आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.
खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.
प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या. उद्या याच वेळेस ते पान सापडले नाही तर तुम्ही ही प्रश्नावली सोडवण्याची गरज नाही, फक्त आपला अव्यवस्थितपणा नीट सांभाळा. अधिक माहितीसाठी तुमच्या "अव्यवस्थितपणा सल्लागारा" शी संपर्क करा.
आता प्रश्नावली:
१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
ब. घडी उलगडून त्याची इस्त्री नीट चेक करतो, एखादा चिकटलेला धाग्याचा तुकडा काढून टाकतो व मग बटने काढतो.
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.
२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
ब. शून्यः एकही पेन चालत नाही.
क. शून्य ते शंभरः बरीच चालू आहेत पण चालणारे नेमक्या वेळेला सापडत नाही. "पॉश" दिसणार्या पेनांमधे रीफिल नसते. मागचे बटन पुश करून चालू/बंद होणारी बॉलपेन्स प्राचीन काळापासून एकाच स्थितीत आहेत - ते बटन कायमचे दाबलेल्या अवस्थेत आहे किंवा खाली/वर कोणत्याही अवस्थेत केले काहीच फरक पडत नाही. टोपणवाली पेन्स व ती टोपणे "लंबी जुदाई" मोड मधे आहेत.
३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
ब. एक फॅन्सी बाउल आहे त्यात. कधीकधी इकडेतिकडेही असतात.
क. घरात आल्यावर पहिली जागा दिसेल तेथे, किंवा जेथून किल्ली स्वतःहून खाली पडत नाही अशा कोणत्याही जागी, बाहेर असताना ज्या हातात जड गोष्ट धरलेली आहे त्याबाजूच्या खिशात इतर दहा गोष्टींच्या खाली असतात, व बाहेर काढताना त्यातील किमान दोन गोष्टी खाली पडतात.
४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
ब. फोन आल्यावर किंवा करताना 'टॉक' बटन दाबायच्या आधी कानावर लावतो.
क. फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.
५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
अ. मी दर रविवारी सकाळी साडेसात वाजता (आपोआप, गजर न लावता) उठून बाहेर गाडी धुतो. माझ्या गाडी धुण्याच्या वेळेप्रमाणे आजूबाजूचे लोक घड्याळे लावतात, व पक्षी/खारी वगैरे पाणी प्यायला आधीच जमा होतात.
ब. दर तीन चार महिन्यांनी, गाडी ओळखू येईनाशी होते तेव्हा, किंवा धुळीत "वॉश मी" वगैरे लोक लिहून जातात तेव्हा.
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.
६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
अ. टीव्हीच्या कपाटात प्रत्येक रिमोट साठी स्वतंत्र योग्य आकाराचा कप्पा केलेला आहे व त्यावर कोणत्या रिमोटसाठी ते लिहीलेले आहे. वापरून झाल्यावर प्रत्येक रिमोट त्याच्या कप्प्यात ठेवतो. कोचवर बसलेलो असताना आवाज वाढवायचा असेल्/चॅनेल बदलायचे असेल तर उठून रिमोट काढतो, वापरतो व परत ठेवून देतो. दर सहा महिन्यांनी बॅटरी बदलतो व रिमोट परत कप्प्यात ठेवून त्या बॅटरीज इ-वेस्ट सेंटर मधे देऊन येतो.
ब. बहुतेक वेळेस कॉफी टेबलवर. कधीकधी शोधावे लागतात.
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.
७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
अ. मला सगळे पाठ आहेत.
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
क. जेव्हा गरज पडेल तेव्हा आधी मागितल्यावर आलेल्या मेल मधून शोधतो (आधी जीमेल, मग याहूमेल या क्रमाने), अगम्य नावाच्या फाईल्स उघडून त्यात लिहीलेला आहे का पाहतो. पोस्ट-इट नोट्स, बिलांच्या मागच्या बाजू वगैरे ठिकाणांहून मिळवतो. नंबर बरोबर नाव लिहीलेले नसल्यास 'असाच काहीतरी नंबर होता' एवढा आत्मविश्वास आल्याशिवाय तो ट्राय करत नाही.
८. बर्याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
अ. माझ्या नोंदवहीत कोणती पावती किती दिवस ठेवायची याचा चार्ट आहे. रोज रात्री एकदा त्यादिवशीच्या पावत्या त्याप्रमाणे लावतो, व योग्य दिवशी फाडून/श्रेडर मधे घालून टाकतो.
ब. इतर बिलांबरोबर असतात. अधूनमधून फाडतो.
क. पँटच्या मागच्या खिशात "जाणार्या पावत्या दिसतात पण येणार्या दिसत नाहीत". पॅण्ट धुवून परत आल्यावर कागदाचे बोळे तेथून खाली पडतात. त्यातील एक दोन कधीकधी उलगडून ते बसचे तिकीट होते, की रेस्टॉरंटची पावती, की सिनेमाचे तिकीट हे शोधण्याचा प्रयत्न करतो. "अरे ही परवा आपण शोधत होतो ती पावती" हा खूप कॉमन संवाद आहे.
९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
अ. माझ्याबाबतीत असे कधी होतच नाही. इतरांनी आमच्याकडे येताना बरोबर आणलेल्या गोष्टी आयफोनच्या कीबोर्डच्या दाबलेल्या बटनांप्रमाणे मला इतर गोष्टींच्या मानाने कायम ठळक व मोठ्या दिसतात. विसरण्याचा प्रश्नच नाही.
ब. पुन्हा आठवेल तेव्हा.
क. सहसा ती गोष्ट द्यायला म्हणून जायचे ठरवतो व तीच गोष्ट न्यायची विसरतो. माझ्या विसरलेल्या गोष्टी शिफ्टिंग्/मूव्हिंग करताना वेगळ्या काढून मित्र नेण्यासाठी फोन करतात.
आता उत्तरांची बेरीज करून एकूण गुण पाहा:
गुणः ५००० व जास्तः आपल्या चरणकमलांवर पाणी घालून ते तीर्थ विकायला ठेवा. जोरात खपेल. 'दिल चाह्ता है' मधल्या सुबोधचा रोल तुम्हाला न देता त्या दुसर्या कोणाला कसा दिला याची कागदपत्रे काही वर्षांनी खुली होतील तेव्हा आधीच त्यावर पुस्तक लिहा.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.
(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही.
चमनराव, हलके घ्या हो. सापडलं
चमनराव, हलके घ्या हो. सापडलं तुमचं नांव अन जमत होती म्हणून कोटी केली.
तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!
व्यवस्थितपणा हा विषय मी
व्यवस्थितपणा हा विषय मी जन्मापासून (माझ्या) ऑप्शनला टाकला आहे, त्यामुळे हि प्रश्नपत्रिका सोडवणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण, तेव्हा नकोच. धन्यवाद!
सुबोध उर्फ टाइमटेबल असा
सुबोध उर्फ टाइमटेबल असा डोळ्यासमोर उभा राहिला....आणि त्याच्यापुढे आवंढे गिळणारी सो कुल... ')
लै भारी रे फारेण्डा
लै भारी रे फारेण्डा
मस्तच आम्ही पण तुकडी 'क'
मस्तच

आम्ही पण तुकडी 'क' मध्ये
सही..! इतके दिवस मी
सही..! इतके दिवस मी व्यवस्थित आणि नवरा गबाळा असा गोड समज होता माझा , पण डोळे उघडले माझे. इतके दिवस घालून पाडून बोलल्याबद्दल नवर्याची माफी मागायला हवी
मस्तच रे मित्रा..
मस्तच रे मित्रा.. झक्कास!
एकदा निवांत गप्पा करूया
दोन तरी प्रश्नांना १०० मार्क
दोन तरी प्रश्नांना १०० मार्क मिळाले मला! नाहीतर.... १-१-१-१ करके तारे बने अनेक!
प्रश्न क्रमांक ७ चा 'क'
प्रश्न क्रमांक ७ चा 'क' पर्याय वाचून लई हसले.
आमच्या सासरी सर्व 'अ' लोकं राहतात आणि माहेरी 'क'. काम इतकं व्यवस्थित पाहिजे की अंधारात सुद्धा वीज गेली असताना वस्तु जगच्याजागी सापडली पाहिजे हे व्याख्यान 'रिपीट' मोडावर असते.
आणि मी दोन्हीमध्ये बसत नाही. त्यामुळे काही प्रश्नांना अ आणि काही प्रश्नांना क अशी धेडगुजरी अवस्था आहे. जौद्या झालं. कोतबो.
भारीये!
भारीये!
मला सगळ्यांची उत्तरे "अ" अशी
मला सगळ्यांची उत्तरे "अ" अशी देता यावी ही इच्छा अगदी बालपणापासुन मनात बाळगलेली आहे. पण काय करू, कितीही प्रयत्न केले तरी आयत्या वेळेला काहीतरी लोच्या होतो आणि मी अलगद "क" कॅटेगरीत जाऊन बसते......... आता उद्यापासुन नक्की "अ".....
आमचा नंबर "क" वर्गातला
आमचा नंबर "क" वर्गातला
ड, ई, फ नाहीयेत का कुठे ?
ड, ई, फ नाहीयेत का कुठे ?
इतक्या पण खाली आलो नाही आम्ही
इतक्या पण खाली आलो नाही आम्ही अजुन
तुमच्यासाठी नाही हो,
तुमच्यासाठी नाही हो, स्वतःसाठी पर्याय शोधत होतो
ठार हसतोय ब्लू टुथ, पेन्स,
ठार हसतोय
ब्लू टुथ, पेन्स, किल्ल्या सगळेच प्रकार आणि पंचेस जबरी.
फोन नंबर सेव्ह करण्याच्या बाबतीत माझा विशेष प्रकार आहे; मी कायतरी शॉर्ट्फॉर्ममधे नाव लिहून नंबर सेव्ह करतो आणि नंतर तो कशाचा होता ते विसरुन जातो.
माझ्याकडून ११वा प्रश्न-
चहा पिउन झाल्यावर त्या कपाचे तुम्ही काय करता?
अ) तात्काळ उठून कप स्वच्छ धुवून त्याच्या जागेवर ठेवतो.
ब) समोर दिसेल त्या व्यक्तीकडे कप देउन तात्काळ त्याबद्दल विसरुन जातो.
क) हात शक्य तितका लांब करुन पण बूड न हलवता तो कप कोचाच्याखाली, पडद्यामागे, विंडोसिलवर ठेउन देतो. वि.सू. असा कप शक्यतो २-३ दिवसांनी त्यातील चहा पूर्ण वाळलेल्या अवस्थेत सापडतो, किंवा झाडूच्या फटक्यासरशी इतर कचर्याबरोबर गडगडत प्रकट होतो.
धम्माल आहे... गूण कॅल्क्यूलेट
धम्माल आहे... गूण कॅल्क्यूलेट करणेच विसरले, इतकं एन्जॉय केलं.... पण सुबोधचा रोल वॉज
हसण्याच्या स्मायली
हसण्याच्या स्मायली
हहपुवा १० वा अन ११ वा
हहपुवा
१० वा अन ११ वा प्रश्न पण धम्माल आहे. 
पर्यायात अजून ड & इ वाढवा की
अफाट लिहीले आहेस. खूप
अफाट लिहीले आहेस. खूप दिवसांनी एवढी हसले मी.

शुम्पी आणि आगाऊचे प्रश्नपण भारी आहेत अगदी.
ज ब री
ज ब री
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन!
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! >> खरेच अभिनंदन. जित्याजागत्या माणसाचं लक्षण यापेक्षा वेगळं सांगता येणार नाही!
मस्त लेख... माझा स्कोअर इथे
मस्त लेख... माझा स्कोअर इथे द्यायला लाज वाटावी.... इतका जास्त आहे
आगावा मी रैनाच्या सासर
आगावा
मी रैनाच्या सासर कॅटेगरीतली अ.
मी पण क गटात
मी पण क गटात
लेखकाला एक महत्वाची सुचना
लेखकाला एक महत्वाची सुचना :-

.
.
इथे .. "ड".."ई" गट करण्याची सातत्याने मागणी होत आहे....कृपया लोकाग्रहास्तव त्यांची मागणी लवकरात लवकर पुर्ण करावी आणि त्यांना त्यांच्याच गटात बसण्याचा मान मिळवुन द्यावा.
.
कळावे,
लोभ असावा
.
.
.
धन्यवाद........
.
उच्च लिहीले आहेस शूम्पी आणि
उच्च लिहीले आहेस
मजा आली!
शूम्पी आणि आगाऊच्या अॅडिशन्सही अगदी पूरक!
भारीच आहे . दहावा तर एकदम
भारीच आहे .
दहावा तर एकदम सही. मी नेहेमीच "क"
बाकी रैना +१ ससुराल अ वर्गात आणि मैका 'क'
मी डीलर शोधतोय जो भारत आणी
मी डीलर शोधतोय जो भारत आणी भारताबाहेर माझे चरणकमलधुतजल विकु इच्छितो.योग्य ते कमीशन दिले जाइल.

**** आम्ही नीलदंत वापरत नसल्याने गुणतक्त्यात गुणसंख्या थोडीशी खालावली आहे.नाहीतर कदाचित आंघोळीचे पाणी विकणारा डीलर शोधावा लागला असता.:)
मस्त लेख फारेंड. दिवाळी अंकात
मस्त लेख फारेंड. दिवाळी अंकात का नाही दिल्हास?
मी कधी क कधी अ. पण कपडे उलटे घालणे हे माझे खास. म्हणजे सुलट्याचे उलटे आणि गळा मागे पाठ पुढे असे पण. हपिसात चहा चा कप पडून राहतो. पण कैकै चीजें व्यवस्थित करते.
Pages