व्हेज बिर्याणी (फोटोसहीत)

Submitted by अंजली on 16 May, 2010 - 23:02
veg biryani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
बटाटा १ मोठा- १ इंचाचे तुकडे
१ कप ग्रीन बीन्सचे (श्रावण घेवडा?) १ इंचाचे तुकडे
२ मध्यम गाजर थोडे मोठे तुकडे
१ .५ कप कॉलीफ्लावर मध्यम आकारचे तुकडे
आलं लसूण १ टे. स्पून
कांदा १ मोठा उभा चिरून
टोमॅटो २ बारीक चिरून
हि. मिरची ३ उभ्या चिरून
लवंग ५-६
हि. वेलची ५
दालचिनी १ इंचाचे २-३ तुकडे
मसाला वेलची २-३
तमालपत्र ३-४ पानं
काळी मिरी ८-९
दही एक मोठा चमचा
काजू १ वाटी- तळून घेऊन
बेदाणे १/२ वाटी- तळून घेऊन
केशर दोन तीन चिमूट - ३-४ मोठे चमचे दुधात खलून
तूप २-३ चमचे
बिर्याणी मसाला २ चमचे
केवडा इसेंस १ टि. स्पून (ऐच्छिक)
हळद एक लहान चमचा
तळलेला कांदा १ वाटी
बारीक चिरलेली कोथंबीर, पुदीना - दोन्ही मिळून अर्धी वाटी
झाकणाच्या कडेनं लावायला कणीक

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ स्वच्छ धुवून निथळून अर्धा तास ठेवा.
२. तांदळाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल, १ मसाला वेलची, तमालपत्र घालून उकळी आणावी.
३. तांदूळ एक-दोन कणी राहतील इतपत शिजवून उरलेलं पाणी पूर्णपणे काढून टाकून बाजूला ठेवावे.
४. ज्या पातिल्यात बिर्याणी करायची त्यात तेल तापवायला ठेवावे.
५. सगळा खडा मसाला घालून कांदा घालून परतून घ्यावा

६. कांदा मऊ झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून १-२ मिनीटे परतावे
६. टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परतावे

७. हळद घालावी परत एकदा परतून घ्यावे
८. बिर्याणी मसाला घालावा

९. केवडा इसेंस घालावा, परतावे
१०. दही घालावे

११. बटाटा, गाजर घालून परतावे
१२. उरलेल्या भाज्या घाल्याव्यात
१३. मीठ घालून नीट परतून घ्यावे
१४. भाज्या साधारण ३/४ शिजल्या की गॅस बंद करावा.
१५. भाताचा लेयर लावून लाकडी चमच्याच्या मागच्या बाजूने ५-६ भोकं पाडून त्यात केशराचं दुध घालावं उरलेलं दूध भातावर शिंपडावं.

१६. काजू, बेदाणे घालावेत, कडेने तूप सोडावे
१७. भरपूर बारिक चिरलेली कोथिंबीर, पुदीना घालावा
१८. तळलेला कांदा घालावा.

१९. झाकण लावून कडेनं कणीक लावून बंद करावं
२०. १ ते सव्वा तास मंद आचेवर ठेवावी. जाड बुडाच्या तव्यावर पातिलं ठेवल्यास खाली करपत नाही.

एकावर एक थर:

वाढणी/प्रमाण: 
नुसती बिर्याणी असेल तर ४ लोकांना
अधिक टिपा: 

१. मी शानचा बिर्याणी मसाला वापरते.
२. तेल न वापरता पूर्ण तुपातपण करता येते पण खूपच हेवी होते. काजू, बेदाणे पण तुपात तळून घ्यायचे.
३. दह्याच्या रायत्याबरोबर सर्व्ह करायची

यावेळेस शेफ मिलींद सोवनी यांच्या पुस्तकात दिलेली टीप वापरली आणि फरक जाणवला. खडा मसाला कांद्याबरोबर न परतता काजू / बेदाणे / कांदा तळून घेतानाच तळून घ्यायचा आणि या पदार्थांबरोबरच एकावर एक थर देताना वापरायचा. त्यामुळे उग्र चव न येता सुरेख स्वाद (फ्लेवर) आला.

माहितीचा स्रोत: 
पाककलेची पुस्तकं, इंटरनेट, स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवडा इसेन्स पूर्णपणे ऑप्शनल आहे. नसला तरी चालेल. मी महिन्यापूर्वी केली होती तेव्हा आलं लसूण पेस्ट आणि केवडा पाणी घालायचं विसरले तरीही अतिशय छान झाली होती. इतकी की आता व्हेज बिर्याणीत आलं लसूण घालणार नाही असं ठरवलं ;).

आत्ताच केली व खाऊन पण झाली. फारच मस्त झालीये. तेलतुप खुप जास्त न वापरता पण सुंदर लागत होती. शेवटच्या क्षणी लक्षात आले की काजु बदाम नव्हते पण त्याने काहीही अडले नाही. तृप्त वाटले खाऊन. बरोबर दिनेशदांचे घुटं केले होते. असा बेत जमलाय म्हणता!
फक्त, ते वेलदोडे वगैरे खाताना मधेच तोंडात येते ते आवडत नाही, त्याला काही उपाय आहे का?

अंजली थँक्यु...

मस्त पाकृ.
काय मस्त दिसते आहे बिर्याणी!

चमचमीत स्वादिष्ट बिर्याणी. या बिर्याणीत फणस गरे किंवा मश्रुम टाकल्यास शाकाहारी खवय्ये मंडळींना मांसाहारी बिर्याणी खातोय असा भास होतो.

शाकाहारी मंडळींनी कधी मांसाहारी खाल्ले नसणार मग त्यांना कसे कळणार मांसाहार कसा लागतो?
माझी एक शंका.

त्या हेटर्स क्लबवरचे प्रतिसाद वाचून वाचून मला बिर्याणी खावीशी वाटायला लागली Proud मी फारशी कधी खाल्ली नव्हती आत्तापर्यंत.
या पाककृतीने काल रात्री केली. खूप छान झाली. उरलेली आज सकाळी खाल्ली. ती आणखी छान मुरली होती. Happy
फोटो काढायचा मात्र राहिला.

आज सुहाना-बिर्याणी-मिक्स वापरून केली होती बिर्याणी. त्या पाकीटावरच्या स्टेप्स, ही रसिपी, त्याखालच्या प्रतिक्रिया, एक-दोन युट्युबवरच्या रेस्प्या या सगळ्याचे 'य' वेळा अध्ययन करून !

थेट दहा जणांकरता केल्याने माझे प्रमाण थोडेसे हलले होते असे जाणवले, स्वाद थोडे उग्र झाले होते असे वाटले. (खाणारांनी तोंडावर छानच झाली आहे, असे सांगितले तरी.)

तुम्ही कोणी लिंबाचा रस वापरत नाही का बिर्याणीमध्ये?

अंजली, तुमच्या या रेसेपीबद्दल धन्यवाद.

खरेतर बिर्याणी घरी करण्यासाठी कधीपासून धैर्य एकवटणे चालू होते. एकदा-दोनदा बिर्याणीसाठी म्हणून डी-मार्टमधून आणलेला तांदूळ साधा भात करूनच संपवला आहे. कितीही रेस्प्या वाचल्या, बघितल्या तरी बिर्याणीची भव्यता आणि व्याप्ती आपल्या कक्षेबाहेरची आहे असे अदृश्य भय सतत जाणवे. (अश्या प्रत्येक वेळी पाणउतारा म्हणून बाहेरून बिर्याणी मागवून ती टिच्चून रिचवली आहे.) बिर्याणीची पूर्ण रेस्पी (किंवा साम्राज्यच म्हणा ना) एका वेळी मनात मावतच नाही असे वाटे. पण आज केली एकदाची!

रेडिमेड बिर्याणी मसाल्यात मिरे जास्त असल्याने उग्र चव येते.
त्यातल्या त्यात परंपरा किंवा रसोई मॅजिक चे बिर्याणी मिक्स सौम्य आहे.

सुहा ना चा बिर्याणी मसाला छान आहे..पण त्यांनी पाकिटावर लिहिलेल्या प्रमाणापेक्षा थोडा कमी मसाला वापरावा..(टू थर्ड)..मग चांगली होते बिर्यानी..स्मोकीं फ्लेवर छान आहे त्यात...

मी एकदा केली. फार सुंदर झाली होती. फार वेळही लागतो. आपुट गरम मसाल्याने, खास करून लवंग, बिर्याणीचा तो भाग खुप कडक चवीचा झाला होता, त्याचं काहीतरी पहावं लागेल.

मी विकतचे मसाले कधी वापरले नाहीत . मैत्रिणीने , सुहाना नाहितर शान वापरायला सांगितले होते . बघेन कधीतरी वापरून .
मी सामीच्या रेसिपीने चिकन बिर्यानी य वेळा बनवली आहे .
एकदा तुनळीवर बघून दिपिका कक्करच्या पद्धतीने बिर्यानी मसाला बनवला . तो पण मस्त लागला .
बनवायला जास्त कष्ट नाहीत आणि बिर्यानी पण कमी कटकटीची आणि चटकन होते . आता बहुतेक वेळा तसाच मसाला ताजा बनवून वापरते .
विकतचे मसाले वापरले नाही त्यामुळे चवीत फरक सांगता येणार नाही . Happy

तांदूळ कोणता वापरावा? ब्रांडेडचे पण काही वाईट रिव्यूज वाचून समजत नाहीये. चव वास आणि टेक्श्चर ह्या तीनहीसाठी समजून घ्यायला आवडेल. लोकल वाण्याकडे 90 पासून आहेत.

आम्ही स्थानिक वाण्याकडून आणलेला सुटा कोलम तांदुळ वापरला होता आणि त्याची बिर्याणी चांगली झाली होती. डी-मार्टमध्ये बिर्याणीचा म्हणून मिळतो त्याची बनवून बघायची आहे.
लेयर लावताना खाली कांद्याचा लावून वर भात लावावा <<< BLACKCAT, चांगली युक्ती आहे. कांदा तळलेला की कच्चा?
अनु, ओके.
आंबट गोड, हो.

कांदा तळलेला की कच्चा?>>>> कांदा पटकन आकसतो.. आम्ही कच्च्या बटाट्याच्या चकत्या लावतो..

तांदूळ कोणता वापरावा? ब्रांडेडचे पण काही वाईट रिव्यूज वाचून समजत नाहीये. चव वास आणि टेक्श्चर ह्या तीनहीसाठी समजून घ्यायला आवडेल. >> रणविर ब्रारच्या टिप्स तुम्ही बिर्याणी प्रो नसाल तर सेला (ब्रान्ड नाही प्रकार ) बासमती वापरा तो लवकर तुटत नाही ,त्यामानाने कमी नाजुक आणी हाताळायला सोपा असतो
सुगन्धी बासमती गोड राइस,जिरा राइस प्रकाराला वापरा .बिर्याणीत मसाला,भाज्या/ चिकन्/मटण याचा फ्लेवर यायला बासमती बिनवासाचाच किवा कमी वासाचा घेतला तरी चालतो.
मी रॉयल बासमती किवा शानचा बिर्याणी राइस वापरते , कोहिनुर पण चान्गला आहे पण डेलिकेट आहे जरा.

Pages