बोजड मराठी शब्द

Submitted by हर्ट on 6 April, 2011 - 12:01

नमस्कार मित्रहो. इथे काय लिहायच? मराठी भाषेत जे शब्द तुम्हाला कायम बोजड वाटत आले आहेत ते शब्द.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'अमुक तमुक विषय अत्यंत वादातीत आहे' हे मी लै लोकांकडून ऐकले आहे (हमखास ऐकू येण्याचे ठिकाणः मिरज विद्यार्थी गृह वसंत व्याख्यानमालेकरता सतरंज्या अंथरणे-गुंडाळणे काम करणार्‍या स्वयंसेवकांधील व्याख्याना आधीची वा नंतरची चर्चा Happy )

रंध्र हे एक असेच काहीसे बोजड वाटणारे नाम आहे. रंध्रचा खरा अर्थ होतो 'छिद्र' (इंग्रजीत Aperture) पण आपल्या साहित्यिकांनी वीररसासाठी 'रंध्रारंध्रातून' चे प्रयोजन केल्याने देशभक्ती म्हणजे नसानसातून वाहत असणारे काहीतरी प्रकरण आहे असे भासते.
'विमर्शकारी', 'निस्सारक' , 'प्राप्य', 'अभ्यवेक्षण' हेही काही असे बोजड शब्द आहेत की याचा अर्थ काय असावा याबद्दल नेहमीच गोंधळ उडतो. खरे तर यांचे इंग्रजी रुपांतर भावते.

वादातीत हा शब्द बोजड नसला तरी अनेकजण 'वादग्रस्त'ला समानार्थी म्हणुन वापरतात>>>>

> खरे आहे. हा अनुभव मी घेतला आहे. व्याख्यानमालेत "जयंत नारळीकर यांचे कार्य वादातीत आहे" असे उदगार एका वक्त्याने काढले होते. पण चहापानाच्या वेळी चक्क एका जेष्ठ व्यक्तीने 'नेमका कसला वाद आहे त्यांच्या संशोधनाबद्दल?" असे विचारून संयोजकांची पंचाईत केली होती.

> भालचंद्र नेमाडे यांच्या "बिढार" चतुष्ट्यातील एका कादंबरीत असाच गोंधळाचा प्रसंग आहे. संपकर्‍यांसमोर मुस्लिम वस्तीत भाषण करणारा कम्युनिस्ट पुढारी म्हणतो, "सरकार का डोका अकलमंद हो गया है | काम नही करता |" म्हणजे 'अकलमंद' चा अर्थ भलताच.

मला ह्या बोजड शब्दांचे अर्थ जरी कळले तरी मला ते बोलीभाषेपासून शेकडो मैल लांब गेल्यामुळे लिहिताना वापरणे वा वाचताना ते शब्द येणे फार बोजड वाटतात. शब्दांचे अर्थ कळतात.. ते कळत असे नाही पण त्याला पर्यायी सोपे सुलभ बोलीभाषेच्या अगदी जवळ जाणारे शब्द असताना इतके किचकट शब्द लेखक का वापरतात कळत नाही. प्रंबंधाची भाषा पाहिली की ती समजून घेणे हेच एक संशोधन वाटते.

बोली भाषा आणि औपचारिक भाषा यात फरक असतोच. असणारच.
प्रबंध हा सत्य, सिद्धांत, संशोधन इत्यादींना मांडणारा असणे अपेक्षित असते. बोली भाषेतला मोकळेढाकळेपणा, मनोरंजनात्मक मूल्य त्यात असणारच नसते. गरजही नाही त्याची.

संपृक्त चा अर्थ नाही लिहिला का कुणी. कुठल्याही द्रावात, विरघळणारा पदार्थ टाकत तो ढवळत राहिल्यावर, एक अवस्था अशी येते कि त्यानंतर तो पदार्थ आणखी टाकल्यास त्या द्रावात विरघळत नाही.
त्याला संपृक्त द्राव म्हणतात.

'वादातीत' चा अर्थ 'वादांच्या पलिकडे जाणारा' असा असावा बहुतेक! 'निर्विवाद'च्या अर्थाच्या जवळ जाणारा अर्थ!'
'एखाद्याचं कार्य वादातीत आहे' म्हणजे ज्यावर काहीही विवाद होऊ शकत नाही असा, माझ्या मते!

बी,
तुम्ही म्हणता तसे शब्द इतरही भाषांमध्ये असतीलच, अगदी इंग्रजीमध्येही.
मग केवळ संस्कृतोद्भव शब्द आहेत (उच्चारायला अंमळ कठीण) म्हणून ते बोजड 'वाटतात'.
तुम्ही जे म्हणताय की पर्यायी व सोपे शब्द आहेत- त्यांचीही एक यादी द्या इथे.
म्हणजे, तुम्हाला बोजड वाटणारे शब्द व त्यांचे तुमच्या हिशोबी सोपे असे पर्यायी शब्द या दोहोंचा विचार व्हायला हवा.

चैतन्य, माझा बोजड शब्दांशी वाद नाही की मला पर्यायी शब्द द्यायला हवे. मला फक्त इतकेचं वाटते आपली मराठी समीक्षक जी समीक्षा लिहितात त्यातले शब्द पाहिलेत तर माझ्यासारख्या अनेकांचा रसभंग होत असेल. एखादे लेखन तुम्ही मनोरंजक करु नका पण निदान समजायला सोपे जाईल इतके सुलभ लिहा. इरावती कर्वे ह्यांनी पी.ऐच्.डी. केले होते पण त्यांचे साहित्य वाचून बघ किती तरल आणि सुलभ सोपी अशी भाषा त्या वापरत. माझे असे मत आहे की तुम्ही जे काही लिहिता ते बोलीभाषेच्या जितके जवळ जाईल तितके ते जास्त लवकर आणि जास्त लोकांपर्यत पोहचेल.

वादातीत म्हणजे वादाच्या पलिकडे---१००% बरोबर.
वादास्पद अन वादग्रस्त जवळ जवळ समानार्थी आहेत.

>>> संपृक्त शब्द इयत्ता आठवीच्या रसायनशास्त्रात होता - संपृक्त द्रावण

तो शब्द संपृक्त असा नसून "संतृप्त" असा आहे. संतृप्त म्हणजे पूर्णपणे तृप्त असलेला/ली. म्हणजेच इंग्लिशमध्ये "Saturated".

तो शब्द संपृक्त असा नसून "संतृप्त" असा आहे. <<< तो शब्द संपृक्त असाच आहे.

(लक्षात राहण्याचे कारण म्हणजे मलाही तो संतृप्त ऐवजी चुकून संपृक्त असा छापला गेलेला आहे असे बरेच दिवस वाटायचे. )

उपरनिर्दिष्ट बरोबर आहे उपरीनिर्दिष्ट नाही.

चैतन्य,
शब्दकोष उघडून पाहिला. तुमचे बरोबर आहे. "उपरिनिर्दिष्ट" हे बरोबर आहे. उपरनिर्दिष्ट चूक आहे.

उपरि (रि ह्रस्व) उपरिनिर्दिष्ट हा बरोबर शब्द.
(उपरि- हा संस्कृत शब्द आहे, किंबहुना उपरिनिर्दिष्ट हा संपूर्ण शब्दच संस्कृत आहे.)

वाह आम्ही दिलेल्या शब्दांवर बराच "काथ्याकूट" झाल्याचे पाहून संतोष जाहला.
अजुन काही शब्द, "व्यामिश्र", "पुनरोक्ती", "सव्यापसव्य", "स्विकारार्ह", "धुरीण", "साकल्याने", "विप्लव", "वैय्याकरणी", "बादरायण", "कर्मानुगतिक", "किंकर्तव्यमूढ", "वडवानल", "प्रत्यक्षानुभूती"

>>> तो शब्द संपृक्त असा नसून "संतृप्त" असा आहे. <<< तो शब्द संपृक्त असाच आहे.

अरेच्चा. असं आहे तर. मी हा शब्द लहानपणापासून "संतृप्त" असाच लिहीत आणि वाचत आलो आहे. ९ वी - १० वी चे शास्त्राचे मराठी पुस्तक बघितलं पाहिजे एकदा.

"पुनरोक्ती" - एखादी गोष्ट पुन्हापुन्हा सांगणे/करणे
"सव्यापसव्य" - विनाकारण केलेला खर्च किंवा विनाकारण वाया घालवलेली एखादी गोष्ट (वेळ/वस्तू इ.)
"स्विकारार्ह" - स्वीकार करण्याजोगी एखादी गोष्ट
"धुरीण" - एखाद्या क्षेत्रातला ज्ञानी/सामर्थ्यवान माणूस (क्रिकेटमधला धुरीण म्हणजे सचिन)
"साकल्याने" - सर्व बाजूने / सर्वाथाने विचार करून केलेली कृती
"बादरायण" - एखाद्या गोष्टीचा दुसर्‍या गोष्टीशी ओढूनताणून जमवलेला संबंध
"कर्मानुगतिक" - पूर्वीच्या एखाद्या कृतीच्या परिणामामुळे वर्तमानात झालेली घटना
"किंकर्तव्यमूढ" - गोंधळलेली व्यक्ती
"वडवानल" - शब्दशः अर्थ म्हणजे समुद्रात प्रदीप्त झालेला अग्नी
"प्रत्यक्षानुभूती" - प्रत्यक्ष घेतलेला अनुभव

"सव्यापसव्य" : शब्दशः अर्थ = जानवे डाव्या खांद्यावर (उजव्या बा़जुस) असणे म्हणजे सव्य ; आणि याच्या उलट अपसव्य. अंतिमसंस्कार, श्राद्ध, इ. वेळी हे अनेक वेळा करावे लागते.
व्यावहारिक अर्थ = एखाद्या गोष्टीसाठी खुप खटाटोप करावा लागणे. (असे आम्हास वाटते.)

अजुन काही शब्द, "व्यामिश्र", "पुनरोक्ती", "सव्यापसव्य", "स्विकारार्ह", "धुरीण", "साकल्याने", "विप्लव", "वैय्याकरणी", "बादरायण", "कर्मानुगतिक", "किंकर्तव्यमूढ", "वडवानल", "प्रत्यक्षानुभूती"<<<<
अशा शब्दांचा अर्थ सुरुवातीला माहीत नसला तरी जरा तर्क लावून आधी माहीत असलेल्या शब्दांच्या आधारे ताडता येतो. उदा.
स्वीकारार्ह - वर 'अर्हता' म्हणजे योग्यता, लायकी असे आले आहे. त्यामुळे स्वीकारण्यास योग्य, स्वीकारण्यालायक हा अर्थ चटकन उमगू शकतो.
सव्य म्हणजे उजवा आणि अपसव्य म्हणजे डावा. (त्याचा जानव्याशी संबंध नाही). बाकी शब्दाचा वर दिलेला अर्थ बरोबर आहे.
पुनरोक्ती - यात संधी सोडवल्यास पुनः + उक्ती असे दोन शब्द मिळतात. उक्ती म्हणजे बोलणे. एखादी गोष्ट पुन्हा बोलणे म्हणजे पुनरोक्ती.
धुरीण - एखाद्या गोष्टीची/कार्याची धुरा वाहणे हा वाक्प्रयोग आपण ऐकलेला असतो. त्यावरून अशी धुरा वाहणारे ते धुरीण असा संबंध लावता येतो.
किंकर्तव्यमूढ - यात किं, कर्तव्य आणि मूढ असे तीन शब्द आहेत. संस्कृत 'किं' याचा अर्थ 'काय' असा आहे. त्यामुळे नक्की काय करावे याबद्दल गोंधळ असलेला/ली असा अर्थ उमगतो.
वडवानल या शब्दातला 'अनल' हा शब्द सापडला (मूळ संस्कृत शब्द. अर्थ - अग्नी) की हा अग्नीशी संबंधित शब्द आहे हे कळते. मग त्यानुसार पुढे शोधाशोध करून त्याचा योग्य अर्थ शोधता येतो.

माझ्या मते, एखादा अपरिचित शब्द समोर आला तर त्याचा थेट अर्थ लक्षात ठेवण्याऐवजी तो दोन किंवा अधिक शब्दांनी मिळून बनला आहे का, असल्यास त्यांचे अर्थ काय अशा पद्धतीने शब्द आधी उलगडून मग अर्थापर्यंत पोचावे. एकदा अशा पद्धतीने अर्थ उमगला की, शब्द बोजड वाटेनासा होतो. Happy

खरेतर इंग्लिश वा अवगत असलेल्या कुठल्याही परभाषेतल्या अपरिचित शब्दांसाठी ही पद्धत आपण वापरतोच की! तीच मराठी शब्दांनाही वापरणे एवढेच करायचे असते. Happy

'वणवा' म्हणजे जंगलाला लागलेली आग तर 'वडवानल' म्हणजे समुद्रावर लागलेला अग्नी असं कुठेतरी वाचलय! शब्दकोडं सोडवतांना असे शब्द विचारतात. Happy

रच्याकने, बादरायण संबंधावर लहानपणी चांदोबात वाचलेली गोष्ट आठवते.
एकदा एका माणसाच्या घरी सकाळी सकाळी बैलगाडीतुन खुप लोक येतात. यजमान कदाचित बायकोकडचे नातेवाईक असावेत आणि यजमानिण बाई नव-याकडचे आप्त असल्याच्या समजुतीत त्यांचं व्यवस्थित आदरातिथ्य वै. करतात. जेवण झाल्यावर यजमान हळुच यजमानिण बाईला विचारतात की हे तुझ्याकडचे नातेवाईक काय? ती नाही म्हणाल्यावर दोघं गोंधळलेल्या मनस्थितीत पाहुण्यांना विचारतात की आपण कोण? आपलं नातं वै! तेव्हा पाहुण्यांपैकी एक बाई म्हणते की तुमच्या दारात बोरीचं झाड आहे आणी आमच्या बैलगाडीचं चाक बोरीच्या लाकडाचं आहे. हा (दुरान्वये) संबंध लावुन आम्ही तुमच्याकडे उतरलो.
याला बादरायण संबंध म्हणजे ओढुन ताणुन आणलेला संबंध असे म्हणतात.

आज सकाळीच एका बाफावर 'घ्राणेंद्रिय' ऐवजी 'घाणेंद्रिय' लिहिले. म्हणजे माझ्या दृष्टीने हा बोमश.

मामी... Lol

माझ्या दृष्टीने लिहायला सोप्पा तरी अर्थ काढायला बोजड शब्दः 'तुरीय' किंवा 'तुर्यावस्था'

Pages