मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल अवचटांचं 'मुक्तांगणची गोष्ट' वाचलं.

लेखनशैली छान आहे. समोर बसून गप्पा ऐकतोय असं वाटत वाचताना.
त्यांच्या आणि सुनंदा अवचटांच्या जिद्दीला सलाम.

Minding Frankie : Maeve Binchy लिखित कादंबरीची संपादित आवृत्ती वाचली.
आयरिश समाजातली एक अगदी साधी सोपी गोष्ट सांगितलीय; जन्मतःच आपल्या आईला गमावलेल्या फ्रॅंकीचे संगोपन , तिच्या आईने ठरवलेला तिचा बाप आपल्या आपल्या close-knit community च्या आधाराने कसे करतो याची.
नॉर्वेतल्या 'त्या' दोन भारतीय मुलांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचताना त्यातल्याकाही गोष्टी ठळकपणे जाणवल्या.
मुलाच्या हितासाठी म्हणून ब्लडहाउंडसारखी पालकांच्या चुका शोधायला टपलेली सोशल वर्कर, मुलीच्या पित्याशी संबंधित प्रत्येकाचाच इतिहास तपासून घेते. मुलीच्या संगोपनापेक्षा त्या पित्याला या सोशल वर्करचेच जास्त टेन्शन येते. वयात आलेला मुलगा स्वतःच्या आईबापांच्याच घरी राहतो, हे तो व्यसनी असण्याइतकेच मुलीची कस्टडी काढून घेण्यासाठी कारण ठरू शकते. अ‍ॅडल्ट मुलगी आपल्या आईवडिलांच्या घरी राहत असल्याबद्दल त्यांना घरभाडे देते.इ.

परवा अब चौकातील एका दुकानात पुस्तके चाळता चाळता "साखरपुडा ते वर्षसण", "अशी जागवा मंगळागौर", "बाळाचे नाव काय ठेवाल" ही पुस्तके दिसली. वाचकांच्या माहितीकरता (व भल्याकरिता) नावे येथे दिली आहेत. आशा आहे की लोकांना ती वाचायची गरज योग्य क्रमाने पडेल Proud

नंदन, लिंकबद्दल धन्यवाद!
आपण ज्याला 'चित्रदर्शी लेखन' म्हणतो ते जास्त प्रभावी का वाटते याचे कारण हेच असावे.
मला असा प्रश्न पडला की साहित्य कोणत्या भाषेत आहे, ती तुमची मातृभाषा आहे का याचाही परिणाम मेंदूवर होत असावा. एखादी प्रतिमा, उपमा मराठीतून वाचणे आणि इंग्रजीतून यात 'मेंटल इमेजरी'त फरक पडत असणार...काय वाटते?

लोकांना ती वाचायची गरज योग्य क्रमाने पडेल>>>>>>>>> Rofl

चि. वि. जोशी यांच "चार दिवस सुनेचे" वाचलं.
भन्नाट आहे. एका ब्राह्मण व्यक्तीचं आत्मव्रूत्त असा फॉर्मेट असलेलं पुस्तक आहे.
तत्कालीन समाजातील चालीरिती, स्वांतंत्र्याचे प्रयत्न, समाज सुधारणा अशा बर्‍याच गोष्टी त्यात आलेल्या आहेत.
त्या काळाशी रिलेट करायला बिलकुल अडचण वाटत नाही. Happy

एखादी प्रतिमा, उपमा मराठीतून वाचणे आणि इंग्रजीतून यात 'मेंटल इमेजरी'त फरक पडत असणार. >>> हो, हो.

लुवान ऑफ ब्रिडा वाचलं. चांगलं आहे. (फार भावलं नाही.) जरा संथ वाटलं. पण तरीही पुढचा भागही वाचेन.

लॉऑरीं सारखंच प्रवासवर्णन आणि संघर्षांचं वर्णन आहे. पण काही काही नविन संकल्पना/व्यक्तीरेखा मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. भाषा सोपी आणि ओघवती आहे. दुवे योग्य जुळले आहेत. आता पुढच्या पुस्तकात काय होते ते पहावे.

************************

शिवा ट्रिलॉजीचा पहिला भाग हातावेगळा केला. आवडला. संपूर्ण विषयाला एक छान वेगळे इंटरप्रिटेशन दिलं आहे आणि ते खूप छान जमलंय. लढाईची वर्णनं जरा तीच तीच येतात. आता दुसरं पुस्तक सुरू केलंय.

एखादी प्रतिमा, उपमा मराठीतून वाचणे आणि इंग्रजीतून यात 'मेंटल इमेजरी'त फरक पडत असणार.>>> थोडा विचार केला याबद्दल पण आता तसा फरक वाटत नाही. पूर्वी नक्कीच होता, पण तो ही बहुतांशी उपमा नीट न समजल्याने असावा. कदाचित मला अजून मुद्दा समजला नसेल. एखादे उदाहरण कोणी देऊ शकेल का? (तोपर्यंत तो लेख वाचतो Happy )

एखादी प्रतिमा, उपमा मराठीतून वाचणे आणि इंग्रजीतून यात 'मेंटल इमेजरी'त फरक पडत असणार...काय वाटते? >> यात मराठी, इंग्रजी इत्यादी पेक्षा त्या भाषेची , त्या विषयाची स्थळ काळाची आपल्याला किती ओळख आहे यावर अवलंबून आहे असं माझं स्वत:पुरतं निरिक्षण आहे.

लॉट्स ऑफ चॉकलेट्स फॉर मी गाण्यात - चॉकलेटं हवीत हे कळतं , पण एलायझाच्या काळात कॅडबरी, हर्शी , नेसले नसताना तिच्या सारख्या मुलीला लॉट्स ऑफ चॉकलेट्स चं किती अप्रुप असेल ते कळणे वेगळे.

लॉट्स ऑफ कोल्स मेकिंग लॉट्स ऑफ हीट साठी नुस्ती थंडी अनुभवून कळणार नाही. सेंट्रल हीटिंग नसलेले, नीट इंन्सुलेशन नसलेले घर, त्यात एखादीच फायरप्लेस अन त्यात थोडेसेच कोळसे. सतत लेयर्स घालून सुद्धा गोठलेले हात पाय हे कळायला हवे.

समवन'स हेड रेस्टिंग ऑन माय नी याचा अर्थ माझ्या , वडील १० पावले पुढे अन आई आम्हा भावंडांचा हात धरून मागून अशा अपब्रिंगिंगमुळे अनेक वर्षे कळला नव्हता. मित्र मैत्रिणींची लग्न झाली, माझं लग्न झालं त्यानंतर कित्येक वर्षांनी अचानक एका सुपरबोलच्या वेळी एक मित्र असा जमिनीवर बसलेला अन सोह्प्यावर त्याची बायको बसली होती, अगदी सहज् त्याचं डोकं तिच्या गुडघ्याशी टेकलं होतं - तेंव्हा कुठे त्या ओळीचा अर्थ गवसला होता.

>>एखादी प्रतिमा, उपमा मराठीतून वाचणे आणि इंग्रजीतून यात 'मेंटल इमेजरी'त फरक पडत असणार...काय वाटते? >> यात मराठी, इंग्रजी इत्यादी पेक्षा त्या भाषेची , त्या विषयाची स्थळ काळाची आपल्याला किती ओळख आहे यावर अवलंबून आहे असं माझं स्वत:पुरतं निरिक्षण आहे. >> +१

झुम्पा लाहिरीचं ' अनोळखी पाऊलवाटा' ( Unaccustomed Earth) वाचलं. मला त्यातल्या कथा फार आवडल्या.

शंकर पाटिलांच ''टारफुला'' वाचतोय.. फार सुंदर व्यक्ती रेखाटन.... परिसराचं वर्णन अप्रतिम आहे.

टारफुला - नाव ऐकले आहे. डॉ - काही व्यक्ती/कुटुंबे मध्यवर्ती धरून एखाद्या गावाच्या बदलत्या काळाची कथा आहे का (साधारण पडघवली सारखी)?

हो, गावचे पाटील दिवंगत झाल्यावर लष्करातील एका निवृत्त व्यक्तीस आणून गावची बिघडलेली घडी व्यवस्थित करण्यावर आधारीत कथा आहे. ग्रामीण वातावरण अप्रतिम उभं केलं आहे... चावडी,तराळ्,सनदी,वाडा,ढेलजेत जाणे वगैरे तूफान वर्णन आहे.

यात मराठी, इंग्रजी इत्यादी पेक्षा त्या भाषेची , त्या विषयाची स्थळ काळाची आपल्याला किती ओळख आहे यावर अवलंबून आहे असं माझं स्वत:पुरतं निरिक्षण आहे.>>> एकदम बरोबर, कारण कुठलीही भाषा ही तिच्या समाज-संस्कृतीचा संदर्भ घेऊनच येते. ते माहिती नसेल तर 'तुम बिन मोरीत तोंड घातले' ची मजा कळणार नाही!
मी फक्त नंदनने लिंक दिलेल्या लेखाच्या संदर्भाने बोलत होतो.
@ कैलास- टारफुला खरचं अफाट आहे.

@ मेधा - प्रतिसाद अगदी पटला. ही थोडीशी 'जावे त्याच्या वंशा...'सारखी गत आहे. अर्थात जितके संदर्भ आपल्याला ठाऊक आहेत, त्याहून कितीतरी अधिक निसटतात हेही खरं. पण त्याला इलाज नाही.

@ आगाऊ -
मला असा प्रश्न पडला की साहित्य कोणत्या भाषेत आहे, ती तुमची मातृभाषा आहे का याचाही मेंदूवर होत असावा. एखादी प्रतिमा, उपमा मराठीतून वाचणे आणि इंग्रजीतून यात 'मेंटल इमेजरी'त फरक पडत असणार...काय वाटते?
हे खरं असावं, असं मला वाटतं. मात्र यातही दोन भाग आहेत. एक म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आपल्या अनुभवांना असणारी मर्यादा. मेधा यांचा प्रतिसाद त्याबद्दल सुरेख भाष्य करतो. दुसरं म्हणजे सामूहिक पातळीवर झालेलं थोडंफार कंडिशनिंग. आपल्या मातृभाषेचा आपण विचार कसा करतो, यावर कमीअधिक प्रमाणात प्रभाव पडतो. त्याबद्दलचा हा लेख वाचावा असा.

स्पॅनिशमध्ये पुल्लिंगी असणारा पुलाचा समानार्थी शब्द (el puente), जर्मनमध्ये स्त्रीलिंगी होतो (die Brücke) होतो. ह्या अंगभूत फरकामुळे एकाच पुलाचे छायाचित्र दाखवल्यावर स्पॅनिश भाषकांना वाटणारे त्याचे वैशिष्ट्य आणि जर्मनांची उमटणारी प्रतिक्रिया निरनिराळी का असते किंवा एका ऑस्ट्रेलियन अ‍ॅबओरिजिनल जमातीत डावीकडे-उजवीकडे-पुढे-मागे या ऐवजी दिशादर्शक शब्द का आहेत, याचा रोचक आढावा या लेखात घेतला आहे.

या दोन पातळ्यांच्या - एक व्यक्ती म्हणून येणारी अनुभवांची मर्यादा, आणि दुसरी म्हणजे मातृभाषेमुळे झालेलं थोडंसं कंडिशनिंग - या दोघांच्या सरमिसळीवर आपली (आणि मेंदूत उमटणार्‍या प्रतिमांची) प्रतिक्रिया अवलंबून असते, असं म्हणता येईल का? वयानुसार जसजशी आपल्या अनुभवांत भर पडते/बदल होतात; तसतशा जुन्या आवडी बदलतात, एकच पुस्तक वाचून उमटणारी प्रतिक्रिया बदलते; हे आहेच. तोच न्याय दुसर्‍या पातळीला लावला तर? म्हणजे जसजसे आपण एकाहून अधिक भाषेतल्या वाचनक्रियेबद्दल अधिकाधिक कम्फर्टेबल होत जातो - तसतसा आपल्या प्रतिक्रियेत फरक पडतो का? (बायलिंग्वल असण्याचे मेंदूच्या दृष्टीने इतरही फायदे आहेत, पण तो भाग अलाहिदा.)

आपल्यापैकी बहुतेक सर्वांनाच दोन वा त्याहून अधिक भाषा येतात. मराठी तर मातृभाषाच, पण हळूहळू इंग्रजी वाचनाचाही सराव होतो. पण त्यापूर्वी ज्या गोष्टी आपण मराठी वाचताना गृहीत धरून चालतो (उदा. वाक्याची लय/cadence), त्या इंग्रजीत (अधिक लक्ष देऊन वाचल्यामुळे) जास्त प्रमाणावर जाणवतात का? किंवा यापलीकडे एखादी तिसरीच नवीन भाषा शिकलात, तर त्या भाषेत वाचण्याचा प्रयत्न करताना येणारा अनुभव कसा असतो - याबद्दल तुम्हा सर्वांची मतं वाचायला आवडतील.

[परवाच झुंपा लाहिरीचं या संदर्भात वाचलेलं एक स्फुट - Knowing — and learning to read in — a foreign tongue heightens and complicates my relationship to sentences. For some time now, I have been reading predominantly in Italian. I experience these novels and stories differently. I take no sentence for granted. I am more conscious of them. I work harder to know them. I pause to look something up, I puzzle over syntax I am still assimilating. Each sentence yields a twin, translated version of itself. When the filter of a second language falls away, my connection to these sentences, though more basic, feels purer, at times more intimate, than when I read in English.]

झुंपा लाहिरीच्या लेखाबद्दल अनेक धन्यवाद, निव्वळ अप्रतिम!
दुसर्‍या लेखात उल्लेखलेली सापिर-वॉर्फची थिअरी, आत्यंतिक लिंग्विस्टीक डिटरमिनीझमकडे नेणारी असल्याने टिकली नाही. पण म्हणून ती पूर्णपणे चुकीची आहे असे नाही.
तो Guugu Yimithirr प्रकार अफलातून आहे!!!

नंदन, विचारप्रवर्तक लिंका आणि चर्चा. खूप खूप धन्यवाद. Happy
शोनू Happy

आत्ता घाईत आहे, पण नंतर पुन्हा डोकावते.

नंदन मस्त दुवे दिलेत, पहिले दोन आधीच वाचले होते, पण झूम्पा लाहिरीचे स्फुट निसटले होते माझ्या नजरेतून.

मराठी माध्यमाच्या सातवीनंतर इंग्रजी सुधारावे म्हणून इलस्ट्रेटेड वीकली वाचायला लावला होता घरच्यांनी. त्यात मालगुडी डेज येत असे दर आठवड्याला. आज वाचताना त्यातले ओल्ड मैसूर स्टेट इंग्रजी नीट कळते, हृद्य वाटते. पण सातवीत असताना त्यातले न येणारे शब्द वीरकर डिक्शनरीत सुद्धा सापडत नसत. मालगुडी चे स्थळ / काळ / संस्कृती खरं तर फार जवळची होती, पण तेंव्हा भाषेचीच अडचण होती.

Pages