द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

चेतन भगतच्या या नव्या पुस्तकाची क्रॉसवर्डमध्ये मोठी चळत पाहिली, त्याची आधीची दोन्ही पुस्तक वाचली होती, फार खास नसली तरी फाईव्ह पॉईंट समवन टीपी म्हणून ठीक वाटल होत. वन नाईट ऍट कॉल सेंटरही नावीन्य म्हणून ठीक, अर्थात शेवटचा अचाट आणि अतर्क्य भाग सोडला तर..

चळतीतून एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त. 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही.

अमदावादेत क्रीडासाहित्याचे दुकान कम क्रिकेट कोचिंग कम गणित क्लासेस आपल्या ओमी व इश या मित्रांसोबत चालवणारा एक गोविंद पटेल, त्यांचा अली नावाचा पुढे भारतीय क्रिकेटचे भविष्य होउ शकेल असे त्यांना वाटणारा एक बारा तेरा वर्षाचा विद्यार्थी जो सारख्या सिक्स मारत असतो, त्याला क दर्जाच्या हिंदी चित्रपटाला लाजवतील अशा अतर्क्य प्रकारे गोव्यात एका मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बळंच गळ्यात पडून थेट ऑस्ट्रेलियात नेणे आणि त्याने तिथले नागरिकत्व आणि ऑस्ट्रेलियातर्फे भविष्यात खेळण्याची संधी मी जन्मोजन्मी भारतीयच राहीन असे म्हणत नाकारणे असे हास्यास्पद [त्याने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व नाकारल्यावर ऑस्ट्रेलियन निराश होतात] घटनातून पाने भरता भरता, गोविंदने त्या दोनपैकी एका मित्राच्या इशच्या बहीणीला गणित शिकवता शिकवता एकमेकांना प्रेमाचे धडे देणे, आणि तिच्या अठराव्या वाढदिवसालाच तिच्याच घराच्या गच्चीवर खाली घरात तिचे आई वडील भाऊ असतांना ती ऍडल्ट झाल्याचा अधिकार बजावणे आणि मग पुढची चिंता यातही बरीच पाने खर्ची पडल्यावर, ओमीचे मामा जे हिंदुत्ववादी व वाईट्ट असतात आणि अलीचे बाबा जे मुसलमान असल्याने दयाळू, सर्वधर्मसमभाव मानणारे व विचारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते असतात यातही एकदोन लुटुपुटुचे संघर्ष झाल्यावर काही काळाने म्हणजे आपल्याला अजून थोडा कंटाळा आल्यावर मामांचा लहान मुलगा तेरा चौदा वर्षाचा हा गोध्रा हत्याकांडात जेमतेम दोन तीन ओळीत संक्षिप्त बळी पडतो, मग पुढे पन्नास पाने मामा व इतर पिसाट हिंदू मिळून गरीब मुसलमानांची तपशीलवार कत्तल करू लागतात.

हे तीन मित्र अलीला वाचवायला एकदम रजनीकांतच होतात आणि मामांच्या पन्नास जणांच्या पेटलेल्या सशस्त्र जमावाशी झुंज देतात, त्या जमावावर पेट्रोल ओतून पेटवून काय देतात, गॅस सिलिंडरचा स्फोट काय करतात, हे सगळे अर्थात स्वतःला खरोंच पण येऊ न देता, अशा सर्व मर्कटलीला केल्या पण तरी शेवटी मुख्य व्हिलन मामा व त्याचे पाच साथीदार उरतातच. एवढ्या सगळ्या गडबडीतही इशची बहीण गोविंदला ती प्रेग्नंट नसल्याची खुशखबर एसेमेसने कळवते [ धन्य ती मुलगी !!! कुणाच काय तर कुणाच काय हेच खरे !!] आणि ती खबर इशच वाचतो आणि मुळात तो फोन गोविंदकडून आपण पोलिसांना बोलावण्याकरता घेतला होता हे विसरून गोविंदलाच बदडू लागतो. इकडे मामा पद्धतशीर डोळे मिटून मंत्र वगैरे म्हणून मग अलीला त्रिशूळ भोसकणारच [ येथे आपण हसून गडाबडा लोळू लागतो ] तेवढ्यात ओमी 'नही' वगैरे सुटेबल उद्गार काढत मध्ये येतो आणि त्रिशूळ त्याच्याच पोटात भोसकला जातो. मग त्याचे मामा हाय मैने ये क्या कर दिया इत्यादी. पण इथेच आपला छळ थांबत नाही. मामा एकदम वाईट्ट हिंदुत्ववादी असल्याने ते पुन्हा त्रिशूळ घेउन उठतात आणि अलीला मारतात पण आता इश व गोविंद वाचवतात आणि प्रतिकाराला सज्ज होतात. आता अलीच्या हातात बॅट आणि मामांकडे त्रिशूळ आणि ते आमने सामने आता काय होणार ? अली बॅट सरसावतो, मामा ही पुढे येतात तेवढ्यात... तेवढ्यात इश त्याला बॉल टाकतो आणि अली मामांच्या टकलावर सिक्सर मारतो, अजून एक बॉल आणि अजून एक सिक्सर कपाळावर की मामा मरूनच खाली पडतात.

एवढे सगळे झाल्यावर लेखकाचे जाउ द्या हो, पण आपल्यासारखे वाचकही एवढे निर्लज्ज की पुढे वाचत रहातात. आता भांडणामुळे इश आणि गोविंदच्या दुकानाचा बटवारा होतो, अलीच्या ऑपरेशनसाठी इश दो लाख रुपये जमवतो तर गोविंद तीन, पण इश गोविंदचे पैसे घेणे नाकारतो एवढेच नव्हे तर त्या पैशाला गोविंदचा स्पर्श आहे म्हणून ते परत देतांना स्वतः हँड्ग्लोव्हज घालून मग ते पैसे परत देतो. आपल्या डोक्यावरचे सर्व केस अगोदरच उपटून झाले असल्याने पुढे वाचणे एवढेच हातात असते. तर हा धक्का सहन न झाल्याने गोविंद आत्महत्या करायचा प्रयत्न करतो, पण तेंव्हाही तो लेखकाचा फॅन असल्याने लेखकाला ईमेल पाठवून गोची करून ठेवतो. मग लेखक सिंगापूरहून अमदावाद आणि विद्या, इश आणि गोविंदचे परस्परांशी त्या त्या नात्याला सुटेबल असे मिलन करून हा छळवाद संपतो.

केवळ मार्केटिंगच्या आधारे एखादी तद्दन फालतू गोष्टही कशी खपवता येते हे असली पुस्तक वाचली आणि त्यांच्या खपाचे आकडे पाहिले की कळते.
मग आता शेवटपर्यंत वाचायच कशाला ? भेळेचा कागदही मागून पुढून पूर्ण वाचायची सवय आहे....मग भोगा आपल्या कर्माची फळं......

---- ता. क. चौथी चूक : टू स्टेट्स

थ्री मिस्टेक्स हे पुस्तक वाचलं तेंव्हा याहून भिकार आणि टाकाऊ लेखन करणे शक्य नाही असे माझे मत झाले होते. ते किती चुकीचे होते हे आता चेतन भगतचेच २ स्टेट्स वाचल्यावर कळले.

प्रस्तावनेत चेतन भगतने तो भारतातला सर्वात लोकप्रिय लेखक आहे असे जाहीर करून त्याबद्दल वाचकांचे आभार मानले आहेत. हे जर खरे असेल तर आपली वाचनसंस्कॄती अजूनही मानवी उत्क्रांतीच्या किती खालच्या पातळीला आहे याची भिती वाटू लागते.

पुस्तकाचे चार भाग आहेत. पहिल्या भागात लेखक आणि त्याची होणारी बायको एकेमेकांना आयआयएममध्ये भेटून मागच्या सर्व पुस्तकातल्याप्रमाणेच फक्त नाव बदलून प्रेमात पडतात. भाग दोन मध्ये लेखक मद्रदेशात जाउन तिच्या आई, वडील व भावाला कंटाळा आणून पटवतो. तीन मध्ये मुलगी दिल्लीला येउन लेखकच्या आई व नातेवाइकांना पसंत पडू पहाते. भाग चार मध्ये हे मद्रदेशीय व जमनापार पालक भांडतात, भांडणे मिटवतात व एक्दचे लग्न पार पडते. परिशिष्टात दांपत्याला जुळी अप्त्यप्राप्ती झाली असून ती कुठल्या राज्याची असे विचारल्यावर भारताची असे बाणेदार उत्तर दांपत्य देते व तीन ओळींची ही कहाणी दोनशे पाने खाऊन संपते.

पुण्यातील कोणाला हवे असल्यास माझ्याकडे २ स्टेट्स हे पुस्तक मला परत न देण्याच्या अटीवर उपलब्ध आहे.

विषय: 
प्रकार: 

अगदी सेम सेम.. क्रॉसवर्ड मधली भलीमोठी चळत पाहून सहज चाळायला घेतलं, पहीली १५-२० पानं वाचली, (बायकोबरोबर फर्निचर शॉपिंग वगैरे कायच्याकाय ), आणि ठेवून देत होते तर नवरा म्हणाला आता वाचायला घेतलंच आहेस आणी इतकं स्वस्त आहे तर घेऊनच टाक. पण मग हाय रे देवा ! हे पुस्तक वाचणं ही पण एक मिस्टेक आहे Proud

मी घेतल ते एअरपोर्टवर वेळ घालवायला Sad पहिली ५ पानं वाचून मग बंद केलं अन मग पुण्याला विसरून आले!!proud.gif

>>> मग आता शेवटपर्यंत वाचायच कशाला ? भेळेचा कागदही मागून पुढून पूर्ण वाचायची सवय आहे....मग भोगा आपल्या कर्माची फळं....... Lol
या कादंबरीचा काही भाग भगतच्या संकेतस्थळावर आहे. ही कादंबरी खर्‍या घटनांवर आधारित आहे, असं काही आहे का ? नसेलही, पण 'सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असते' असं म्हणतात, म्हणून खात्री करून घेण्यासाठी विचारतोय एवढंच.
या कथानकात 'त्या' तीन चुका कुठल्या ? (वाटलं तर spoiler warning देऊन सांगा.) Happy

  ***
  असेच काही द्यावे घ्यावे
  दिला एकदा ताजा मरवा
  देता घेता त्यात मिसळला
  गंध मनातील त्याहून हिरवा
  - इंदिरा

  मामांचा लहान मुलगा तेरा चौदा वर्षाचा हा गोध्रा हत्याकांडात जेमतेम दोन तीन ओळीत संक्षिप्त बळी पडतो,
  Lol

  -- शकुन

  GS, धन्यवाद.. मी क्लेम लावणार होते लायब्ररीत ह्या पुस्तकासाठी.. आता दुसर्‍या worth पुस्तकासाठी लावेन.

  फाइव्ह पॉइंट समवन जरा बरे होते इतकेच.. त्याचे नंतरचे वन नाईट ऍट कॉल सेंटर तर अतिशय भंपक होते... आता हे नवीन पुस्तक तर त्यावर पण कळस चढवणारे दिसतेय.. असो.. चेतन भगत आय आय एम, अहमदाबादचा आहे.. मार्केटिंग व्यवस्थित करणार नाही तर काय..

  बी-स्कूलशी संबंधित एक पुस्तक आहे.. Earning the Laundry Stripes नावाचे.. हे बरे आहे.. अर्थात गोध्रा आणि हिंदु वाइट्ट व मुसलमान दयाळु असा उगा ओढुन ताणुन प्रसंग ह्यात पण आहे...

  >>> हिंदू वाईट्ट व मुसलमान दयाळू...
  असे केल्याशिवाय प्रसिद्धी व साहित्य, कला, पत्रकारिता क्षेत्रातील टोळ्यांकडून इतर सहकार्य मिळणेही अवघड असते. पण तेही धड जमायला हवे ना ? जसे मि अँड मिसेस अय्यर या चित्रपटामध्ये जमले आहे. It is necessary but not sufficient. कथेतही काहितरी दम हवा.

  बिग बझारमध्ये पण ठेवले आहे विकायला, कांद्यावर पुस्तक फ्री की पुस्तकावर दुधीभोपळा फ्री ते मी नीट पाहिले नाही

  बाकी समस्त धर्मनिरपेक्षांना आवडलेही असेल पुस्तक!!!

  आपल्या डोक्यावरचे सर्व केस अगोदरच उपटून झाले असल्याने पुढे वाचणे एवढेच हातात असते >>>> Rofl
  .
  भेळेचा कागदही मागून पुढून पूर्ण वाचायची सवय आहे >>> तुम्ही पण का ? मला एकदा आंगण झाडताना कुठुन तरि उडुन बागेत पडलेला वर्तमानपत्राचा तुकडा वाचत बसल्याबद्दल चांगला ओरडा पडला होता Happy

  "३ मिस्टेक्स" अहो नावातच सार सारं आलं Happy बर 'त्या' तीन चुका मला पण नीट नाही कळल्या. कदाचित ती प्रिंटिंग मिस्टेक असेल Happy Happy पुस्तकाच नाव खर तर The ONLY Mistake... अस पाहिजे होत.
  दीपक
  "Reality is an intensely personal experience..subject to all forms of perceptual biases."

  पुस्तकाबद्दल वाचतेय की अ आणि अ च्या बीबीवर आलेय हे कळेना... वाचून ह ह पु वा!!!
  उगाचंच मला आपलं या माणसाचं काही न वाचल्यामुळे अडाणी असल्यासारखं वाटत होतं. जो तो मेला त्याबद्दलच बोलतोय.. चला 'राजाचे कपडे सुंदर' म्हणतायत सगळे तर.

  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home

  जीएस, अगदी अगदी.

  हरीच्या ऐवजी गोविंद, नेहाच्या ऐवजी विद्या, दिल्ली ऐवजी अहमदाबाद एवढाच काय तो फरक FPS आणि यामध्ये! अं हं... अजून एक! हे जरा जास्तच अ नि अ आहे.
  गेल्या वीकेंडला भराभर पानं उलटत संपवलं हे पुस्तक. Happy

  भन्नाट लिहिले आहेस. ह. ह. पु.
  मी या लेखकाच्या वाटेला कधी गेले नाही आणि यापुढे जाइल अस वाटतही नाही..
  मी पण ते भेळेचे कागद वाचणारी वर आवडला तर सांभाळुन ही ठेवणा-या मधली आहे.

  अलीच्या ऑपरेशनसाठी इश दो लाख रुपये जमवतो तर गोविंद तीन, पण इश गोविंदचे पैसे घेणे नाकारतो एवढेच नव्हे तर त्या पैशाला गोविंदचा स्पर्श आहे म्हणून ते परत देतांना स्वतः हँड्ग्लोव्हज घालून मग ते पैसे परत देतो. :))
  आपल्या डोक्यावरचे सर्व केस अगोदरच उपटून झाले असल्याने पुढे वाचणे एवढेच हातात असते >>>>>>>> :))
  भन्नाट, खतरनाक. ...
  भेळेचा कागद ... अगदी अगदी...
  -प्रिन्सेस...

  अरेच्चा, इथे तर बर्‍याच लोकांना माहीती आहे की हा लेखक असे लिहीतो. मग ती चळत संपते तरी कशी ? शिवाय बेस्ट सेलर लेबल ही लागते.

  GS, मजेदार.

  [ नातीचरामी ५०% सवलतीत विकलेस, ह्याचा सवलतीचा दर काय ? Happy ]

  अरेच्चा, इथे तर बर्‍याच लोकांना माहीती आहे की हा लेखक असे लिहीतो. मग ती चळत संपते तरी कशी ? शिवाय बेस्ट सेलर लेबल ही लागते. <<<<<<<
  एक तरुण वर्ग असाही आहे की, 'मिल्स आणि बून'पासून जे काही चटकदार असेल ते वाचायला त्यांना जाम आवडतं. कॉलेजातल्या काही लोकांना एकदम भन्नाट वाटतं चेतन भगतची पुस्तकं वाचायला. आवड आपली आपली! बाकी काय? Happy
  (माझा एक कलीग आहे. तो गुजराथी आहे; त्यामुळे त्याला पुस्तक जाम म्हणजे जामच आवडलं.. लोकांचे पुस्तक आवडायचे निकषही जबरी असतात.) Happy

  त्या गोविंदचा या गोविंदाशी काही संबंध तर नाही ना?? Happy

  म्हणजे माझ्यासारखे पुष्कळ वेडे आहेत तर अजून !!
  मला तर खाता खाता वाचल्यामुळे ओरडा बसलाय... :हा:हा

  अरेच्चा, इथे तर बर्‍याच लोकांना माहीती आहे की हा लेखक असे लिहीतो. मग ती चळत संपते तरी कशी ? शिवाय बेस्ट सेलर लेबल ही लागते.

  GS, मजेदार.

  [ नातीचरामी ५०% सवलतीत विकलेस, ह्याचा सवलतीचा दर काय ? ]

  शेवटी सगळेच दस्तोयव्हस्की वाचत नाहीत.. प्रत्येक प्रकारच्या लिखाणाचा (तसेच चित्रपटाचा, नाटकाचा, संगीताचा) एक वाचकवर्ग असतो.. मराठीमध्येच बघा ना.. बहुसंख्य लोक हे पुल, वपु, गेला बाजार स्वामी, राधेय आणि नाव सांगायला खांडेकर इतकेच वाचतात.. मला अशी कित्येक कुटुंब माहिती आहेत ज्यांच्या घरात केवळ पुलंची पुस्तके, कॅसेट असतात.. त्यांना मराठी साहित्य म्हणजे तेव्हडेच माहिती असते..

  भारतीयांचे इंग्रजी लिखाण हे आजकाल संख्येने जास्ती आणि दर्जाने कमी असे होउ लागले आहे.. टीकास्वयंवर नावाच्या पुस्तकामध्ये भालचंद्र नेमाड्यांचा भारतीयांच्या इंग्रजी लिखाणावर अतिशय सुंदर लेख आहे.. अर्थात तो लेख लिहिला तेव्हा आरके नारायरण, माळगावकर इत्यादी मोजकेच इंग्रजी भाषेमध्ये लिखाण करणारे लोक होते..

  पण एक हिन्दी सिनेमा निघु शकेल इतकी ताकद नक्किच आहे ह्या पुस्तकाची. Happy तसेही चेतन भगतच्या कुठल्यातरी पुस्तकावर बेतलेला एक सिनेमा तयार होतच आहे ना? हाच कि काय?

  आयला, ही गोष्ट अन पुर्वीच्या काळी डिटेक्टिव गोष्टी असायच्या काळा पहाड वगैरे, त्यात बरच साम्य वाट्टय!
  >>>>>> मामांचा लहान मुलगा तेरा चौदा वर्षाचा हा गोध्रा हत्याकांडात जेमतेम दोन तीन ओळीत संक्षिप्त बळी पडतो, मग पुढे पन्नास पाने मामा व इतर पिसाट हिंदू मिळून गरीब मुसलमानांची तपशीलवार कत्तल करू लागतात.
  सन्क्षिप्त बळि पडतो....... खी खी खी खी..........! असच अस्त नेहेमी!

  आर्क, ह्या पुस्तकावर नाही निघत चित्रपट... It is on his first book: five point someone Happy

  दीपक
  "Your fear of death is not your love for life."

  हेलो,,,,
  वन नाईट ऍट कॉल सेंटरवर निघणारा चित्रपट.
  सोहेल खान, अम्रिता अरोडा, इशा कोप्पिकर, गुल पनाग, शरत सक्सेना, शर्मन जोशी.
  आणि खास भूमिकेत सलमान आणि कतरिना.
  पिक्चर जवळ जवळ पूर्ण झालाय.. लवकरच रीलीज होइइल
  (फाईव्ह पॉइंट समवनचे नुकतेच शूटिंग चालू झालय)

  जी एस.. पुस्तकापेक्षा तुझे परीक्षण वाचून मजा आली.. मायबोलीच्या साहित्याचे असे मार्केटिंग झाले तर????
  हा प्रश्न मला पुस्तक वाचताना कित्येकदा पडला.

  असच अस्त नेहेमी! >>>
  लिंबुटींबु,
  ' खुदा के लिये ' बघितला की नाही ??

  फाइव पॉइंट समवन वर एक नाटक निघाले आहे. इंग्रजीतच आहे ते नाटक. मध्यंतरी हैद्राबादला ते झाले होते (बहुतेक एका चेन्नईच्या ग्रुपचे आहे).

  >>>खुदा के लिये ' बघितला की नाही ??
  नाही बघितला ग! Sad
  बघितला अस्ता तर डोक तापल अस्त का??? Proud

  Five point someone हे नाटक मी चेन्नईला बघितलं. चेन्नई प्लेअर्स या गृपने केलं होतं. मला पुस्तकच आवडलं नसल्याने नाटकही आवडलं नाही. पण नाटकाला भन्नाट गर्दी होती. आणि अगदी standing ovation वगैरे.
  Three mistakes वर सिनेमा विपुल शाह काढणार आहे अशी Screenमध्ये बातमी आहे. म्हणजे त्यात अक्षय कुमार नक्की असणार.

  हां !! या पुस्तकाचं कथासार वाचून माझ्या डोक्यात पहिल्यांदा हाच विचार आला की संभाव्य चित्रपट डोळ्यासमोर ठेवूनच हे लिहीलं आहे. हिंदी सिनेमागिरी (=भंपकपणा आणि बेगडीपणा) ठासून भरली आहे यात..

   ***
   The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.

   हे म्हणजे अगदीच IIM grad. ला शोभणारे वाटते. म्हणजे प्रकाशक आणि सिनेमा निर्माता दोन्हीकडुन पैसे मिळण्याची सोय एकाच वेळी.

   Pages