द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

चेतन भगतच्या या नव्या पुस्तकाची क्रॉसवर्डमध्ये मोठी चळत पाहिली, त्याची आधीची दोन्ही पुस्तक वाचली होती, फार खास नसली तरी फाईव्ह पॉईंट समवन टीपी म्हणून ठीक वाटल होत. वन नाईट ऍट कॉल सेंटरही नावीन्य म्हणून ठीक, अर्थात शेवटचा अचाट आणि अतर्क्य भाग सोडला तर..

चळतीतून एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त. 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही.

अमदावादेत क्रीडासाहित्याचे दुकान कम क्रिकेट कोचिंग कम गणित क्लासेस आपल्या ओमी व इश या मित्रांसोबत चालवणारा एक गोविंद पटेल, त्यांचा अली नावाचा पुढे भारतीय क्रिकेटचे भविष्य होउ शकेल असे त्यांना वाटणारा एक बारा तेरा वर्षाचा विद्यार्थी जो सारख्या सिक्स मारत असतो, त्याला क दर्जाच्या हिंदी चित्रपटाला लाजवतील अशा अतर्क्य प्रकारे गोव्यात एका मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बळंच गळ्यात पडून थेट ऑस्ट्रेलियात नेणे आणि त्याने तिथले नागरिकत्व आणि ऑस्ट्रेलियातर्फे भविष्यात खेळण्याची संधी मी जन्मोजन्मी भारतीयच राहीन असे म्हणत नाकारणे असे हास्यास्पद [त्याने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व नाकारल्यावर ऑस्ट्रेलियन निराश होतात] घटनातून पाने भरता भरता, गोविंदने त्या दोनपैकी एका मित्राच्या इशच्या बहीणीला गणित शिकवता शिकवता एकमेकांना प्रेमाचे धडे देणे, आणि तिच्या अठराव्या वाढदिवसालाच तिच्याच घराच्या गच्चीवर खाली घरात तिचे आई वडील भाऊ असतांना ती ऍडल्ट झाल्याचा अधिकार बजावणे आणि मग पुढची चिंता यातही बरीच पाने खर्ची पडल्यावर, ओमीचे मामा जे हिंदुत्ववादी व वाईट्ट असतात आणि अलीचे बाबा जे मुसलमान असल्याने दयाळू, सर्वधर्मसमभाव मानणारे व विचारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते असतात यातही एकदोन लुटुपुटुचे संघर्ष झाल्यावर काही काळाने म्हणजे आपल्याला अजून थोडा कंटाळा आल्यावर मामांचा लहान मुलगा तेरा चौदा वर्षाचा हा गोध्रा हत्याकांडात जेमतेम दोन तीन ओळीत संक्षिप्त बळी पडतो, मग पुढे पन्नास पाने मामा व इतर पिसाट हिंदू मिळून गरीब मुसलमानांची तपशीलवार कत्तल करू लागतात.

हे तीन मित्र अलीला वाचवायला एकदम रजनीकांतच होतात आणि मामांच्या पन्नास जणांच्या पेटलेल्या सशस्त्र जमावाशी झुंज देतात, त्या जमावावर पेट्रोल ओतून पेटवून काय देतात, गॅस सिलिंडरचा स्फोट काय करतात, हे सगळे अर्थात स्वतःला खरोंच पण येऊ न देता, अशा सर्व मर्कटलीला केल्या पण तरी शेवटी मुख्य व्हिलन मामा व त्याचे पाच साथीदार उरतातच. एवढ्या सगळ्या गडबडीतही इशची बहीण गोविंदला ती प्रेग्नंट नसल्याची खुशखबर एसेमेसने कळवते [ धन्य ती मुलगी !!! कुणाच काय तर कुणाच काय हेच खरे !!] आणि ती खबर इशच वाचतो आणि मुळात तो फोन गोविंदकडून आपण पोलिसांना बोलावण्याकरता घेतला होता हे विसरून गोविंदलाच बदडू लागतो. इकडे मामा पद्धतशीर डोळे मिटून मंत्र वगैरे म्हणून मग अलीला त्रिशूळ भोसकणारच [ येथे आपण हसून गडाबडा लोळू लागतो ] तेवढ्यात ओमी 'नही' वगैरे सुटेबल उद्गार काढत मध्ये येतो आणि त्रिशूळ त्याच्याच पोटात भोसकला जातो. मग त्याचे मामा हाय मैने ये क्या कर दिया इत्यादी. पण इथेच आपला छळ थांबत नाही. मामा एकदम वाईट्ट हिंदुत्ववादी असल्याने ते पुन्हा त्रिशूळ घेउन उठतात आणि अलीला मारतात पण आता इश व गोविंद वाचवतात आणि प्रतिकाराला सज्ज होतात. आता अलीच्या हातात बॅट आणि मामांकडे त्रिशूळ आणि ते आमने सामने आता काय होणार ? अली बॅट सरसावतो, मामा ही पुढे येतात तेवढ्यात... तेवढ्यात इश त्याला बॉल टाकतो आणि अली मामांच्या टकलावर सिक्सर मारतो, अजून एक बॉल आणि अजून एक सिक्सर कपाळावर की मामा मरूनच खाली पडतात.

एवढे सगळे झाल्यावर लेखकाचे जाउ द्या हो, पण आपल्यासारखे वाचकही एवढे निर्लज्ज की पुढे वाचत रहातात. आता भांडणामुळे इश आणि गोविंदच्या दुकानाचा बटवारा होतो, अलीच्या ऑपरेशनसाठी इश दो लाख रुपये जमवतो तर गोविंद तीन, पण इश गोविंदचे पैसे घेणे नाकारतो एवढेच नव्हे तर त्या पैशाला गोविंदचा स्पर्श आहे म्हणून ते परत देतांना स्वतः हँड्ग्लोव्हज घालून मग ते पैसे परत देतो. आपल्या डोक्यावरचे सर्व केस अगोदरच उपटून झाले असल्याने पुढे वाचणे एवढेच हातात असते. तर हा धक्का सहन न झाल्याने गोविंद आत्महत्या करायचा प्रयत्न करतो, पण तेंव्हाही तो लेखकाचा फॅन असल्याने लेखकाला ईमेल पाठवून गोची करून ठेवतो. मग लेखक सिंगापूरहून अमदावाद आणि विद्या, इश आणि गोविंदचे परस्परांशी त्या त्या नात्याला सुटेबल असे मिलन करून हा छळवाद संपतो.

केवळ मार्केटिंगच्या आधारे एखादी तद्दन फालतू गोष्टही कशी खपवता येते हे असली पुस्तक वाचली आणि त्यांच्या खपाचे आकडे पाहिले की कळते.
मग आता शेवटपर्यंत वाचायच कशाला ? भेळेचा कागदही मागून पुढून पूर्ण वाचायची सवय आहे....मग भोगा आपल्या कर्माची फळं......

---- ता. क. चौथी चूक : टू स्टेट्स

थ्री मिस्टेक्स हे पुस्तक वाचलं तेंव्हा याहून भिकार आणि टाकाऊ लेखन करणे शक्य नाही असे माझे मत झाले होते. ते किती चुकीचे होते हे आता चेतन भगतचेच २ स्टेट्स वाचल्यावर कळले.

प्रस्तावनेत चेतन भगतने तो भारतातला सर्वात लोकप्रिय लेखक आहे असे जाहीर करून त्याबद्दल वाचकांचे आभार मानले आहेत. हे जर खरे असेल तर आपली वाचनसंस्कॄती अजूनही मानवी उत्क्रांतीच्या किती खालच्या पातळीला आहे याची भिती वाटू लागते.

पुस्तकाचे चार भाग आहेत. पहिल्या भागात लेखक आणि त्याची होणारी बायको एकेमेकांना आयआयएममध्ये भेटून मागच्या सर्व पुस्तकातल्याप्रमाणेच फक्त नाव बदलून प्रेमात पडतात. भाग दोन मध्ये लेखक मद्रदेशात जाउन तिच्या आई, वडील व भावाला कंटाळा आणून पटवतो. तीन मध्ये मुलगी दिल्लीला येउन लेखकच्या आई व नातेवाइकांना पसंत पडू पहाते. भाग चार मध्ये हे मद्रदेशीय व जमनापार पालक भांडतात, भांडणे मिटवतात व एक्दचे लग्न पार पडते. परिशिष्टात दांपत्याला जुळी अप्त्यप्राप्ती झाली असून ती कुठल्या राज्याची असे विचारल्यावर भारताची असे बाणेदार उत्तर दांपत्य देते व तीन ओळींची ही कहाणी दोनशे पाने खाऊन संपते.

पुण्यातील कोणाला हवे असल्यास माझ्याकडे २ स्टेट्स हे पुस्तक मला परत न देण्याच्या अटीवर उपलब्ध आहे.

विषय: 
प्रकार: 

जीएस, मनापासून धन्यवाद! टू स्टेट्स आणि व्हाईट टायगर असा भयानक ड्बलडोस घेतल्यावर त्याहूनही मोठी मिस्टेक करण्यापासून मला वाचवल्याबद्द्ल धन्यवाद.मनमोहन देसाई, के.सी.बो़काडीया,कादरखान असली उत्तुंग व्यक्तिमत्व देखील खुजी वाटावीत असा आहे हा चेतन भगत.

अरे, त्या तीन चूका कोणत्या? (मी पुस्तक वाचलेले नाही. परीक्षणे मात्र वाचली आहेत). क्रिकेट, धर्म आणि राजकारण का?
>>>>>

१. तिघांच्या व्यवसायाचा एकत्रित फायदा एका नवीन इमारतीच्या जागेत गुंतवणे. ती इमारत भुकंपात जमीनदोस्त होते.-> परिणाम-financial loss.
२.मित्राच्या बहीणीसोबत प्रेमसंबंध ->परिणाम - मैत्री तुटणे
३. योग्य वेळी अलीला मदत न करणे->परिणाम - अलीचे मनगट निकामी होते आणि भारत एका महान खेळाडुला मुकतो.

अर्थात सार्‍या चुका सावरता येतात लेखक खमक्या असेल तर Wink
कसे ते वर जीएस ने सांगितलेच आहे..
ज्यांना तपशील जाणुन घ्यायचा असेल त्यांनी माझ्याकडुन पुस्तक घेउन जावे... परत करण्याची आवश्यकता नाही.. Proud

रॉबिन Rofl

मेव्हण्याने विचारल नवीन पुस्तक आणलय देवु का वाचायला.
मी म्हणालो कोणत?? तो बोल्ला चेतन भगतच टु स्टेट्स.
मी नको बोल्लो. एकतर चेतन भगतच पुस्तक आणि दुसर म्हणजे ते विंग्रजीत.त्याऐवजी त्याच्या घरुन प्रभात क्लासिक्स डिव्हीडी संच घेवुन आलो. ते चित्रपट बघताना निखळ आनंद मिळतोय. Happy

3 idiots नंतर चेतन भगत हा 4th idiot आहे. त्याच्या पुस्तकांपेक्षा बी-प्रश्ण अधिक दर्जेदार आहेत Proud

मी ते रद्दीत घालेन
>>>
रद्दीत घातली तर दो बाते होंगी. एकतर ते पुस्तक पुन्हा रद्दीतून कुणीतरी अर्ध्या किमतीत विकत घेईल आणि वाचून वेडा होईल. किंवा रद्दीत फाडून भेळवाल्याला विकले तर त्याचे कागद भेळ बांधून पुन्हा कदाचित जी एसच्या हातात जातील आणि भेळ खाल्ल्यावर ते कागद जी एस पुन्हा सवयी प्रमाणे मागून पुढून वाचेन आणि पुन्हा वेडा होईल. त्यापेक्षा जाळूनच टाका ना ते... Proud

दुसरी बात होने के चान्सेस ज्यादा है... आणि जर तसं झालं तर पुस्तकाच पान का होईना जीएसकडे परत जाईल. आणि मग तो पुढंच चेतन किंवा इतर कुणाच पुस्तक मला (फ्री) देणार नाही. त्यापेक्षा जीएस तू असं कर ना -

१) भेळ खाऊ नकोस Happy किंवा भेळ खाताना प्लेट मध्येच खा! प्लेट नसेल तर भैय्याला ( भेळवाले काका/ मामा इ. Proud ) समोरच्याला आजूबाजूच्याला विचारून कन्फर्म करून घे की तो हा कागद नाही!

२) एवढं करूनही जर हा कागद तुझ्या परत तुझ्याकडे आला तर तर नीट ल क्षात घे की - तो कागद आणि तू यांनी एकमेकांबरोबर डोळसपणे बराच वेळ घालवणे याला पर्याय नसावा! Proud

Light 1

अजुन एक शक्यता आहे, सारखे सारखे चेतन भगत च्या पुस्तकावर भेळ खाल्ल्याने जीएस चेतन भगत सारखेच भरपुर आणि दर्जेदार (?) लिहायला लगेल Happy

ही ही शक्यता आहे जी एस भेळ फेकून देउन चेतन भगतच्या पुस्तकाचे सुटे कागद चावून चावून खाईल Proud

ना रहेगा बास , ना बजेगी बांसुरी Proud

हूडा तूझा हा पर्याय वाचून मला ते कचर्‍याचे कार्टूनच्या आकारात बनवलेले डब्बे आठवले "माझा खाउ मला द्या" Light 1
मी लहानपणी त्यांना त्यांचा खाउ (कागद) देता यावा म्हणून भेळ खायचो फक्त.. अर्थात तेव्हाही माझ्या या कारणावर कुणीच विश्वास ठेवत नसे...:फिदी:

अजून एक शक्यता आहे, त्या पुस्तकाच्या कागदावर दिल्याने भेळेची चव बिघडून जीएस भेळ खायचे सोडून देईल Happy

अरे आता बास करा !!!! माझी मोठी 'मिस्टेक' झाली की मी ते पुस्तक वाचले.

आपला नम्र

( दोन्ही हात जोडणारी बाहुली )

जी एस(च्या डोक्या)वर चेतन भगतच्या पुस्तकांचा आणि भेळेचा इतका परिणाम झालाय की तो आता बाहुल्या खेळायला लागलाय Proud

अरे आता बास करा !!!! माझी मोठी 'मिस्टेक' झाली की मी ते पुस्तक वाचले.

ही मिस्टेक नं. १
असले काहितरी वाचुन इथे काहीबाही गिरबटवले ही मिस्टेक नं. २
आणि मग त्याच्यावरचे प्रतिसाद वाचले ही मिस्टेक नं. ३

मला कळल्या आता सगळया मिस्टेकी....

"३ मिस्टेक्स" अहो नावातच सार सारं आलं बर 'त्या' तीन चुका मला पण नीट नाही कळल्या<<< त्या तीन चुका म्हणजे
five point someone
2 states
one night at call centre...
खरेतर चेतन भगतने अजून आपल्या चुकांबद्दल्च पुस्तके लिहिलि पाहिजेत...

२ states वाचायलं घेतलं..चेतन भगत केवळ हिंदि सिनेमे बनवावेत या आणि याच उद्देश्याने लिहितो असं वाटलं...मनातल्या मनात मी तर त्यातल्या पात्रांचे casting पण करून टाकले..
क्रिश्--चष्मा घातलेला ह्रितिक
अनन्या-असिन
क्रिशची आई-किरण जुनेजा
क्रिशचे वडिल्-कुलभुषण खरबंदा
अनन्याचे आई वडिल--सीमा विश्वास, नाव नाही माहित पण हम है राहि मध्ये जुहिचे वडिल झाले आहेत ते..
पुढे जसे जसे सुचेल तसे लिहिनच्..सध्या एवढेच

हा बी बी स्टेल झला आहे का? >> रॉबिनहुड नाही, मी आज पहिल्यांदीच बीबीवर चक्कर मारत आहे आणि मला देखिल काही ह्या लेखकाविषयी लिहावसे वाटले.

मी चेतन भगत चे फक्त २ स्टेट्स वाचले आहे. पण मला स्वत:ला ते प्रचंड आवडले. हो अगदी प्रचंड. कारण नं १. मी त्या पुस्तकाशी रिलेट करु शकले.
२. मला त्याची ओघवती आणि अतिशय साधी लेखन शैली आवडली.

माझे स्वतःचे लग्न हे आंतरप्रांतिय असल्याने (मी मराठी आणि नवरा केरळी) मी ह्या पुस्तकातील ओळी आणि ओळीशी रिलेट करु शकले.
पण मला वाटते तसे जरी नसते तरी मला पुस्तक नक्कीच आवडले असते.
एकदा का हे पुस्तक वाचायला घेतले की संपेपर्यन्त आपण खाली ठेवुच शकत नाही.

साधी, ओघवती भाषा म्हणजे साहित्यीक मुल्य नाही असे होते का? त्याने पुस्तकात वापरलेले इंग्लिश हे अगदी प्राथमिक पातळीचे आहे आणि मला वाटतं तीच त्या पुस्तकाची strength पण आहे.

स्लार्तीचे मला पटले कि कुठेतरी मुव्हीचा ग्राफ लक्षात घेउनच म्हणजे ह्यावर मुव्ही नीघु शकेल ह्या कल्पनेतुनच पुस्तक लिहीले आहे असे वाटते. म्हणजे कुठेतरी हे पुस्तक म्हणजे एका बॉलीवुड चित्रपटाचा स्क्रीनप्ले वाचत आहोत असे वाटते.
पण so what? एक कथालेखनाचा नविन प्रकार (genre) म्हणुन ह्याकडे बघायला काय हरकत आहे?

शेवटी माझ्यामते कुठलीही कलाकृती तुम्हाला आनंद देत आहे का नाही ह्यातच त्या कलाकृतीचे यश सामविलेले असते. जर निखळ आनंद आणि करमणुक देण्यात ती कलाकृती यशस्वी होत असेल तर माझ्यामते ती चांगली कलाकृती असते.
पण ह्यात पुन्हा म्हणणारे असे म्हणु शकतील की वाचकांची अभिरुची उच्च आहे की सामान्य त्यावर त्या कलाकृतीचा आस्वाद घेणे अवलंबुन आहे. पण माझ्यामते कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद प्रत्येक जण आपापल्या आकलनाच्या क्षमतेनुसार घेत असतो. एखादा सिनेमा अथवा नाटक जर प्रेक्षकगृहातील १०० जणांना आवडले असेल तर ह्याचा अर्थ असा नाही की ते १०० जणांना समान समजले आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या पातळीवर ते समजले असेल आणि आवडले असेल.

वरील मुद्दा विषयांतर वाटेल पण मला असे म्हणायचे आहे की अतिशय साध्या, सोप्या शब्दात करमणुक प्रधान लेखन करणे म्हणजे ते वाईट लिखाण होते का?

माझे वैयक्तीक मत, 2 states is an awesome book. बर्‍याच ठिकाणी इतके सही पंचेस आहेत. काही काही प्रसंग तर इतके छान फुलविले आहेत, मी प्रचंड एकटीच हसले आहे अनेक प्रसंग वाचतांना.

तो लेखक हुषार आहे, विचारी आहे आणि मला आवडला.

पण माझे हे विधान त्याचे फक्त एकच पुस्तक वाचुन केलेले आहे हे कृपया ध्यानात ठेवा.

बरं झालं हा बीबी वर आला.. Happy
टू स्टेट्स वाचलं.. ह्या बीबी वर जितकं झोडपलय तितकं वाईट अजिबात नाहिये... ३ मिस्टेक्स पेक्षा खूपच बरं आहे...

मी माझ्या २ अगदी जवळच्या मित्रांचे आंतरप्रांतीय विवाह जवळून पाहिले आहेत.. त्यामुळे त्यातल्या बर्‍याच गोष्टी रिलेट होऊ शकल्या.. काहीकाही पंचेस खूप भारी आहेत... अणि वाईटच आहे असा पूर्वग्रह ठेवून वाचायचं ठरवलं (जो माझा झाला होता.. ) तरी मधेच सोडून द्यावं असं वाटत नाही..
बॉलीवूड मुव्ही काढायचाच आहे असं ठरवूनच लिहिल्यासारखं वाटतं..
अचाट आणि अतर्क्य गोष्टी नाहियेत असं नाही.. पण हिंदी चित्रपट काढायचा झाला तर त्या असणं गरजेचच आहे.. Happy

बाकी वर कोणीतरी लिहिलेलं तसच कास्टचा विचार मी पण पुस्तक वाचताना करत होतो.. ही माझी कास्ट
क्रिश - रणाबीर किंवा चष्मा लावलेला शाहिद कपूर
अनन्या - मधू सासर्खी एखादी टिपीकल साउदी चेहेरापट्टी असलेली हिरवीण.. करीनाही चालेल म्हणा.. ती सहस्रबुद्धे असू शकते तर अय्यर का नाही.. Happy
अनन्याचे बाबा - हम है राही प्यार के मधल्या जुही चावलाचे वडील..
क्रिशचे बाबा - अमरीश पुरी
क्रिशची आई - किरण खेर
क्रिशचा बॉस - बोमन ईराणी...

रच्याकने... वर्षा नायर.. गुड पोस्ट..

Pages