४-१० वर्षाच्या मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी आणि चांगली सवय कशी लावावी?

Submitted by लाजो on 2 May, 2012 - 18:59

लहान मुलांच्या, म्हणजे वय वर्षे ४ ते १० या वयोगटातल्या मुलांच्या, खाण्याच्या सवयी, आवडी निवडी इ इ बद्दल इथे लिहा. माझ्यासारख्या बर्‍याच पालकांना खुप मदत होइल.

मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी इथे या विषयावर थोडी चर्चा झाली आहे, पण ते 'गप्पांचे पान' आहे त्यामुळे चर्चा वाहुन जाईल.

धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या माझी ५ वर्षांची लेक खाण्याच्या बाबतीत भयंकर चुझी, आळशी, हट्टी झाली आहे.

सकाळी जेमतेम दूध पिऊन शाळेत जाते. लंच शाळेतच... डब्ब्यात रोज सँडविचच हवे कारण इतर मुलं सँडविचेस आणतात. त्यात सुद्धा फक्त चिझ / बटर /चिकन स्लाईसेस / चॉकलेट स्प्रेड असलीच सँडविचेस.... कधी वेगळं काही दिलं तर डब्बा परत येतो...

रात्रीच जेवण ६.३० ला असतं पुर्वी भाजी पोळी खायची आता त्यालाच 'यक्क यक्क' म्हणते... चिझी पास्ता हवा असतो... फ्राईड राईस आणि नुडल्स खाते पण त्यातल्या भाज्या नकोत (तरी तिच्यासाठी मी भाज्या बारीक चिरुन वेगळा राईस आणि नुडल्स करते). बटाटा/ भाज्यांचे स्टफ्ड पराठे कधी कधी खाते.

इतर नवे पदार्थ ट्राय करायला आवडत नाहित... बाहेर कुठे गेलो तर हिची खाण्याची नाटकं....

खाताना एका जागी बसेल तर शप्पथ... स्वतःच्या हाताने जेवायचा आळस (पास्ता/पिझ्झा सोडले तर)... सगळं लक्ष खेळण्यात/ड्रॉईंग करण्यात ... खाताना कटाक्षाने टिव्ही बंद असतो.

मला मदत करा...... प्लिज्जच..

लाजो , छान आहे बाफ. आपण इथे डब्यामध्ये काय द्यायच त्याच्या आयडियाज लिहायच्या आहेत कि खायची सवय कशी लावायची ते?

http://www.maayboli.com/node/30585 लाजो, या लिंकवर फोटो आहेत त्याप्रमाणे ट्राय करून बघू शकतेस. मी शाळेत फळं , भाज्या यांचे चार्ट असतात ते दाखवून मुलाला सांगते, हे सगळं खाण कसं जरुरी आहे ते. सहसा या वयात शाळा,टीचर यांच जास्त पटतं मुलांना असं निरीक्षण आहे Happy रोज थोडं थोडं हॅमर(म्हणजे चांगल्या अर्थाने) केलं , आता फारसा त्रास नाही या बाबतीत. ही फे़ज असते मुलांची सो डोण्ट वरी Happy

सीमा, मुलांना वेगवेगळे पदार्थ खायच्या सवयी कश्या लावायच्या, त्यांच्या आवडी निवडी कश्या बदलायच्या... खाताना एका जागी बसुन, नीट स्वतःच्या हाताने, आनंदाने कसे खायला शिकवायचे हे मुळ प्रश्न.

डब्यामधे काय द्यायचे याची चर्चा इथे चालु आहे. त्यातले १/४ पदार्थ सुद्धा माझी लेक खात नाही Sad

शिल्पा, धन्स गं Happy लिंक बघितली... हे असले प्रकार करुन झालेत...

लेकीची शाळा ८.५० ते २.५० असते. तिच्या डब्ब्यात :
- एक फ्रुट अ‍ॅपल, केळं, संत्र, कलिंगडाच्या फोडी, द्राक्ष इ पैकी एक किंवा कॉम्बो असते - हे ती खाते.
- स्नॅक साठी कधी चिझ+ बिस्किट / फ्रुट बार / गोड बिस्किट / कप केक / मिनी मफिन्स अस काहितरी - मोस्ट ऑफ द टाईम हे संपतं.
- योगर्ट / फ्रुट ड्रिंक / ज्युस - हे ही मोस्टली संपतं.
- लंच - सँडविचेस - इथेच घोडं पेंड खातं Sad

रोजच्या डिनरला तिचे जास्त नखरे असतात...

लाजो, +१००००!
माझ्या मोठ्या लेकीचं आणि तिचं बघुन बघुन की काय आता धाकटीचं पण असच आहे! कधी कधी खुप चिडचिड होते.
मोठी लेक फक्त वरण-भात, तुप लावुन पोळी असं खाते जेवताना. डब्यात तीच वर लिहीलेली सँडविचेस. पराठा/पोळी असं नको असतं कारण इतर मुलं आणत नाहीत.
धन्यवाद हा धागा सुरु केल्याबद्दल. इतर माबोकरांचे अनुभव/ टिपा वाचायला मिळतील.

लेकीला 'वरण' मग ते तूरीच/ मुगाच कसलंही असो... कुठल्याही फॉर्म मधे आवडत नाही.. अगदी लहानपणापासुन... सॉलिड्स सुरु केली तेव्हा वरणाचे पाणी वेगवेगळ्या पद्धतीने - कधी गोडं तर कधी पालक घालु इ इ प्रकारे देण्याचे लाख प्रयत्न केले.. तिला तो वरणाचा वास आणि स्वाद आवडत नाही... मी आणि नवरा नुसत्या वरण भातावर आवडीने राहु Happy

लाजो, तरी तुझ्याकडे इतक्या छान छान पाकृ आहेत...आणि तुझी मुलगी तुला नाही म्हणते....सांग तिला तुझ्या आईला आम्ही पळवणार आहोत...:)

मला काही फ़ार चांगला अनुभव नाहीये पण पहिल्या वेळी ज्या चुका केल्या त्यातल्या काही दुसर्‍यावेळी निस्तरताना आलेल्या अनुभवातून थोडं शेअर करू शकते..
मुलांना ती लहान असताना बसायला लागली आणि साधारण समोरचे चार दात आले की आपण भरवतानाच थोडं थोडं फ़िंगर फ़ूड द्यावं...जे काही त्याला चावण्यासारखं असेल त्याप्रमाणे (गिळताना घशात अडकायचा धोका लक्षात घेऊन वस्तू निवडा) मी छोटे होलग्रेन ओट्स (चिरिओज सारखे पण चिरिओज अति साखर वाले असतात. हे टिजे मध्ये मिळतात ते थोडे बरे आहेत..तुम्ही कुठलेही द्या) त्याच्या छोट्या दातांनी तो तोडतो...केळ्याचे बारीक काप किंवा उकडून मऊ केलेली फ़ळं जी काही हातातून सटकतात पण काही तोंडापर्यंत जातात असं...थोडक्यात त्याला हाताने खाण्यात रस निर्माण होतो...मग जसा जसा तो मोठा होतो आणखी खाणं देऊ शकता.
प्रत्येक मुलाच्या दाताचं येणं, वस्तू पकडण्याचा महिना इ.इ. बदलतो त्याप्रमाणे थोडा अंदाज घ्या. इथे आपण त्याचं त्याने खाणं पेक्षा त्याला खायचं असतं असे माहित करुन देत असतो..प्रत्यक्षा खाणं आपण एका बाजूने भरवत राहायचं...
साधारण वर्षाचा होताना माझा छोटा फ़ळांचे तुकडे, उकडलेले वाटाणे, गाजर इ. अंड्याच्या आम्लेटचे तुकडे असं त्याच्या हाय चेअरच्या ट्रे मध्ये ठेवलं की खात राहतो..वरण भात मी बाजुने चमच्याने भरवते.....
पण मोठ्याच्या बाबतीत हे सगळं मी केलं नव्हतं..त्यामुळे अजूनही काही वेळा तो हाताने खायला टंगळमंगळ करते...

आपल्या चवीचं खाणं याविषयी प्रकाश टाकण्यासाठी सध्या माझ्याकडे काहीच नाही. मी स्वतः संध्याकाळचं जेवण आपल्या पद्द्धतीचं करते आणि ते सोडून मी दुसरा पर्याय देत नाही (हे थोडं स्ट्रॉंग वाटेल पण बेबीसेंटरच्या साईटवर पण लिहिलं आहे की तुम्ही मुलांना फ़ार पर्याय देऊ नका मग ते त्यातला सोपा आणि फ़ास्ट फ़ूड टाइप पर्याय निवडतात...)
अगदी सगळं नाही पण सध्या खातोय...त्यातल्या त्यात त्याला मांसाहार आवडतो म्हणून काही दिवशी बरं पडतं...आपल्याही काही भाज्या आवडतात पण अजून्ही मी मुलांच्या जेवणात तिखट घालत नाही.. तिखटवालं थोडं जरी असलं तरी नाकं मुरडणं पाणी पिणं सुरू होतं..
तुम्ही आपल्या मुलांना तिखटाची सवय कधी सुरू करतात आणि कशी याबद्दल कुणीही सांगितल्यास आभार्स.....

सगळ्या आयांचा लाडका विषय आहे हा. आपण निदान मुलं खात नाहीत अशी तक्रार तरी करतो जो प्रकार जास्त सोपा आहे. माझ्या दोन मैत्रिणी ओबीस मुलांना खाण्यापासून दूर ठेवता ठेवता रडकुंडीला येतात. ही मुलं अक्षरश: काय दिसेल ते खातात. आधी जरा मुलांची दया आली पण नंतर आयांची अडचण समजली. मुलांना खाऊ नका असं म्हणताना रोजच काळजाला घरं पडतात. त्यामुळे आपले काम सोपे आहे.
पाच, सहा, सात यावर्षांमध्ये माझ्या मुलानेही खाण्याचे सगळे नखरे केले आणि आम्ही मेटाकुटीला आलो.;) शाळेत दिलेला डबा परत आणणे हे लाडके काम होते. एकीशी झालेल्या बोलण्यातून प्रयोग म्हणून मीही कडक धोरण अवलंबले आणि शाळेतल डबा संपल्याशिवाय घरात घेणार नाही हे स्पष्ट केले (त्यावेळी इयत्ता २री). तरीही डबा परत आल्यावर घराबाहेर उभा करून त्याला खायला लावले
(रडारड झाली) आणि मगच घरात घेतला. असे साधारण चार दिवस ओळीने झाले. मग त्याचीही मात्रा चालेना. डबा परत येणे हळू हळू थांबले. त्यावेळी वर्गात भारतीय मुले दोनच होती त्यामुळे याचा डबा यक्की असे सगळे म्हणायचे.
तरीही डब्यात मी देते ते पदार्थ म्हणजे इडलीवर तूप मेतकूट्/साखर, पास्ता (थरमॉसमध्ये कोमट राहतो), पालक्/मेथी/बटाटा/गाजर पराठा त्याला तूप व तिखट नसलेली सुके खोबरे, डाळे, शेंगदाणे अशी कोणतीतरी चटणी, साध्या पोळीला तूप लावून चटणी कधी लोणचे, गूळतूप, तूप साखर, तिखटामिठाच्या पुर्‍या, पालक पुर्‍या, होल ग्रेन ब्रेडचे सँडविच, आप्पे, घरी केलेले बर्गर इ.. यासगळ्याची अनेक दिवस देऊन आपल्याला व मुलांच्या ब्रेनला छान सवय होते. आपण आपला हट्ट (चांगल्या बाबतीत तरी) सोडता कामा नये हा धडा मी भरपूर मनस्ताप सोसल्यावर शिकले. डब्यात एका पदार्थाला दुसरा असा पर्याय मात्र दिसता कामा नये.
स्नॅक टाईमला मात्र मी माझे मत लावून धरत नाही. चिप्स हवे असतील तर चार बाळ गाजरे दुसर्‍या झीपलॉकमध्ये घालून द्यायची, एखादा मिनी बेगल क्रीम चीज लावून, डोरीटोज हवे असतील तर शेंगदाणे, डाळे, काजू यापैकी एक चिक्कीची वडी त्यातच सरकवून द्यायची.;) (नटस् चालण्याच्या वयात आलाय आता, नाहीतर राजगिरा देत असे पूर्वी), कधी सफरचंद इ. कधी आपल्या आवडीचा पदार्थ असेल तर बरोबर एखादे चॉकलेट दिले तर मुलाला बरे वाटते. कधीमधी शाळेत आवडता मेन्यू असेल तर (शक्यतो शुक्रवारी) पिझ्झा वगैरे खातो. सध्यातरी असे चालले आहे. हुश्श्य.
आता मिडलस्कूलला काय करतो देव जाणे!

आईशपथ! काय सर्वदूर रडारड आहे पोरांच्या न खाण्याची! मैना यांनी सांगितलेला, जाड्या मुलांचा प्रश्न भारतीय मुलांमधे कमी दिसतो का सुदैवानं? एरवी आपली सगळी खात्या-पित्या घरातली ही मुलं बरगड्या मोजून घ्या गटात!

या फेज मधून गेल्यावर आता मला भारतीय आई-बापांच्या पोरं वाढवण्यात, मुख्यत्त्वे खायला घालण्यात गडबड आहे की काय असा संशय येतो. ७-८ वर्षांची मुलं.. पालकांना भरवावं लागतं!? आम्ही पण हीच चूक केली. खारे बाबा, कसंही, कुठेही खा, हवं तर नाचून दाखवतो, पण खा! तुझ्या आवडीचं आहे, आतातरी खा. या धिंगाण्यात पोर लाडवलं खाण्या-पिण्याच्या बाबतीत असं वाटतं. बरं काटकुळ्या देहात रिझर्व्स नसल्यासारखी स्थिती. पोटात गेलं नाही की पडलेला चेहेरा! तेही बघवायचं नाही.

ज्यांची मुलं अत्यंत डिसिप्लीनने खातात त्या आई-बापांना मला साष्टांग नमस्कार घालावासा वाटतो. आमचे एक ओळखीचे आहेत, नॉन इंडियन. त्यांचं तेव्हा माझ्या मुलाच्या वयाचं पोर (६ वर्षं) आणि ३ वर्षांचं बारकं, इतके व्यवस्थीत, पानात पडेल ते जेवायचे! त्यांचा उपाय, मोठ्यासाठी असा होता: ६:३० जेवायची वेळ. त्यावेळी बोलवलं की टेबलाशी हात धुवून यायचं. असेल ते खायचं. (शक्यतोवर पोराच्या आवडीचंच जेवण असेल.) त्याक्षणी नखरे केले की, "यू आर एक्स्क्यूज्ड" म्हणून उठवायचं. थेट दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट मिळेल. रात्री भुकेनी झोप लागली नाही तर कपभर दूध. ते नको असल्यास काहीच मिळणार नाही. आम्हा देशी आईबापांच्या ह्रदयाला हा प्रकार फार म्हणजे फारच क्रूर वाटला. पण परिणाम असा की त्यांचं पोर निमूट खायला शिकलं, आमचं नाही. आता जेवलो नाही तर उपास घडणार हे समजलं असावं (इकडे घरी अगदी नित्यनेमानं, जेवणाखाण्याच्या लढाईत आईबाप जिंकतात की पोर अशी स्थिती, आणि म्हणून की काय 'जेवण' हा सोहळा फारच नकारात्मक दृष्टीनं बघितल्या जाऊ लागला!)

एक दिलासा: २ ते १०-११ वर्षांपर्यंतचा गोंधळ निस्तरताना नाकीनऊ आले तरी भविष्यकाल उज्ज्वल असतो! Proud प्री-प्युबर्टी आणि प्युबर्टीत पोरं व्यवस्थीत खायला लागतात. चवी बर्‍यापैकी डेवलप होतात. तेव्हा न खाणे फेज संपून खायला द्या फेज सुरू होते.

या पोस्टीच्या थेट काही उपयोग झाला नाही तरी आशेचा किरण दिसावा अशी इच्छा!. Happy

लहान मुले आणि प्राणी जरुरीपेक्षा जास्त कधी खात नाहीत. tt.gif

आमच्याकडेही पिकी ईटर आहे. डॉक म्हणाली appetite चांगले आहे तेव्हा काळजी नसावी. सध्या जे आवडीने खाईल ते द्यावे. पाचवीत गेल्यावर म्हणजे वय १० नंतर काही मुलं नवे पदार्थ, चवी ट्राय करतात. सध्या फक्त मांस, मासे, कार्ब्ज आणि दूध-दुधाचे पदार्थ लागतात. त्यामुळे गाजर-मटार, भोपळा, पालेभाजी घालून खिमा, पालक-मेथी घालून मटण चिकन, आणि बरेचदा पराठे हे भाज्या पोटात घालण्याचे मार्ग आहेत.

तेव्हा सॉरी लाजो, इथे काही मार्ग निघण्याची शक्यता कमी आहे. Light 1 मिळाला तर मला सांग. Happy
पळून जाते..

(मृ चे शेवटचे वाक्य इथेही वाचा. Happy )

खारे बाबा, कसंही, कुठेही खा, हवं तर नाचून दाखवतो, पण खा! >>>>>>>> Happy

माझी लेक तर आवडीचं नसेल तर सरळ मला भूक नाही म्हणते..आणि तशीच काही न खाता राहते..

लाजो वर सगळ्यानी म्हटल्याप्रमाणे ही एक फेज असते. माझा मुलगा पण ३ ते ५ च्या दरम्यान खायला जाम म्हणजे जाम पिडायचा. रोज उठून तेच. हे नको, ते नको, मला हे आवडत नाही, ते आवडत नाही. आणि काय आवडतं तर वाट्टेल ती फळं, तिन्ही त्रिकाळ दूध आणि कुकी, चिप्स, चॉकलेट. भात, पोळी, पास्ता (तो त्याला अजुनही फारसा आवडत नाही), पिझ्झा सुद्धा नको. जे जास्त चावायला लागतं ते काही नकोच. पण वर वेका म्हणते तसं थोडं नाही बरच स्ट्रिक्ट रहावं लागतं. आपण जरा ढील दिली की बसलेच आपल्या डोक्यावर. दीड ते दोन तास लागायचे आम्हाला रात्रीच्या जेवणला तेही मी भरवूनच. नुसतच समोर ठेवलं तर हा तसाच बसून राहणार. डॉ. ला सांगायची चोरी तो वर मृण्मयी ने सांगितलय तसच सांगणार, उपाशी ठेव २ दिवस खाणार नाही, ४ दिवस खाणार नाही मग आपोआप खाईल, जे आपण करू शकत नाही :(. पणा मी त्याला तो मागतोय ते ऑप्श्न्स दिले नाहीत. देणायासारखी परिस्थिती नव्हती. दम्यामुळे त्याला फार पथ्य होती. २ तास लागले तरी चालेल पण आपण हेच खाणार आहोत मग तुला फ्रूट मिळेल हे इतकं संपलं की हे दर २ मिनिटाला बोलत रहायचं आणि त्याला चावायची आठवण करायची. फ्रूट ही आमचं अमीष असायचं. जाम पेशन्स लागतो. नवरा घरी असेल तर जाम वैतागायचा. म्हणायचा हे असं खाऊन काय अंगी लागेल त्याच्या? पण हळू हळू मुलाला समजलं आपलं चालत नाही, आई चंच चालतं. २ तासाचे १ तास झाला, आता ४० मिनिटस झालेत. आता तो त्याच्या हाताने पण खायला लागला आहे, (वय साडेसात), त्यासाठी मात्र डॉ. चं ऐकलं. ताट समोर ठेवायचे, १ तासाचा टायमर लावायचे, खाल्लं तर ठीक नाही तर सरळ ताट उचलून, १ कप दूध देऊन, झोपायला पाठवायचे. हे सात चा झाल्यावर सुरू केलं. महिना लागला अक्कल यायला. पण आता भरवा भरवी बंद आहे. बाहेर अजुनही त्रास आहे. खेळायचं असतं, जेवायचं नसतं पण मी आता सोडून देते. घरी रात्री आपलच जेवण कंपल्सरी करते. तिखट अजिबात चालत नाही, सासूबाई म्हणतात सवय कर पण आत्ता कुठे गाडी रुळावर आली आहे, आता तिखट खाण्यासाठी परत मेहनत करायची माझी तयारी नाही. Happy
डब्याची कटकट आहेच. सँडविच असतील तरच डबा संपतो नाहीतर परत. घरी आल्यावर मी तो खायला लावते पण डॉ. म्हणे तसं करू नकोस. घरी आल्यावर त्याला खूप भूक लागत असणार, डबा खाल्ला नसल्याने, तू त्याला फक्त दूध दे आणि डिनर च्या वेळेलाच जेवायला दे. म्हणजे त्याला कळेल की डबा खाल्ला नाही तर जेवायच्या वेळेपर्यंत भूक धरून ठेवावी लागते. हे मी अजुन करू शकले नाही कारण शाळेतून आल्यावर स्वीमींग, कराटे असतं, तिथे असं उपाशी कसं नेणार?

मुलाने खाणं सोडलं तर कधी कसला त्रास दिला नाही की रडारड केली नाही,
पण जेवण म्हणजे घरात वॉर झोन. व्हॅक्यूमला घाबरायच तो समोर ठेवून जेऊ घातलय. Sad

सगळ्यांच्या पोस्टी चांगल्या आहेत.
मुलं १०+ झाली की मस्त खातात असं ऐकुन आहे. सध्या वाट बघावी लागेल!

अजुन एक. एकदा एका डॉ.ने सांगितलं होतं की 'जेवली नाही, खाल्लं नाही' असा विचार तुम्ही करु नका! काय काय खाल्लय याची लिस्ट करा रोज. तुम्हालाच अंदाज येइल. बर्‍यापैकी खाल्लय हे जाणवेल. असं मी एकदा केलंही होतं. त्याचा उपयोग माझ्या मनःशांतीसाठी झाला होता.

लहान मुले आणि प्राणी जरुरीपेक्षा जास्त कधी खात नाहीत. >>> मलाही त्याच डॉ.ने हे सांगोतलं आहे.

सध्या जेवणाच्या बाबतीत (वरण-भात, तुप-पोळी का होईना) मी कडक धोरण अवलंबलय. त्याचा फायदा थोडा होतोय पण मलाच असं वागल्याने वाईट वाटत रहातं.....

वर्गात हेल्दी फुड/जंक फुड असं काही कानावर आलं की घरातल्या वागण्यात जरा फरक पडतो. पण एक आहे की लेकीला मॅक/केएफसीत स्वत्;हुन जायचं नसतं... कोक/तत्सम पेयं आपणहुन मागत नाही.

हम्म...

वेका, मैना, मृ, फुपा, लोला... पोस्टी आवडल्या...पटल्या.

थोडक्यात मलाच माझ्या स्ट्रॅटेजिज बदलल्या पाहिजेत आणि थोडा पेशन्स पण वाढवला पहिजे Happy

आशेचा किरण Happy ... त्याकडेच बघत पुढची वाटचाल Happy

लहान मुले आणि प्राणी जरुरीपेक्षा जास्त कधी खात नाहीत. >>> हो डोक्टर म्हणाली होती तिची असचं.

'लेक तिला हव तेच आणि हव तेव्हाच खाणार, तु टेंन्शन घेऊ नकोस'. हे सांगुन सांगुन माझा नवरा ही कंटाळलाय आता Proud

मी बघितलय की लेकीच्या गोर्‍या मित्र मैत्रिणी अगदी व्यवस्थित खातात (१-२ अपवाद वगळता). इथल्या आया मुलांना अगदी लहानपणापासुन त्यांचे त्यांचे खायला देतात.. आणि नाही खल्ले तर खाणे कचर्‍यात... आपण नाही ना करु शकत असं Sad

वत्सला, माझ्या लेकीलाही कोक इ एरेतेद पेय आवडत नाहीत पण मॅकडोनल्डस चे फक्त चिकन नगेट्स तेव्हढे आवडतात. त्याबरोबर अ‍ॅपल ज्युस. पोळीबरोबर गोड काहितरी असेल तर पटपट संपते. तूप साखर, गुळ तूप, खीर, बासुंदी, श्रीखंड, कंडेन्स्ड मिल्क, दहीसाखर, अगदी शिंगाड्याचा लाडु किंवा जिलबी पण चालते Lol

अरे देवा !! वाचतेय.
मृण, मैना, फुपा यांचे पटले.

आमच्याकडे वरणभातभाजीपोळीइडल्यादोसेआप्पेकाहीभाज्याउसळी व्यवस्थित खायची मुलगी. या वर्षी पासून भरवणे बंद करायचे होते. ते मी इथे आल्यामुळे बारगळले. शिवाय चांगल्या ७५% भाज्या खायची ते अति लाडाने बंद करण्यात आले आहे दुर्दैवाने. आता पुन्हा नेटाने प्रयत्न करावा लागेल. Sad
'तू नसताना उपाशीच ठेवतो दोन दिवस, पहा लायनीवर येते की नाही' असे म्हणणारे खंदे वीरच ढेपाळले. एनीवे घरात सतत खूप लोकं असल्यामुळे लाड प्रत्येकाजवळ चालत नाहीत हे मुलीला, आणि पोरांना उपाशी ठेवणे हे वाटते तितके सोपे नाही हे बापाला चांगलेच कळले आहे. Wink

दिवसाचा (रात्रीचा) पूर्ण फोकस जेवणावर राहु नये एवढा एकच उपाय आहे मला सापडलेला.
एनीवे स्वतःच्या हाताने (पटापट) जेवायला उद्युक्त करणे हा पुढल्या वर्षभराचा संकल्प आहे. पाहुयात.

सगळ्यांचे अनुभव वेगवेगळे आहेत.
माझे चार शब्द.
जेवण शिजवायच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घ्या.
आज जेवायला काय करायचे ? किंवा काय करु या ? पासून सुरवात करा. हे केलंस तर तू खात नाहीस. यांचा तूला काही फायदा नाही. हे खाल्लं तर तूला शक्ती मिळणार नाही, फक्त हेच खाल्लस तर तूला चागली चित्र काढता येणार नाहीत,, असे सांगायचा प्रयत्न करा.

एखाद्या पदार्थाच्या तयारीत अवश्य मदत करायला लावा, आपणच केलेला पदार्थ खायची इच्छा होते.

माझ्या मानसकन्येबाबत तिच्या आईने फारच कठोर प्रयत्न केले. हा पदार्थ करण्यासाही, त्यासाठी लागणारे पैसे कमावण्यासाठी तूझ्या आईने फार कष्ट केले आहेत. तू हे खाल्ले नाहीस तर ते सगळे
वाया जाईल, असे सांगत असे ती. लेकीने समोर येईल ते खायचे, असेच धोरण अगदी लहानपणापासून
बाणवले.
शक्य असेल तर मूलांना आणखी कोणाकडे तरी, स्लीप ओव्हर ला पाठवा. तिथे मुकाट्याने जेवतात, ती.

दिनेशदा,
तुम्ही सांगितलेल्या बर्‍याचश्या स्ट्रॅटेजिज ट्राय करुन झाल्यात... अगदी इमोशनल ब्लॅकमेलिंग पण करुन झालय Proud

तिने सॅलड्स, भाज्या वगैरे खाव्यात म्हणून बॅकयार्डात व्हेजि पॅच बनवुन घेतला. त्यात मेथी, टॉमेटो, २-३ प्रकारची सॅलड्स, कॅप्सिकम इ इ लावले... उत्साहाने २ -३ दिवस पाणी घातलेन... आता फक्त टोमेटो काढायला पुढे.. खायला आई आहे Lol

लेकीला लांब केस आवडतात म्हणुन तिला सांगितले की तु भाज्या खल्यास की तुझे केस छान लांब आणि काळेभोर होतिल.. २ दिवस ऐकलन.. तिसर्‍या दिवशी म्हणते... अत्ता नकोच मला लांब केस... मोठी झाले की वाढवेन... Uhoh झालं... आमच्यापेक्षा आजची पिढी अति स्मार्ट आहे म्हणायची Lol

रिवॉर्ड्स चार्ट चा पण प्रयोग करुन झालाय. २-३ दिवस उत्साह.. मग ये रे माझ्या मागल्या....

नगेट्स आमच्याकडे पण फेवरिट. मैत्रिणीकडे चक्क छोले व भाजी खाउन आली व मग म्हणे बर लागतं की भाता बरोबर. अजून भात पोळी व करी एकदम खायची अक्कल नाही. तूप मीठ भात, बिर्यानी असे तरी नाहीतर चिकन रोटी तरी. मी पण तिला विचारूनच काय ह्वे ते करून समोर ठेवते.
डोसा, बटर व कोक असे कैच्याकै काँबो एकेकाळी आवड्त होते. आज काकडी खाणारच आहे असे मला प्रॉमिस केले आहे. का तर काकडी खाऊन वजन कमी होईल. Happy

नगेट्स आमच्याकडे पण फेवरिट. मैत्रिणीकडे चक्क छोले व भाजी खाउन आली व मग म्हणे बर लागतं की भाता बरोबर. अजून भात पोळी व करी एकदम खायची अक्कल नाही. तूप मीठ भात, बिर्यानी असे तरी नाहीतर चिकन रोटी तरी. मी पण तिला विचारूनच काय ह्वे ते करून समोर ठेवते.
डोसा, बटर व कोक असे कैच्याकै काँबो एकेकाळी आवड्त होते. आज काकडी खाणारच आहे असे मला प्रॉमिस केले आहे. का तर काकडी खाऊन वजन कमी होईल. Happy

दिनेशदा,
<<शक्य असेल तर मूलांना आणखी कोणाकडे तरी, स्लीप ओव्हर ला पाठवा. तिथे मुकाट्याने जेवतात >>
बरोबर आहे पण दुसर्‍यांकडे लोकं मुलं जे खातात तेच जास्त देतात, पिझ्झा, पास्ता वगेरे. कोणी एक दिवस आलेल्या मुलाला भाजी पोळी देत नाही Happy आणि थोडी मोठी मुलं खातात लोकांकडे, ३/४ च्या पोरांचं लक्ष सगळं खेळण्यातच.

आणि बाकी पण जे तुम्ही म्हणता आहात ते ६/७ वर्षांच्या मुलांना कळतं, त्याना जरा जंक फूड, हेल्दी फूड हे पण शाळेत सांगतात. मला आता मुलगा विचारतो, या जेवणात प्रोटीन आहे का, कार्ब्स आहेत का, फॅट्स किती आहेत वगेरे आणि नीट उत्तर दिलं की हे फूड मला स्ट्राँग बनवणार आहे असं म्हणून खातो.

३ ते ५ मधली मुलं आपलं काही ऐकायच्याच मूड मधे नसतात. त्यातल्या त्यात टीचर चं ऐकतात.

आमच्यापेक्षा आजची पिढी अति स्मार्ट आहे म्हणायची

लाजो ती तर आहेच गं Happy पण आपण पण डोकं लाऊन त्यांना तोडीस तोड उत्तरं द्यायची Happy

माझा मुलगा गेल्या वर्षीपर्यंत काहीच नवीन खाऊन बघायचा नाही, म्हणजे रोजच्या बर्‍याच भाज्या, पोळी, भात तो खायचा पण भेळ, वडे, समोसे असं काहीच नाही, एक घास पण खाऊन बघायला तयार नसायचा. पण आता खाऊन बघतो , बरेचदा नाही आवडलं असच उत्तर असतं पण खाऊन तर बघतोय, मी बेबी स्टेप्स मधे प्रोग्रेस बघते Proud

तू नीट खाल्लं नाहीस तर एवढीच राहशील, मग डॉ. इंजेक्शन देऊन फूड पोटात घालतील असं सांगून बघ. आम्ही मुलाला वरणाचं इंजेक्शन घ्यायचं का असं म्हणायचो Happy

मी हि हैराण आहे या प्रश्नामुळे. आणि ४ ते १० नाही ३ ते १० वयोगट करा. माझी ३ वर्षाची मुलगी अजिबात जेवत नाही.फळ नाहीत दुध नाही, काडी पैलवान आहे. ४ घास वरण भात भू भू ची भीती घालून घालून कसाबसा गिळते नाहीतर सरळ थुकून टाकते. Maggie Noodles, Maaza Mango Juice हे मात्र पटापट पोटात जात. मुलाचा अजूनच वेगळा प्रकार आहे. तो फक्त गोड खातो. गोडाचा शिरा, बिस्कीट, केक आणि रोज किसान जाम आणि पोळी. भाज्या अजिबात नाहीत. बळजबरी केली तर अजिबात जेवत नाही. नेट वर बघितलं तर ते म्हणतात कि ३ वर्षानंतर मुलांना स्वत्वाची जाणीव व्हायला लागते. ती आई वडिलांना करून देण्याचा मार्ग म्हणजे अन्न नाकारण कारण तोच सगळ्यांत सोपा मार्ग आहे. आईला वाटत ना कि मी भाजी खावी मग मी खाणार नाही. मुलीच्या बाबतीत मला हे कारण पटलय. कारण तिच्या वागण्यात बराच बदल झालाय. तिला सगळ स्वताला करायचं असत. अंघोळ घातलेली आवडत नाही, कपडे स्वताला हवे तेच घालणार, एकंदरीत माझे निर्णय मी घेणार असं वागण बदलताना दिसतंय.
मला आठवत कि माझ्या लहानपणी मला देखील मला वरण भात पोळी खायला आवडायचं नाही. फरसाण पाव असंच आवडायचं. माझी आजी जाम चिडायची माझ्यावर. पण हळूहळू सगळ बदललं. म्हणून मुल मोठी झाली कि सुधारतील या आशेवर राहायचं दुसर काय.

ते रोज तूप साखर/ जॅम पोळीचं नाटक आमचं पण झालं आहे, आई, साबा म्हणायच्या बारीक आहे तो, देत जा त्याला रोज तूप साखर पोळी. पण मला पटायचं नाही, रोज नुसतीच तूप साखर पोळी काय. मग त्यात पण शक्कल लढवली. अर्ध्या पोळीचा तूप साखर लावून रोल बनवून ठेवायचा आणि अर्धी पोळी भाजी शी खाल्ली तर आणि तरच तो मिळेल असं सांगायचं. कधी कधी तो पण बार्गेन करायचा एक घास भाजीचा, एक घास तूप साखरेचा. अशी एक पोळी खाऊ घालायची.

आता मोठा झालाय. टू मच शुगर बॅड फॉर हेल्थ असं मलाच पढवत असतो Proud

लहानपणी आदित्यनं डबा परत आणला, तर त्यादिवशी मी त्याला टी.व्ही. अजिबात पाहू द्यायचे नाही. अगदी कडकपणे हे धोरण मी राबवलं.
त्याला मॅगी / बिस्किटं / वेफर्स असलं हवं असायचं डब्यात (कारण गुज्जु पोरांच्या डब्यात हेच असायचं बहुतेकवेळेला!! एक-दोन वेळा त्यानं सर्व मुलं पी.टी.ला गेलेली असताना गुपचूप वर्गात येऊन नेहमी बिस्किटंच आणणार्‍या एका मुलाचा डबा संपवला होता :हाहा:)
मग मी त्याला सांगितलं - हे पदार्थ थोडे देईन, (ते ही आठवड्यातून एकदा), पण त्याबरोबर घरी मी जो पदार्थ डब्यासाठी केलेला असेल तो ही थोडा न्यावा (आणि संपवावा लागेल). ही मात्रा बर्‍यापैकी लागू पडली होती.

हे काही वर्षं झालं. मग शाळेकडूनच डब्याचं वेळापत्रक मिळालं. वर्गशिक्षिका काटेकोरपणे सर्वांचे डबे तपासायची. सर्वांच्याच डब्यात एकच पदार्थ असल्यामुळे मुलं गपगुमान खायची.

मुलांना विचारून आपलं आपणच डब्याचं वेळापत्रक बनवणं - हा उपाय बरा वाटतो मला. (असं वेळापत्रक मी नंतर त्याच्या कंप्युटर सर्फिंगसाठीही बनवलं होतं :फिदी:)

मुलं ८-९ वर्षांची होईपर्यंत ५-१० टक्के यशस्वी होणारा अजून एक उपाय म्हणजे - इंग्लिश नावं देऊन पदार्थ समोर ठेवायचे. उदा. - फोडणीचं वरण ऐवजी 'दाल फ्राय' म्हणायचं. (मी एकदा चवळीची उसळ 'स्प्राऊटेड बीन्स विथ मिक्स व्हेज' या नावानं वाढली होती. चिरंजीवांनी त्यादिवशी ताट चाटून पुसून साफ केलं. :हाहा:)

माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाला जेवणात्/न्याहारीला सतत कॉर्न-फ्लेक्सच हवे असायचे. एकदा तिनं दूध-साखर-पोळी कालवली आणि रोटी-फ्लेक्स म्हणून त्याच्या समोर ठेवले. तर तो मिटक्या मारत जेवला Lol

अर्थात, परदेशात हे इंग्रजी उपाय कितपत यशस्वी ठरतील ही देखील शंकाच आहे...

१०+ नाही, पण १५+ झाली की पोरं आपण देऊ ते खातात... कारण तेव्हा भूक इतकी वाढलेली असते, की पर्यायच नसतो. Proud
पण तरीही त्या-त्या वयोगटासाठी निरनिराळे बीबी मस्ट आहेत Lol

माझी लेक पुढच्या महिन्यात ३ ची होईल. जेवणाचे नखरे आमच्याकडे पण जोरदार आहेत. अख्खा दिवस ती वेगवेगळी फळं, काकडी, गाजर्,मुळा ह्यावर काढू शकते. पण जेवायला चल म्हटलं की डिस्क्लेमर सुरू होतात.. मी भाजी खाणार नाही...त्यातल्या त्यात आमटी पोळी आवडते फार. त्यामुळे मी आमटीतच वेगवेगळ्या भाज्या घालून उकळते. माझ्याच समाधानासाठी.किंवा पोळीचा घास भाजी भरून आमटीत बुडवून दिला तर जातो. पण आवडत नसेल तर २०-२० मिनिटं घास तोंडात घोळवायची हातोटी थक्क करते मला. तिच्या दुर्दैवाने आई आणी बाबा पैकी कुणीच तिच्या हट्टामुळे पाघळत नाही. तास तासभर जेवण चालतं.रविवारी तिला सांगितलं होतं की जेवलीस तरच ईतर आवडीचा खाऊ मिळेल त्यामुळे जेवणाला पर्याय नाही. तर पोरीने दुपारी साडेतीन पर्यंत वेळ काढला. आपल्याला भूक लागली आहे हे अजूनही कळत नाही त्यामुळे शेवटी रडारड झाली पण खायची तयारी नव्हतीच. अजून तरी हात टेकलेले नाहीत. प्रयत्न सुरूच राहातील.तिच्या पेडीने मला सांगितलं होतं. डू नॉट फाईट विथ हर ड्युरिंग मील टाईम. यू विल नेव्हर विन. त्यामुळे डोक्यावर बर्फ ठेऊन खायला घालायचे प्रयत्न सुरू असतात आमचे.

पण आपण पण डोकं लाऊन त्यांना तोडीस तोड उत्तरं द्यायची << : हम्म... पटलय Happy

नेट वर बघितलं तर ते म्हणतात कि ३ वर्षानंतर मुलांना स्वत्वाची जाणीव व्हायला लागते. ती आई वडिलांना करून देण्याचा मार्ग म्हणजे अन्न नाकारण कारण तोच सगळ्यांत सोपा मार्ग आहे. आईला वाटत ना कि मी भाजी खावी मग मी खाणार नाही<< अगदी अगदी...

२०-२० मिनिटं घास तोंडात घोळवायची हातोटी थक्क करते<<< सेम हियर Uhoh

डोक्यावर बर्फ ठेवुन रहाणे हे शिकण्याची मला गरज आहे.. हल्ली मिच फारच तापट व्हायला लागल्येय Uhoh

डू नॉट फाईट विथ हर ड्युरिंग मील टाईम. यू विल नेव्हर विन. >>> खरंय...

मुलांच्या आवडीची, भरपूर चित्रं असलेली भरपूर पुस्तकं दाखवत दाखवत त्यांना जेवायला घालणे - हा अजून एक उपाय. पण तो मुलं ५-६ वर्षांची होईपर्यंतच कामी येतो.

काही दिवसांपूर्वी पोराचं वजन बघितल्यावर इथे विचारावं असं डोक्यात आलं होतं. वय चार आणि वजन १३.५ किलो. Happy
पण इथलं वाचून, पोरगा बर्‍यापैकी नीट खातोय असं वाटतंय. सकाळी ग्लासभर दुध पिवून शाळेत जातो. जेवण /ब्रेकफास्ट कंपलसरी शाळेतच. बरा मेन्यु असतो पण. गेल्या महिनाभरात छोले-चावल, राजमा-चावल, दाल्-चावल, आलु, गोबी, पनीर पराठे + दही, इडली, सँडविच, व्हेज टिक्की (१००% दिल्लीवालं जेवण) असं सगळं खायला मिळालंय. याशिवाय एखादं फळ किंवा ज्युस. दिलेल्या वेळात शाळेत जेवण पूर्ण होतं.

घरी आल्यावर दुपारी एखाद्या अंड्याचं ऑम्लेट किंवा चीझचा क्युब इतकंच खातो. संध्याकाळी परत ग्लासभर दुध, बदाम, थोडेसे भिजवलेले चणे-शेंगदाणे (हे जिमला जाणार्‍या धाकट्या दिराच्या कृपेने आम्हा सगळ्यांना खायला मिळतं. Happy )

रात्रीचं जेवण, एक फुलका + भाजी / डाळ -वरण. जे काही बनलं असेल ते. एखाद्या दिवशी त्याच्या जेवायच्या वेळेपर्यंत जर भाजी/आमटी झाली नसेल तर पोळीला जॅम लावून खातो. स्वतःच्या हाताने जेवला तर पाऊण तास आणि बाबाने खाऊ घातलं तर वीस मिनीटात जेवण होतं. स्वैपाकात तिखट घालायची आम्हाला सवयच राहिली नाहीये. जास्तित जास्त एखादी हिरवी मिरची असते. जर तिखट लागलंच तर बाबा त्याच्या डाळीमध्ये चमचाभर साय घालून देतो. Happy पण संपव रे, संपव रे, झोपायला उशिर होतोय, तुझं शेड्युल बिघडेल असं सारखं ओरडावं लागतो.

पण गावाला गेलं की यातलं सगळं बंद. आख्खा दिवस एखादं-दुसरं फळ आणि ग्लासभर दुध यावरच काढतो. तिकडे सगळ्या पोरांमध्ये असताना याला खेळण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. बरं रागावलं तर पाठीशी घालायला आज्ज्या, आजोबा, काका यांची फौज उभी असते. Happy

पोळी, भाजी, वरण हे खावं म्हणून मी वर्षभरापूर्वी त्याला डाळी, चिकन, अंडी यात प्रोटिन्स असतात, फुलके, भात यात कार्बोहायड्रेट्स असतात, भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स असतात, दुधात कॅलशियम असतं इ.इ. सांगितलं होतं. it works for him. बर्‍याचदा मी फक्त प्रोटिन्स आणि कार्बोहायड्रेट्स खाल्लेत, व्हिटॅमिन्स कुठे आहेत असंही विचारतो. Happy

माझ्यासाठी सध्याचा मोठा प्रश्न, त्याला जंक फुड पासून दुर कसं ठेवावं हा आहे. आम्ही घरात चिप्स, मॅगी, कोल्ड ड्रिंक वा तत्सम गोष्टी शक्यतो आणत नाही. हे पदार्थ चांगले नसतात हे त्याला समजावलं आहे. पण आता शाळेतून येताना बसमध्ये बरेच जण चिप्स, कुरकुरे असलं काही ना काही खाताना दिसतात. शाळेच्या कँटिनमध्ये पण हे प्रकार ठेवलेले असतातच. हे बघून आम्ही हे चांगलं नसतं हे सांगतोय ते बहूदा चुकीचं आहे असं त्याला वाटायला लागलंय. तो /ती कसं काय खाते? तिची आई तिला का खाऊ देते या प्रश्नांना काय उत्तर द्यावं. आमच्याकडे चॉकलेट्स / टॉफी /कँडीज चं पण रेशनिंग असतं. रोज एका कँडी /टॉफीपेक्षा जास्त नाही. पण शाळेत बाकीच्या मुलांना खाताना बघून हे रेशनिंग पण डळमळित व्हायला लागलंय.

Pages