आंब्याची कढी

Submitted by मंजूडी on 18 May, 2010 - 03:34
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक खवलेला नारळ
एक मध्यम कैरी उकडलेली
गूळ, मीठ
फोडणीसाठी अर्धा टि स्पून तेल, अर्धा चमचा मेथीचे दाणे, ४ सुक्या मिरच्या

क्रमवार पाककृती: 

१. कैरी उकडून तिचा गर काढून घ्यावा.
२. नारळाचं दूध काढून घ्यावं (आवडेल तितकं पातळ).
३. नारळाच्या दूधात गूळ विरघळवून घ्यावा.
४. कैरीचा गर थोडा थोडा करून नारळाच्या दूधात मिसळावा. कैरीच्या आंबटपणावर किती गर लागेल ते अवलंबून असतं. सगळा गर लागेलच असंही नाही.
५. चवीप्रमाणे मीठ घालून कढी उकळण्यास ठेवावी.
६. फक्त अर्धा चमचा तेल घेऊन फोडणीसाठी तापत ठेवावं. तेल तापलं की त्यात मेथीचे दाणे घालावेत आणि सुक्या मिरच्यांचे तुकडे घालून चमच्याने फोडणी जरा परतवून मगच कढीत घालावी.

वाढणी/प्रमाण: 
सात ते आठ माणसांसाठी दोनदा घेण्याएवढी कढी होते.
अधिक टिपा: 

साधारणपणे कैरीच्या गराच्या निम्मा गूळ तरी लागतोच. कैरी जास्त आंबट असेल तर कढीची चव घेऊन गूळ वाढवावा.

आवडीप्रमाणे अगदी थंड किंवा गरम अशी ही कढी वाढावी.

फोडणीत जिरं-हिंग अजिबात घालू नये. चव बदलते.

ह्या कढीला कैरीची कढी न म्हणता आंब्याची कढी का म्हणतात हे मला नेहमी पडलेलं कोडं आहे. पण जशी आंबेडाळ, उकडांबा, मोरांबा, मेथांबा तशीच आंब्याची कढी असं म्हणून मी मनाचं समाधान करून घेते. Wink

माहितीचा स्रोत: 
आजी, आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केली. छान झालीच पण अ‍ॅपलसॉस वापरुन करणार असाल तर सावधान. गुळ अगदी कमी घाला. सॉस नैसर्गिक जरा गोडच असते. गुळाने फारच गोड होते. तरी मी कमीच घातला होता. पुन्हा करताना अजुन जरासा आंबटपणा यायला काय करावे कैरी नसेल तर? लिंबु पिळावे का?

अरे वा! अ‍ॅपल सॉसची आयडीया छान आहे. आमच्याकडे आजच अ‍ॅपल सॉस पन्हं झालं. आता उद्या परवा हे करून बघेल.
ह्यावेळी मी ग्रॅनी स्मिथचा सॉस आणलाय. आणखी कैरीच्या जवळ जाणारी चव आली पन्ह्याला.

मी काल केली आंब्याची. एकदम सोपी आहे करायला आणि चवही जरा हटके. आधीपासून प्लॅन नव्ह्ता त्यामुळे घरात क्रिम ऑफ कोकोनट नामक गोडमिट्ट नारळाच्या पाकाचा कॅन होता. तो न चालल्याने शेवटी ताजं नारळाचं दूध काढायला लागलं. ते थोडंसं निघालं पण कैरीला पुरलं.

हम आंबा लाया हु, लवकरच करूंगा Happy अ‍ॅपल सॉसची कढी करेन म्हंटलं पण सामान काढल्यावर अगदीच हे वाटलं. आता आंबा आणलेला आहे, नारळाचं दूध आहे. आज उद्यातच करणार Happy

कढी केली एकदाची. एकदम जबरी झाली आहे. तुम्ही सांगितलं नाही तरी आम्ही कोथिंबीर घातली थोडीशी. ( मांसाहेब कोथिंबीर कुलोत्पन्न आहेत. दारात रांगोळी काढली तरी त्यावर कोथिंबीरीची दोन पानं घातल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही).

आंब्याची कढी .. नावाचा पत्ता लावावा लागेल अस का म्हणतात ते .. टेस्टी असणार नक्कीच.. Happy
आणि हो, मंजूडी प्लीज मला एकेरी हाक मारा .. ते तुम्ही तुमच वगैरे नकोच Wink

Pages