आंब्याची कढी

Submitted by मंजूडी on 18 May, 2010 - 03:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक खवलेला नारळ
एक मध्यम कैरी उकडलेली
गूळ, मीठ
फोडणीसाठी अर्धा टि स्पून तेल, अर्धा चमचा मेथीचे दाणे, ४ सुक्या मिरच्या

क्रमवार पाककृती: 

१. कैरी उकडून तिचा गर काढून घ्यावा.
२. नारळाचं दूध काढून घ्यावं (आवडेल तितकं पातळ).
३. नारळाच्या दूधात गूळ विरघळवून घ्यावा.
४. कैरीचा गर थोडा थोडा करून नारळाच्या दूधात मिसळावा. कैरीच्या आंबटपणावर किती गर लागेल ते अवलंबून असतं. सगळा गर लागेलच असंही नाही.
५. चवीप्रमाणे मीठ घालून कढी उकळण्यास ठेवावी.
६. फक्त अर्धा चमचा तेल घेऊन फोडणीसाठी तापत ठेवावं. तेल तापलं की त्यात मेथीचे दाणे घालावेत आणि सुक्या मिरच्यांचे तुकडे घालून चमच्याने फोडणी जरा परतवून मगच कढीत घालावी.

वाढणी/प्रमाण: 
सात ते आठ माणसांसाठी दोनदा घेण्याएवढी कढी होते.
अधिक टिपा: 

साधारणपणे कैरीच्या गराच्या निम्मा गूळ तरी लागतोच. कैरी जास्त आंबट असेल तर कढीची चव घेऊन गूळ वाढवावा.

आवडीप्रमाणे अगदी थंड किंवा गरम अशी ही कढी वाढावी.

फोडणीत जिरं-हिंग अजिबात घालू नये. चव बदलते.

ह्या कढीला कैरीची कढी न म्हणता आंब्याची कढी का म्हणतात हे मला नेहमी पडलेलं कोडं आहे. पण जशी आंबेडाळ, उकडांबा, मोरांबा, मेथांबा तशीच आंब्याची कढी असं म्हणून मी मनाचं समाधान करून घेते. Wink

माहितीचा स्रोत: 
आजी, आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी एखाद आंबा गटग करुन मंजुडीला ती करुन आणायला सांगावं आणि आपण मस्त जमुन आलेली कढी ओरपावी Proud स्वर्गसुख स्वर्गसुख Proud

आंब्याच्या रायत्याची कृती कुणी टाकेल का? तोंडाला पाणी सुटल्यामुळे रेसिपी माहिती आहे का वर जाण्याइतका धीर नाही.

रैना, ही पाकृ साधारण सोलकढी सारखीच आहे. पण कैरीची चव एकदम वेगळीच आणि सुंदर लागते. आणि सोलकढीला कढीपत्ता, सुक्या मिरच्या, जिर्‍याची फोडणी असते, ह्यात फक्त मेथी दाणे आणि सुक्या मिरच्या..

बिमली म्हणजे तोंडल्यासारखे दिसणारे पण रंगाने फिक्कट पोपटी असे फळ असते. आवळ्याच्या झाडासारखेच त्याचे झाड असते आणि या बिमल्या खोडालाच लागतात. चवीला इतक्या आंबट असतात कि गोव्याला, पितळेची भांडी घासायला वापरतात. पण याची कढी आणि लोणचे मस्त होते. माश्याच्या आमटीत पण घालतात. आंबट खायची आवड असेल, तर नूसत्याही खाता येतात. (माझ्या रंगीबेरंगी पानावर, फोटो आणि महिती असेल. )

क्या याद दिला दी ! आम्ही कैरीचं सार म्हणतो ह्याला ( नारळाच्या दुधामुळे हे नांव असावं , कारण टोमॅटोचं सार सुद्धा नारळाचं दूध घालून केलं जातं ) . Happy

छान गं..
चक्क मेथांबा माहिती आहे तुला :-०

माझ्या सासरी मेथांबा माहीतच नाही कुणाला Sad मेथांब्याला इकडे "कैरीचं रायतं" म्हणतात. माझ्या माहेरीच मेथांबा हा शब्द प्रचलित असावा अशी समजूत झाली त्यामुळे माझी. Happy

कैरीच्या गरा ऐवजी मी चक्क "नो शुगर अ‍ॅडेड अ‍ॅपल्-सॉस" वापरला आणि मंजूडी ची रेसिपी शब्दशः पाळली. अफाट झाली होती! बरोबर लेमन राईस आणि हरभर्‍याचे उसळ.

आत्ताच करुन पाहिली मंजुडी. नारळाच दुध नव्हत म्हणून फ्रोजन चव वापरला. तरी सुद्धा मस्तच लागत होती. थँक्स रेसीपीसाठी.
गावठी पिकलेल्या आंब्याचा (आंबट पाहिजे) पातळ रसाला , कडीपत्ता,तिखट आणि हिरवी मिरचीची फोडणी देवून आंब्याचे सार करतात आत्याकडे. (कर्नाटक स्पेशॅलिटी. ) तसा प्रकार वाटला.

होय होय... लोला म्हणिंग राईट!

अशीच अननसाचीही कढी करतात.
प्रमाण: एका मोठ्या नारळाच्या दुधासाठी अर्धी वाटी अननसाचा शिजवलेला गर घ्यायचा. गराच्या साधारण पाऊणपट साखर. अननसाचे साधारण आठ ते दहा मध्यम आकाराचे तुकडे कढी उकळताना घालायचे. आणि नो फोडणी. अननसाचा सुरेख स्वाद येतो त्या कढीला... फोडणी घातली तर तो वास, स्वाद बदलतो. आणि अननसामुळे फार सुंदर रंग येतो कढीला.

सीमा, रायवळ आंब्याचे सार असते का ते?
माझ्या आजोळी रायवळ आंब्याच्या साराला सासवणी म्हणतात. भारी चव लागते. उन्हाळी ताप येतो तेव्हा सकाळ-संध्याकाळ सासवणीच प्यायची.
पण यंदा रायवळ आंबा मिळालाच नाही Sad त्यामुळे उकडांबा नाही आणि सासवणी पण नाही. Sad

मस्त. धन्यवाद मंजुडी. कल्पु, एपल सॉस ची कल्पना छान. त्यानेच करुन पहाते. चक्क आहे घरात.
मंजुडी, ह्याच्याबरोबर बाकी मेनु काय करता?

Pages