मर्‍हाटी बोलु कवतुके

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 13:54

marahati_kavatuk_bw.jpg

आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्‍या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.

चला तर मग, तयारी करा आपापल्या मनाच्या कप्प्यात हळुवारपणे जपलेल्या बोलीभाषेला मिरवण्याची!

आपापल्या भाषेतली ही गंमत आपण अशी अनुभवणार आहोत-
१. आम्ही इथे काही काल्पनिक प्रसंग संक्षिप्तपणे दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला आवडेल तो प्रसंग निवडून तुमच्या बोलीभाषेत खुलवायचा आहे.
२. प्रसंग खुलवताना त्या भाषेचा लहेजा, त्या भाषेत वापरले जाणारे विशिष्ट शब्द खुल्या दिलाने वापरण्यात यावेत. त्या त्या गावाच्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन त्या संवादांतून व्हायला हवे.
३. एका आयडीने एकापेक्षा जास्त प्रसंगावर, एकापेक्षा अधिक बोलीभाषांमध्ये लिहील्यास हरकत नाही.
४. प्रसंग लिहीताना प्रसंगाचा क्रमांक, तुमच्या गावाचे आणि बोलीभाषेचे खास नाव असल्यास लिहायला विसरु नका.

* * * * * * * * * * * * * * * * *

प्रसंग १.
आज तुमच्या घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूवरांकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे. हे सगळे उत्साही मंगल वातावरण तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून आमच्यापुढे साकार करायचे आहे.

प्रसंग २.
कामानिमित्ताने/ शिक्षणानिमित्ताने/ लग्नानंतर तुम्ही दुसर्‍या देशी/गावी गेलात. खूप वर्ष उलटली. तुम्ही तुमच्या व्यापात रमून गेलात. अवचित तुम्हाला तुमची जुनी मैत्रिण वा जुना मित्र भेटतो. मग शाळेतील, कॉलेजातील, कॉलनीतील गप्पांना रंग चढतो.जुन्या मैत्रीच्या पुनर्भेटीचा हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतील वळणात लिहा.

प्रसंग ३.
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. तुमचा मोबाईल खाली पडतो आणि तो कुणीतरी उचलून त्याचाच मोबाईल आहे असे सांगतो. तुमचे नि त्याचे तिथे भांडण जुंपते. गोष्ट अगदी हमरीतुमरीवर येते. हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून लिहा.

करायची सुरुवात?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, वर्‍हाड चं नाव काहाडलं...
"चांगला संसार करजो. आपल्या घराच नाव काडजो. लळू नको" आणि "जाय बर बाबू .." निरा असली..
Lol

बी, साजिरा छानच.
होस्टेलमधे सहनिवासी असणार्‍या मित्रांच्या आठवणी तरळून गेल्या.

मला लिहायचं ते इथंच प्रतिसादात लिहायचं की नवीन ठिकाणी?
संयोजक कृपया मदत करा.

बी आणि साजिरा दोघांनी जबरी लिहिलय...

साजिर्‍या मोठं वाटत नाहीये... आणि विषय बघाता खरंतर अजून जास्त पण लिहिणे शक्य आहे..

दोन चार भाषांची सरमिसळ करुन लिहा कोणीतरी.. आपण फक्त वाचणार...

मस्त उपक्रम. बी, खूपच चित्रदर्शी संवाद!! कळायला अजिबात अवघड वाटले नाहीत.
साजिरा, ही भाषाही थोडी थोडी कळते आहे. तरी अनुवाद टाकाच प्लीज. Happy

मराठी अनुवाद त्याच पोस्टमध्ये टाकला आहे.

दिनेशदा, काही अहिराणी शब्दांचे अर्थ काहींना उत्सुकता म्हणून हवे असतील तर त्यासाठी. Happy

साजिरा, मस्त चुरचुरीत संवाद. Happy अनुवाद वाचला तेव्हा कुठे बर्‍याच वाक्यांचा अर्थ उमगला. पण मूळ बोलीत अर्थ फारसा न कळताही वाचताना मजा आली!

मस्त लिहिलय साजिर्‍याने. मजा आली.

बेळगावी मराठीत कुणीतरी लिहा. (श्या. मला बोलता येतय पण लिहिताना अर्धे शब्द कानडी. ते लोक बोलतातच पण तसंच. आमची कामवाली तिच्या लहान मुलीला घेऊन आली तेव्हा म्हणाली होती. "मळगाळाचे दिवस, ल्हान पोरीचं काम. ब्याडा ब्याडा म्हटलं तरी येती बघा" )

आणि गजालीवरून कुणीतरी मालवणीत लिहा ना.

अरे वा मस्त उपक्रम .. बी, साजिरा एकदम चुरचुरीत संवाद..
बाकीच्या पण बोलीभाषे मधुन येउ द्या
लक्ष्मण देशपांडेंच 'वर्‍हाड निघालं लंडनला' आठवल्यावाचुन राहवलं नाही Happy

टप्प्याटप्प्यावर होणारं मायबोलीचं बदलतं रूप अभिमानास्पद आहे. आज इतक्या दिवसांनी मायबोलीवरचे नवे नवे उपक्रम पाहून बरंच काही मिसल्याची जाणीव होतेय. या उपक्रमासाठी खूप सा-या शुभेच्छा !

हे माझ्याकडुन पण एकः
प्रसंग क्र.१.
गावाचे नावः धुळे
बोलीभाषा: अहिराणी

नवरीनी फुई(आत्याबाई): वं बहिनीओन! आटपा! नवरी तय्यार व्हयनी का? आणि ती रत्नी? तिले जास्त टाईम लागस नट्टापट्टाले! काम नैन धाम नै... नुसता नखराच दखा नटमोगरीना!

मोठी जाऊ(नवरीना 'माय'ले): का वं इजु? नवरदेवले ववाळाले ताट लिधं का? त्या मां तुपना दिव्वा लावाले इसरु नकोस बर्का! आन आक्पेटी नेमबंद ठी दे नैतं इसरी जाशी...अन मग तथा बोंब! तुले म्हाईत शे ना 'धल्ला' (धडला- म्हातारा) ना स्वभाव! आन जवाईले ववाळशी तव्हय डोक्यावर पदर घे जो!
नवरीनी मायः हां वं बाई! माले म्हाईत शे ना! ह्ये का पह्यलं लगन शे आपल्या घरमां...
एक करवली (मुसमुसत): वं माय मी आते काय करु? मन्ही नथ नई सापडी राह्यनी! कालदिन देव आणाले गयथु तव्हय तं व्हती नाकमां …
दुसरी करवली: बैगं! तुन्ह्या लुगड्यामां तं नै अडकनि? कालदिन तु ते जरीनं लुगडं घालेल व्हतं ना! त्यामां धुंडी ले तं पह्यले.
नवरीनी मावशी: आह्या माय वं! तुन्हा नाकमां तं दखी व्हती मी, तु बेळमाथनी पुजी राह्यन्थी तव्हय. कोन मरी जाय जो ना हात मां पडी व्हई ना तं कल्याण शे!
पहिली करवली: हाव ना व माय ! आते दिप्वॉळीले लिन्थी! यास्ले कळनं तं मन्ही काई खैर नई.
नवरीनी मायः हा वं बहीन्! जवाईले कळनं तं मग बसं व्हई गयं! आसा दांगडो घाली तो लगिनमां. आन दख तु...आथाईनच वापस जाई इले लिसन! आखो तिले आयुसभर डोस दीथीन तिन्हा सासरकडना लोके ... "भाउना लगिनमां गयी आन नथना आहेर करी उनी चोरास्ले.!!! " तुले सांगस.. हाई शुभीना नवरा भलता आग्यायेताळ शे! एक येळ इस्तव हातमां धरी जाई पन ह्यास्ना सोभाव ना ... बाप रे बाप! शुभे, तु आतेपुरती मन्ही नथ घाली ले बईन! पन त्यास्ले आतेच नको सांगु!

इतक्यात सासुरवाशीण कस्तुरा गावावरुन येउन पोचते. आल्याआल्याच आईच्या गळ्यात पडते.
"माय वं, अण्णाले पह्यलेच सांगं व्हतं मी की मन्ह्या नंदासकडं (नणंदा) बी निवतं धाडनं पडी, पन त्यास्ले पत्रिका नै मियनी आतेपावत. तं मन्ही सासु कितली बोलनी माले, म्हाईत शे का? की इन्हा मायबापले काही वळनच नै शे तं पोरले कसं व्हई?, आनि इन्हा बाप तर नाक वर करीसन बोलस.. आसं आनि तसं...!" तु आते ना आते शरदले (चुलतभावाला) गाडी लीसन धाड आणि मन्ही नणंदले ली ये म्हना! माले काई म्हाईत नै...
नवरीनी मायः का वं कस्तुरा? माले एक सांग, तुन्ही नणंदना देरना (दिराच्या) लगनमां आम्हले निवतं धाडं व्हतं का?आन मंग आते कसा बोलतस तुन्हा सासरकडना? हाई दख! आते तुले खमकी व्हयनं पडी. ४ साल व्हई ग्यात लगनले...

नवरीना बापः आटपा आटपा... तठे नवरदेव ई लागना पारवर आनि तुम्ही काय चावळी राह्यनात आठे? हाऊ बबन्या कोठे शिलगना? वर्हाडना स्वागत कराले फुलमाळा सांगन्या व्हत्या मी कोपर्यावरन्या फुलवालाले! लेवाले ग्यात का कोन? तो सत्या, आज्या तर काई कामनाच नै शे!
त्या वाजावाला, पोटझोड्या उनात का? त्याले म्हना नेमबंद वाजवा, नवरदेवकडना वर्‍हाड पोची राह्यनं ! कव्हय जाई हाई 'सुख्या' आते पारवर? त्यान्हाबरोबर कोन जाई राह्यनं? शेवंता, धुरपदा,कली तुम्हन्या पोरेस्ले धाडा बरं सुख्याना बरोबर!

बबन्या: हाई काय ई राह्यनु हार लीसन! घ्या वं बहिनीओन... गजरा बांधा!

नवरीना काका(नवरीना बापले): दादा, मानकर्‍यास्नी लिश्ट व्हई ना? हाई नारय आनेल शेतस..,. नेमबंद मोजी ल्या बरं! पंगतीमां त्यास्ना ताटेसले लावाना शेतस!

नवरीनी आजली (आज्जी) : तेलनपापड्या लिध्यात का? आन सांजोर्‍या? त्या परमिलाले इचार बरं! गिरजे... नवरदेवले पारवर देवाले दुधशेवाया ली ले तं ताटमां!
नवरीची आई: हाओ आत्याबाई( सासुबाईला आत्या म्हणतात)! लिधं बरं मी बठ्ठं सामान!
नवरीना काका: चला चला..गाडीमां बठी ल्या!

नटमोगरी.. पोटझोड्या.. मस्त आर्या! Happy मस्त कार्य काढलंस.

त्या त्या लहेजात, हेलात, टोनमध्ये ऐकायला मिळायला हवं हे सगळ्यांना. मग प्रादेशिक बोलीभाषांचं खरं ऐश्वर्य जाणवेल. Happy

छान आहे कल्पना.

बी, साजिरा, आर्या, मस्त एकदम. मजा आली. Happy

बी, संवाद वाचताना मला मकरंद अनासपुरे बोलतोय असंच वाटत होतं सारखं! आणखीही स्वतंत्र लिही.

धन्यवाद सर्वांना! Happy
हो रे साजिरा! प्रत्येक बोलीभाषेचा एक खासच लहेजा असतो. दिनेशदांनी सांगितलेली ऑडीओ फाईलची आयडीया मस्त आहे.

अहिराणी मराठी आणि गुजराती दोघींचा हात धरून चालते का?
लिधं म्हणजे घेतलं, ताटमा म्हणजे ताटात, शे : आहे, नवरीनी: नवरीची, ली ये : घेऊन ये असे अर्थ आहेत का? हे थेट गुजरातीतून आल्यासारखं वाटतंय!
लीसन म्हणजे काय?

Pages