मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंद्राची इथे टाकलेली प्रचि बघून ही खाली टाकलेली प्रचि टाकण्याची केव्हाची वाट बघत होते. पण व्हिजिबिलिटी अगदी खराब होती त्यामुळे प्रचि काढताच आली नाहीत. आज अचानक बर्‍यापैकी स्वच्छ दिसत होतं म्हणताना लगेच फोटो काढले. कॅमेरा निकॉन कुलपिक्सचाच असल्याने इतक्या लांबवरचं फार स्पष्ट दिसत नाहीये. पण कधीकधी अचानक हवा अगदी स्पष्ट असते आणि मग त्यावेळी अगदी थेटपर्यंतच्या पर्वतरांगा दिसतात.:

हा दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे दिसणारा कर्नाळ्याचा सुळका. समुद्रात समोरच बुचर आयलंडही दिसत आहे :

समुद्रापल्याड दिसतंय तेच कॉर्नवुड कॉम्प्लेक्स की काय? :

No TV Day on June 1 च्या निमित्ताने हिंदुस्थान टाइम्स आयोजित..

सगळीच व्यंगचित्रं झकास आहेत. > हो.. हव तर आम्ही व्यंगचित्रांसकट वॉकींट टूर करायला तयार आहोत. :p

आज अचानक बर्‍यापैकी स्वच्छ दिसत होतं म्हणताना लगेच फोटो काढले. कॅमेरा निकॉन कुलपिक्सचाच असल्याने इतक्या लांबवरचं फार स्पष्ट दिसत नाहीये. पण कधीकधी अचानक हवा अगदी स्पष्ट असते आणि मग त्यावेळी अगदी थेटपर्यंतच्या पर्वतरांगा दिसतात.: >> मामी... दर वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सुरु व्हायच्या आधी आणि ऑक्टोबर मधे परतीच्या मार्गावर असलेल्या पावसामुळे मुंबईच्या हवेतील दमटपणा प्रचंड वाढतो. त्या कारणाने हवेत मिसळलेलं प्रदुषण वरच्या दिशेने प्रवास करतं आणि हवा स्वच्छ होतं. परिणामी मुंबईकरांना तसेच पुणे व इतर प्रदुषित शहरांतील लोकांना दुरवरचे नजारे बघण्याचा आनंद घेता येतो.

इंद्रधनुष्य, तरीच नेमेके त्याच वेळेस बरेच जण सर्दी खोकल्याने आजारी पडतात ( प्रदुषण विरहीत हवेची तितकी सवय नसते ना आपल्याला Wink )
व्यंगचित्र मस्तच.
मामी तुमच्या घरातुन दिसणारा व्ह्युही मस्त आहे.

( आजच्या बातमीनुसार रेसकोर्स जैसेथे रहाणार वाटतं )

<< मामी तुमच्या घरातुन दिसणारा व्ह्युही मस्त आहे.>> सहमत. पण महालक्ष्मीचा रेसकोर्स व मुंबई बंदर दोन्ही जिथून दिसतात असं घर कुठे बरं असावं, या विचाराने माझं डोकं भणभणलंय ! Wink
<<आजच्या बातमीनुसार रेसकोर्स जैसेथे रहाणार वाटतं >> एव्हांना याच्यावरही जोरदार बेटींग सुरूं झालं असावं ! Wink
<< तुमच्या सोबत वॉकींग टुर म्हणजे पर्वणीच असेल.>> वा: ! हें बरं आहे. तुमचे मुंबईचे अनुभव वाचायला मिळावेत म्हणून मीं धडपडतोय तर तुम्ही माझीच कॉलर पकडताय !!! Wink असो, तुम्हाला डिंवचायला दक्षिण मुंबईतल्या कांहीसा जुनाटतेचा म्हणण्यापेक्षां गूढतेचा बुरखा ओढून घेतलेल्या एका तीर्थ क्षेत्रावरच नेतों तुम्हाला, प्रत्यक्ष नाही तर एका आभासी 'वॉकींग टूर'वर.

अठराव्या शतकात [ १७७५ च्या दरम्यान] कावसजी पटेल या दानशूराने गिरगांव- भुलेश्वर- काळबादेवी भागांत पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बांधलेली तळी म्हणजेच 'सी.पी. टँक' . [ आतां अर्थातच तिथं त्या तळी/टँकचा मागमूसही नाही !] खूप दाटीवाटीचा हा भाग मुख्यतः गुजराती, मारवाडी , वस्तीचा. सणासुदीत पुण्याच्या तुळशीबागेत असते ना त्या गर्दीच्या कित्येकपट अधिक गचडी ,आवाका व आर्थिक उलाढाल इथल्या गल्लीबोळात होत असावी. गुजरात, कच्छ,राजस्थानमधून आलेल्या या मंडळीने तिथल्या देवळांच्या प्रतिकृती इथं उभारायचा जणूं ध्यासच घेतला असावा. हिराबाग, कृष्णबाग ,मोरारबाग [ आमच्या मोठ्या बहिणीचं लग्न ह्या देवळाच्या सभागृहात झालं होतं, ५० वर्षांपूर्वीं ] अशीं खूप जुनीं देवळं सीपी टँक चौकाभोंवती फेरा धरूनच उभीं आहेत . [ दक्षिण कोकणाने अगदीं मनापासून ज्या नेत्यांवर प्रेम केलं त्यांत बॅ. नाथ पै अग्रस्थानीच असावेत. त्यांचं मराठी भाषण प्रथम मीं ऐकलं ते इथल्या 'हिराबागे'च्या सभागृहात. मराठीतलं त्यांचं भाषण त्यांच्या इंग्लीश भाषणाइतकं प्रभावी नाहीं वाटलं तरीही त्यांच्या पारदर्शक प्रामाणिकपणाने व कळकळीने ती कसर भरून निघत असे].
aCPTank.JPG
अर्थात, सीपी टँकची खरी ओळख मात्र आहे - ' माधवबाग' ! १८७४मधे नरोत्तमदास वरजीवनदास यांनी इथं लक्ष्मीनारायणाचं मंदिर बांधलं. कमानीचा भव्य दरवाजा असलेल्या या मंदिराच्या आवारातच मग इतर कांहीं जैन पंथीयानी आपापलीं देवळंही उभारलीं. मूळचे रोह्याचे असलेले पांडुरंशास्त्री आठवले यांचा 'स्वाध्याय परिवार' गुजराती समाजानेही मोठ्या प्रमाणात जवळ केलेला. म्हणूनच पांडुरंगशास्त्र्यांनी स्थापलेली 'भगवदगीता पाठशाळा'ही याच आवारात आतां दिमाखात उभी आहे. देवळानी व्यापलेल्या 'माधवाश्रमा'च्या प्रशस्त आवारांत संध्याकाळीं गेलात तर तिथल्या भाविकांचीं कोंडाळीं पाहून कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावर आल्याचाच भास झाल्याशिवाय रहाणार नाही.
माझे वडील संतसाहित्य आवडीने व अभ्यासपूर्वक वाचत पण नियमितपणे किर्तन, प्रवचनाला जाणार्‍यातले मात्र ते नव्हते. असं असूनही 'माधवबागे'त मात्र वर्षातील ठराविक दिवशीं आवर्जून ते किर्तनाला जात - कारण, किर्तनकार असत सोनोपंत दांडेकर ! घरीं येवून कौतुकही करत, आईलाही अग्रहपूर्वक कधीं तरी या कीर्तनाना घेवून जात . कुतूहल म्हणून मींही गेलों, मग जात राहिलों व धन्यही झालो. संत साहित्याचे गाढे अभ्यासक व हाडाचे वारकरी असलेले सोनोपंत दांडेकर [ मुंबईच्या रुईया कोलेजचे प्राचार्य व गुरूदेव रानडेंचे आवडते शिष्य] इतक्या तन्मयतेने, रसाळपणे किर्तन करत कीं गच्च भरलेला माधवाश्रम परिसर मंत्रमुग्ध होत असे. किर्तनाला त्यांच्या मागें २५-३० श्रमिक वर्गातले वारकरी टाळ घेवून साथीला असत. पण त्यांचंही पाठांतर, समज व तयारी अवाक करणारी असे. किर्तनात मधेच थांबून दांडेकरानी मागें नजर फिरवतांच त्याना किर्तनाच्या त्यावेळच्या संदर्भात हवा असलेला नेमका अभंग एकसूराने लयीत हे वारकरी सादर करत ! मला आठवतं, वर्षातून ठराविक दिवस सोनोपंतांच्या इथल्या किर्तनासाठी राखीव असत व तो पंधरवडा मंतरलेलाच असे.

सीपी टँकचं दुसरं वैशिष्ठ्य म्हणजे इथला माधवबागेला लागूनच असलेला ' पांजरपोळ '! जवळ जवळ १७० वर्षं जुना असलेला, खास गाईंच्या जोपासनेसाठीं बांधलेला हा पांजरपोळ एका ट्रस्टने चालवला आहे. आजही तिथं ३००-४०० गाईंची निगा राखली जाते. या आवारात गाईंसाठी ' मॅटर्निटी वॉर्ड', वासरांसाठी वेगळा कक्ष, पशुवैद्यकीय विभाग अशी पद्धतशीर व्यवस्था आहे. सर्व गाई चांगल्या धष्टपुष्ट दिसतात त्यावरून त्यांची निगा काळजीपूर्वक घेतली जाते हें स्पष्ट होतं. इथल्या गाईंचं दूध मुख्यतः या परिसरातल्या देवळांसाठींच वापरलं जातं. भाविकांच्या देणग्यांतून हा खर्च भागवला जातो, अशीही माहिती मिळाली. दाटीवाटीच्या भर वस्तीतला, स्वतःचं अस्तित्व दीडशें वर्षांहून अधिक काळ टि़कवून ठेवणारा हा 'पांजरपोळ' चक्रावूनच टाकतो !

इतर देवळांजवळ असतात तशीं पोथ्या- धार्मिक पुस्तकांची छोटीं दुकानं सी.पी. टँकलाही भरपूर आहेत. आमच्या ऑफिसमधल्या दोन तरूण पोरानी 'लोकल गाईड' म्हणून मला धरूनच इथल्या पुस्तकांच्या दुकानात एकदां आणलं होतं. अत्यंत हुषार, सुविद्य, 'एमबीए'छाप या तरुण पोराना तिथून रामायण व महाभारताचे सटीप खंड घ्यायचे होते ! स्वत:चं व्यावसायिक कसब व काम संभाळून हीं दोन पोरं [एक तरूण व एक तरूणी] कसल्या कसल्या विषयाना हात घालत असतात याची मला कल्पना होती म्हणूनच मला फार मोठा धक्का नाही बसला. पण तिथल्या पहिल्या दोन दुकानदाराना मात्र तो बसला असावा;त्यांनी सुरवातीलाच कांहींशा संशयाने त्यांच्याकडे बघत सरळ त्याना नकारच दिला. 'आमच्या गिरगांवात येवून याना हवं तें पुस्तक मिळत नाही ',हें अर्थात मला अस्वस्थ करतच होतं.पण पुढच्या दुकानात मात्र त्याना सौजन्यपूर्वक त्या ग्रंथांच्या मोजक्याच प्रती उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं व दोघांत मिळून प्रत्येकीं रामायण व महाभारताच्या खंडांचा एकेक संच देण्यात आला. त्यांची किंमत एवढी माफक होती कीं मीं चकीतच झालों. " अहो भाऊ, उत्तरेत 'गीता प्रेस' सारख्या कांहीं प्रकाशनसंस्था आहेत त्याना मोठमोठ्या देणग्या देवून असे ग्रंथ माफक किंमतीत लोकाना उपलब्ध करून द्यायला धार्मिकांकडून सांगितलं जातं ! व्यासंगी जाणकारांच्या टिपा व रसाळ हिंदीतलं भाषांतर ही खासियत आहे या ग्रंथांची ! हे ग्रंथ सीपी टँकलाच मिळतील , असं कळलं म्हणून तर तुम्हाला धरून आणलं ना इथं !!" , दोघांपैकीं त्या तरुणीने माझ्या ज्ञानात अमूल्य भर टाकली होती . [ नंतर माझ्या इतर पुस्तकप्रेमी मित्रांकडून कळलं कीं मरीन लाईन्सला 'पार्सी डेअरी'च्या समोरच्या एका दुकानात व गिरगांवात पोर्तुगीज चर्चच्या समोरच्या "बळवंत पुस्तक भांडार"मधेही संत साहित्यावरचीं दुर्मिळ पुस्तकं/ ग्रंथ वाजवी किंमतीत मिळतात].

सीपी टँकच्या चौकातून व्हीपी मार्गाने प्रार्थना समाजकडे निघालात कीं उजव्या हाताला वैशिष्ठ्यपूर्ण प्रवेशद्वार असलेली एक मोठी, प्रसिद्ध कॉलनी दिसेल - सिक्का नगर. खूप जुनी असलेली ही कॉलनी आजही खूपच चांगल्या तर्‍हेने ठेवली आहे. या कॉलनीत एक छोटं मैदानही होतं जिथं क्रिकेटचे सामने खेळायला/ पहायला आम्हीं जात असूं. पण याच मैदानात स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींचं भाषण असताना हलकासा लाठीमार झाला होता व अख्खं गिरगांव चिडलं , हादरलं होतं याच्या अगदीं लहानपणीच्या पुसटशा आठवणीमुळें मला सिक्का नगरचं खूप अप्रूप वाटायचं. कित्येक वर्षानी त्या बाजूला गेलो असताना मुद्दाम या कॉलनीत फेरी मारली; तें मैदान गायब होवून तिथं इमारती उभ्या राहिलेल्या पाहून इतिहासच छाटला गेल्यासारखं वाटलं !

परत सीपी टँक चौकात येवून चर्नी रोड स्टेशनकडे जाणार्‍या खाडिलकर मार्गात [पूर्वीचं नांव 'कांदे वाडी'] शिरलात कीं दुतर्फा लग्न-मुंजीच्या निमंत्रण पत्रिका विकणारीं दुकानंच दिसतील. मला वाटतं अगणित डिझाईन्सच्या, सर्व किंमतींच्या पत्रिका किरकोळ व घाऊक पद्धतिने मिळण्याचं हें देशातलं सर्वांत मोठं मार्केट असावं. मधेंच डाव्या बाजूला " मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव" हा ठळक अक्षरांतला बॅनर तुमचं लक्ष वेधून घेईल. ही प्रसिद्ध केशवजी नाईकांची चाळ. गणेशोत्सवातल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेली. खाडिलकर मार्ग गिरगांवच्या मुख्य रस्त्याला मिळतो तिथंच डाव्या बाजूच्या छोट्याशा बोळामधे आहे श्री स्वामी समर्थ मठ. मला वाटतं स्वामी भक्तानी मुंबईत बांधलेला हा सर्वांत जुना मठ असावा. त्याच्या जरासं अलिकडे उजव्या बाजूला जो बोळ जातो तो तुम्हाला नेवून सोडतो गिरगांवातल्या एका भुलभुलैयाकडे - खोताची वाडी ! पण त्याबद्दल नंतर कधीतरी.

वा! भाऊ, अगदी खरोखरच तुमच्याबरोबर फेरफटका मारल्यासारखं वाटलं. मस्त माहिती.

सहमत. पण महालक्ष्मीचा रेसकोर्स व मुंबई बंदर दोन्ही जिथून दिसतात असं घर कुठे बरं असावं, या विचाराने माझं डोकं भणभणलंय ! >>> Happy

गेल्या काही दिवसांत / वर्षांत मुंबईत भटकंती अशी नाहीच. एयरपोर्ट ते पुणे, मुंबई सेंट्रल किंवा जिथे काम असेल तिथे निमूटपणे जाणे आणि येणे. गाडी दुसराच चालवत असल्याने रस्ते वगैरे लक्षात नाहीतच. काल मात्र स्वतः ड्राईव्ह करत फोर्टपर्यंत गेलो. जहांगीर आर्ट गॅलरीजवळच्या चौकात गाडी पार्क केली. लहान असताना इथे सहल आली होतॉ तेव्हां ही सगळी ठिकाणं पायी हिंडून पाहिली होती. जहांगीरमधे दोनच प्रदर्शनं आहेत. इतर ठिकाणी काम चालू आहे. तिथून मग वाळकेश्वर ला हँगिंग गार्डन,म्हातारीचा बूट ही ठिकाणं मुलांना दाखवली. वरून मुंबई झकास दिसते. हँगिग गार्डन पाहताना ब-याचशा हिंदी सिनेमातले सीन्स आठवले. अलिकडेच बुढ्ढा मिल गया पाहीला होता. त्यात ते दोघे कॅमेरा घेऊन याच गार्डनमधे फिरताना दाखवलेत. म्हातारीचा बूट पाहताना लहान झाल्यासारखं वाटलं. मस्त स्मरणरंजन झालं. इथे पूर्वी सूर्य, चंद्र यांच्या घसरगुंड्या होत्या का ? काल दिसल्या नाहीत.

माझ्या आठवणींच्या आधीही मुंबई अशीच होती, आठवणीतलीही छानच होती आणि आताचीही. पुरी दुनिया देखी, लेकिन मुंबई तो मुंबई है असं वाटलं. या शहराची सर दुस-या कुठल्याच ठिकाणाला येणार नाही. (अर्थात पुण्याचं स्टेटस अजून प्राप्त झालेलं नाही म्हणा) Wink

आता मात्र मुंबईत जिथे तिथे फ्लायओव्हर्स, मेट्रोचे उड्डाणमार्ग झालेत. मुंबईला आता ऑफिशियली पुलाची वाडी म्हणायला काहीच हरकत नाही ! पुण्यात दोन तीन पूल एकत्र आले कि पुलाची वाडी म्हणू लागलेत, इतके पूल असते तर पुलंकित नगरी म्हटले नसते काय ?

माझ्या वरच्या पोस्टला ही तळटिप टाकायची राहिली - Wink
तळटिप - पाटील यांचीं या परिसराचीं जलरंगातील अप्रतिम चित्रं येतीलच म्हणून प्रकाशचित्रं सोबत टाकलीं नाहीत .

<< उंचावर >> Oh, so stupid of me ! तसं एकाच खिडकीतून अर्धं जगच दिसलं होतं नाहीं का
कल्पना चावलाला !!! Wink

भाऊ... गिरगाव वॉक मस्तच Happy
पांजरपोळ म्हणजेच गायवाडी का?

तिथून मग वाळकेश्वर ला हँगिंग गार्डन,म्हातारीचा बूट ही ठिकाणं मुलांना दाखवली. वरून मुंबई झकास दिसते. > +१

काल चिरंजीवांनी Ship पाहण्याची इच्छा (फक्त इच्छाच हा... हट्ट नाही) व्यक्त केली... आणि मग काय त्याचा मुड बदलायच्या आत त्याला धरुन बांधुन भाऊच्या धक्क्यावरुन फिरवुन आणलं. :p

From भाऊचा धक्का

<< पांजरपोळ म्हणजेच गायवाडी का? >> नाही. खाडिलकर रोडच्या एका टोकाला सीपी टँक [ व त्याच्या जवळच पांजरपोळ आहे ] तर नेमक्या विरूद्ध दिशेच्या टोकाला अगदीं समोरच 'गायवाडी' आहे.

इंद्रजी, छान प्र.चि.! खूप वर्षानी भाऊच्या धक्क्याच्या प्रवेशद्वाराचं कां होईना, पण दर्शन झालं. बरं वाटलं.

भाऊ, गिरगाव दर्शन भारी! Happy

जिथे मारते कांदेवाडी
टांग जराशी ठाकूरद्वारा,
खडखडते अन् ट्राम वाकडी
कंबर मोडुनी, चाटित तारा
...

Happy

Pages