तुम्ही किती व्यवस्थित आहात?

Submitted by फारएण्ड on 9 November, 2012 - 10:15

आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.

खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.

प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या. उद्या याच वेळेस ते पान सापडले नाही तर तुम्ही ही प्रश्नावली सोडवण्याची गरज नाही, फक्त आपला अव्यवस्थितपणा नीट सांभाळा. अधिक माहितीसाठी तुमच्या "अव्यवस्थितपणा सल्लागारा" शी संपर्क करा.

आता प्रश्नावली:

१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
ब. घडी उलगडून त्याची इस्त्री नीट चेक करतो, एखादा चिकटलेला धाग्याचा तुकडा काढून टाकतो व मग बटने काढतो.
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.

२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
ब. शून्यः एकही पेन चालत नाही.
क. शून्य ते शंभरः बरीच चालू आहेत पण चालणारे नेमक्या वेळेला सापडत नाही. "पॉश" दिसणार्‍या पेनांमधे रीफिल नसते. मागचे बटन पुश करून चालू/बंद होणारी बॉलपेन्स प्राचीन काळापासून एकाच स्थितीत आहेत - ते बटन कायमचे दाबलेल्या अवस्थेत आहे किंवा खाली/वर कोणत्याही अवस्थेत केले काहीच फरक पडत नाही. टोपणवाली पेन्स व ती टोपणे "लंबी जुदाई" मोड मधे आहेत.

३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
ब. एक फॅन्सी बाउल आहे त्यात. कधीकधी इकडेतिकडेही असतात.
क. घरात आल्यावर पहिली जागा दिसेल तेथे, किंवा जेथून किल्ली स्वतःहून खाली पडत नाही अशा कोणत्याही जागी, बाहेर असताना ज्या हातात जड गोष्ट धरलेली आहे त्याबाजूच्या खिशात इतर दहा गोष्टींच्या खाली असतात, व बाहेर काढताना त्यातील किमान दोन गोष्टी खाली पडतात.

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
ब. फोन आल्यावर किंवा करताना 'टॉक' बटन दाबायच्या आधी कानावर लावतो.
क. फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.

५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
अ. मी दर रविवारी सकाळी साडेसात वाजता (आपोआप, गजर न लावता) उठून बाहेर गाडी धुतो. माझ्या गाडी धुण्याच्या वेळेप्रमाणे आजूबाजूचे लोक घड्याळे लावतात, व पक्षी/खारी वगैरे पाणी प्यायला आधीच जमा होतात.
ब. दर तीन चार महिन्यांनी, गाडी ओळखू येईनाशी होते तेव्हा, किंवा धुळीत "वॉश मी" वगैरे लोक लिहून जातात तेव्हा.
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.

६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
अ. टीव्हीच्या कपाटात प्रत्येक रिमोट साठी स्वतंत्र योग्य आकाराचा कप्पा केलेला आहे व त्यावर कोणत्या रिमोटसाठी ते लिहीलेले आहे. वापरून झाल्यावर प्रत्येक रिमोट त्याच्या कप्प्यात ठेवतो. कोचवर बसलेलो असताना आवाज वाढवायचा असेल्/चॅनेल बदलायचे असेल तर उठून रिमोट काढतो, वापरतो व परत ठेवून देतो. दर सहा महिन्यांनी बॅटरी बदलतो व रिमोट परत कप्प्यात ठेवून त्या बॅटरीज इ-वेस्ट सेंटर मधे देऊन येतो.
ब. बहुतेक वेळेस कॉफी टेबलवर. कधीकधी शोधावे लागतात.
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.

७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
अ. मला सगळे पाठ आहेत.
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
क. जेव्हा गरज पडेल तेव्हा आधी मागितल्यावर आलेल्या मेल मधून शोधतो (आधी जीमेल, मग याहूमेल या क्रमाने), अगम्य नावाच्या फाईल्स उघडून त्यात लिहीलेला आहे का पाहतो. पोस्ट-इट नोट्स, बिलांच्या मागच्या बाजू वगैरे ठिकाणांहून मिळवतो. नंबर बरोबर नाव लिहीलेले नसल्यास 'असाच काहीतरी नंबर होता' एवढा आत्मविश्वास आल्याशिवाय तो ट्राय करत नाही.

८. बर्‍याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
अ. माझ्या नोंदवहीत कोणती पावती किती दिवस ठेवायची याचा चार्ट आहे. रोज रात्री एकदा त्यादिवशीच्या पावत्या त्याप्रमाणे लावतो, व योग्य दिवशी फाडून/श्रेडर मधे घालून टाकतो.
ब. इतर बिलांबरोबर असतात. अधूनमधून फाडतो.
क. पँटच्या मागच्या खिशात "जाणार्‍या पावत्या दिसतात पण येणार्या दिसत नाहीत". पॅण्ट धुवून परत आल्यावर कागदाचे बोळे तेथून खाली पडतात. त्यातील एक दोन कधीकधी उलगडून ते बसचे तिकीट होते, की रेस्टॉरंटची पावती, की सिनेमाचे तिकीट हे शोधण्याचा प्रयत्न करतो. "अरे ही परवा आपण शोधत होतो ती पावती" हा खूप कॉमन संवाद आहे.

९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
अ. माझ्याबाबतीत असे कधी होतच नाही. इतरांनी आमच्याकडे येताना बरोबर आणलेल्या गोष्टी आयफोनच्या कीबोर्डच्या दाबलेल्या बटनांप्रमाणे मला इतर गोष्टींच्या मानाने कायम ठळक व मोठ्या दिसतात. विसरण्याचा प्रश्नच नाही.
ब. पुन्हा आठवेल तेव्हा.
क. सहसा ती गोष्ट द्यायला म्हणून जायचे ठरवतो व तीच गोष्ट न्यायची विसरतो. माझ्या विसरलेल्या गोष्टी शिफ्टिंग्/मूव्हिंग करताना वेगळ्या काढून मित्र नेण्यासाठी फोन करतात.

आता उत्तरांची बेरीज करून एकूण गुण पाहा:

गुणः ५००० व जास्तः आपल्या चरणकमलांवर पाणी घालून ते तीर्थ विकायला ठेवा. जोरात खपेल. 'दिल चाह्ता है' मधल्या सुबोधचा रोल तुम्हाला न देता त्या दुसर्‍या कोणाला कसा दिला याची कागदपत्रे काही वर्षांनी खुली होतील तेव्हा आधीच त्यावर पुस्तक लिहा.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.

(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बहुतेक ठिकाणी ब आणि काही ठिकाणी क वर्गात आहे. अरेरे..
सगळीच उत्तरे ’क' का नाहीत? Sad

१० वा प्रश्न
घरातल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या कश्या ठेवता?
अ. आकाराप्रमाणे व्यवस्थित वेगळे गठ्ठे करून मग एकदम सपाट करून घडी घालून.
ब. साधारण कमीतकमी जागेत मावेल असा गठ्ठा
क. बोळे Happy

यात मी अ वर्गात जाते. लहानपणापासून हा प्रॉब्लेम आहे Wink

सर्वांच्या पर्तिक्रिया पाहता मी बाजी मारतोय इथे "अ" तुकडीत... Happy

जिओ मेरे अंड्या..!!!

लिव्हलय बाकी भन्नाटच... सगळीच उदाहरणे चाबूक हैती.. Happy

माझ्यासाठी व्यवस्थितपणा अन स्वछता म्हणजी जीव के प्राण.. नुसते हातच साबण लाऊन मी दिवसातून पच्चास वेळा धुत असतो.. टिश्श्यूचे एक बंडल सोबतीला नेहमी असतेच.. ही झाली स्वछता... आणि ते टिश्श्यू अगदी टोकाला टोके घडी करून ठेवणे हा झाला माझा व्यवस्थितपणा.. Happy

हसहसुन मेलेय.
मी कभी ब कभी क. फक्त नी च्या प्रश्नाचं उत्तर अ!
शुम्पी आणि आगाऊ :D:
माझ्या नवर्‍याला चहाचा कप ठेवण्याच्या अफलातून जागा यावर डॉक्टरेट!

नुसते हातच साबण लाऊन मी दिवसातून पच्चास वेळा धुत असतो.. टिश्श्यूचे एक बंडल सोबतीला नेहमी असतेच.. ही झाली स्वछता... आणि ते टिश्श्यू अगदी टोकाला टोके घडी करून ठेवणे हा झाला माझा व्यवस्थितपणा..<<<
सांभाळा.

९!

ह्यात गिफ्ट रॅपरबद्दल पण प्रश्न आला पाहिजे Wink

अगदी व्यवस्थित एक एक चिकटपट्टी हळुवार सोडवत नाजूकपणे रॅपिंग पेपर काढून त्याची नीट घडी घालून ठेऊन पुन्हा वापरणारे लोकं बघितले की त्यांचा आदर करावा की स्वतःला तु क द्यावे असा संभ्रम पडतो Wink

Biggrin सह्ही!!!

मी बर्‍याच बाबतीत 'ब' वर्गात.

नुसते हातच साबण लाऊन मी दिवसातून पच्चास वेळा धुत असतो.. टिश्श्यूचे एक बंडल सोबतीला नेहमी असतेच.. ही झाली स्वछता... आणि ते टिश्श्यू अगदी टोकाला टोके घडी करून ठेवणे हा झाला माझा व्यवस्थितपणा..<<<
सांभाळा. >>>> Lol

ह्या रोगाच्या काही अड्व्हान्स्ड केसेस आहेत आमच्याघरी..
पाहुणे नुसते जागेवरुन परत जाण्यासाठी उठले, तरी पलंगपुसाच्या वरची चुणी परत ठीकठाक केली जाते.

डायनिंग टेबल वर जेवत असताना फोन वाजला तर फोन घ्यायला उठलेल्या माणसाची खुर्ची परत टेबलच्या आत घुसवली जाते.

डब्यातले चीज घेताना जर आजूबाजूच्या मुर्खांनी टवके तोडून मूळच्या चौकोनी ठोकळ्याचा पंचकोनी, शटकोनी केला असेल तर २ शिव्या हासडून तो परत चौकोनी केला जातो.

टेबलवर कामासाठी बसल्यावर लॅपटॉप टेबलाशी काटकोनात, खुर्ची टेबलाशी काटकोनात व स्वत: टेबलाशी काटकोनात आहोत ना हे बघितले जाते व नसल्यास १ एम एम चा ऑफ असला तरी तो काढला जातो.

क्लीक केलेल्या फोटोत सिमेट्री नसेल. तर त्यात कितीही दुर्मीळ चेहेरे असतील तरी ते फोटोज डिसक्वालीफाय होऊन कचर्‍याच्या टोपलीत जातात.

च स्मा विसरणे? आनी घरची किल्ली येताना दार उघडून कुलुपातच ठेवणे, मग सकाळी कामवाली आल्यावर तिने किल्ली डोळ्यासमोर नाचवून साले काढणे झाले आहे का?

खतरनाक सर्वे आहे. आरोग्यासाठी अति आवश्यक. सर्वे सन्तु निरामयाः
माझ्या टापटीपग्रस्त बायकोला दोन्ही हातात पेनं, पावत्या, रिमोट वगैरे घेऊन आवरमंडळात भ्रमण करताना थांबवून समोर बसवून वाचायला दिला. खूप हसून ती पुन्हा आवरायला गेली. माझ्या अनुभवानुसार व्यवस्थित, अव्यवस्थित बरोबरच कुव्यवस्थित अशी पण एक श्रेणी असते. हे लोक दुसऱ्यानच्या वस्तू आवरतात आणि मग त्या फक्त यांनाच सापडू शकतात पण ते त्या कुठे ठेवल्या ते विसरलेले असतात. मग सात्विक संतापयुक्त भांडणं ठरलेलीच.

लो. तिलक यांना वस्तु अव्यवस्थित ठेवायची सवय होती ते महनत की त्याने मला वस्तु पतकन सापदते.

दरवाजाला चावी तशीच बाहेर बाराशे चोवीस वेळा तरी राहिली असेल. किल्ली आयटम्सवर तर एक स्वतंत्र लेखऐवज होईल. चावी अ‍ॅक्टिव्हालाच रात्रभर राहणे. पार्किंग करताना काचा खालीच राहणे (मग गाडी धुणार्‍या पोर्‍याने सकाळी सपकन बादली ओतून गाडीला आतून आंघोळ घालणे, मग तोच वर दादागिरी करत सांगायला येणे) हे आमचे क्लासिक आहेत.

आमचा धाकटा भाऊ गाडी रिमोट लॉक केल्यानंतरही चारही दरवाजांच्या हँडल्सना वेताळागत लोंबकळून बघतो. काचा बंद आहेत का हे बघण्याची त्याने खास पद्धत डेव्हलप केली आहे. ते वेताळागत लोंबकळत असतानाच तो आंधळा असल्यागत गाडीचं छत आणि काचा जिथे एकेमेकांना भेटतात तिथं बोटं खुपसून चाचपून बघतो. या प्रोजेक्टला त्याला पाच मिनिटं लागतात, अजिबात अतिशयोक्ती नाही.

कधीकधी घरात आल्यावर काहीतरी राहिल्यागत सारी लॉकं खाडखाड उघडून पुन्हा बाहेर जातो आणि मग तोच तो पाच मिनिटांचा प्रोजेक्ट. रिपीट.

-- बाहेर जाताना घराच्या दरवाजाला लॅच लावले असले तरी पुन्हा लिफ्टपासून दाराशी येऊन ते नीट लागले असल्याची खात्री करणे, घरातल्या घरात मोबाईल गहाळ झाल्यावर एका मोबाईल वरून किंवा लँडलाईनवरून रिंग दिल्यावरच तो सापडणे, त्यातही तो सायलेंट मोडवर असेल तर त्याचा स्क्रीन फ्लॅश होतोय का, हे बघण्यासाठी त्याचा दिवे मालवून शोध घेणे! Lol हे असे प्रकार नेहमी आयुष्यात घडणारे आहेत.

पैशाच्या पाकिटात / पर्समध्ये नोटा मूल्य, आकार व बाजूनुसार व्यवस्थित जुळवून त्यांची वेगळी चळत, नाण्यांसाठी वेगळा कप्पा, क्रेडिट-डेबिट कार्डे - लायसन्स अगदी नीट ठेवणारे, त्या त्या कप्प्यात त्याच गोष्टी ठेवणारे, रोज रात्री पाकिटातील / पर्समधील कचरा आवरणारे अशीही एक कॅटॅगरी असायला हवी. Happy मी पर्समध्ये नोटा कोंबणार्‍यांच्या गटातली!

बीबी आता "मी केलेला वेंधळेपणा"मोड घेतोय. फारेण्डाचा प्रश्न काय आहे? तुम्ही किती व्यवस्थित आहात?

मी अति अव्यवस्थित आहे. धन्यवाद. Proud Light 1

>>आमचा धाकटा भाऊ गाडी रिमोट लॉक केल्यानंतरही चारही दरवाजांच्या हँडल्सना वेताळागत लोंबकळून बघतो. काचा बंद आहेत का हे बघण्याची त्याने खास पद्धत डेव्हलप केली आहे. ते वेताळागत लोंबकळत असतानाच तो आंधळा असल्यागत गाडीचं छत आणि काचा जिथे एकेमेकांना भेटतात तिथं बोटं खुपसून चाचपून बघतो.

हा तर माझ्या कॅटॅगरीतला आहे. Happy बाकी बाबतीत अव्यवस्थितपणा ठीक आहे, पण गाडीच्या बाबतीत नो चान्स.

Lol मस्त लेख.

माझ्यासाठी व्यवस्थितपणा अन स्वछता म्हणजी जीव के प्राण.. >>> अंड्या, तुझं लग्न झालं नाही असं कुठल्या बीबीवर वाचलं होतं म्हणुन तुला फुकट सल्ला. लग्न करताना अशाच ओसीडीग्रस्त व्यक्तीशी लग्न कर. 'अ' बरोबर 'क/ड/ई' चं लग्न म्हणजे दोघांना त्रास. Happy

माझे मार्क्स (त्रासदायकरित्या) ५०००पेक्षा जास्त आहेत आणि मला ओसीडी आहे हे मला ठावुकही आहे. पुर्वीही मी कोणत्यातरी धाग्यावर याबद्दल लिहिलं होतं. स्वयंपाक करताना मीठ ४ वेळा हवं असेल तरी प्रत्येक वेळेस जागेवर ठेवणे, आपलीच नाही तर दुसर्‍याने उठताना वाकडी केलेली चेअर परत टेबलखाली खुपसणे. भिक्कार सर्विस असणार्‍या हॉटेलमधे प्लेटस लवकर उचलल्या नाहीत तर माझे हात सगळ्या प्लेटस एकत्र करुन ठेवण्यासाठी शिवशिवत रहातात. कधी कधी पटकन एकात एक घालुन २-३ प्लेट्स ठेवते पण. Happy दरवाजे उघडताना, पर्टिक्युलरली ऑफिस वॉशरुम्स, कॉमन प्लेसेसचे - पेपर नॅपकिन्स वापरणे या बाबतीत मी फार कीन आहे. Wink घरात तर माझ्या हातातल्या सततच्या डस्टिंग क्लॉथमुळे मला सगळे 'फडके बाई' म्हणतात. मज्जा म्हणजे आमच्या घरी सगळे सुमेधाच्या घराच्या विरुद्ध 'क' कॅटेगरी आहेत. Happy

मज्जा म्हणजे आमच्या घरी सगळे सुमेधाच्या घराच्या विरुद्ध 'क' कॅटेगरी आहेत. <<
चुकीच्या घरी पडलात बघ तुम्ही दोघी Wink Light 1

एक नंबर Happy मी अजाबात व्यवस्थित नाही, "क" वर्ग Happy विशेष म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सापडत नाहीत त्या आईलोकांना हमखास विनासायास सापडतात Happy

@मुंगेरीलाल.. हे लोक दुसऱ्यानच्या वस्तू आवरतात आणि मग त्या फक्त यांनाच सापडू शकतात पण ते त्या कुठे ठेवल्या ते विसरलेले असतात. मग सात्विक संतापयुक्त भांडणं ठरलेलीच Happy +१११११११११११११११११.

बीबी आता "मी केलेला वेंधळेपणा"मोड घेतोय.>>> कुठलाही धागा कुठेही भरकटत जाणे हा माबोपेशल अव्यवस्थितपणा आहे!

आता आम्ही रीतसर किल्ल्या दारातच विसरायला लागलो आहोत. दोन्ही दिवस तसेच झाले. माबो सँक्षन. Happy पण काल दोन तास खपून एक रूम साफ केली.

Pages