मर्‍हाटी बोलु कवतुके

Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 13:54

marahati_kavatuk_bw.jpg

आपली बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते आणि या प्रत्येक बोलीभाषेची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकीचा आपापला असा गोडवा, ठाशीवपणा, तिखटपणा, लहेजा आहे. मायबोली वर साजर्‍या होत असलेल्या 'मराठी भाषा दिवस २०१२' च्या निमित्ताने आपण अनुभवणार आहोत बोलीभाषेचा ठसका.

चला तर मग, तयारी करा आपापल्या मनाच्या कप्प्यात हळुवारपणे जपलेल्या बोलीभाषेला मिरवण्याची!

आपापल्या भाषेतली ही गंमत आपण अशी अनुभवणार आहोत-
१. आम्ही इथे काही काल्पनिक प्रसंग संक्षिप्तपणे दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला आवडेल तो प्रसंग निवडून तुमच्या बोलीभाषेत खुलवायचा आहे.
२. प्रसंग खुलवताना त्या भाषेचा लहेजा, त्या भाषेत वापरले जाणारे विशिष्ट शब्द खुल्या दिलाने वापरण्यात यावेत. त्या त्या गावाच्या संस्कृतीचे, परंपरेचे दर्शन त्या संवादांतून व्हायला हवे.
३. एका आयडीने एकापेक्षा जास्त प्रसंगावर, एकापेक्षा अधिक बोलीभाषांमध्ये लिहील्यास हरकत नाही.
४. प्रसंग लिहीताना प्रसंगाचा क्रमांक, तुमच्या गावाचे आणि बोलीभाषेचे खास नाव असल्यास लिहायला विसरु नका.

* * * * * * * * * * * * * * * * *

प्रसंग १.
आज तुमच्या घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूवरांकडची सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत. आहेर, मेंदी, हळद लावणे, उखाणे, पंगती, रुसवेफुगवे सगळे छोटे छोटे कार्यक्रम बघावयास मिळत आहेत. अगदी लगीनघाई चालली आहे. हे सगळे उत्साही मंगल वातावरण तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून आमच्यापुढे साकार करायचे आहे.

प्रसंग २.
कामानिमित्ताने/ शिक्षणानिमित्ताने/ लग्नानंतर तुम्ही दुसर्‍या देशी/गावी गेलात. खूप वर्ष उलटली. तुम्ही तुमच्या व्यापात रमून गेलात. अवचित तुम्हाला तुमची जुनी मैत्रिण वा जुना मित्र भेटतो. मग शाळेतील, कॉलेजातील, कॉलनीतील गप्पांना रंग चढतो.जुन्या मैत्रीच्या पुनर्भेटीचा हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतील वळणात लिहा.

प्रसंग ३.
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात. तुमचा मोबाईल खाली पडतो आणि तो कुणीतरी उचलून त्याचाच मोबाईल आहे असे सांगतो. तुमचे नि त्याचे तिथे भांडण जुंपते. गोष्ट अगदी हमरीतुमरीवर येते. हा प्रसंग तुम्ही तुमच्या बोलीभाषेतून लिहा.

करायची सुरुवात?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट आहे हा उपक्रम. Lol

बी, साजिरा, आर्या...मस्तच. Happy
सीमा, एक खूप जवळचा मित्र कोल्हापूरचा आहे. त्याची आठवण आली एकदम. Happy

हेहेहेहेहेह्....मस्तच मेजवानी मिळतीये! एकेक भाषेतली. Lol
मामी...खान्देशात २च जिल्हे. धुळे हे गुजराथ सीमेवर आहे तर म.प्र. सीमेला लागुन जळगाव जिल्हा आहे.म्हणुन धुळ्याची अहिराणी गुजराथी मिश्रीत आहे तर जळगावची हिन्दी मिश्रीत. Happy

प्रसंग ३:
गावः धुळे
भाषा: अहिराणी

दशरथभौ : तात्या! काय धडशा मारी राह्यनात मांगे! तठे कितली जागा पडेल शे… पुढं सरका!
तोतारामशेठ: मी कोठे धडशा मारी राह्यनु तुमले? एक तं सालं हाई गासोड रस्तामां पडेल शे!
दशरथ: ओ …काय करी राह्यनात हाई? मन्ह्या गासोडाले काब्र पाय मारी राह्यनात?
हाSSत्त मरो! हाई मोबाईल बी आतेच वाजी राह्यना.
(फ़ोन उचलुन): हां! का वं? जरा दम धरशी का? मी आठे गाडीमां लटकी राह्यनु…फ़ोन उचलाना करता हात बी खाली घेता येत नै इतली गर्दी शे, म्हाईत शे का?
हा! हां! माले याद शे…तठे जाईसन तुन्हा भावाले भेटानं आन त्याले लिसन सराफ़ाकडे जाई येवानं!"
वैतागाने फोन बंद करुन शर्टच्या वरच्या खिशात ठेवतो. फ़ोन ठेवता ठेवता पडतो.

दशरथ्शेठ: आं!!! ओ ओ तात्या! तुम ले काई लाज सरम शे का? आहो हाई फ़ोन मन्हा शे! तुम्ही तं खुशाल मन्हा फ़ोन उचलीसन बोली राह्यनात! हाई दखा लोके हो… तुम्ही साक्षी शेतस,खिसामातीन तिकीट काढाना करता पैसा काढी राह्यनु तव्हयमा, या मानुसनी मन्हा फ़ोन उचली लिधा आणि निलाजर्‍याना गत बोलीबी राह्यनात!

तोताराम: आर्तिच्या मारी! काय बोली राह्यनात तुम्ही तुम्हले समजी राह्यनं का तरी?… हाई फ़ोन मन्हा शे ! दखा लोके…तुमना समोर शे.. या शेठ ना मोबाईल खाली पडना तं मी काई केलं का? हाई फ़ोन मन्हा खिसामां ठेयेल व्हता…! आर्र, मन्ही आंडेर कथी गई? वं ..शिता! तु बठेल शे ना? उठानं नै बर्का! लोके लगेच जागा पकडी लेतस!
दशरथ: कथा ग्या कंडाक्टर भाऊ!! ओ कंडाक्टर भाऊ… गाडीमाना बठ्ठा लोकेसनी आते ना आते तपासणी ली ल्या, मी तं गाडीच नै पुढे जाऊ देवावु. आते पता लागी कोन चोर शे ते!
तोतारामः ओ शेठ, चोर कोनले म्हनी राह्यनात? तो दखा तुमना खिसामां फोन वाजी राह्यना! काय मानुस शे!
दशरथशेठ: वं माडी वं! हाई तं मन जोडेच शे! व्हई जास भौ आसं ...आते वय व्हयनं आम्हनं!

सीमा,
ही माझीच भाषा !!

---
बी, संवाद उत्तम आहेतच पण तू कल्पना पण उत्तम लढवली आहेस.
आता फक्त तिसरा प्रसंग राहिलाय, तो पण लिहून टाक.
---
आर्या, हे पण मस्त जमलंय.

नदीवर येते कपडे धुवाले तर सासूचे कपडे फक्त पिळून काडते. अन तिचे कपडे घंटाभर घासत बसते. >>>> Lol

बी, अरे झकासच जमलय की रे! एकदम मस्त! Happy

साजिरा, लै भारी!

मस्त रे बी, सीमा, आर्या! Happy

अहिराणी फक्त धुळे आणि जळगाव जिल्ह्यातच नाही बोलली जात. खानदेशाला लागून असलेल्या उत्तर नाशिक जिल्ह्याच्या कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव या तालुक्यांतही बोलली जाते. मात्र या सार्‍या गावांची अहिराणी ही शब्द, लहेजा, टोन इ. मध्ये थोडी वेगवेगळी आहे. (एका प्रकारच्या अहिराणीवाले दुसर्‍या प्रकारच्या अहिराणीवाल्यांची नेहेमी टर उडवतात. :फिदी:) धुळे जिल्ह्यातल्या अहिराणीवर गुजराथी, जळगाव जिल्ह्यातल्या अहिराणीवर वैदर्भीय तसंच मध्यप्रेदेशातल्या हिंदीचा आणि नाशिक जिल्ह्यातल्या अहिराणीवर दख्खनी मराठी भाषेचा प्रभाव आहे. दर चाळीस पन्नास मैलांवर बदलणारी अहिराणी बघणं, अनुभवणं हे खरंच खूप मनोरंजक आहे.

गजालीवाले कुठे गेले इथले? आणि सोलापूर, मराठवाड्यातले? आणि नगरचे?

आजींचा बस मधला प्रसंग Rofl आहे बी!!!! भाषा वाचायला लै मजा येते! आज घरी साग्रसंगीत नकलांसहित ही स्क्रिप्ट वाचणार आहे मी!!!!! एक नंबर!

सजिरा, बरोब्बर. नाशकात खुप अहिराणी बोलणारी मंडळी आहेत. वडिला मायको मध्ये होते नोकरीला, तिथे भरपूर पबलीक खानदेशी होतं. अहिराणी ऐकायलाही फार मजा येते.

सीमा, मस्त जमलय बरक!! Happy

इसरा कि च्यामारी आता ते प्रकर्ण. तवां शेपुट घात्लासा. रिस्पॉन्स मागायच झाल न्हायी. मं आता काय उपेगं. का "ताईसाब" म्हणाया आल्तासा?

ओबामा 'हरखुन टुम्म' झाल्ता भाशन द्येताना. >>>> Rofl

बी, धम्माल आहे तो आजीबाईंचा प्रसंग Lol

गजालीकर, या इकडे. नंदिनी , बेळगावी येऊ दे.

बी, सीमा आर्या, काय तोडफोड लिहिलंय!!! Biggrin

बी, तू लिहिलेलं मोठ्यानी वाचून बघितलं! Proud पुन्हा नागपुरातले दिवस आठवले. मजा आली.

सीमा, लय भारी!
आर्या, बी हे भाग पण मस्तच!

रच्याकने, आमच्याकडे जीपीएस मधल्या सुचना मराठीत आहेत! त्यातला निवेदक बाबा 'डावीकडं वळा' 'शक्य तेव्हढ्या लवकर मागे फिरा' ' आपण आलो बर का!' अशा सगळ्या सुचना मराठीत देतो. तो कोल्हापुरचा असावा असा आमचा अंदाज आहे. कुणाला कल्पना आहे का तो कोण आहे ते?

"कोल्हापूरी मुसलमानी बोली"

प्रसंग १ : मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका दोन कोल्हापूरी मुस्लिम मित्रांना दिली आहे. त्यावेळी ते आपल्या घरी नसल्याने त्यांच्या "जोरू" कडे (सौ. कडे) देऊन आलो होतो. आता हे दोघे एकत्र येऊन या लग्नाविषयी बोलत आहेत हा काल्पनिक प्रसंग.

इसाकअल्ली : "अरे हमीदमियॉ, तेरेकू आशक्याकी शादीपत्रिका आयी क्या ? मेरेकू आयी."
हमीदमियॉ : "हाँ, हरामी आया था वो, शामकू. मेरेकू भेट्या नयी. लै बाराबोड्याका है, पत्रिका टाक्या और न्हाट्याच. जोरु बोलती मेरेकू लई घाईमे था भौजी."
इ. : "हां. सई बोल्या. वैसेभी कब मिलताच नयी आजकल ओ साला. घर क्या बांद्या उस्ने, लक्ष्मीपुरी छोड्या और दोस्तांकू भुल्याच वो. मेरेकू भी पट्याच नै, बोले तो वो घर आया और थोडा उशीरतलक बैठ्या. च्यापानी करको दिया शबानाने उसको. लई आठवणी काड्ते बैठ्या वो बोली."
ह. : "मेरा बी टायमिंग जर चुक्याच. हरामीने एक मोबाईल मिस कॉल दिया होता तो मै न्हाटते न्हाटते घरकू आ जाता. लेकिन सालेकू बराबर पता की उस्कू देखनेके बाद तू और मै उस्को छोडनेवाले नैच | करकू वो भाग्या जनू."
इ. "पर आचिन्दे. मेरेकू और शबानाकू लई गोड वाट्या उसके लडकेकी शादी की बात सुन्कर. बोले तो मुजे वो सब याद आने लगा की शैल्या ल्हानपनसे हमारे घर सिफासे खेलने आता रैता और फिर बोलनेकू भी सिख्या उसकी तरह. तो फीर एक दिन अम्मीच बोली 'काय कू शैलुको सिफासे अपनी बोलीमे बोलनेकू देता तुम लोगा. अच्छी बात नै. उसको मराठीच बोलनेकू बोलो. फिर मैने अम्मीकोच डाफर्‍या. बोल्या, 'तू चूप बैठ. ये मराठी मुसलमान का दंगा हम दोस्तोमे कबीच आणनेका नै बोल्के रखतू तुझे अम्मी'
ह. " सही बात बोल्या तू इसाकभाई. ये हम्रे मन मे कबीच आया नई की कोलापुरमे ये मराठी, वो गुजराती, हम मुस्लमान. आशक्या तो बक्री ईद को हमारे अब्बूमियाँ के साथ बैठकर ऐसा घुलमिल जाता था, की मेरे आनेसे पैले अब्बू उसकोच लेकर खाना परोशने बैठते थे !"
इ. : "और हम उसके घरमे दिवाली के टैमपे चकल्या कानुला खाते बैठते. लेकीन ये नोकरी के कारण गया यहाँसे और माटी मे मिला दिया सारा कॉन्टॅक्ट झटसे, उस्ने !"
ह. : "अरे ऐसा नही भय्या. इसमे उसकी क्या चूक ? तेरा मेरा धंधा है बिझ्नेस है, उसको तो गव्ह्र्मेन्ट नोकरी है, आज यहॉ, कल वहॉ. ऐसा होनेवालाच था. लेकिन अब देख ना, इतने साल हुये फिर भी आशक्या आपनेकु बिसर्‍या नै च ना. आठवणीसे पत्रिका देनेकू आयाच की नै. मेरेकू लै गोड वाट्या, इसाकभाई,"
इ. : "ये बिलकूल सै बात बोली तुमने हमीदमियॉ. बरं ये तो बोलो, शादी इधरच है, तो उन्का वो हल्दीका झमेला देखने जानेवाली हु ऐसे शबाना बोल्ती. तू रोशना कू भेज दे फिर, दोनो मिल्के जायेंगी"
ह : "ठिक है, वैसाच करेंगे. भला वो लडके को क्या देन्गे शादीमे हमारे तरफसे ? शेपरेट देन्गे या दोनो मिल्के ?"
इ. : : "अरे वो पत्रिका मे उस्ने लिखा है 'नो प्रेझेन्ट्स". फिर ?"
ह. : आच्चिन्दे रे. वो लिक्या करकू क्या हम नई देनेवाले ? उस्ने हमारी जन्नत के शादीमे केवडा खर्च कर्‍या तो तेरेकू क्या मालूम नै ? दोनो कल जाते है, और बेस्ट कुछ तो लेन्गे वो लडके के वास्ते. क्या बोलता तू ?"
इ. : "तू बोल्या और मैने नही सुन्या ऐसा कबी हुवाच नै ना. लेते है कुछ, आपुन को क्या, शादीको जानेका ये पैली बात हुना |"

धन्यवाद संयोजक.

लै ब्येस आयड्या हाय. कल्लापुरी आन अहिराणीनं तं कहर केल्यान. मास्नी येकबी बोली येत न्हाई. समदी उमर शेहरात ग्येली. मात्तर हेल काढून बोलतो आन गावाकडली म्हूनश्यान ठोकून दितो. त्येवडाच रुबाब! Proud

पन टिरेकला जातांना या बोलीचा लै उपेग व्हतो. गावकरी पार पिरेमात पडत्यात. हेलकरी बोली आयकली की मग फुल्टू अतिथी देवो भव! दणक्यात पाहुणचार भ्येटलाच म्हून समजा!! Happy

आपला णम्र,
-गामा पयलवान

सीमा, बी, आर्या, अशोक मस्त मस्त! सीमाचे संवाद वाचताना कोल्हापूरच्या देवळाबाहेरच उभी आहे की काय आणि दोन फटफट्यांचे पार्श्वसंगीतही ऐकू येत आहे असे वाटत होते. Lol

Rofl भारी लिहिलय सगळ्यांनीच.

हे थोडं नगरी लिहायचा प्रयत्न केला आहे. हे अगदी ऑथेंटिक नगरी नाही. मला आठवेल आणि सुचेल तसं लिहिलय. बुवा आणि बाई म्हणजे पार्लेकर नव्हेत.

बुवा: ओ बाई फोन पडला व्हय हिथं ?
बाई: ऑ ? काय म्हणला रं बाबा ?
बुवा: त्यो काय फोन, फो-न्न हां येउंद्या हिकडं
बाई: ह्यो ? फोन ?
बुवा: व्हय व्हय त्योच
बाई: ऑ ? माह्यावाला फोन कामुन देऊ म्हंतोस ?
बुवा: ओ बाई हिथं आता हिथं पल्डा नव्ह फोन खिशातनं
बाई: आरं बाबा गाडी चालना म्हुन कहाडला पिशवीतनं. ल्योक डोळं लावुन बसला आसल घरला
बुवा: ए बाई जास्तीची शानपट्टी नाय पायजे, काय ? हिथं समद्या मानसांदेकत पल्डा नव्ह फोन. काय ष्टोरी सांगून र्‍हायली बाई.
बाई: बाईमान्सास काय म्हुन तरास देऊन र्‍हायलास रं बाबा ?
बुवा: बाईमानूस ? बाईमानूस म्हणून नीट बोलु र्‍हायलो तर बाई ऐकना. आण हिकडं तो फोन
बाई: आ-त्ता ? माज ल्योक शेरातुन घेऊन आला फोन. अस्सा दिन व्हय कुनाला बी...
बुवा: एsssss बाई ठुशे पाटील म्हण्त्यात मला. बर्‍या बोलानं फोन दे न्हाय तर...
बाई: न्हाय तर काय रे करशील ? बघुं दे मला बी काय करशील. पाटील आसशील तुझ्या गावचा.
बुवा: अय बाई पुन्यांदा सांगतोय फोन आत्ता हिथं पल्डा समद्यासमोर. देती का न्हाय फोन ?
बाई: डोळं फुटलं काय रं टकुरड्या तुझं ? पिशवीतुन काढला म्हंणलं ना
बुवा: ए बये डोळं फुटलं असत्याल तुझं. फोन दे म्हंणलं ना...
बाई: आरं जा रं..तुझ्यात दम आसल तर हात लावुन दाखिव फोनला
बुवा: ए बाई फोन न्हायी देत तर फ्रेंडशिप देतीस का ?

ए बाई फोन न्हायी देत तर फ्रेंडशिप देतीस का ?>>> हे भारी आहे.

ठुशेपाटील Happy

मस्त लिहिलं आहेस.

Pages