मर्‍हाटी बोलु कवतुके

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 13:54

marahati_kavatuk_bw.jpg

आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्‍या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.

चला तर मग, तयारी करा आपापल्या मनाच्या कप्प्यात हळुवारपणे जपलेल्या बोलीभाषेला मिरवण्याची!

आपापल्या भाषेतली ही गंमत आपण अशी अनुभवणार आहोत-
१. आम्ही इथे काही काल्पनिक प्रसंग संक्षिप्तपणे दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला आवडेल तो प्रसंग निवडून तुमच्या बोलीभाषेत खुलवायचा आहे.
२. प्रसंग खुलवताना त्या भाषेचा लहेजा, त्या भाषेत वापरले जाणारे विशिष्ट शब्द खुल्या दिलाने वापरण्यात यावेत. त्या त्या गावाच्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन त्या संवादांतून व्हायला हवे.
३. एका आयडीने एकापेक्षा जास्त प्रसंगावर, एकापेक्षा अधिक बोलीभाषांमध्ये लिहील्यास हरकत नाही.
४. प्रसंग लिहीताना प्रसंगाचा क्रमांक, तुमच्या गावाचे आणि बोलीभाषेचे खास नाव असल्यास लिहायला विसरु नका.

* * * * * * * * * * * * * * * * *

प्रसंग १.
आज तुमच्या घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूवरांकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे. हे सगळे उत्साही मंगल वातावरण तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून आमच्यापुढे साकार करायचे आहे.

प्रसंग २.
कामानिमित्ताने/ शिक्षणानिमित्ताने/ लग्नानंतर तुम्ही दुसर्‍या देशी/गावी गेलात. खूप वर्ष उलटली. तुम्ही तुमच्या व्यापात रमून गेलात. अवचित तुम्हाला तुमची जुनी मैत्रिण वा जुना मित्र भेटतो. मग शाळेतील, कॉलेजातील, कॉलनीतील गप्पांना रंग चढतो.जुन्या मैत्रीच्या पुनर्भेटीचा हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतील वळणात लिहा.

प्रसंग ३.
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. तुमचा मोबाईल खाली पडतो आणि तो कुणीतरी उचलून त्याचाच मोबाईल आहे असे सांगतो. तुमचे नि त्याचे तिथे भांडण जुंपते. गोष्ट अगदी हमरीतुमरीवर येते. हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून लिहा.

करायची सुरुवात?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून धन्यवाद सगळ्यांना. मी ते रात्री इतक गडबडीत लिहिलं कि अजुन वाढवायची इच्छा असुनही वेळ मिळाला नाही. मला वाटल आज शेवटचा दिवस आहे लिहायचा. Happy
आता बाकीच्यानी लिहिलेलं वाचते.

अरे मी मिसले हे.

मी पुण्याची बोलीत राईट अप केल असते की... अपनेको जमेगा मस्त हे असले लिहायला. पण आता फिनिश झाली ना डेट...?
संयोज़क, काय डेट आहे लास्ट पाठवायची...

Happy

झंपी , अगं लिही. वरती बिल्वाने लिहिलयं बघं अजुन वेळ आहे. इथेच लिही. पाठवायचं वगैरे नाहीये कुठे. Happy

मस्तच आहे हा उपक्रम....
सर्वांनीच धमाल लिहिलेय अगदी.... जरी हे ऑडिओ स्वरूपात नसलं तरी भाषेमुळे देखिल वाचताना तो हेल जाणवतो...... ऑडिओ ऐकायला अजून मजा येईल...

<<नदीवर येते कपडे धुवाले तर सासूचे कपडे फक्त पिळून काडते. अन तिचे कपडे घंटाभर घासत बसते.>> मस्तच.... संपूर्ण संवाद वाचताना डोळ्यांपूढे लक्ष्मणराव देशपांडे उभे राह्तात.

साजिरा, अनुवादामुळे प्रसंगातली गंमत पण कळली.... अक्षरशः 'लगीनघाई'... लग्नघरात असाच कल्लोळ चालू असतो चहूबाजुंनी Lol

Rofl
एकदम धमाल लिहीलय सगळ्यांनी. बीने तर एकदम कहरच केलाय.
कित्येक महिन्यांनी माबोवर आल्यावर ही एकदम झक्कास मेजवानी मिळाली.

Ya dhagyat 'bee' la hi ek dairy milk deun taka saglyanna hasavalya baddal Happy

सगळ्यानी मस्त लिहिलय. Lol
अशोकमामा कोल्हापुरी मुसलमान बोलतात त्याला आम्ही बागवानी म्हणायचो.
ऐकायला गोड वाटतात बोलीभाषा. Happy
खुप कल्पक आणि उत्तम उपक्रम आहे हा. सन्योजक धन्यवाद. Happy

हसून हसून मेले मी! Rofl

सगळ्याच एन्ट्र्या अफलातून आहेत! बी, साजिरा, मी_आर्या, सीमा...... धम्माल करताय! Lol
कुणाला येत असेल तर कोकणी मुसलमानांच्या भाषेतपण लिहा ना..... आणि बाणकोटी भाषेत वगैरेपण....

झकासराव ~ बिलकुल वो बागवानीच है ! मैने मुस्लमानी ऐसेकू बोल्या की ह्यांके सबी बागवान लोगा पैले मुसलमानीच हुते है |

तुमकू ह्यांका अकबर मोहल्ला मालूम होंगा. इधर रैते हे लोगा ज्यादाकरको | लै अच्छे है. गणपती भी बिठाते है अपने गल्ली मे |

ए बाई फोन न्हायी देत तर फ्रेंडशिप देतीस का ? >>> Rofl

अरे, गजालीवाले कुठे दडून बसलेत? जा-जू, साताक्रा, नीलू, देसाई बंधू ??

संयोजक, हा उपक्रम काही दिवस अजून चालू राहू दे. इतक्यात बंद करू नका.

अशोक, सिंडरेला
दोघांचे उतारे मस्त. आता खरं तर दोन बोलीभाषा बोलणारे आमनेसामने आले तर
काय होईल, असा उतारा पाहिजे.

अशोक :
यु. म. पठाण यांच्या काही कथा आहेत अशा भाषेत.
जितराब नावाच्या कथेतला एक संवाद तर अजून आठवतोय मला.

बंच्चांदाकी याद आतीया न्हवं, मुजेबी आती. पर किसे कैते ? अल्लामियॉंने अपने नसीबमे उनका सूकच नई लिखा हय.

माझ्या आजोळी पण ते लोक अशीच भाषा बोलतात. मला तर अर्थच लागत नाही, कधी कधी.

उदा. जाने वकुत आने होना चा अर्थ, जाताना एक फेरी मार.. असा होतो.

जबराट........ !!
बी, आर्या, सीमा, साजिरा.......... झकास........ Happy
उपक्रमाची कल्पना लय भारी !!

अजून आहे ना उपक्रम ? मराठवाडी भाषेत लिहायची जबरदस्त इच्छा होतेय ,२ रा प्रसंग , अगदी योगायोगाने मागच्याच आठवड्यात घडला.
औबादच्या एका मित्राने जवळ जवळ १३/१४ वर्षांनी फोन केला, "काय राव घंटाभर फोन लावतोय, ओळख कोण" एका झटक्यात ओळखल मराठवाडी स्टाईल वरुन Happy

होय दिनेश ~ तुम्ही सुचविता तसा एक प्रयोग [काल्पनिक का होईना] घडायला हवा इथे.

मी स्वतः पठाणसरांच्यासमवेत त्यांनी कथेत वापरलेल्या भाषेत संभाषण केले होते. धमाल आली होती. त्याना मी 'अकबर मोहल्ला' आणि "डॉ.झाकीर हुसेन प्रा.शाळा' परिसरात वाढलो होतो हे समजल्याक्षणी त्यानी झटदिशी 'अरे इस्कीमें फिर तू आप्पुनके साटपेमे काच है तो !" अशी मिश्किल स्वरातील आपुलकी दाखविली.

इथे "साटपेमे" म्हणजे 'गट्ठ्यातील, ग्रुपमधील'

"इस्कीमे' ला तसा थेट काही अर्थ नाही, पण ज्यावेळी आपण मराठीत उद्गारतो, "अरे, च्यामायला....तू आमच्याच पट्ट्यातील की भावा' असा सूर ध्वनीत होतो.
"आच्चुंदे = असू दे !" हे तर हरघडी इथे उच्चारले जाते.

येस्स : 'वकूत' मला माहीत आहे = वक्तचे बागवानी रूप = "जातेवेळी एक फेरी मार" या अर्थाने. येताना म्हणायचे असेल तर मग अर्थातच 'आने वकूत'.

"मगरीब वकूत आऊ नको रे !" = 'संध्याकाळच्या वेळेला येऊ नको रे !" ही एक इथली कायमची सूचना असते, पै पाहुण्यांसाठी.

मला यांच्यातील 'मुडदा बशिवला तिचा...." याचे बागवानी रूप फार आवडते.
"जनाजा धुलाया उसका" : जनाजा म्हणजे प्रेत वाहून नेण्याची पेटी हे माहीत होते. पण 'धुलाया = धुणे' याचे प्रयोजन कशासाठी याचा पत्ता लागत नव्हता, तो डॉ.झाकीर हुसेन स्कूल (उच्चारी इस्कूल) मधील एक शिक्षक रहमतमिया शिकलगार यानी सांगितला. कबरस्थानात प्रेत पुरुन झाल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मौलवी तो 'जनाजा' समोर उघडा ठेवून काही सुरती [धार्मिक ऋचा] पुटपुटतात व पेटीच्या आतील बाजूवर पाणी शिंपडतात. म्हणजे ती पेटी 'नव्याने' कामाला सज्ज ठेवण्याचा प्रघात झाला. आता गल्लीतील वादात एखादी बेगमसाहीबा दुसरीसाठी 'तेरा जनाजा धुलाया' म्हणते याचा अर्थ 'तुला तर पुरलेच पण तुझी आठवणही आता ठेवत नाही' अशी शापवाणी उच्चारते.

फार छान आहे लहेजा या मराठी-मुस्लिम बोलीचा.

अशोक पाटील

मराठी-मुस्लिम भारी आहे अशोक. ऐकलं आहे मी अनेक वेळा. गोड असतं अगदी. वरचं स्पष्टीकरणही इंटरेस्टिंग आहे. Happy

ए बाई फोन न्हायी देत तर फ्रेंडशिप देतीस का ? >> Lol

प्रसंग २
बोलीभाषा: रत्नागिरीमधली मुसल्मानी बोली. या बोलीची सर्वोत्कृष्ट नक्कल ऐकायची असेल तर पुलंची म्हैस ही कथा जरूर ऐका. Happy

या संवादासाठी मला मदत करणार्‍या लाडकीचे भरपूर आभार. Happy तिच्यासारखी मैत्रीण मला मिळाली हे तिचे नशीब!!!!! Proud

===============================================

रस्त्यावरशी सलमान जाताना बाईकवरशी जानारो सैफ त्याला बघते. बाईक थांबन त्याला साद घालते.

"सल्लूभाय. सलाम वालेकूम"
"वालेकूम अस्सलाम. सैफू, तू हिकडे खय?"
"हिकडे माझ्या बायकोचा घर हय"
"आयला, हे मला कसा नाय म्हायती. किती दिसानी मिल्लोस. बोल काय बोलतस."

"काय सांगू? मुंबयलाच हव मी. आनखीन जाईन खय? "
"येवडो कंटालून नुको बोलू. चल, च्या पीत पीत बाते करू.

दोघेहीजण रस्त्याच्याकडेला असलेल्या टपरीवर कटिंगची ऑर्डर देतात. मग सैफ म्हणतो.

"कॉलेज खपल्यावर आपुन मिल्लूच नाय ना ."
"मंग काय? तवा आपुन हर वर्सा मिलूचा प्लान केलो होतो. पन कोनपन मिलत नाय".
"तुजा बेस हय तू गावाच्या भार तरी गेलोस. मी हिकडेच लोकाना एलाअयसी ईकत बसलू हव."
"का? तू दुकान टाकला होतास ना?"
"आग लागली दुकानाला. हिकडे गांवात मोबाईलचा दुकान चाल्ला असता. किरानाच्या दुकानाला गिराईकच खय येतात आजकल"
"चालूचाच रे. धंदा बोल्लु की अप्स डाऊन्स येतातच"
"ते सगला जावदे. किती दिस हैस तू हिकडे? सगल्या दोस्ताना आपवून बेस पार्टी करू या"
"हे बेस हय. मी चारपाच दिस हौ. मंग परत मुंबयला. तू प्लान कर मंग. त्याच्या अदी माला गावची खबरबात सांग".
"सांगन्यासारका कायपन झैला नाय. कपडादुकानवाल्या तेजवानी मालकाची बायको पलून गेली. मंग बाजुच्या गावात गावले. पेपरात अयला होता सगला. नी तुला शब्बो यादात है? ती हल्ली प्लेनमदा वेटरचा काम करते. आपलो अफझल गेलो ना कुवेतला त्याच्या प्लेनमदा होती. वलक पन नाय दाखवलान तिनी. गावात ऐली की मिस इंडियासारके नकरे करत फिरते."

"ती कॉलेजात असताना कमी नकरे करत होती काय? अनि तिचो तो दोस्त".
"कोन? प्रसाद पुरोहित? त्याची शादी झैली. पुन्यातची बायको. कंटाललोय बिचारो. करेल तरी काय रोज डाल धान खावका लागतय बिचार्‍याला. माज्या घरा पार्टीला कोन नाय आयला तरी तो नक्की येल. "
"ती पाटील पन पुन्यात असते ना ?"
"पुन्यात? चल!! ती अमेरिकेला असते. घोस लंडनाला. सासूस अनि सासरोस दिल्लीला. ती ग्लोबल फॅमिली हय. पोरा झैली की वाटते नॉर्वेचा व्हिसा काडतील."
"नार्वे हिकडशी शंभर किमी अशेल त्याला व्हिसा किनाला"
"टकला तुझा. सिंधुदुर्गातचा नाय युरोपमनचा नॉर्वे. 'मध्यरात्रीच्या सूर्याचा देश' असा शालेत वाचलास ते यादात नाय काय?"
"पन सूरज असेल ते त्याला अर्धीरात कसा बोलूचा? आपले भूगोलाचे सर खुलेच होते. काय्पन शिकवत. "

"मुंबयला र्‍हेनपन तू अजून डफ्फरच हैस. जरा जगात काय काय होतय ते ऐकत जा."
"ऐकुका टाईम खय हय. सारका कामच काम असते"
"हा बराबर. अमी काय खालीच अस्तु. आमशी काय टाईमच टाईम."
"ते सगला जावदेत खड्य्यात. माला अदी सांग. गावातच्या त्या चिकनी चमेलीचा मोठा लफडा झैला होता ना?
लफडा काय..मोठा झोलच झैला होता. तुला काय म्हाईतीच नाय काय? पोर्‍या अजून ईक कटिंग दे."

इथून पुढच्या गप्पा सेन्सर्ड आहेत.
Proud

Lol सगळेच भारी. कोल्हापुरी आणि कोकणी मुस्लीम भाषा वाचताना मज्जा आली.
@ सिंडरेला .... फोन नाही तर फ्रेंडशीप ... Biggrin

आर्या, अशोकराव, नंदिनी एकदम मस्त! खूप भराभर बोलतात हे मराठी-मुस्लिम. शब्द मराठी असले तरी पटकन समजत नाही.
सिंडे, फ्रेन्डशिप काय थेट? Lol

हे असेच उगाच-- सिंडीने केलेल्या नगरी भाषेत एक शुद्ध मराठी भाषा. प्रताधिकार सिंडरेला Happy
खरं तर ह्यात काहीच विशेष वा वेगळं नाही. केवळ गंमत.
--
बुवा: काकू, शुकशुक. अहो. काकू, तो फोन पडला आहे पहा तिथे..
बाई: ऑ ? काय म्हणला रं बाबा ?
बुवा: तो तिथे फोन पडलाय ना. तोऽऽ पहा तिथे तुमच्या शेजारी. तो देता का जरा?
बाई: ह्यो ? फोन ?
बुवा: बरोब्बर. तोच फोन. देता का तो कृपया?
बाई: ऑ ? माह्यावाला फोन कामुन देऊ म्हंतोस ?
बुवा: अहो काकू. आत्ता माझ्या खिशातून तो फोन पडला तिथे. तुमचा फोन कशाला मागू मी? माझाच फोन आहे तो. देता का मला परत?
बाई: आरं बाबा गाडी चालना म्हुन कहाडला पिशवीतनं. ल्योक डोळं लावुन बसला आसल घरला
बुवा: नाही, ते सगळं ठीक आहे. पण माझा फोन आहे तो. द्या मला.
बाई: बाईमान्सास काय म्हुन तरास देऊन र्‍हायलास रं बाबा ?
बुवा: त्रास काय दिला काकू? हे पहा. मी सभ्यपणे तुम्हाला सांगू पहातोय मगाचपासून की तो जो फोन आहे तुमच्या शेजारी पडलेला तो माझा आहे. तो मला परत द्या. तर तुम्ही निष्कारण त्याला वेगळं वळण लावत आहात. माझी तुम्हाला त्रास द्यायची मुळीच इच्छा नाही. तर तुम्हीच माझा फोन परस्पर लांबवण्याचा हेतू बाळगून आहात की कसे असा मला संशय येत आहे. द्या आता माझा फोन मला परत.
बाई: आ-त्ता ? माज ल्योक शेरातुन घेऊन आला फोन. अस्सा दिन व्हय कुनाला बी...
बुवा: आता हे फार होतंय! हद्द झाली. मला ह्याबद्दल तक्रार करायला भाग पाडताय तुम्ही. इतक्या थराला खरं म्हणजे जायला नकोय हे. त्यापेक्षा सरळपणे मला तो फोन द्या. नाहीतर..
बाई: न्हाय तर काय रे करशील ? बघुं दे मला बी काय करशील. पाटील आसशील तुझ्या गावचा.
बुवा: अहो काकू. समजून घ्या. पाटील कसला? साधा नोकरदार माणूस मी. आत्ता पडला हो सर्वांसमक्ष माझा फोन तुमच्या शेजारी. द्या तो. हेच न्याय्य आहे.
बाई: डोळं फुटलं काय रं टकुरड्या तुझं ? पिशवीतुन काढला म्हंणलं ना
बुवा: आरडाओरडा करणे व्यर्थ आहे. त्यापेक्षा आपण त्या फोनवरून तुमचा नंबर फिरवून पाहूया. घ्या तुम्हीच तो हातात. हो घ्या. मला नका देऊ. हं, आता तुमचा नंबर फिरवा. पाठ आहे का? नाही. आता काकू डायरी काढणार. चष्मा काढणार. पण झटकन मला फोन देऊन विषय संपवणार नाहीत. चालूद्या तुमचं. स्टॉपला वेळ आहे माझ्या.

काकू चष्मा काढत असताना त्यांना पिशवीत त्यांचा फोन दिसतो.
बाई: आरं पोरा. हाए बग माजा फोन हितंच. मी तर हा माजाच समजून बसले रे बाबा. अरे एकसारकेच दिसतात, बग तरी. घे रं बाबा तुजा तुला परत.
बुवा: अंबाबाईचीच कृपा. नाहीतर नसता तंटा झाला असता. आणि काकू, हा लहान तोंडी मोठा घास होतो आहे.. पण, दुसर्‍याचं मुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही असंच झालं नाही का हे? तरी, धन्यवाद. आणि आशीर्वाद द्या.
बाई: तू काय बोलला काई समजलं न्हाई बग, पर पोरा सग्ळं तुज्या मनासार्क हुईल बग.
---

नंदिनी, मस्त!

'एक डाव धोबीपछाड' सिनेम्यात विनय येडेकरच्या तोंडी अशीच भाषा आहे.
तो सबंध सिनेम्यात वेगळ्यावेगळ्या मराठी बोलीभाषांचा मस्त वापर केला असा साक्षात्कार मला आत्ता नंदिनीची पोस्ट वाचून झाला Wink विनय येडेकर, सुबोध भावे, प्रसाद ओक, अशोक सराफ, मुक्ता बर्वे किंवा अगदी स्मिता तांबेनेही मस्त उच्चार केले आहेत त्यांनी रंगवलेल्या पात्रांच्या विविध बोलीभाषांचे.

अशोक, मस्त स्पष्टीकरण.
नंदीनी, हा नमुना पण मस्तच.
बेळगावी नमुना कधी येतोय.

मी बेळगावाला, एक तूकडा ऐकला होता ?
एक बाई दुसरीला विचारत होती,

का गा, कुटं चाल्याली ?
शेताकडं जातू या !

असे काहितरी.
---------
आपल्याकडे वसई भागातले कुणी नाही का ?
तिथल्या इस्ट इंडियन लोकांची भाषा पण खास असते.

हटं कटं ? कवर्‍याला घेतरी गं केरी तू ? (इकडे कुठे, केवढ्याला घेतलीस हि केळी ?)

प्रचंड धम्माल उपक्रम आहे हा! प्रसंग पण भारी दिलेत आणि सगळे संवाद पण अफाट! Happy

दादा कोंडकेंच्या सोंगाड्या चित्रपटातलं 'बिबं घ्या बिबं, शिककाई' हे गाणं आठवलं. सगळे लग्नप्रसंग तर हमखास 'बुंग' ची आठवण करुन देणारे.म़जा आली वाचताना. ऑडिओची कल्पना पण आवडली. Happy

नवरा मुलगा मारुतीच्या दर्शनाला गेला आहे. त्यावेळचा हा वधुपक्षाकडचा २-३ मिनिटाचा संवाद नागपूरीमध्ये.

नवर्‍या मुलीचे काका (यांचं नाव देवराव): नवरदेव अर्ध्या तासात वापस येइन अन आपल्याकडचे पोट्टे तं इडल्याच खाऊन राहिले अजून. एकजन कामाचा न धामाचा. सकाड पासनं पाहून र्‍हायलो, कोनी केसं सरडच करते तं कोनी जेल्-फ्येल लाऊन चिपकऊन टाकते. नुसते झामल झुमल करुन र्‍हायले.. काय बे ए जितेंदर, हारं आनले का फूलवाल्याकडून?

जितेंदर: आनले नं पप्पा. तुमी आत्तापासुन कशाला किटकिट करुन रायले? भाऊजीकडचे पोट्टेसोट्टे घंटाभर तरी बारातीत नाचतीन मंगच येतीन मांडवात. तिकडे पंडितजी पूजा मांडून रायले, तिकडे पहा नं सगडं ठीक आहे का ते..
देवराव: आता हे कालचे पोट्टे मला आरडरी देऊन रायले पहा. आवं जितेंदरची मम्मी, तिकडे मांडवात पूजा-गिजा मांडून झाली का पाहून या.

नवर्‍या मुलीची आजी: कोन भांडून रायलं मांडवात?
जितेंदरची मम्मी (सुरेखा): कोनी तं नाई वो.
न.मु.आजी: नाई तो जितेंदर अन देवराव काय तरी म्हने पूजा आन कोनीतरी भांडून रायली मनून
जि.मम्मी: आवं भांडून न्हाई मांडून म्हने ते.
न्.मु.आजी: काय बोलते वं तोंडातल्या तोंडात? ही वाली सूनबाई मुद्दामच हडू बोलते मले कडू नाई म्हनुन..देवराव, कोनी भांडून रायलं का मांडवात?
देवराव: आँ? मले तर न्हाई माईत. जाऊनच बघतो एकेकाला.

जितेंदर: सोनुभैया, ते बुडी नुसती मधात मधात सवाल करत रायते तिला जरा भाएर घेऊन जाशील यार.
तिच्यासमोर बोलनं म्हनजे आ बैल मुझे मार. भौत्तीच परेशानी है यार!
सोनुभैया: छोड न बे.. मले पन टाइम न्हाई. मी पुर्न मकानाच्या चाब्या सांभाडून रायलो.
न.मु.आजी: कोन बाब्या आला का?
सोनुभैया: कोन बाब्या?
न्.मु.आजी: भैताड! तु च तर म्हने की बाब्या आला..
जितेंदर: हे भगवान! तू भाएर जाऊन बसून जा नं वं माय.. आयकु येत न्हाई तर सवाल कायले करते पुन्ना पुन्ना?
(हे मात्र आजीबाईला बरोबर ऐकू येते)
न्.मु.आजी: सगडं बराबर आयकु येते मला. माह्येवाले कान तुमच्यावाल्या कानाहून जादा चतरे हाएत. अन भाएर बसून र्‍हायला मी कामातनं गेली आहो का रे ? मीनं माह्यावाल्या सात पोट्ट्यांचे लगनं केले हाएत. धा धा किलोच्या शेवळ्या, धा किलोच्या कुरड्या आजपन करुन टाकते मी. तुमच्या मायसारकी न्हाई "मले पहा न फुलं वहा" .........इ....इ... Wink

Pages