ग्रँडमॉम्स गोईंग स्ट्राँग!

Submitted by संयोजक_संयुक्ता on 12 May, 2013 - 01:41

काळ बदलला. साधनं बदलली. तंत्रज्ञान बदललं. एकंदर जीवनमान बदलत चाललंय तसं माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत चाललाय. पूर्वीची, तुमच्या- आमच्या काळातली छान छान गोष्टी सांगणारी, देवघरात वाती वळणारी, मुलं नातवंड सुना हेच एक विश्व मानणारी ही आजी तरी कशी ह्याला अपवाद असेल बरं?

एकीकडे नातवंडांना छान गोष्टी सांगत, त्यांच्याकडून इंटरनेटचे धडे घेणारी ही आजच्या काळातली आजी नव्या दमाने, नव्या उत्साहात आयुष्याच्या ह्या दुसर्‍या खेळीस सुरुवात करते. नोकरी /व्यवसायातून किंवा गृहिणीपदावरून निवृत्ती घेतल्यानंतर, घरातील जबाबदार्‍या पुढील पिढीकडे सुपूर्त केल्यानंतर पुन्हा एकदा आनंदाने जगण्याची उर्मी असणारी ही आजी. काही वेळेस जोडीदाराची साथ संपल्याने, मुलं आपापल्या घरट्यात रमल्याने आलेला एकाकीपणा, तब्येतीच्या कुरबुरी, नात्यांचे न सुटलेले अनाकलनीय गुंते, आयुष्यभरातील सुख- दु:खांचा हिशोब मांडताना हेलकावणारं मन, त्यातून क्वचित येणारं नैराश्य हे सगळं बाजूला सारून सकारात्मक दृष्टीकोनातून "आजीपण" उपभोगणार्‍या ह्या सगळ्या आज्यांना आज मातृदिनानिमित्त संयुक्तातर्फे अभिवादन!

स्वतःच्या आरोग्याबद्दल सतर्क राहून वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या करून घेणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी हातमिळवणी करणे, नवनवीन गोष्टी शिकण्यात उत्साही/ तत्पर असणे, अनेक वर्षांच्या धकाधकीच्या आयुष्यात मागे पडलेल्या एखाद्या जुन्या छंदाला पुन्हा आपलेसे करणे, नवीन व्यवसाय / उद्योगात झेप घेणे, सामाजिक उपक्रम राबविणे ह्या आणि अश्या नानाविध गोष्टींनी आपले जीवन हसत-खेळत जगणार्‍या अश्या अनेक आज्या आजूबाजूला दिसतात.
मोबाईल वापरायला शिकणे, एकटीने विमानप्रवास करणे किंवा परदेशगमन करणे, स्वतःच्या व कुटुंबीयांच्या विकासासाठी ह्या वयातही जागरूक असणे, समाजात सुधारणांना खतपाणी घालणे यांपैकी अनेक गोष्टी ही आजी करत असते. तुमच्या घरात/परिचयात असलेल्या आजींबद्दल इथे जरूर लिहा.
तुमच्या परिचयातील आजी ही शहरी वळणाची कदाचित नसेलही... पण पुरोगामी विचार व सुधारणांना आपल्या आयुष्यात मोलाचे स्थान देणारी, गावातल्या लोकांना, लेकीसुनांना आपल्या आचार-विचारांनी प्रेरित करणारी, त्यांना योग्य मार्ग दाखवणारी, कधी फटकारणारी आजी हीदेखील आजच्या युगातील आजी म्हणता येईल. अशा या आजीबद्दलही इथे लिहायला विसरू नका!

आणि हो, तुमच्यापैकी जर कुणी अशी "सुपर आजी" असाल तर तुमचे हे "आजीपणाचे" अनुभव सुद्धा नक्की लिहा!

aajji1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळं आजीमंडळ फार गोड, ग्रेट आहे.
वा! मस्त लिहिलं आहे सगळ्यांनी. प्रेरणादायी धागा आहे हा!>> +१.

५८ व्या वर्षी त्यांनी युथ हॉस्टेलचा 'सारपास' ट्रेक एखाद्या तरुणीला लाजवेल असा हसत-हसत पुर्ण केला. नंतरही हिमालयातले १-२ ट्रेक्स केले.>> __/\__. खरंच भारी!

आम्ही घरातल्या किमान कामांनी कंटाळूनही "बास झालं बै आता" असं म्हणतो त्याची लाज वाटते असं काही वाचल्यावर! Sad

पराग, नानबा, नताशा, वत्सला सगळ्यांच्याच आज्ज्या ग्रेट आहेत.
माझ्याही चुलत सासुबाई अश्याच होत्या. माहेरी बडोद्याला विहिरीवर पोहायला शिकल्या होत्या.
नंतर लग्नानंतर दादरला शिवाजी तलावावर बायकांना पोहायला शिकवून संसाराला अडचणीच्या काळात हातभार लावला. तेव्हा म.टा. मधे "साठ वर्षाची मासोळी" म्हणून त्यांच्यावर लेख आला होता.
नंतर त्यांचा मुलगा उच्चशिक्षित होऊन कॅनडाला गेला. (७०च्या द्शकाची सुरवात)त्याने कॅनेडियन मुलीशी लग्न करून तो तिथेच राहिला. मग या काकू कित्येक वेळा एकटीने विमानप्रवास करायच्या. कॅनडातही जेव्हा रहायला गेल्या तेव्हा कॅनेडियन सुनेशी छान पटवून घेतलं.
तिथे पंचक्रोशीत कुणालाही काही मदत हवी असेल तर या तिथे हजर. मग ते स्वयंपाकाचं, पार्टीचम काम असो, बाळंतिणीची काळजी घेण्याचं काम असो, बेबी सिटिंग असो, कुणाला लोणची घालून द्यायची, फराळाचं बनवून द्यायचं, कोणत्याही कामाला त्यांची आनंदाने तयारी.
त्यांच्या ७० व्या वाढदिवशी त्यांच्या मुलाने त्यांना सायकल दिली. त्यानंतर त्या सगळीकडे सायकलवर फिरायच्या.
रेडक्रॉसचंही खूप काम त्या करायच्या.
अपर्णा वेलणकरच्या "फॉर हिअर ऑर टु गो" या पुस्तकात "यू फूल मी गॉड" या नावाचं एक प्रकरणच त्यांच्यावर आहे. दर २ वर्षांनी भारतवारीत त्या माझ्याकडे नगरला काही दिवस रहायच्या. देवपूजा आणि स्वयंपाकाची कामं स्वता:हून अंगावर घ्यायच्या. आणि आम्हाला रोज नवनवे पदार्थ करून घालायच्या. पुन्हा संध्याकाळी आमच्याबरोबर पोहायलाही यायची तयारी!
एके वर्षी माझ्या मुलांची मापं घेऊन कॅनडाला गेल्या. पुढच्या वर्षी दोघांना स्वता: विणलेले स्वेटर घेऊन आल्या. ते स्वेटर माझ्या मुलांनी वापरून आता माझे छोटे पुतणे , भाचे मंडळी अजूनही वापरतात.
त्या स्वता: फारसं शिकलेल्या नव्हत्या. मग इंग्रजीचा काही प्रश्नच नाही. तरी कुठेही अडलं नाही.
त्यांची एक वही होती. त्यात कविता, बडबडगीतं, विनोद, विणकामाचे नमुने असा खजिना होता.
जे चांगलं दिसेल ते टिपून ठेवण्याची त्यांना आवड होती.
आता त्या नाहीत पण आम्ही त्यांना खूप मिस करतो.
अजून खूप लिहिण्यासारखं आहे...........................

धन्यवाद सगळ्यांना!!

नताशा, मानुषी तुमच्या आज्ज्या ग्रेट आहेत!
शशांक पुरंदरेंनी म्हटलय तसं खरोखर हा धागा वाचुन उत्साही वाटतय!

'साठ वर्षाची मासोळी; मानुषी किती गोड !!!
छान छान व्यक्तीमत्वांशी ओळख होत आहे आणी अजून काही नवीन शिकण्याचा हुरुप निर्माण होत आहे..
सर्वांच्या आजींना थम्स् अप

आजचं जग जास्त चांगलं आहे अन येणारं अजुन चांगलं असेल >>> वा काय मस्त पॉझिटिव्ह विचार आहे. आपल्या पिढीत सुद्धा 'आमच्या काळी यंव नी त्यंव' करत उसासे सोडणारे लोक आहेत त्यामानाने तुझ्या आजीचा हा विचार खूपच आवडला.

मानुषी, 'मासोळी' Happy 'फॉर हियर...' मधलं ते प्रकरण पुन्हा वाचलं पाहिजे.

वत्सला, खूप छान वाटलं तुझ्या सासूबाईंबद्दल वाचून. Happy

नताशा, काय प्रेरणादायी विचार आहेत तुझ्या आजींचे.

मानुषी, मस्त ओळख करून दिलीत सासूबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची.

साधं , इतर चार लोकांसारखं मध्यमवर्गीय राहणी असूनही १००० त उठुन दिसण्यासारखं जगता येत हे दाखविणार्‍या माझ्या सासूबाई. म्हणजे माझ्या लेकीच्या आजीविषयी थोडसं इथे लिहिते.

माझ्या सासूबाईंना घरच्या जबाबदारी मुळ फारसं शिकता आल नाही. पण आत्मविश्वास आणि पैशाला पैसे जोडण्यामुळ आज त्या यशस्वी उद्योजिका आहेत.छोट्या गावामधल्या घरगुती राजकारणाला शिताफिने तोंड देत आज त्यांनी स्वतःचा छोटा उद्योग सुरु ठेवलाय. (यंत्रावर शेवया करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्याविषयी परत कधीतरी लिहिन.) खरतर गावात बर्‍याच बायका तो उद्योग करतात. पण स्वच्छता, व्यावहारीकपणा आणि प्रामाणीकपणा मुळ आणि माणसं जोडण्याच्या त्यांच्या कलेमुळ त्या त्यांच्या व्यवसायात अगदी यशस्वी झाल्या आहेत.
पण आज मला त्याविषयी नव्हे तर त्यांच्या आनंदी स्वभावाविषयी, उच्च सेल्फ इस्टिम विषयी लिहायच आहे बरेचवेळा आपण "माझ्याकडे हेच नाही, तेच नाही" म्हणून रडत बसतो.
पण त्या मात्र जे आत्ताच्या परिस्थितीत माझ्याकडे आहे त्याचा सर्वाधिक उपयोग करुन घेवून सुखी रहाण्याचा प्रयत्न करतील. उदा. साधे १०० रुपयाचे बेडशीट बेड वर घालतील ,पण एकही सुरुकती न पाडता. इतके व्यवस्थित कि हॉटेल मध्ये आहोत असे वाटावे. घर कदाचित साधे असले तरी चालेल. पण त्यासमोर निदान झेंडुच्या फुलांची बाग तरी फुलवून ते सुरेख सजविण्याचा प्रयत्न करतील.
तुम्ही म्हणाल त्यात काय , अल्पसंतुष्ट असतील. पण ते तसे नाही.त्यांचा स्वभाव नक्कीच महत्वाकांक्षी आहे. त्यांच्या अपेक्षाही असतात. पण ध्येय गाठण्याच्या नादात सध्याच्या परिस्थीतीविषयी कुढत बसण्याचा नाही. अपेक्षांचे ओझे दुसर्‍यावर लादण्याचा स्वभाव नाही. त्यांच्या अवतिभोवती वावरताना त्यामुळ अपराधित्व येत नाही.

रुढार्थाने त्या अति प्रेमळ, सायीसारख्या मायेच्या नसतील कदाचीत. थोड अंतर राखून, अलिप्त राहून प्रेम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांची आई त्यांना सोडून बालपणीच गेल्यामुळ असेल कदाचीत. पण अति भावनाशिल न वागताही जवळीक साधता येते हे मी त्यांच्याकडुन शिकत आहे.

आज आई आणि बाई म्हटल कि त्यागमुर्ती, झिजणं, सोशिकपणा हेच शब्द बरेचदा डोळ्यासमोर येतात.
त्या संसारासाठी नक्कीच खुप कष्ट घेतात. पण नेमक कुठे थांबायच ते त्यांना माहित आहे. स्वतःची काळजी घेवून अधिक उत्तम रित्या आपल्या कुटुंबियाची काळजी घेता येते. हे सगळ्याच स्त्रियांनी त्यांच्याकडुन घेन्यासारखे आहे. आपल्याला आयुष्यात काय हवं आहे हेच आपल्याला कधी कधी कळत नाही. संपुर्ण आयुष्य खेड्यात काढूनही माझ्या सासुबाईंना मात्र ते पक्क कळलय असा माझा समज आहे.
प्रत्येक बाईकडे काहीना काही गुण असतोच. त्या गुणाला अ‍ॅसेट बनवून (भांडवल) तुम्हाला काहीतरी "बनता" येतच हे त्यांच्याकडुन माझ्या लेकीने शिकाव.

इतर सगळ्या आई लोकांसारखं मलाही माझी लेक यशस्वी व्हावी असेच वाटते. ती वाट खडतरही असेल कदाचित. पण अल्टिमेट गोल गाठताना , माझ्या लेकीने तिच्या आजीसारखी ती वाट एंजॉय करावी, उद्यासाठी आजचा क्षण कुढु नये एवढचं. Happy

मी आता सर्वांनी लिहिलेलं वाचते आहे.
नानबा अतिशय स्फुर्तीदायक व्यक्तीमत्व.
पराग खुप आवडलं तु लिहिलेलं.
वर्षू , तुमच्यासारखी कुल आजी मी पण होणार. Happy

छान ओळखं.

>>त्या संसारासाठी नक्कीच खुप कष्ट घेतात. पण नेमक कुठे थांबायच ते त्यांना माहित आहे. स्वतःची काळजी घेवून अधिक उत्तम रित्या आपल्या कुटुंबियाची काळजी घेता येते. हे सगळ्याच स्त्रियांनी त्यांच्याकडुन घेन्यासारखे आहे. >>

हे आवडलं.

वॉव सीमा, मस्त पोस्ट!!

ध्येय गाठण्याच्या नादात सध्याच्या परिस्थीतीविषयी कुढत बसण्याचा नाही. अपेक्षांचे ओझे दुसर्‍यावर लादण्याचा स्वभाव नाही. त्यांच्या अवतिभोवती वावरताना त्यामुळ अपराधित्व येत नाही.
रुढार्थाने त्या अति प्रेमळ, सायीसारख्या मायेच्या नसतील कदाचीत. थोड अंतर राखून, अलिप्त राहून प्रेम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांची आई त्यांना सोडून बालपणीच गेल्यामुळ असेल कदाचीत. पण अति भावनाशिल न वागताही जवळीक साधता येते >>
हे खूपच आवडलं आहे!! Happy

सीमा, मस्तच. वर बाकीच्यांच्या पोस्ट्सही भारी आहेत. प्रत्येक आजीकडून शिकण्यासारखं काहीतरी आहे. मातृदिनावर आधारित हा उपक्रम सगळ्यात जास्त आवडला.

सीमा, मस्तच ओळख.
साधे १०० रुपयाचे बेडशीट बेड वर घालतील ,पण एकही सुरुकती न पाडता. इतके व्यवस्थित कि हॉटेल मध्ये आहोत असे वाटावे. घर कदाचित साधे असले तरी चालेल. पण त्यासमोर निदान झेंडुच्या फुलांची बाग तरी फुलवून ते सुरेख सजविण्याचा प्रयत्न करतील.
तुम्ही म्हणाल त्यात काय , अल्पसंतुष्ट असतील. पण ते तसे नाही.त्यांचा स्वभाव नक्कीच महत्वाकांक्षी आहे. त्यांच्या अपेक्षाही असतात. पण ध्येय गाठण्याच्या नादात सध्याच्या परिस्थीतीविषयी कुढत बसण्याचा नाही.>> हे सही आहे.

मस्तच लिहिलय सर्वांनी.

या मातृदिनानिमित्त माझ्याही आजीची आठवण आली. त्याकाळात घरी रोज ५०-५० लोकांचा स्वयंपाक वगैरे करुन, त्या धबडग्यात सुद्धा बॅडमिंटन, पोहणे, भरतकाम करणे या सर्वासाठी वेळ काढायचीच.

संयोजकांचे आभार या उपक्रमाबद्दल.

काय मस्तं लिहिलय मानुषीताई आणि सीमा !!
'साठ वर्षाची मासोळी', मस्तं टयटल , तुम्ही पण त्यां कडूनच स्विमंग शिकला असणार , मानुषीताई !
सीमा,
तुझ्या सासुबाईंचा छोटा उद्योग थाटतानाचा प्रवास ' आईला उद्योजिका व्हायचाय' धाग्यावर वाचायला आवडेल !!

वत्सला, नताशा, सीमा, मानुषी, तुमच्या सगळ्यांच्या पोस्टींमधल्या आज्या ग्रेट आहेत!

या आज्यांची तडफ, कर्तुत्व बघितल्यावर, आपल्याला सगळं सहज, सोपं मिळत गेलं की आपण फार गोष्टी गृहीत धरतो असं वाटतं.

नताशा, मानुषीताई, सीमा सुंदर पोस्ट आहेत!

मला माझ्या दोन्ही आजी- आजोबांचा सहवास फारसा मिळाला नाही. चौघेही माझ्या लहानपणीच गेले. आता वाटतंय, त्या सामान्य वाटणार्‍या आजी-आजोबांमध्ये काहीतरी असामान्य पैलू असणारच, त्यांची ओळख व्हायचे राहून गेले.

माझ्या दोन्ही आजेसासूबाई एकदम भन्नाट होत्या. नवर्‍याच्या आईची आई अगदी शेवट्पर्यन्त सर्व लेकीसुना, नातवंड गोतावळ्याचे लाडच् लाड ़ करायची. त्यान्चे लग्न बालपणीच झाले होते, नवरा गेल्यानंतर घरची पिढीजात जहागीरदारकी संभाळत ७ मुलाना मोठं केलं, त्यातल्या ५ मुली, उत्तम शिक्षण घेउन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यावर मगच लग्न करवून दिल्या. अगदी उत्साहमूर्ती होत्या.

अजून लिहीते जरा वेळाने.

या आज्यांची तडफ, कर्तुत्व बघितल्यावर, आपल्याला सगळं सहज, सोपं मिळत गेलं की आपण फार गोष्टी गृहीत धरतो असं वाटतं.>>+१०१
काहितरी करायला हवं नाहीतर माझी नातवंड लिहितील की त्यांची आज्जी माबोवर गप्पा ठोकत बसायची नुसती. Uhoh

मस्तच ..

>> आजचं जग जास्त चांगलं आहे अन येणारं अजुन चांगलं असेल

>> पण ध्येय गाठण्याच्या नादात सध्याच्या परिस्थीतीविषयी कुढत बसण्याचा नाही.

Happy

शूम्पी, Lol

>>काहितरी करायला हवं नाहीतर माझी नातवंड लिहितील की त्यांची आज्जी माबोवर गप्पा ठोकत बसायची नुसती. >>>
तू उपक्रमांमध्ये संयोजक म्हणून भाग घे म्हणजे तुझ्या नाती अभिमानाने 'आमची आजी नोकरी, घरचं सगळं सांभाळून मायबोलीवर संयोजक म्हणूनही काम करायची' असं अभिमानाने सांगतील Proud

मस्तच लिहिलय सर्वांनी. >>> सगळ्या आज्ज्या खुप खुप आवडल्या..
शिकण्यासारखे आहे प्रत्येक आज्जी कडुन !!
सायो, शुम्पी Lol

'त्या संसारासाठी नक्कीच खुप कष्ट घेतात. पण नेमक कुठे थांबायच ते त्यांना माहित आहे. स्वतःची काळजी घेवून अधिक उत्तम रित्या आपल्या कुटुंबियाची काळजी घेता येते," सीमा , हे फार्फार आवडलं.. अति भावनाशील न होता जवळीक साधणे- खूप पटला हा पॉईंट!!!

Pages