डाळ तांदूळ खिचडी

Submitted by तृप्ती आवटी on 9 March, 2012 - 20:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, २ पाकळ्या लसूण, ३-४ चमचे नारळाचा चव, १ हिरवी मिरची, १ मोठा चमचा (टे स्पू) लोणकडे तूप, मीठ, कोथिंबीर

फोडणीसाठी- तेल, हळ्द, हिंग, जिरे.

क्रमवार पाककृती: 

डाळ आणी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे. ५-६ वाट्या पाणी आधणास ठेवावे. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावे. हिंग- हळद-मोहरीची फोडणी करावी. मोहरी तडतडली की जिरं घालावं. त्यात हिरवी मिरची आणि लसूण घालावा. लसूण जरा फुलला की डाळ-तांदूळ, नारळाचा चव घालून छान परतून घ्यावे. वरुन गरम झालेले पाणी, चवीप्रमाणे मीठ घालून नीट हलवुन घ्यावे.

खिचडी जरा शिजत आली की तूप घालून नीट हलवुन घ्यावे. सात्विक चव येते खिचडीला. ही खिचडी तशी मऊसर असते तेव्हा लागल्यास थोडे आणखी गरम पाणी घालावे.

भाजलेले पापड, बारक्या कैर्‍यांचं ताजं लोणचं, ही खिचडी, तिखट-मीठ लावलेल्या काकडीच्या किंवा कैरीच्या फोडी असा सगळा सरंजाम गच्चीवर न्यावा. गार वार्‍याच्या झुळुकी घेत ह्या सगळ्याचा आस्वाद घ्यावा. कॉलोनीतुन चक्कर मारणारी मैत्रिण दिसल्यास तिला पण जेवण्यासाठी हाक मारावी Happy

वाढणी/प्रमाण: 
२ साधारण खाणारी मोठी माणसे
अधिक टिपा: 

_ लागणारा वेळ खिचडी कढईत चढवण्यापर्यंतचा आहे. खिचडी शिजायला थोडा आणखी वेळ लागेल
_ जरा आंबट कैरीची फोड किसून घातली तर वेगळाच स्वाद येतो खिचडीस
_ खाणार्‍यास मिरची चालणार असेल तर हि मी, लसूण, नारळ असं भरड वाटून घातलं तरी चालेल
_ ह्या खिचडीत दुसरा मसाला घालायची गरज नाही. अगदी वाटलच तर अर्धा चमचा गरम मसाला घालावा
_ इथे डाळ तांदूळ खिचडीच्या आणखी काही कृती आहेत

माहितीचा स्रोत: 
बहिणीच्या मैत्रिणीची आई (बहुतेक)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळं रहायच म्हणजे एकत्र कुटुंबापासून का? Happy

काल हे खिचडी कौतुक वाचून अगदी रहावलं नाही. केलीच खिचडी. सिंडे तुझ्या कृतीतील गोष्टी हाताशी नव्हत्या इथे, त्यामुळे जे होते ते घातले. घरून येताना तूप आणलं होतं ते विसरुनच गेले होते. ते आठवलं आणि वजनाची पर्वा न करता ओतलं. Happy

इराला मी काय काय भाज्या आलटुनपालटुन घालून मऊ खिचडी देत असे, भरपुर तूप टाकुन. खिचडी भरवताना सुवास पसरला की घर अचानक घर असल्यासारखे वाटे. बाळांचे म्हणून जे काय वास असतात त्यात आता तो खिचडीचा वास स्मृतीत घुसुन बसला आहे.

सिंडे आजच दुपारी लंचला खिचडी केली. माझ्या लेकीला कधीही आवडत नाही पण आज
मिटक्या मारत लंच संपवले.माझी दुपार शांत जातेय Happy थँक यू.

सोपी असल्यामुळे, मालकांनी केलेली रविवारी. नेहमी मसाला घालून खाल्लेली. त्यामुळ वेगळी आणि छान वाटली एकदम. मुलीला सुद्धा आवडली. फ्रोजन भाज्यांच पॅकेट घातल खरं यात.

मी या खिचडीसाठी खास "कैरी" आणली. घराला गच्ची नाही त्यामुळ मैत्रिणीला हाक मारायचे तेवढे राहिले. सिंडी माफ कर. Proud

सात्वीक खाना म्हणजे लसुण आणि कांदा विरहित असच राजस्थान , UP कडे वगैर समजतात. मैत्रिणीच्या घरात बघुन माहिती. खखोदेजा. पण आपण मराठी लोक सात्वीक म्हणजे बिन मसाल्याच/ सपक/साध असा घेतो.

मी नेहमी मसाला घालून करते. कैरी घातली नाही कधी. आता घालून करेन.

माझ्या साठी मला आवडतं ते सात्विक>>>> सेम हिअर Happy

इराला मी काय काय भाज्या आलटुनपालटुन घालून मऊ खिचडी देत असे, भरपुर तूप टाकुन. खिचडी भरवताना सुवास पसरला की घर अचानक घर असल्यासारखे वाटे. बाळांचे म्हणून जे काय वास असतात त्यात आता तो खिचडीचा वास स्मृतीत घुसुन बसला आहे.>>>> आईशप्पथ!! अगदी खरं !!

"चक्कर मारणारी मैत्रिण दिसल्यास तिला पण जेवण्यासाठी हाक माराव""
आई गं.. सिंडी, किती गोड!!!!
मीही तुरीच्या डाळीची खिचडी अशीच करते..थोडे हिरवे मटर घालून.. Happy

काल केली होती, पण माफ करा, मला तर काही फरक जाणवला नाही नॉरमल खि. पेक्षा Uhoh
मुगाच्या एवजी तूर घातली होती, म्हणुन असेल कदचित.

प्रा. विसूभाऊ बापट त्यांच्या जगप्रसिद्ध 'कुटुंब रंगलंय काव्यात' या एकपात्री प्रयोगात 'ऊन ऊन खिचडीवर साजूक तूप.....' ही रचना फारच (जरा जास्तच Wink ) रंगवून रंगवून सादर करत असत. ती रचना त्यांची स्वतःची आहे की अजून कोणाची हे आता आठवत नाहीये. पण ती रचना ऐकताना मात्र पोटात भूक खवळून उठत असे.

ह्म्म.. ओ खोबरे घालून कधी केली नाही. लसूण. सुक्या लाल मिरच्या वगैरे घालून कायम करते. आता करून बघेन. सुनिधीमुळे मी हल्ली कशातच हि.मिरची घालत नाही. Sad

कधीतरी तुपाच्या फोडणीमधे लवंग दालचिनी तमालपत्र घालून मग खिचडी करते, ती एकदम पळीवाढी असते. जास्त तिखटप्ण होत नाही आणि मसालेदार पण होत नाही.

मी आतापर्यंत बेस्ट खाल्लेली खिचडी पावसच्या स्वामी स्वरूपानंद मंदिरातली.

मी आतापर्यंत बेस्ट खाल्लेली खिचडी पावसच्या स्वामी स्वरूपानंद मंदिरातली.<<< अनुमोदन. बेस्टेस्ट चव अत्तापर्यंत.
जुन्या मा. बो. मधे श्यामलीची रेसिपी आहे ती पण अत्यंत रुचकर होते.
लसूण घालून ही रेसिपी ट्राय करेन नक्की. जोडीला टोमॅटोचं सार असलं की स्वर्ग.

काल केली होती ही खिचडी. मस्त झाली होती! नारळाचा चव नसल्याने डेझिकेटेड कोकोनट घालुन केली होती (तरी) मस्त झाली होती. नारळाचा चव घालुन तर अफाट लागत असेल!

मी पण काल केली अशी खिचडी. छान झाली. म्हटलं जरा सात्विक जेवण जेवू. तेव्हड्यात बिल्डींग मधल्या काकांनी ''शिंपले विथ करी'' आणून दिली! मग काय?? सात्विक खिचडी मसालेदार झालीच!
आयुष्यात प्रथम खाल्लं शिंपल्यातलं. यम्मी होतं.

साध्या मुडाखि ची काय रेसिपी म्हणून बघितले नाही पण मधे जरा टी आर पी वाढल्याने काल करून पाहिली....मस्त झाली होती... मऊ खिचडी आणि तूप....अप्रतीम लागत होते..धन्यवाद सिड्रेला...

मी पण रविवारी रात्री केली अशी खिचडी... मी थोडे फ्रोझन कॉर्न आणि मटार पण घातले... फोडणीत नारळाचा चव घालायला विसरल्यामुळे वरतुन ताजं खोबरं कोथिंबीर घातलं Happy मस्त मऊ मऊ खिचडी झाली होती. सोबत पोह्याचे पापड आणि कैरी+मिरची लोणचे... मजा आ गया Happy

धन्स सिंडे Happy

सिंडे, तुझे म्हणणे बरोबर आहे. पहिल्यांदा कुठलीही भाजी न घालता केली ( फक्त कोथिंबीर वरुन ) तर फार छान लागली. दुसर्‍यांदा गाजर, मटार घालून केली तर तेवढी छान चव नाही आली. पुढच्यावेळेपासून अगदी वरचीच पद्धत वापरणार ( बारकासा बदल म्हणजे मिरच्यांचे मोठे तुकडे घातले तिखट सोसत नाही म्हणून. )

सिंडे छान रेसिपी.. अजुन एक प्रकार करतात खिचडीचा
फोडणीव्यतिरिक्त सर्व साहित्य कुकरात शिजवावं . दोनच शिट्या करा म्हंजे तांदुळ नीत शिजतील आणि डाळ थोडी कमी शिजेल. मग कुकरच झाकण निवेपर्यंत ग्यास बंद ठेवावा.बाकीची डाळ वाफेवरच छान शिजते.
वाढायच्या अगोदर खिचडे थोडी मोकळी करायची आणि वरुन साजुक तुप, जिरं, मोहोरी, हिंग, बेडगी लाल मिरच्यांची(तडक्याला वापरतात त्या)फोडणी द्यायची, खिचडी एकसारखी करुन घ्यायची .
पटकन होते, तेल कमी, इतर भाज्यही वापरुन करता येइल. लाल मिरची एवजी गोल काश्मीरी लाल मिरची वापरली तर चव लगेच वेगळी लागते.

ही अशीच खिचडी करते आताशा. अतिशय चवदार होते.
सांगायचेच रहात होते. धन्यवाद सिंडरेला.

नेहेमीच्या मुडाखिला हिने आणि नेहेमीच्या पिवळ्या मूगडाळीला सालासकटच्या हिरव्या मूगडाळीने रिप्लेस केले आहे. सालासकट असलेली मूगडाळ जास्त चविष्ट आहे. खिचडीत लगेच फरक जाणवतो. त्याची आमटीही मस्त होते चवीला.

आज वाचली. मस्तच वाटतीये कृती. नक्की करणार. त्यापुर्वी अजुन कोणी केली तर गच्चीवर जा व इथे एक फोन करा. चक्कर मारायला लगेच बाहेर पडणेत येईल. Proud

सिंडे, आज केलीय ही खिचडी. बाहेर पावसाळी हवा आहे आणि खोबरं-तूप घातलेली ही खिचडी खरंच इतकी सात्विक वाटतेय ना खायला. पोपटी मिरच्या मोठे तुकडे करुन घातल्या की अगदी हलका मिरचीचा स्वाद लागतो तोही मानवतो अगदी Happy
अशा पद्धतीची खिचडी एकही भाजी न घालता आणि घोटून घेऊनच छान लागते. खूप धन्यवाद परत एकदा इतक्या सोप्या आणि चविष्ट कृतीबद्दल !

Pages