द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

चेतन भगतच्या या नव्या पुस्तकाची क्रॉसवर्डमध्ये मोठी चळत पाहिली, त्याची आधीची दोन्ही पुस्तक वाचली होती, फार खास नसली तरी फाईव्ह पॉईंट समवन टीपी म्हणून ठीक वाटल होत. वन नाईट ऍट कॉल सेंटरही नावीन्य म्हणून ठीक, अर्थात शेवटचा अचाट आणि अतर्क्य भाग सोडला तर..

चळतीतून एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त. 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही.

अमदावादेत क्रीडासाहित्याचे दुकान कम क्रिकेट कोचिंग कम गणित क्लासेस आपल्या ओमी व इश या मित्रांसोबत चालवणारा एक गोविंद पटेल, त्यांचा अली नावाचा पुढे भारतीय क्रिकेटचे भविष्य होउ शकेल असे त्यांना वाटणारा एक बारा तेरा वर्षाचा विद्यार्थी जो सारख्या सिक्स मारत असतो, त्याला क दर्जाच्या हिंदी चित्रपटाला लाजवतील अशा अतर्क्य प्रकारे गोव्यात एका मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बळंच गळ्यात पडून थेट ऑस्ट्रेलियात नेणे आणि त्याने तिथले नागरिकत्व आणि ऑस्ट्रेलियातर्फे भविष्यात खेळण्याची संधी मी जन्मोजन्मी भारतीयच राहीन असे म्हणत नाकारणे असे हास्यास्पद [त्याने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व नाकारल्यावर ऑस्ट्रेलियन निराश होतात] घटनातून पाने भरता भरता, गोविंदने त्या दोनपैकी एका मित्राच्या इशच्या बहीणीला गणित शिकवता शिकवता एकमेकांना प्रेमाचे धडे देणे, आणि तिच्या अठराव्या वाढदिवसालाच तिच्याच घराच्या गच्चीवर खाली घरात तिचे आई वडील भाऊ असतांना ती ऍडल्ट झाल्याचा अधिकार बजावणे आणि मग पुढची चिंता यातही बरीच पाने खर्ची पडल्यावर, ओमीचे मामा जे हिंदुत्ववादी व वाईट्ट असतात आणि अलीचे बाबा जे मुसलमान असल्याने दयाळू, सर्वधर्मसमभाव मानणारे व विचारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते असतात यातही एकदोन लुटुपुटुचे संघर्ष झाल्यावर काही काळाने म्हणजे आपल्याला अजून थोडा कंटाळा आल्यावर मामांचा लहान मुलगा तेरा चौदा वर्षाचा हा गोध्रा हत्याकांडात जेमतेम दोन तीन ओळीत संक्षिप्त बळी पडतो, मग पुढे पन्नास पाने मामा व इतर पिसाट हिंदू मिळून गरीब मुसलमानांची तपशीलवार कत्तल करू लागतात.

हे तीन मित्र अलीला वाचवायला एकदम रजनीकांतच होतात आणि मामांच्या पन्नास जणांच्या पेटलेल्या सशस्त्र जमावाशी झुंज देतात, त्या जमावावर पेट्रोल ओतून पेटवून काय देतात, गॅस सिलिंडरचा स्फोट काय करतात, हे सगळे अर्थात स्वतःला खरोंच पण येऊ न देता, अशा सर्व मर्कटलीला केल्या पण तरी शेवटी मुख्य व्हिलन मामा व त्याचे पाच साथीदार उरतातच. एवढ्या सगळ्या गडबडीतही इशची बहीण गोविंदला ती प्रेग्नंट नसल्याची खुशखबर एसेमेसने कळवते [ धन्य ती मुलगी !!! कुणाच काय तर कुणाच काय हेच खरे !!] आणि ती खबर इशच वाचतो आणि मुळात तो फोन गोविंदकडून आपण पोलिसांना बोलावण्याकरता घेतला होता हे विसरून गोविंदलाच बदडू लागतो. इकडे मामा पद्धतशीर डोळे मिटून मंत्र वगैरे म्हणून मग अलीला त्रिशूळ भोसकणारच [ येथे आपण हसून गडाबडा लोळू लागतो ] तेवढ्यात ओमी 'नही' वगैरे सुटेबल उद्गार काढत मध्ये येतो आणि त्रिशूळ त्याच्याच पोटात भोसकला जातो. मग त्याचे मामा हाय मैने ये क्या कर दिया इत्यादी. पण इथेच आपला छळ थांबत नाही. मामा एकदम वाईट्ट हिंदुत्ववादी असल्याने ते पुन्हा त्रिशूळ घेउन उठतात आणि अलीला मारतात पण आता इश व गोविंद वाचवतात आणि प्रतिकाराला सज्ज होतात. आता अलीच्या हातात बॅट आणि मामांकडे त्रिशूळ आणि ते आमने सामने आता काय होणार ? अली बॅट सरसावतो, मामा ही पुढे येतात तेवढ्यात... तेवढ्यात इश त्याला बॉल टाकतो आणि अली मामांच्या टकलावर सिक्सर मारतो, अजून एक बॉल आणि अजून एक सिक्सर कपाळावर की मामा मरूनच खाली पडतात.

एवढे सगळे झाल्यावर लेखकाचे जाउ द्या हो, पण आपल्यासारखे वाचकही एवढे निर्लज्ज की पुढे वाचत रहातात. आता भांडणामुळे इश आणि गोविंदच्या दुकानाचा बटवारा होतो, अलीच्या ऑपरेशनसाठी इश दो लाख रुपये जमवतो तर गोविंद तीन, पण इश गोविंदचे पैसे घेणे नाकारतो एवढेच नव्हे तर त्या पैशाला गोविंदचा स्पर्श आहे म्हणून ते परत देतांना स्वतः हँड्ग्लोव्हज घालून मग ते पैसे परत देतो. आपल्या डोक्यावरचे सर्व केस अगोदरच उपटून झाले असल्याने पुढे वाचणे एवढेच हातात असते. तर हा धक्का सहन न झाल्याने गोविंद आत्महत्या करायचा प्रयत्न करतो, पण तेंव्हाही तो लेखकाचा फॅन असल्याने लेखकाला ईमेल पाठवून गोची करून ठेवतो. मग लेखक सिंगापूरहून अमदावाद आणि विद्या, इश आणि गोविंदचे परस्परांशी त्या त्या नात्याला सुटेबल असे मिलन करून हा छळवाद संपतो.

केवळ मार्केटिंगच्या आधारे एखादी तद्दन फालतू गोष्टही कशी खपवता येते हे असली पुस्तक वाचली आणि त्यांच्या खपाचे आकडे पाहिले की कळते.
मग आता शेवटपर्यंत वाचायच कशाला ? भेळेचा कागदही मागून पुढून पूर्ण वाचायची सवय आहे....मग भोगा आपल्या कर्माची फळं......

---- ता. क. चौथी चूक : टू स्टेट्स

थ्री मिस्टेक्स हे पुस्तक वाचलं तेंव्हा याहून भिकार आणि टाकाऊ लेखन करणे शक्य नाही असे माझे मत झाले होते. ते किती चुकीचे होते हे आता चेतन भगतचेच २ स्टेट्स वाचल्यावर कळले.

प्रस्तावनेत चेतन भगतने तो भारतातला सर्वात लोकप्रिय लेखक आहे असे जाहीर करून त्याबद्दल वाचकांचे आभार मानले आहेत. हे जर खरे असेल तर आपली वाचनसंस्कॄती अजूनही मानवी उत्क्रांतीच्या किती खालच्या पातळीला आहे याची भिती वाटू लागते.

पुस्तकाचे चार भाग आहेत. पहिल्या भागात लेखक आणि त्याची होणारी बायको एकेमेकांना आयआयएममध्ये भेटून मागच्या सर्व पुस्तकातल्याप्रमाणेच फक्त नाव बदलून प्रेमात पडतात. भाग दोन मध्ये लेखक मद्रदेशात जाउन तिच्या आई, वडील व भावाला कंटाळा आणून पटवतो. तीन मध्ये मुलगी दिल्लीला येउन लेखकच्या आई व नातेवाइकांना पसंत पडू पहाते. भाग चार मध्ये हे मद्रदेशीय व जमनापार पालक भांडतात, भांडणे मिटवतात व एक्दचे लग्न पार पडते. परिशिष्टात दांपत्याला जुळी अप्त्यप्राप्ती झाली असून ती कुठल्या राज्याची असे विचारल्यावर भारताची असे बाणेदार उत्तर दांपत्य देते व तीन ओळींची ही कहाणी दोनशे पाने खाऊन संपते.

पुण्यातील कोणाला हवे असल्यास माझ्याकडे २ स्टेट्स हे पुस्तक मला परत न देण्याच्या अटीवर उपलब्ध आहे.

विषय: 
प्रकार: 

मी चेतन भगतची तिन्ही पुस्तकं वाचली आहेत...फाय पाँट समवन फार आवडलं...म्हणुन उत्सुकतेने पुढचं पुस्तक घेतलं..पण पुढच्या दोन्ही पुस्तकांत हाती निराशाच आली....प्रत्येक वेळेस लेखकाची लेवल खालीच घसरली....हे नवीन तर अतिशय कंटाळवाणं पुस्तक आहे...खरंच पाप केल्यासारखं वाटलं वाचुन.....:(
आमचे सर आय.आय.टी मध्ये चेतन भगतचे सिनीयर होते...ते म्हणतात की लेखकाने फाय पाँट समवन मध्ये सांगितलेले अर्ध्याहून अधीक प्रसंग खोटे आहेत,काल्पनिक आहेत...वेंकट हे पात्र ज्या प्रकारे रेखाटलय..म्हणजे केवळ अभ्यासु, कधी न हसणारं, मजा न करणारं...तसं काही प्रत्यक्षात नव्ह्तं....
ते पुस्तक फक्त एवढया कारणासाठी प्रसिद्ध झालं की , ते वाचताना,मुलं आपल्या कॉलेज लाईफ च्या चार वर्षां सोबत ह्या पुस्तकातील एकेक प्रसंगाशी सांगड घालायची...मीही तेच केलं...पण ते प्रसंगच खोटे होते....:(

Lol
(वाचन) संन्यास घेतलेले कधी कधी बरे असते. Happy

सुमेधा अग प्रसंग खोटे असले तरी फिक्शन म्हणून्चांगले होते ते पुस्तक..नाईट ऍट कॉलसेंटर त्यामानाने बोर होतं बरच..

आणि हे वरचं वाचून तर या पुस्तकाच्या नादीच लागणार नाहीये मी!!!

ही अद्भुत गोष्ट वाचून एक प्रकारचे सुन्नत्व आले आहे ! Happy .. परिक्षण वाचताना पडलेल्या ऑब्व्हियस प्रश्नाचे उत्तर शेवटच्या वाक्यात मिळाले .. ते वाचून Lol .. खल्लास !..
ह्या कादंबरीवर एक पौराणिक शिनुमा बनू शकेल Happy

हे पुस्तक वाचलं तेंव्हा याहून भिकार आणि टाकाऊ लेखन करणे शक्य नाही असे माझे मत झाले होते. ते किती चुकीचे होते हे आता चेतन भगतचेच २ स्टेट्स वाचल्यावर कळले.

प्रस्तावनेत चेतन भगतने तो भारतातला सर्वात लोकप्रिय लेखक आहे असे जाहीर करून त्याबद्दल वाचकांचे आभार मानले आहेत. हे जर खरे असेल तर आपली वाचनसंस्कॄती अजूनही मानवी उत्क्रांतीच्या किती खालच्या पातळीला आहे याची भिती वाटू लागते Happy

पुस्तकाचे चार भाग आहेत. पहिल्या भागात लेखक आणि त्याची होणारी बायको एकेमेकांना आयआयएममध्ये भेटून मागच्या सर्व पुस्तकातल्याप्रमाणेच फक्त नाव बदलून प्रेमात पडतात. भाग दोन मध्ये लेखक मद्रदेशात जाउन तिच्या आई, वडील व भावाला कंटाळा आणून पटवतो. तीन मध्ये मुलगी दिल्लीला येउन लेखकच्या आई व नातेवाइकांना पसंत पडू पहाते. भाग चार मध्ये हे मद्रदेशीय व जमनापार पालक भांडतात, भांडणे मिटवतात व एक्दचे लग्न पार पडते. परिशिष्टात दांपत्याला जुळी अप्त्यप्राप्ती झाली असून ती कुठल्या राज्याची असे विचारल्यावर भारताची असे बाणेदार उत्तर दांपत्य देते व तीन ओळींची ही कहाणी दोनशे पाने खाऊन संपते.

पुण्यातील कोणाला हवे असल्यास माझ्याकडे २ स्टेट्स हे पुस्तक मला परत न देण्याच्या अटीवर उपलब्ध आहे.

गाजरपारखी लोकांच्या पदरात गाजरेच पडणार... Proud

ते पुस्तक तुझ्या जवळ ठेवणेच तुझ्या सर्व जन्माच्या पापांची सजा आहे. आम्ही त्यात वाटेकरी होऊ इच्छीत नाही.....
मायबोलीसाठी वेळ काढू लागलात आभार.

मला आवडले बरे २ स्टेट्स.. मी कॉमेडी म्हणुन वाचले आणि मधुन मधुन हसलेही..

बाकी गोष्टीत नाविन्य तसे काहीच नव्हते, पण चेतनच्या आधीच्या पुस्तकांप्रमाणे पाच मिनिटांत टाकुन दिले नाही हीच एकमेव जमेची बाजु.

जी एसने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा एखाद्या खानदानी बेवड्याने गुत्त्यावर जावे तसे क्रॉसवर्डमध्ये गेला. नेहमीच्या ओळखीच्या रॅकजवळ जाऊन त्याने चेतन भगतच्या आलेल्या नव्या पुस्तकाच्या काही प्रती काढून पाठीवरील हॅवर सॅकमध्ये टाकल्या आणि घराच्या दिशेने चालू लागला.

पाठी वरील पोतडीत बसलेला चेतन भगत त्याच्याशी बोलू लागला 'हे निर्लज्ज वाचका. माझ्यापेक्षा निर्लज्ज या जगात कुणी असेल असे मला वाटले नव्ह्ते .पण तुझ्यापुढे हरण्याची मला वेळ आली आहे. तुझा वेळ जावा म्हणून तुला एका फडतूस लेखकाची आणि त्याच्या बावळट्ट वाचकांची कथा सांगतो ती ऐक. त्यानन्तर मी तुला मी माझ्या लेखनाने निर्माण केलेले काही प्रश्न विचारीन. त्याची उत्तरे माहीत असूनही तुला देता आली नाही तर त्याचा परिणाम तुला माहीत आहेच्.तुझ्या डोक्याची शम्भर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील. ऐक तर. पुण्यनगरीत गोविन्दवर्मा नावाचा एक ब्राम्हण वाचक सोवळ्यात रहात असे.... "

Proud

आमचे सर आय.आय.टी मध्ये चेतन भगतचे सिनीयर होते...

चेतन भगत आयायटी पास आहे? पण त्याची कल्पनाशक्ती पाहिली की शंका येते.. Happy

चेतन भगतची पुस्तके म्हनजे काही typical मसाला हिन्दी चित्रपटासारखी असतात.. डोके बाजुला ठेवुन वाचायची.. अर्थात हे ठेच लागल्यानंतरचे शहाणपण आहे! Sad

चिंगीला अनुमोदन..मलाही २ स्टेट्स काहीही नवीन नसलं तरी अगदीच कंटाळवाणं वाटलं नाही.

तुम्हाला कोणी बंदूकीचा चाप डोक्याशी धरुन हे वाचा म्हणुन सांगीतलय का?

>>
वाचन बेवड्याना असले प्रश्न विचारण्यात अर्थ नसतो Proud

अरे, त्या तीन चूका कोणत्या? (मी पुस्तक वाचलेले नाही. परीक्षणे मात्र वाचली आहेत). क्रिकेट, धर्म आणि राजकारण का?

जीएस.. Lol

अरे, त्या तीन चूका कोणत्या?

>>>
१) पुस्तक घेणे
२)त्याचे पैसे देणे
३) ते पुस्तक वाचणे
Proud

LOL
बरं झालं हे वाचलं - आता पुस्तकाच्या वाट्याला पण जायला नको..
भेळेचा कागदही मागून पुढून पूर्ण वाचायची सवय आहे >>>
हे हे हे.. माझी मामी सात्विक संतापानं म्हणते - ह्या लोकांना (म्हणजे आमच्या घरातले सग़ळे) अंकलिपी दिली तरी प्रेमानं वाचत बसतील..

हूड Lol

हिंदी बिनडोक चित्रपट काढायची तयारी करतोय चेतन....

पण त्या पुस्तकाच्या कागदांवर भेळ देणार असलास तर मला बोलाव.. मी येईन....
(भेळेसाठी दोन चार पानं वाचायला लागली तरी चालतील....)

Proud

Lol बरं झालं चेतन भगतचं अजून एकही चांगलं, वाईट कोणतंही पुस्तक वाचलेलं नाही. वाचलेल्यांनी पापक्षालनाकरता अधून मधून रिव्ह्यू टाकत चला . तेवढंच बाकीच्यांना शिक्षेत सहभागी करुन घेतल्याचा आनंद मिळेल. Wink

Pages