खव्याची पोळी-पाकृ नव्हे वृत्तांत

Submitted by रैना on 19 March, 2011 - 09:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 
    सारणासाठी
  • २५० ग्रॅम खवा
  • १ वाटी साखर (साधी, नेहमीची)
  • २ मोठे चमचे बेसन, थोड्याश्या तुपावर भाजून
  • १ मोठा चमचा रवा, खसखस थोडीशी, थोड्याश्या तुपावर भाजून
  • फारच लाडात असल्यास किंचीत खोबरे, वेलदोड्याची पूड, केशराच्या काड्या, दुधाचा हबका वगैरे जे वाट्टेल ते Proud

पारीसाठी
मैदा (२ मोठे चमचे) +कणिक (अडिच वाट्या)+ मोहन - फार घट्ट नाही, फार सैल नाही (just perfect u see) स्टाईलने कणिक भिजवून ठेवावी.

क्रमवार पाककृती: 

ही पाकृ नसून हा एक वृत्तांत समजावा. आपल्या जिकीरीवर करावे. Proud
पदार्थ करायच्या आधी एखाद महिना वाहत्या बाफवर नुसतेच करणार, करणार म्हणत रहावे.
त्याने काय होते? माहौल बनतो आणि धीर गोळा करायला मदत होते. शिवाय फुकट टीका होते, त्याने मनोबल वाढते. शिवाय आपण कमिट केले, आता(तरी) करावेच लागेल, अशी परिस्थिती निर्माण होते.
मग एखाद आठवडा आधी उपलब्ध सर्व पाकृ वाचायला घ्याव्यात. वाचल्यानेही मनोबल वाढते (अथवा खचते).

जुन्या मायबोलीवरील पाकृ
- खव्याची पोळी http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59984.html?1079651858
- सांजोर्‍या/साटोर्‍या http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93898.html

- पाकृ वाचून जमेल असे वाटल्यास नक्की जमते- (थंबरूल क्रमांक १)
- वाचता, वाचता, ज्या घटक पदार्थाचा अर्थ समजत नाही असे वाटते, अस्से दोनापेक्षा अधिक घटक पदार्थ निघाल्यास तो पदार्थ करण्याच्या इराद्यास डिच मारावे. (थंबरूल क्रमांक २)
- किंवा अगदी उत्तरआर्यंलडांतच मिळणारे exotic घटक पदार्थ असल्यासही डिच मारावे (आपण, आपला दुर्दम्य उत्साह आणि कामाचा उरक यांना शेवटपर्यंत विसरू नये. अंथरूण पाहून.. इ.इ.इ. ) (थंबरूल क्रमांक ३)
- सर्व पाकृ वाचल्या की ... मामी चांगल्या करते, तिलाच विचारू म्हणून फोन करावा. मग तिचीही पाकृ कानावर पडेल. की पुन्हा थंबरुल क्रमांक ३ रेफर करावा.
- मग गुमान सर्व पाकृ आणि आपले डोके यांचा वापर करुन आपल्याला जमेल तो घोळ घालावा. जमले तर पाकृ लिहावी आणि नाहीच जमले तर माकाचु वर अश्रु गाळावे. (थंबरूल क्रमांक ४)

१. खवा लालसार भाजून घ्यावा. (तूप सुटेपर्यंत). तो homogenous mass (mess) दिसेपर्यंत परतावे. (तो गिच्च गोळा जरा हार्टस्टॉपिंग दिसतो. :फिदी:)
२. मामी टाकते म्हणून त्यात साधी साखर टाकावी. मग ते एकदम लिक्वीड दिसते. मग गॅस बंद करावा.(मामीची टीप- रटराट उकळू नये म्हणे. साखर टाकली आणि वितळली की गॅस बंद कर.)
३. माकाचू, माकाचू म्हणून पॅनिक. मग अब 'ओखली में सिर दिया है तो मुसल से क्या डरना' असे आठवून, वाचलेल्या पाकृ आठवाव्या. मग भाजलेले बेसन, खसखस, खोबरे, आणि रवा त्यात ओतावे आणि हॅरीपॉटरच्या वाँड्सारखे वरवर न हलवता चांगले जीव खाऊन हलवावे. मग ते निदान सेमीसॉलिड दिसायला लागते. (तोवर घरातील एक सदस्य - हे लाटणार कसे? आमच्याकडे पुरणासारखे लाटताना मी पाहिले आहे' असा महत्त्वाची टिप्पण्णी करेल. त्याला अर्थातच इग्नोर करावे. त्यांच्या घराण्याबद्दल बोलण्याएवढा वेळ सध्या आपल्याकडे नाही एवढे लक्षात ठेवावे. मोह टाळावा. )
४. ते पुरेसे थंड होईपर्यंत टंगळमंगळ करावी. रामरक्षा (येत असल्यास) म्हणावी. रामरक्षा म्हणल्याने पदार्थ चांगला होतो की नाही ते त्या रामास ठाऊक. empirical evidence माझ्याकडे तरी नाही.
५. मिश्रण (आणि डोके) पुरेसे थंड झाले की पुरणासारखे पारीत ठेऊन, पोळ्या लाटाव्या.

वाढणी/प्रमाण: 
पाव किलो खव्याच्या ८ पोळ्या
अधिक टिपा: 

- जमल्या तर लग्गेच भाव खाऊ नये, कारण आपल्यासारख्यांना पुन्हा करायच्या झाल्यास नक्की जमतीलच असे नाही. त्यासाठी कमीतकमी १० वेळा जमल्या की मग भाव खावा. तोपर्यंत विमानं जमिनीवरच राहतील असे पहावे.
- फोटो टाकला रे टाकला की मायबोलीवरील सुगरण/सुगरणी साईज,वजन,प्लेट वगैरेंपासून टिपण्णी करत बिनाखव्याच्या वगैरे खव्याच्यापोळ्या कशा करतात तेही सांगतील, म्हणून टेंशन घेऊ नये. Chill !!
- प्रतिक्रियांमध्ये ' घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच आहे, ती चालेल का ? अस प्रश्न आला की खचून जाऊ नये. मग 'खास' लोकांकडे उत्तरासाठी रेफर करावे.
- साखरेच्या दाण्याचा साईज आणि उसमळणी यावरही मायबोलीवरचे एक्ष्पर्ट बोलतील, बाफ काढतील, शंका विचारतील. ते क्वाईट नॉर्मल आहे. आपण तोंड म्हणून उघडायचे नाही.
- खव्याची पोळी होळीला कशी काय चालते अशीही एक अर्धधार्मिकपूर्णतांत्रिक शंका काढली जाईल. मंद स्मित करावे. (थंबरूल क्रमांक ५)
- घरी खपोळीच काय पंचपक्वान्न केली तरी आपली कार्टी 'वरणभात आणि साधी पोळी'च खाणार. तेच जर लोकांकडे केलेली असली तर मात्र मागून खाणार. (हा मात्र मर्फीज लॉ. अगदी आणि हमखास)

माहितीचा स्रोत: 
मायबोली सुगरणी + (माझी) मामी. मॉरल सर्पोट- पूनम आणि पुपु (मंजूतै आणि हिरकु)
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद लोक्स. Happy

आणि पोळ्या संपत आल्या किंवा संपल्या की म्हणायचं मी खाल्लीच नाही >>> अगदी अगदी फुलपाखरू.
सिंडे- ऑम्लेट Lol

पूनम- मस्तं. छान दिसतायेत पोळ्या. आयअ‍ॅमप्राऊडऑफ यु. तुझी कृती लिही खरंच. Happy

मवा, चिन्नु- तुम्हीही कृती लिहा. एका पानावर राहतील सगळ्या. त्या मी नंतर हेडर मध्ये हलवेन. Happy

क्या बात है!
रैना, पूनम पोळ्या एकदम झकास दिसतायत. मी आपल्या पुपोच केल्या. पुढच्या होळीत खपो ट्राय करेन पण नको नको इतकं नको ढकलायला पुढे. करते लवकरचं.
रैना, बाकीचं ताट पण झकास दिसतय बर्का. वालाचं बिरड आहे न वाटीत?

त्या साहीत्यामधे खर तर मोबाईल फोन व कमीत कमी ३-४ माबो मैत्रिणींचे काँटॅक्ट नंबर पण आवश्यक असे लिहायला हवे. >>> Rofl हे आवडलं !!

भन्नाट Lol Raina, you made my monday morning Happy
पोळ्या आणि सगळेच पदार्थ मस्त!

रैना, पूनम क्या बात है!
सह्हीच.....माझ्या कडे पण हाच बेत आहे.
बाकी तु लिहिलयस मस्त..अगदी खुसखुशीत...आवडलं Happy

ताट सजलेले पदार्थांनी
लेख भरलेला "पंचेसनी"
ह ह पु वा गाल आणि पोट अजू...न दुखतंय. लै भारी लिवलया.

वर लिहिल्याप्रमाणे, माझ्या आणि रैनाच्या कृतीत खूप फरक आहे. अगदी शाळेत असताना वहीच्या पानाच्या मधोमध रेघ काढून 'फरक सांगा' लिहीतो, इतपत Proud परंतू अंतिम ध्येय एकच असल्याने, मी केलेल्या खव्याच्या पोळ्यांची ही पद्धत.

पाव किलो खवा. हा माझ्याकडची दीड वाटी भरला.
(म्हणून) दोन वाट्या पीठीसाखर
प्रत्येकी एक वाटी रवा आणि मैदा.
वेलदोड्याची पूड, भाजलेली खसखस
पोळ्या लाटण्यासाठी तांदळाची पीठी.

१) खवा कढईत तूप सुटेपर्यंत भाजला. कोमट झाल्यावर त्यात पीठीसाखर, वेलदोड्याची पूड आणि भाजलेली खसखस घालून खूप मळले. मोठा गोळा केला.

२) खवा गार होईपर्यंत रवा + मैदा ह्यात कणकेला घालतो त्यापेक्षा जास्त तेल (मोहन नाही, गार तेल) आणि मीठ घालून क्रम्ब्ज केले, मग फ्रीजमधलं थंड पाणी घेऊन गोळा घट्ट मळला. हा कुटून कुटून मऊ करायचा असतो. मी फूड प्रोसेसरमध्ये स्टीलचं एस आकाराचं ब्लेड लावून त्यात मळला. बाहेर काढून परत मऊ केला.

३) खव्याचे चपटे गोळे केले.

४) पारीचे दोन प्रकारचे गोळे केले- एक खव्याइतका आणि एक त्याहून लहान.

५) पारीचा खव्याइतका गोळा हातात घेऊन बोटांनी थोडा मोठा केला, त्यावर खव्याचे सारण ठेवले, त्यावर पारीचा छोटा गोळा ठेवून पसरवून बंद केले. असे सर्व भरलेले उंडे तयार केले.

६) नॉनस्टिक तवा सर्वात लहान आचेवर ठेवला. उंडा तांदुळाच्या पीठीत घोळवून हलक्या हाताने पोळी लाटली. आकार छोटाच आहे. (विकतची अगदीच छोटी असते). मंद आचेवरच भाजली.

खवा जरा जरी जास्त तापमान असेल, तर लगेच जळतो/ करपतो. त्यामुळे आच मंदच ठेवायची आहे.

ह्या प्रमाणात माझ्या चौदा पोळ्या झाल्या. कशा आणि काय आकाराच्या, ते वर फोटोत आहेच.
(रैनाच्या पाव किलोच खवा वापरून आठ पोळ्या झाल्या. (रैनाच्या पोळीपेक्षा माझी पोळी खूप लहान होती असे वाटत तरी नाहीये. बर, सारणही भरपूर होतं आणि कडेपर्यंत पसरलं होतं)

यावरून, प्रत्येकीच्या करण्याच्या पद्धतीत किती फरक असतो, हे ढळढळीतपणे सिद्ध झालेलं आहे! हा पुरावा 'आईसारखं होत नाही' ह्या वाक्याला उत्तर म्हणून वापरावा. ह्या वाक्यावरचा प्रताधिकार मी मुक्त करते आहे Wink :दिवा:)

पूनम तुझी पण कृती छान. Happy
जर यदाकदाचित मी खपो केल्या तर बहुदा सारण तुझ्या पद्धतीने आणि कणिक रैनाच्या पद्धतीने करेन कि काय असं वाटतंय. Happy

हा पुरावा 'आईसारखं होत नाही' ह्या वाक्याला उत्तर म्हणून वापरावा.>>>> आवड्या...:हाहा: पुरावा एक्दम ठोस है ! बोले तो खरंच ढळढळीत.

मदत मदत पट्कन हवी आहे.
खव्याच्या पोळ्यांचा बेत आहे आज माझ्याकडे पण खवा भाजुन कोमट असताना त्यात साखर घातली,पिठी साखर पण त्याचा गोळा नाही झाला, रव्यासारख सारण तयार झालं...आता काय करु?

मी फ्रिज मधे ठेवुन पण बघितल पण ते रव्याच्या सारणा सारखच आहे आता त्याच्या पोळ्या तर बनु शकत नाहीत, पण माझ काय चुकलं?

रैना, असेच पदार्थ करुन बघत जा आणि फक्त वृत्तांत टाकत जा. >>> अगदी अगदी.... धमाल वृत्तांत!!! पूनमच्या पोस्टी पण तोडीस तोड!!!

Pages