हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी

Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21

गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या गाण्यात विशेष म्हणजे, पेल्यामधे नूतन ला बोलताना जे दाखवले आहे.. ते special effects, timing लै भारी आहे.
>>
त्यात पेल्यात बर्फ टाकल्यावरचा तिचा थंडी वाजल्याचा अभिनय अप्रतिम...

त्यात पेल्यात बर्फ टाकल्यावरचा तिचा थंडी वाजल्याचा अभिनय अप्रतिम...>> ती सिचुएशन पन जबरदस्त आहे. माझा ऑल टाईम फेवरेट पिक्चर..

नूतन अन सुनिल दत्त चं जलतें हैं जिसके लिये पाहिजेच या यादीत. साधा फोनचा रिसीव्हर कानाला लावून नूतन ने जो अभिनय केलाय त्याला तोड नाही!

गाण्याचे शब्द अर्थात लाजवाब आहेतच.

खईके पान बनारसवाला..
>>

हे गाणं देव आनंदच्या बनारसी बाबू सिनेमासाठी लिहिलं होतं... पण त्याला न आवडल्यानी पडून होतं...
डॉन सिनेमा पूर्ण बनल्यावर सगळ्यांना वाटलं की उत्तरार्ध खूप जास्ती अ‍ॅक्शनपॅक्ड होतोय आणि त्यात थोड्या लाईट मोमेंट्स पाहिजेत... म्हणून मग हे गाणं डॉन मधे वापरायचं ठरलं...
किशोरनी पान खाल्याचा प्रॉपर आवाज वाटावा म्हणून पान खाऊनच हे गाणं गायलं... गाताना त्याला पिंका टाकण्यासाठी म्हणून स्टूडिओ मधे एक पॉलिथीन शीट टाकलं होतं... किशोरनी फुल मूड मधे तल्लीन होऊन एंजॉय करत अ‍ॅक्शन्स सकट गाणं गायलं... पुढे शूटिंगच्या वेळी अमिताभनी याच अ‍ॅक्शन्स पडद्यावर केल्या...

बाकी गाण्याबद्दल काय बोलू...
हिस्टरी...

अहाहा, सुंदर धागा दिनेशदा, सर्वान्नी किती गोड गाण्यान्ची आठवण करुन दिलीये Happy

कश्मीर की कली चित्रपटातील बहुतेक सर्वच गीते
दिवाना हुआ बादल
निगाहों निगाहों में
तारीफ करु क्या उसकी
सुभान अल्ला हसी चेहरा
हाय रे हाय ये तेरे हाथ में

आप की नजरोंने समझा...

चित्रपट : अनपढ
गीत : राजा मेहदी अलि खान
संगीत : मदन मोहन
गायीका : लता मंगेशकर

धर्मेंद्र, माला सिन्हाच्या उत्क्रुष्ट अभिनयांपैकी एक. आपल्या जोडीदाराबरोबर हातात-हात घालुन पाहण्यालायक गाणं.

http://www.youtube.com/watch?v=yPhBr3U-7Qk

सगळीच गाणी एकसेएक आहेत. तेरे घर कि सामने माझा पण अतिशय आवडता सिनेमा.. अप्रतिम गाणी..
देव आणि नूतन अजुन काय पाहिजे??

देवची सगळीच कृष्ण धवल मधली गाणी अप्रतिम आहेत.
ऐसे तो ना देखो... के हमको नशा हो जाये
छोड दो आंचल जमाना क्या कहेगा
अभि ना जाओ छोडकर के दिल अभि भरा नही
ओ निगाहे मस्ताना.. देख समा है सुहाना
http://www.youtube.com/watch?v=TLfLhYYO03g&feature=related
देखो रुठा ना करो... आइग किती रोमँटीक असाव एखाद्याने.. Happy
http://www.youtube.com/watch?v=bTDEbAb6eng&feature=related

परख सिनेमात सलील चौधरीने लताकडून, "ओ सजना बरखा बहार आयी, रस कि फ़ुहार लायी, अखियोंमे प्यार लायी" असे एक सुंदर गाणे गाऊन घेतले आहे. या गाण्याची माझ्या मनावर मोहिनी आहे. हे गाणे ऐकले कि अवेळी पाऊस पडल्यासारखा वाटतो, आणि पावसाळ्यात हे गाणे ऐकले नाही तर, पाऊस पडल्यासारखाच वाटत नाही.
( याच सिनेमात लताचीच आणखी दोन छान गाणी आहेत. एक आहे, "मिला है किसीका झुमका
ठंडे ठंडे हरे हरे नीमतले" आणि दुसरे " बन्सी क्यू गाये " )
हा बहुदा साधनाचा पहिला सिनेमा. श्रेयनामावलीत तिचे नाव साधना शिवदासानी, असे आहे.
पुढे प्रसिद्ध झालेला, साधना कट, त्यावेळी नव्हता. तसा सिनेमातही तिला फ़ारसा वाव नाही,
सिनेमाचा विषयही वेगळाच आहे. (योग्य माणसाची निवड पण ती लग्नासाठी नाही )
गाण्यात, मिठी मिठी अगनीमे जले मोरा जियरा, किंवा ऐसे रिमझिममे ओ सजन, प्यासे प्यासे
मेरे नयन, तेरेही ख्वाबमे खो गये, अश्या श्रूंगारीक ओळी आहेत, पण त्या काळच्या प्रणयाच्या
कल्पना बघता, हे शब्द नायिका, नायकासमोर उघडपणे, गायलीच नसती.
हे गाणे चित्रीत झालेय, रात्रीच्या वेळी. पाऊस अर्थातच आहे, पण नायिका पावसाच भिजलेली नाही.
(भिजवण्यासाठी लताचे सूर पुरेसे आहेत) ती फ़क्त हात पागोळ्याखाली धरते. (असाच नायिकेला
न भिजवता, भिजवण्याचा यशस्वी प्रयत्न, तब्बूच्या तक्षकमधल्या, करने लगी मै बूंदोसे बाते, मधे
झालाय )
रंगीत नसूनही बिमल रॉयने हे गाणे अप्रतिम चित्रीत केलेय. एका प्रसंगात पडद्याला कर्णात छेदून
वरचा भाग काळा आणि खालच्या भागात साधनाचा चेहरा, असा प्रयोग केलाय. त्या कोनातुन ती
फ़ार सुंदर दिसलीय. इथे तिथे पडणारा पाऊस, पागोळ्या, जास्वंदीचे फ़ूल, तिच्या घराची पडवी,
दूरून तिचे गाणे ऐकणारा नायक, सगळे कसे मस्त जमून गेलेय.
माझ्याकडच्या सिडीवर हे गाणे आहे. प्रत्येकवेळी हे गाणे बघितल्यावर एवढे तृप्त व्हायला होते,
कि पूढचे गाणे बघायला, मन तयारच होत नाही.

आणखी एक आवडते गाणे, मधुमति मधले, चढ गयो पापी बिछुवा. पुन्हा बिमल रॉय, सलील चौधरी आणि लता आहेतच. शिवाय मन्ना डे आहे. पडद्यावर नृत्यनिपुण वैजयंतीमाला.
तिचा वेष बघता, कथानक हिमाचल प्रदेशातले असावे असे वाटते, पण हे गाणे बेतलेय, आसामी
लोकगीतावर. खास करुन, शेवटचा वाद्यमेळ, थेट आसामी बांबू बीट्सचा ( जमिनीवर उभे आडवे
बांबू ठोकत त्यात नाचणारे आसामी लोकनृत्य कलाकार तूम्ही बघितले असणारच. ) पण या गाण्यात मात्र टिपर्‍या आहेत.
बाकी चित्रपटभर, पहाडी निसर्ग टिपला असला तरी हे गाणे मात्र सेटवर चित्रीत झालेय. सोबतचे
नर्तक, वैजयंती एवढे नृत्यनिपूण नाहीत. तिच्या एवढ्या त्यांच्या स्टेप्स अवघडही नाहीत. पण हि
सगळी कसर तिने एकटीने भरुन काढलीय. खास करुन ज्या मन्ना डे च्या ओळी आहेत, त्यावर
तिच्या स्टेप्स फ़ारच सुंदर आहेत. बिछुआ डसलाय पण तो प्रेमाचा, त्यामूळे आजकाल बिपाशा
बासूने, जसे उत्तेजक हावभाव केले असते, तसे नाहीत. तिच्या चेहर्‍यावर एक प्रसन्न भाव आहे. शेवटच्या वाद्यमेळ्यावरचे नृत्य थोडेसे अपेक्षाभंग करते. (मनात उगाचच आसामी कलाकार येतात.)
पण तरिही एकंदर परिणाम ग्रेटच. हे गाणे अनेक शाळांच्या गॅदरींग मधे सादर व्हायचे. त्यांचा नाच
जास्त जोरकस असायचा देखील, पण तरिही मूळ प्रतिमा, कधीच गढुळली नाही.

आजचे तिसरे गाणे आहे पाकिजा मधले. हा सिनेमा मी दहा बारा वेळा बघितला आहे. सगळीच गाणी आवडती. ( या सिनेमासाठी ध्वनिमुद्रीत झालेली, पण सिनेमात न आलेली पण लताची काही गाणी होती. एच एम व्ही ने ती पुढे बाजारात आणली होती, मी एकदाच ऐकली होती ती.)
यूही कोई मिल गया था, सरे राह चलते चलते, हे ते गाणे. या शब्दाना सिनेमात अर्थ आहे. मीनाकुमारी ट्रेनमधून प्रवास करत असताना, रात्रीच्या वेळी राजकुमार तिच्या डब्यात येतो. ती गाढ
झोपेत असते. तो पाणी पित असताना, त्याचे लक्ष तिच्या पायांकडे जाते. तो तिच्या पायांच्या बोटात, एक चिठ्ठी लिहून ठेवतो. "आपके पाँव बहुत नाजूक है, इन्हे जमींपर मत उतारीयेगा, मैले हो जायेंगे" असे लिहिलेले असते. ती त्याला बघायच्या आधीच तो उतरून जातो. ती चिठ्ठी ती जपून ठेवते आणि कायम त्याच्यासाठी झुरत राहते (पुढे त्यांची भेट होते)
या गाण्यासाठी प्रचंड मोठा सेट आहे. मोठे आंगण, त्यातले कारंजे, मग कोठा, मागे तिच्या दालनात
जाणारा रस्ता. त्याच्या दोन्ही बाजूने कारंजे ( हाच सेट, थाडे रहियो साठी पण वापरलाय )
ती केशरी वेषात. पुढे नशील्या डोळ्यांचा कमल कपूर. आणि काहि साजिंदे. सारंगीवर सूर छेडताच ती गाणे सुरु करते. आणि मागच्या दोन नर्तिका पदर सावरून नाचायला सुरवात करतात. या दोघींचा पदन्यास, सितारादेवीने मस्तच सादर केलाय. या दोघींचे क्लोजपही नाहीत बहुतेक. मधेच
मीनाकुमारीही उठून नाचते, पण तिच्या हालचाली माफ़क आहेत.
ये चिराग बूझ रहे है, या ओळींवर गुलाम मोहम्मद ने लताकडून खास कारागिरी करुन घेतलीय.
आणि मग दालनातले आपोआप विझत जाणारे चिराग. याच गाण्यात तिचा आणि त्याच्या डोळ्यांचा
एक सुंदर क्लोजप आहे. शेवटी ट्रेनच्या शिट्टीने तिचे सैरभैर होणे, तिला दूरवर ती गाडी दिसणे, प्रसंगाला उंचीवर नेऊन ठेवतात.
मधेच कॅमेरा त्या कारंज्यात घुसतो. आणि त्यातले एक एक कारंजे तो पार करतो, आणि शेवटी तेही
बंद पडते. आभाळातला चंद्रहि मस्त.

गाईडमध्यल्या, पिया तोसे नैना लागे रे ची जादू औरच आहे. बहुतेक हे गाणे रुपक तालात आहे. सात मात्रांचा हा ताल तसा कमी वापरतात ( अभिमानमधले हाय हाय तेरी बिंदीया रे, हे गाणे पण याच तालातले. दोन्ही गाणी गुणगुणून बघा )
पिया तोसे मधे पण लता आधी या ओळी तालात गुणगूणते. मग एस्डी ने अप्रतिम वाद्यमेळ दिलाय. मग सतार. त्यावर वहिदाच्या पायांचा क्लोजप. या गाण्यात, मराठी दिवाळी, राजस्थानी होली आणि आसामी बिहू, हे सण दिसताहेत. बहिदा त्या त्या वेषात आहे. चक्क नऊवारी साडीत पण आहे.
या गाण्यात सहनर्तिका आहेत. पण त्यांना कवायत टाईप नाचायला लावलेले नाही. प्रत्येक नर्तिका, एखाद्या शिल्पाप्रमाणे नृत्य करतेय.

वैजयंतीमालाचा आम्रपाली आठवतोय ? भानू अथैयानी तिचा तो प्रसिद्ध ड्रेस निर्माण केला होता. त्यात
तडप ये दिन रात की, नील गगन के साये मे, जाओ रे जोगी तूम जाओ रे अशी लताची सुंदर गाणी आहेत.
पण मला सर्वात आवडते ते, तूम्हे याद करते करते, जायेगी रैन सारी, तूम ले गये हो अपने, संग नींदभी हमारी, हे गाणे. गाण्याचे भाव विरहाचे आहेत. मोठ्या कलापूर्ण सेटवर ती एकटीच आहे. ते तिचे शयनगृह आहे. राजनर्तिकेला साजेसे ते खूप मोठे आणि कलापूर्ण आहे. भानू ने तिच्यासाठी मोतिया रंगाचा नाइट ड्रेस निर्माण केलाय. टिकलीही त्याच रंगाची.
या गाण्यावर नाच नाही, पण तिचा ड्रेस आणि सेट यावर नजर ठरत नाही. (या गाण्यात जो तूम न आ सको तो, मुझको प्रमे बुलालो, असे शब्द आहेत. त्यातल्या प्रमे या शब्दाबद्द्ल मला खात्री नाही. त्याचा अर्थ पण लागत नाही )
मन है के जा बसा है, अंजान एक नगर मे, तूम्हे ढूंढती हू प्रीतम, मनके उस नगर मे, असे सुंदर शब्द या गाण्यात आहेत.

एका गाण्यात सिनेमाच्या कथेचा उत्कर्ष कसा साधता येतो, याचे उदाहरण म्हणून मी बंदीनी मधले, मेरे साजन है उसपार, हे गाणे सांगेन. ज्याना माहीत नाही त्यांच्यासाठी या सिनेमाची थोडक्यात कथा. नायिका कल्याणी, म्हणजेच नूतन, गावातल्या पोस्ट्मास्तर ची मुलगी. गावात एक राजकीय कैदी, अशोककुमार, नजरकैदेत आहे. त्याला तिच्या घरापर्यंत यायची सवलत आहे. तिचे त्याच्यावर एकतर्फी प्रेम आहे ( जोगी जबसे तू आया मेरे द्वारे, आणि मोरा गोरा अंग लैले ) पण त्याची शिक्षा संपून तो निघून जातो. मग ती त्याच्या शोधात निघते ( ओ जानेवाले हो सके तो लौट के आना ) पुढे तिला कळते कि अशोककुमारचे लग्न झालेय. त्याच्या कजाग बायकोचा तिच्या हातून खून होतो. तिला शिक्षा होते (जेलमधे आशाची दोन अप्रतिम गाणी, ओ पंछी प्यारे आणि अबके बरस भेज ) जेलमधे तिला धर्मेंद्र भेटतो. तिने लिहिलेला तिचा भूतकाळ त्याच्या वाचनात येतो. तो तिला घरी घेऊन जायला तयार होतो. त्याच्याघरी जाणारी, आगगाडी पकडण्यासाठी ती रेल्वे स्टेशनवर आलीय, तिथेच बोटीचा धक्का आहे. आणि बोटीत चढण्यासाठी आजारी अशोककुमार तिथे आलाय. मागे एस्डीच्या आवाजातले हे गाणे,
मेरे साजन है उसपार, मै इसपार, तू मनहार, ओ मेरे माजी ले चल पार. गाण्याला अध्यात्मिक अर्थही आहेच.
अशोककुमारची अवस्था बघून तिच्या मनाची चलबिचल. त्यालाच आपल्या प्रेमाची जास्त गरज आहे, अश्या निर्णयापर्यंत तिचे येणे. आगगाडीतून वेगाने धावत जाऊन, जेमतेम एका फळीवरून तिचे बोटीवर जाणे, हे सगळे या गाण्यात आहे.
या चित्रपटाचा हा शेवट बिमल रॉयच्या सल्लागाराना पटला नव्हता. धर्मेंद्र त्यावेळी तरुण आणि देखणा होता तर अशोककुमार जेष्ठ होता. नायिकेने तरुण नायकाला डावलून अशोककुमारकडे जावे, हे कुणाला पटत नव्हते, पण बिमल रॉय म्हणाले, जर या चित्रपटाचे नाव बंदीनी असेल तर हाच शेवट हवा.

उमरावजान सिनेमातील रेखा वर चित्रित झालेली गाणी अपप्रतिम आहेत.
"दिल चीज क्या हे" आणि "इन आखोंकी मस्ती के"
कोरिऑग्राफी, वेषभूषा, अभिनय, संगीत, आशाबाईंचा आवाज......सर्वच अप्रतिम !!

माझं अजुन एक खास आवडीचं गाणं;

जीवन से भरी तेरी आंखे...

सुंदर गीतरचना, सुमधुर संगीत आणि सात्विक, सोज्वळ अभिनय. हमखास गुणगुणायला लावणारं.

चित्रपट : सफर
गीत : इंदीवर
संगीत : कल्याणजी-आनंदजी
गायक : किशोर कुमार

Enjoy!

http://www.youtube.com/watch?v=GoRJlzAQ0es

सगळी जुनी गाणे येत आहेत.. Proud

मला ' दिल चाहता है ' मधली सगळीच गाणी एक से एक वाटतात..

त्यातले दिल चाहता है.. हे टायटल गाणे .. एव्हरग्रीन

ते इतके सुंदर रित्या चित्रित केलेय.. कि कधीही बघतो तेव्हा एकदम मुड फ्रेश होतो..

मुंबै-गोवा हायवे... आमिर-सैफ-अक्षय ची मस्त धमाल.. गोव्याचे शूटिंग..आणि त्यात शंकर्-एह्सान्-लॉय चे संगीत..

त्यातल्या काही आवडणार्‍या गोष्टी..
१. आमिर सगळाच्या सगळा मासा गिळतो... अक्षय तो फेकून देतो Proud
२. फोर्ट अग्वाद चे शूटिंग
३. अक्षय, आमिर, सैफ बाइक्स वरुन जात असताना दाखवलेत तो सीन..

झक्कास Happy

दिनेशदा, खजिना खुला करताय अगदी !
" तुम्हे याद करते करते.. " कितीदा पाहिलं ऐकलं तरी तृप्ती होत नाही.

मला दिल चाहता है मधलं बेस्ट पिक्चराईज्ड सॉन्ग 'तनहाइ..' वाटतं. त्याचा एकटेपणा, गर्दीत असूनही स्वतःच्या दु:खात मग्न असल्याने जाणवणारे आयसोलेशन हे ग्रेट टेक्निकने चित्रित केलय. मूड परफेक्ट पकडला गेलाय गाण्याचा पिक्चरायझेशनमधे.

दिनेश ग्रेटच माहिती देताय.

गाण्यांच्या बाबतीत मलाही निर्विवादपणे ६०-७० चा काळ हा गोल्डन पिरियड आहे असेच वाटते. पण त्यातही मी पार्शल आहे ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट गाण्यांच्या बाबतीत. ही गाणी स्क्रीनवर बघताना त्यात छाया प्रकाशाचा जो अजब खेळ दिसतो त्यामुळे गाणी इतकी मॅजिकल वाटतात.
प्यासा ची सगळीच गाणी त्यादृष्टीने बेस्ट पिक्चराईज्ड. येह दुनिया अगर मिलभी जाये तो क्यां है.. मधे गुरुदत्त त्या ग्रीक मोन्यूमेन्ट स्टाईल इमारतीच्या भव्य दरवाजावर हात टेकवून कॉन्ट्रास्ट लाईट्मधे जला दो.. इसे फुंक डालो ये दुनिया .. मेरे सामने से हटालो ये दुनिया... गातो तेव्हा शहारा उमटतो अंगावर. त्याची ती सिल्हूट आणि समोरची अथांग गर्दी. विजयचा हताश संताप काय अंगावर येतो या गाण्याच्या पिक्चरायझेशनमधे!
कागझ के फूल मधला वक्त ने किया क्या हसीं सितम मधे तो दोघांच्या मधून जाणारा प्रकाशाचा पट्टाही असाच मॅजिकल.
ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट्मधे पिक्चराईज्ड झालेली दोन रोमॅन्टिक गाणी माझ्या मते आजवरची बेस्ट रोमॅन्टिक ड्युएट्स- १) अभी ना जाओ छोडकर २) देखो रुठा ना करो. नंतर दहा नंबरमधे असलेली गाणीही ग्रेट आहेत. परत आल्यावर लिहिते त्यावर.

या चित्रपटाचा हा शेवट बिमल रॉयच्या सल्लागाराना पटला नव्हता. धर्मेंद्र त्यावेळी तरुण आणि देखणा होता तर अशोककुमार जेष्ठ होता. नायिकेने तरुण नायकाला डावलून अशोककुमारकडे जावे, हे कुणाला पटत नव्हते, पण बिमल रॉय म्हणाले, जर या चित्रपटाचे नाव बंदीनी असेल तर हाच शेवट हवा.>> दिनेश सर्व पोस्ट्स अतिशय सुन्दर. और आन्देव. गाईड ची मी सीडीच घेतली आहे. दिन ढ्ल जाये हाय विसरलात का?

ये चिराग बुझ रहे है म्हणजे जो यावा असे वाट्ते तो येण्याची उमीद पण हळू हळू कमी होत चालली आहे असे का?

ट्युलिप मस्त पोस्ट अनुमोदन. अभि ना जाओ सुरु झाले की मन साखर साखर होते अगदी.

तडप तडप के इस दिलसे आह निकलति रही मुझको सजा दि प्यार कि, ऐसा क्या गुनाह किया, के लूट गए, हां लुट गयें , के लुट गए हम तेरी मुहोब्बत मे!
तो ब्रीज, ऐश ची साडि, मस्तच.

आंखो कि गुस्ताखियां पण मस्त, धुंद गाणंय! ऐश्वर्याहि कमी प्लास्टिक वाटलिये.

तो पूल 'हम दिल दे चुके सनम' ह्या गाण्यात आहे..
'तडप तडप के' मध्ये सलमान दिसतो, त्यामुळे ते गाणं कर्णमधुर जास्त आहे Happy केकेनं जीव ओतून गायलंय खरंच.

'दिल चाहता है'ला अनुमोदन. संपूर्ण चित्रपटच मस्त आहे.

दिनेश, ट्युलिप, छान पोस्ट्स.

आंखो कि गुस्ताखियां पण मस्त, धुंद गाणंय! ऐश्वर्याहि कमी प्लास्टिक वाटलिये.

अतिशय सुंदर दिसलीय ती ह्या गाण्यात.. तिचे डोळेही खुप छान दिसतात ह्यात, अग्दी हिरवे हिरवे...

'लक्ष्य' या चित्रपटाचे शीर्षकगीत अतिशय उत्तमरित्या गायलेलं व चित्रित केले आहे. या गाण्याचे शब्द प्रेरणादायी आहेत व चित्रिकरणातही ह्रुतिकने केलेली मेहेनत व आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची धडपड भावली. गाण्याच्या शेवटी दाखवलेली परेड रोमांचित करून जाते.

मस्त धागा सुरु केलायेत दिनेशदा Happy
तुम्ही माहिती पण सुरेख देताय. वर सगळ्यांनी लिहिलेली जुनी गाणी वाचुन कुठलं जास्त चांगलं ते ठरवणं कठिण जातयं.

दिल चाहता है बाबत माझंही अनुमोदन.

मला 'रोजा ' मधलं - ये हंसिन वादिया ये खुला आसमां ' अतिशय आवडतं.
जोल थिफ मधला कॅब्रे - "बैठे है क्या उसके पास?????" हेलन कसली नाचलीये आणि दिसते पण मस्त .

सगळ्यांनी मस्त गाण्यांच्या आठवणी काढल्यात. ही सगळीच गाणी मला पण आवडतात.
दिनेश झकास बाफ आणि सुरेख माहिती देतोयेस.

"झोंका हवा का आज भी" :- 'हम दिल दे चुके सनम'
"फिर भी दिल है हिंदुस्तानी" टायटल साँग
"हम ना समझें थे, बात इतनी सी" :- 'गर्दिश

दिनेशजी , ते गाणं आत्ताच ऐकल परत...'मुझे सपनोमे बुलालो...' असं आहे बहुतेक. मी हे गाणं आत्ता पर्यन्त फक्त ऐकल होतं. पार्श्वभूमी काहीच माहीत नव्हती. त्यामुळे आत्त्त्त्ता पर्यंत ती ओळ मी 'मुझे कब्रमे बुलालो...' असं ऐकत होते आणि इतकी वर्ष असच समजत होते की एका मोठ्या महालात नायीकेचं भूत मेणबत्ती घेउन हे गाणं म्हणत असेल. आज तुमच्या पोस्टने मोठ्ठा गैरसमज दुर झाला...बाकी इथल्या सगळ्याच पोस्ट एक एक मस्त सफर घडवून आणतायत...छान धागा सुरु केलात.

'तडप तडप के' मध्ये सलमान दिसतो, त्यामुळे ते गाणं कर्णमधुर जास्त आहे केकेनं जीव ओतून गायलंय खरंच.>>> तूफान आक्षेप!! तुम्ही तुमच्या प्रतिसादामधले हे वाक्य ताबडतोब काढून टाका.. अन्यथा सलमानने या गाण्यात काय वाईट गेले ते सांगा!!! Proud

डरमधले "तू है मेरी किरन".. पडद्यावर फक्त आणि फक्त जुही दिसते... अत्यंत संदर आणि निरागस..

Pages