अब इत्रभी मलो तो मुहोब्बत की बू नही - अनिता

Submitted by बेफ़िकीर on 13 April, 2012 - 06:23

"बघू मोबाईल तुझा?"

बिनदिक्कत मी माझा सेलफोन हिच्याकडे दिला. दोघांनाही सुट्टी असल्याने दोघे घरीच होतो आणि हिला माझी एकंदर दिनचर्या या विषयावर कधीचे साठलेले बोलून दाखवायची तीव्र इच्छा झालेली असावी हे माझ्या लक्षात आलेले होते. बिनदिक्कतपणे सेलफोन हिच्या हातात देण्याचे कारण घरी पोचण्याआधी मी तो 'ऑल क्लीअर' करून ठेवायचो आणि ही सवय कटाक्षाने पाळायचो.

"डिलीट केलेस वाटतं सगळे कॉल्स"

"म्हणजे?"

"अनिताचे?"

"छे.. डिलीट काय करायचेत... संबंधच नाहीये काही... "

"तूच तर म्हणतोस आम्ही तास तास गप्पा मारतो म्हणून..."

काही योजना असतात माझ्या. एखाद्याला एकदम धक्का बसू नये म्हणून मी त्या व्यक्तीचा मूड असेल असे बघून थोडीशी कल्पना देऊन ठेवतो. ही मला नेहमी अशा गोष्टींवरून चिडवायची (याचे कारण मी अशा गोष्टी करतो हे तिला बरेचसे माहीत आहे) त्यामुळे जेव्हा केव्हा एखादी गोष्ट खरी असेल तेव्हा ती एकदम समजण्याआधी मी अधेमधे थोडी कल्पना देऊन ठेवायचो. असेच एकदा सहज म्हणालो होतो हिने चौकशी केल्यावर. 'मी आणि ती गप्पा मारतो तासनतास'! हे मी का सांगितले? तर त्या क्षणापुरती ती थट्टा होती. पण उद्या खरंच आम्ही इतक्या गप्पा मारतो हे माझ्या सेलफोनवरून अचानकपणे सिद्ध झाले तर मी हेही म्हणायला मोकळा होऊ शकलो असतो की 'हे मी तुला सांगितलंच होतं की आधी'! त्या क्षणापुरती थट्टा का? तर दोघेच बाहेर गेलेलो असू आणि ती मला चिडवत असेल तर त्या शेडमध्ये थोडेफार खरे थट्टेच्या स्वरुपात बोलून ठेवायचे आणि तिला चिडवायला आणखीन कुरण दिल्यासारखे दाखवायचे. त्या क्षणापुरते ते थट्टामस्करी ठरते तर उद्या अचानक बिंग फुटलेच तर 'हे मी म्हणालेलो नव्हतो का' असे म्हणता येते.

क्रुएल! मी क्रूर आहे. एखाद्या लहान मुलाला चॉकलेटसाठी डोळ्यातून पाणी काढताना पाहिले तर माझ्याही डोळ्यात पाणी येते. पण हक्काच्या माणसाचे, ज्याने आपल्यासाठी सर्व त्यागलेले आहे, त्याचे मन मोडताना मला वाटायला पाहिजे तितके वाईट का वाटत नाही? गृहीत धरण्याचा स्वभाव का झाला किंवा का आहे?

दागचा शेर आठवतो.

शुमार अपनी खताओंका बतादू
तुम्हे शायद हिसाब आये न आये

माझ्या चुकांची संख्या मीच सांगतो तुला, तुला हिशोब करता येईल न येईल.

अनिता ब्राह्मण नव्हती आणि मराठाही नव्हती. म्हणजे नाही आहे.

माळी आहे ती.

जातीप्रमाणे वागणारी ती एकटीच असावी. माझ्या खुरटलेल्या अस्तित्वाला तीन महिने सतत फुलवायचा प्रयत्न केला तिने. हे करताना स्वतःच फुलत गेली. मी फक्त फुलल्यासारखा भासत राहिलो.

कश्शाचाही खरा परिणाम होत नाही असा एक दगड आहे मी. असे म्हणतात की शुक्राच्या पृष्ठभागावर उभे राहिले तर तेथील अती घनतेमुळे पृष्ठावरून परावर्तीत होणारे किरण परत फिरून पृष्ठावरच येतात व अख्खाच्या अख्खा शुक्र हा ग्रह एखाद्या दरीतून चहूकडून वर जात असलेल्या डोंगरासारखा दिसत राहावा तसा दिसतो. म्हणजे मी राहात असलेल्या बिंदूपासून कोथरुड सगळ्यात जवळ, मग सगळे पुणे त्याच्यावर, त्यावर सगळा भारत, भारताच्या वर डोंगराच्या वरच्या भागात अमेरिका, कॅनडा, एकीकडे ऑस्ट्रेलिया, सर्वात वरचा बिंदू म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रूव.

मला मी असाच सगळीकडे दिसतो. बाकी काही दिसत नाही.

एवढे करून चमकत तर नाहीच मी शुक्रासारखा.

मात्र शुक्र या एकाच ग्रहावर सूर्य खरोखर पश्चिमेला उगवतो तसा मी रात्री जागतो आणि दिवसा झिंगल्यासारखे जमेल ते काम करत राहतो.

अनिता रानटी वेलीसारखी होती.

एका कवीसंमेलनात झालेली भेट आणि तिच्या नवर्‍याला माझी कविता आवडणे याचे परिमाण पुढे वेगळेच झाले. माझी दोस्ती झाली ती खरी दिलीपशी. त्याची कविता चांगली नसली तरी त्याने लग्न करून घरी आणलेली कविता छान होती.

एकदा कैच्याकै प्रकार झाला. त्याने त्याच्या चार पाच मित्रांचे टोळके जमवून मला कुठे बोलवले तर शनिवार पेठेमागे नदीला लागून असलेल्या कॉजवेवर. मी ऑफीसमधून थेट तिथे गेलो आणि एक तास काव्यवाचन झाले भर रस्त्यालगत असलेल्या एका स्पॉटवर.

धमाल आली.

अशी निखळ आणि अचानक जमलेली मैफील मोठमोठ्या संमेलनांपेक्षा भारी ठरते. पण अचानक जमायला हवी. ठरवून काही केले की ते ठरवल्याचा इगो त्यात मिसळतो आणि 'कसे छान ठरवले बघा' यावर अधिक लक्ष केंद्रीत व्हायला लागते.

न ठरवता आईच्या पोटात आपणच येतो ही केवढी गंमत. ठरवले असते तर प्रत्येकालाच टाटा बिर्लाच्या घराण्यात जन्म हवासा वाटला असता.

माझे आणि अनिताचे नाते निर्माण होणे व संपणे हे एक्स्प्रेस वेगाने झाले.

तिच्या घरी तिच्या सोसायटीतील लोकांना कविता ऐकवण्यासाठी मला बोलावले होते आणि मानधन म्हणून मला एक नारळ, एक शाल आणि बर्‍यापैकी दाद मिळाली.

"ही पण कविता करते"

निघताना दिलीप म्हणाला. 'अरे वा' म्हणून सटकलो मी. स्वतःची कविता ऐकवून झाली की तेथून सटकण्याचा माझा स्वभाव आहे. असतो एकेक जण स्वार्थी! मान्य तर करतोय की.

कवितेने मला काय काय दिले असेल तर प्रवास, मित्र, मोठेपणा आणि स्वतःच्या घरी परक्यासारखे वावरण्याची शिक्षा.

यशःश्रीच्या नजरेपुढे आणि कपाळाच्या आठीपुढे बाहेर मिळवलेल्या सर्व वाहवाच्या चिंध्या होतात. मी पगारही कमवतो, बर्‍यापैकी कमवतो पण आज त्रेचाळीसाव्या वर्षी वाटत आहे की गेलेले क्षण मी तिला आता पुन्हा मिळवून देऊ शकणार नाही. अशा ठिकाणी पोचलो आहे की नाही आधीचा काळ आणू शकत नाही पुढचा सुधारू शकत. याचे कारण पुढचा काळ सुधारण्यासाठी आता तिच्या मनात थोडी तरी उभारी पाहिजे ना? आता मी काहीही केले तरी ती आधीच्या पापांची सारवासारवी वाटते. क्षुल्लक गोष्टींसाठी काय घालवले याचा विचार मनात येऊ नये म्हणून 'आपण बेफिकीर आहोत' असे स्वतःला सांगत व्यसनांकडून अनुमोदन मिळवायचे आणि 'चुकली असली तरी ही वाटही शेवटी तिथेच पोचते' असा वाद जगाशी घालत पुढचा श्वास घ्यायचा.

एकदा वाटतं सरळ एखादं अनाथ पोरगं उचलून घरात आणावं आणि त्याच्या संगोपनात वेळ घालवावा. पण असे मूल हिला पटत नाही आणि हिला पटत नाही अशी निदान एक तरी गोष्ट आपण केली नाही याचे समाधान मी तिला देत बसतो.

१९८८ पासून प्रवास, २००५ ला अपघात आणि २००७ पासून कविता. मी लग्न करून दुकटा झालो पण जिच्याशी केले ती एकटीच राहिली की काय!

सुखात आहेस ऐकतो, हे कसे जमवतेस सांग ना
तुडुंब डोळ्यांमधील पाणी कुठे लपवतेस सांग ना

वैभवचा हा मतला खरा करून दाखवण्याची जबाबदारी बहुधा त्याने मलाच दिली.

इतर सगळ्याच कथांमध्ये मी त्या त्या व्यक्तिरेखेकडून माझ्या बायकोकडे अशी दिशा ठेवली. यात मात्र हिच्याकडून त्या व्यक्तीकडे असेच लिहावेसे वाटत आहे. याचे कारण.....

..... आमची चोरी पकडली गेली.

चोरी पकडली गेल्यानंतर जे भाव मनात येतात ते चोरीच्या आधीच्या मनातील भावांपेक्षा नेमके उलटे असतात. 'हिला काय समजणार आहे आणि समजले तरी त्यात काय इतके' हे आधीचे भाव 'काय केले मी हे आणि आता कसे हे हिला विस्मृतीत ढकलायला लावू' असे होतात नंतर.

नव्या ओळींचे एसेमेस फक्त दिलीपला यापासून दोघांनाही पाठवण्याची पातळी गाठणे माझ्यासारख्या विकृतासाठी डाव्या हातचा मळ होता. त्याला हवा तो प्रतिसाद मिळणे हा आजवरचा अनुभव. त्याचे मातेरे होणे हा अनुभव पहिलाच!

इथे काही लिहावेसे वाटते. किंचित वादग्रस्त. कदाचित वाद होईल, कदाचित नाही. पण स्त्री हा प्रकार कायम शोषितांमध्ये गणणे चूक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. जे मी इथे या मालिकेत लिहिलेले आहे त्यातील आजवरच्या सर्वच स्त्रिया या काही 'कधी एकदा विवाहबाह्य संबंध होतायत' अशा नव्हत्या. इन फॅक्ट त्यातली कोणीच नव्हती, दोन सोडल्या तर! प्रेमा कतलानी आणि शीतल. पण प्रेमा आणी शीतल सोडून बाकीच्या ज्या होत्या त्या कोण होत्या? काय होत्या?

एक माणूस हे कशाकशाचे मिश्रण आहे? शरीर आणि संस्कार? परिस्थिती आणि इच्छा? लाचारी आणि सत्तापिपासा? विवशता आणि शोषक वृत्ती? सगळ्याचेच मिश्रण!

या स्त्रियांना संसार होते. अनेकींना मुलेबाळे होती. काहींना जॉब होता. रेखाचा तर तसा हेतूच नव्हता. ऋत्विका मुनोत शीतलसारखीच असली तरी बिंग फुटल्यावर हादरणारी होती. कोजागिरी मुळातच शोषित होती.

या स्त्रिया एका वेगळ्याच पुरुषाबरोबर एका विशिष्ट व आज आपल्या समाजास अमान्य असलेल्या पातळीस का गेल्या?

अनेक कारणे आहेत.

एक म्हणजे सौदामिनीसारख्या स्त्रिया, ज्यांचे नवरे संसाराचा खेळखंडोबा करून बायकोच्या जीवावर मौज करत आहेत. अशा स्त्रियांना फक्त स्त्रीचाच मानसिक आधार पुरतो असेच काही नाही. अत्यंत नाजूक मनोवस्थेच्या प्रसंगी जो मदत करेल तो मित्र मानला जातो हे सहज शक्य आहे. मग त्या मित्राबरोबर काही वेगळे क्षण, काही असे क्षण जे एरवी कधीच उपभोगता येणार नाहीत, अनुभवले जातात. हे सगळे गुप्तच राहते. हे महत्वाचेही राहात नाही नंतर. आज ती लखनौमध्ये काय करत असेल आणि माझी आठवण तरी असेल का याचा विचार माझ्या मनाला शिवतही नाही. याचे कारण जे काही झाले ते त्या क्षणांनी निर्मिलेले रसायन होते. तेच रसायन पुन्हा झाले नाही. सौदामिनी ही स्त्री कधीच पायघसरू नव्हती आणि नसेल.

पण शीतलचे काय? प्रेमा कतलानीचे काय? त्या तर सरळ सरळ भूल पाडणार्‍या मदनिका. नाहीतर एका अनोळखी माणसाबरोबर कोणी रात्री कारमधून अहमदनगरहून पुण्याला येईल? बरं समजा प्रेमा तशी नव्हतीच, पण ती तशी माझ्याबरोबर आली म्हणून माझ्यामनात तसे विचार आले हे मान्य करू. पण मग नंतर जे झाले ते तिने का होऊ दिले? आणि असेच होते तर धुळ्याच्या बसमध्ये बसवून दिल्यावर तिकिटाचे पैसे माझ्याकडून का घेतले नाहीत? निघताना आवाज का गहिवरला? कोणतीही पाऊलखुण मागे न ठेवता त्या कुठे निघून गेल्या? फक्त काही तासांची गुप्त मौज हा उद्देश! अशाही स्त्रिया! सौदामिनीच्या एकशे ऐंशी डिग्रीजमधल्या.

रेखा आणि ज्योती मेहता! यांचे तिसरेच! काही झाले तर होऊ दिले म्हणणार. त्यावर बातचीत नाही. फार झाले तर गप्प बसवणार. बाकी मैत्री भरपूर. यांना काय हवे असते आणि काय नको असते? जे हवे असते किंवा नको असते ते नेमके कोणत्या क्षणी दुसर्‍याला सांगायचे याचे वय लग्न आणि मूल होऊन अनेक वर्षे झाल्यानंतरही यांच्या आवाक्यात का नसते? मुलगी वयात आली की लज्जेचे आवरण पत्करते अशी समजूत ठाम असलेल्या या समाजात अशा बायकांना कोणती पातळी कोणत्या वेळी हवीशी वा नकोशी होते? समोरच्या पुरुषाला बाहुले कसे बनवू शकतात? ठीक आहे तो अनीतीचा पुतळा आहेच. पण या कोणाला, कोणत्या निकषांवर किती जवळ येऊ देतात याचे कायदे काय आहेत? अनाकलनीय.

कॅरोलसारख्या थोड्याच, खरे तर कोणीच नाही. तू कोण आहेस आणि मी कोण आहे याच्याशी देणेघेणे नाही. मला तू आवडलास, प्राप्त झालास, दॅट्स इट! प्राप्तच झाला नसतास तर मी काहीच केले नसते. कॅरोल खरी! 'यू कॉल्ड्मी फ्रम हैड्रबड? जीझस'!

सीमा गैलाड म्हणजे पुरुषांचा पुरुष! शिव्या काय, वागणं काय! नुसती नशा! हुक्का! पण आत ओलावा! जे काय आहे ते तोंडावर.

पायल कोणत्या प्रकारात मोडते? दिवस गेल्यावर आणि संसार महत्वाचा वाटल्यानंतर शांतपणे सगळे संपवून टाकले. स्वार्थी?

पण या सर्व स्त्रिया आपला स्वतःचा चॉईस दुसर्‍याच्या चॉईसशी जितका मॅच होईल तितका मॅच करत होत्या. दुसर्‍याचा चॉईस बदलत नव्हत्या. आग्रह नव्हता, अ‍ॅक्सेप्टन्स होता. हिम्मत होती, पण ती हिम्मत दुसर्‍याने केली हे दाखवण्याचे कौशल्य अपार होते. काहीतरी हवे होते, पण ते तुला हवे आहे हे सिद्ध करण्याची हातोटी होती. गुपीत आवडत होते पण त्याची तीव्रता किती असावी यावर स्वतःचे नियंत्रण हवे होते. या स्त्रियांचे शोषण झाले का? बलात्कार केले का मी? स्वतःच्या घरात रात्री बेरात्री प्रवेश देणारी आसावरी शोषित कशी?

या जगात पुरुषाना पुरुषांपासून दिवस जात असते तर विवाहबाह्य संबंधांचा प्रश्नच आला नसता कारण विवाह केलेच नसते कोणी. पण स्त्रियांना स्त्रियांपासून दिवस जात असते तर विवाहबाह्य संबंध अस्तित्वात आले असते, याचे कारण विवाह झालाच पाहिजे व समाजमान्यता असायलाच हवी हा नियम स्त्रियांनी केलाच असता.

नाहीतर गॉसिपिंग कशावर करणार?

कशाला बायकांना बदनाम करायचे. आपण काय आहोत ते बघू. पण या सगळ्या बायका कशा आहेत असे तुम्हाला वाटते राव? अगदी मजेत आहेत सगळ्या. पोरेबाळे, श्रीमंती, संसार, सगळे मस्त चाललेले आहे. मग वापर काय यांचा झाला काय? मीच वापरला गेलो हे नाही पटत का रे?

वापरले जाण्यात मजा आहे. अनियंत्रीपणे दुसर्‍याचे होण्यात मजा आहे. स्त्रीला शरीर स्त्रीचे असले तरी मेंदू पुरुषापेक्षा दुप्पट विचार करू शकणारा असतो. लिफ्ट घेऊन गाडीतून उतरल्यानंतर पुन्हा रात्री 'बारिशका मौसम था' वगैरे एसेमेस कशाला करायचे? शोषण झाले म्हणून बोंब मारता यावी म्हणून? प्रत्येक दिसलेल्या बाईबरोबर बरा होत नाही माझा विबासं? असो! गरळ ओकून झाल्यामुळे अनिताकडे वळायला हरकत नाही. म्हणजे नसावी.

तुम्हाला कोणाला कधी ड्राईव्ह करताना एकाच व्यक्तीचे चाळीस एसेमेस आले आहेत का चाळीस?

हसा हसा, पण या थापा नाहीत.

चाळिसाव्वा एसेमेस 'तुम्ही ड्राईव्ह करताय ना? मग नंतर करते एसेमेस' असा होता.

एकाच स्त्रीमध्ये आई, बहिण, मुलगी, मैत्रीण, पत्नी, सून, सासू, व वेश्या होण्याची क्षमता असते.

प्रत्येक घटकाचे कॉम्बिनेशन कमीजास्त असते इतकेच प्रत्येक स्त्रीमधले.

दिलीपने 'वेश्या' या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असणारी बाई लग्न करून घरात आणली होती. चाळीसपैकी सहा ते सात मेसेजेसना मी गाडीतूनच उत्तर दिले होते.

'अब इत्रभी मलो तो मुहोब्बत की बू नही, वो दिन हुवा हुवे के पसीना गुलाल था' या शेराप्रमाणे घामालाही सुगंध येणार्‍या अनिताला स्वतःची सांसारिक दु:खे सांगून दुसर्‍याची सहानुभुती मिळवण्याची कला लाभलेली होती.

बाहेर वगैरे भेटणे झाले एका रेस्टॉरंटमध्ये! बरेच काय काय सांगितले. जातीवरून छळतात. दिलीप किती पगार मिळतो तेही सांगत नाही. पैसे मागीतले की म्हणतो तू कमावतीयस की वगैरे!

"एकदा निरेला यायचंय मला"

हे वाक्य तिने टाकलं तेव्हा मी गार झालो. अजून बारा वर्षात माझी बायको आलेली नाही आमच्या प्लॅन्टमध्ये!

"कशाला?"

"तिकडे कोण आहे ते बघायला... सारखा तिकडेच असतोस.."

'अरेतुरे' ही पातळी आल्यानंतर टाकलेले हे लाडीक वाक्य! अगदी तुमची शपथ सांगतो खरे तर मला संताप आला होता. ही कोण होती जिने मला म्हणावे तुझी तिकडे कोण आहे! च्यायला!

नंतर एकदा घरीच जेवायला बोलावलं मला दिलीपने! पाया सूप!

तेव्हा अशी वागली जशी मानलेली बहिण!

पण एक दिवस मीही तोल घालवून बसलोच. आणि मग आणखीन एकदोनदा तोल गेला. याच दरम्यात मी घरी सुतोवाच केलेले होते थट्टेच्या स्वरुपात! दिलीपपेक्षा अनिताशीच माझ्या गप्पा होतात तासनतास असे!

माझ्या गाडीची बेडरूम व्हायची वेळ आली होती.

मग नियम ठरला. साडे सात नंतर एसेमेस नाही. मग तो नियम मोडण्यात आला. मग नियम मोडण्याच्या आनंदात एसेमेस वाढायलाच लागले. हिला जातीवरून छळत असतील असे मला वाटतच नव्हते. दिलीप तर उत्तम वागताना दिसत होता त्या दरम्यानच्या काळात!

आणि एक दिवस, म्हणजे एके रात्री दिड वाजता माझ्या बेडरूममधला लाईट अचानक लागला. घाईघाईत मी 'ऑल क्लीअर' करायचे विसरून गेलेलो होतो. एम बी ए ची परिक्षा असल्याने बाहेरच्या खोलीत अभ्यास करत असलेल्या यशःश्रीने माझा फोन वाजल्यावर आत येऊन सरळ तो हातात घेऊन एसेमेस वाचला. तो होता तिसर्‍याच मित्राचा! पण त्याखाली अनिताचे सहा एसेमेस आणि माझी चार उत्तरे होती.

ती रात्र आणि पुढचे दोन दिवस भयानक गेले. दोन्ही दिवसात मी अनिताला इतकेच सांगितले की एकही मेसेज करू नकोस. ती तिकडे हादरलेली असणार याची मला कल्पना होती.

काळ गेल्यावर ही जरा शांत झाली तर दिलीपचा मला फोन आला.

"काही नाही.. हिच्या मोबाईलच्या बिलात तुमचे खूप एसेमे आणि कॉल दिसले.. आपली रिलेशन्स चांगली आहेत... त्यामुळे मला काहीच वाटले नाही... पण हीच रडतीय.. तेव्हा तुम्ही हिच्याशी टचमध्ये राहा.. माझ्या मनात असं कसं काही येईल हो?"

गांड फाटणे म्हणजे काय ते मला समजले. नेमके याच काळात त्याने तिचे बिल बघणे हे तर फारच दुर्दैवी ठरले माझ्यासाठी!

मी सरळ हिला म्हणालो... 'मला मदत कर'! सगळे ऐकून घेतल्यावर तिने अनिताला फोन करून सांगितले.

"अगं मला माहितीय भूषण तुला एसेमेस करतो ते.. मला त्यात काही नाही वाटत... "

दुसर्‍या मिनिटाला मला दिलीपचा फोन...

"अहो हे कसलं मिसअन्डरस्टँडिंग झालंय?? .. मी कधी असा विचार करेन का? .. ही उगाच टेन्शन घेतीय..."

माझ्यासारख्या एका थर्डक्लास माणसाला पुन्हा थोबाड वर करून जगण्याची संधी मिळाली.

थेंबाप्रमाणे क्षुद्र मी अन तू समुद्रासारखी
मोडायला विश्वास मी नात्यास आंदण मानतो

-'बेफिकीर'!

(नांवे काल्पनिक - जातीचा उल्लेख केवळ घटनेपुरता, बाकी काहीही सिग्निफिकन्स अभिप्रेत नाहीच)

==============================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217

एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399

मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963

जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो - http://www.maayboli.com/node/31177

ठरशीलही निष्पाप तू, म्हणतीलही पापी मला
पण कृत्य जे केलेस... मी त्यालाच शोषण मानतो - http://www.maayboli.com/node/31976

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो - http://www.maayboli.com/node/32642

शिखरावरी आरंभुनी गाठेल तळ... कळते तरी
माझ्या तुझ्या नात्यास मी अनिवार्य घसरण मानतो - http://www.maayboli.com/node/33399

====================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

वो दिन हुवा हुवे के पसीना गुलाल था'

वो दिन हवा हुए जब पसीना गुलाब था.. असं म्हणायचं होतं का???

छान आहे ..

धन्यवाद वर्षू, हवा हुवे के असे आहे, हवा हुवे जब असे नाही Happy

मी हुवा हुवे लिहिले आहे ते टायपो Happy

धन्यवाद सर्वांचे

अस्वस्थ करणारे लेखन.

खूप काही लिहायचे होते ते लिहून खोडले आहे. कधीतरी आपली इच्छा असली आणि आपली परवानगी मिळाली तर प्रत्यक्ष भेटीत ह्या विषयावर चर्चा करायची इच्छा बाळगून आहे(जी कदाचित पूर्णच होणार नाही ह्याचीही कल्पना आहे)

ही खरी वाटते!!! मनापासुन लिहिलं आहे. तुम्ही खरच इतके प्रांजळ आहात की ...? तुमच्या बायकोची कमाल आहे.

एकदा वाटतं सरळ एखादं अनाथ पोरगं उचलून घरात आणावं आणि त्याच्या संगोपनात वेळ घालवावा. पण असे मूल हिला पटत नाही आणि हिला पटत नाही अशी निदान एक तरी गोष्ट आपण केली नाही याचे समाधान मी तिला देत बसतो. >>>>

ही ओळ खुप काही खरं बोलुन गेली. खरी वेदना. इकडे कथालेखक मनोगत लिहित आहे असे वाटते. खरी वेदना!!

"पायल कोणत्या प्रकारात मोडते? दिवस गेल्यावर आणि संसार महत्वाचा वाटल्यानंतर शांतपणे सगळे संपवून टाकले. स्वार्थी?

बेफिकिर

" mag kay karayla hav hot tine tichya navryala jar samjal asat tar ticha aani tichya mulancha sambhal tumhi kela asta ka,??"

पण स्त्री हा प्रकार कायम शोषितांमध्ये गणणे चूक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. >> अरे वा!! ( आश्चर्यचकीत बाहुली ) सर्व बायकांची कीव पासून हे वाक्य , गंमत आहे. Happy

तुमची बायको स्त्रियांच्या कोणत्या 'प्रकारात' मोडते बरे. एव्हढ्या तज्ञ माणसाच्या सहवासात राहून, त्याचे प्रयोग पाहूनही त्यांनी काही खास ज्ञानकण वेचलेले दिसत नाहीत. Happy

.... ह्म्म्म बाकी बेफिकीर फॅन्स लोकहो तुम्ही चिडू नका हं - . या लेखाच्या शिर्षकाचा अर्थ न उलगडल्याने चुकून वाचले आत येऊन . परत नाही येणार हं तुमच्या रंगाचा बेरंग करायला.

या जगात पुरुषाना पुरुषांपासून दिवस जात असते तर विवाहबाह्य संबंधांचा प्रश्नच आला नसता कारण विवाह केलेच नसते कोणी. >>

जरा अभ्यास कमी पडतोय हो तज्ञ. गेली कीत्येक वर्ष अमेरिकेतले गे पुरुष आणि सध्या भारतातले गे देखिल आम्हाला विवाहाची परवानगी द्या म्हणून भांडतायेत. अमेरिकेत काही राज्यात गेंनी विवाह केलेले देखिल आहेत. नंतर त्यातही विबास आणि घटस्फोटाची मागणी हे प्रकार दिसून येत आहेत.

एकाच स्त्रीमध्ये आई, बहिण, मुलगी, मैत्रीण, पत्नी, सून, सासू, व वेश्या होण्याची क्षमता असते.
प्रत्येक घटकाचे कॉम्बिनेशन कमीजास्त असते इतकेच प्रत्येक स्त्रीमधले.>>
स्पीचलेस. लोकांमधले अध्यात्माचे अमुक् एक टक्के प्रमाण वाचले होते , अता प्रत्येक बाईतले वेश्येचे प्रमाण !!
जबरा!! तज्ञ खरोखरच लोकांच्या ज्ञानात अनमोल भर टाकत आहेत. तज्ञांचा व्यासंग आणि हे उच्च कोटीचे विश्लेषण बघून मन अगदी भरून आले.

भंजाळून गेले डोके वाचता वाचता..खरे खोटे फारसे महत्वाचे नाही. पण हे इतकं वेगळच असं कसं लिहिता हो तुम्ही बेफि!? I am truly amazed!