वाढदिवस!!!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

वर्षातले ३६३ दिवस एकीकडे! आणि *हा दिवस दुसरीकडे!
अशा तुलनेतही ज्याचे पारडे खाली जाईल, तो दिवस म्हणजे वाढदिवस!!

सकाळी बरोब्बर ६.१५ ला जाग आली. मोबाईलला गजर करण्याची गरजच पडली नाही. एका आवर्तनामधे उठलो. पांघरूणाची घडी केली. आवरलं. एक पेला भरून पाणी प्यालं. पुस्तकात वाचल्याप्रमाणे प्राणायाम केला. १२ सूर्यनमस्कार घातले. जॉगिंगला गेलो. साधारण अर्ध्या तासाने परत आलो. मनसोक्त व्यायाम झाल्यामुळे आनंद झाला. दिवसाची सुरुवात अशी छान झाली, म्हणजे दिवसही छानच जाणार! त्यातून आज माझा वाढदिवस! मग काय बोलता?

कामावर ठेवताना बोलणे झाल्याप्रमाणे बरोब्बर ७.३० वाजता कामवाली बाई आली आणि काम करू लागली. सोसायटीच्या "सोलर हिटरमधून" गरम पाणी आले. नुकतीच बदलून घेतलेली बाथरूममधली पाईप खराब झाली नाही, कारण ती चायनीज मेड नव्हती. शॉवरच्या टवळ्यात असणार्‍या ३० छिद्रांपैकी एकाच छिद्रातून भसाभस पाणी यायला सुरुवात झाली नाही. कारणा टवळेही चायनीज नव्हते.

अंघोळ झाल्यावर मी देवाला नमस्कार केला. देवाचे म्हटले. आज घालण्याच्या कपड्यांना आदल्या रात्रीच इस्त्री केलेली असल्याने धावपळ होण्याचा प्रश्नच नव्हता. काल रात्री धुतलेले सॉक्स नीट वाळलेले होते. बुटांना काल रात्रीच पॉलिश केलेले होते. नेहेमी बरोबर असणार्‍या फडक्याने हेल्मेटवरची धूळ पुसली त्यामुळे परत बुट काढून हात धुवायला जावे लागले नाही.

कामावर ठेवताना बोलणे झाल्याप्रमाणे बाईक धुणार्‍याने ती नीट धुवून ठेवली होती, त्यामुळे मी जाम खूष झालो. बाईक काढली आणि चौकात जाऊन चहा प्यावा म्हटले. चौकातल्या चहावाल्याने, मी फक्त ब्र काढताच चांगला कपभरून चहा दिला. चहा पिता पिता त्याच्या कप धुणी यंत्राकडे माझे लक्ष गेले नाही. उरलेले पैसे, मी न मागता त्याने परत केले.

रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. मी वेगात गाडी घेऊन जाऊ शकलो. तीन पदरी रस्त्यावर डाव्या बाजूला जागा सोडून कोणीही टेम्पो-रिक्षा-बस वाला गाडी चालवत नव्हता. बसवाल्याने उजवीकडून अचानक गाडी मधल्या पदरावर आणली नाही आणि 'मायनस वन' ते पहिल्या पदरावरचे जरतारी मोर आपलं लोक, वेड्यासारखे पळत आले नाहीत. मीही डावीकडून गाडी घातली नाही.

दांडेकर पूलापासून सारसबागेकडे जाताना दर १० फुटांवर "हात" दाखवणारे ताई-माई-भाई-पोरं आडवे आले नाहीत, की माझीच चूक असल्यागत त्यांनी माझ्याकडे डोळे मोठे करून पाहिले नाही. मीही जोरात हॉर्न दिला नाही, की अप्पर-डीपर दिला नाही.

स्वारगेट चौकात सिग्नल लगेच मिळाला. सिग्नल चालू असताना आकाश आणि पाताळ सोडून इतर आठ दिशांहून भसाभस लोक आले नाहीत. चौकात उभे असलेले ६-७ ट्रॅफिक पोलीस एकाच ठिकाणी बोलत बसले नाहीत. मी सिग्नलला थांबलेलो असता उगाचच कोणीही खोपच्यातून गाडी पुढे घ्यायचा प्रयत्न केला नाही आणि ती माझ्या गाडीला घासलीही नाही. मी चिडून बघितले नाहीच. आणि त्यावर कोणी रेड्यासारखे हसलेही नाही. रेड्याने १३व्या शतकात 'वेद' शिकून घेतले, तेव्हाच "सॉरी" देखिल शिकून घेतले होते. सिग्नल पडायला ६० सेकंद असल्याने, पेट्रोल/डिझेलच्या किमतींना स्मरून सर्वांनी आपापल्या गाड्या बंद ठेवल्या. काळाकुट्ट/डास मारताना फवारला जाणारा असा कोणत्याही प्रकारचा धूर सोडणारे एकही वाहन जवळपास नव्हते. बीआरटीच्या रस्त्यामधे एकही बस नव्हती.

सिग्नल सुटण्याच्या १० सेकंद आधी कोणीही सिग्नल तोडला नाही. मीही थांबलो आणि आमचा सिग्नल पडल्यावरच गेलो. सिग्नल तोडावा का असे मनात आले, पण मला आज जराही उशीर झालेला नसलेने मी तसे केले नाही. बीअरटीमधे उभी असलेली बस आमच्या कोणाचीही पर्वा न करता मुसंडी मारून आडवी आली नाही. ट्रॅफिक पोलिस उभे असलेल्या (जथ्थ्याने नव्हे) ठिकाणापासून १०० मिटर अंतरावर नो पार्किंगच्या बोर्डखाली दिवसा ढवळ्या रांगेने रिक्षा लावलेल्या नव्हत्या. त्यातल्या कोणीही अचानक 'ढोली तारो ढोल बाजे' वर असा 'गोल-गोल' फिरून डान्स केला नाही. मी त्याला काही बोललो नाही आणि त्यानेही मस्तवालपणे वेगात गाडी आडवी घालण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने मस्तवालपणा न केल्याने मीही काही बोलायची गरज पडली नाही.

भर रस्त्यात कुठेही एखादी अशी कुंडी किंवा नुसतीच फांदी नव्हती, जिच्या मागे मॅनहोल नसलेला खड्डा असेल. रस्ते उकरलेले नसल्याने ते बुजवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे सगळा रस्ता एकदम मस्त सपाट होता. रस्त्यामधे धूळ नव्हतीच, त्यामुळे कसल्याही सूचनेशिवाय भर रहदारीच्या मार्गामधे बसून ती साफ करणारे स्त्रीपुरुषही नव्हते. त्यामुळे मी अजूनच निश्चिंत झालो.

ओव्हरब्रिजवर गाडी थांबवून फोनवर बोलणारे तर कंदिल घेऊन शोधले तरी सापडले नाहीत. ओव्हरब्रिजच्या उतारावर अवजड कचरा गाड्या, प्रकाशाच्या वेगापेक्षा चार तृतियांश वेगाने गेल्या नाहीत. कचरा नीट बांधला गेला असलेने त्यातून सडका कचरा सांडला नाही. ओव्हरब्रिजवरुन गाडी चालवताना, मधे मधे राहून एकमेकांशी बोलत जाणारे कोणी नगही दिसले नाहीत. त्यामुळे मी हॉर्न देण्याचा प्रश्नच नव्हता. नो एण्ट्रीमधून तर कोणीच आले नाही! छोट्याश्या दीडपदरावर कोणा मोराने आपली गाडी पार्क केलेली नव्हती त्यामुळे ट्रॅफिक जामची संभावनाच शिल्लक राहिली नाही. नेहेमीपेक्षा लवकरच मी कामावर पोचलो.

दुपारी कॅण्टीनच्या जेवणामधे राजमा, बटाटा आणि तवा फ्राय यापैकी कोणतीही भाजी नव्हती. पोळ्या अंदमानातून आयात केलेल्या नव्हत्या. सॅलाड म्हणजे काही देठासकट कोबी नव्हता. जेवण देणार्‍याने पोळीला पुरेल इतकी भाजी आणि भाताला नीट पुरेल इतकी आमटी दिली. पालक राईसमधे हिरवा रंग नसून खराखरा पालक होता. चमचे स्वच्छ धुतलेले होते. पाण्याचे ग्लास आणणार्‍या ग्लासवाल्या बाबाने आम्ही एकदा हात करताच लांबूनच आम्हाला मोजून तितके ग्लास आणून दिले. त्याने आम्हाला सोडून, आमच्या नंतर आलेल्या पोरींना ग्लास देऊन, आमच्याकडे काणाडोळा केला नाही. अशा रितीने दिवसाची सुरुवात फार सुंदर झाल्याने, उत्साहात मी दिवसभर भरपूर काम केले आणि रात्री नव्हे संध्याकाळी वेळेत घरी पोचलो.

रात्री घरी येताना तो वाढदिवसाचा विनोद आठवला.
"ओऽ अक्काऽऽ.. केक द्या केऽऽऽऽऽऽकऽ! " : भिकारी.
"काय रे माजलास काय??? केक कशाला हवाय? भाकरी देते हवं तर... " : अक्का.
"अहो, आज माझा वाढदिवस आहे." : भिकारी (लाजत)

योग्य वेळी हे स्मरल्याने, आज वाढदिवस असूनही मी केकची अपेक्षा केली नाही!

* "वर्षातले ३६३ दिवस एकीकडे! आणि हा दिवस दुसरीकडे! " --> ३६५ - ( वाढदिवस तिथीने आणि तारखेने. )

आजचा वाढदिवस तिथीने. तारखेने काही दिवसांपूर्वीच झाला. नुकतेच परतोनि पाहे करून एक वर्ष झाले.

विषय: 
प्रकार: 

अर्रे सही ऋयाम. Lol
बाकी शेवटी टडोपा ' पण काही असो.. फिर भी दिल है हिंदुस्थानी' छाप डायलॉक टाळलेस ते तर लई आवडेश.

अरे वा ऋयामा..................मला वाटलंच होतं, की खरा वादि नाही(कंगनाचा वादि वगैरे असं काही नव्हतं वाटलं हां!!)
त्यामुळे तुला जे काही वाटतय.....की मांडायला जरा जमलं नाही ...असं काही नाही!
छान!
तरी नेक्स्ट टायमाची वाट पहाते.

>> सांगायचं तात्पर्य काय, तर मुलगा वयात आला..
ता वरुन ताकभात ओळखायचं, मंडळी.>>

??? नक्की काय लॉजिक आहे ह्यात ?

Pages