गूळपोळी

Submitted by मनःस्विनी on 7 January, 2010 - 02:40
gulpoli
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सारणः
अर्धा वाटी गूळ किसलेला नाहीतर चुरा गूळ,
चार चमचे बारीक बेसन,
१ चमचा दूध,
२ चमचे शुद्ध तूप,
२ चमचे सफेद तीळ,
२ चमचे सुखे पांढरे खोबरे(काळी पाठ नसलेले) नाहीतर चुरा,
२ चमचे खसखस्(एच्छिक आहे. सर्वच जण टाकत नाहीत)
वेलची,
केसर,
तव्याला चुना

पारी:
१ वाटी कणीक,
२ चमचा बारीक रवा,
४ चमचे बारीक बेसन
४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन,
पाणी लागेल तसे,
मिठ चवीला.

क्रमवार पाककृती: 

पारी कृती:
१. सगळी पिठ व रवा एक करून मध्ये खड्डा करून मिठ घालून मध्ये मोहन घालायचे व मस्त क्रम्स करायचे.
२. मग पाणी लागेल तसे घालून घट्ट भिजवून झाकून अर्धा एक तास तरी ठेवावे. रवा भिजतो.
३. एक तासाने हाताला जरासेच तेल घेवून एकदम मळायचे मस्त. तेल ओतायचे नाही पुन्हा. रवा एक्जीवे झाला पाहिजे. पुन्हा झाकून ठेवायचे.

सारणः
१. तीळ, सुखे खोबरे कीस, खसखस कोरडे असे वेगवेगळे मंद आचेवर जरासेच भाजून घ्यायचे,रंग बदलला नाही पाहिजे. बेसन ही तूपात खरपूस भाजावे वास येइपर्यन्त. मग जरासाच दूधाचा हबका मारावा.
२. मग सर्व(बेसन व गूळ सोडून) बर्‍यापैकी थंड करायचे व वाटायचे वेगवेगळे. ह्याचसाठी वेगळे वाटायचे की तेल सुटून मिक्सी खराब होवू शकतो. मध्ये मध्ये थांबून चमचा फिरवून अंदाज घेत वाटायचे नाहीतर तेल निघून पातं अडकते व मिक्सी खराब होइल. हि पूड तयार ठेवणे.
३. आता आधी गूळ व बेसन हातानेच वेगळा मिक्स करून घेवून मळणे व वरील पूड टाकणे. फूड प्रोसेसर असेल तर मस्त. पण खूप फिरवू नये गूळ उष्णतेने वितळेल. व मिश्रण खूप कोरडे करू नये थोडेसे ओलसर असेल तर गोळे करायला बरे पडते. असे गोळे करून झाकून ठेवावे. कोरडे करू नये.
४. वेलची पूड्,केसर कुस्करून टाकावे.

लाटणे:
एकतर उंडा करून मध्ये भरून लाटणे.
पण ह्याच्यापेक्षा दोन पातळ चपाती करून सारण सर्व बाजूने पसरवायचे पण कडे पर्यन्त मिश्रण भरू नये. गूळ वितळून बाहेर येतो. मग आधी कडेकडेने लाटावे.( साधनाच्या मांडे कृती मध्ये दाखवलेय ना तसेच).
१.कडेने पातळ असा उंडा करायचा. त्याने कडा पातळ रहातात.
gupo1.jpg
२.मोदकासारखा उंडा करून जितके ज्यास्त सारण भरता येइल तितके भरायचे,
gulpoli.jpggupo2.jpg
३. हातानेच मग मोदकासारखा जवळ आणून तोंड बंद करून हातानेच जरा चपटा करायचा कडेने पातळ ठेवत.
gupo3.jpg
४.मग हलक्या हाताने लाटायचा, मी पातळच लाटते. गूळ जर मस्त मिक्स असेल तर नाही येत बाहेर.
gupo4.jpg
५. पोळी एका बाजूने भाजली की पलटायची.
gupo5.jpg
६. मस्त फुगते.
gupo6.jpg
७. खुसखुशीत पोळी मध्ये तोडून बरी पडते..
gupo9_0.jpggupo8.jpg

अधिक टिपा: 

१.तवा हा खूप गरम नाही पण योग्य गरम पाहिजे. नाहितर चिकटते. दिनेश ह्यांनी मला गेल्यावेळेला चुना लावायला सांगितला तव्याला. मी चुना लावूनही केल्या व चुना न लावता. फक्त गॅस नीट ठेवायचा व तव्याचे तापमान नीट सांभाळायचे. एक बाजू भाजली की दुसरी पलटून भाजायची. ज्यास्त वेळा उलट पलट करु नये. गूळ बाहेर आल्याने चिकटतो व उलटत नाही गॅस खूपच गरम झाला तर व पोळी कच्ची रहाते.
एकदा सवय झाली दोन तीन पोळी झाली की होते मग नीट.
२. गूळ कडक असेल तर स्टील डब्यात घालून कूकरमध्ये शिटी शिवाय १० मिनीटे घालायचा व मग लगेच बाहेर काढून फोडायचा.
३. तीळाचे प्रमाण व खोबरे आपल्या आवडीप्रमाणे कमी ज्यास्त करु शकतो.
४.जर तीळ्,खसखस ,खोबरे भाजले ना की आपोआप तेल सुटते वाटताना मग गूळ अ‍ॅड केला की लगेच ते तेलच बाईंडिंग सारखे काम करते. मी बघ असे लाडू वळून ठेवलेत. मस्त तेलकट व आपोआप वळतात. मग पोळीत लाटले की पसरतात देखील मस्त जराशा दाबाने.

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनु, धन्स गं... अगदी नीट लिहिली आहेस. मला १६ ला करायची इच्छा आहे, पण कठीण काम म्हणुन धीर होत नव्हता. आता तुझ्या कृतीने करुन बघते. चांगल्या झाला तर कळवतेच.. (नाहीतर माझे काय चुकले बीबी आहेच,.... Happy )

दोन चपात्या करुन त्यावर सारण पसरायचे झाल्यास त्याचे गोळे करुन नको ना ठेवायला??

>>दोन चपात्या करुन त्यावर सारण पसरायचे झाल्यास त्याचे गोळे करुन नको ना ठेवायला?>><<

हो. पण झाकून ठेव सारण.

मस्त.. Happy चुना कशासाठी लावायचा ते सांग..
मी चुना लावूनही केल्या व चुना न लावता. >>>>>> दोन्हीमधे काय फरक होता? चव बदलत तर नाही ना?

मला फर्क नाही जाणवला. मला वाटले चुकटेल म्हणून चुनाचा उपाय सुचवलेला होता तो केला. पण नाही चिकटत तवा जरा सेट झाला की. तापमान नीट असेल तर.

गुळपोळी फॉर् डमीज साठी रुचिरातली कृती अगदी परफेक्ट आहे. वर लिहीलेली माझ्यासाठी जरा क्लिष्ट आहे.

नको ग बाई.. इकडेसुध्दा ते प्रकाशकाचे (आणि ओगलेबाईंचे) हक्क्/कायदा/नियम वगैरेची चर्चा होईल Happy

अदिती, तू म्हणालीस ह्याच्यापेक्षा सोपी म्हणून एक उत्सुकता की आणखी सोपी व अशी वेगळी काय असते. (सिरीयसली विचारले होते).
माझ्याकडे रुचिरा नाहीये...
पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे ते कायदे/हक्क चर्चा होइल म्हणून नकोच. Happy

>> मिश्रण खूप कोरडे करू नये थोडेसे ओलसर असेल तर गोळे करायला बरे पडते.

कोरडं झालं तर दुधाचा हात (अगदी हातच - पटकन सगळा गोळा भिजतो - तेव्हा चमच्याबिमच्यानेही नाही घालायचं दूध) लावून सारखं करून घ्यायचं.

अशा तयार केलेल्या गुळाची जितकी गोळी घ्याल त्याच्या साधारण दीडपट मोठी कणकेची लाटी घ्यायची , आणि तिचे सारखे दोन भाग करायचे. त्या दोन भागांच्या पुर्‍या लाटून त्यांच्यामधे गुळाची हातावर चपटी केलेली गोळी (ती ही जराशी लाटून घ्यायला हरकत नाही) ठेवायची, कडा जुळवून बंद करायच्या आणि तांदुळाच्या पिठीवर एकाच बाजूने (म्हणजे लाटताना उलटायची नाही) लाटायची पोळी. Happy

मी कव्हरमधे रवा घालत नाही. आणि मोहनही गरम नाही घालत. कणकेत थोडं डाळीचं पीठ आणि नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल घालून नेहमीच्याच कन्सिस्टन्सीची भिजवते. नेहमीच्या पोळ्यांच्या तव्यावरच भाजते.

स्वाती, तूही गूळाच्या पोळ्यांतली expert दिसतेस! मला, तशा फार नाहीत, पण ५ करून पाठवशील का? प्रत्येक पोळीवर फक्त तुझा आणि तुझाच प्रताधिकार आहे असं म्हणून खाईन! :p

>>मी कव्हरमधे रवा घालत नाही>><<

आता ह्यावेळेला रव्याशिवाय करेन.. तो रवा घातला की हात दुखतो मळून मळून. पण एक क्रिस्प येते असे वाटते मला.

काहे लोक नुसते बेसन्,मैदा,कणीक जराशी...
काही नुसते बेसन्,मैदा...

मी एकदाच केल्या आहेत बर्‍याच वर्षापूर्वी.
ह्या पोळ्यांकरता पिवळा धम्मक चिक्कीचा गूळच लागतो ना?
स्वाती, संक्रांतीकरता करणारच असशील तर २३ तारीख फार दूर नाही. Wink

माझ्या मते चिक्कीचा गूळ नाही लागत. मी ३-४ दा केल्या आहेत रुचिरा च्या रेसिपी प्रमाणे. साधाच गुळ वापरला होता मी.

ओगलेबाईंच्या कृतीने छानच होतात पोळ्या. शीगोशीग भरलेल्या २ वाट्या गूळाच्या १२ पोळ्या होतात.

मनू तू गूळ कूकरमध्ये शिट्टी न लावता वाफवून घेण्याची टीप दिली आहेस, पण मी नेहेमीसारख्या २ शिट्ट्या करून गूळ विरघळवते. कूकरचे झाकण पडेस्तोवर मात्र बाकी जय्यत तयारी करून ठेवायला लागते- कणीक वगैरे. बाहेर गूळ काढला की बेसन, खसखस घालून, मळून पोळ्या करायला लगेच सुरूवात करायची. यात गूळ किसण्याचे कष्टही पडत नाहीत.. शिवाय किसणीला बराच गूळ चिकटून वाया जातो (किसणी, हात, चमचा- सगळं चिकट, चक्क राडाच होतो माझ्याकडून :(), तेही वाचते.

ओगलेबाईची कृती कोणी लिहु शकत नाही का?

खूप वेगळी आहे का? असेल सोपी तर मलाही द्या ना. Happy मी शनिवारी करणार आहे. प्रत्येक जण म्हणतय म्हणून विचारतेय.(घाबरत घाबरत विचारतेय कारण तेच उत्तर एकायला मिळेल की कायदा/हक्कभंग वगैरे वगैरे)

मी लिहिते मनु कृती ओगलेबाईंची.. संध्याकाळी लिहिते घरी गेल्यावर. माझ्या टीपांसहित लिहिते हवंतर Wink

ओगलेआजी खरंच ग्रेट आहेत हा स्वानुभव. अगदी पहिल्यांदा कोणतीही पाककृती करताना स्वतःचं डोकं कुठेही न चालवता त्यांनी लिहिलंय तसंच्या तसं सगळं केलं तर ती कृती जमतेच. मुख्य म्हणजे त्यांनी दिलेल्या प्रमाणाचे भाग केले- निम्मं, दीडपट वगैरे, तरीही कृतीत फरक पडत नाही. त्यांनी इतक्या जुन्या काळात सगळं डॉक्यूमेन्ट केलं म्हणून त्यांचं जास्त कौतुक वाटतं. आपल्याला साधं काही लिहून ठेवावं- आपल्याच रेफसाठी म्हटलं तरी कंटाळा येतो! Sad

पूनम- ओगल्यांच्या कृतीवर तुझे रसग्रहण लिही. झाली समीक्षा. Wink
आत्ताचा हा परिच्छेद ""ओगलेआजी खरंच ..... पासून हेवी ड्युटी मराठीत (क्लिष्ट भाषेत) लिहीलास की झाली समीक्षा.
उदा- ज्या काळात दस्ताऐवजीकरणाची पद्धत नव्ह्ती तेव्हा इतके काटेकोर संशोधन करुन ओगलेआज्जींनी मराठी पाककलेला एक अमुल्य ठेवा दिला आहे आणि शिवाय कित्येक सासुरवाशींणींना स्वयंपाकात पारंगत करण्याचा विडा उचलुन, कित्येक नवदंपत्तींचा संसार वाचवला आहे आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे" वगैरे.................
मिल्या काय म्हणाला हे लिहीलेस की समीक्षेवर टीकाकारांचे मत.

अजून काही पानं भरायची असल्यास गूळ आणि साखरकारखान्यांच्या राजकारणावर केदार लिहून देईल. देशील ना रे ? Wink

हवं तर अन्नपूर्णा आणि प्रतिभाताईंच्या कृती लिही बरोबर की झाला तौलनिक अभ्यास.

Proud
मग त्यावर प्रतिक्रिया येणेप्रमाणे.
सौ पूनम यांच्यासारखी समीक्षा येत्या १०,००० वर्षात होणे नाही.
सौ पूनम यांना उसशेतातल्या मजूरांविषयी जराही कणव नाही.
ती राणी गुणाची असेल तर- पूनम गूळ कित्ती मस्त मिळतो नाई पुण्यात ? वॉव
पुण्यातील विचारवंत- गूळ की गुळ ?
माबोवरील टीकाकार- चुना लावायला उद्युक्त करुन तुम्ही तरूण पिढीला व्यसनाधीन करताय आणि वरून मखलाशी करताय.

मी आता रुचिरा १ व २ उद्याला पुस्तक इथुनच विकत घ्यायचे ठरवून टाकलेय ऑलरेडी. त्यांचे(ओगलेआजी) खूप एकलेय आता म्हटले घेतेच उद्याला. (खरेदीविभागात कसे जायचे विचारलेय तिथे).
नाहीतरी मराठी स्वंयपाकाची पुस्तके नाहीच आहेत.

पूनम पण तू नक्कीच लिहि तुझ्या खास टिपासहित.

रैना Biggrin

ती राणी गुणाची असेल तर- पूनम गूळ कित्ती मस्त मिळतो नाई पुण्यात ? वॉव>>>>
वाईट आहेस Lol

सशल- ठीक आहे, समीक्षणात 'असं मला वाटतं' असंही लिहीन Proud

आता हे वरचे वाचून मी विचारात. खूप वेगळ्या अश्या मराठी रेसीपी नसतील तर उगाच पुस्तके घेवून कोपर्‍यात पडणार. (पैशाचा प्रश्ण नाहीये पण तू दिसेल ती स्वंयपाकाची पुस्तके विकत घेवून वाचत मात्र नाहीस व कोपर्‍यात पडणार असे एकावे लागते. असो. खूप विषयांतर केले मी).

पूनम, तू तरीही लिहि गं नाविन्यपुर्ण मराठीत ती रेसीपी..(हे सिरियसली लिहितेय) ... Happy

रैना, Lol
घरी ओगलेआजींचं रुचिरा माझ्या आईच्याही हाताशी असतं. माझ्याकडची कृती ही बहुतेक तिथूनच आली असावी. फक्त आईने अनुभवाने फेरबदल केले असावेत.

ओके, तर ही पाककृती- साभार 'रुचिरा-१' 'मेहता पब्लिशिंग हाऊस' 'लेखिका- कमलाबाई ओगले'

साहित्य- चार वाट्या 'चांगल्यापैकी' किसलेला गूळ, सहा वाट्या कणीक, अर्धी वाटी खसखस, १०-१५ वेलदोडे, अर्धी वाटी बेसन, एक वाटी तेल, तांदळाची पिठी एक वाटी.

कृती- कणकेमध्ये चिमूटभर मीठ आणि अर्धी वाटी कडकडीत तेलाचं मोहन घालून कणीक घट्ट भिजवावी. किसलेल्या गूळात, भाजून कुटलेली खसखस, 'बदामी रंगाचे' बेसन आणि वेलदोड्याची पूड घालून चांगले मळावे. पोळी करताना कणकेचे दोन उंडे करावे. त्यापैकी एका गोळ्यापेक्षा थोडा जास्त गूळ घ्यावा आणि तो दोन उंड्यात ठेवून पोळी लाटावी. गूळ कडेपर्यंत जाईल असे पहावे.

समीक्षा- १) कृतीत आत्मीयता नाही.
२) अत्यंत संदीग्ध वर्णन- 'चांगल्यापैकी' गूळ, 'बदामी' रंगाचे बेसन- हे अत्यंत सापेक्ष वर्णन गोंधळात पाडणारे.
३) तांदूळाच्या पीठीचे प्रयोजन काय?- हे प्रत्यक्ष पोळी लाटेस्तोवर समजत नाही- पीठी पोळी लाटताना भुरभुरायची असते हे ज्ञान ज्यांना नुसती कृती वाचून पोळी केल्याचे समाधान ज्यांना मिळवायचे आहे, त्यांना मिळत नाही. पीठी ओट्यावर वाटीत आहे, पोळी पोळपाटावर लाटली जात नसून, चिकटत आहे, तवा तापलेला आहे.. अशा तापलेल्या वातावरणात हीच ती वेळ- वापर ती पीठी- हा साक्षात्कार होण्याचा जो क्षण आहे, तो केवळ अनुभवण्याचा. पण कृतीत त्याचे शंकासमाधान न केलेले असल्याने कृती इथे कमी पडते
Proud

अनुभवाचे बोलः सुंदर पोळ्या होतात Happy (आजीबाई, समीक्षेचा शहाणपणा केल्याबद्दल, मनापासून माफी!)

पूनम, एक शंका: उंडे करुन म्हणजे पराठ्यांसारखं सारण भरुन लाटायचं?
बदामी बेसन म्हणजे भाजून बदामी केलेलं बेसन का?

मनु, तुला हवे असेल तर माझे रुचिरा पाठवते. सगळे प्रकार करुन झाले की परत पाठव(शीलच) Happy

पूनम, रैना Rofl

Pages