शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ले ज मनोज मुकुंद नरवणे भारताचे लष्कर प्रमूख म्हणून 1जाने 2020 पासून नियुक्त होतील. ले.ज. नरवणे हे पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षातला हा एक सुवर्णक्षण आहे! प्रबोधिनीचे संस्थापक आदरणीय आप्पा पेंडसे यांनी देशाचे नेतृत्व करणारे, रूप पालटू देशाचे असे स्वप्न बाळगणारे विद्यार्थी घडवण्यासाठी ज्ञान प्रबोधिनीची स्थापना केली. आज या शाळेचे माजी विद्यार्थी भारताचे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत ही एकप्रकारे ती. आप्पांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती आहे! आणि अर्थातच ज्ञान प्रबोधिनीच्या सर्व आजी माजी विद्यार्थी - विद्यार्थीनींसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे!
जाता जाता - सध्याचे उपलष्करप्रमुख ले. ज. सुदर्शन हसबनीस हे देखील प्रबोधिनीचेच माजी विद्यार्थी आहेत!

अरे वाह! चांगली बातमी आणि जिज्ञासा छान प्रतिसाद

सध्याचे उपलष्करप्रमुख ले. ज. सुदर्शन हसबनीस हे देखील प्रबोधिनीचेच माजी विद्यार्थी आहेत >>>
एक दुरुस्ती सध्याचे उपलश्करप्रमुख ले.ज. नरवणे आहेत.
ले.ज. हसबनीस डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (प्लानिंग) आहेत.

हर्पेन, धन्यवाद!
प्राची, बरोबर आहे! मी आपले मराठी मध्ये लिहायचे म्हणून डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (प्लानिंग) चे उपलष्करप्रमुख असे भाषांतर केले. चीफ ऑफ आर्मी स्टाफ एक आणि त्यांच्या खाली अनेक डेप्युटी चीफ अशी रचना असते का?

छान बातमी!
जि, प्रतिसाद आवडला.

नवी दिल्ली : भारताच्या कोनेरू हम्पीने येथे महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये चीनच्या लेई टिंगजीविरुद्ध आर्मेगेडन गेम बरोबरीत सोडविल्यानंतर जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ३२ वर्षीय भारतीय खेळाडूने चीनच्या आणखी एक खेळाडू टांग झोंगयीविरुद्ध चमकदार पुनरागमन करीत १२ व्या अंतिम फेरीत विजय मिळवला. त्यामुळे तिला टिंगजीविरुद्ध टायब्रेकर खेळावा लागला.

रोजंदारीवर कुलुप बनवण्याच्या कामावर असलेले वडील आणि फुगे विकून संसाराला हातभार लावणार्‍या आई यांच्या सोळा वर्षाच्या मुलाने खेलो इंडिया यूथ गेम्स मधील वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. शेख बशीरलाल असे ह्या खेळाडूचे नाव आहे. कोच श्रीनिवास राव ह्यांनी ह्या मुलाला क्रिकेट खेळत असताना शरीरयष्टीकडे बघून वेट लिफ्टिंग मधे भाग घेण्यास प्रोत्साहित केले. शालेय स्पर्धांमधल्या कामगिरीच्या जोरावर मिळालेल्या खेलो इंडीयाच्या शिष्यवृत्तीमुळे व्यवस्थित आहार घेता आला असे त्याने सांगितले.

अधिक सविस्तर बातमीकरता
https://www.thehindu.com/sport/other-sports/weightlifting-lock-makers-so...

भारतरत्न पुरस्कारानंतर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्काराची प्रजासत्ताक दिनाच्या काही तास आधी घोषणा करण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खासदार मेरी कोम, छन्नुलाल मिश्रा, अनेरूद जुगुनाथ जीसीएसके, विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा मठ उडुपी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिनंदन

बशीर तसेच त्याचे गुरू श्रीनिवास राव यांचे अभिनंदन! खेलो इंडिया खरोखरच चांगली योजना आहे.

क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळख असलेल्या लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आलं आहे.
https://www.loksatta.com/krida-news/sachin-tendulkar-wins-laureus-20-spo...

२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीनं कुलसेखराच्या गोलंदाजीवर षटकार लगावत भारताला जगतजेता बनवलं. भारताला पुन्हा एकदा जगजेतेपद मिळवून देण्याचं सचिन तेंडुलकरचं स्वप्न साकार झालं होतं. २ एप्रिल २०११ रोजी विश्वचषक विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून घेऊन संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. यादरम्यान सचिन आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होता. त्यावेळी टिपलेल्या क्षणाला 2000-2020 या कालावधील क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्या क्षणाला ‘ कॅरीड आन द शोल्डर्स आफ ए नेशन’ शीर्षक देण्यात आलं आहे

क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळख असलेल्या लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आलं आहे. 2000-2020 या २० वर्षांमध्ये क्रीडा विश्वाताला हा सर्वात भावूक आणि प्रेरणा देणारा क्षण होता. सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये लॉरियस पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. सचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला.

महत्वाचं म्हणजे या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेतून केली होती. यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील २० दावेदारांना नामांकन होतं. त्या सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला आहे. बर्लिनमध्ये टेनिस दिग्गज बोरिस बेकरने सचिनला या चषक देऊन सन्मानित केलं.

सौमित्रला 'मर्क'चा मुकुट! (Soumitra Athavale's Success)

सौमित्रला 'मर्क' या बहुराष्ट्रीय औषध कंपनीने स्पर्धेतून निवडलेल्या दहा शास्त्रज्ञांपैकी एक असा बहुमान मिळाला. त्या दहा शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या रासायनिक प्रक्रिया प्रस्तावांची प्रायोगिक तपासणी कंपनीतर्फे येत्या तीन-चार महिन्यांत होऊन एका प्रस्तावाची निवड होईल व त्या प्रस्तावकर्त्यास दहा हजार युरोचा पुरस्कार दिला जाईल.

आर्क्टिकच्या वर असलेला १० लक्ष चौरस कि.मी. आकाराचा सर्वात मोठा ओझोन होल, आता पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर.

कोरोनाव्हायरस मुळे मानवावर लादल्या गेलेल्या लॉकडाउनमुळे जगाच्या विविध भागात आपण प्राणी मुक्तपणे बाहेर फिरत आहेत वगैरे दृष्ये बघितली असतीलच. त्याच बरोबर आता असेही निदर्शनास आले आहे की आर्क्टिकच्या वर असलेला १० लक्ष चौरस कि.मी. आकाराचा ओझोन होल, आता कमी होत होत पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. हे होल मार्च महिन्यात निदर्शनास आले होते आणि वातावरण सुधारल्यामुळे जवळजवळ दोन महिन्यांतच हे होल बुजत आहे ही अत्यंत वाईट काळातील चांगली बातमी आहे.

https://in.finance.yahoo.com/news/good-news-largest-ozone-layer-07215015...

वा.. मस्त बातमी हर्पेन.
दुर्दैवाने पृथ्वी आनंदीत होते तेव्हा मानव दु:खी होतो आणि मानव आनंदी होतो तेव्हा पृथ्वी दु:खी होते हे सत्य भयानक आहे. करोना संपल्यावर दोन्ही आनंदात रहातील हे कोण पाहील काय माहिती.

एन्डेंजर्ड स्पेसीज असलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची संख्या लाखांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

https://in.yahoo.com/news/millions-endangered-baby-turtles-cross-0910389...

भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा राज्यातल्या रुशीकुल्या बीचवर जन्मलेल्या लाखो कासवांचे समुद्राकडे मार्गक्रमण

ऑलिव्ह रिडले कासव हिवाळ्याच्या शेवटी आणि दरवर्षी वसंत .तूच्या सुरुवातीच्या काळात अंडी घालण्यासाठी येतात. कासविणी रात्रीच्या वेळी येतात आणि अंडी वाळूच्या घरट्यात पुरतात. सुमारे 45 दिवसांनंतर, त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात आणि समुद्राकडे परत जातात. लॉकडाऊनमुळे ओडिशा राज्यातील किनारपट्टीचा हा परिसर मोठ्या प्रमाणात निर्जन झाला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून वन्यजीवांना त्यांच्या अधिवासावरील हक्क पुनर्प्रस्थापित करता येण्याचे ताजे उदाहरण.

किती छान बातमी हर्पेन !! काही दिवसांपूर्वी टिव्हीवर पाहिले होते . प्रखर प्रकाशाच्या प्रदूषणामुळे बाळ कासवांना दिशा कळायची नाही आणि ते चुकीच्या दिशेने जायचे समुद्राकडे न जाता. त्याने संख्या कमी झाली होती Sad
ते तुरुतुरु जाताना फार गोड दिसतात Happy
मी National Geographic नियमित वाचते, या महिन्याच्या इश्यू मध्ये थोडे pessimistic आणि थोडे optimistic दोन्ही आले आहे.
धन्यवाद, सकारात्मक धागा. Happy

गीतकार जावेद अख्तर यांना 2020वर्षीच्या रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने गौरवले आहे. स्टीव्हन पिंकर, स्टीफन फ्राय, लारेन्स क्राऊस, ख्रिस हिचन्स अश्या विवेकवादी व नास्तिक चळवळीतल्या दिग्गजांच्या आळीत जावेद अख्तर पोहोचले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आपले तार्किक विचार रोखठोकपणे मांडणाऱ्या अख्तर साहेबांचा यथोचित गौरव.

मला काल कायप्पा वर एक पोस्ट आली. आता ती खरी आहे की नाही माहीत नाही, कारण पेपरला ती नाही. ती इथे टाकली म्हणजे मी शेणातले फॉरवर्ड उचलले असे कोणाला वाटले तर वाटु द्या बॉ.

आपले माजी पंतप्रधान माननीय श्री मनमोहन सिंग यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठाने स्कॉलरशीप सुरु केलीय अशी ती बातमी आहे. जर ही बातमी खरी असेल तर श्री मनमोहन सिंग यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आणी खूपच अभिमानाची गोष्ट. इथे साधा चेक लिहीतांना अनेकांची फॅ फॅ उडते, पण हे सदगृहस्थ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पण होते. अनेक पदव्या आणी मोठा अनूभव . देव त्यांना उदंड आणी निरोगी आयुष्य देवो आणी असेच सन्मान मिळत राहो.

मोदींना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानासाठी इग नोबेल पुरस्कार मिळाला, वाजपेयी नंतर हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे पंतप्रधान.

मोठी झेप! DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी, शत्रूला कळण्याआधीच होणार प्रहार
https://www.loksatta.com/desh-videsh-news/india-successfully-tests-hyper...

ह्या बातमीतल्या 'भारताने स्वबळावर विकसित केलेल्या' ह्या शब्द रचनेची सवय व्हायला लागली आहे. अभिमानास्पद कामगिरी आणि आनंदाची बातमी. धन्यवाद जिद्दु.

Pages