व्हेज बिर्याणी (फोटोसहीत)

Submitted by अंजली on 16 May, 2010 - 23:02
veg biryani
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
बटाटा १ मोठा- १ इंचाचे तुकडे
१ कप ग्रीन बीन्सचे (श्रावण घेवडा?) १ इंचाचे तुकडे
२ मध्यम गाजर थोडे मोठे तुकडे
१ .५ कप कॉलीफ्लावर मध्यम आकारचे तुकडे
आलं लसूण १ टे. स्पून
कांदा १ मोठा उभा चिरून
टोमॅटो २ बारीक चिरून
हि. मिरची ३ उभ्या चिरून
लवंग ५-६
हि. वेलची ५
दालचिनी १ इंचाचे २-३ तुकडे
मसाला वेलची २-३
तमालपत्र ३-४ पानं
काळी मिरी ८-९
दही एक मोठा चमचा
काजू १ वाटी- तळून घेऊन
बेदाणे १/२ वाटी- तळून घेऊन
केशर दोन तीन चिमूट - ३-४ मोठे चमचे दुधात खलून
तूप २-३ चमचे
बिर्याणी मसाला २ चमचे
केवडा इसेंस १ टि. स्पून (ऐच्छिक)
हळद एक लहान चमचा
तळलेला कांदा १ वाटी
बारीक चिरलेली कोथंबीर, पुदीना - दोन्ही मिळून अर्धी वाटी
झाकणाच्या कडेनं लावायला कणीक

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ स्वच्छ धुवून निथळून अर्धा तास ठेवा.
२. तांदळाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी घेऊन त्यात मीठ, चमचाभर तेल, १ मसाला वेलची, तमालपत्र घालून उकळी आणावी.
३. तांदूळ एक-दोन कणी राहतील इतपत शिजवून उरलेलं पाणी पूर्णपणे काढून टाकून बाजूला ठेवावे.
४. ज्या पातिल्यात बिर्याणी करायची त्यात तेल तापवायला ठेवावे.
५. सगळा खडा मसाला घालून कांदा घालून परतून घ्यावा

६. कांदा मऊ झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून १-२ मिनीटे परतावे
६. टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परतावे

७. हळद घालावी परत एकदा परतून घ्यावे
८. बिर्याणी मसाला घालावा

९. केवडा इसेंस घालावा, परतावे
१०. दही घालावे

११. बटाटा, गाजर घालून परतावे
१२. उरलेल्या भाज्या घाल्याव्यात
१३. मीठ घालून नीट परतून घ्यावे
१४. भाज्या साधारण ३/४ शिजल्या की गॅस बंद करावा.
१५. भाताचा लेयर लावून लाकडी चमच्याच्या मागच्या बाजूने ५-६ भोकं पाडून त्यात केशराचं दुध घालावं उरलेलं दूध भातावर शिंपडावं.

१६. काजू, बेदाणे घालावेत, कडेने तूप सोडावे
१७. भरपूर बारिक चिरलेली कोथिंबीर, पुदीना घालावा
१८. तळलेला कांदा घालावा.

१९. झाकण लावून कडेनं कणीक लावून बंद करावं
२०. १ ते सव्वा तास मंद आचेवर ठेवावी. जाड बुडाच्या तव्यावर पातिलं ठेवल्यास खाली करपत नाही.

एकावर एक थर:

वाढणी/प्रमाण: 
नुसती बिर्याणी असेल तर ४ लोकांना
अधिक टिपा: 

१. मी शानचा बिर्याणी मसाला वापरते.
२. तेल न वापरता पूर्ण तुपातपण करता येते पण खूपच हेवी होते. काजू, बेदाणे पण तुपात तळून घ्यायचे.
३. दह्याच्या रायत्याबरोबर सर्व्ह करायची

यावेळेस शेफ मिलींद सोवनी यांच्या पुस्तकात दिलेली टीप वापरली आणि फरक जाणवला. खडा मसाला कांद्याबरोबर न परतता काजू / बेदाणे / कांदा तळून घेतानाच तळून घ्यायचा आणि या पदार्थांबरोबरच एकावर एक थर देताना वापरायचा. त्यामुळे उग्र चव न येता सुरेख स्वाद (फ्लेवर) आला.

माहितीचा स्रोत: 
पाककलेची पुस्तकं, इंटरनेट, स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली, तुझ्या रेसिपीने आज बिर्याणी केली (मायनस केवडा जल आणि सील करायला कणिक) ..

अतिशय चविष्ट झाली .. अनेक आभार! Happy

यावेळेस शेफ मिलींद सोवनी यांच्या पुस्तकात दिलेली टीप वापरली आणि फरक जाणवला. खडा मसाला कांद्याबरोबर न परतता काजू / बेदाणे / कांदा तळून घेतानाच तळून घ्यायचा आणि या पदार्थांबरोबरच एकावर एक थर देताना वापरायचा. त्यामुळे उग्र चव न येता सुरेख स्वाद (फ्लेवर) आला. वर पण ही टीप टाकते.

>>मस्त फोटो!>> +१
अप्रतिम होते ही बिर्याणी! आठवणीने इथे नवीन टीप शेअर केल्याबद्दल धन्यवाद अंजली Happy

धन्यवाद मंजू आणि स्वाती.
बिर्याणी मुरल्यावर दुसर्‍या दिवशी अजून छान लागली.
अजून एक टीप: मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये इथे उन्हाळा खूप होता. तेव्हा कांदा उभा चिरून, कडकडीत वाळवून ठेवला होता. फ्रीजमध्ये मस्त राहिला. बिर्याणीसाठी हा कांदा वरून घालायला पटकन तळून झाला.

सुरेख. काय एकसेएक तोंपासु फोटो आलेत. भाज्या शिजतानाचा, केशर घातलेल्या, सजवलेल्या भाताचा आणि तयार बिर्याणीचा असे सगळेच फोटो भारी Happy

ह्या वीकेन्ड ला केली होती. एकदम मस्त झाली होती :). एक हेल्प हवी आहे मला, बिर्याणी साठी ब्राउन कांदा कसा करायचा? माझा डीप फ्राय केला की मऊ होतो Sad

इंग्रो मधे मिळणारा 'फ्राईड अनिअन' कुठल्या तेलात आणि कधी तळला असेल या शंकेने कधी वापरला नाही..मी उन्हा़ळ्यात कांदा चिरून कडकडीत वाळवून ठेवते (जुलै-ऑगस्ट आमच्याकडे भरपूर उन असतं), फ्रिज मधे छान रहातो. अगदी २ मिनीटात छान कुरकुरीत तळला जातो. काही मैत्रिणी कांद्याला तांदळाची पिठी लावून तळतात. त्यानंही कुरकुरीत होतो म्हणे. मी अजून ट्राय केलं नाहीए. किंवा ग्रोसरी स्टोअरमधे नुसता 'Dried Onion' मिळत असेल तर तोही पटकन तळून व्हायला हरकत नाही.
बिर्याणी छान झाली सांगितल्याबद्दल धन्यवाद Happy

अवनमध्ये उभा पातळ कापलेला कांदा तेलाचा हात लावून २७५ डिग्रीजला ठेवला तर छान कुरकुरीत होता. मधून मधून हलवायचा. मी नेहेमी असाच वापरते. तेल अगदी कमी लागतं.

कित्ती छान फोटो आणिपाक्रु!
एक नविन प्रकार कळला.
काल मोदिंनी म्हट्ल्याप्रमाणे प्रत्येकाची/प्रत्येक प्रांताची पद्दत ही वेगवेगळी असते!
पद्धत छानपणे समजून सांगितल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

अमेझिंग झाली होती ही बिर्याणी. मी आजवर वेगवेगळे पुलाव केले, पण बिर्याणी करायची हिंमत नव्हती. उद्या १७ जणांसाठी करुन न्यायची म्हणून आज ट्रायल घेतली, खूप खूप मस्त झाली होती, झालेले, उद्या होणारे सगळे कौतुक अंजली तुझे. मनापासून धन्यवाद. Happy

प्रतिसाद दिलाय की आठवत नाही पण सुंदर फोटो आलेत. पाकृ. मस्त आहे, केवड्याशिवाय सर्व पदार्थ घरात पण आहेत. के. इ. नसले तर चालेल का?
या आठवड्यात नक्की करणार.

Pages