NCECA मातीकामाच्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

जानेवारीत कॉलेजच्या सिरॅमिक स्टुडीओमध्ये एनसिका (NCECA - National Council on Education for the Ceramic Arts) कॉन्फरन्सचे पत्रक नोटीसबोर्डवर लागले. नजदिकच्या काळात होणार्‍या वर्कशॉप, आर्ट शोज् यांची पत्रकं नेहमीच तिथे लागत असतात. त्यावर एक नजर टाकायची, हे सगळे महागडे प्रकार आपल्यासाठी नाहीत असे म्हणून खांदे उडवायचे आणि कामाला जायचे हा सगळ्यांचा नेहमीचा रिवाज. यावेळीही दुसरे काही केले नाही.

काही दिवसांनी सरांनी विचारले तू जाणार का कॉन्फरन्सला, जायला हवंस तुला नक्की आवडेल. मातीकामाची कॉन्फरन्स ही कल्पनाच मला भारी वाटत होती. या क्षेत्रातला माझा अनुभव बघता तिथे लोक काय बोलत असतील, मला कळेल का, मला अजून मातीचे किती प्रकार असतात हे कळत नाहीत मग बाकीचे सगळे कसे कळणार असल्या हजार शंकांनी घेरले, शेवटी त्यावर मात करून मी माझ्या मातीकामाच्या पहिल्या कॉन्फरससाठी एकदाचे नाव नोंदवले.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कॉन्फरन्ससाठी युनिव्हर्सिटी ऑफ टॅम्पा, फ्लोरीडा गाठले. तिथे पोचल्यावर कन्व्हेन्शन सेंटरला नावनोंदणी केली, स्वतःच्या नावाचा बिल्ला, कार्यक्रमाचे पत्रक असे सगळे घेतले. काऊंटरवर विचारले किती लोक आहेत यावेळी, उत्तर आले रिसेशनमुळे यावेळी जरा लहानच होणार आहे कॉन्फरन्स, ४००० वगैरे लोक असतील. मातीकाम करणारे लोक, तेही फक्त चार हजार अश्या छोट्याश्याच कॉन्फरन्समध्ये आपण आलोय हे बघून मला भरून आले.

इतर विषयांच्या सायन्टीफिक कॉन्फरन्स होतात तशीच ही पण होती. लोक एकमेकांना स्वतःच्या कामाबद्दल, येणार्‍या अडचणीबद्दल, त्यावरच्या उपायांबद्दल, नवीन लागलेल्या शोधाबद्दल, मातीकामामुळे होणार्‍या पर्यावरणाच्या हाणीबद्दल, रीसर्च फंडींगबद्दल बोलत होते. पण त्यांचे फोटो काढून इथे टाकण्याइतके विशेष त्यात काही नव्हते.

एका हॉलमध्ये कलाकारांचे मोठे प्रदर्शन भरले होते जिथे मातीच्या वस्तू विकायला होत्या, दुसर्‍या हॉलमध्ये सगळे विक्रेते, तिथे वेगवेगळे ग्लेझ, मातीकामचे टूल्स, भट्ट्या, चाक, टीशर्ट, मातीकामाची पुस्तके, डीव्हीडी असे सगळे.
तिसर्‍या हॉलमध्ये अनेक कलाकार आपल्या कलेचा डेमो देत होते, त्यावर चर्चा करत होते.

एक कलाकार चाकावर एकाच वेळी १७५ पौंड मातीचे (त्याच्या स्वतःच्या वजनापेक्षा जास्त मातीचे) भांडे कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक देतांना

या कलाकाराशी बोलतांना त्याने सांगीतले की या उन्हाळ्यात तो स्वतःच्या घरासाठी बाथटब स्वतः बनवणार आहे, चाकावर. ते त्याचे खूप दिवसंचे स्वप्न आहे.

सहा फुटापेक्षाही उंच भांडे बनवायचे प्रात्यक्षिक देतांना

हाताने मोठा रांजन बनवतांना

बाकी बर्‍याच ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरचे चर्चासत्र सुरू होते. सतत ४ दिवस तुमच्या भोवतालचे सगळेजण फक्त आणि फक्त मातीकामाबद्दल उत्साहाने बोलताहेत, मुख्य म्हणजे ते जे बोलताहेत ते एकमेकांना (आणि बरचस मलासुद्धा) कळतय हे बघून दिल खुश हो गया.

या ठिकाणी हजेरी लावलेले बरेचसे लोक शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीत शिकवणारे शिक्षक होते, काही विद्यार्थीही होते तर बरेचसे लोक स्वतःचा स्टुडीओ असलेले तर काही अगदी प्रसिद्ध कलाकार होते.
आपल्याकडे जसे विज्ञान प्रदर्शन असते तसे इथे बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मातीच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते. देशभरातल्या शाळेतून प्रवेशिका पाठवण्यात आल्या होत्या. त्या हॉलबाहेर K-12 Exhibition असे लिहीले होते म्हणून नाही तर कुठल्याही प्रसिद्ध कलाकाराच्या कलाकृती वाटतील इतक्या सुंदर कलाकृती शाळकरी मुलांनी केल्या होत्या. त्यातले हे काही फोटो.
या बुटाच्या लेस फक्त मातीच्या नाहीयेत बाकी सगळे मातीपासून बनवलय

खरीखुरी बॅग वाटते ना

वर्तमानपत्र, दूधाचा डबा, डोनट, कप केक बघतांना सगळे अगदी वाटत होते. प्रत्यक्षात बघतांना मला आधी वाटले की कोणीतरी वाचतांना पेपर विसरून गेलय नंतर कळले की तो मातीचा पेपर आहे.

हातोडा, स्क्रु ड्रायव्हर, पिशवी

हा एका पाचवीतल्या मुलाने केलेला जिराफ

मातीची विहीर

सहावीतल्या मुलाने केलेला कपबश्यांचा सेट

चहाची किटली

जिराफाचा मुखवटा

झेब्र्याचा मुखवटा

आणि ही पहिलीतल्या मुलाने केलेली पोस्टाची गाडी

हे सगळे तर कॉन्फरन्समध्ये बघायला मिळालच पण बाकी इतकं काही ऐकायला, बघायला मिळाले, प्रेरणा मिळाली की माझ्या कल्पनांना आता धुमारे फुटू लागलेत. तेव्हा काही दिवसांनी तुम्हाला माझी कारागिरी बघायला मिळेल :).
तुमची शाळेत जाणार्‍या वयाची मुले असतील तर त्यांना हे नक्की दाखवा न जाणो त्यांना यातुन काही करायची प्रेरणा मिळेल.

मुलांच्या कलाकृतींचे अजून काही फोटो इथे बघता येतील.

प्रकार: 

सगळे मातीत गेले म्हणतात पण इथे लोकांनी मातीचे सोने केले आहे. Happy फारच जबरी. ती बॅग व हातोडीवाली बाग, पेपर जबरी आहे.

.

अफाट अफाट अफाऽट सुंदर! सुंदर कलाकृंतींचा आढावा आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद रुने!

पहिल्या दोन फोटोंतली प्रचंड भांडी घडवतानाचे व्हिडिओ आहेत का कुठे?

सुरेख!!!
मातीकाम म्हटलं की फक्त गोलाकार कुंड्या/रांजण किंवा फारतर फुलदाण्या डोळ्यासमोर यायच्या. किती कलात्मक आणि सुंदर गोष्टी आहेत!!!!
फार कौतुक आणि थोडासा हेवा ही कला ज्यांच्या हातात आहे त्यांचा Happy

वॉव, काय जबरी मातीकाम केलंय लोकांनी. ५ वी अन ६ वी तल्या मुलांचं तर फारच कौतुक वाटलं. कितीतरी वेळ डीव्होट करावा लागत असेल ना या सगळ्याला, ते लहान वयात एकाग्रतेने करणे खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्या बॅग्स तर अहाहा.. सांगितले नसते तर नक्कीच लेदर बॅग वाटल्या असत्या.
छान केलंस रुनी हे सगळं इथे शेअर करुन. Happy

एकसे बढकर एक वस्तू आहेत सगळ्या. त्या लहान मुलांनी बनवलेल्या वस्तू तर खरंच कौतूकास्पद आहेत. Happy

मस्तच.. सही आहे सगळ्या गोष्टी.
तो पेपर करायला सोप्पाय. आधी मातीचा आकार बनवायचा मग त्याला पेपर चिटकवायचा.. Lol

मस्तच रुनी. तुझं मातीकाम अशा कॉन्फ.मध्ये लवकरच बघायला मिळेल, हो ना? Wink
पहिली, पाचवी आणि सहावीतली मुलंही भारीच आहेत.

मस्त, एकदम आवडला अनुभव व वस्तु... बाप रे, तो पेपर, पर्स, विहीर, बूट.. कम्म्म्म्माल्ल्ल्ल्लय!!!

रुनी, लहान मुलांना कुठे शिकावयास पाठवावे हे?

Pages