साक्षर भारत आणि आपला खारीचा वाटा (सार्वजनिक धागा)

Submitted by वैजयन्ती on 9 May, 2011 - 02:45

मधंतरी माझ्याकडे काम करणार्‍या बाईच्या मुलीच्या शिक्षणासंबधी इथल्याच एका धाग्यावर मी माझ्या अडचणी विचारल्या होत्या. मला अगदी लगेच उत्तरे मिळाली, पण त्याचवेळी असंही लक्षात आलं की कितीतरी लोक इकडे आपला खारीचा वाटा उचलत आहेत. आपण आपले अनुभव / अडचणी आपण शेअर इकडे करुया का?
आपले बरे/वाईट दोन्ही अनुभव लिहूया.
ज्यांना शिकायचय त्यांचीच उदासीनता, त्यामुळे झालेला उत्साहभंग, ज्यावेळी यावर मात करता आली त्यावेळी कशी केली, घरातल्यांची मदत किंवा त्यांची होणारी चिड्चिड, त्यातून निघालेला किंवा न निघालेला मार्ग.. अश्या गोष्टी शेअर करता करता, आपल्याला उत्तरे सुद्धा मिळतील. कमीत कमी एकमेकांना आधार तरी होईल!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच नेटवर एका शोधात ही माहिती तरुण भारतच्या साईटवर मिळाली. (अर्काइव्ह्ज)
कोणाला उपयोगी पडू शकेल म्हणून येथे चिकटवत आहे.

दहावी आणि बारावी परीक्षेत अपशय आलेल्या किंवा गुण कमी मिळालेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनींना पुढे काय करावे?हा मोठा प्रश्‍न असतो. या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योेगजकतेची कास धरण्याचा उत्तम पर्याय आहे. यामध्ये पुण्याच्या आसपासच्या तीन संस्थांमध्ये पूर्णपणे विनामूल्य स्वयंरोजगार देण्याची सोय आहे. या ठिकाणी फक्त प्रशिक्षणच मोफत नाही; तर निवास व भोजनव्यवस्थाही विनामूल्य आहे. या तीन संस्थांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे-

१) महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था :-

बँक ऑफ महाराष्ट्राने दहा वर्षांपूवी हडपसर येथील औद्योगिक वसाहतीत हे केंद्र सुरू केले. संस्थेचे कामकाज सांभाळण्यासाठी दोन अधिकारी बँकेने नियुक्त केले आहेत. प्रशिक्षणाची निवड करणे, प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे, विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना मिळवून देणे एवढेच नाही; तर प्रशिक्षणोत्तर फॉलोअप या गोष्टीही हे अधिकारी समर्थपणे पार पाडतात. दहावीपर्यंत (पास/नापास) शिक्षण घेतलेल्या २० ते ३५ वयोगटातील युवक/युवतींना विविध प्रकारचे तांत्रिक अभ्यासक्रम शिकवले जातात. मोबाईल फोन दुरुस्ती व देखभाल, ब्युटी पार्लर, फोटोग्राफी व व्हिडीओ शुटिंग, पेपर बॅग्ज/फाईल्स, कव्हर्स तयार करणे, टेलरिंग व ड्रेस डिझायनिंग, सॉफ्ट टॉईज, दुग्धव्यवसाय, दुचाकी वाहनाची दुरुस्ती व देखभाल, टॅली पॅकेज, डिजिटल फोटोग्राफी यासारखे तांत्रिक अभ्यासक्रम शिकवले जातात. प्रशिक्षण १५ ते ४५ दिवस चालते. या प्रशिक्षणामध्ये फक्त तांत्रिक प्रशिक्षणच नाही; तर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे अष्टपैलुत्व यावे लागते, त्या सर्व गोष्टींंची शिकवण दिली जाते. महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेची राज्यात ७ केंद्रे आहेत; ज्यामध्ये पुणे (०२०-२६८२१५१३/१४), नाशिक (०२५३-२५९०००७६), औरंगाबाद (०२४०-२४०२५०१), नागपूर (०७१२-२४४३४८२), अमरावती (०७२१-२५७८३८०), ठाणे व जालना या केंद्रांचा समावेश आहे.

२) रुडसेट इन्स्टिट्यूट (तळेगाव) : सिंडिकेट बँक व कॅनरा बँक :-

या दोन बँकांनी तळेगाव दाभाडे, पुणे येथे रुडसेट इन्स्टिट्यूटची सुरुवात १९९९ मध्ये केली. १८ ते ४५ दरम्यान किमान सातवी पास शिक्षण झालेल्यांना या केंद्रात स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण नाबार्ड व सिडवी यांनी पुरस्कृत केले असून, प्रशिक्षण प्रमाणपत्रामुळे बँकेतून मिळणार्‍या कर्जालाही हे उमेदवार पात्र असतात. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांपर्यंत संस्थेकडून पाठपुरावा केला जातो व प्रशिक्षणाचा उमेदवारास कशाप्रकारे लाभ झाला, याचा आढावा घेण्यात येतो. या केंद्रामध्ये ड्रेस डिझायनिंग, हस्तकला, अन्नप्रक्रिया व बेकरी, ब्युटी पार्लर, स्वेटर निटिंग, सॅनिटरी नॅपकिन, दुग्धव्यवसाय, गांडूळ खतनिर्मिती, शेळीपालन, फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी, कुक्कुटपालन, उदबत्ती तयार करणे, घरगुती विद्युत उपकरणं दुरुस्ती, मल्टीफोन सर्व्हिसिंग, फ्लॉवर डेकोरेशन, टू व्हिलर दुरुस्ती, विविध मसाले बनवणे, असे विविध प्रशिक्षण कार्यक्रम येथे दाखवले जातात. संपर्कासाठी संस्थेच्या दूरध्वनी क्रमांक ०२११४-२२५५०४.

३) बरोडा स्वयंरोजगार विकास संस्थान, थेऊर फाटा, पुणे :-

बँक ऑफ बरोडाने थेऊरफाटा, पुणे येथे २००५ मध्ये या केंद्राची सुरुवात केली. १८ ते ४५ वर्षादरम्यान किमान आठवी शिक्षण झालेल्यांना या ठिकाणी दोन ते चार आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणामध्ये तांत्रिक कौशल्याबरोबरच प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून विक्री कौशल्यापर्यंत सर्व बाबींवर मार्गदर्शन केले जाते. या संस्थेत डेअरी फॉर्मिंग, डेअरी डेव्हलपमेंट, व्हर्मी कम्पोस्ट, टेलरिंग, ब्युटी पार्लर, मोबाईल रिपेरिंग, सॉफ्ट टॉईज व डेकोरेटिव्ह आयटम्स, अगरबत्ती व मेणबत्ती उत्पादन, दुचाकी वाहनदुरुस्ती, कॉम्प्युटर हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग टेक्निक, टीव्ही/रेडिओ/इलेक्ट्रिकल वस्तू दुरुस्ती, लेदर वस्तू उत्पादन, आर्टिफिशियल ज्वेलरी मेकिंग, फोटोग्राफी व व्हिडीओ शुटिंग, कॉम्प्युटर बेसिक व डीटीपी यासारखे कोर्सेस शिकवले जातात. संपर्कासाठी संस्थेचा दूरध्वनी क्रमांक आहे ०२०-२६९१२००७/९९७५०४५१७६.

परवा व्हॉट्स अॅपवर एक संदेश व फोन नं फिरत होता. संबंधित व्यक्तीला फोन करून माहिती विचारली तर त्यांनी संदेशातील मजकूर कन्फर्म केला.
पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या, ग्रामीण भागांतील गरीब, बेरोजगार व होतकरू तरूणांची दरमहा, ३०० ते ४०० रूपयांत ३/४ शेयरिंग बेसिस वर राहाण्याची सोय ते करतात. अर्थात ही सोय कशी, काय आहे हे मी प्रत्यक्ष पाहिलेले किंवा त्याबद्दल कोणाकडून ऐकलेले नाही.

डॉ रोहीत बोरकर, हितकारिणी संस्था, पुणे.
८७९६५१००२४ / ८७९६८१८१७०.

Pages