तुम्ही किती व्यवस्थित आहात?

Submitted by फारएण्ड on 9 November, 2012 - 10:15

आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.

खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.

प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या. उद्या याच वेळेस ते पान सापडले नाही तर तुम्ही ही प्रश्नावली सोडवण्याची गरज नाही, फक्त आपला अव्यवस्थितपणा नीट सांभाळा. अधिक माहितीसाठी तुमच्या "अव्यवस्थितपणा सल्लागारा" शी संपर्क करा.

आता प्रश्नावली:

१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
ब. घडी उलगडून त्याची इस्त्री नीट चेक करतो, एखादा चिकटलेला धाग्याचा तुकडा काढून टाकतो व मग बटने काढतो.
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.

२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
ब. शून्यः एकही पेन चालत नाही.
क. शून्य ते शंभरः बरीच चालू आहेत पण चालणारे नेमक्या वेळेला सापडत नाही. "पॉश" दिसणार्‍या पेनांमधे रीफिल नसते. मागचे बटन पुश करून चालू/बंद होणारी बॉलपेन्स प्राचीन काळापासून एकाच स्थितीत आहेत - ते बटन कायमचे दाबलेल्या अवस्थेत आहे किंवा खाली/वर कोणत्याही अवस्थेत केले काहीच फरक पडत नाही. टोपणवाली पेन्स व ती टोपणे "लंबी जुदाई" मोड मधे आहेत.

३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
ब. एक फॅन्सी बाउल आहे त्यात. कधीकधी इकडेतिकडेही असतात.
क. घरात आल्यावर पहिली जागा दिसेल तेथे, किंवा जेथून किल्ली स्वतःहून खाली पडत नाही अशा कोणत्याही जागी, बाहेर असताना ज्या हातात जड गोष्ट धरलेली आहे त्याबाजूच्या खिशात इतर दहा गोष्टींच्या खाली असतात, व बाहेर काढताना त्यातील किमान दोन गोष्टी खाली पडतात.

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
ब. फोन आल्यावर किंवा करताना 'टॉक' बटन दाबायच्या आधी कानावर लावतो.
क. फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.

५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
अ. मी दर रविवारी सकाळी साडेसात वाजता (आपोआप, गजर न लावता) उठून बाहेर गाडी धुतो. माझ्या गाडी धुण्याच्या वेळेप्रमाणे आजूबाजूचे लोक घड्याळे लावतात, व पक्षी/खारी वगैरे पाणी प्यायला आधीच जमा होतात.
ब. दर तीन चार महिन्यांनी, गाडी ओळखू येईनाशी होते तेव्हा, किंवा धुळीत "वॉश मी" वगैरे लोक लिहून जातात तेव्हा.
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.

६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
अ. टीव्हीच्या कपाटात प्रत्येक रिमोट साठी स्वतंत्र योग्य आकाराचा कप्पा केलेला आहे व त्यावर कोणत्या रिमोटसाठी ते लिहीलेले आहे. वापरून झाल्यावर प्रत्येक रिमोट त्याच्या कप्प्यात ठेवतो. कोचवर बसलेलो असताना आवाज वाढवायचा असेल्/चॅनेल बदलायचे असेल तर उठून रिमोट काढतो, वापरतो व परत ठेवून देतो. दर सहा महिन्यांनी बॅटरी बदलतो व रिमोट परत कप्प्यात ठेवून त्या बॅटरीज इ-वेस्ट सेंटर मधे देऊन येतो.
ब. बहुतेक वेळेस कॉफी टेबलवर. कधीकधी शोधावे लागतात.
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.

७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
अ. मला सगळे पाठ आहेत.
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
क. जेव्हा गरज पडेल तेव्हा आधी मागितल्यावर आलेल्या मेल मधून शोधतो (आधी जीमेल, मग याहूमेल या क्रमाने), अगम्य नावाच्या फाईल्स उघडून त्यात लिहीलेला आहे का पाहतो. पोस्ट-इट नोट्स, बिलांच्या मागच्या बाजू वगैरे ठिकाणांहून मिळवतो. नंबर बरोबर नाव लिहीलेले नसल्यास 'असाच काहीतरी नंबर होता' एवढा आत्मविश्वास आल्याशिवाय तो ट्राय करत नाही.

८. बर्‍याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
अ. माझ्या नोंदवहीत कोणती पावती किती दिवस ठेवायची याचा चार्ट आहे. रोज रात्री एकदा त्यादिवशीच्या पावत्या त्याप्रमाणे लावतो, व योग्य दिवशी फाडून/श्रेडर मधे घालून टाकतो.
ब. इतर बिलांबरोबर असतात. अधूनमधून फाडतो.
क. पँटच्या मागच्या खिशात "जाणार्‍या पावत्या दिसतात पण येणार्या दिसत नाहीत". पॅण्ट धुवून परत आल्यावर कागदाचे बोळे तेथून खाली पडतात. त्यातील एक दोन कधीकधी उलगडून ते बसचे तिकीट होते, की रेस्टॉरंटची पावती, की सिनेमाचे तिकीट हे शोधण्याचा प्रयत्न करतो. "अरे ही परवा आपण शोधत होतो ती पावती" हा खूप कॉमन संवाद आहे.

९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
अ. माझ्याबाबतीत असे कधी होतच नाही. इतरांनी आमच्याकडे येताना बरोबर आणलेल्या गोष्टी आयफोनच्या कीबोर्डच्या दाबलेल्या बटनांप्रमाणे मला इतर गोष्टींच्या मानाने कायम ठळक व मोठ्या दिसतात. विसरण्याचा प्रश्नच नाही.
ब. पुन्हा आठवेल तेव्हा.
क. सहसा ती गोष्ट द्यायला म्हणून जायचे ठरवतो व तीच गोष्ट न्यायची विसरतो. माझ्या विसरलेल्या गोष्टी शिफ्टिंग्/मूव्हिंग करताना वेगळ्या काढून मित्र नेण्यासाठी फोन करतात.

आता उत्तरांची बेरीज करून एकूण गुण पाहा:

गुणः ५००० व जास्तः आपल्या चरणकमलांवर पाणी घालून ते तीर्थ विकायला ठेवा. जोरात खपेल. 'दिल चाह्ता है' मधल्या सुबोधचा रोल तुम्हाला न देता त्या दुसर्‍या कोणाला कसा दिला याची कागदपत्रे काही वर्षांनी खुली होतील तेव्हा आधीच त्यावर पुस्तक लिहा.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.

(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आग "लागला" असे कोणी ओरडत आमच्या घरी आला, तर आग "लागली" असे म्हणवून घेतल्याशिवाय पाणी पण नाही मिळायचे >>> Biggrin काय उदाहरण दिलंयस.

बापरे.. पण व्यवस्थित राहाण्यात वाईट काही नाही असे दिवसेंदिवस वाटु लागले आहे.

नवर्‍याने त्याचे सी.एस. चे सर्टिफिकिट सुद्धा हरवले. आता ज्या गोष्टींवर तुमचे पोट चालते, निदान ती गोष्ट नीट ठेवण्याइतका सेन्स आणि व्यवस्थितपणा तुमच्यात असलाच पाहिजे.

आग "लागला" असे कोणी ओरडत आमच्या घरी आला, तर आग "लागली" असे म्हणवून घेतल्याशिवाय पाणी पण नाही मिळायचे >>>
भोकाड कंटिन्यू>> Lol

माझे बाबा वर्तमानपत्राबरोबर येणार्‍या जाहिरातीच्या पत्रकांमधल्या शुद्धलेखनाच्या चुका काढायचे. लाल पेनाने चुकीभोवती गोल करून बाजूला बरोबर शब्द लिहायचे. Happy

फारेंड ,ग्रेट आहेस!!! :हाहपुवा: झालीये...

,'अव्यव्स्थित लोकं खूपच निगरगट्ट व थंड असतात असे आढळलेय. कोणी काहीही बोला... फरक नसतो.' १००% सहमत!!!

Uhoh मला आता माझ्याच व्यवस्थितपणाचा राग येऊ लागलाय .. कारण अती व्यवस्थित माणसं सदानकदा आजूबाजू च्या ( अ‍ॅक्चुली फक्त नवर्‍याच्या असं वाचा.. Wink ) अव्यवस्थितपणाचा तर्रास करून घेत असतात..
फारेण्डा.. मेरे ४५०० मार्कं पकडलेत रे मी(च)...... Proud

सुमेधाव्ही, मामी Rofl

वर्षू नील

मला आता माझ्याच व्यवस्थितपणाचा राग येऊ लागलाय .. कारण अती व्यवस्थित माणसं सदानकदा आजूबाजू च्या ( अ‍ॅक्चुली फक्त नवर्‍याच्या असं वाचा.. ) अव्यवस्थितपणाचा तर्रास करून घेत असतात..
फारेण्डा.. मेरे ४५०० मार्कं पकडलेत रे मी(च)......>>>.
अरे अजिबात राग येउ देऊ नका.... कारण माझी अती व्यवस्थित मैत्रीण , म्हणजे तिच्याईतक व्यवस्थित मी अजुन तरी कोणी पाहील नाही , ती माझ्याकडे आली कि चहाचा कप ठेवायला म्हनुन जाते आणि माझा ओटा आवरुन येते... Happy
ही रो़ज घरात घालायचे कपडे '( नाईट ड्रेस .वगैरे.) बेड्शीट्स, पिलो कव्हरस, टॉवेल सगळ ईस्त्री करते...सगळे कपडे समजुन घ्या....तिचा स्पेशल मित्र पण हैराण आहे तीची स्वछता बघुन....ही कुठेही गेली कि सी सी टी व्ही सारखी बघत असते..बाहेर पड्ल की पहिल वाक्य" ईन लोगोंको घर ठिक रखने में प्रोब्लेम क्या है"...माझ नेहमीच उत्तर " अरे मै पुछना भुल गयी , रुको पुछ के आती हुं!"

नीधप
माझी मुलगी पण ....वय वर्ष दीड..
कुठलंही दार, ड्रॉवर किंचितसा उघडा असेल तर 'बंद, बंद' असं म्हणत हातवारे करते. ते बंद केल्याशिवाय थांबत नाही.
स्वतःची खेळणी मात्र जमिनीवर ओतायची असतात >>> अगदी...
सगळे लाईट स्वीच पण 'बंद, बंद' आणि हिला कचर्यचा डबा तर अजिबात उघडा आवडत नाही...लगेच जाउन बंद आणि तो पण तिनेच कराय्चा...आपण बंद केला तर परत उघड्ते आणि बंद करते...
हिला जेउ घालताना हाताला थोड जरी काही लागल की हे ' हात हात ' करते ...तिचे हात धुतल्याशिवाय परत जेवण कंटिन्यु होत नाही......

बाकी मी क मधे आलेय मुलगी झाल्यापासुन्..नवरा हाफिसात अ आणि घरी क :रागः

शोनु, मी अगदी अती व्यवस्थीत वगैरे नाहीये पण माझी एक मैत्रिण हॉस्टेलवर रहायची... मी पण तिच्या रुमवर गेले की गप्पा मारता मारता तिची पुर्ण रूम लावून द्यायचे... अगदी झाडुन पुसुन Proud
इतकी गबाळी ठेवायची रूम ती की मला बसवायचं नाही अगदी तिथे !

रिया...मी पण तिच्या रुमवर गेले की गप्पा मारता मारता तिची पुर्ण रूम लावून द्यायचे... अगदी झाडुन पुसुन
इतकी गबाळी ठेवायची रूम ती की मला बसवायचं नाही अगदी तिथे !
>>> आहे माझी एक मैत्रीण अशीच अगदी गबाळी..मी पण करते हेच तिच्याकडे ...तिच्या बेडरुम मधे जायला कपड्यांच्या ढिगार्यामधुन वाट काढावी लागते..पाऊल टाकाय्ला पण जागा नसते...आणि हाफिसात एकदम स्टार आहे...माझ्या २ टोकाच्य २ मैत्रीणी आहेत... Happy

शोनु कुकु - तुझ्यअ त्या ओटा स्वच्छ करणार्‍या मैत्रिणीसारखी माझी एक मैत्रिण आणि एक मावशी आहे. त्यांनी केलेले अ कॅटेगरीचे काम आपण ब आणि क वाल्यांना समजणे आणि डायजेस्ट होणे कठिण असते.

फारेण्डा, लेख मी माझ्या फेबु वर शेअर करीत आहे.

किती मस्त लेख!!! खूप हसतेय... आणि शूम्पी, आगाऊचे प्रश्नसुद्धा भारीच.

मी बरीचशी अ आणि ब कॅटेगरी... सध्या नवर्‍याच्या संगतीने क च्या दिशेने वाटचाल सुरू झाली की काय अशी अधूनमधून शंका येत राहते.
भोकाड कंटिन्यू>> हे म्हणजे आमचे चिरंजीव.
इथल्या थंडीच्या दिवसांत जर कुणी पाहुणे आलेत तर प्रत्येकाने घरातली चप्पल, किंवा किमान सॉक्स घातल्याशिवाय बसायचे असते. नाही तर त्याचे 'चप्पल घाल'च्या बॅकग्राऊंडला का ही ही बोलणे शक्य नसते. आमच्याकडे घरातल्या किती चप्पल आहेत त्याचा बॉक्स बघून चक्कर येते लोकांना. Wink
शाळेत पहिल्या दिवशी बाईंची तक्रार होती: 'ही इज वेरी पर्टिक्युलर'! Uhoh
सध्या बाबा मन लावून पोराला माणसात आणतोय, हाच काय तो दिलासा.

गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.>> अजूनही दहाच्या आतच्चे. Happy आयता वर आला धागा तर रुटिन चेकप केल Wink तब्येत ठणठणीत !!

अशक्य हसतोय. ९
सगळे क. एकतरी ब येईल इतपत माफक अपेक्षा फा तू धुळीला मिळवलीस.
मस्त वारा सुटलाय आणि तुमच्या कारचं ड्रायव्हरसाईडच दार माणूस बसे पेक्षा १० सेकंद जास्त उघडं राहिलं किंवा ट्रंक मधून समान काढताना असाच वारा सुटलाय तर तुमच्या मनात पहिला विचार काय येईल?
१. या अशा निरभ्र सकाळी गोल्फ खेळायला मिळणं म्हणजे स्वर्गसुखाच्या दोन पावलं जवळ जाणं. काय मजा येईल. (हे वाक्य भाषांतरीत नाही. तरीही अशा शैलीत(हुss) का लिहिलं बर मी? )
२. काय भन्नाट वारा सुटलाय, मस्त ओपन गाडीतून लांब जाऊया.
३. दुकानांच्या पावत्या, महत्त्वाची पत्र, बिलं उडायच्या आत दार थाडकन आपटूया.

फा, धमाल लिहिलंय! मजा आली वाचायला.

प्रश्नः
तुमच्या मायबोलीत अनेक डुप्लिकेट आयड्या आहेत. त्या वापरताना प्रत्येकवेळी तुम्ही...

अ) प्रत्येक आयडीसाठी वेगवेगळी कंप्यूटर्स/ फोन्स/ टॅबलेट वापरता.

ब) प्रत्येक आयडीचा पासवर्ड नीट लक्षात ठेवून किंवा स्प्रेडशीटमध्ये बघून पहिल्या आयडीतून लॉग आउट करून दुसर्‍या आयडीत लॉग इन करता.

क) आयड्या, पासवर्ड्स, मशीन, आयडीचं जेंडर, (आणि निषिध्द बाफ), यांपैकी कश्याचही भान न ठेवता आयडीमागची व्यक्ती (अभावित आणि) बावळटपणे जाहीर करता.

आमच्या सासरी सर्व 'अ' लोकं राहतात आणि माहेरी 'क'. काम इतकं व्यवस्थित पाहिजे की अंधारात सुद्धा वीज गेली असताना वस्तु जगच्याजागी सापडली पाहिजे हे व्याख्यान 'रिपीट' मोडावर असते.
आणि मी दोन्हीमध्ये बसत नाही. त्यामुळे काही प्रश्नांना अ आणि काही प्रश्नांना क अशी धेडगुजरी अवस्था आहे. जौद्या झालं. कोतबो. >> रैना तुमने तो हमारी मुंह की बात छिन ली.

Mast farend

कोविडोत्तर प्रश्न

१. तुम्ही अजूनही मास्क वापरता का?

अ. हो.
ब. नाही, पण अडीनडीला म्हणून एखादा मास्क ऑफिसात/खिशात/पर्समध्ये/लॅपटॉप बॅगमध्ये असतो.
क. नाही.

२. मास्क वापरत असल्यास- कुठला वापरता?

अ. N95
ब. सर्जिकल/कापडी
क. जो आधी सापडेल तो.

३. N95 वापरत असल्यास-एक मास्क किती दिवस वापरता?

अ. एका वेळी ३-४ वापरात असतात. कालचा मास्क आज वापरत नाही. नवा मास्क वापरायला काढला की त्याच्यावर नावाची आद्याक्षरं, तारीख घालून ठेवायची. दिवसभर वापरला की एक खूण करायची. अशा आठ खुणा झाल्या की तो मास्क वर्तमानपत्रात गुंडाळून मेडिकल वेस्टमधे टाकायचा.

ब. तीनचार मास्क्स एका वेळी वापरात असतात. त्यातला बरा दिसणारा उचलून घालायचा. अधूनमधून सगळेच टाकून देऊन नवीन काढायचे.

क. मास्कला वास यायला लागला की टाकून देतो.

1 ब
2 ब
3 -
(का विचारलेत प्रश्न, हेही लिहिलस तर?)

धमाल आहे धागा. अजून मागच्या पानांवरचे प्रतिसाद वाचले नाहीत.

(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही >> ह्या क वाक्याचे अ आणि ब पर्याय पण आहेत का?
अ. सर्वेक्षण कात्रण करून मी २०१२ सालच्या सर्वेक्षणाच्या वहीत चिकटवले होते. त्याचे डीजिटायझेशन करून गिट हब वरती उपलब्ध करून दिले आहे. परंतु त्यात केलेले मारकोव्ह साखळी विश्लेषण आता कालबाह्य झाल्यामुळे त्याचा संदर्भ देणे प्रशस्त वाटत नाही.
ब. ?

1 अ

२ ब कापडी वापरते आणि धुते तो. दोन ठेवलेत.

क वास येत नाही, सुवास येतो, हाहाहा कारण comfort वापरते.

१. ब
२. अ
३. ड: एकदा वापरला आणि तो अजिबात खराब झाला नसला की परत वापरायला एका जागी ठेवतो. त्याचा मास्क म्हणुन परत वापर कमीच त्यापेक्षा टेबलावर चहा/ज्यूस/स्मुदी असे जरा सांडले की पटकन हाताशी असल्याने ते टिपायला जास्त होतो. मग पुढल्या वेळी नविन मास्क काढतो.
तो दोन तिन चा स्टॉक संपला आणि पुढल्या वेळी पंचाईत झाली की नवा स्टॉक घेतो.

१. तुम्ही अजूनही मास्क वापरता का?
>>>

माझा पर्याय ड आहे.
मी सध्या घरी साफसफाई करताना मास्क वापरतो. कारण मला धुळीची ॲलर्जी आहे. सटासट नॉनईस्टॉप शिंका येतात. आधी रुमाल गुंडाळायचो नाकाला. आता मास्क सोयीचा पडतो.

एक बॅगेतही असतो. प्रवासात गाडीच्या खिडकीवर बसल्यावर जोरदार थंड वारा नाकात शिरला तरीही मला सर्दी पकडते. अश्यावेळीही मी आधी रुमाल गुंडाळायचो. आता मास्क वापरतो. कारण एक नाक सोडले तर चेहऱ्याच्या ईतर ईंद्रियांना त्या वाऱ्याची मजाही लुटायची असते Happy

मास्क मात्र जास्त वापर झाल्यावर धुवून ठेवतो. अन्यथा धुळीपासून वाचायला मास्क वापरायचा आणि तोच धुळीत पडला असेल तर तो बावळटपणा ठरेल.

वावे Happy Happy

१. आता फक्त सक्ती असेल तेथे व हॉस्पिटल/डॉ ऑफिस मधे
२. या बाबतीत कॅस्केडिंग लॉजिक आहे. उपलब्ध मास्क्स पैकी जो सर्वात उच्च दर्जाचा असेल तो Happy
३. असे काही ठराविक नाही. विचार करून सुद्धा नक्की उत्तर आले नाही (त्यामुळे उगाचच शाळेतील अनेक परीक्षा आठवल्या)

ऋन्मेष, धुळीसाठी, गार हवेसाठी वापरलेला मास्क इथे अपेक्षित नाही. कोविडसाठी घ्यायची काळजी म्हणून वापरलेला मास्क फक्त!
माझीही उत्तरं ब.
अवल, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'अ' असणारा माणूस भेटला Lol

Pages