मर्‍हाटी बोलु कवतुके

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 13:54

marahati_kavatuk_bw.jpg

आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्‍या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.

चला तर मग, तयारी करा आपापल्या मनाच्या कप्प्यात हळुवारपणे जपलेल्या बोलीभाषेला मिरवण्याची!

आपापल्या भाषेतली ही गंमत आपण अशी अनुभवणार आहोत-
१. आम्ही इथे काही काल्पनिक प्रसंग संक्षिप्तपणे दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला आवडेल तो प्रसंग निवडून तुमच्या बोलीभाषेत खुलवायचा आहे.
२. प्रसंग खुलवताना त्या भाषेचा लहेजा, त्या भाषेत वापरले जाणारे विशिष्ट शब्द खुल्या दिलाने वापरण्यात यावेत. त्या त्या गावाच्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन त्या संवादांतून व्हायला हवे.
३. एका आयडीने एकापेक्षा जास्त प्रसंगावर, एकापेक्षा अधिक बोलीभाषांमध्ये लिहील्यास हरकत नाही.
४. प्रसंग लिहीताना प्रसंगाचा क्रमांक, तुमच्या गावाचे आणि बोलीभाषेचे खास नाव असल्यास लिहायला विसरु नका.

* * * * * * * * * * * * * * * * *

प्रसंग १.
आज तुमच्या घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूवरांकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे. हे सगळे उत्साही मंगल वातावरण तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून आमच्यापुढे साकार करायचे आहे.

प्रसंग २.
कामानिमित्ताने/ शिक्षणानिमित्ताने/ लग्नानंतर तुम्ही दुसर्‍या देशी/गावी गेलात. खूप वर्ष उलटली. तुम्ही तुमच्या व्यापात रमून गेलात. अवचित तुम्हाला तुमची जुनी मैत्रिण वा जुना मित्र भेटतो. मग शाळेतील, कॉलेजातील, कॉलनीतील गप्पांना रंग चढतो.जुन्या मैत्रीच्या पुनर्भेटीचा हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतील वळणात लिहा.

प्रसंग ३.
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. तुमचा मोबाईल खाली पडतो आणि तो कुणीतरी उचलून त्याचाच मोबाईल आहे असे सांगतो. तुमचे नि त्याचे तिथे भांडण जुंपते. गोष्ट अगदी हमरीतुमरीवर येते. हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून लिहा.

करायची सुरुवात?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसंग- तीन, गाव- उत्तर पुणे जिल्हा(खेड,आंबेगाव्,जुन्नर;शिरुरचा पश्चिम भाग)

ह्या बोरीबंद्रावं येऊन गाडी पकडीपोत इथंच गडाद पडलं. आता कव्हा सरवोदेला पोहोसायचा आन कव्हाशीक जीपडं घावायचं.घराला पोचस्तव्हर तं तांबडं फुटंन.जितराबांच्या धार कव्हाशीक निघायच्या आन कव्हाशीक दुधं घालायची.

लोकलमधल्या शीटावं बस्ताबस्त्ता आस्लं काय्काय मनात दाटत व्हतं.समद्या सकाळपुन निर्‍हा पिट्टा पल्डा व्हता.

ह्या मंबयीत यायाचं म्हयी निस्ता डोक्याचा गोयंदा व्हतोय. मोर्‍हल्या दिसाच्या कामाची पार वाट लागऽती. आन तिधं कोरटातबि ती वकीलं काय सुदरून देती नाय.कव्हा केस निकालावं निघंऽन आसं झालंय आत्ता.निर्‍ही टायमाची खोटी न पैशाचा मुडदा.ह्याच्यापरास हाती काह्यीसुधील नाय.

यळंमाळं काह्यी खायाला बी झालं न्हव्हतं.
’चाट्कनी दोन घास खावून येतो’
वकीलाला म्हंगालो तं त्ये गाबडीचं आयकत आस्तंऽय का?

’क्येस कव्हाबी बोरडावं येऊ शक्ती’ म्हून सारखंच भेवडीत व्हता.

येळभर पोटात दाना न्हाय.पार तव्हारी याया लाग्लि .आता सरवोदेला गेल्यावं जीपडं सुटसत्व्हर येखांदोन रोट्या न आंडाकरी हादाडल्याबिगार व्हायाचं नाय.आन वर एखांदी म्याक्डॉल नाह्यतं बीपीची कॉटर लावली तं एकच लंबर काम व्हईन.पर नकं तेच्यायला.सण्कष्टी चतुर्थीचीबी प्येला म्हनून मंडळी लयीच औदान करीन उद्याच्याला.आख्ख्या दिवसाची आय्झेड व्हऊन जाती तिच्या बडबडीनी. नवरा प्येला म्हंगालं का तिच्याइक्त्या घान तोंडाची बाई न्हायी गवसायची कुढंयबी.
च्यायला तिलायबी केंधूळ फोन करायचा व्हता. पार भुस्काट झालंय मस्ताकाचं. पह्यला फोन लावाय पायशेन. पॉर्‍हसुदील वाट पघत आस्तीन ना.येळभर टायीमच नाय घावला त्येला म्या तरी काय कर्ण्हार.पॉर्‍हान्नापन काह्यतरी कापडंचॉपडं नाह्यतं निदान खायाला तरी काही घ्ययाला पायशेन व्हतं.ह्या वकिलान्च्या लफड्यात तेसुधील राहूनच ग्यालं च्यायला.

आता फोनवं तरी त्यान्च्याबराबर बोलावा असा इचार करीत पँडीच्या खिशात हात घातला तं काय. आत्त्यायला, मोबायीलचं डबडं कुढं घावातंय.दुसर्‍या खिशात ह्ये का काय म्हनून तिधं हात घालितो तं तिधंय काय हे? ..घंटा?? बंडीच्या खिशात्बी कुढं गवसातंय ते डबडं. आयला. झालंक्काय याचंबी वाटुळं. मागल्या आखिदीला तं घ्येतला व्हता.जुनं डबडं वावरात रातच्या वक्ती कांद्याला बारं द्येतानी कुढं उलाथलं कळालंबी नाय.आत्ता ह्येयबी डबडं ग्यालं तं आटापलंच म्हंगायचं न काय.

पर एवढ्यात काय पघतोऽऽ... हा सामनीच्या शीटाव्हर्ला बांडा खाली वाकूवाकू काह्यीतरी चापशीत होता.मी पघऽतोय, तव्हर तं बांड्यानी मोबाईल उचाल्लासुधील. आत्याह्यला मिव्हं. नदरंसामनी वाटमारी. लयीच बाराबोड्याचं ब्याणं दिसातयं कनी. आत्ता चिप राहून चालातं काय. ’ओ भाऊ वो मेरा फोन का चोरी किव कर्ता है रे तू. नीच्ये पडा व्हता वो मेरेवाला फोन हये. गपचित रिटन करनेका,नाह्यतं इद्दरच र्‍हाडा कर्ता की नाय मय द्येक बे तू!’ म्या त्याच्यावं डाफार्लो.

’च्यल ये, तेरा कायका फोन रे? ह्ये तं माव्हाच फोन हे.उगं डोक्याची कल्हयी नाय पायशेन पग.' त्ये बी बांडगुळ माह्यावं आराल्डं.

च्यायला आपलाच दिसाऽऽतंय बाण्ड्गुळ... आसून्दे मरुन्दे. मोबायील चोरितो म्हन्जी काय.
'बापाची पेंड ह्ये काय रं? इक्डं आन पह्यला मोबायील. मोबायील माव्हा ह्ये सांगऽऽतोय पग तुला गैबान्या. डोक्यात शिरातय ना बॉल्लिलं. का दिव येक ठुण उल्ट्या हाताची मुस्काडावं .. सुक्काळीच्या. पानीबी मागाय्च्या लाय्कीचा र्‍हायचा न्हाईस पग.' बोलाय लागलो मंग मी कोन्च्याच बापाचा न्हाय.
''गप ये किडंपड्या. ईजार पिवळी करुन घ्याय्ची हावस सुट्ली न क्काय तुला भूसनाळ्या.जाव्दें जाव्दें म्हणितोय तं ह्ये तं लयीच उगीरवानी बोलातंय.'' सोंड्या काय बोलाय कमी करित न्हव्हता.

आपल्याच्यानि हा काय आघत नाय आत्ता. माव्ही तं पार अक्कालच गुल व्हया लाग्ली न काय. आत्ता चिप बसनं म्हयी गोट्या कपाळात जायची बारी.
"ये यड्याभोकाच्या नाय तुला इधं उल्टा टांगुन मिर्चीच्या धुर्‍या दिल्या ना,तं म्याबी येकाच बापाचा न्हाय."

तरी ते आराल्डंच "ह्ये पग तुला लाश्टंच सांगतो. ह्यो मोबायील माव्हा हे. म्हन्जी म्हाव्हाच ह्ये.म्होरं जर का बोल्लास ह्येंबाड्या आत्ता तं समदं बत्तीस्च्या बत्तीस नरढ्यात ग्येलंच म्हून पग तुपलं,आन त्येय बि येकाच फैटीत. "

"आरं नकं नकं. आसं कुढं करीत आस्त्यात का राव." म्या आप्ला हाळुस रिवस ग्येर टाखुन ठुला.

तं जखाळं काय म्हणितंय.."कस्सा बराबर आण्हला का ल्हायनीवं."

"न्हाय त्ये आसं ह्ये पग. तु मस समदं दात नरढ्यात घालशिन. पर त्ये काल्च्या बाजार्ला मंडळीनी नयीनच्या नयीन कोल्गेट्ची टूप आनुन ठुली, ती काय माव्ह्या ढुंगावं घसरित बसु का काय रोज सकाळ्च्याला. आरं शंबर रुपय जातिन ना माव्हं निस्कारन वायाला"
म्या ह्ये बोलाय्ची खोटी, समदा रागबीग ईसरुन त्ये बांडं लागलं कनि, दाताड काढाय मोट्मोठ्यानि.
मेंदुत जरा कमिऽच दिसातंय.

काल्हडा नं भावड्यानि मोबायील खिशातुन, आन जव्हा मला दाखावला.

"माउली माउली येवढया बारिला चुकी झाली पगा माव्ही. माफी करा राव. समदी गडबडच झाली राव्. यळंमाळं निस्तं उल्टंच व्हतय पगा आज्. लयी वायीटवंगाळ बोल्लो राव तुम्हाला. त्वांड झोडाय्चि बारी आली पगा माह्यावं."
मोबायील आप्ला नाह्यिच म्हंगाल्यावं आता दुसरं कर्तो तरी काय म्या बाबुराव.

त्यान्हीबी माव्ही समजुत घातली,"पाव्हणं चालायचं राव. जाऊंदया वले. व्हती मिश्टिक येखाण्द्या टाय्माला.पह्यला तुमचा मोबायील घावतोय का नाय ते पगा"

आन्मंग आत्ताशि माव्ही टुप लागली. "आवं कोरटात वकिलानि त्ये डबडं सायलिन्स करुन पिश्वितच ठु म्हनुन सांगातलं व्हतं, न्हायतं त्ये जजडं फायीन मारितंय म्हनुन हाग्या दम धिल्ता पगा. हाए वले पिश्वितच ह्ये त्ये डबडं."

त्ये इच्राय लागलं "कोरटात आल्थं काय तुम्ही?कुढुल्ल्लं ह्येत तुम्ही? "

"वाड्याचा ह्ये पगा मी. तिक्डं भिमाशंक्रापं ह्ये आम्चं वाडं." म्या सांगातलं.

"आन मी बी घोड्याचा ह्ये ना राव. मला वाटत व्हतंच ..सोयरं आपलंच दिसातंय म्हनुन. कापडं न बॉलणं श्येमच ह्ये न काय." त्ये म्हंगालं .

''आत्याह्य्ला मजाच झाली न क्काय समदीच.तुम्ही मंबयीत काय करत्या? सरव्हीस ह्ये का काय?" म्या म्होरं चालु ठुलं .

त्ये,''नाह्यी वो वाशिला मारक्येटला आल्थो.बट्ट्याचि पट्टि न्ह्यायचि पल्डि व्हती. लयी दी झाल्तं.तव्हा ती घित्लि न मण्ग आत्ता जरा लाल्बागला साडूपं जावून आलो जराशिक.त्येच्या पोरिच्या सोयरिकीचि गडबड चाल्लीय जरा,तव्हा गेल्थो जरा बोल्चाली कराया.''
तुम्ही कोरटात काह्याला. काय वाटपाचा लफ्डा ह्ये का काय? आपल्याभोति ती लयीच _टंउपट आस्ती पगा."
"न्हाय वो. पुनरवसनाचं रखाडलंय ना आमचं ईस वर्सापून्.तव्हा मारितोय चक्रा न काय ह्ये.पार कम्रंचा काटा ढील्ला पल्डा पगा ह्येल्पाटं घालुघालु.काम सुचानि का धाम सुचानि ह्या क्येशिपाई" मलाय्बी मन हाल्कं कराय लयी दी झाल्तं कोनच घावलं न्हव्हतं.

"चालाय्चंच वले.क्यालं तं पाय्शेनंच."त्यांन्हैबी माला आंजार्लं.

''त्ये जावून्दे वले टिप्रित.गाय छाप तं आसनंच ना तुमच्यापं.द्या यखांदा इडा न काय ह्ये.कोरटात जाय्चं म्हयी लयीच मुस्क्या आवळुन घ्याय्ची धन ह्ये न काय्.मोबायील नका न तम्बाखु खाउन थुकु नका.बोलु नका न खोलु नका.आन मंग कराय्चं तरी काय आम्ह्या तिधं जाऊन्.काय भिताडाला धडका घ्यायाच्या क्काय?'' म्हायी गाडी तं ढाळानि शम्भ्रानि सुटलि नं काय.

कोपरितुन पुडि काढित तो म्हंगाला,''ही घ्या चुना न पुडि.बाकि बिजंचि जत्रा कशि काय झालि औन्दा?मला त काय जाया झालंच नाय पगा बिजलां.''

''आवं धरणात गाव उठल्यापुन श्योच गेला ना समदा जत्रंचा.उगंच आप्लि द्येवासाठि कराय्चि नं काय"म्या म्हंगालो.

"फुर्मोळ तं रेटला आसंन ना दाबुन?"त्यान्हं इचार्लं.

"त्ये सोडितो का राव्.म्येथिचि भाजि,आंबिल, मलिदा नं घुगर्‍या. चार दि निस्ता धुराळा पग्.यळंमाळं रेमटित व्हतो." फुर्मोळांचं तं आपल्याला आझुकय्बि लयी आप्रुक.

"म्होर्ल्या बिजंला या आमच्यापं फुर्मोळाला" म्या आवातनं दिउन ठुलं.

''नक्किच यानं कर्तो पगा बिजंला.'' त्यान्हैबी हामि धिलि. "सोय्रं, तुम्हियबि या कनि आमच्यापं येखान्दिशि.घर्च्याच कोम्ड्या ह्येत्.धसरु दोन्तिन आलं तुम्हि तं,पर वशाट चालातं नं तुम्हालां? नाह्यंतं शेंगुळि मास्वड्याच्या ब्येत उड्वुन दिउ तुमच्यासाठि. "

वशाट म्हंगाल्याव तं आप्ल्या मुखात तं लाळंचा पूरच पूर सुटाया लागतोय निर्‍हा."चालातं म्हयी काय पळातंय. बोंब्यील सुकाट आन्डी चिकाण मटान मछ्छि समदंच हानितो नं काय्ह्ये."

"मण्ग तं झालिच पगा बारि येत्या आखाडात आप्ल्या घराला."तोयबि मला घरि न्ह्येयाला लयीच घायीवं आल्था.

मण्ग आम्ह्या एक्मेकाण्णा लाव्-लम्बर दिउन ठुलं. निरोपय्बि घ्येतला. घाट्कोपर ठेसण तव्हर आलंय्बि.म्या आप्ला खालि उत्रुन भट्वाडिच्या आण्गानि पावलं टाखाया सुर्वात क्येली.

रवी दाते.

व्वा, व्वा ~ रवी दाते, मझा आला एकदम एक लम्बरी लिखाण.

शेवटचं "लाव-लम्बर दिउन ठुलं..." झक्कासच. यातील 'लम्बर' वरून पंजाब, राजस्थानभागात जगावेगळं काम करणार्‍याला वा एखादा तरुण दिल्लीत चांगल्या पोस्टवर नोकरीला गेला की त्याला गावकरी 'लम्बरदार' असे विशेषनाम देतात हे आठवले.

रवि दाते, मस्स्तच !!

पर त्ये काल्च्या बाजार्ला मंडळीनी नयीनच्या नयीन कोल्गेट्ची टूप आनुन ठुली, ती काय माव्ह्या ढुंगावं घसरित बसु का काय रोज सकाळ्च्याला. आरं शंबर रुपय जातिन ना माव्हं निस्कारन वायाला >>> Rofl

धमाल सुरु आहे इथे.

इतके मोठे उतारे लिहिणार्‍यांनी खरं तर 'मराठी भाषा दिवस २०१२' ह्या ग्रूपमध्ये स्वतंत्र धागे काढून लिहायला हवं. इथे प्रतिसाद आणि ते उतारे सगळच एकत्र झालय. संयोजक, काय म्हंता ?

ये ब्बात भाऊकाका!! Happy
>>नाय तर हंयच तिखट-मीठ चोळून बांगड्यासारखो चांगलो भाजून काढलं असतंय ह्येकां ">>लंगटी लावन रांपण खेचण्यात ल्हानपन गेलां त्येचां, आतां दिसात तां खेंचांकच बघता तो " >> Biggrin

मस्त मस्त सगळ्यांचेच लेखन मस्त!! ईतर भाषेतलं वाचताना जरा जड जातय पण मजा येतेय Happy

सगळ्यांनी खूप धमाल लिहीले आहे. वाचताना खरंच खूप मजा येतेय.
आणि हो, हाच धागा काय मराठी भाषा दिवसाचा कोणताही धागा 'बंद' होणार नाहीये. तुम्ही अवश्य लिहू शकता. Happy

Bhaukaakaa mastach. ShevaTi maalavaNi gaaDii dhakaluk tumakaach yevachaa laagalaa. Happy

Lol
सगळ्यानी कमाल केली आहे. Happy

प्रसंग- तीन, गाव- उत्तर पुणे जिल्हा(खेड,आंबेगाव्,जुन्नर;शिरुरचा पश्चिम भाग)>>> वाह!!
हे बर केलत प्रचारक. नायतर लोकाना पुणे म्हणजे पाट्या आणि सदाशिव पेठच माहितेय.
पुणे जिल्ह्यात किती फरक आहे हे बघत नाहीत लोकं.

झंपी, प्रचारक, गजानन, भाऊकाका... कहर आहेत सगळे!!! Rofl
खुप दिवसांनी निखळ वाचन कराय्ला मिळालं!

भाऊ Lol

यळंमाळं, नदरंसामनी, चाटकनी, पल्डा व्हता, आल्ह्तो ...
प्रचारक... लईच मज्जा आली वाचताना आक्षी खेड जुन्नर येष्टीत बसल्यागत.. ह्या कानांनी आइकल्याचा भास झाला बघा... Happy

मस्त मस्त छान लिहिलंय !

<< मस्त धमाल आहे ही >> १००% सहमत. त्याचबरोबर, बोलीभाषेची खरी गंमत ती त्या त्या भागात जावून प्रत्यक्ष 'ऐकण्या'तही आहेच, हेंही खरं.!

लंगटी लावन रांपण खेचण्यात ल्हानपन गेलां त्येचां, आतां दिसात तां खेंचांकच बघता तो ">> Biggrin Lol

" मेल्या तुझ्या टकलावरचीं कौलां उडतहत तीं बघ आधी; कौल कसलो लावतहस हंय ! " Lol Lol

भाऊकाकानु धम्माल Happy

बाकीचे सगळेच जोशात Happy

पाट्या, दुरड्या, शिबरी,>>>> गजाभाऊ , एकदम पार तिकडं चिकुर्ड,शेकरवाडी,करंजवड,ऐतवड ला गेल्यासारख वाटल. Happy
झंपी, टोल्या, सिंडरेला, भाऊ ,प्रचारक मस्त एकदम.

<< ShevaTi maalavaNi gaaDii dhakaluk tumakaach yevachaa laagalaa >>लक्ष्मीकांतजी, " गाडी ढकलूंक" हें तुम्ही खूपच मवाळ लिहीलंय. माझी बायको म्हणते " तुम्ही स्वताक ह्या बैलगाडीक जुंपून घेतास ना, तेव्हा खरांच शोभून दिसतास " !! हेंही " मर्‍हाटी बोलु कवतुके " म्हणून गोड मानायचं, आणि काय !!!! Wink

"सलाऽमाल्येकुम डाक्टर्साह्येब''
''रामराम चाचा.'' रविवार संध्याकाळ म्हणजे कसाईभेट अनिवार्य.

"क्या व्हना साब तुम्कु?" समोरच्या व्यक्तीला 'आप' हे संबोधन वापरुन संभाषण करणारा तथाकथित उर्दूभाषी ह्या महाराष्ट्रप्रांती अजून मला आढळला नाही.मग समोरची व्यक्त्ती स्थान,वय,हुद्दा,कर्तृत्व यात श्रेष्ठ असो वा कनिष्ठ.

''आप मुझे पाऊण किलो गावरान चिकन दे दिजिए.'' मी माझी गरज मांडतो.
"नरवा दु क्या साब तुम्कु?थोडा बडा हये पर येक्दम हच्चा हे."हे कानी येता जरासा हादरलोच.

'मरवा दु क्या' अशी पृच्छा कसायाने करण्याइतपत गर्हणीय प्रमाद पामराकडून कधी घडला ही चिंता ग्रासू लागली.
शिवाय मारणारा मोठया शरीरयष्टीचा असून प्रेमळही आहे असा दिलासाही 'एकावर एक फ्री' सारखा कसाईभाई देताहेत.म्हणजे मारणारा बहुधा गुदगुल्या करून किंवा विनोद सांगून हत्या करण्यात वाकबगार वगैरे असणार.

पण तरीही मटण घेताना मृत्यू म्हणजे फारच अनरोमँटीक आहे हो. वर्तमानपत्रात हे सगळं वाचताना सुर्‍हुदांना किती बरे गलबलून येईल.

शिवाय टी.व्ही. चॅनेल्सवर
''मटन खरीदने गये चालीस साल के आदमी को मटन की दुकानपर ही दिनदहाडे उतार दिया मौत के घाट. क्या वोह सचमुच मटणही खरीदने जाया करता था वहां? या सफेद लिबास पहने कोई वहशी दरींदा था वोह, जो मटण लेने आयी माबहनोंपर चलाता था अपना हात या काटता था उन्हे चिकौटीयाँ?
शक्ल और सूरत से सादालोह दिखनेवाले इस भेडिए ने बच्चो और औरतोंका मटण खरीदना कई दिनों से कर रक्खा था हराम.दरींदे के इस अभद्र व्यवहार के चलते मटण और चिकन के दीवाने कई घरोंको पिछले कई दिनोंसे करना पड रहा था घासफूस पे गुजारा. इससे चौपट हो रहा था मटनवाले का अच्छाखासा चलता पुश्तैनी धंधा.उसने कई बार वासना से पीडित इस नराधम को समझाने का किया था प्रयास. लेकिन वह अकल का अंधा अपनी इन नादान हरकतों से बाज कहा आनेवाला था. आखिरकार टूट ही गया एक दिन मटणवाले के धीरज का बांध. और कर दिया उसने कल सुबह उस सरफेरे का काम तमाम. और ले ली आखिर निरामिष भोजन की चहैती माबहनोंने राहत की सास"असलं काही वाजवत राहणार यातही मला तीळमात्र संदेह नव्हता.
महोदय 'नरवा दु क्या?' असं पुसताहेत हे ज्ञान अंमळ उशीरानेच झाले.
आहे.. सौभाग्यवतींचं कुंकुबळ बळकट आहे. ती अहेवच मरणार.तिच्या अहेवनवमीच्या पंगतींसाठी दरवर्षी पदरमोड करणं हे विधिलिखीत अटळ आहे. अहो जिवंतपणी सोडत नाही ती मेल्यावर काय सहजासहजी सोडणार होय?

"नरवा?' माझ्या चेहर्‍यावर मोठं प्रश्नचिन्ह.
"नरवा ओ... नरवा. बोल्ये तो मुर्गा. मुर्गा ओ. क्या साब तुम्बिना. मज्याकच करत्ये."
अच्छा. ते नर या अर्थी आहे होय.
मागच्या वेळी आम्हाला बहुधा नरवाच देण्यात आला असावा.त्याला घरी नेल्यावर मुलांच्या खेळण्यातलं नाव असलेला, एक.. नव्हे दोन अवशिष्ट अवयव दोन्ही तळहातावर नाचवीत घेऊन अर्धांगाने काढलेला ईईईईईत्कार आणि 'हे खाणार तुम्ही? य्य्याक' ओकुद्गार आठवता झाला.
"नही पाऊण किलो मुर्गीही दे देना.''मागल्या प्रकाराची पुनरावृती टाळणंच इष्ट.
"य्ये च्यल रे तीन पाव गावठि निकाल डाक्टर्साब्कु फटाफट.'' पोर्‍याला आज्ञा झाली.
''अब्ये सुन रे आच्छी जंड निकाल जरा. हौर सुन तु. जरा स्येबत काटत्ये जा ना गोश तु''.

"डाक्टर्साब को यक्दम हाच्चे छोटे छोटे पिस काटके द्ये,य्क्दम ठिक से साफ कर्के द्ये ब्येटा.'' हे मलाही बोध व्हावा म्हणून.

"मुर्गी जंडच निकाली ना? निकात मत निकालत्ये जाव.राग्या भोत शिण कर्ता. स्येबत द्येत्ये जाव उस्कु हामिशा. हौर च्यर्बि,कलेजि, बैद्ये सब निकालके द्येदो."

"नही,चरबी निकाल दिजिए. बाकी कलेजी,अंडे रहने दो.'' माझी विनवणी.

"र्‍हैंद्ये रे सब,चर्बि फ्येक्के द्ये सिरिफ च्यल. हात चला पटापटा. गिर्‍हाईकाके ट्यैम पे क्या बाता कर्ते बईठते रे साल्ये तुम सब. कित्ती बार बोला तुम्को. सुन्तेच नयी.
ये शारुक हिदऽरा.पाण ल्येक्ये आ खल्या कि दुकान से पाच्च्.ये ले बीस रुपय ल्येक्ये जा... हाबि चाक्लिटा खानिका कम कर ज्यरा तु .. सुन्तेच नयी आ ये पोट्टे.ईन्की दादीन्ये सर्पि चडाकि रक्खाय इनकु...
य्येले य्येले दोरुपय ले हौर भाग जल्दि च्यल हिदरसें नको ट्यैम की खोटी करु चल.
आर्‍ये हो गै केनै डाक्टर्साबका. हा च्यल डाल दे थय्लिमं पटापट.
हौर वो राग्या गौना दिया क्या नहिर्‍ये? आरिफ? भोत हरामका ह्ये साला. गर्दिमे आयसेच भाग्ता कबिकबार वो राग्या. य्क्दम निकात हये साला.''

मी पुन्हा हवालदिल. ''चाचा कौन? मैं?''

''नय्नयी साब. क्या बातकर्ते तुम्बि? तुम्कोन्हैइ.''

सुटकेचा नि:श्वास टाकून मी माझी पिशवी ताब्यात घेऊन आठवणीने पैसे अदा करून दुकानाबाहेर पडतो.

रवी दाते.

छान

एक इच्छा :- यातले बरेचसे संवाद जितके ऐकायला मजेदार वाटतील तितके वाचयला कदाचित वाटणार नाही किंवा वेग कमी पडतो. हे ध्वनीमुद्रित केले तर अजुन मजा येईल.

Pages