावी या दृष्टीने. त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःचे मानसिक संतुलन ढासळू दिले नाही. भुवनेश्वरपर्यंत एका लोकल माणसाबरोबर डेड बॉडी घेऊन आल्या. दरम्यान माझा भाऊ मुंबईहुन भुवनेश्वरला पोहोचला. तेव्हा पहिल्यांदा त्यांनी भावना मोकळ्या केल्या...
त्या दोघांनी बघितलेले स्वप्न त्या पुर्ण करताहेत. गेल्या ४ वर्षांत भारतात बरेच फिरल्या पण युरपचा दौराही करुन आल्या. एकट्या फ्रांसपर्यंत गेल्या. तिथे त्यांच्या एका फ्रेंच मैत्रीणीकडे १५ दिवस पॅरिसमध्ये राहिल्या. तिकडुन लंडनला जाऊन हिथ्रो विमानतळावर केसरी टुरला जॉईन झाल्या.
मग श्रीलंका पाहून झाली. आता आफ्रिकेला जाण्याचा विचार आहे.

ऑस्ट्रेलियात वर्षभर होत्या तेव्हाही मजेत होत्या. 'मला बोलायला कोणी नाही' 'कंटाळा आला' 'काय ही थंडी' असा सुर कधीच नाही. वाचन, उत्तम सिनेमे बघणं, रोज चालायला जाणं, शेजार्‍यांशी कधीतरी गप्पा असा भरगच्च कार्यक्रम असतो. शिवाय नातींमध्येही रमून जातात.

२ वर्षांपूर्वी त्यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे 'मोफत वाचनालय' घरुन चालवायला घेतले. काही काळातच त्यांचा साहित्य कट्टा घरी जमायला लागला. शिवाय काही वर्षांपूर्वी एक छोटे भजनी मंडळ सुरु केले. कुणीही मंडळात सहभागी व्हा पण अट एकच 'घरचे/टी व्ही सिरियलचे विषय काढायचे नाहीत!' Biggrin मंडळ सुरु झाल्यावर थोडेफार गाता यावे म्हणुन गाण्याच्या क्लासला जाऊन थोडे गाणे शिकून घेतले. दोन की तीन परीक्षा पास झाल्या. पहिल्या दिवशी क्लासमधली मुले आजींना क्लासमध्ये बघुन एव्हढी आश्चर्यचकित झाली होती की गायचे सोडुन आजींकडेच बघत बसली. नंतर मात्र 'नाही आजी हे गाणं असं नाही, तसं आहे!' अशा चर्चा व्हायला लागल्या.

जीवनाकडे बघण्याचा पॉझिटेव्ह अ‍ॅटीट्युड, मुळची हुशारी त्याला वाचन-अभ्यासाची जोड, माणसांची आवड आणि हसतमुख व्यक्तिमत्व या भांडवलावर त्या सत्तरीतली आजी न रहाता 'चिर-तरुण आजी' झाल्या आहेत!

अतिशय सुरेख धागा आहे!!!
सगळ्ञ्या प्रेरणा दायी आज्या आहेत. शेअर करणार्‍या सर्वाना धन्यवाद!!

चेरी, वर्षु, छान लिहिल्यात आठवणी.
पराग, नानबा तुमच्या सुपर आज्या फार मस्त, खरचं नशीबवान आहात Happy
वत्सला, तुमच्या सासूबाईंची ओळख आवडली Happy

खुपच प्रेरणादायी आहेत सगळ्या आज्या! काहीही करायचा उत्साह हा कॉमन डिनॉमिनेटर आहेच! >>>> +१००..

प्रचंड आवडला हा धागा - सर्व वाचून इतका उत्साह वाढलाय ना .....

सर्व लेखकांचे/लेखिकांचे मनापासून आभार ....

चेरी, पराग, वर्षू ताई, नानबा, वत्सला - सगळ्याच आज्जा प्रेरणादायी आहे ! कसल भारी वाटतय वाचुन Happy अजुन वाचायला आवडेल !

मला हा उपक्रम फार आवडला. सुपरआज्या फार मस्त आहेत.
माझी आजी अगदी नानबाच्या आजीसारखी आहे. खरंतर माझ्या सगळ्याच आज्या एक से बढकर एक आहेत. या सगळ्यांनी किमान ग्रॅज्युएट अन कमाल म्हणजे डॉक्टर (एमडी, एम.एस.) एवढं शिक्षण अगदी गरिबीत केलंय. कसं ते त्यांच्याकडूनच ऐकण्यासारखं आहे. सगळ्याच ७५+ वयाच्या.
या सगळ्यांनी अगदी समाजाच्या चालीरितींच्या विरुद्ध जाऊन, प्रसंगी राजकीय लढ्यात सहभागी होऊन, त्यांच्या बुद्धीला पटेल तेच केलं. त्यामानाने आम्ही नातवंडं आजुबाजुचे चार लोक जे करतात तेच करतो. विशेष काही नाही.
तर माझी आजी आहे ८०+ वर्षाची.
माझ्या आजीचे वडील ती लहान असतानाच गेले. मोठ्या बहिणीने-मेव्हण्यांनी सगळ्या लहान भावंडांना वाढवलं. मेव्हणे संघाचे मोठे कार्यकर्ते. त्यामुळे आजी अन इतर भावंडंही संघाचं काम करत होतेच. सगळ्या बहिणी एम.ए., बी एड झाल्या. (१९५०-५५ साली). शिक्षक, लेक्चरर वगैरे झाल्या. आजी सांगते की लहानपणापासुनच तिच्या वर्गात ती एकटी किंवा एखाद्-दुसरी अजुन मुलगी असायची. लग्नही तिने स्वतःच्या मर्जीने अन स्वतःच्या अटींवर केलं. आजोबांकडे सग्ळे काँग्रेसी तेव्हा तिने आधीच क्लिअर केलं की ती जनसंघाचं काम सोडणार नाही. अन तिने खरंच इलेक्शनमध्ये तिच्या सासर्‍यांविरुद्ध कँपेनिंग केलं. घरच्या कुणीही तिला अडवलं नाही अन तिनीही स्वतःच्या विचारांना मुरड घातली नाही. आजही किती घरात एवढं व्यक्तीस्वातंत्र्य आहे?
लग्नाआधी तिने बीए केलं. मग लग्नानंतर एमए (इंग्लिश लिट) अन बीएड. शाळेतून रिटायर झाल्यावर आता ती एक शाळा चालवते अन अजुनही सगळ्य मिटिंगा वगैरे अटेंड करते.
याशिवाय अनेक उद्योग जसं की झोपडपट्टी मध्ये बचतगट, हेल्थ सेंटर, शाळेतल्या मुलांसाठी रवीवारचे कोचिंग क्लासेस वगैरे. हे सगळं अर्थातच कसलीही फी न घेता फक्त देणगीतून चालवले जाते.
तिच्याइतकं डिसिप्लीन फक्त आर्मीमध्येच शक्य आहे. ठरलेल्या वेळी ठरलेली कामं, स्वत:चं डाएट-औषधं-मेडिकल टेस्ट वेळच्यावेळी करणं, वर्षभरात काय अन कधी करायचं त्याचं प्लॅनिंग हे इतकं काटेकोर आहे की त्यावरनं आम्ही चिडवतो सुद्धा.
तिचं रोज २-३ पेपर, पुस्तकं वाचणं, जुन्या पद्धतीचं पण परफेक्ट इंग्लिश बोलणं, मोबाइल वापरणं, एकटीने विमानप्रवास अन सगळ्या नव्या गोष्टी लॉजिकली विचार करुन अ‍ॅक्सेप्ट करणं माझ्या मित्रमैत्रिणींना फार आवडतं.
उगाच "आमच्या काळी सगळ किती छान" वगैरे तिच्याकडून कधीही ऐकलं नाही. (रोमँटिसिज्म नाही अजिबात) .उलट नेहमी म्हणते की आजकाल तुम्हाला पाणी, अंतरं, अन्न, कम्युनिकेशन अशा साध्या गोष्टींसाठी एनर्जी, वेळ घालवावा लागत नाही तर तुम्ही किती काही करु शकता.तिच्या लहानपणी प्लेग आला म्हणून जंगलात रहाणे, मुलींना दुरापास्त शिक्षण, जुनाट चालीरिती, पाण्यासाठी दूर दूर जावे लागणे, अन नंतर्च्या काळातही साध्या साखरेसाठी रेशनिंग वगैरे असल्याचा तिला अतिशय राग आहे. एकुणच त्या काळाविषयी तिचं मत काही विशेष चांगलं नाही. आजचं जग जास्त चांगलं आहे अन येणारं अजुन चांगलं असेल हा तिचा विचार मला फार आवडतो. Happy
शिक्षणासाठी त्या पिढीने इतके हाल सहन केलेत, विशेषतः मुलींनी. त्यामुळेच मला कुणी शिक्षण घेऊन त्याचा काहीही उपयोग केला नाही की फार राग येतो..यावर मी ज्वलंत चर्चाही केली होती मागे माबोवर Wink
अजून खुप काही लिहू शकते पण आत्ता इतकंच.

<<५८ व्या वर्षी त्यांनी युथ हॉस्टेलचा 'सारपास' ट्रेक एखाद्या तरुणीला लाजवेल असा हसत-हसत पुर्ण केला. नंतरही हिमालयातले १-२ ट्रेक्स केले.
मुले बाहेर पडायला लागल्याबरोबर इंटरनेट, काँप्युटर अगदी सहजरीत्या आत्मसात केले. काँप्युटरचा एक कोर्स अलिकडेच त्यांनी पुर्ण केला. आता तर स्मार्ट-फोनवर व्हॉट्स अ‍ॅपही वापरतात. आम्हाला सतत फोटो वगैरे पाठवतात, चॅटवर असतात.<<

व्वा...वत्सला. तुझ्या सासुबाईंचं खुप खुप कौतुक!! अतिशय प्रेरणादायी आहे व्यक्तिमत्व. Happy

आता प्रिंटआउट काढुन आईला वाचायला देते.

५८ व्या वर्षी त्यांनी युथ हॉस्टेलचा 'सारपास' ट्रेक एखाद्या तरुणीला लाजवेल असा हसत-हसत पुर्ण केला. नंतरही हिमालयातले १-२ ट्रेक्स केले.
>> हे फार म्हणजे फार भारी आहे.

Pages