गे पेरेंटस आणि मुलांचे संगोपन

Submitted by केदार on 14 June, 2011 - 09:56

अशातच एक मुलाखत पाहिली, त्यात मुलाखत देणारा गे होता. याला व त्याच्या पार्टनरला दोन मुलं आहेत, जुळी आहेत जी त्याने एका किरायाच्या गर्भाशया मध्ये मध्ये प्रत्येकी एकाचे स्पर्म डोनेट करून जन्माला घातली. (फॅटर्नल जुळी असा नवीन शब्द त्याने योजला)

मला गे व्यक्तींचे स्वातंत्र्य मान्य आहे, त्यामुळे तो गे वगैरे असला तरी कुठलाही सांस्कृतीक त्रास वगैरे मला नाही. रादर जेंव्हा असे विषय निघतात तेंव्हा मी प्रत्येक जण प्रत्येकाचे सेक्स ओरियंटेशन स्वतः ठरवू शकते, त्यांचे स्वातंत्र्य वगैरे असे बोलतो. त्यामुळे गे असणे हा मुद्दा नाही.

मुद्दा असा आहे की

१. ही दोन मुलं जन्माला येताना त्यांना काय माहित की पुढच्या १२-१४ वर्षात अगदी शाळेत सांगताना पासून ते अनेक गोष्टीत जिथे जिथे आईवडिल येतील तिथे आमचे दोन बाबा व एकही आई नाही (गे) असे त्यांना सांगावे लागणार त्याचा नाही म्हणला तरी मानसिक त्रास त्यांना होऊ शकतो.
इथे लोकं म्हणू शकतील की असे कुठे रोज सांगावे लागते, अनुभवावरून सांगतो की मुलं त्यांच्या आईवडिलांबद्दल शाळेत बोलतात. माझी मुलगी मला कित्येकदा तिच्या मित्रांच्या आई वडिलांविषयी सांगते. त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या नाहीतर मानसिक द्वंदाबद्दल मी बोलत आहे.

२. मुलांवर असणारे मातापित्याचे संस्कार ह्या मुलांवर नसतील तुम्ही म्हणाल मग अनाथांचे काय? पण हे अनाथ नाहीत, तर तसेच जन्माला घातलेत.

३. जाणता अजानत्या वयात पेरेंटस गे असल्यामुळे ती पण थोडी फार गे कडे वळल्या जातील का? कारण परत वातावरण. ह्यात मुलांच्या वैयक्तीक चॉईस वर अजानता तसे संस्कार होऊ शकतात.(कोणीही न लादता बंधन येऊ शकते असे वाटते) कारण अनेक लहान मुलं, जी विविध करेक्शन फॅसिलिटीत असतात ती गे होऊ शकतात / असतात. अमेरिका सोडून द्या वाटल्यास इतर देशांत अशा मुलांवर अनेकदा अत्याचार होउन गे होतात पण मुळे गे पण त्यांच्यात नसतो तर परिस्थितीमुळे तेच आवडू लागते.

अश्या विचारांमुळे गे वृत्तीला विरोध नसताना पण त्यांना मुलं असणे ह्याला समहाऊ माझा विरोध म्हणता येनार नाही, पण ते स्विकारायला थोडी अडचण वाटत आहे. (वरील मुद्यांमुळे - चुकीचे असू शकतील)

गे लग्न संस्था आताशा निर्माण झाली आहे, त्यामुळे लग्न असेल तर मुलं का नको हा प्रतिवाद होऊ शकतो, पण मी मानसिक द्वंदाबद्दल लिहितोय.

तुम्हाला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. पालक सुजाण असतील आणि मुलांशी सुसंवाद साधू शकत असतील तर मानसिक प्रॉब्लेम्स होणार नाहीत. हे तर समलिंगी पालकांनाच काय, घटस्फोटित (आधीच्या लग्नातून मुले असता/नसता) पालक, दत्तक वा सरोगेट मदर वापरून झालेली मुले, सिंगल पॅरेन्ट फॅमिलीज इ. सर्वांनाच लागू पडतं.
'ईच फॅमिली इज डिफरन्ट' हे त्यांच्या लक्षात आणून दिलं की झालं.

२. म्हणजे कोणते संस्कार? संस्कार मिळणार नाहीत असं काही मला वाटत नाही.

३. असे नाही वाटत.

(माझी उत्तरं अमेरिकन समाजाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली आहेत. भारतातल्या अ‍ॅक्सेप्टन्स लेव्हलची मला काही कल्पना नाही.)

माझी इथे एक अमेरिकन मैत्रिण आहे जिने या विषयावर मास्टर्स केले आहे.
तिचे म्हणणे असे की साधारण स्ट्डी मध्ये नॉन्-गे पालकांच्या १००० पैकी ३ जणांना गे मुले होत असतील
तर तेच प्रमाण नॉन गे पालकांनी वाढवलेल्या मुलांत आहे म्हणजे गे पालकांनी वाढवलेल्यात १००० मध्ये ३ जणे नॉन गे असतील.
मला हे पटले नाही आणि मी म्हणाले याचा अर्थ गे पालकांच्या influence ने समाजातील गे प्रमाण वाढणार आणि गे संख्या पण वाढणार. तिचे म्हणणे असे की मी गे जिवनपद्धती चुकीची असे धरुन हे मत मांडत आहे.
मला जरी हे आवडले नाही तरी माझा अ‍ॅप्रोच बरोबर आहे असे नाही कारण जर मला समाजात गे लोकांची संख्या वाढणे पसंत नाही तसेच बर्याच आन्ग्ल लोकांना अमेरिकेत अशियन लोकांची संख्या वाढणे पसंत नाही त्यामुळे स्वातीच्या वरील पोस्टशी सहमत होउन इथे फार बोलत नाही.

इंटरेस्टिंग विषय आहे. त्यातील ज्ञान/ माहिती इत्यादी जवळपास नाहीच. त्यामुळे येथील लोकांचे विचार, आकलन, अनुभव इत्यादी मधून माहिती मिळावी अशी आशा आहे. वर लेखात उल्लेख केलेल्या मुलांची पिढी जेव्हा सज्ञ होईल तेव्हा (किंवा अशी गे पालकांची पुढची सज्ञ झालेली पिढी अगोदरपासूनच अस्तित्त्वात असेल तर) त्यांच्यावरून हे बरेवाईट परिणाम इत्यादींबद्दल अधिक कळू शकेल.

१. स्वातीला अनुमोदन.
२. संस्कार म्हणजे काय? आणि 'माता'पित्यानंच केलेले संस्कार चांगले किंवा योग्य असं कसं म्हणणार? माझ्यामते संस्कार म्हणजे चांगला 'मनुष्यप्राणी' बनण्यास आवश्यक असलेले शिक्षण. ते दोन वडिल किंवा दोन आयाही (आईचं अनेक वचन) देऊ शकतील ना? अमेरीकेत किंवा भारतातही सिंगल पॅरेंटस वाढवतातच ना मुलांना (सुष्मिता सेन).
३. अशा लोकांच्या घरातच या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असाव्यात. घरात जर मोकळेपणा असेल, नॉर्मल, हेल्दी वातावरण असेल तर मूल त्याच्या नैसर्गिक भावनेकडेच वळणार ना?

अजून या बाबतीत माझ्या तरी वाचनात कुठली स्टॅटस्टीक्स आलेली नाहीत. जसा जसा काळ जाइल तस बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील.

#२: ते कोणत्याही पालकांवर अवलंबून आहे त्यामुळे यात काही फरक होईल असे वाटत नाही.

#३: हे एवढ्यात कळणार नाही. कोणीतरी काही वर्षांनी अभ्यास केल्याशिवाय कसे सांगणार? आत्ता तेवढा 'डेटा' उपलब्ध असेल का?

१: स्वातीच्या नं १. मुद्द्याला अनुमोदन. इथे गे पेरेंट्स असण्याचं प्रमाण बरंच आहे त्यामुळे मुलांना सांगायला एवढं ऑकवर्ड वाटत असेल असं नाही किंवा ऐकणार्‍यांना एवढा धक्का बसत असेल असं नाही.

२. सूज्ञ, सुजाण पालक असतील तर ते ही चांगले संस्कार करु शकतील.

३. माहित नाही. त्यादृष्टीने विचार केलेला नाही.

२ हा सहज सुचलेला उप मुद्दा आहे.

खरा मुद्दा १ मात्र नक्कीच आहे. तसेच ३ पण. तिसर्‍या मुद्यांच्या समर्थानात मी अनेक पुस्तकात वाचलेले हे लिहू इच्छितो.

अगदी माणूस (किंवा स्त्री) असेल आणि तो स्ट्रेट असताना देखील, त्याला जाणता, अजाणता एखादा समलिंगी त्याला उत्तेजीत करू शकतो, कारण अवयवांना उत्तेजना येताना समोर स्त्री आहेत की पुरूष हे कळत नाही. आणि त्यामुळेच तिसरा मुद्दा (जो जेल मध्ये गे किंवा परिस्थितीमुळे (लैंगिक अत्याचारामुळे) गे हा उचित आहे, अर्थात त्यावर स्टॅट नाही, पण जेल मधील स्टॅट नक्कीच कामाला यावे.

गे पेरेंटेसचे मुलं गे होतील असे मी अजिबात म्हणत नाही. तर ते पालक फक्त "पुरक" ठरतील एवढेच मांडत आहे.आणि हे पुरक ठरणे म्हणजे परत खर्‍या स्वतंत्र्य वृत्तीच्या आड येणे पण असू शकते का?

ह्या शिवाय आणखी काही मुद्देही असतील, जे मी लक्षात घेतले नसतील. वाचकांकडून ती अपेक्षा.

मला स्वतःला असं वाटतं की सिंगल पॅरेंट आणि गे पॅरेंट हे वेगळे कन्सेप्ट आहेत. आणि मी केदारच्या मताशी खूप सहमत आहे.

मुलांनी स्त्री-पुरूष निसर्गनियमानुसार एकत्र रहातात हे पहाणे आणि त्या जीवनपद्धतीचे संस्कार मुलांमध्ये होणार नाहीत. समजा ह्या वरच्या उदाहरणातील मुलांपैकी एक स्त्रीबालक असेल तर स्वतःचे लैंगिक ओरीएंटेशन ठरवताना तिला गोंधळल्यासारखे नाही का होणार? अशी मुले पौगंडावस्थेत जास्त संभ्रमीत होऊ शकतात. पुन्हा दोन जुळ्यातील ज्या मुलाचा वीर्यदाता कुटुंबात सबमिसीव रोलमध्ये आहे.. त्या मुलाला त्याव्यक्तीची उद्या कीळस वाटली (समाजात "गे" हेटर्स बरेच आहेत) तर तो पालक हे कसे हाताळेल?

त्याचप्रमाणे दोन स्त्रिया पालक म्हणून एकत्र रहाताना त्यांच्या मुलीला त्या "पुरुष" कशाप्रकारे, कुठच्या नजरेतून दाखवू शकतील.

दोन्ही प्रकारांत मुले वातावरणाच्या प्रभावामूळे भिन्नलिंगी व्यक्तीला सामोरे जाताना फेअर चान्स देतील काय? त्यामुळे अंजलीचा तिसरा मुद्दा मला महत्वाचा आणि कळीचा वाटतो.

तसेच समाज अशा मुलांना सुखासुखी जगू देईल का? सेलिब्रेटीची मुले ह्या सगळ्याला अपवाद आहेत. सर्व सामान्य समाजात अगदी युरोपात देखिल "गे" कुटुंब सुरक्षित नाहीत.

ह्या सगळ्या मुद्द्याशी संबंधित इंग्लंडमधली घटना -
एक मध्यमवयीन जोडपे आहे ज्यांना मुले होऊ शकत नाहीयेत. त्यांनी फॉस्टरींग म्हणजे संगोपनासाठी मुले संभाळायची तयारी दाखवली. तसे अर्जही केले. पण ते डिवोटेड कॅथलिक आहेत म्हणून त्यांना मूल संभाळायला द्यायला नकार दिलाय.
त्यांनी ह्या विरोधात कोर्ट केस केलीये की मूल असणे आणि त्याचा सहवास हवा असणे हे कॅथलिक लोकांसाठी इतर समजांइतकेच साधारण आहे.
पण ह्याचा प्रतीवाद असा केला गेलाय की ते त्यांच्या धार्मिकभावनेमुळे गे जीवनपद्धती मुलांना अनुसरू देणार नाहीत. आणि ह्यामुळे मुलांच्या गे असू शकण्याच्या हक्कावर गदा येईल.

मला हे सगळे मूर्खपणाचे वाटते. ह्यात एका मुलाला आई वडिलांचे प्रेम मिळाले असते ते मुकले नाही का?

मला हे सगळे मूर्खपणाचे वाटते. ह्यात एका मुलाला आई वडिलांचे प्रेम मिळाले असते ते मुकले नाही का? >>>> अनुमोदन.

प्रत्येक जण प्रत्येकाचे सेक्स ओरियंटेशन स्वतः ठरवू शकते, त्यांचे स्वातंत्र्य वगैरे असे बोलतो. त्यामुळे गे असणे हा मुद्दा नाही.. >>> कसे आहे की सिगारेट पेयला लागायची मग म्हणायचे की आता कैन्सर होउ नये म्हणुन काय करता येइल याची चर्चा करुया पण मी सिगारेट मात्र सोडणार नाहि.

आपण (सर्व जगच) कोठे चालले आहे समजत नाहि. (मी धर्म , संस्क्रुती, इत्यादी गोष्टिबद्दल बोलत नाहि) जे natural आहे ते सोडुन देयचे आणी मग त्यातुन निर्माण झालेलले प्रश्न सोडवायचे हे मूर्खपणाचेच आहे. उद्या जनावरांबरोबर संबध ठेवण्यासाठी देखील आंदोलन होइल आणी मग त्यातुन येणारे आजार/रोग कसे टाळायचे यावर expert च्या चर्चा घडतील.

अवघड विषय!

जनावरांबरोबर संबध ठेवण्यासाठी देखील आंदोलन होइल आणी मग त्यातुन येणारे आजार/रोग कसे टाळायचे यावर expert च्या चर्चा घडतील.>>. अरेरे.

जाई जुई, त्या मुलांना इतर सुद्धा पालक मिळतील.
मुद्दा मुर्खपणाचा नाहीये. एकदा का फॉस्टर होम वाल्या संस्थांनी मुलांची जवाबदारी घेतली की त्यात ते समलिंगी असतील तर काय, हा सुद्धा प्रश्न येतो. उद्या ते मुल खरच समलिंगी निघालं तर हे पालक डिवाऊट कॅथलिक्स असल्यामुळे त्याला सोडुन देणार नाहीत हे कशावरुन?

मी सुद्धा गेल्या वर्षी एका गे दांपत्याबद्दलची Documentary बघीतली. ती बघून तर मला फारचं मूलभूत प्रश्न पडला.
गे दांपत्याने सरोगेट आईच्या मदतीने अपत्यप्रापती करून घेतली होती. त्या Documentary मधे त्या आईची पण मुलाखत दाखवली.
ते बाळ १ महीन्याचे असताना त्याला आईपासून विभक्त करून त्याच्या दोन वडिलांकडे सुपुर्त करण्यात आलं. त्यामुळे ती आई बाळाला Breastfeeding करू शकत नव्हती.
ती Documentary बघून मला प्रश्न पडला. गे असणं नैसर्गिक आहे हे मानून त्या दोन पुरुषांना लग्न करण्याचा अधिकार देण्यात आला. पण त्या बाळाची Breastfeeding ही नैसर्गिक गरज नाही का? ते का डावलण्यात आलं?
गे असण्याला माझा ही विरोध नाही. सज्ञान व्यक्तीला त्याचं सेक्स ओरिएंटेशन ठरवायचा स्वातंत्र्य आहे. पण बिचार्या बाळाला काही सांगता येत नाही की ,"मला आईचं दूध हवं. Formula नको." Happy

सोहा,
पण बिचार्या बाळाला काही सांगता येत नाही की ,"मला आईचं दूध हवं. Formula नको.">>>>ज्या नॉर्मल जोडप्यातली आई मेडीकल कंडीशनमुळे बाळाला पाजू शकत नसेल तर ती बाळं काय म्हणतील? किंवा ज्या आया शक्य असूनही करत नाहीत त्यांची बाळं?

ज्या नॉर्मल जोडप्यातली आई मेडीकल कंडीशनमुळे बाळाला पाजू शकत नसेल तर ती बाळं काय म्हणतील? किंवा ज्या आया शक्य असूनही करत नाहीत त्यांची बाळं? >>>

अंजली अमान्य, मुळात त्यांना दुध येत नाही किंवा शेप ठेवायचा म्हणून हे झाले. दुध न येणे ही खरी अडचण आहे. तिला मान्य करावेच लागेल. पण हाच रुल सगळ्यांना का? त्याच न्यायाने दुध पाजणार्‍या सर्व आया मग व्यथाच घोळ घालत आहेत असे होते. Happy त्यामुळे ते स्वातंत्र्य त्यांना मिळायला हवे असे माझे मत आहे.

जाईजुई म्हणाल्याप्रमाणे सिंगल पेरेंट हा मुद्दा देखील इथे थोडा विजोडच आहे कारण इथे जोडी नॅचरल नाही.

अकुने दिलेली लिंक चाळली, त्यातील आयडेंटिटी क्रायसेस हा अजुन एक मुद्दा आहेच.

गणू गे असण्याला तुमचा विरोध मी समजू शकतो. पण इथे गे असणं हा इश्यु नाही!

गे लोकांच्या चॉइस बद्दल मला काहीही इश्यू नाही. तो फार वैयक्तिक प्रश्न आहे. पालकत्व हा वेगळा इश्यू आहे. सुजाण पालकत्व व सेक्ष्युअल ओरिएंटेशन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर दोन गे व्यक्ती मुलांना उत्तम संस्कार, स्टॅबिलिटी, भावनिक आधार, सुरक्षितता नवे एन्रिचिन्ग अनुभव देउ शकत असतील तर काय हरकत आहे. मोठे होण्याच्या एका लेव्हल ला आपल्याला दुसर्‍याला नर्चर करावे, नेस्ट बनवावे असे वाटतेच. वांझोटी लफडी व कुठेही न जाणारे नाते संबंध किंवा नुसतेच मजा करणे किती दिवस. अर्थात हा ही वैयक्तिक चॉइस असू शकतो. एकदा तुम्ही पालकत्वाला कमिट झालात की वेगळ्या दिशेने ग्रोथ चालू होते.

मी सिंगल पेरेंट आहे पण शीअर कामाचे लोड, प्रेशर व घरकाम, घरी सोबत नसणे ह्यामुळे मला कधी कधी वाटते कि एखाद्या गे किंवा लेस मित्र/ मैत्रिणीबरोबर कम्यून स्वरूपात राहणे काय वाइट आहे.
त्यांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या बरोबर पण घर चालवणे, एकत्र राहणे, घरकाम शेअर करणे,
मुलांबरोबर अभ्यास व इतर चांगले अनुभव घेणे ह्यात मदत होइल. परत मुलांवर अब्युज होण्याची शक्यता पाहता गे/ लेस लोकांबरोबर राहणे बरे असे कधीकधी वाटते. सिंगल पेरेन्ट ही इतकी ऑल कंझ्युमिन्ग जबाबदारी आहे कि त्यात आपली स्ट्रेट रिलेशन्शिप डेवलप करायला काहीही वाव नाही.
पण असे कम्युन टाइप, आपली मुले व आपण असे राहता येइल असे नेहमी वाट्ते.

पालक मुलांच्याजीवनात काय टाइपचा इन्फ्लुअन्स आहेत ते महत्त्वाचे. त्यांचा सेक्ष्युअल चॉइस नव्हे.
मॉडर्न फॅमिली नावाच्या शो मध्ये एक चांगले गे कपल दाखिवले आहे. शिवाय गे लोकांना जीवनातील इतर बाबी जसे कला, साहित्य, लाइफ्स्टाइल मध्ये जास्त रस असतो. ( अनुभव )
अर्थात मला रिसर्च बॅकग्राउंड नाही त्यामुळे वरील प्रश्नांवर मी काय लिहीणार पण सिगल व गे पेरेंटिन्ग यांचे एकत्रीकरण करता आल्यास एक नवी जीवनशैली उदयास येइल. ह्यात फेमिनिझम वरील आपली मते पण इन्टॅक्ट राहतील. असे ही वाट्ते.

केदार, परत सांगशील का तुला काय म्हणायचं आहे ते?
माझं उत्तर सोहानं जो मुद्दा काढला ('पण त्या बाळाची Breastfeeding ही नैसर्गिक गरज नाही का?' - जो फक्त गे जोडप्यांच्या नवजात बालकांबाबत आहे) त्याला होतं.

ही बातमी काल की परवा मी पेपरमध्ये वाचली होती. हे दोन गे पुरुष मूकबधीर आहेत, हे वाचल्याचे आठवते. 'हे काळजी घेऊ शकतील का?' अशी शंका मनात डोकावली.

मला हेच म्हणायचे आहे की अडचण असताना दुध न मिळणे हे मान्य आहे पण दरवेळी तीच तुलना प्रत्येक मुलाबाबतीत का? अगदी सिंगल पेरेंट (पुरूष) असताना एखाद वेळी तान्ह्या मुलाला दुध मिळणार नाही, पण हे बघा, त्यांना मिळतं का दुध? मग तुम्ही का अट्टहास करताय? हे मात्र मला अमान्य आहे एवढेच म्हणत आहे.

माझ्या मते आईचं दूध हे महत्वाचं आहे. पण (केवळ) हा मुद्दा धरून गे जोडप्यांना पालकत्व नाकारावं असं मला वाटत नाही.

केदार / सोहा, ही पर्टिक्युलर केस मला माहीत नाही, पण सर्व बाबी कायदेशीर असतील तर सरोगेट मदरशी व्यवस्थित करार केलेला असतो. तिने नंतर तक्रार करण्याला अर्थ नाही. तसंच मातेचं दूध सर्वोत्तम आहार असला तरी एकमेव आहार नाही.

सर्व प्रकारे योगक्षेम वाहू शकणारे पालक ही तितकीच, किंबहुना त्याहून अधिक नैसर्गिक गरज आहे.

अमा.. गे कपल्स किंवा रिलेशनमध्ये मुल अब्युज होणार नाहीत हे गृहितक आहे हो.. इथेही मुले अब्युज होऊ शकतात नि त्यातून तर आपल्याला अनपेक्षित समस्या येऊ शकतात.

कम्युनिटी गट एकटे स्त्री/पुरुष पालक असा असेल ना..? कम्युन गट गे पालक असा असेल तर पुन्हा वेगळा आयाम आहे, असे मला वाटते.

वैद्यबुवा, कुठचेही धार्मिक अनुसरण असले किंवा लैंगिक अनुसरण असले तरी पालक आपल्या मुलांवर रागावतात किंवा प्रेम करतात ते सहवासातल्या प्रेमामुळे. सर्वसाधारण कोणतेही पालक "गे मूल" तशाच प्रकारे हातळेल जसे की कॅथेलिक पालक नाही का? असाच प्रश्ण मी गे पालकत्वाबद्दल उठवला तर की उद्या हे गे पालक आपल्या अपत्याच्या भिन्नलिंगी ओढीने चिडुन त्याला बाहेर काढणार नाहीत कशावरून?

>> सर्वसाधारण कोणतेही पालक "गे मूल" तशाच प्रकारे हातळेल जसे की कॅथेलिक पालक नाही का? असाच प्रश्ण मी गे पालकत्वाबद्दल उठवला तर की उद्या हे गे पालक आपल्या अपत्याच्या भिन्नलिंगी ओढीने चिडुन त्याला बाहेर काढणार नाहीत कशावरून?

जाईजुई, कॅथलिक फार कट्टरपंथीय असतात म्हणून तो विचार आला आहे. गे नॉन-गे लोकांच्या बाबतीत असा काही द्वेष करत असल्याचे अशा घाऊक प्रमाणात दिसलेले नाही.

सुजाण पालकत्व व सेक्ष्युअल ओरिएंटेशन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
>> १००% सहमत!
ब्रेस्ट मिल्कचा मुद्दा कुठल्याही सरोगसीच्या किंवा अ‍ॅडॉप्शनच्या केसमधेही येतोचकी. गे कपल आहे म्हणून असे झाले असे थोडेच आहे? भीन्नलिंगी कपल असते तरी हेच झाले असते.

मला तरी यात काहीच प्रश्न दिसत नाही. मुलांना शाळेत प्रश्न विचारले गेले तरी सुजाण पालक काय सांगायचे ते मुलांना व्यवस्थीत समजावून सांगू शकतात. खरे तर बहुतेक मुले कुटूंब वेगवेगळ्या प्रकारची असतात हे खूप सहजपणे मान्य करतात. मुलांचे आईबापच बरेचदा ही गोष्ट मान्य करु शकत नाहित आणि आपल्या मुलांना तिरस्कार करायला शिकवतात. Sad

बरोबर स्वाती. गे नसणं हा "टॅबू" नाहीये गे लोकांकरता. अमेरिका पुष्कळ पुढारलेला देश आहे असं म्हंटलं तरी गे लोकांना अजूनही झगडावं लागतं लोकांच्या द्वेषाविरुद्ध आणि समान हक्कांकरता सुद्धा.

अश्या सेटप मधली मुले उलट जास्त उदारमतवादी होतील. त्यांच्या भावी पार्टनरला जास्त चांगले समजावून घेऊ शकतील. मुले पेरेन्ट चांगला कि वाइट ते बघतात. स्त्री कि पुरुष/ गे कि स्ट्रेट हे त्यांच्या साठी फार महत्त्वाचे नसते. त्यांच्यासमोर वावरताना आपण प्रथम पालक असतो मग एक अ‍ॅडल्ट विथ चॉइसेस. ती प्रायवसी जपता आली तर उत्तम मुले वाढवणे शक्य आहे. आता उभे राहणारे नव्या इकॉनमीतील नव्या प्रकारचे जॉब्स त्यांना अधिक चांगले समजतील. कारण त्यांनी वेगळ्या सिच्युएशन्स फेस केलेल्या अस्तील. मुले नेहमी भविष्याकडे बघत असतात. पालक हा त्यातला फक्त एक फॅक्टर आहे/ त्यांचे जीवन, प्रायोरिटिज आपल्याहून वेगळे असतात. हे लक्षात घेतले पाहिजे.

उत्तम संभाषण कला विनोद बुद्धी, हुशारी, संवेदनशीलता मुलांवरील प्रेम हे जेंडरलेस गूण आहेत.

Pages