ग्रँडमॉम्स गोईंग स्ट्राँग!

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:41

काळ बदलला. साधनं बदलली. तंत्रज्ञान बदललं. एकंदर जीवनमान बदलत चाललंय तसं माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत चाललाय. पूर्वीची, तुमच्या- आमच्या काळातली छान छान गोष्टी सांगणारी, देवघरात वाती वळणारी, मुलं नातवंड सुना हेच एक विश्व मानणारी ही आजी तरी कशी ह्याला अपवाद असेल बरं?

एकीकडे नातवंडांना छान गोष्टी सांगत, त्यांच्याकडून इंटरनेटचे धडे घेणारी ही आजच्या काळातली आजी नव्या दमाने, नव्या उत्साहात आयुष्याच्या ह्या दुसर्‍या खेळीस सुरुवात करते. नोकरी /व्यवसायातून किंवा गृहिणीपदावरून निवृत्ती घेतल्यानंतर, घरातील जबाबदार्‍या पुढील पिढीकडे सुपूर्त केल्यानंतर पुन्हा एकदा आनंदाने जगण्याची उर्मी असणारी ही आजी. काही वेळेस जोडीदाराची साथ संपल्याने, मुलं आपापल्या घरट्यात रमल्याने आलेला एकाकीपणा, तब्येतीच्या कुरबुरी, नात्यांचे न सुटलेले अनाकलनीय गुंते, आयुष्यभरातील सुख- दु:खांचा हिशोब मांडताना हेलकावणारं मन, त्यातून क्वचित येणारं नैराश्य हे सगळं बाजूला सारून सकारात्मक दृष्टीकोनातून "आजीपण" उपभोगणार्‍या ह्या सगळ्या आज्यांना आज मातृदिनानिमित्त संयुक्तातर्फे अभिवादन!

स्वतःच्या आरोग्याबद्दल सतर्क राहून वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करून घेणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करणे, नवनवीन गोष्टी शिकण्यात उत्साही/ तत्पर असणे, अनेक वर्षांच्या धकाधकीच्या आयुष्यात मागे पडलेल्या एखाद्या जुन्या छंदाला पुन्हा आपलेसे करणे, नवीन व्यवसाय / उद्योगात झेप घेणे, सामाजिक उपक्रम राबविणे ह्या आणि अश्या नानाविध गोष्टींनी आपले जीवन हसत-खेळत जगणार्‍या अश्या अनेक आज्या आजूबाजूला दिसतात.
मोबाईल वापरायला शिकणे, एकटीने विमानप्रवास करणे किंवा परदेशगमन करणे, स्वतःच्या व कुटुंबीयांच्या विकासासाठी ह्या वयातही जागरूक असणे, समाजात सुधारणांना खतपाणी घालणे यांपैकी अनेक गोष्टी ही आजी करत असते. तुमच्या घरात/परिचयात असलेल्या आजींबद्दल इथे जरूर लिहा.
तुमच्या परिचयातील आजी ही शहरी वळणाची कदाचित नसेलही... पण पुरोगामी विचार व सुधारणांना आपल्या आयुष्यात मोलाचे स्थान देणारी, गावातल्या लोकांना, लेकीसुनांना आपल्या आचार-विचारांनी प्रेरित करणारी, त्यांना योग्य मार्ग दाखवणारी, कधी फटकारणारी आजी हीदेखील आजच्या युगातील आजी म्हणता येईल. अशा या आजीबद्दलही इथे लिहायला विसरू नका!

आणि हो, तुमच्यापैकी जर कुणी अशी "सुपर आजी" असाल तर तुमचे हे "आजीपणाचे" अनुभव सुद्धा नक्की लिहा!

aajji1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना धन्यवाद! नाही गं डीजे...........मी माझ्या वडिलांकडून शिकले पोहायला. सांगलीला कृष्णा नदीत!
अगदी ७/८ वर्षाची असताना!

माझ्या दोन्ही आज्या अगदी साध्या सुध्या गृहिणी होत्या, एक अजुनही आहे.पण दोघींची स्वतःची अशी गम्मत आहे. Happy

बाबांची आई बर्‍यापैकी काळाच्या पुढे होती. त्याकाळी गावात शिवाशीव पाळतं, तेंव्हा माझी आजी कोणाही अडल्या नडल्याला औषोधोपचार, खाऊ पिऊ देत असे. नंतर भलेही आंघोळ करायला लागो, ती मागे पुढे बघत नसे.
स्वतः ११ मुलांबरोबर ओळखीची, नात्यातली इतर मूलेही शिक्षणासाठी तिने संभाळली आणि त्यांच्या खाऊ पिऊत कशातही फरक केला नाही. तसा तिने सुना आणि स्वतःच्या मुली आणि मुलगे ह्यांतही फरक केला नाही, ती सगळ्यांना सारखेच ओरडायची Proud माझ्या आईला तर तिने बरीच मदत केली, घरात सेटल व्हायला. आई चार भावांची लाडकी बहीण. तिने माहेरी कधी एकटीने जेवण बनवले नव्हते. एकदा आजोबांनी तिच्यावर सगळे जेवणाचे काम टाकायचे ठरवले. तेंव्हा आजीने आजोबांच्या धुसफुशीला न जुमानता आईला मदत केली. तिने त्या काळी सगळ्या मुलांना गोरेगावातच वेगवेगळे संसार करून दिले. ह्या आजीला मी फक्त ४ वर्षेच बघीतलं. Sad

आईची आई, अजुनही आहे, आणि मी पहिलीच दुधावरची साय असल्याने माझे रग्गड लाड करते. तिच्या पणतीचे पण करते. ही तिला बेबल्या म्हणते आणि ती पणजीला हेमल्या म्हणते. Wink

आता ती ८०+ आहे, स्वतःचे सगळं स्वतः करते. अजुनही घरातली सगळी कामं करते. स्वतःचा आहार, औषधे, व्यायाम ह्यात हयगय करत नाही. माझ्या ह्या आजीने ८० च्या दशकात ख्रिश्चन सून मोकळेपणाने स्विकारली. माझ्या आईचे आणि माझे ऑपरेशन झाले तेंव्हा तिने सगळं निगुतीने केलं. तिने माझ्या आईला एकच सांगीतले की तुझी सासू जास्त अनुभावी आणि भेदभाव न करणारी आहे. तू तिचं सगळं ऐक. माझ्यापेक्षा त्याच तुला योग्य सल्ला देतील.

आणि माझ्या आजीचे सल्ले काय? तर -
सगळ्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत. (माझी आई केवळ मासे, आंबे आणि बटाटाच खायची माहेरी)
नवर्‍याला (म्हणजे माझ्या बाबांना) गरम जेवण हवे असेल तर त्याने वेळेवर घरी यावं, कोणी (म्हणजे माझी आई) त्याच्यासाठी जागत बसणार नाही. Proud
नणंदा - भावजयांचे संसार बघू नकोस, तुझा बघ.त्यांचे नवरे नि त्यांची मुलं, तुझ्या नवर्‍या आणि मुलांसारखी नाहीत. Proud
देतलो कोण? - घोव नायतर आवशीचो घोव. (काही हवसं वाटलं तर नवरा किंवा वडिलच देतात) त्यामुळे अजुन कोणी काही देईल अशी अपेक्षा करू नकोस. पण कोणी दिलं तर त्याला विसरू नकोस.

माझ्या ह्या साध्या सुध्या आज्यांनी माझं, माझ्या सगळ्याच आत्ते - चुलत - मामे भावंडांच लहानपण सुंदर केलं. सगळ्या सुना - जावयांची कुटुंब जोडून आम्हाला एक मोठ्ठ कुटुंब दिलं.

सर्वांच्या आज्ज्या भारी!
शूम्पे Proud

सही धागा आहे हा. संयोजकांचं कौतुक आहे. यावेळी छान विषय निवडले आहेत. Happy

मानुषी, ग्रेट आहेत तुमच्या आजी.

सीमा, मस्त लिहिलयस.

तुम्ही म्हणाल त्यात काय , अल्पसंतुष्ट असतील. पण ते तसे नाही.त्यांचा स्वभाव नक्कीच महत्वाकांक्षी आहे. त्यांच्या अपेक्षाही असतात. पण ध्येय गाठण्याच्या नादात सध्याच्या परिस्थीतीविषयी कुढत बसण्याचा नाही. अपेक्षांचे ओझे दुसर्‍यावर लादण्याचा स्वभाव नाही. त्यांच्या अवतिभोवती वावरताना त्यामुळ अपराधित्व येत नाही. >>>>>> क्या कही!! Happy

हा उपक्रम विशेष वाटला आणि आवडलाही खुप! मी सगळ्या पोस्टी कॉपी पेस्ट करुन घरातल्या इतर लोकांना वाचायला देणार आहे. सगळेच उपक्रम छान आहेत पण ह्या उपक्रमाकरता संयोजकांचे विशेष कौतूक. Happy
काही आज्यांबद्दल वाचताना मला स्वतःलाच खुप उत्साह आला!

माझ्या चुलत आजी बद्दल थोडंसं. माझ्या वडिलांची काकू म्हणून ती आमची 'काकूआजी'. 'काकूआजी' मूळची सांगलीची. शिक्षणासाठी पुण्याला आली. तिथे मॅट्रिकपर्यंत शिकली. त्या काळातही पोहायला जायची, नाटकात काम करायची, नाटकं बघायला जायची, गावात सभा असल्या की भाषणं ऐकायला जायची. पुढे माझ्या आजोबांशी तिचा प्रेम विवाह झाला. त्यांची म्हणजे जया भादुरी-अमिताभ बच्चन जोडी होती (अर्थात ही जया-अमिताभ जोडी खूप नंतर आली)- आजोबा एकदम सहा फूट उंच तर आजी एकदम पिटुकली. मूर्ती लहान तरी एकदम करारी, धडाडीचं व्यक्तिमत्त्व होतं. आजोबा-आजी नंतर बिलासपूरला स्थायिक झाले. तिथे आजोबांनी एक भोजनालय सुरू केलं. सुरुवातीला भोजनालयात लागणारं सगळ्या वर्षाचं कित्येक किलोंचं लोणचं ती स्वतः घालत असे. तिथे दिल्या जाणार्‍या इतर पदार्थांसाठी लागणारे जिन्नस बाजारातून आणून सगळी प्रक्रिया करून माल भोजनालयात पाठवणे हे सगळं आजीच्या देखरेखीखाली चाले. तिचं माणसं हाताळायचं कसब जबरदस्त होतं. तिथल्या कामगारांकडून सगळी कामं ती चोख करून घेत असे. आजोबांचा सगळा व्यवसाय तिनेच अतिशय शिस्तीत चालवला असं म्हंटलं तरी अतिशोयक्ती होणार नाही. आजोबा पुण्यात अनाथ विद्यार्थी गृहात शिकले. त्यामुळे त्यांना अनाथ विद्यार्थ्यांविषयी खास जिव्हाळा होता. त्यांनी आणि आजीने 'मानसकन्या' ह्या उपक्रमात अशा अनेक अनाथ विद्यार्थिनींची आयुष्ये मार्गी लावली. त्यामागची भावना आजोबांची होती तरी उपक्रम राबवण्याचं काम आजीनेच केलं होतं. आजी हिंदी अतिशय उत्तम बोलायची. आजोबांकडे येणं जाणं खूप होतं. विजयाराजे शिंद्यांपासून ते क्रिकेट खेळाडूंपर्यंत अगदी कुणीही यायचं. तरी त्या काळी सुद्धा आजीचा स्वतःचा असा गोतावळा होता.

आजीला खाण्याची आणि इतरांना खिलवण्याची खूप आवड होती. कुठल्याही गावी गेली की कुणी सोबत असो नसो ती जाऊन सगळा बाजार पालथा घालणार, ताज्या भाज्या-फळं घेणार, गावात चांगली हॉटेल्स कुठली त्याची चौकशी करून तिथे जाऊन दोन पदार्थ चाखून घरच्या सदस्यांसाठी आणखी चार बांधून घेऊन येणार. पेढे खावे तर ह्या गावचे, वांगी खावी तर त्या गावची अशी सगळी माहिती तिच्याकडे एकदम तयार असे. तिने बाजारात जायचं ठरवलं की ती एकदम बाजारहाटचंडिका होत असे. आमच्या गावातला मोंढा घरापासून दूर आहे. तिथवर नेणारं कुणी नसलं, रिक्षा मिळाली नाही असं काही झालं की ती आमच्या घरी काम करणार्‍या बन्सीच्या मोटरसायकलवर सुद्धा बाजारात जायची. बन्सीच्या मागे मोटरसायकलवर दोन्ही बाजूस पाय टाकून बसलेली आजी आणि त्या दोघांच्या मध्ये भाजीपाल्याने भरलेल्या पिशव्या हे दृश्य सगळ्या गावाला ओळखीचं असणार नक्की. वास्तविक आजी-आजोबांनी बिलासपूरचा व्यवसाय खूप वाढवला होता, त्यामुळे गाडी-घोडे अशा सगळ्या सुखसोयी तिथे होत्या. पण म्हणून हाताशी गाडी नसताना तिचं काही अडलं नाही. माझ्या मोठ्या बहिणी बरोबर तिच्या सायकलवर डबलसीट बाजारात गेलेली आजी आठवते आहे. तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे आणि सढळ हाताने खरेदी करण्यामुळे तिच्या गावोगावी खूप ओळखी होत. प्रत्येक भेटीत नेहमीच्या ठिकाणी आवर्जून भेट दिल्यामुळे ओळखी टिकायच्या सुद्धा. त्याचा फायदा तिने आपल्या व्यवसायासाठी करून घेतला. जास्त पगार, इतर सुविधा देऊन इकडचे मुख्य आचारी, इतर कारागीर बिलासपूरला न्यायची. तिचं नावच इंदिरा होतं. नक्की कुठल्या इंदिरेने कुणाचे गूण घेतले कळायला मार्ग नाही. पुढे दुर्दैवाने तिला पचनसंस्थेचा असाध्य विकार जडला. खाल्लेलं काही पचत नसे. लगेच उलटून पडे. उपचारांसाठी ती एकदा एकटी लंडनला जाऊन आली. इतर अनेक उपाय केले. पण तो आजार काही बरा झाला नाही. आजी अक्षरशः शाळकरी मुलीसारखी हलकी-फुलकी झाली. तरी निराश, दु:खी दिसली असं कधी झालं नाही. आधीच्याच उत्साहात सगळी कामं करायची. त्याच उत्साहात उदरभरणाचं यज्ञकर्म सुरूच असायचं Happy

बाहेर कितीही कर्तृत्ववान बाई असली तरी घरात आमच्यासाठी मात्र ती शिस्त आणि लाड ह्याचं अफलातून मिश्रण होती. ताटात साधी लोणच्याची फोड टाकलेली सुद्धा तिला चालत नसे. पोहायला शिकली तेव्हा कदाचित नऊवारी साडी घालून शिकली असेल. पण पुढे तिच्या नाती पोहायला जायच्या तेव्हा त्यांच्या बरोबर 'लेटेस्ट' पोहण्याचा पोशाख घालून पोहायला जायची. आमच्या घरी पण लोकांचं येणं जाणं खूप होतं. त्यातले काही नमुने आले की आतल्या खोलीत कुजबूज करून हसणे हा आमचा आवडता उद्योग होता. आजीला ते कळल्यावर ती पण आमच्यात शामील व्हायची. आमच्या सोबत नवीन चित्रपटांतली हिंदी गाणी म्हणायची. एकदा आम्ही व्हॅक्सिंग इ. बद्दल बोलत होतो. आजीने लगेच आम्हाला तिच्यावेळी ती काय करत असे ते सांगितलं. अगदी आमच्या पिढीतल्या मुली सुद्धा ज्या विषयांवर बोलायला लाजतात त्या विषयांवर ती आमच्याशी मोकळेपणाने बोलायची. हे अतिशय कौतुकास्पद वाटतं मला.

माझी खात्री आहे, आज आजी असती तर तिने इंटरनेट, स्मार्ट फोन्स सगळं शिकून घेतलं असतं. इथे अमेरिकेत माझ्या घरी आली असती. इथल्या फार्मर्स मार्केटमध्ये गेली असती एकटीच. इथल्या भाज्या, इतर शेतीमाल आणि त्याच्या वेगवेगळ्या जाती, त्यामागचे सगळे अर्थकारण समजावून घेतले असते. आजी खरंच खूप भारी होती.

आज हा धागा एका दमात वाचून काढला. ग्रेट आहेत सगळ्या आज्ज्या. आपली माणसं आजही असोत वा काळाच्या पडद्या आड गेलेली असोत, त्यांचं गुणवर्णन मुद्दामहून केलं जात नाही. आज मायबोलीच्या ह्या उपक्रमामुळे दोन पिढ्याची कर्तृत्वं आपण स्वतःशीच उजळवून काढत आहोत आणि ती इतरांना सांगून प्रेरणेचा मोठा स्त्रोतच खुला करत आहोत.

संयोजक, मस्त चाललं आहे Happy

सिंडरेला, पोस्ट खूप क्युट आहे !! आणि आजी खरंच खूप भारी!! Happy

खूप छान लिहीले आहे सर्वांनी!! वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, सगळ्या आज्ज्यांबद्दल वाचूनच मरगळ निघून जातेय!

सिंडरेला.. खूपच इम्प्रेसिव्ह आहे तुझी काकूआजी... एकदम भारी...
कितीतरी गोष्टी,गुण शिकायचे आहेत आपल्याला अश्या उदाहरणांवरून याची जाणीव होतेय या धाग्यामुळे Happy
अ‍ॅब्सॉल्यूटली मॉरल बूस्टिंग व्यक्तीमत्वे...

सिंडी काकूआजीची छान ओळख करून दिलीस. अगदी काळापुढेच होत्या या स्त्रिया!
आणि हो सांगलीच्या सगळ्या मुली(??) एक्स्पर्ट स्वीमर्स असतात हो!(:डोमा:)

सर्वांच्या आज्ज्या झांसी की रानी! Happy मस्त वाटले वाचून. संयोजकांचे कौतुक अन आभार.
वरच्या पोस्ट्स वाचून वाटते की अंदाजे पंचवीस वर्षांपासून 'ग्रँड्मॉम्स आर ग्रोईंग स्ट्राँग' .. पण त्याची दखल या घडीला घेतली जातेय, जाणीव आता कुठे होतेय. एक बदल व्हायला एक पिढीचे अंतर. आज आपण असे कोणते बदल हिरीरीने स्वीकारु जे पंचवीस वर्षांनी नावाजले जातील?! त्या सर्व आजी आजोबांना माझा नमस्कार. Happy

वरच्या पोस्ट्स वाचून वाटते की अंदाजे पंचवीस वर्षांपासून 'ग्रँड्मॉम्स आर ग्रोईंग स्ट्राँग' .. पण त्याची दखल या घडीला घेतली जातेय, जाणीव आता कुठे होतेय. >>>> आशू.. दखल 'इथे' (मायबोलीवर) आत्ता घेतली जाते आहे असं म्हणू शकतेस... त्याचं कारण हा उपक्रम ह्या वर्षी आला.. पण माझ्या बाबतीत म्हणशील तर 'ग्रँडमॉम इज स्ट्राँग' ह्याची जाणीव अनेक वर्षांपासून किंवा कळायला लागल्यापासून होतीच. Happy आणि हेच इथल्या बर्‍याच जणांच्या बाबतीत असू शकेल.
ह्या फोरम वर नाही पण बाहेर ह्याविषयी कुठल्यातरी स्वरूपात आदर, कृतज्ञता व्यक्त नेहमी करत आलो आहोत.

एक बदल व्हायला एक पिढीचे अंतर >>> कुठला बदल ?

बाकी सगळ्यांच्या पोस्ट्स वाचल्या.. खूप मस्त लिहिलं आहे सगळ्यांनी.. सगळ्याच आज्ज्या भारी !

सगळ्यांच्या आज्या भार्री आहेत. नाही म्हटलं तरी जरा कॉम्प्लेक्सच आला वाचून. आपल्याला सगळं (त्यामानाने) सुखासुखी मिळतं म्हणून किंमत राहत नाही की काय. Happy
निदान त्यांच्यासारखा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड बाणला अंगात तरी पावलं. Happy

माझी आजी
काय काय लिहु तिच्याबद्द्ल? लिहु तेव्हढे कमीच आहे.
लहानपणीच छोट्या भावंडाना सांभाळ्ण्याची जबाबदारी तीने हसतमुखाने पार पाडली. तिची आई तिच्या वाट्याला कधी आलीच नाही. पण तिच्या मुलाला, म्हणजे माझ्या बाबांना नोकरीच्या व्यापातुनही आईचे प्रेम कमी पडु दिले नाही. लहानपणापासुनच ती खुपच धीट होती. गावच्या देवळात बाईच्या वेषात शिरून चोरी करणार्‍या एका माणसाला तिने रंगे हाथ पकडले तेव्हा पुर्ण गावाने तिला नावाजले होते.

पुढे तिच्या काकांनी तिला दत्तक घेतले. त्यावेळी बरीच मुले असतील तर नातेवाईकांना दत्तक दिले जाई. त्यामुळे काकांनीच तिचे लग्न लावुन दिले आणि ती वयाच्या पंधराव्या वर्षी जबाबदार ग्रुहीणी बनली. माहेरी गरीबी तर सासरी अचानक वाट्याला आलेली श्रिमंती. परंतु ती बद्लली नाही. जुन्या काळचे जाचक निर्बंध, नऊवारी साडी, दागदागिने लेवुन घरातली कामे करणे तिला नक्किच जड गेले असेल; पण कुठ्लीहि परिस्थिती ती त्याच सहजतेने हाताळायची.

माझे आजोबा लवकरच गेले आणि घरची एकत्र कुटंब व्यवस्थाही कोलमडली. आजीचे दिर्,जावा सारे वेगळा घरोबा करुन राहु लागले आणि आजिवर एक लहान मुलगा आणि सासु यांची जबाबदारी येऊन पडली. कायम घर एके घर करणारी आणि एकत्र कुटुंब सांभाळणार्‍या माझ्या आजीला नोकरी करावी लागली.

अचानक उद्भवलेली परिस्थिती तिने हसतमुखाने हाताळली. तिने नर्सिंगचा कोर्स केला आणि जिल्हा परिषदेच्या हॉस्पिट्लमध्ये नोकरी पकड्ली. आज नोकरी करणे सहज सोपे आहे आणि काळाची गरजही आहे. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. आसपासचे, शेजारी पाजारी, नातेवाईक एव्ह्ढेच काय तिच्या आईनेही नोकरीला विरोध दर्शविला आणि नावेही ठेवली. पण नोकरिच्या निर्णयावर ती ठाम राहिली. स्वतःच्या घराचा उत्कर्ष तर साधलाच पण बहीणींच्या लग्नाचेही तिनेच पहिले.

नोकरीत खेडोपाडी चालावे लागायचे, नदीही चालत पार करावी लागायची. तेव्हा तिचे पाय दुखायचे, पण सांगते कोणाला? पण ती किती आधुनिक विचारांची होति ते आम्हाला तिथले गावकरी सांगत. ते म्हणायचे, नर्स बाई बामण, शुद्ध्(शाकाहारी) खाणार्‍या, पण आम्हा गावकर्‍यांच्या जत्रेत त्यांनी तयार केलेल्या मटनाचेच जेवण लागायचे. त्या स्वतः चवही न बघता उत्तम मांसाहारी बनवायच्या. यामध्ये घरातले सोवळे ओवळे असुनही फक्त गावकर्‍यांनी दिलेल्या प्रेमापोटी ती त्यांचा हट्ट पुरवीत असे. सकाळी सोवळ्यातली पुजा पण जातपात फक्त देवघरापाशी बाकी ती कोणत्याही जातितील लोकांना तेव्हढिच आपलिशी वाटायची आणि तिही कोणालाही सढ्ळ हस्ते मद्त करीत असे.

पुढे तिची ती फिरतीची नर्सची नोकरी संपली आणि ती पुर्णपणे आमच्या वाट्याला आली. उन्हाळ्यातील लोणची, पापड, कुरड्या तिनेच करू जाणे. आणि तिने केलेले बेसनचे लाडु, आजही आठवुन तोंडाला पाणी सुटते. आमचे शाळेचे ड्रेस तीच धुवायची, कारण तिला कामवालीने धुतलेले कपडे आवडत नसत. ती सतत कामात व्यग्र असायची, कुठे गोधडी शिवणे, ईस्त्री करणे, वह्या पुस्तकांना कव्हर घालणे ती आनंदाने करायची.

एव्हढेच नाही, घराचे सगळे आर्थिक व्यवहार अगदी आजतागायत तिच सांभाळायची. वयोपरत्वे डोळ्यांना कमी दिसायचे म्हणुन विणणे, शिवणे कमी झाले तरी बँकेचे व्यवहार आणि आम्हा नातवंडाना शेअर बाजारातले बारकावे समजुन सांगताना तिची बुद्धी मात्र तिक्ष्ण असायची. अगदी शेवटच्या आजारपणातही तिची तल्लख बुद्धी आणि आपल्या माणसांवरचे प्रेम तसेच कायम राहिले.

आज ती या जगात नाही, पण तिचे प्रेमाचे बोल, ताक घुसळताना आमच्या हातात लोण्याचा गोळा ठेवत आमच्या आभ्यासाची चौकशी करताना तिच्या चेहर्‍यावरचे कुतुहलाचे भाव, सारे काही तसेच्या तसे आठवते. व्यवहारी जगात राहुनही मनातला प्रेमाचा झरा जपणारी माझी आजी कायमच आमच्यासाठी एक प्रेरणा ठरली आहे.

तिचे एक वाक्य मला नेहमी आठवते " काम करताना कंटाळा आला तर दुसरे काम हातात घ्यावे. कामाचे स्वरुप बदलले की कंटाळा जातो आणि श्रम केले म्हणजे शरिराला आणि बुद्धिला गंज चढ्त नाही."

Pages