मर्‍हाटी बोलु कवतुके

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 13:54

marahati_kavatuk_bw.jpg

आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्‍या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.

चला तर मग, तयारी करा आपापल्या मनाच्या कप्प्यात हळुवारपणे जपलेल्या बोलीभाषेला मिरवण्याची!

आपापल्या भाषेतली ही गंमत आपण अशी अनुभवणार आहोत-
१. आम्ही इथे काही काल्पनिक प्रसंग संक्षिप्तपणे दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला आवडेल तो प्रसंग निवडून तुमच्या बोलीभाषेत खुलवायचा आहे.
२. प्रसंग खुलवताना त्या भाषेचा लहेजा, त्या भाषेत वापरले जाणारे विशिष्ट शब्द खुल्या दिलाने वापरण्यात यावेत. त्या त्या गावाच्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन त्या संवादांतून व्हायला हवे.
३. एका आयडीने एकापेक्षा जास्त प्रसंगावर, एकापेक्षा अधिक बोलीभाषांमध्ये लिहील्यास हरकत नाही.
४. प्रसंग लिहीताना प्रसंगाचा क्रमांक, तुमच्या गावाचे आणि बोलीभाषेचे खास नाव असल्यास लिहायला विसरु नका.

* * * * * * * * * * * * * * * * *

प्रसंग १.
आज तुमच्या घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूवरांकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे. हे सगळे उत्साही मंगल वातावरण तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून आमच्यापुढे साकार करायचे आहे.

प्रसंग २.
कामानिमित्ताने/ शिक्षणानिमित्ताने/ लग्नानंतर तुम्ही दुसर्‍या देशी/गावी गेलात. खूप वर्ष उलटली. तुम्ही तुमच्या व्यापात रमून गेलात. अवचित तुम्हाला तुमची जुनी मैत्रिण वा जुना मित्र भेटतो. मग शाळेतील, कॉलेजातील, कॉलनीतील गप्पांना रंग चढतो.जुन्या मैत्रीच्या पुनर्भेटीचा हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतील वळणात लिहा.

प्रसंग ३.
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. तुमचा मोबाईल खाली पडतो आणि तो कुणीतरी उचलून त्याचाच मोबाईल आहे असे सांगतो. तुमचे नि त्याचे तिथे भांडण जुंपते. गोष्ट अगदी हमरीतुमरीवर येते. हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून लिहा.

करायची सुरुवात?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नताशा ~

"माह्येवाले कान तुमच्यावाल्या कानाहून जादा चतरे हाएत..."

धिस शुअरली इज धम्माल ! ग्रेट !!

[@ साजिरा, पौर्णिमा, वत्सला - थॅन्क्स]

हा उपक्रम छानच आहे. फार मज्जा आली मला वाचायला आणि लिहायला पण. Happy
नागपूरात पहिलेपासुनच हिरो/हिरोइन्सची नावं ठेवायची फॅशन आहे. त्यामुळे मिथुन्/जितेंदर सारख्याच काजल्/करिश्माही दिसतात. "शुभविवाह: चि.सौ.का. काजल बोंदरे आनि चि. अक्षयकुमार फुटाने" वगैरे मुळे फार हसु येतं Happy

व~हाडी भाषा मोबाईल चा घोळ

ओये ओये ओये बाबुन्या, थो मावला मोबाईल व्हय ना बह्याडा...... सटकला काय.....

नाई हो भाऊ काईच्या काई नोका ठसन लाऊ गऴ्याहो... माया मोबाईल बी पल्डला थो बी असाच दिसते

..... अबे त नसानवानाच्या तुया मोबाईल कुटी पल्ड्ला म्या काय जानाव रे??????

कायच्यावरुन हा तुयावलाच मोबाईल हाए???? माया बी त पल्डला लेका इकळेच मोबाईल.....

अरे बावा, काहाले दिमाग खाते रे!!!!!, का सकाय सकायच ठर्रा लावला का????..... अशे कामं नाई कराव कमीत कमी झाकट पड्याची त वाट पहाव लागत होती हि~या.......

हे पा गळ्या तु काई शिल्लक चालू-बोलू नको , हा मोबाईल माया हाए त हाए मंग मले बाकी काईच घेने नाही हो

जाय न रे बावा, मी का रिकामा हाओ लेक मले बी डवरे ध~याले जाव लागते ना भाऊ, का ले काड्या करु रायला????

म तुले डवरे हाए त काय मी धु~यानं हाओ का बे ओ डोमड्या.........

बरं, हे पाय आपुन हा मोबाईल एस.टी,डी ले नेऊ तुले मी मावला नंबर सांगतो तुआ तो फिरवजो, लागीन त १ रुपया बी घे गळ्या माया इकुन, जर थ्या नंबरावरी ह्या मोबाईलची घंटी पल्डली तर थो माया राईल हे त मानतं का नाई भाऊराया???

हाओ, अस जमते गळ्या काम.......

पाय बर, म्या त सांगू रायल्तो हा माया हाए म्हून.....
पर मंग माया कुकडे गेला
तु आठो त गळ्या सकाऊन घरुन निंगाला तवा कुकडे कुकडे गेल्ता अन फोन कुटी कुटी काल्ड्ला होता तुनं

अरे हाओ गळ्या बराबर हाए, दर्यापुर च्या मामाच्या लायन्या नातवानं नेल्ता गळ्या माया मोबाईल खेळ्याले,आता काय कराव काई सुचु नाई रायले गळ्या एक त ते पोट्टं सायाचं हाए लायनं अन वरी सांग्याची गोठ हे की बेज्ज्या कुचिन हाए.

थामा एक काम करा ह्या माया मोबाईल वरुन तुमच्या मामाईले फोन लावसान त्याहीले सांगा सीन सारा अन ठीवाले सांगा मोबाईल त्याईच्या पाशी उद्या वापस जासान मंग तो वापस आन्याले

हाओ गळ्या हे जमते लावसान त नंबर, बरा मले आठू रायला गळ्या

"ह्यालो, पंजाब मामा च्या इकळे आला काय हा फोन, मी संतोस बोलू रायलो, मामाले देसान बरं फोन थोडासाक, मामा..... मी संतोस, मावला मोबाईल रायला तुमच्या इकळे आज सकाऊन आल्तो तवा, ठीवसाल ना पद्धतशीरनं, हाओ म्या सकाऊन चा पेलो त्या टायमाले वईनी आल्त्या ना पिंट्याले घिऊन त्या वख्ती पिंट्ञा कायच्यानंतरी रळत होता बेज्या त त्याले चुप करवाले म्या मोबाईल देल्ता गाने लाऊन थो तिकळेच रायला म, एक काम करा न तुमाले भेटला अशीन मोबाइल त थ्याची ब्याट्री बुझवून ठेवसान, मी उद्या येऊ रायलो खताचे पैशे घिऊन त्या वक्ती वापस नेतो, ठेऊ मंग..... हाओ.... हाओ.... ते सातबा~याच करतो मी काम ,जय गजानन"

जमलं का????

हअओ गळ्या, काईच्या काई गळ्या आज सोसायटीत जरा तनतन झाल्ती मावली कर्जावून त तुमच्यावर राग कहाल्डला गड्या म्या, बेकार हाए सायाचं हे कामाचं टेन्षन

जाऊ द्या ना मले मावला मोबाईल भेटला अन तुमाले तुमच्या मोबाईल चा ठिकाना लागला शेवट शेगाव च्या बाबाजी मर्जी न गोळ झाला ना बाप्पा, लय झाले मंग

नाई नाई, माय जीवाले लय लागले गळ्या म्या तुमाले बेकार बोल्लो लय, आता कमीत कमी चा त प्याव्च लागते तुमाले एक कट माया इकून,

एका शर्तीवर, तुमचा नेहमीचा सांगा, चा नंतरची पुडी माया इकून मंग विमल-शितार खा नाई त आर.एम.डी

चला मंग मटकेच!!!!!!!!

सीमा, पूनम, सिंडरेला, नंदीनी, टोल्या, साजिरा.. खूप सही प्रसंग रंगवलेत Happy मज्जा आली वाचताना.

मला पुणेरी आणि मुंबईकरांची बोलीभाषा फार फार आवडते. इथे वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती पण कुणी नाही लिहिल Happy

>>>तुले डवरे हाए त काय मी धु~यानं हाओ का बे ओ डोमड्या......... Biggrin किती दिवसांनी 'डोमड्या' शब्द ऐकला! मस्तं लिहिलंय टोल्या!!

>>फोन नाही तर फ्रेंडशिप Lol

>>>ते बुडी नुसती मधात मधात सवाल करत रायते Lol नताशा, मस्तं लिहिलंय.

संयोजक, ही कल्पना अफाट आवडली. (एकदम तोडफोड बाफ!)

कुणीतरी टीपीकल पुणेरी शब्द वापरून लिहा. आणि "बॉम्बे" मराठी पण यू नो Happy

नंदिनी, नताशा, अशोक पाटील, पौर्णिमा सहीच!

बी(पुन्हा), सीमा (स्वारी शीमा :फिदी:), साजिरा, आर्या, सिंडरेला, नताशा आणि सगळे... धम्माल भारी! मीही लिहून ठेवलंय, टाकतो आता.

(स्थळ : बाजारालगतचा इस्टी त्यांड किंवा इस्टी त्यांडलगतचा बाजार. सांगलीतलं एक गाव. वेळ दुपारी तीनची.)

इस्टीत्यांडवर आज गर्दी दिस्त्या. [ आज बुदवार. मजी बाजाराचा दिस. मग त्यांडावर गर्दी न्हाय दिसायची तर काय दात्रीच्या माळरानावर दिसंल वी? ] त्यांडाला लागूनच बाजारपेट हाय. आजूबाजूच्या गावातली बायाबापडी सकाळी लौकर आपल्या घरातनं निगूनशिनी बाजार्‍हाट आटपून कडूसं पडायच्या आत घरात पोचायला पायजे ह्या बेतानं आल्याली. बाजारात वांगी, गवारी, शेवग्याच्या शेंगा, झालंच तर दोडकं, पडवाळं, कार्ली, कूतमीर, मीती, कांदं, बटाटू, तांबाटू, पावट्याच्या शेंगांच्या पाट्या घिवून इकायला लांबच्या लांब वळीत बसल्याली बाया-बाप्ये हायती. मदी गिरायकास्नी जाया- याला रस्ता सुडून कलींगडं, फपया, केळं, पीरू, ह्यंची वळ. पल्याड तांदूळ, जुंदळं (ज्वारी), हारबरं, उडीद, हुलगं, पांची, चवळं आशी दुसरी वळ. मग त्या वळीच्या पाटीला पाट लावून दुसर्‍या अंगाला साळुतं (केरसुण्या), सुंभ, सुपं, पाट्या, दुरड्या, शिबरी, टोपल्या, सुया, दोरं, दाभणं, सुतळ्या, काथ्या, पैतानं, काळं/पंचरंगी हाता-गळ्यात बांदायचं दोरं. आनी करदूडं. ही वळ. तेंच्या फुड्यातल्या वळीत कोंबड्या-बकरी (जित्ती), अंडी, मासळी ह्येंच्या खरीदीची घासाघीस. तेंच्याबी पड्याल्ल्या अंगाला पोराटोरांची खिळणी, पूरींच्या केसातल्या किलपा-बिलपा, डिस्को लब्बर, चाप-फाप, फन्या, काकनं-कंडं आसलं काय-बाय. या वळींच्या काटकोनात बसलाय - लालभडक मिरच्यांचे ढीग, धने, जिरे, लौंगा, काळीमिरी, लसून, दालचिनी आस्ला ठसका. आनी ह्या सार्‍याच्या भौतंनं भजी, गारीगार कांडीवाला, आईस किरीम, जिलीबी, बर्पाचा गोळावाला, उसाचा रसवाला.

(आता म्हंचीला गुराळ लावलंय पावन्यानं जणू? तर... तसं न्हाय. सारं कसं बैजवार हुया पायजेल.) तर बाजारात तशी त्यांडावर बी वर्दळ हाय. कायींचा बाजार करूनशिनी झालाय. कायींची खरेदी आय्न भरात आल्या, तर काय जनं शेवटच्या खरीदीची घासाघीस कर्त्याती. (आता ह्यात बी गिर्‍हायकांची आजून यक जात आस्ती. ती मजी बाजार उलगडायला लागतो अशा वेळी ही जात बाजारात उगावती. ह्येंची खरेदी सुरू हुती उलगडत्या बाजारात. कारण बाजाराबरूबर मालाचा दर बी उतरणीला लागल्याला आस्तुया.)

तीन वाजायल्यात मजी आज्च्या बाजारानं आपली शिगंची यळ नुस्ती कुटं वलांडल्या. मजी बाजार धड भरात बी नाय आणि तसा उतरणीला बी आजून लागल्याला न्हाय.

कल बर्‍याच वर्सानं आपल्या म्हायारला आल्याली सुली आपल्या भावजंबर बाजार्‍हाट करूनशिनी नुस्ती कुटं इस्टी त्यांडवर आल्या. तंवर भावजंला आपल्या म्हायार्च्या पर ह्याच बाजारगावात दिल्याल्या मैतरनीची -आनी तिज्या घर्ला बूलीवन्याच्या आग्रेवाची - अचानक आटवन आल्या.

"हुय वं वैन्सं... अवं, माज्या म्हायारची भिंगरी हितंच दिल्या. लैंदी बुलीवत्या, पन मला काय जाया झाल्यालं न्हाय. च्हलू या का? हितंच खालच्या आळीला घर हाय तिजं."

"न्हाय बाय! " सुलीनं उगंचच आंगाव पाल पडल्यावानी केलं.
"आवं च्हला," भावजंचा नेटानं आपल्या नंदंला आग्रेव सुरूच.
"नगं बाय... माजी ना वळक ना पाळक. तू जाव्न यं. तंवर म्या टिकतू जरा हितंच पारबर."
(शेवटी - बगा बाऽय... किती मिंत्या करायच्या तरी.. च्हला म्हंतुया तर...! - वगैरे पुटपुटत सुलीची भावजं जूडीदारणीला भेटायला जाती.)

(पाच मिण्टांनं सुली टेकल्याल्या कट्ट्यावरच जरा सैलावून बसायला लागती. सैलावताना तिजा धक्का तिज्या मागं तिज्याकडं पाट करूनशिनी बसल्याल्या केळंवालीला लागतु.)

केळंवाली : (भडाकती) काय ढोसन्या मारत्याती बाय.. योक्योक नमुनाच ! जरा सावरून बसा की बाय ! का त्ये बी शिकवाय लागतया?

सुली : (केळंवालीकडं बगीत बी न्हाय) (ठसक्यात) "ए ऽऽऽ लागला चुकून धक्का म्हणूनशिनी काय म्या म्हस नाय ढोसन्या मारायला. मला शिकवू नगंस बसायला.. आदुगर सोत्ता बोलायला शीक!"

(तेवड्यात तितं दोन बाया यत्याता. समूर लागल्याल्या इस्टीकडं ब्वाट दाऊन केलंवालीला - )
पैली बाय : ही गाडी कंच्या गावाला जात्या वं?
केळंवाली (अजूनही कुर्रर्रर्‍यात) : मला न्हाय म्हाईत! इच्च्यारा कंडक्टराला.
दुसरी बाय : (आवाजात पैलीपरास जरा जास्त आर्जव आणून) बरं ही र्‍हावंद्या. ती तकडची गाडी कंच्या गावाला जात्या त्यं तरी सांगा!
केळंवाली : (अजून भडाकल्यालीच) मला न्हाय म्हाईत... इच्च्यारा कंडक्टराला!
पैली बाय : केळं कशी दिलीसा?

सुली : त्यास्नी न्हाय म्हाईत. इच्च्यारा कंडक्टर्रर्रराला...!

केळंवाली (दुप्पट तापती) : माज्या त्वांडाला लागू नगंस बर्का. म्हागात पडंल.

सुली : आगं जा गं. म्हाग आस्तीलं तुजी केळं!
केळेवाली : आसं वी? कंच्या गावची मास्तरीन आलीय म्हनं मला द्यान द्याला? आँ?
सुली : त्या गं पंच्यात्या कशाला तुला? म्या आसंन कंच्या बी गावाची. तुला काय गं चांबारचौकशी? चूंब्डी कुटली!
केळंवाली : आसं व्हय? आसू दे.. आसू दे... शरम वाटन्यासारखं आस्लं तर नगं सांगू गावाचं नाव.
सुली : आगं जा गं! शरम वाटन्याजोगं धंदं आमी नाय करत! वाटारची हाय मी वाटार्रर्रर्रची ! आन् म्हायार हाय आंबंवाडी! म्या भेतोय का काय गं तुला?
केळंवाली : (यटवान दावीत) भॅतॉय कॉ कॉय. ऑंब्यावॉडी म्हायार हॉय म्हणं!... ..........(वाईच थांबून).....आँ?? आंबेवाडी? (आचीर्‍यानं डोळं मोटं करीत... आणि मागं वळून बगीत...) आं.. बं.. वा.. डी..?
सुली : (बाक्कदिशी केळंवालीच्या आवाजात झाल्याला फरक जानवूनशिनी, मागं वळून बगीत) व्हय व्हय! आंबंवाडी बाचं गा... व... हा.. य.. मा.. ज्या........................................... आँ? आगं माले तूऽऽऽऽऽऽ!!!

"आगं सुले, तूऽऽऽऽऽऽऽ !!! "

"माऽऽऽ ले....!!!"

"सुले....!"

पन्नाशीला पोचलेल्या पर लग्नाधरनं यगदा बी गाटभेट न झाल्याल्या ह्या दोन बालमैतरणींचा तेंच्याच डोळ्यावर, कानावर इस्वास बसं ना. दोगी कडकडून भेटायल्या. दोगींची शेवटची भेट कदी झाल्ती ह्ये आठवत आठवत त्या पार पार मागं पोचल्या. बारीकातल्या बारीक आटवनी बी आर्श्यासार्ख्या लक्क हूनशिनी समूर आल्या. आक्षी पार तिसरीत असताना मालीच्या भावाची (पक्याची) आणि सुलीची टक्कर हून सुलीच्या फराकाच्या वट्यातली भोकरं कशी जमिनीवर सांडली आणि त्याच भोकरांवरून ती दोघं पाय घसरून पुन्हा कशी पडली आणि दोघास्नीबी किती मोठाली टेंगळं आल्ती, ह्ये आठवून दोघीबी पोटाला पीळ पडंस्तवर हासल्या. ... आणि नेमकं पाचवीच्या सामाय परिक्षेच्या टायंबालाच सुलीच्या घरामागच्या परड्यात मालीनं कचनाच्या डोलीत बसलेल्या आग्याम्हवाला कसं डिवचलं हुतं आणि त्याच्या मधमाशीनं मालीच्या खालच्या व्हटाला घेतलेल्या चाव्यानं तिचा एकच खालचा व्हट दोन दिस कसा फुग्यात हवा भरल्यावानी टुम्म फुगून लोंबत हुता, त्ये आठवून हसता हसता तर दोघींच्याबी डोळ्यात पानी आलं...

"सुले, एक सांगू का?"
"सांग की.."
"बग... हासचील. म्हंचील, काय आता ह्या वयात सुचायलंय तरी..."
"न्हाय हासत. आता आनी किती हासू?"
"बग आं?"
"न्हाय खरंच... शीप्पत!" खरंतर सुलीचा हसण्याचा भर अजून पुरता ओसरला नव्हता.
"सुले, आपून ल्हानपनी बर्पाचा गोळा खायाचू तेजी लय आटवन आल्या.... तू व्हय म्हंडलीस तर आता पन दोघीत एक गोळा आनून तळहातावर फोडून आर्धा आर्धा खाऊया?"

सुलीचं डोळं पुन्हा भरून आलंतं.

सुले, आपून ल्हानपनी बर्पाचा गोळा खायाचू तेजी लय आटवन आल्या.... तू व्हय म्हंडलीस तर आता पन दोघीत एक गोळा आनून तळहातावर फोडून आर्धा आर्धा खाऊया?"
>> भारी लिवलयं.

दोन मैत्रीणी मूळच्या पुण्याच्या पण अमेरीकेत न्यु जर्सीच्या मराठी मंडळाच्या हळदी कुंकूवाला १० एक वर्षानी भेटतात, ते ही जेवणाच्या लाईनीत उभे असताना.. Happy
एकीने विदेशी नवरा केलाय, दुसरीने सिंधी पुण्याचाच. त्यांचा साडी, नवरा,विदेशी नवरा, हेअरस्टाईल,मुलं. पेठ.. बदलेले पुणं ह्यावर गोष्टी होतात त्या लाईनीत उभं राहून.. .. एकमेकींकडून उत्तराची वाट बघण्यापेक्षा प्रश्णांची सरबत्ती चालूच. जमलं तर उत्तर मध्ये असे असते. मग ताटात जेवणं घेवून सुरुच एका कोपर्‍यात खुर्च्या ओढून.
त्यातली एक मंडळाची सेकेटरी.. Proud

(झक्कींना मेजवानी.)

---------------------------------------------------------------------
अय्याsssssss तु.. चिन्मयी ना?
(दुसरीचा अय्या पहिलीपेक्षा मोठा)
अय्याssssssssssssssssssss तु शाल्मलीच ना?
चिन्मयी= चि.
शाल्मली - शा.

चि. - येस येस.. मी मघा पासून बघत होते की की अपर्‍या नाकाची दिसते ती कोणतरी ओळखीची वाटतेय .. बट यू नो जरासे ऑकवर्ड वाटत होते की एकदम कसे विचारायचे..
शा. - करेक्ट! करेक्ट! मलाही वाटलेच की शेवाळी रंगाची साडी नेसलेली ह्या बाईसाहेब कुठेतरी भेटलेल्या वाटताहेत.. यू नो वाईल्ड गेस केला.
मग..... ए.. हॉय आर यु गं? टॅन लॉंग एयर्स ना..

चि. - येस. यु र जस्ट राईट. बघ ना.... टाईम फ्लाईज गं.... हो, मी इथेच. तु ही इथेच असतेस का?

शा. - करेक्ट! सध्या मीच आहे ना इकडच्या मंडळाची सेकेटरी( आवजात तो पुणेरी "टरी" वर जोर देवून) साडीचा पदर नीट करत..तुला अजून शेवाळीच रंग आवडतो दिसतो?.(तिच्या साडीकडे कटाक्ष टाकून)

चि. - अय्या... पैठणी आहे ना... भन्नाट दिसतेस. पूण्यातून घेतलीस का? पुणे बदललंच की.. टिळक रोडवरच्या दुकानात सही मिळायच्या रंगसंगती, माझ्या काकूच्या बहिणीच्या लग्नात तिथेच केली होती खरेदी.
शा. - हो तर.. काहीच विचारु नकोस... यु कांट बिलीव. आपलं एस. पी(कॉलेज) किती बदलयं..
चि. - तु तर एकदम फेमस होतीस ना.. मगss काय तोतलानी साहेबच ना..... म्हणजे तुझी न्युज एकली होती कॉलेज संपल्यावर.. डोंट माईंड.. पण शर्वरी टोल्ड मी. एकदा कॉलेजनंतर पेठेत भेटली तेव्हा..

शा. - हँ हॅं... हँ... (हसून झाल्यावर).. इटस ओके गं. अय्या.. शर्वरीने सांगितली.. अजुन सवय गेली नाही का तीची? हो गं म्हणजे त्यानेच विचारले. बाबांना न्हवतं पसंत.. सिंधीच भेटला का? तर चित्तपावन मेलेत का असे आजीने विचारले. तर, काय करायचेत चित्तपावन... कर्‍हाडे नाहीतर सिंधी बरा असे आई. मग काय केलं, तोतलानी साहेबांनी सांगितली एक ट्रीक.. .. मास्टर्स करायला आलो इथे अन रजिस्टर लग्न केलं गपचूप अमेरीकेत आल्यावर . अन न्युज दिली पुण्याला पाठवून. हँ.. हँ..

चि. - तु अजून तशीच 'हे' आहेस बरं का? यु नो... ना.
शा. - यु वेअर नॉट लेस. तुझं तर .. गोगलगाय पोटात पाय.. मला तेव्हा वाटायचे की जोश्यांचा अमित तर खास मित्रच होता तुझा... नाही कारण..तुमची सारखे वह्या बदलाबदली चालायची ना.. (इथे डोळा मारून)हॅं .. हँ....
चि. - अय्या... यु र टू मच. छे! ही वाज जस्ट अ गूड फ्रेंड हं. पप्पांचा स्टूडंट होता ना. (एकदम लाडात.. येवून). बट यु नो नथिंग लाईक द्याट हं.
मला तेव्हा करीअरमध्ये 'रस' होता... सायकोलॉजी आवडायचे तसे.
आणि हळूहळू सर्वच जात होते अमेरीकेत काहीना काही करायला.. सो मी पण मग अ‍ॅपलाय केलं. पण इथे आल्यावर रसच गेला. यु नो आय वाज होमसिक. पण हॅरीने मदत केली. ही वाज जस्ट देअर फॉर मी .. माझ्या त्या दिवसात.
(तोवर नंबर आला असतो.. जेवण ताटात घेत पुढे सरकत असतात मैत्रीणी.. नेमकी आमटी वाटीत घेताना 'हॅरी' एकलं आणि शाल्मलीने ...)
शा. - काsssssssssय! हा हॅरी कोण? इथे पकडला काय? हँ .. हॅं..
चि. - (लाजून) म्हणजे तस जुळूनच आलं. मिन्स.. वी वेअर गूड फ्रेंडस आधी. ही वाज सिनिअर. तो सायकोलॉजीचे डॉउट्स समजावून सांगायचा... मग नोटस द्यायचा. आणि मग.. ही जस्ट स्पेल दी बीन्स्..(लाजून)
शा. - (मध्येच डोळा मारून) म्हणजे इथे पण वह्याच का? हम्म्म.. यु र जस्ट दी सेम... इन्ट्रो देणार ना?
बरं हे केसांचे काय केलेस? भद्रण का केले ते असे? आठवतेय ना... तुला एस. पीची 'शारदा' म्हणत.. हँ .. हॅं... न्यु हेअरस्टाईल का?
चि. - अगं काही विचारु नकोस... इट वाज गेटींग हार्ड टू मेन्टेन.. लाँग हेअर इतकं कठीण होतं सांभाळताना...

(बर्‍याच गोष्टी चालूच रहातात... इतक्यात शाल्मलीच कार्ट आमटीत गुलाबजामून बुडवून एकत्र करून खायला लागतं) Proud
दोघीही.... ओ माय गॉड.. करत तिथे पळतात तर शाल्मली... कुठे न्यायची सोय नाही अस पुटपुटत आजूबाजूला त्याच्या बाबाला शोधायचा प्रयत्न करते पैठणी सांभाळत.. Proud

सगळ्यांचे वाचले.
बी: अफलातून
सीमा: मस्तच!
मी_आर्या, अशोक, साजिरा वगैरे सगळेच मस्तच.

मस्त संवाद. सगळेच वाचायला मजा आली. बीची भाषा एकदम चित्रदर्शी आहे. Happy
सीमाचे संवाद सगळ्यात आवडले. अगदी तंतोतंत.
आणि वाठारच्या मालू आणि सुलूची भाषा सातारच्या बोलीसारखीच आहे.

अ फ ला तु न कल्पना संयोजक व भ न्ना ट प्रवेशिका!!!!! बी च्या आजीबाईंनी(प्रसंगातल्या) व सीमाने तर कमाल केलीये.

[प्रसंग क्र. ३ : मोबाईल वरून ट्रेनमधे हमरीतुमरीवर ; स्थळ: कोकण रेल्वेचा डबा. संभाषण :मालवणी कोकणी ]
पायाखालच्या बॅगेला बाहेरच खोचलेली पाण्याची बाटली काढायला गजाभाऊ वाकले आणि त्यांच्या शर्टाच्या खिशातला मोबाईल खाली पडला. कोकण रेल्वेतून गांवच्या जत्रेला निघालेल्या आजुबाजूच्या सगळ्या मालवण्यांचं लक्ष एकदम खाली वळलं. समोरच बसलेल्या नवख्या तरुणाने पटकन वांकून तो मोबाईल उचलला. गजाभाऊनी आभारप्रदर्शनाचा चेहरा करत मोबाईलसाठी हात पुढे केला.
"हा मोबाईल माझा आहे. तुमचा खाली कुठे पडला असेल तर तो तुम्हीच शोधा ",तो तरुण शुद्ध मराठीत ठामपणे म्हणाला. ताटातला मासा बोलायला लागला असता तरी बसला नसता असा धक्का बसला सगळ्यानाच, हे बघून आणि ऐकून. आणि, खचाखच भरलेल्या त्या डब्यात जणूं मधमाशांचं पोळंच उठलं.
"गजाभाऊ, ऐकान काय घेतास, देखवाच त्येकां मालवणी खाजां काय असतां तां ! "
" ह्या रेल्वेमुळे असले भामटे आतां घुसतहत कोकणात; पर्यटन कसलां , प्रदूषणच आसा ह्यां "
"ह्या गण्यादादानी त्येंचो झिल नाय इलो म्हणान ह्या आगाऊ शान्याक त्येची सीट दिल्यानी. त्येंकाच सांगा आतां हुसकून काढूक त्येकां "
" अरे मेल्यानुं, आधी गजाभाऊंचो मोबाईल घ्येवा ताब्यात आनि मगच हुसकून काढा त्येकां "
" आयेच्यान सांगतंय, हो उपटसूंभ मराठी मानूस आसा म्हणान ,नाय तर हंयच तिखट-मीठ चोळून बांगड्यासारखो चांगलो भाजून काढलं असतंय ह्येकां "
"मेल्या, त्येच्यापेक्षां कालवणच कर मा रे त्येचां. बायलेन दोन डबे भरून भात दिल्यानहा पण कालवणाचो डबो देवकच इसारली हा !"
" हंय रामायण चल्लांहा मोबाईलचां, तरी ह्येचां आपलां नेहमीचां पारायण बायलेचांच ! "
" अरे, आम्ही बोंबलून घसो सुकवतोंव, आनि ज्येचो मोबाईल चोरलो ते गजाभाऊ मात्र उगीच बसलेहेत !"
आतां गजाभाऊना कंठ फुटला. " हो उपरो मेलो शुद्ध मराठीत बोलताहा. कोणी तरी शुद्ध मराठीत सामाजावा रे त्येकां. सांगा मोबाईल माझो देवन टाक , नाय तर न बोलताच हंय धुमशान घालतंय आतां मी ".
" 'जनमनाच्या कानोशा'तलीं तुमची रोजचीं पत्रां तर खरमरीत मराठीतच असतत मा ? मग आतांच अडलां खंय शुद्द मराठीसाठी ? "
"अरे बाबा, मी रवळनाथाकडे इडो उचलान शपथ घेवन बसलहंय, 'रेल्वेन पनवेल ओलांडल्यान कीं मालवणी शिवाय एक जरी शब्द बोललंय ,तरी माझ्या जमीनीच्या वादाचो निकाल माझ्या इरुद्ध लाव ', म्हणान "
" गजाभाऊनुं, जमीनीचो वाद आणखी दोन पिढ्यो चलतलो पण हो मोबाईल तर आत्ताच घेवक होयो मा ताब्यात !"
" जावंदे रे आतां तां ; कुणीतरी समजावा झालां ह्या पावण्याक सूद्ध मराठीत "
"ये पावण्या, आतां उगीच ताणू नको. देवून टाक बघूं त्यांचा मोबाईल."
" अरे वा: ! शंभर मालवणी ओरडले म्हणजे हा मोबाईला ह्यांचाच आहे असं सिद्ध होतं का ?" तो तरुणही न डगमगता म्हणाला.
झालं! आतां तर शेपटीवरच पाय पडला होता मालवणी फुरशाच्या !
"शिरां पडलीं रे ह्येच्यार. खेचा रे ह्येकां भायेर.माकाय काथ्यो कुटान खुपखूप दिस झालेत. हात शिवशिवतहतच माझे "
"तू जरा रव, मीच वळतंय बघ त्येकां चुडतां वळतत तसो "
"सांखळी खेचा रे कोणी तरी "
" आयला, कोन हो श्यानो ? ह्या चोराच्या कानफटीत खेंचूचां सोडून साखळी खेंचा काय !"
" जावंदे रे, त्येचां काय ऐकतस ! लंगटी लावन रांपण खेचण्यात ल्हानपन गेलां त्येचां, आतां दिसात तां खेंचांकच बघता तो "
" प्रश्न आता मोबाईलचो नाय, मालवणी अस्मितेचो आसा; ह्येकां ठेंचूंकच होयो आतां "
"माझां ऐकशात ? आधी गण्यादादांकच लावा उठाबश्ये काढूंक; त्येंचांच श्यानपन नडताहा ह्यां; या उपटसुंभाक आपल्या झिलाची सीट देवन नसतां मोठेपन मिळवूंक गेलल्ले ! "
गण्यादादाना आतां मधे पडल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.
" ह्यां बघा, मी ह्या पावन्याक सीट दिलंय ह्यां कबूल. पण गजो माझो ल्हानपनापासूनचो दोस्त आसा. तेंव्हा त्येचो मोबाईल मिळवून देणां ह्यांय आतां माझां कर्तव्यच आसा. पण , तां माझ्या पद्धतिन माकां करूंक देशात ?"
मग शांत, निर्विकारपणे बसलेल्या त्या तरुणाकडे वळून गण्यादादाने विचारलं " हा तुमचा मोबाईल म्हणतां, तर त्याचा नंबर सांगा . माझ्या मोबाईलवरून मी करतों त्यावर फोन. रिंग वाजली तर तो तुमचा मोबाईल! उगीच मारामार्‍या कशाला ?"
तरी त्या डब्यातल्या मधमाशा घोंघावतच होत्या.
"थोबाड बघा त्येचां. तो काय डोंबलाचो सांगतलो नंबर "
" अरे, पण ह्यां म्हणजे गजाभाऊंवरच अविश्वास दाखवल्यासारखां नाय ?"
" पण चोराचीच असली विनवणी काय म्हणान ?असली गांधीगिरी करूंची ह्या गण्यादादांक ना जुनीच खोड आसा. "
" त्येच्यापेक्षां रवळनाथाक कौल लावलो, तर कसां ? फ्रेम करून आणलेलो रवळनाथाचो फोटो आसा आयतोच माझ्या बॅगेत "
" मेल्या तुझ्या टकलावरचीं कौलां उडतहत तीं बघ आधी; कौल कसलो लावतहस हंय ! "
" बिचार्‍या गजाभाऊंकडे बघा रे ! कोणीतरी बाईलच पळवल्यासारखो चेहरो टाकल्यानी हा त्येनी !! काय करूंचा असात तां बेगीना करा रे ."
ह्या सगळ्या गादारोळाकडे दुर्लक्ष करत त्या तरुणाने घसा खाकरून शांतपणे गण्यादादांकडे बघत म्हटलं, " बरं. माझ्या मोबाईलचा नंबरच हवा ना ? हा घ्या ! "
अख्खा डबा डुकराच्या शिकारीसाठी रात्री दबा धरून बसावं तसा अचानक ' सायलेंट मोड'मधे गेला !
आतां गण्यादादाने आपला मोबाईल जय्यत तयारीत ठेवला व त्यावर त्या तरुणाने उच्चारलेल्या आंकड्याबरोबर उत्कंठावर्धक एक एक बोट फिरवायला सुरवात केली. दोन सेकंदांचा भयानक पॉज ... आणि मग.... मेगॅ अँटीक्लायमॅक्स ! त्या तरुणाच्या हातातल्या मोबाईलच्या ट्यूनने डब्यातल्या सगळ्यांचं तणतणणंच बंद केलं ! डुकराऐवजी स्वत:चीच शिकार झाली असल्याचं लक्षात यावं तसं झालं सगळ्यांचं आणि त्यांच्या नजरा वळल्या गजाभाऊंकडे. ते तर आ वासून बघतच बसले होते त्या तरुणाकडे. मग शुद्धीत आल्यासारखं ते बरळले-
"अरे गण्या, मेल्या, ह्येना माझ्याच मोबाईलचो नंबर सांगल्यान रे तुकां ! आणि वाजलो तो रिंग टोनय माझ्याच चेडवान लोड करून दिलेल्यान माकां त्या मोबाईलवर !! काय भुताटकी आसा ही !!!"

गण्यादादा आणि समोरचा तो तरूण खो खो हंसत सुटले.
" गजा , मेल्या, होच तो माझो झिल, तूं तुझ्या चेडवासाठी इचारी होतस ना,तोच ! त्या दोघानी भेटून सूत पण जमवल्यानी, केंव्हाचांच. तुझ्या चेडवानच दिलो तुझो मोबाईल नंबर आणि घेवक सांगल्यान ह्येकां तुझी अशी फिरकी !! "
------
[फक्त संभाषण मालवणीत दिल्यानंही शब्दांवर विशेष न अडखळतांही त्या भाषेची लज्जत चाखतां येईल असं वाटलं. तरीही कांही शब्दांची ओळख करून देणं आलंच -
मालवणी खाजं- गूळ व बेसनाचा लोकप्रिय पदार्थ पण ' मालवणी इंगा" ह्याअर्थींही वापर .
झिल- मुलगा; चेडू - मुलगी ; कालवण - माशाची आमटी; काथ्या कुटणां- नारळाची टणक टरफलं चिखलात कुजवून, सुकवून मग काठीनं झोडून त्यापासून काथ्या काढणं; चुडतां वळणां - नारळाच्या झाडाच्या मोठ्या पानांची पातीं बांबूच्या चटईसारखी गुंफणे; ]

@ झंपी _ "आमटीत गुलाबजामून बुडवून एकत्र करून खायला लागतं)" ~ हुबेहूब नजरेसमोर आला हा प्रसंग.

@ भाऊ नमसकर _ ", 'रेल्वेन पनवेल ओलांडल्यान कीं मालवणी शिवाय एक जरी शब्द बोललंय ,तरी माझ्या जमीनीच्या वादाचो निकाल माझ्या इरुद्ध लाव ', म्हणान "
~ हे लै भारी ! बेळगाव महाराष्ट्रात आल्याबिगार मी डोक्याला मुंडासं बांधणार नाही अशी म्हसोबासमोर आमच्या संकेश्वरातील कुळाने ३५ वर्षापूर्वी शपथ घेतली होती, जी आजतागायत पाळली आहे. अगदी मुलाच्या लग्नातही मांडवात तो बोडकाच वावरत होता, त्याची आठवण आली.

टकला तुझा >>>

पन सूरज असेल ते त्याला अर्धीरात कसा बोलूचा? आपले भूगोलाचे सर खुलेच होते. काय्पन शिकवत. >>>

Lol मस्त चालू आहे.

नताशाने टाकलेली बोली बर्‍यापैकी ऐकलेली आहे. लहानपणी आमच्या शेजारचं एक कुटुंब अगदी असंच बोलायचं आपसांत. त्यांचं ऐकून काही दिवस आम्हीही 'ग' लावून बोलायचो. (पोस्टी-बिस्टी ऐवजी पोस्टी-गिस्टी.) मकरंद अनासपुरेही पडद्यावर असं बोलताना बर्‍याचदा ऐकलंय.

बी,साजिरा,सीमा,टोल्या,मी_आर्या,पोर्णिमा,गजानन,अशोकजी,झंपी,सिंडरेला सर्वांचे लेखन मस्त!
@साजिरा..अहिराणी कळायला थोडी कठिण गेली,पण अनुवादामुळे समजली.
@बी <<<तू हा मोबिल जवय ठू...>>> "ठू"हे फारच गोड!

कूतमीर, मीती, कांदं, बटाटू, तांबाटू, >>> फर्मास्स !! (आम्ही लहानपणी डोक्यावर उशी घेऊन भाजी-भाजी खेळायचो तेव्हा अगदी असंच बोलायचो Lol )

लंगटी लावन रांपण खेचण्यात ल्हानपन गेलां त्येचां, आतां दिसात तां खेंचांकच बघता तो " >>> Rofl अशक्य!!

Pages