NCECA मातीकामाच्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
1’

जानेवारीत कॉलेजच्या सिरॅमिक स्टुडीओमध्ये एनसिका (NCECA - National Council on Education for the Ceramic Arts) कॉन्फरन्सचे पत्रक नोटीसबोर्डवर लागले. नजदिकच्या काळात होणार्‍या वर्कशॉप, आर्ट शोज् यांची पत्रकं नेहमीच तिथे लागत असतात. त्यावर एक नजर टाकायची, हे सगळे महागडे प्रकार आपल्यासाठी नाहीत असे म्हणून खांदे उडवायचे आणि कामाला जायचे हा सगळ्यांचा नेहमीचा रिवाज. यावेळीही दुसरे काही केले नाही.

काही दिवसांनी सरांनी विचारले तू जाणार का कॉन्फरन्सला, जायला हवंस तुला नक्की आवडेल. मातीकामाची कॉन्फरन्स ही कल्पनाच मला भारी वाटत होती. या क्षेत्रातला माझा अनुभव बघता तिथे लोक काय बोलत असतील, मला कळेल का, मला अजून मातीचे किती प्रकार असतात हे कळत नाहीत मग बाकीचे सगळे कसे कळणार असल्या हजार शंकांनी घेरले, शेवटी त्यावर मात करून मी माझ्या मातीकामाच्या पहिल्या कॉन्फरससाठी एकदाचे नाव नोंदवले.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कॉन्फरन्ससाठी युनिव्हर्सिटी ऑफ टॅम्पा, फ्लोरीडा गाठले. तिथे पोचल्यावर कन्व्हेन्शन सेंटरला नावनोंदणी केली, स्वतःच्या नावाचा बिल्ला, कार्यक्रमाचे पत्रक असे सगळे घेतले. काऊंटरवर विचारले किती लोक आहेत यावेळी, उत्तर आले रिसेशनमुळे यावेळी जरा लहानच होणार आहे कॉन्फरन्स, ४००० वगैरे लोक असतील. मातीकाम करणारे लोक, तेही फक्त चार हजार अश्या छोट्याश्याच कॉन्फरन्समध्ये आपण आलोय हे बघून मला भरून आले.

इतर विषयांच्या सायन्टीफिक कॉन्फरन्स होतात तशीच ही पण होती. लोक एकमेकांना स्वतःच्या कामाबद्दल, येणार्‍या अडचणीबद्दल, त्यावरच्या उपायांबद्दल, नवीन लागलेल्या शोधाबद्दल, मातीकामामुळे होणार्‍या पर्यावरणाच्या हाणीबद्दल, रीसर्च फंडींगबद्दल बोलत होते. पण त्यांचे फोटो काढून इथे टाकण्याइतके विशेष त्यात काही नव्हते.

एका हॉलमध्ये कलाकारांचे मोठे प्रदर्शन भरले होते जिथे मातीच्या वस्तू विकायला होत्या, दुसर्‍या हॉलमध्ये सगळे विक्रेते, तिथे वेगवेगळे ग्लेझ, मातीकामचे टूल्स, भट्ट्या, चाक, टीशर्ट, मातीकामाची पुस्तके, डीव्हीडी असे सगळे.
तिसर्‍या हॉलमध्ये अनेक कलाकार आपल्या कलेचा डेमो देत होते, त्यावर चर्चा करत होते.

एक कलाकार चाकावर एकाच वेळी १७५ पौंड मातीचे (त्याच्या स्वतःच्या वजनापेक्षा जास्त मातीचे) भांडे कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक देतांना

या कलाकाराशी बोलतांना त्याने सांगीतले की या उन्हाळ्यात तो स्वतःच्या घरासाठी बाथटब स्वतः बनवणार आहे, चाकावर. ते त्याचे खूप दिवसंचे स्वप्न आहे.

सहा फुटापेक्षाही उंच भांडे बनवायचे प्रात्यक्षिक देतांना

हाताने मोठा रांजन बनवतांना

बाकी बर्‍याच ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरचे चर्चासत्र सुरू होते. सतत ४ दिवस तुमच्या भोवतालचे सगळेजण फक्त आणि फक्त मातीकामाबद्दल उत्साहाने बोलताहेत, मुख्य म्हणजे ते जे बोलताहेत ते एकमेकांना (आणि बरचस मलासुद्धा) कळतय हे बघून दिल खुश हो गया.

या ठिकाणी हजेरी लावलेले बरेचसे लोक शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीत शिकवणारे शिक्षक होते, काही विद्यार्थीही होते तर बरेचसे लोक स्वतःचा स्टुडीओ असलेले तर काही अगदी प्रसिद्ध कलाकार होते.
आपल्याकडे जसे विज्ञान प्रदर्शन असते तसे इथे बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मातीच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते. देशभरातल्या शाळेतून प्रवेशिका पाठवण्यात आल्या होत्या. त्या हॉलबाहेर K-12 Exhibition असे लिहीले होते म्हणून नाही तर कुठल्याही प्रसिद्ध कलाकाराच्या कलाकृती वाटतील इतक्या सुंदर कलाकृती शाळकरी मुलांनी केल्या होत्या. त्यातले हे काही फोटो.
या बुटाच्या लेस फक्त मातीच्या नाहीयेत बाकी सगळे मातीपासून बनवलय

खरीखुरी बॅग वाटते ना

वर्तमानपत्र, दूधाचा डबा, डोनट, कप केक बघतांना सगळे अगदी वाटत होते. प्रत्यक्षात बघतांना मला आधी वाटले की कोणीतरी वाचतांना पेपर विसरून गेलय नंतर कळले की तो मातीचा पेपर आहे.

हातोडा, स्क्रु ड्रायव्हर, पिशवी

हा एका पाचवीतल्या मुलाने केलेला जिराफ

मातीची विहीर

सहावीतल्या मुलाने केलेला कपबश्यांचा सेट

चहाची किटली

जिराफाचा मुखवटा

झेब्र्याचा मुखवटा

आणि ही पहिलीतल्या मुलाने केलेली पोस्टाची गाडी

हे सगळे तर कॉन्फरन्समध्ये बघायला मिळालच पण बाकी इतकं काही ऐकायला, बघायला मिळाले, प्रेरणा मिळाली की माझ्या कल्पनांना आता धुमारे फुटू लागलेत. तेव्हा काही दिवसांनी तुम्हाला माझी कारागिरी बघायला मिळेल :).
तुमची शाळेत जाणार्‍या वयाची मुले असतील तर त्यांना हे नक्की दाखवा न जाणो त्यांना यातुन काही करायची प्रेरणा मिळेल.

मुलांच्या कलाकृतींचे अजून काही फोटो इथे बघता येतील.

प्रकार: 

Happy

मी तुला या बद्दल विचारणारच होतो, बरे झाले सुरु केलस सांगणं.
कॅलटेकला एक क्लब आहे तिथे जायचा विचार अधुनमधुन होत असतो, अजुन जाणे मात्र झाले नाही Sad

अबाबा ! रुनी ते हातोडा , बॅग , स्क्रु ड्रायवर सगळ मातीचं आहे ? तु सांगतेस म्हणुन नाहीतर नुसत बघितलं असतं अजिबात विश्वास बसला नसता.

मस्तच गं ! धन्यवाद रुनी ईथे दाखवल्याबद्दल! तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि फोटोंच्या प्रतिक्षेत. Happy

तुम्ही जाणार असे वाचले होते तेव्हा पासून उत्कंठा होती. तो वृत्तांत वाचायला मिळाला. किती सुरेख वस्तू बनविल्या आहेत. आणि आता तुमच्या नवीन कलाकृतींची वाट पाहात आहे.
तुम्ही एकदा पाँडिचेरीस जरूर भेट द्या तिथे ऑरोविल मध्ये पण जबरी मातकाम होते. मातीकामाबद्दल एक माहितीपूर्ण आर्टिकल पण लिहा ना. पुढील मातीकामास शुभेच्छा.

जबरी लोक आहेत एकेक..

आता रुनीचा जबरीपणा पाहण्यास उत्सुक. आलेली स्फुर्ती लवकरच क्रूतीत उतरो ही सदिच्छा.... Happy

एरवी शीर्षक वाचून एक इंग्रजी नावाची कॉन्फरन्स म्हणून मी वाचायच्या भानगडीतही पडले नसते, पण लेखक म्हणून तुझं नाव वाचून पान उघडलं आणि अज्जिबात निराशा झाली नाही. छान अनुभव आहे हा अगदी.... तुझ्या ह्या आवडीच्या क्षेत्रात खूप मोठी हो, भरपूर प्रगती कर Happy

सहीच! पहिले दोन फोटो तर अफलातून! एकढे भव्य मातीचे भांडे चाकावर बनू शकते हे कुणी असेच सांगितले तर त्याला वेड्यात काढतील लोक! (तू पण या फोटोंचे प्रिंट जवळ ठेव... पुरावा म्हणुन दाखवायला Wink )

अरे सहीच आहे हे! किती सुंदर सुंदर, अजब वस्तू बनवल्या आहेत मातीपासून.... आणि त्या मातीच्या आहेत हेही कळत नाहीए. मस्त गं रूनी!

अफलातून ! काय कला असते एकेकांकडे...
रूनी, तुझी स्फूर्ती प्रत्यक्षात बघायला मी उत्सुक आहे. Happy
<< पण लेखक म्हणून तुझं नाव वाचून पान उघडलं आणि अज्जिबात निराशा झाली नाही. >> मंजूडीला अनुमोदन.

Pages