न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोनू
तुझ्याकडची झाडे, फ्रेम्स, मूर्त्या या सगळ्या गोष्टी बघून पुस्तकांच्या खोली पर्यंत मी पोचलेच नाही. त्यामुळे पुस्तके आवरता आली नाहीत. पुढच्यावेळी तुझ्या कुठल्या कुंड्या/फ्रेम्स पळवता येतील यावर एक सविस्तर चर्चासत्र करायला हवे. पुस्तकांचे (पळवण्याचे आवरण्याचे नाही) त्यानंतर बघण्यात येईल. Proud

मैत्रेयीने जीटीजीचा आढावा घेतला आहे आणि बुवा, टण्याने डिटेलमध्ये लिहिले आहे. आता मी माझ्या साईडचे थोडक्यात लिहितो.

माझा आणि सिंड्रेलाचा एकत्र जाण्याचा प्लॅन होता. पण सिंड्रेलाने शनिवारी सकाळ-सकाळी ६ वाजता मला फोन करुन प्लॅन अचानक बदलायचा प्रयत्न केला. मी झोपेत असेन आणि हो-हो म्हणेन असा तिने विचार केला असावा बहुतेक. पण मला ते कळले, आणि मी तिला म्हणालो की तू तुझं ये, मी माझं येतो वेगळा. तिने पुढे जाऊन शोनूकडे मी कसा तिला अकारण डिच दिला असा आरडा-ओरडा केला. पण माझी बाजू सत्याची असल्याने मी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. Proud

गेल्यागेल्या मला लालू, रुनी आणि नितीन भेटले. हे तिघे कुठल्याही जीटीजीला माझ्या आधीच आलेले असतात. मी कितीही लवकर गेलो तरी ते असतातच. शोनूने मग इडली-चटणीने सुरुवात करुन दिली. तिथेच टण्या भेटला. तो तिथे चक्क पुस्तक न वाचता कांदा कापत उभा होता. नंतर बोलता बोलता टण्याने तो अमेरिकेत कसा फक्त एक बॅकपॅक घेऊन येतो ते सांगितले. त्यात जितके कपडे मावतील तितके कपडे तो दोन-तीन आठवडे कसा पुरवतो त्याच्या काही युक्त्या सांगितल्या.

मग मृण्मयी कुठूनतरी अवतरली. टण्याने वर तिचे केलेले वर्णन खरे आहे. मग हळूहळू बाराकर आले. अमृता, असामी हे शिट्टीवालेसुद्धा आले. ह्यावेळी फक्त ४ लोकांनी मायबोली टी-शर्ट घातला होता. माझ्यासकट काही लोकांना अजून टी-शर्ट मिळालेलाच नाहीये. मग मी आणि मृने टी-शर्ट समितीतल्या काही अकार्यक्षम व्यक्तिंवर नाराजी व्यक्त केली आणि कार्यक्षम व्यक्तिंचे कौतुक करुन झाले. गेल्या जीटीजीला कुर्ता ड्रेस-कोड होता तेव्हा झक्की टी-शर्ट पॅन्ट घालून आले होते, आणि ह्या जीटीजीला सगळे टी-शर्टात तर झक्की कुर्ता घालून आलेले! बहुतेक हिरो दिसण्याची ती एक आयडिया त्यांनी यावेळी वापरली.

रुनीने ह्यावेळी सुंदर पणत्या करुन आणल्या होत्या. चाणाक्ष लोकांनी छान छान डिझाईन असलेल्या लगेच उचलल्या आणि मग मला आवडलेल्या राहिल्याच नाहीत. मग मी रुनीकडे ऑर्डर नोंदवली. तिच्या वतीने नितीन सगळ्या ऑर्डरी नोंदवून घेत होता. तर तो कुठल्यातरी कागदाच्या चिटोर्‍यावर लिहून घेत होता. त्याला म्हणालो की अरे इतर वेळी आय-फोन, आयपॅड, अजून बरंच काय काय इलेक्ट्रॉनिक्स मला दाखवत असतोस आणि आता चिटोर्‍यावर लिहून घेतोस! तर त्याने 'धंदा नेहमी गुजरात्यासारखा करावा' असे मला सुनावले!

मग खाणे पिणे सुरू केले. ह्यावेळीही पदार्थांमध्ये व्हरायटी खूप होती. मग खाता खाता मी आणि विकु बोलत बसलो. नंतर बुवाही आले. गेल्या तीन जीटीजींमध्ये मला कोणीतरी एखाद्या क्षेत्रातला जाणकार भेटत आला आहे. तेव्हा मी त्यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या आहेत. मागे किरण आणि केदार ह्यांच्याशी बोललो होतो. ह्यावेळी विकु. त्यांनी तिथे मला वॉल स्ट्रीट वरच्या बर्‍याच गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजावल्या. सीडीओ, क्रेडिट डिफॉल्ट स्वॉप, हेज फंड, फ्युचर्स, त्या जेम्स पॉल्सन च्या हेज फंडने नक्की काय केले, त्यांच्या कंपनीचे हेज फंड काय करते, वगैरे फार छान सांगितले. ते सांगतानाही 'समजा तुमचा डुकरांचा बिजनेस आहे', 'तुम्ही लक्ष दिले नाही तर हजार डुकरांची डिलिव्हरी तुम्हाला घ्यावी लागते, ती डुकरं कुठं ठेवणार तुम्ही? तुम्ही स्वतःतर खात नाही', अशी विनोदी उदाहरणे देत होते. तिथे फार हसलो.

नंतर गवतात बसून, खाऊन झाले आणि मग सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले. स्वातीने छान म्हटली गाणी. तिथे 'नैना ठग लेंगे' वर किरणने जी काय कॉमेन्ट केली त्याच्यावर लोक अक्षरशः खोखो हसत होते. लई मजा आली तेव्हा. भरपूर लापि वाजवल्यावर भाईंनीही गाणे म्हटले. मग सगळे इकडे-तिकडे गप्पांमध्ये गुंग आहेत असे बघून सिंड्रेलाने डिच दिल्याबद्दल माझ्याशी वादावादी सुरू केली. मग सर्वांना कुणकुण लागली आणि अचानक एकदम सगळेच खुर्च्या, सोफे सरसावून बसले मजा बघायला! मग ते आमच्या लक्षात आले आणि आम्ही भांडण बंद केले. ह्यावेळी फक्त लालूने माझी न्याय्य बाजू उचलून धरली. Proud मग लोकं गटागटाने गॉसिप करु लागले. मलातर आजकाल विषयाचा पत्ताच नसतो. मी फक्त 'हो!', 'असं कुणी लिहिलं?', 'हा कोण नवीन आयडी!' एवढंच म्हणत असतो. सायोने एक दोन तु. क. टाकून थोडेफार मला सांगितले. लोकांनी आता अगदी नियमितपणे बाराबाफावर लिंका दिल्या पाहिजेत. नाहीतर कळणारच नाही मला.

त्यानंतर निघताना मी आणि नितीन शोनूच्या मुलांशी थोडा खेळलो. एकदम उत्साही मुलं आहेत. अनीश मस्त खेळला माझ्याशी. आवडला मला तो. मग संध्याकाळी मी विकुंना घेऊन निघालो. माझ्या ड्रायव्हिंगवर त्यांना काही आक्षेप घेतला नाही. Proud जाताना मग गाडीत भारत, चीन, रशिया, होमिओपॅथी असे अनेक विषय झाले. कॉमनवेल्थ गेम्सचे जे सध्या भारतात झाले आहे, तेच जर चीनमध्ये झाले असते तर तिथे पुढे काय घडले असते ह्यावर त्यांनी इंटरेस्टिंग टिप्पणी केली. त्यांना त्यांच्या घरी सोडून मी पुढे घरी आलो. येताना नेहमीप्रमाणे खायला सगळे पदार्थ पॅक करुन घेऊन आलो. आणि रविवारी खाऊन संपवले. सर्व सुगरण मंडळींना खरोखर धन्यवाद. Happy

शोनूने छान व्यवस्था ठेवली होती. श्रीतर सगळीकडे मदत करत होते. शोनूचे घर आणि घरातली सजावट एकदम मस्त आहे. वयोवृद्ध व्हायच्या आधी एकदा नक्की तुझी सगळी पुस्तकं लावून देईन असे मी शोनूला आश्वासन दिले आहे ह्यावेळी. Proud

एकंदरित जीटीजी मस्त झाला. मजा आली.

लोल. सही आहेत वृत्तांत, फोटो लिंक इ मेल करा की.

विकु फ्युचर्स / ट्रेडींग बद्दलची माहिती आपण इथे लिहू, मी सुरु केली आहे पण वेळ मिळत नाही. (तेवढचं जरा आपल्यात एकमत होईल.) काय म्हणता?

आर्च एवढी सगळ्यांना पहायची इच्छा असेल तर एका तरी जीटीजी ला ये की! घरी बसून प्रत्येक जीटीजीचे फोटो मिळवून पहाण्यात काय मजा ?

>>>>'समजा तुमचा डुकरांचा बिजनेस आहे'..... Biggrin

मस्तं वृत्तांत हो मामा! मला थेरडीला युवतीगटात ढ्कलून चार क्षण आनंदाचे दिले त्याबद्दल बाळ टण्या आणि बाळ फचिन यांचे आभार. त्यांना, आम्हा सगळ्या जास्वंदी आणि खमंग बायकांसारख्या बायका मिळोत. Proud

बाय द वे, बाराबशीसाठी सगळ्यांना चला चला करणारे विकू बस गेल्यावर फार फार निवांत होते. Proud

श्रीखंड कुणी केलं होतं? अप्रतीम होतं चवीला. लाडू पण A-1! मी पिशवीत टाकून आणणार होते पण अगदीच चार पाच उरलेले दिसले, मग उदार मनाने शोनूला ठेवू दिले. Proud

बुवांच्या कृपेनं कितीतरी वर्षांनी विडे खायला मिळाले. आणि सेक्युरिटी चेक्मधे बॅगा टाकताना अचानक त्यांनी माझ्याकरता आवर्जून आणलेले एक्स्ट्रा विडे शोनूच्या घरी राहिल्याचा साक्षात्कार होऊन अतीव दु:ख झालं. पण शोनू आणि श्री यांनी इतकी मेहेनत आणि आगत्य दाखवलंय, की त्यांनी आपल्या वाटणीचे विडे खाल्ल्ले तरी काही हरकत नाही हा विचार मनात येऊन बरंऽ वाटलं. Happy

टण्याचा वृत्तांतही क्रमशःच आहे का?
नसेल तर बाराच्या गाडीच्या आगमनाशी तो संपवल्याबद्दल त्याचा तीव्र निषेध.
क्रमशः असेल तर इतकी तरूण मुलं आणि क्रमशः वृत्तांत कसले लिहिता! झक्कींच्या वेळी असं नव्हतं!

Angry
Proud

श्रीखंड सोत्ता शोनूनेच केलं होतं. फारच भारी होतं!

बाय द वे, आर्चने फोटो कसे पाहिले? आणि त्याहीपेक्षा का पाहिले? इत:पर जीटीजीला प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही कोणीही फोटो पाठवू नयेत. फोटोत असलेल्या लोकांच्या परवानगीशिवाय तर अजिबात पाठवू नयेत.

बरोब्बर बारा वर्षांन्पूर्वी टाकलेली श्रीखंडाची रेस्पी इथे आहे

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105628.html?1130862503

शनिवारचं श्रीखंड घरी विरजलेल्या दह्याचं होतं. अन ७-८ तास टांगून ठेवल्यावर मग बांधलेल्या पुरचूंडीवर वजन ठेवून २-३ तास ठेवलं होतं.

साखर घालून हॅंड ब्लेंडर ने मिसळून घेतलेलं.

माझी तर एवेएठि च्या आधी पासून तारंबळ ऊडाली होती. झक्कींची खास योजना होती २५ तारखेला बारा हून फिली ला जाताना वाटेत सुमा फुड्स मधून उकडीचे मोदक घ्यायचे. मुख्य म्हणजे कोणी विचारलं तर त्यांना " फचिन आणि टण्या ह्यांच्याकरता मुली सांगून आल्या आहेत आणि त्यांना भेटून आपण पुढे प्रस्थान करणार आहोत" असं ते सांगणार होते. कोणाला आजिबात काहीच सांगू नका असा दम पण भरला मला. आता घ्या! मी आपलं ह्या कार्यक्रमामुळे उशीर होईल म्हणुन हळूच पोस्टींमधून , जरा लवकरच निघूयात का असं आडून आडून सुचवत होतो.
नंतर एकदा सगळी बाराकर मंडळी गाडीत बसल्यावर, झक्कींएवजी विकुंनी सॉल्लिड बॅटिंग केली. विकुंची खासियत म्हणजे अगदी गंभीर चेहर्यानी ते प्रचंड विनोदी बोलतात, त्यामुळे आणखीनच हसायला येतं. त्यांनी केलेलं मैत्रेयी च्या ड्रायविंगचे वर्णन ऐकून तर मी खाली आडवा पडायचा बाकी राहिलो.
"अहो, मी असा हार्ट अटॅक यायचा बाकी राहिलो बघा!", " असे आम्ही सिग्नल ला असताना गाडी उजवीकडे होती आणि सिग्नल पडल्यावर एकदम अशी गाडी डावीकडे घेऊन टाकली त्यांनी"
"ती रस्त्याच्या पिवळी लाईन म्हणजे, उगाच काहीतरी आपली मारून ठेवली आहे असं त्यांना वाटतं"
मुख्य म्हणजे मैत्रेयी स्वतःच त्यांच्या ह्या सगळ्या वक्तव्यावर फुल्ल टू हसत होती.
गाडीत बसल्या बसल्या मला पहिला प्रश्न " तुम्ही ड्रायविंग नीट येतं म्हणुन करता की उगाच आपलं गंमत म्हणुन आज व्हॅन वगैरे चालवायला घेतेलीये?"
मी म्हंटलं अहो तसा पुष्कळ आहे ड्रायविंगचा अनुभव मला तर म्हणतात " आमच्या जीवाशी खेळ करु नका कृपया" अगदी गंभीरपणे. मी त्याना आश्वासन दिलं की माझ्या मायबोलीवरच्या पोस्टी बघून तुम्ही माझ्या ड्रायविंग बद्दल निष्कर्ष काढू नका, तुम्हाला नीट घेऊन जाईन मी.
मग गॅस(पेट्रोल) भरायला थांबलो तेव्हा, गाडीच्या मागच्या चाकातली हवा एकदमच कमी आहे असं गॅस अटेंडंटानी निर्देशनास आणून दिलं. मी ही बातमी जाहीर केल्यावर सरवात मागच्या शिटावर बसलेल्या सगळ्या महिलांना (स्वाती, मैत्रेयी आणि सायो) मी त्यांना उद्देशून मुद्दामच हे म्हणतोय असं वाटलं. पण परत एकदा आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या स्वतःच "सगळेच टायरं चेक करुन घ्या", " तरी मेलं आज कमी खाललं", " आता इथून पुढे कशी काय जायची ही गाडी" असा कल्लोळ सुरु केला आणि हसुन हसुन पुरेवाट झाली.
मला बाकी डायवर माणसाला पार भंडावून सोडलं सगळ्यांनी एक एक सुचना देऊन. गाडीत पण शोनूचं घर येऊस्तोवर यथेच्य चेष्टा, मस्करी सुरु होती. तीचं घर यायच्या आधी वॅली फोर्ज नावाच्या एका सुंदर पार्कातून जावे लागते. कंट्री साईड इतकी सुंदर होती की स्वातीनी शंका बोलून दाखवली की शोनू "आमिष" आहे की काय, गुलदस्त्यात?" पण मग सगळ्यांचे एकमत ती आमिष नसून "सामिष" आहे असं झालं. पुढे थोड्याच अंतरवर आम्ही एक वळण घेतलं आणि गराज सेल असलेल्या घरासमोर येऊन उभं राहिलो. तिथे बर्याच अमेरिकन लोकांची गर्दी बघून " मायबोली वर बर्याच अभारतीय अमेरिकन लोकांनी सुद्धा खुप आयड्या घेतल्यात असाव्यात" अशी शंका काढत गाडीतून उतरायच्या बेतात असतानाच ते घर तिचं नाही असं कोणाच्या तरी लक्षात आलं.

शोनू कडे आम्ही सरवात उशीरा पोहोचलो! दारात स्वागताला "मृ" उभी ठाकली होती. आता गेल्यावर नितीन, रॉणी, असाम्या आणि मुख्य म्हणजे "अमृता-किरण" दिसले. परवा रात्री पर्यंत दुख्खाच्या निळ्या बाहुल्या टाकत एवेएठि ला यायला जमणार नाही ह्याचा शोक करत अमृता इथे पोस्टी डकवत होती, तेव्हाच अंदाज आला होता की हे येतील बहुतेक. मग एकदाचा टण्या दिसला! आधी पाहिलेल्या फोटोंपेक्षा खुपच वेगळा, जास्त सुढृढ वाटला. मै म्हणते तशी मिशी चिकटवल्या सारखी वाटत होती. थोडक्यात "कारा" वगैरे न वाटता, अपनी धून मे मस्त माणूस वाटला.
तिकडे किचनात जोरदार तयारी सुरु असल्याची दिसत होती, शोनू, लालू ह्यांचे मासे फ्राय करणे सुरु होते. थोडं इकडे तिकडे गप्पा होत असताना, ग्रिंच म्हणजे श्री शोनूनी आम्हाला बार ची वाट दाखवली. किंगफिशर, सॅरनॅकचा पहिला राऊंड झाला. श्री (श्री शोनू) नी भाईंना सरप्राईज देत शिद्धी सिंगल मॉल्ट "ग्लेनफिडीच" काढली तेव्हा भाईंच्या डोळ्यातले आर्त भाव मी ह्या माझ्या ढापण्या डोळ्यांनी पाहिले अन मी पावन झालो. बारा च्या बशीचा मी एकलाच डायवर असल्यामुळे मला ते पेय लांबूनच बघावं लागलं. दुखः अनावर होऊन मी घरात असलेल्या डझनभर बाथ्रुमांपैकी एका मध्ये घुसून रडून घेतलं. पुढे असं बाथरुम सापडुन रडायची वेळ बर्याच लोकांवर का आली हे आता हळू हळू कळेलच.

गप्पांचा नुसता धो धो पाऊस सुरु होता. जेवणाच्या आधीच इतकं खाणं झालं की काय विचारू नका. मग शोनूची बाग बघायला सगळी फौज निघाली. दाराच्या बाहेरच कुठल्याशा छान झाडाची फुलं फुकट आहेत (शोनू बिचारी चांगली आहे) तोडून भाई आणि अजून कोणी तरी खिशात घातले. हे डिसीकर आणि फिलीकर लोकांची घरं म्हणजे आम्हा जर्शीकरांकरता "जहां दूर तक नजर जाती है वहां तक का सारा इलाका हमारा है" अशीच वाटतात. झालं, पुढची गप्पांची मैफिल तिथेच बागेतल्या गवतावरच जमली. तिथे ही आयड्यांपासून ते माबो वरच्या एकेक भन्नाट कथांबद्दल गप्पांच्या फैरी झडल्या. झक्की आणि नितीन नी त्यांना मिळालेल्या ट्रॅफिक तिकीटांच्या गमतीदार किस्से सांगितले.
टण्यावर १७व्यांदा तो मेट्रन असल्याचा आळ घेतला गेला आणि शेवटी एक मेट्रन टण्या आणि एक मेट्रन सिंड्रेला आहे अशी मांडवली करणेत आली. अजून बर्याच चर्चा झाल्या. एका गमतीदार कथे बद्दल चर्चा सुरु असताना झक्कींनी पुर्ण विषय जाणून घेता "त्यात काय, मी सुद्धा सायकल वर टांग मारुन टेकडीवर जायचो...." अशी सुरवात केली आणि मग पुढे अशीच विधानं अनावधानाने करत ते पांढ्र्या शाईत किती खोलवर बुडाले होते ह्याचा त्यांना आजिबात अंदाज नव्हता. आमची मात्र हसता हसता पुरेवाट होत होती. ह्या सत्रात झक्की आणि नितीन (श्री रुनी पॉटर)नी जोरदार बॅटिंग केली. असाम्या आडवा तिडवा बॅटिंग जरी करत नसला तरी खुपच उतकृष्ट शीट अँकर आहे असे मी नमुद करु ईच्छितो. कुठलीही चर्चा असो तो सिंगल, डबल, मधेच एखादा रिवर्स स्वीप चौकार असं करत ती पुढे नेण्यात पटाईत आहे. त्याचं हे कौशल्य
वाढीस लागून बहरायचे कारण त्याचा स्वतःचा मायबोलीचा प्रचंड अभ्यास आहे की हवा हवाई शी त्याची मैत्री ह्याचा सुगावा अद्याप कोणाला लागलेला नाही. एका वाक्यात टोले हाणायला द इनफेमस फळ्ळी पटाईत आहेच पण मृ नी मात्र तलवार अगदी म्यानच केल्याचे भासत होते. तिनी बॅटिंग न करता ह्या वेळी प्रेक्षक बनून बाकीच्यांच्या बॅटिंगचा आनंद पुरेपूर लुटायचं ठरवलं होतं बहुतेक. मैत्रेयी नॉन स्टॉप एक एक भन्नाट कथा आणि आयड्यांचे विषय एकदम शिताफीने काढत चर्चा एकदम फ्रेश ठेवत होती, मदतीला सायो, सिंड्रेला, अमृता आणि पन्ना होत्याच. ह्या सगळ्या आक्कांचा मायबोलीचा अभ्यास प्रचंड आहे! ३-३, ४-४ वर्षांपुर्वी येऊन गेलेल्या कथा आणि आयड्यांची नावं त्यांची खासियत वगैरे त्या क्षणाचा विलंब न करता धडधडा सांगतात. गवतावर बसून सुद्धा एक किंगफिशरचा राऊंड झाला पण बारा बशीकर आक्कांनी लगेच डोळे गरागरा फिरवत "कितवी हो बुवा ही" असे टोले हाणत, गिल्टी फिलींग देत माझ्या बियरचं पार गोमुत्र करुन टाकलं.
येवढी बडबड करुन सगळ्यांना परत भुका लागल्या आणि मोर्चा परत घराकडे निघाला.
जेवणाची तर बहार होती अक्षरशः परत तुडूंब खाललं. मला तर सगळं खाऊन बघता नाही आलं पण तरी बिर्यानी, चिंबोर्या, भेद्राचं लोणचं, फ्राय मासे, उकडीचे मोदक (तुप टाकून) आणि श्रीखंड (पाव किलो तरी) खाललं! जेवता जेवता माझा कंपू वेगळा झाला. मी आपलं विकु, फचिन आणि नितीन जवळ सोफ्यांवर जाऊन बसलो तर तिथे विकु, फचिनला डुक्करांच्या फ्युचर्स बद्दल समजून सांगत होते. मी ही मग थोडे धडे घेतले. जेवताना तिकडे गॅस शेगडी पाशी साहित्यिक चर्चेला उधाण आलं होतं, टण्या, बाई (स्वाती), लालू, शोनू मुद्दे मांडत होते, बाकी सगळे ऐकत होते. मी आणि नितीन (दोघं डायव्र मानसं) एका कोपर्यात चिंबोर्या लढवत ... आपलं खात होतो.
जेवणं झाली, सगळे मस्त दिवाणखान्यात विसावले अन गाण्याचा कार्यक्रम सुरु झाला.

क्रमशः

नाही ग बायांनो, नाही पाहिले तुमचे फोटो. कोणीही तुमच्या गटगचे नियम मोडले नाहीत. वरती मॄने फोटो टाकलाय न मिरच्यांचा तो पाहिला. मजेत लिहिलं होतं. उगाच त्रास करून घेऊ नका.

ए नविन बाफांवर टाका रे वृतांत..
बुवा, टण्या, फच्या मस्त वृतांत Happy टण्या, मला बारीक म्हंटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बर्का Proud
रच्याकने, असाम्याने मला जाताना सांगितलं की बारातली लोकं आली की बाकीचे सगळे एकदम बारीक दिसू लागतात. Proud एकाच दिवसात २ कॉम्प्लिमेंट्स.. वा वा वा. Wink

भाई, मेरेको आपपे शक आरहेला है. Wink

मी पण कर्मशःच लिहितोय. बुवांची गाडी जोरात निघालीये.
डुक्कर, फचिन आणि विकु - अशी एक कथा पाड बघू फच्या..

आता नवीन धागा उघडलाय, पुर्ण केल्यावर तिथेच टाकेन. दिसत नाहीये ना कोणाला? मला दिसतोय म्हणुन विचारतोय.

असामी असं म्हणाला तरी तिला ऐकू येणं शक्य आहे का Rofl

मी गटगला उपस्थित लोकांव्यतिरिक्त पार्ल्यात नेहमी येणार्‍या काही लोकांना फोटो पाठवलेत. केदार, सशल, अगो, पग्या.

घरच्या दह्यातही सावर क्रीम घालतेस का चक्का करतांना?
>> नाही . कधी कधी दुधात एक गॅलनला १ पाइंट हाफँडहाफ घालते पण यावेळेस नव्हतं घातलं. दोन गॅलन दुधाचं दही होतं परवा.

Pages