तुम्ही किती व्यवस्थित आहात?

Submitted by फारएण्ड on 9 November, 2012 - 10:15

आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.

खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.

प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या. उद्या याच वेळेस ते पान सापडले नाही तर तुम्ही ही प्रश्नावली सोडवण्याची गरज नाही, फक्त आपला अव्यवस्थितपणा नीट सांभाळा. अधिक माहितीसाठी तुमच्या "अव्यवस्थितपणा सल्लागारा" शी संपर्क करा.

आता प्रश्नावली:

१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
ब. घडी उलगडून त्याची इस्त्री नीट चेक करतो, एखादा चिकटलेला धाग्याचा तुकडा काढून टाकतो व मग बटने काढतो.
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.

२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
ब. शून्यः एकही पेन चालत नाही.
क. शून्य ते शंभरः बरीच चालू आहेत पण चालणारे नेमक्या वेळेला सापडत नाही. "पॉश" दिसणार्‍या पेनांमधे रीफिल नसते. मागचे बटन पुश करून चालू/बंद होणारी बॉलपेन्स प्राचीन काळापासून एकाच स्थितीत आहेत - ते बटन कायमचे दाबलेल्या अवस्थेत आहे किंवा खाली/वर कोणत्याही अवस्थेत केले काहीच फरक पडत नाही. टोपणवाली पेन्स व ती टोपणे "लंबी जुदाई" मोड मधे आहेत.

३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
ब. एक फॅन्सी बाउल आहे त्यात. कधीकधी इकडेतिकडेही असतात.
क. घरात आल्यावर पहिली जागा दिसेल तेथे, किंवा जेथून किल्ली स्वतःहून खाली पडत नाही अशा कोणत्याही जागी, बाहेर असताना ज्या हातात जड गोष्ट धरलेली आहे त्याबाजूच्या खिशात इतर दहा गोष्टींच्या खाली असतात, व बाहेर काढताना त्यातील किमान दोन गोष्टी खाली पडतात.

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
ब. फोन आल्यावर किंवा करताना 'टॉक' बटन दाबायच्या आधी कानावर लावतो.
क. फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.

५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
अ. मी दर रविवारी सकाळी साडेसात वाजता (आपोआप, गजर न लावता) उठून बाहेर गाडी धुतो. माझ्या गाडी धुण्याच्या वेळेप्रमाणे आजूबाजूचे लोक घड्याळे लावतात, व पक्षी/खारी वगैरे पाणी प्यायला आधीच जमा होतात.
ब. दर तीन चार महिन्यांनी, गाडी ओळखू येईनाशी होते तेव्हा, किंवा धुळीत "वॉश मी" वगैरे लोक लिहून जातात तेव्हा.
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.

६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
अ. टीव्हीच्या कपाटात प्रत्येक रिमोट साठी स्वतंत्र योग्य आकाराचा कप्पा केलेला आहे व त्यावर कोणत्या रिमोटसाठी ते लिहीलेले आहे. वापरून झाल्यावर प्रत्येक रिमोट त्याच्या कप्प्यात ठेवतो. कोचवर बसलेलो असताना आवाज वाढवायचा असेल्/चॅनेल बदलायचे असेल तर उठून रिमोट काढतो, वापरतो व परत ठेवून देतो. दर सहा महिन्यांनी बॅटरी बदलतो व रिमोट परत कप्प्यात ठेवून त्या बॅटरीज इ-वेस्ट सेंटर मधे देऊन येतो.
ब. बहुतेक वेळेस कॉफी टेबलवर. कधीकधी शोधावे लागतात.
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.

७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
अ. मला सगळे पाठ आहेत.
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
क. जेव्हा गरज पडेल तेव्हा आधी मागितल्यावर आलेल्या मेल मधून शोधतो (आधी जीमेल, मग याहूमेल या क्रमाने), अगम्य नावाच्या फाईल्स उघडून त्यात लिहीलेला आहे का पाहतो. पोस्ट-इट नोट्स, बिलांच्या मागच्या बाजू वगैरे ठिकाणांहून मिळवतो. नंबर बरोबर नाव लिहीलेले नसल्यास 'असाच काहीतरी नंबर होता' एवढा आत्मविश्वास आल्याशिवाय तो ट्राय करत नाही.

८. बर्‍याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
अ. माझ्या नोंदवहीत कोणती पावती किती दिवस ठेवायची याचा चार्ट आहे. रोज रात्री एकदा त्यादिवशीच्या पावत्या त्याप्रमाणे लावतो, व योग्य दिवशी फाडून/श्रेडर मधे घालून टाकतो.
ब. इतर बिलांबरोबर असतात. अधूनमधून फाडतो.
क. पँटच्या मागच्या खिशात "जाणार्‍या पावत्या दिसतात पण येणार्या दिसत नाहीत". पॅण्ट धुवून परत आल्यावर कागदाचे बोळे तेथून खाली पडतात. त्यातील एक दोन कधीकधी उलगडून ते बसचे तिकीट होते, की रेस्टॉरंटची पावती, की सिनेमाचे तिकीट हे शोधण्याचा प्रयत्न करतो. "अरे ही परवा आपण शोधत होतो ती पावती" हा खूप कॉमन संवाद आहे.

९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
अ. माझ्याबाबतीत असे कधी होतच नाही. इतरांनी आमच्याकडे येताना बरोबर आणलेल्या गोष्टी आयफोनच्या कीबोर्डच्या दाबलेल्या बटनांप्रमाणे मला इतर गोष्टींच्या मानाने कायम ठळक व मोठ्या दिसतात. विसरण्याचा प्रश्नच नाही.
ब. पुन्हा आठवेल तेव्हा.
क. सहसा ती गोष्ट द्यायला म्हणून जायचे ठरवतो व तीच गोष्ट न्यायची विसरतो. माझ्या विसरलेल्या गोष्टी शिफ्टिंग्/मूव्हिंग करताना वेगळ्या काढून मित्र नेण्यासाठी फोन करतात.

आता उत्तरांची बेरीज करून एकूण गुण पाहा:

गुणः ५००० व जास्तः आपल्या चरणकमलांवर पाणी घालून ते तीर्थ विकायला ठेवा. जोरात खपेल. 'दिल चाह्ता है' मधल्या सुबोधचा रोल तुम्हाला न देता त्या दुसर्‍या कोणाला कसा दिला याची कागदपत्रे काही वर्षांनी खुली होतील तेव्हा आधीच त्यावर पुस्तक लिहा.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.

(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्लीपींग विथ द एनिमी मधला नीट-फ्रीक आठवला.
दर आठवड्याला सलून च्या वार्‍या करणारे, तासनतास कपाटं आवरत बसणारे, कार प्रचंड स्वच्छ ठेवणारे, हायजीन्-फ्रीक असे आणि बरेच आसपासचे लोक आठवले.
पण ते तसे असले आणि त्यांचा टॉलरंस ईतरांच्या मानाने खूप कमी किंवा अगदीच झीरो असला तरी त्यांची ही सवय त्यांना आयुष्यात कुठल्यातरी गोष्टीत ईतरांपेक्षा बरीच यशस्वी बनवते. (अगदी अतिरेकी नीटनेसने काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम तयार केले नाहीत तर)

लेख सर्वेक्षण की विनोदनिर्मितीच्या दृष्टीकोनातून पहायचाय ते नीट समजले नाही.

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.

मेलो हसून हसून

**लेख सर्वेक्षण की विनोदनिर्मितीच्या दृष्टीकोनातून पहायचाय ते नीट समजले नाही**

-चमन आहात अगदी!

माझं रेकमंडेड रेटींगः Light 1

गुणः ५००० व जास्तः स्लो डाऊन; गेट अ लाईफ! असाच वेग ठेवलात तर लवकरच ओसीडी ला बळी पडाल.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: यु डोंट एक्झिस्ट. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हाला "खुशालचेंडु" हा किताब देण्यात आला आहे. वेल्कम टु द क्लब!!

Happy

Happy आवडले!

माझ्या मनात ५००० गुणांची सुप्ताकांक्षा असावी बहुतेक ;-), पण ती प्रत्यक्षात कधी येईल असे वाटत नाही! Lol

९च प्रशन कसे काय? १० तरी हवेत म्हणजे कसं नीट राउंडफिगर वाटेल.

१०. तुम्ही एखादा पदार्थ कसा तयार करता?
अ. कोणता पदार्थ करायचा हे आधीच प्लॅन केलेलं असतं त्यामुळे त्यासाठी लागणारं सामान सुमान दुकानातून आणून नीट निवडून कपाटात्/फ्रीजमध्ये टेह्वलेलं असतं. पदार्थाला सूटेबल सर्विंग बोल्स पण घरात उपलब्ध असतात.
ब. पदार्थ कोणता करायचा ते घरात असलेल्या सामानावरून ठरतं. नसलेला एखादा जिन्नस वगळून रेसिपी फॉलो करता. कोणी पाहुणे नसतील तर मांडणी आणि सजावटीच्या भानगडीत पडत नाही.
क. एखादी रेसिपी वाचून तो पदार्थ करायची खुमखुमी येते. घरात सर्व जिन्नस असणारच ही खात्री असते. आयत्या वेळी फजिती होणार असं लक्शात येताच तुम्ही स्क्वॉश ऐवजी काकडी, मैद्याऐवजी कणिक, तुपाऐवजी तेल, साखरेऐवजी गुळ अशी अदलाबदल करता आणि स्वतःच्या कल्पकतेवर खुष होत पदार्थावर ताव मारता

Lol

शूंपी त्याने दहावा प्रश्न लिहिलेली फाईल/पेपर त्याला सापडत नसल्यामूळे राहून गेले असणार. ह्यावरून अमोलचा स्कोर ओळख Lol

स्वतःच्या कल्पकतेवर खुष होत पदार्थावर ताव मारता<<
शूंपी!! झक्कास!
(स्वतःच्या कल्पकतेवर खुष होत पदार्थावर ताव मारणारा) इब्लिस.

मस्त Lol

-चमन आहात अगदी! >> आहेच तर आता नाही कसं म्हणणार.

पण हसून सोडून द्यावा नक्की त्यासाठीच लेख होता ना?
मला वाटलं खरंच काही सर्वेक्षण वगैरे लिहिलं आहे.
चमन काय सुबोध काय असे सगळेच लोक नेहमीच दिसतात किंवा सगळेच लोक कधीनाकधी तसे वागतांना दिसतात. मला लेखातला नेमका विनोद अजूनही कळला नाही.
लोकं असं टोकाचं वागले की त्यांना नेमकं विनोदी म्हणायचं की सिरिअस म्हणायचं की सुबोध की अजून काही हेही अजून कळालं नाही.

Pages