मर्‍हाटी बोलु कवतुके

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 13:54

marahati_kavatuk_bw.jpg

आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्‍या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.

चला तर मग, तयारी करा आपापल्या मनाच्या कप्प्यात हळुवारपणे जपलेल्या बोलीभाषेला मिरवण्याची!

आपापल्या भाषेतली ही गंमत आपण अशी अनुभवणार आहोत-
१. आम्ही इथे काही काल्पनिक प्रसंग संक्षिप्तपणे दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला आवडेल तो प्रसंग निवडून तुमच्या बोलीभाषेत खुलवायचा आहे.
२. प्रसंग खुलवताना त्या भाषेचा लहेजा, त्या भाषेत वापरले जाणारे विशिष्ट शब्द खुल्या दिलाने वापरण्यात यावेत. त्या त्या गावाच्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन त्या संवादांतून व्हायला हवे.
३. एका आयडीने एकापेक्षा जास्त प्रसंगावर, एकापेक्षा अधिक बोलीभाषांमध्ये लिहील्यास हरकत नाही.
४. प्रसंग लिहीताना प्रसंगाचा क्रमांक, तुमच्या गावाचे आणि बोलीभाषेचे खास नाव असल्यास लिहायला विसरु नका.

* * * * * * * * * * * * * * * * *

प्रसंग १.
आज तुमच्या घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूवरांकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे. हे सगळे उत्साही मंगल वातावरण तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून आमच्यापुढे साकार करायचे आहे.

प्रसंग २.
कामानिमित्ताने/ शिक्षणानिमित्ताने/ लग्नानंतर तुम्ही दुसर्‍या देशी/गावी गेलात. खूप वर्ष उलटली. तुम्ही तुमच्या व्यापात रमून गेलात. अवचित तुम्हाला तुमची जुनी मैत्रिण वा जुना मित्र भेटतो. मग शाळेतील, कॉलेजातील, कॉलनीतील गप्पांना रंग चढतो.जुन्या मैत्रीच्या पुनर्भेटीचा हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतील वळणात लिहा.

प्रसंग ३.
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. तुमचा मोबाईल खाली पडतो आणि तो कुणीतरी उचलून त्याचाच मोबाईल आहे असे सांगतो. तुमचे नि त्याचे तिथे भांडण जुंपते. गोष्ट अगदी हमरीतुमरीवर येते. हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून लिहा.

करायची सुरुवात?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्तुत्य उपक्रम! प्रसंग खूप आवडले. दुर्दैवाने, मला एकही बोलीभाषा नीट येत नाही, पण वाचायला नक्की आवडेल. Happy
लिहिणार्‍या सगळ्यांना शुभेच्छा!

उपक्रम आवडला. प्रत्येक बोलीभाषेत वाक्यरचनेची पद्धत, विशिष्ठ शब्द या बरोबरच बोलण्याचा हेल / शैली वेगळी असते. ही बोलण्याची पद्धत लिहुन कसे दाखवणार आणि त्याशिवाय त्या भाषेची गोडी नाही कळणार.

फारच छान कल्पना. Happy मजा येईल वाचायला.

लहानपणापासून कायमच शहरी वातावरणात राहिल्यामुळे अशी कुठलीही बोली भाषा माझ्या तोंडी नाही हे आत्ता प्रकर्षानं जाणवलं.

ही वर्‍हाडी भाषा:

प्रसंग १.
आज तुमच्या घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूवरांकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे. हे सगळे उत्साही मंगल वातावरण तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून आमच्यापुढे साकार करायचे आहे.

मुलीची आई:
जाय बर बाबू वर्‍हात आली का पाय बर बाहेर जाऊन.
परमिला काळली का त्या हयद. हे घे ह्याच्यात भिजव.
उठा न व माय तू इथून.. काय मेंध्या घेऊन बसल्यात तुमी पोरी.. जायले यायले तरास होते नुस्ता.. अन त्या गोधळीले का ते फेदोळ लाऊन ठूलेत मेंदीचे.. माय मलेच धुवा लागन ना. पाह ही पोरगी आयकत म्हून नाहीच.

इतर बायकांमधील गप्पा:
मायबाई लय खपसुरत हाये वो नवरी. गोरीभराड.. लंबेलंबे केस.. नाक चरचर! कामाधंद्याल्ये पन बरी हाय म्हणतात.
काय नाव हाय तिच?
अनुया आहे मावशी.
मायबाई आजकाच्या पोरींचे नाव काहीतरी येगळे असतात बाई. अनुया, रिया, सिया .. काहीतरीच!!!!

मुलीचे वडीलः
अनुये.. चांगला संसार करजो. आपल्या घराच नाव काडजो. लळू नको. मी हाये ना! तूले कशालेच कमी पडू देनार नाही मी.
संत्या जाय बर आच्याराले सांग दहा मानसाचा गरमागरम चा पायजे म्हनून.
हे पोट्टे ना अजाबात आयकत नाही. कवापासून हा पोरगा शामियाना आनाले गेला तिकळेच अयकला.

मुलीची काकू:

मायबाई अनेची माय लय लुगडे आलेत वो तुले अहेर म्हनून. हे पाय निळ लुगड लाय चांगले हावे वो बाई ह्याचे काठ?
केवळ्याले वो ?
असंन पाचश्याले.
लय आवडल मायबाई मले.

====

प्रसंग १'लाच धरुन:

मायलेकीतील हा सोयरीकीचा संवाद वाचा:

लेकः काव मा, त्वा पायली का दगडू सराफाची पोरगी? गेलती न तू तिकडे?"
माय: अव मायबाई! हो म्या पायली पोरगी! गोरीभराड, उच्चीपुरी, चरचर नाकाची हाय अनं सैपाक पन लय चवदार करते बाई. लयचं चांगली पोरगी हाये. तू इचार ना तुया भावाले. तो पोरगा धुरतच नाही लगनाले. काय मुंजा रायते का .. काय बाई! म्या इचारल त हे पोरग तनतन घराबाहेर निंगून जात्ये."
लेकः काय नाव हाय त्या पोरीच अन् किती शिकलीसवरली हाय?
मायः परमिला नाव हाय. शिक्षणाच काय करा लागत्ये. पोरगी सातवा वर्ग पास हाय. सैपाकपानी, सडासारवन, घरच सबन काम करु शकते अशी हाये. पोरी भेटतात कुठ आजकाल. शिकलेली पोरगी पायजे नाई वं बाई माह्या घरात. पाह्यला नाही का काय झाल शेजारच्या कांबळ्याच्या घरात. आठ दिवस नांदली नाय सून."
लेकः हो न मायबाई ह्या शिकलेल्या पोरी अजाबात ऐकत नाही. अन हे पोरगी तू म्हनते दिशाले साजरी हाय. आजकाल साजर्‍या दिसनार्‍या पोरीतन काय नखरे करतात. पाह्यत नाही का तू आपल्या दिलप्याची बायको. काय मटकते बाई .. काय मटकते! इतकुले झाम्पर काय घालते. फदफद पावडर काय लावते. होटपालीस काय शिंपडते अंगावर. पाहवत नाई व बाई तिचा ताल. नदीवर येते कपडे धुवाले तर सासूचे कपडे फक्त पिळून काडते. अन तिचे कपडे घंटाभर घासत बसते. काय म्हशीसारखी जाडी झाली त्ये."

इतकुले झाम्पर काय घालते. फदफद पावडर काय लावते. होटपालीस काय शिंपडते अंगावर. पाहवत नाई व बाई तिचा ताल. नदीवर येते कपडे धुवाले तर सासूचे कपडे फक्त पिळून काडते. अन तिचे कपडे घंटाभर घासत बसते. >>> Lol

मस्त वाटते आहे वर्‍हाडी भाषा वाचायला!
काही काही शब्दही भन्नाट आहेत, जसे गोरीभराड, नाक चरचर...
होटपालीस म्हणजे काय?

बी! अफाट! अतिशय आवडले! काय गोड आहे Happy Happy
लोकांनी लिहा बाबा. आम्हाला असं येत नाही म्हणून आम्ही खंतावतोय इथे!

शैलजा, लिपस्टिक गं, (नेलपॉलिशसारखं ओठपॉलिश)
पण मग 'अंगावर शिंपडते'चं काय करायचं? :गोंधळात पडलेली बाहुली:

अस्सल लिहिलेस बी. सहीच अगदी. Happy

मस्त आहे हा उपक्रम. बोलीभाषा आणि त्यांतलं शब्दभांडार मराठी टिकवण्याच्या, वाढवण्याच्या दृष्टीने किती महत्वाच्या आहेत, हे ओळखून हा मनोरंजक खेळ ठेवल्याबद्दल संयोजकांचं मनापासून कौतुक. Happy

मी पण लिहिन अहिराणीत.

बी, किती सुंदर लिहिले आहेस !!
(या आमंत्रणाची का वाट बघत होतास ? स्वतंत्रपणे का नाही लिहिलेस आधी ?)

एखादा शब्द सोडला, तर अर्थ लावायला अजिबात त्रस होत नाही.

प्रसंग १. लग्नकार्य. भाषा- खानदेशात तसंच उत्तर नाशिक जिल्ह्यात बोलली जाणारी अहिराणी.
***

'नंदे, तू जल्दी लुगडं नेशी ले. आन दुसरं काईच काम नई कये तरीबी चालई, पन या पोर्‍या सम्हाळ तुन्हा. अख्खा घरभर सांजोरीस्ना चुरा. त्यास्ले लगीनना कपडा आवढात घालू नको. बारशिंगी पोर्‍या शेतस. टाळी लागापावत उखडा करी टाकतीन.' (वरमाय)
'गंप्या, या पोर्‍यास्ले मांडवात घी जाय रे. बकासूरनी अवलाद शेतस. निर्‍या काढी देशी माय तू माले?' (वराची बहिण सुनंदा. पण सारे नंदे किंवा नंदी म्हणतात. तिच्या अग्यावेताळ अन खादाड पोरांची नावं मात्र सनी आणि विकी अशी आधुनिक आहेत.)
'नंदाबोय, हात जोडीसन सांगस, तुन्हा पोर्‍यास्नं आज माले काईच सांगू नको. माले कामं शेतस. तो संज्या रामपारापशीन ब्यांडवालाले घेवाले जायेल शे. तठेच दारू पीसन उलथना व्हई ते अवघड शे. वर्‍हाडन्या गाड्या अजून उगवन्या नईत. आज एक ते मोठी तारीक शे. तीन गाड्यास्मा वर्‍हाड मायनं नई ते ऐन टाईमले जास्तीनी गाडी कोठेन पैदा करवा? दोन दिवसपशीन बापुले सांगी र्‍हायनू..' (वराचा लहान भाऊ गंपू)
'गंप्या, तू सुट आठेतून. गाड्यास्नं मी पाई घीसू. सैसानले आनखी येक ट्यांकर लागई पानीना. ते पाय जाय तू. मळामा चक्कर टाकाले सांग किशाले येक. त्या सालदारस्नी दाडगी भरा पयले. नंदे, चित्रेऽऽ त्या लुगडास्ना बोळा घीसन फिरा तुमी अजून चार तास हां. लगीन जाऊद्या तेल लावत. त्या पोर्‍यास्ले आवर तू पयलेऽऽऽ.' (वरपिता बापु. सूर- गेल्या चार दिवसांपासून आहे तोच. ओरडण्याचा.)
'माले खाई टाका तुमी आते. राक्षस बरा व्हई या पोर्‍यास्पेक्षा. सन्या, भायेर पळ तू पयले तुन पप्पाकडे. आठे दिस्ना ते मार खाशी आते. जिजी, माले निर्‍या काढी दिशी?' (सुनंदा. सूर- पोरांवर वैतागाचा. मग मावशीला अजीजीचा.)
'या मंडोळ्या काढी टाकू का? माई, मना कपडा कुठे शेतस?' (वर. स्वर- हताश. याचं सकाळपासून काहीच कुठे सापडत नाही, कुणी ऐकतही नाही. करवल्या म्हणवून घेणार्‍या साड्या नि मेकपमध्ये मग्न आहेत.)
'मन्या, पागल व्हयनास का? पोरीस्वो, नवरदेवनं कुवारं जेवण व्हयनं का? रखमे, शिरा शेवाळ्या अजून व्हयन्या नईत?' (वराची आत्या.)
'मन्या, हाऊ तुना कपडा शेवंतीना. लगीनना कपडा पारवर घालतंस, माईत नई का? नंदे, तुनं लुगडं पायखालऽऽऽ. आवर ते.' (वराची मावसबहीण. ही त्यातल्या त्यात आवरून तयार आहे.)
'नंदे, तुना नवरा बलाई र्‍हायना वसरीमा. आहेरनी अंगठी आतेच घालू का इचारी र्‍हायना..' (वराची चुलतबहीण.)
'आजना म्होत्रावर आनखी येक लगीनबी करी टाका सांग त्यास्ले. सव वरसं व्हयनात, पन गुढगाले बाशिंग अजून तशेच. अवघड माणूस शे खरं. मायवर जायेल शेतस सरा. रखमे, माले निर्‍या काढी दिशी का?' (सुनंदा. सूर- पहिला वैतागाचा, नंतर विनंतीचा. हिचा आता हा पॅटर्नच ठरून गेला आहे.)
'नंदे, तू तुन्तुनं लावू नको. तुनंतुनं तू आवर. त्या झितरा सावर. माले कुवारपनना सैपाक करना शे नवरदेवना.' (वराची आणखी एक चुलतबहिण.)
'तुमी बाया घोळ घालू नोका बरं आते. दिन्या, तुले तांब्यागलास घीसन भायेर धाडं ना? नारू, त्या आहेरना वस्तू नि लुगडास्ना गठ्ठा कुठे शेतस? गाड्या येयेल शेतीस. त्यास्मा टाका जल्दी..' (वराचा चुलता.)
'मनी माय तू, नंदे, तुनं लुगडं शे का झोपानी ताडपत्री? त्या पोर्‍यास्ले आवऽऽर!' (सुनंदेची लग्नाची साडी अख्ख्या खोलीभर लोळतेय. पोरं तिच्याशी खेळताहेत, लोळताहेत.)
'विक्याऽऽ, आय मरी खाई जावो तुले. रांडकीना चवनान्धवना! माय वंऽऽ, माले निर्‍या काढी देस का?' (सुनंदा. सूर- तेच दोन्ही.)
'तू, तुनं लुगडं आन तुन्या निर्‍या- दिसू नका माले आते घडीभर. माऽऽऽय, आठे पाट चौरंग व्हतं, कुठे शे? आन त्या गासोडा?' (वरमाय.)
'मना कुडता कुठे शे? माले खावाले मिळनार शे का नई?' (हताश नवरदेव.)
'चित्रे, ह्या निर्‍या धर तू जराशा..' (सुनंदा.)
'आवरा रेऽऽ. नऊ वाजनात. गंप्या, त्या बामनदादाले बलाव जाय. किशा, त्या डायवरस्ले घी ये तू आठे. तंबाकू आन चुना पुडीबी घी ये तवडी.' (बापु)
'माई, माले निर्‍या काढी दिशी का येवड्या?' (सुनंदा.)
'आरे, त्या मन्याले खाऊ घाला रे कुवारपननं जेवन..' (कुणीतरी आजी.)
'रखमे, माले निर्‍या धरू लाग जराशी तू..' (सुनंदा.)
'या पाच हजार ठेव तुनकडे. सैसानले हिसाब दे माले.' (वराचा मोठा चुलता.)
'माले निर्‍या काढी द्या कोनीतरी..' (सुनंदा.)
'चला रे, हला लवकऽऽर!' (नारू.)
'मन्या निर्‍या..' (सुनंदा.)
***

मराठी अनुवाद-

'नंदे, तू लवकर तुझी साडी नेस बघू. आणी दुसरं काहीच काम नाही केलं तरी चालेल, ही पोरं सांभाळ तुझी. अख्ख्या घरात करंज्यांचा चुरा. लग्नात घालायचे कपडे त्यांना एवढ्यात घालूस आणि त्यांना. बारशिंगी पोरं आहेत तुझी. लग्नाच्या मुहूर्तापर्यंत पार उकिरडा करतील.' (वरमाय.)
'गंप्या, या पोरांना मांडवात घेऊन जा रे. बकासूराची अवलाद आहेत. निर्‍या काढून देशील का आई तू मला?' (वराची बहिण सुनंदा. पण सारे नंदे किंवा नंदी म्हणतात. तिच्या अग्यावेताळ अन खादाड पोरांची नावं मात्र सनी आणि विकी अशी आधुनिक आहेत.)
'नंदाबाई, हात जोडून सांगतो, तुझ्या पोरांचं आज तरी मला काहीच सांगू नकोस. मला कामं आहेत. तो संज्या सक्काळपासून बँडवाल्यांना घ्यायला गेलाय. तिथेच दारू पिऊन लोळत बसला असेल तर अवघड आहे. वर्‍हाडाच्या गाड्या अजून उगवल्या नाहीत. आज एक तर लग्नाची मोठी तारीख. खूप लग्नं आहेत आज. तीन गाड्यांत वर्‍हाड मावलं नाही, तर ऐन वेळेला जास्तीची गाडी कुठून मिळेल? तरी दोन दिवसांपासून बापूंना सांगतोय मी..' (वराचा लहान भाऊ गंपू)
'गंप्या, तू सुट इथून. गाड्यांचं मी पाहून घेईन. संध्याकाळी आणखी एक जास्तीचा टँकर लागेल पाण्याचा. त्याची व्यवस्था कर जा तू. आणि त्या किशाला मळ्यात चक्कर टाकायला सांग. त्या सालदारांच पोट भरा आधी. नंदे, चित्रेऽऽ त्या साड्यांचे बोळे घेऊन तुम्ही फिरत राहा अजून चार तास हां. लग्न जाऊद्या तेल लावत. त्या पोरांना आवर तू आधीऽऽऽ.' (वरपिता बापु. सूर- गेल्या चार दिवसांपासून आहे तोच. ओरडण्याचा.)
'मलाच खाऊन टाका तुम्ही आता. राक्षस बरा या पोरांपेक्षा. सन्या, तू बाहेर जा आधी तुझ्या पप्पांकडे. इथे दिसलास तर मार खाशील आता. जिजी, मला निर्‍या काढून देशील?' (सुनंदा. सूर- पोरांवर वैतागाचा. मग मावशीला अजीजीचा.)
'या मुंडावळ्या काढून टाकू का? माझे कपडे कुठे आहेत आणि?' (वर. स्वर- हताश. याचं सकाळपासून काहीच कुठे सापडत नाही, कुणी ऐकतही नाही. करवल्या म्हणवून घेणार्‍या साड्या नि मेकपमध्ये मग्न आहेत.)
'मन्या, वेडा झालास का? पोरींनो, नवरदेवाचं कुवारं जेवण झालं का? रखमे, शिरा-शेवया अजून झाल्या नाहीत?' (वराची आत्या.)
'मन्या, हे तुझे शेवंतीच्या वेळचे कपडे. लग्नाचे कपडे पारावर घालतात, माहिती नाही का? नंदे, तुझी साडी पायाखालीऽऽऽ. आवर ती.' (वराची मावसबहीण. ही त्यातल्या त्यात आवरून तयार आहे.)
'नंदे, तुझा नवरा बोलावतोय तुला ओसरीत. जावयाला लग्नात मिळालेली अंगठी आताच घालू का विचारतोय..' (वराची चुलतबहीण.)
'आजच्या मुहुर्तावर आणखी एक लग्न करून टाका म्हणून सांग त्यांना. सहा वर्षं झालीत, पण गुडघ्याला बाशिंग अजून तसंच. अवघड माणूस आहे खरंच. आईवर गेलेत सगळे. रखमे, मला निर्‍या काढून देतेस का?' (सुनंदा. सूर- पहिला वैतागाचा, नंतर विनंतीचा. हिचा आता हा पॅटर्नच ठरून गेला आहे.)
'नंदे, तू तुणंतुणं लावू नकोस. तुझं तू आवर बघू. त्या झिपर्‍या सावर आणि. मला नवरदेवाचा कुवारपणाचा सैपाक करायचा आहे अजून.' (वराची आणखी एक चुलतबहिण.)
'तुमी बायका घोळ घालू नका बरं आता. दिन्या, तुला तांब्याग्लास घेऊन बाहेर बोलावलं होतं ना? नारू, त्या आहेराच्या वस्तू नि साड्यांचे गठ्ठे कुठेत? गाड्या आल्यात. त्यांत टाका लगेच..' (वराचा चुलता.)
'माझे आई तू, नंदे, तुझी साडी आहे का मांडवात टाकायची ताडपत्री? त्या पोरांना आवऽऽर!' (सुनंदेची लग्नाची साडी अख्ख्या खोलीभर लोळतेय. पोरं तिच्याशी खेळताहेत, लोळताहेत.)
'विक्याऽऽ, आईमरीने खाल्लं तुला, रांडेच्या, चव नाही अन धव नाही! आई गंऽऽ, मला निर्‍या काढून देतेस का?' (सुनंदा. सूर- तेच दोन्ही.)
'तू, तुझी साडी अन तुझ्या निर्‍या- दिसू नका मला आता थोडा वेळ. आणि पोरींनो, इथं पाट-चौरंग होतं, कुठे आहे? आणि इथली गाठोडी?' (वरमाय.)
'माझा कुर्ता कुठेय? मला खायला मिळणार आहे की नाही?' (हताश नवरदेव.)
'चित्रे, ह्या निर्‍या पकड तू जरा..' (सुनंदा.)
'आवरा रेऽऽ. नऊ वाजलेत. गंप्या, त्या ब्राह्मणदादांना बोलाव जा. किशा, त्या सार्‍या ड्रायव्हर लोकांना घेऊन ये तू. तंबाखू आणि चुन्याची पुडीही आण येताना.' (बापु)
'माई, मला निर्‍या काढून देशील का एवढ्या?' (सुनंदा.)
'अरे, त्या मन्याला खाऊ घाला रे कुवारपणाचं जेवण..' (कुणीतरी आजी.)
'रखमे, मला निर्‍या पकडायला मदत कर बरं जरा तू..' (सुनंदा.)
'हे पाच हजार ठेव तुझ्याकडे. संध्याकाळी हिशोब दे मला..' (वराचा मोठा चुलता.)
'मला निर्‍या काढून द्या कुणीतरी..' (सुनंदा.)
'चला रे, हला लवकऽऽर!' (नारू.)
'माझ्या निर्‍या..' (सुनंदा.)
***

Pages