डाळ तांदूळ खिचडी

Submitted by तृप्ती आवटी on 9 March, 2012 - 20:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, २ पाकळ्या लसूण, ३-४ चमचे नारळाचा चव, १ हिरवी मिरची, १ मोठा चमचा (टे स्पू) लोणकडे तूप, मीठ, कोथिंबीर

फोडणीसाठी- तेल, हळ्द, हिंग, जिरे.

क्रमवार पाककृती: 

डाळ आणी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे. ५-६ वाट्या पाणी आधणास ठेवावे. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावे. हिंग- हळद-मोहरीची फोडणी करावी. मोहरी तडतडली की जिरं घालावं. त्यात हिरवी मिरची आणि लसूण घालावा. लसूण जरा फुलला की डाळ-तांदूळ, नारळाचा चव घालून छान परतून घ्यावे. वरुन गरम झालेले पाणी, चवीप्रमाणे मीठ घालून नीट हलवुन घ्यावे.

खिचडी जरा शिजत आली की तूप घालून नीट हलवुन घ्यावे. सात्विक चव येते खिचडीला. ही खिचडी तशी मऊसर असते तेव्हा लागल्यास थोडे आणखी गरम पाणी घालावे.

भाजलेले पापड, बारक्या कैर्‍यांचं ताजं लोणचं, ही खिचडी, तिखट-मीठ लावलेल्या काकडीच्या किंवा कैरीच्या फोडी असा सगळा सरंजाम गच्चीवर न्यावा. गार वार्‍याच्या झुळुकी घेत ह्या सगळ्याचा आस्वाद घ्यावा. कॉलोनीतुन चक्कर मारणारी मैत्रिण दिसल्यास तिला पण जेवण्यासाठी हाक मारावी Happy

वाढणी/प्रमाण: 
२ साधारण खाणारी मोठी माणसे
अधिक टिपा: 

_ लागणारा वेळ खिचडी कढईत चढवण्यापर्यंतचा आहे. खिचडी शिजायला थोडा आणखी वेळ लागेल
_ जरा आंबट कैरीची फोड किसून घातली तर वेगळाच स्वाद येतो खिचडीस
_ खाणार्‍यास मिरची चालणार असेल तर हि मी, लसूण, नारळ असं भरड वाटून घातलं तरी चालेल
_ ह्या खिचडीत दुसरा मसाला घालायची गरज नाही. अगदी वाटलच तर अर्धा चमचा गरम मसाला घालावा
_ इथे डाळ तांदूळ खिचडीच्या आणखी काही कृती आहेत

माहितीचा स्रोत: 
बहिणीच्या मैत्रिणीची आई (बहुतेक)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लगो, खिचडीत मूगडाळ, तांदूळ घालतात. फार मसालेदार नसते. चवीला काळा मसाला असतो फक्त.
मसालेभातात तोंडली, काजू असतात. मसाल्यांमध्ये अख्ख्या गरम मसाल्याबरोबरीने सुकं खोबरं, धणे, जिरं, लाल मिरच्या वाटून. मसालेभात हा मोकळा असतो तर खिचडी जरा गिच्चं चांगली वाटते.

अन्नपुर्णा - सौ कमल ओगले - खिचडीत पाणी घातल्यानंतर सुख खोबर, धने, जिरे थोड्याश्या तेलात तळुन ते दळुन आधीच तयार केलेला मसाला घातल्यास उत्तम चव येते ( हा अनुभव आहे. ) हा मसाला फार तर दोन वेळा वापरता येईल इतकाच बनवावा. ताजा मसाला चांगली चव देतो हे सांगणे नको.

मस्त पावसाळी हवेत अशी गरमागरम खिचडी आयती खायला मिळणे हे स्वर्गसुख!

होस्टेली खिचडी नामक एक प्रकार मी होस्टेलात असताना करायचे. त्यात तांदूळ व डाळ (मूग / छिलका मूग, तूर इ.) आधी किमान तासभर भिजवून घ्यायची. त्यातच धणे जिरे पूड, मसाला (गोडा / काळा / वेळप्रसंगी मॅगी मसालाही वापरलाय), किसलेले आले किंवा आल्याचे छोटे तुकडे, मीठ, तिखट घालून ते नीट मिक्स करून घ्यायचे. तांदळाला व डाळीला मसाला लागला पाहिजे. जर खिचडीत कोणती भाजी घालणार असू तर तीही तेव्हाच घालायची. (चिरलेला कांदा, बटाटा, फ्लॉवर, घेवडा, मटार इ. आवडीप्रमाणे). दहा वीस मिनिटे तरी मुरू द्यायचे. होस्टेलातल्या हॉटप्लेटवर नेहमीचे यशस्वी पातेले चढवायचे. त्यात साजूक तूप, जिरे, मोहरी, हळदीची फोडणी करून डाळ-तांदूळ-भाज्या-मसाले मिश्रण भरपूर - खरपूस परतायचे. साधारण दुप्पट ते तिप्पट पाणी घालायचे व पाण्याला उकळी आली की एक-दोनदा मिश्रण सारखे करून झाकण ठेवायचे. अधून मधून चेक करत राहायचे. खिचडी होत आली की त्यात चमचाभर साजूक तूप घालायचे. वरून कोथिंबीर पेरायची. सोबत घरून नेलेले कैरीचे किंवा लिंबाचे लोणचे, खारातली मिरची किंवा लसणाची चटणी. टोमॅटो-काकडीचे काप. अहाहा! ती गरमागरम खिचडी बघता बघता चट्टामट्टा व्हायची!

Pages