तुम्ही किती व्यवस्थित आहात?

Submitted by फारएण्ड on 9 November, 2012 - 10:15

आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.

खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.

प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या. उद्या याच वेळेस ते पान सापडले नाही तर तुम्ही ही प्रश्नावली सोडवण्याची गरज नाही, फक्त आपला अव्यवस्थितपणा नीट सांभाळा. अधिक माहितीसाठी तुमच्या "अव्यवस्थितपणा सल्लागारा" शी संपर्क करा.

आता प्रश्नावली:

१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
ब. घडी उलगडून त्याची इस्त्री नीट चेक करतो, एखादा चिकटलेला धाग्याचा तुकडा काढून टाकतो व मग बटने काढतो.
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.

२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
ब. शून्यः एकही पेन चालत नाही.
क. शून्य ते शंभरः बरीच चालू आहेत पण चालणारे नेमक्या वेळेला सापडत नाही. "पॉश" दिसणार्‍या पेनांमधे रीफिल नसते. मागचे बटन पुश करून चालू/बंद होणारी बॉलपेन्स प्राचीन काळापासून एकाच स्थितीत आहेत - ते बटन कायमचे दाबलेल्या अवस्थेत आहे किंवा खाली/वर कोणत्याही अवस्थेत केले काहीच फरक पडत नाही. टोपणवाली पेन्स व ती टोपणे "लंबी जुदाई" मोड मधे आहेत.

३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
ब. एक फॅन्सी बाउल आहे त्यात. कधीकधी इकडेतिकडेही असतात.
क. घरात आल्यावर पहिली जागा दिसेल तेथे, किंवा जेथून किल्ली स्वतःहून खाली पडत नाही अशा कोणत्याही जागी, बाहेर असताना ज्या हातात जड गोष्ट धरलेली आहे त्याबाजूच्या खिशात इतर दहा गोष्टींच्या खाली असतात, व बाहेर काढताना त्यातील किमान दोन गोष्टी खाली पडतात.

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
ब. फोन आल्यावर किंवा करताना 'टॉक' बटन दाबायच्या आधी कानावर लावतो.
क. फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.

५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
अ. मी दर रविवारी सकाळी साडेसात वाजता (आपोआप, गजर न लावता) उठून बाहेर गाडी धुतो. माझ्या गाडी धुण्याच्या वेळेप्रमाणे आजूबाजूचे लोक घड्याळे लावतात, व पक्षी/खारी वगैरे पाणी प्यायला आधीच जमा होतात.
ब. दर तीन चार महिन्यांनी, गाडी ओळखू येईनाशी होते तेव्हा, किंवा धुळीत "वॉश मी" वगैरे लोक लिहून जातात तेव्हा.
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.

६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
अ. टीव्हीच्या कपाटात प्रत्येक रिमोट साठी स्वतंत्र योग्य आकाराचा कप्पा केलेला आहे व त्यावर कोणत्या रिमोटसाठी ते लिहीलेले आहे. वापरून झाल्यावर प्रत्येक रिमोट त्याच्या कप्प्यात ठेवतो. कोचवर बसलेलो असताना आवाज वाढवायचा असेल्/चॅनेल बदलायचे असेल तर उठून रिमोट काढतो, वापरतो व परत ठेवून देतो. दर सहा महिन्यांनी बॅटरी बदलतो व रिमोट परत कप्प्यात ठेवून त्या बॅटरीज इ-वेस्ट सेंटर मधे देऊन येतो.
ब. बहुतेक वेळेस कॉफी टेबलवर. कधीकधी शोधावे लागतात.
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.

७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
अ. मला सगळे पाठ आहेत.
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
क. जेव्हा गरज पडेल तेव्हा आधी मागितल्यावर आलेल्या मेल मधून शोधतो (आधी जीमेल, मग याहूमेल या क्रमाने), अगम्य नावाच्या फाईल्स उघडून त्यात लिहीलेला आहे का पाहतो. पोस्ट-इट नोट्स, बिलांच्या मागच्या बाजू वगैरे ठिकाणांहून मिळवतो. नंबर बरोबर नाव लिहीलेले नसल्यास 'असाच काहीतरी नंबर होता' एवढा आत्मविश्वास आल्याशिवाय तो ट्राय करत नाही.

८. बर्‍याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
अ. माझ्या नोंदवहीत कोणती पावती किती दिवस ठेवायची याचा चार्ट आहे. रोज रात्री एकदा त्यादिवशीच्या पावत्या त्याप्रमाणे लावतो, व योग्य दिवशी फाडून/श्रेडर मधे घालून टाकतो.
ब. इतर बिलांबरोबर असतात. अधूनमधून फाडतो.
क. पँटच्या मागच्या खिशात "जाणार्‍या पावत्या दिसतात पण येणार्या दिसत नाहीत". पॅण्ट धुवून परत आल्यावर कागदाचे बोळे तेथून खाली पडतात. त्यातील एक दोन कधीकधी उलगडून ते बसचे तिकीट होते, की रेस्टॉरंटची पावती, की सिनेमाचे तिकीट हे शोधण्याचा प्रयत्न करतो. "अरे ही परवा आपण शोधत होतो ती पावती" हा खूप कॉमन संवाद आहे.

९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
अ. माझ्याबाबतीत असे कधी होतच नाही. इतरांनी आमच्याकडे येताना बरोबर आणलेल्या गोष्टी आयफोनच्या कीबोर्डच्या दाबलेल्या बटनांप्रमाणे मला इतर गोष्टींच्या मानाने कायम ठळक व मोठ्या दिसतात. विसरण्याचा प्रश्नच नाही.
ब. पुन्हा आठवेल तेव्हा.
क. सहसा ती गोष्ट द्यायला म्हणून जायचे ठरवतो व तीच गोष्ट न्यायची विसरतो. माझ्या विसरलेल्या गोष्टी शिफ्टिंग्/मूव्हिंग करताना वेगळ्या काढून मित्र नेण्यासाठी फोन करतात.

आता उत्तरांची बेरीज करून एकूण गुण पाहा:

गुणः ५००० व जास्तः आपल्या चरणकमलांवर पाणी घालून ते तीर्थ विकायला ठेवा. जोरात खपेल. 'दिल चाह्ता है' मधल्या सुबोधचा रोल तुम्हाला न देता त्या दुसर्‍या कोणाला कसा दिला याची कागदपत्रे काही वर्षांनी खुली होतील तेव्हा आधीच त्यावर पुस्तक लिहा.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.

(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारेंड, Lol हे बेस्ट आहे. नवर्‍याला नक्की वाचायला देणार मी. मी जनरली 'ब' गटात, क्वचित 'अ'. प्रतिसादातले प्रश्न पण एक से एक आहेत.

१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
मात्र असले उटपटान्ग डिझाईनचा केवळ एकच सदरा माझ्याकडे आहे, व त्याला बटणे नसून, ती नन्तर दोर्‍यात ओवलेली काजात गुफायची अस्तात तशी आहेत. बाकी लग्न पूजा वगैरे माझ्या व्यवसायाचे एथनिक की काय ते कार्यक्रम म्हणले की मी खान्द्यावर उपरणे/शाल घेऊन उघडाबम्बच अस्तो सर्ववेळ! आमच्यात शर्ट वगैरे सदरे घालून पूजा सान्गायची पद्धत नाही. कितीही थन्डी असली तरी न्हाल्या अन्गाने उघडेच बसावे लागते. फार फार तर एखादे उपरणे/शाल पान्घरावी.

२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
(इसवीसन १९८८ मधे मी ड्रायव्हिन्ग लायसन काढायला गेलो असताना, धुपका शर्ट घातल्यावर आधिच्या शर्टमधिल पेनपेन्सिल वगैरे घ्यायला विसरलो होतो, अन इन्स्पेक्टरसमोर सही करता गेल्यावर इन्स्पेक्टरकडेच सहीसाठी पेन मागितल्यावर त्याने मला धूधू धुतला होता. नशिबाने लायनीमधे त्यावेळेस सगळे टगेच होते त्यामुळे इज्जतीचा फारसा फालुदा झाला नाही, त्याने रान्गेतून बाजुला काढून पेन आणायला पिटाळले, तो बरेच फिरल्यावर एका पानपट्टीवर तेव्हाची एक रिफिल मिळाली, तिने मग सही करुन लायसनची कार्यवाही केली. सगळे झाल्यावर त्या इन्स्पेक्टरने माझ्या रिटायर्ड वडिलान्ची ओळख मला सांगितली, अन वर म्हणाला की तुझे बाबा इतके मोठ्ठे सिनियर ऑफिसर अस्ताना तू असा कसा वेन्धळा? तेव्हापासून माझ्या खिशात एकवेळ एक पैसाही सापडणार नाही पण पेन्-पेन्सिली असा बराच जामानिमा वेगवेगळ्या खिशात राखिव म्हणून ठेवलेला अस्तो. )

३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
त्याव्यतिरिक्त गाडीच्या किल्ल्या प्याण्टीच्या मागल्या उजव्या खिशात अस्तात (थोरला तिथुन त्या काढुन घेतो, गाडी उडवितो, अन परत किल्ली खिशातच ठेवतो--- त्याच्या प्यान्टीच्या! मग रोज सकाळी मी ऑफिसला निघताना बोम्बाबोम्ब करतो)

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
माझ्या फोनला ब्ल्युटूथ ची सोय नाही, अन मोबाईल घरीच ठेवून मी कामाला जातो.

५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.
अगदीच वेळ पडली तर अन थोरल्यावर ओरडूनही त्याने न धुतल्यावर लाजेकाजेस्तोवर एक बादली पाण्यात आख्खी सुमो धुवुन पुसुन लख्ख करतो Proud

६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.
(महत्वाचे: टीव्हीच्या रिमोटवर माझा कधीच ताबा नसतो. ते खाते कुटुम्बाकडे आहे - उत्तर वरील् प्रमाणेच, पण हा प्रश्न गाळावा)

७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
(मी एकही नम्बर लक्षात ठेवू शकत नाही, अगदी माझ्याच फोनचा माझा नम्बरही नाही. सबब खिशात बारक्या वहीवर सगळे लिहून ठेवतो, व खिशात वही आहेना हे लक्षात येण्यासाठि सारखा खिसा चाचपून बघतो - लोकान्ना वाटते की याच्या छातीतबितित दुखते आहे की काय)

८. बर्‍याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
पावत्या सांभाळण्याइतपत "खर्च" करण्याची क्षमता अजूनही आली नाहीये पण अगदीच सटीसमाशी घेतलेल्या वस्तूच्या प्याकिन्गच्या खोक्यातच सर्व कागदपत्रे ठेवतो व खोका कपाटात्/माळ्यावर टाकून देतो. त्याचे पुढे काय होते ते माहित नाही.

९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
इतरांच्या गोष्टी माझ्याकडे राहिल्यात असे कधीच होत नाही. (माझ्या गोष्टी इतरांकडे मी न नेताच त्यान्ना पाय फुटून पोचल्यात असे अनेकवेळा अनुभवलय, पण वस्तुन्ना पाय फुटण्यावर माझा काय कन्ट्रोल असणार बोवा? ) मी मात्र जिकडेतिकडे वस्तू विसरुन येतो. मी स्वतःच स्वतःला कुठे विसरलोय इतकेच होण्याचे शिल्लक आहे असे लिम्बी म्हणते.

आता तुम्हीच ठरवा बोवा काय ते, मी निकषच विसरलोय.

>>>दरवाजाला चावी तशीच बाहेर बाराशे चोवीस वेळा तरी राहिली अ>>><<
मला आजवर कळले नाहीये खरच की हे असे कसे होवु शकते? हा विसरभोळेपणा आहे. अव्यवस्थित पणा मध्ये मोडतो का?

अव्यव्स्थित लोकं खूपच निगरगट्ट व थंड असतात असे आढळलेय. कोणी काहीही बोला... फरक नसतो. Proud

माझ्या घरी माझी आई खूपच कडक असल्याने अशी शिस्त लागली गेली. चादरीला चुणी न पाडता खेचून नीट लाव्याची बेड.. लहानपणी त्रास वाटायचा पण आता मी तिची पुर्ण कॉपी झाली हे मलाच नकळत झालेय. Proud

लहानपणि सर्व गोष्टित नेहमि तिसरा माणुस हुशार असायचा.तोच नेहमि खरि ऊत्तर द्यायचा. तसेच इथेहि आहे.तिसरि ऊत्तरे हिच खरि ..म्हणजे आपल्याला जवळचि, आपलि आहेत.झकास लिखाण. मनापासुन आवडले.

फा, तुझं विशेष कौतुक. आज या लेखाची लिंक मला फेबुवर सापडली. जिने दिली होती ती बहुधा माबोकर नाहीये. तुझी किर्ती सर्वदूर आहे एकूण! Happy

तुमचे रिमोट्स कोठे असतात?

टीव्हीसमोर किंवा किचनमध्ये, शेवटी बायको कुठे असणार Lol Lol Lol

झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.

४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.

अगगगग... हसून हसून मेले... Rofl

आमची व्यवस्थितपणाशी लंबी जुदाइच असते कायम.>> +१

मस्त लिहीलंय... सकाळ एकदम फ्रेश!!!!!!!!!!!!!!!!!

शूम्पी दहाव्या प्रश्नासाठी ____/\____ स्वतःच्या कल्पकतेवर खुष होत पदार्थावर ताव मारतो... Lol

१३: काही दिवसांकरता बाहेरगावी रहायला जाताना तुम्ही काय काळजी घेता?
१. बॅग आठ दिवसापासून भरून तयार असते. सगळी दारं-खिडक्या लावली आहेत याची दोनदा खात्री करून घेता, गॅस सिलिंडरचं बटण ऑफ करता, विजेची सगळी उपकरणं बंद असतात, चार दिवस आधीपासूनच चोख प्लॅनिंग केलं असल्यामुळे फ्रीज रिकामा असतो त्यामुळे तो ही बंद असतो. कामवाली, दूधवाला, पेपरवाला यांना योग्य सुचना दिलेल्या असतात. दरवाज्यावर पोस्टमन, कुरीयर करता कोणाकडे पत्रं द्यावीत याची सुचना चिकटवलेली असते. दरवाज्याला कुलुप्/लॅच लावून चावी पर्समध्ये नेहमीच्या कप्प्यात ठेवली जाते.
२. बॅग आदल्या दिवशी भरलेली. दारंखिडक्या लावलेली, विजेची उपकरणं बंद (ऑलमोस्ट सगळी). फ्रीजमध्ये बर्‍याच गोष्टी असल्याने तो चालूच असतो. दूधवाला, पेपरवाल्याला आवर्जून निरोप दिलेला. कामवालीला आपल्या घरातल्या डिस्कशनमधून कल्पना आल्याने ती कामावर येत नाही. पोस्टमन, कुरीयरचा मुद्दा लक्षातच आलेला नसतो. दरवाजा व्यवस्थित बंद केलाय याची खात्री करता. गॅस? .... ह्यॅ! फक्त निराशावादी माणसंच गॅस सिलिंडरचं बटण ऑफ करतात.
३. आदल्या दिवशी तिकीट शोधण्याच्या गडबडीत / विमानाच्या तिकीटाची इमेल नक्की कोणत्या इमेल अकांउंटमध्ये आहे हे शोधण्याच्या गडबडीत इतर फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ झालेला नसतो. सकाळी उठून बॅग भरण्याच्या गडबडीत दारंखिडक्या, विजेची उपकरणी वगैरे क्षूद्र गोष्टी खिजगणतीतही नसतात. ठचाठच भरलेला फ्रीज रात्रीच चुकून बंद केलेला असतो. पण ते तुम्हाला गावाहून आल्यावरच कळतं. चावी घरातच ठेऊन दार ओढून घेता. पण हे ही तुम्हाला गावाहून आल्यावरच कळतं.
गावाहून आल्यावरही तुमची कामवाली आणखी चारदिवस कामाला येत नाही. तिचा मोबाईल नंबर तुमच्याकडे नाही हे तिला माहित असतं. दुधवाल्यानं इमानेइतबारे रोज दुध टाकलेलं असतं आणि शेजारी ते रोज वापरतात. परत आल्यावर दाराबाहेरच्या वर्तमानपत्रांच्या डोंगराआडून तुम्हाला दरवाज्यापर्यंत जावं लागतं.

मामी , Biggrin

दुधाच्या पिशव्या शेजार्‍यांच्या मांजराने फोडल्याने दारात दुध, दही असा रहाडा असतो Wink

आमच्याकडे विरजणाचे दूध फ्रिजात जाते. व त्यातून ते वाचलेच तर चहात जाते. (भांडे कुठलेही असो):) त्यामुळे हल्ली दुधाच्या विऱजणाच्या भांड्यावर "विरजण" असा येल्लो टॅग असतो.

दरवाज्यावर पोस्टमन, कुरीयर करता कोणाकडे पत्रं द्यावीत याची सुचना चिकटवलेली असते.
>>
होय होय, त्यामुळे घरफोड्या करणारांना आणखी वेगळी सूचना चिकटविण्याची गरज राहात नाही.

'येवा, घर आपलंच आहे'

Rofl

काही 'ब' चे अपवाद वगळता माझा स्कोअर सरसकट 'क' येत असल्याने आणि हे रोजच जगत असल्याने तुझी निरिक्षणक्षमता जबरदस्त आहे, हे आवर्जून सांगतो. Lol
आमच्याकडे माता-पिता म्हणजे सगळे एकदम जिथल्या तिथे. (त्यात एकाने ठेवलेले दुसर्‍याला सापडत नाही, यावरून नेहमी तडतडबाजा असतो, पण ज्याची त्याला वस्तू नीट सापडणे या इथल्या विषयात दोघेही हुकमी.)

मामी, शूंपी.. Lol तुमचेही प्रश्न एकदम भारी आहेत.
मामी, गावाला गेल्यावर पेपर आणि दुधाच्या बाबतीत असे खरंच घडलंय माझ्याबाबतीत. Proud

तसेच बाहेरच्या दौर्‍यात हॉटेलवर उतरल्यावर निघायच्या दिवशीची बॅगेची आवराआवरी करून परतीच्या आरक्षित केलेल्या सीटवर बसेपर्यंत मध्ये जो काही रंजक, चमत्कारीक आणि प्रत्येक वेळी निराळ्या रूचीचा अध्याय घडतो तो म्हणजे.. काय सांगू? Proud

सही Happy

गजानन Happy

माझा ४ वर्षांचा भाचा पण कॉपि-पेस्टेड जिन्स घेऊन आलाय्...तो मोठ्ठे भोकाड पसरून रडत होता आणि अचानक मधेच रडे थांबवून हात उंच करून त्याच्या आईला स्वयंपाकघरातले वरच्या कप्याचे नीट न लागलेले दार दाखवत होता. तिने ते नीट लावून घेतल्यावर त्याने परत भोकाड कंटीन्यू केले Happy

माझा ४ वर्षांचा भाचा पण कॉपि-पेस्टेड जिन्स घेऊन आलाय्...तो मोठ्ठे भोकाड पसरून रडत होता आणि अचानक मधेच रडे थांबवून हात उंच करून त्याच्या आईला स्वयंपाकघरातले वरच्या कप्याचे नीट न लागलेले दार दाखवत होता. तिने ते नीट लावून घेतल्यावर त्याने परत भोकाड कंटीन्यू केले

>>> आईग्गं! त्याची काळजी घ्या.

माझी भाची पण हा असलाच प्रकार आहे गं सुमेधा..
वय वर्ष दीड..
बाहेरून आलेल्या कुणीही चपला काढल्या की त्या कपाटात गेल्याशिवाय ही बसू देत नाही कुणाला. कुठलंही दार, ड्रॉवर किंचितसा उघडा असेल तर 'बंद, बंद' असं म्हणत हातवारे करते. ते बंद केल्याशिवाय थांबत नाही.
स्वतःची खेळणी मात्र जमिनीवर ओतायची असतात. Happy

नीरजा Happy

हे दिवसेंदिवस कठीण काम होत चालले आहे. फोनवरच्या राँगनं वर बोलणार्‍या माणसांचे सुद्धा मराठी व्याकरण आमच्याकडे सुधारले जाते.

आग "लागला" असे कोणी ओरडत आमच्या घरी आला, तर आग "लागली" असे म्हणवून घेतल्याशिवाय पाणी पण नाही मिळायचे Happy

Pages