जय हेरंब स्पर्धा

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 21:33

विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळाली. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला जेवढी शक्य होतील तेवढ्या गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल (sanyojak@maayboli.com) करून कळवायचा आहे. सर्वात जास्त बरोबर उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.

१. जय जय जय श्री गणेश - श्री. रघुनंदन पणशीकर
२. जय देवा गणेशा नमो - श्री. राहुल देशपांडे
३. गजानन करी नर्तन - कु.प्रीति ताम्हनकर
४. आरती गणनायका - सौ. माधुरी करमरकर
५. नमन तुजसी श्री गौरीसुता - श्री. रघुनंदन पणशीकर
६. आज हो गणपती आले दारी - राहुल देशपांडे, माधुरी करमरकर
७. प्रथम नमन तुजसी - श्री. राहुल देशपांडे
८. एकदंत भालचंद्र - श्री. रघुनंदन पणशीकर
९. जय हेरंब - श्री. राहुल देशपांडे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी,
स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय. (म्हणजे ही स्पर्धा पहिल्यांदाच झाली त्यामुळे जो काही प्रतिसाद होता तो अभूतपूर्वच म्हणायला पाहिजे ना! Happy
स्पर्धेतल्या चारही स्पर्धकांनी जवळ जवळ सर्व राग आणि ताल ओळखले आहेत.
ही गाणी रागबद्ध असली तरी फक्त एकच राग एका गाण्यात वापरला होता असं नाही. याला अपवाद म्हणजे जय जय जय श्री गणेश (यमन) आणि प्रथम नमन तुजसी (परज).
त्यामुळे स्पर्धा थोडी इंटरेस्टिंग होती.

सर्वाधिक बरोबर उत्तरे दिली आहेत ती अभिजित आणि दाद यांनी! स्मिता यांची एखाद्-दुसरी चूक झालीय सचिन्_बी यांनी केवळ तालाची उत्तरे पाठवली आणि ती सर्व बरोबरच आहेत.

दाद नी गाणी त्यातल्या सर्व बारकाव्यांसकट ओळखली आहेत, खरं तर अगदी टिपली आहेत!!
त्यामुळे त्यांची उत्तरे आणि त्या बरोबरची टिप्पणी वाचून मला 'जे अभिप्रेत होतं ते ऐकणार्‍यापर्यंत संपूर्णपणे पोचल्याच्या अनुभूतीने मिळणारा' अवर्णनीय आनंद झाला! दाद, तुमचे विशेष विशेष धन्यवाद!! मला वाटतं की तुमचा संगीत या (ही) क्षेत्रातला अधिकार तुमच्या टिप्पणी वरून लक्षात येतो, म्हणून स्पर्धक नव्हे तर परीक्षक्/समीक्षक हीच भूमिका तुमच्या साठी योग्य आहे.. म्हणून स्पर्धक म्हणून अभिनंदन करण्याऐवजी तुमच्या या सहभागाबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देणंच जास्ती संयुक्तिक आहे!

त्यामुळे स्पर्धेचा निकाल असा:

दादः परीक्षक/समीक्षक
अभिजितः प्रथम
स्मिता: द्वितीय
सचिन : तृतीय- ताल विभागून प्रथम!

सर्वांनाच माझ्यातर्फे एक एक सी डी पाठवण्यात मला आनंद आहे. कृपया पत्ता कळवा.

अभिनंदन आणि धन्यवाद!
लोभ वृद्धिंगत होवो!
उपासक!
उत्तरे दुसर्‍या पोस्ट मधे टाकतो

उत्तरे:
"१. जय जय जय श्री गणेश - 
राग - यमन . अगदी शुद्ध यमन (मध्यम देखील फ़क्त तीव्र)
ताल -दादर्‍याचा ठेका (६ मात्रा)
या अल्बम मधलं सर्वात पहिलं सुचलेलं गाणं. "
"२. जय देवा गणेशा नमो -
रागाधार - भीमपलास
ताल -एकताल (आणि संगीता मधे १२ मात्रांचाच चौताल देखील)
या गाण्याची चाल आधी झाली होती. म्हणजे अगदी पूर्णं जशीच्या तशी नाही, पण हार्मोनियम सोलो वाजविण्याकरता मी एक गत बांधली होती त्यावर आधारलेली. गाणं केल्यावर मग त्यात थोडी रागबाह्यता चालतेच. तशी या चालीत ही. (दुखहर जगपालका मधे कोमल धैवत, आणि धैवताचा धनि असा आरोहात्मक वापर वगैरे..)"
"३. गजानन करी नर्तन - राग मिश्र - केदार, नंद, हमीर आणि तार सप्तकात कोमल गंधार
ताल - धमार (किंवा दीपचंदी) आणि शेवटी केहेरवा लग्गी
प्रीति चं youtube वरचं गाणं ऐकून अजय जोगळेकर नी मला आग्रह केला की मी या अल्बम करता तिच्यासाठी एक गाणं करावंच आणि मग मी कल्पना केली गजाननाच्या नृत्याची लहान मुलीच्या आवाजात केलेलं वर्णन आणि अगदी.. गणपतीचं नृत्य म्हणजे धीम्या गतीत, झोकात (दाद नी लिहिलंय तस्सं अगदी..). अशी मी कल्पना केली"
"४. आरती गणनायका -
राग मिश्र - भिन्न षडज, हेमंत, भटियार -
ताल रूपक (७ मात्रा, पण वाजविण्यासाठी रूपक चे बोल वापरलेले नाहीत)
हे अल्बम मधलं सर्वात शेवटी सुचलेलं गाणं. सुरुवातीला मला चाल अशी बांधायची होती की आरतीच्या वेळी म्हणता यावी. पण जशी सुचत गेली त्यानुसार तसं होईल असं वाटत नाही. अजून एक सोपी चाल देखील आहे जी दीपचन्दी ठेक्याच्या अंगानी जाते.. नंतर कधी तरी.."
"५. नमन तुजसी श्री गौरीसुता -
राग- रागेश्री -
ताल: मत्त ताल (९ मात्रा)
दाद नी अगदी बरोब्बर ओळखलं फक्त एकदाच मुखड्याच्या दुसर्‍या ओळीत कोमल गंधार वापरलाय भीमपलास अंगानी. ’जय जग पालनकर्ता’ मधे.
मत्त तालात गाणं बांधायचं असं आव्हान घेतल आणि ओढून ताणून होत असेल तर करायच नाही असं ठरवलं होतं. त्यासाठी डॊ. आश्विनी भिडे-देशपांडे यांच्या बंदिशींचा थोडा विचार केला. त्यांच्या खूप बंदिशी आहेत मत्त तालामधे. अर्थातच सुगम संगीतासाठी हे कसं जमेल हे मोठं आव्हान होतं मला. पण वाटतंय खूप गुणीजनांच्या प्रतिक्रिये वरून की प्रयत्नाना गणरायानी यश दिलंय. शेवटी कृपा त्याचीच असावी लागते हे खरं!"
"६. आज हो गणपती आले दारी - राग- मिश्र:  : दुर्गा, भूप, यमन, केदार अगदी शेवटच्या कडव्यात सोहोनीची झलक  - ताल केरवा (८ मात्रा वेगवेगळे बोल ध्रुव्पद आणि कडव्याना)
हे गाणं २००४ मधे आम्ही बे एरिया मधील महाराष्ट्र मंडळा करिता लहान मुलांचा गाण्याचा आणि नृत्याचा कार्यक्रम सादर केला होता तेव्हा केलेलं आहे. याच्यावर नृत्य देखील होतं. एखाद्या रागाचा मूळ बांधा घेऊन मग त्यावर असं हे बसवलेलं नाहिये खरं तर! पण सुरावटी वेग्वेगळ्या रागांच्या गुंफल्या गेल्या आहेत. त्यावेळी आम्ही जो गजर घेतला होता तो अष्टविनायक चित्रपटातील गाण्यावरून घेतला होता आणि चाल ही तशी होती. पण आता प्रोफ़ेशनल रेकॊर्डिंग करायचं म्हटल्यावर मी ती बदलली. हा ही माझा प्रयत्न आवडलाय असं प्रतिक्रियांवरून वाटतंय!
त्याच कार्यक्रमात मी अजून एक गाण रेकॊर्ड केलं होतं ’दिवस सुगीचे सुरु जाहले’ आणि ते गायलं होतं माबो कर अभिजित नी!"
"७. प्रथम नमन तुजसी -
राग - परज (शुद्ध परज दुसरं काही नाही)
ताल - केरवा (८ मात्रा पण वगाची जात सुरुवातीला)
कै. पंडित वसंतराव देशपांडे यांच ’लाल आये’ आणि ’पवन चलत आलि कियो’ हे रेकॊर्डिंग (माझ्या माहितीनुसार तबल्याला उस्ताद झाकिर हुसेन!) तुम्ही ऐकलंय का? जबरदस्तं आहे! ते ऐकल्यावर ’परज’ मधे कुठलं नाट्यगीत किंवा सुगम गाण आहे का ते शोधलं पण मला नाही सापडलं. म्हणून डोक्यात विचार आला की आपण का नाही बांधायच? आणि मग मी हा प्रयत्न केला. खरं सांगायचं तर मी केवळ भजनी तालाचा, आता आहे त्या पेक्षा थोड्या अधिक गतीचा ठेका घेतला होता. पण अजय जोगळेकर नी त्याला ही वगाची लोकगीताच्या ठेक्याची ट्रीट्मेंट दिली. माझ्या मनात सुरुवातीला भजनी असल्यामुळे, सुरुवातीला मला फारसं पटलं नाही. पण चारदा ऐकल्यावर चांगलं आणि वेगळं वाटलं आणि मग ओके केलं! मजा येतेय ना हया ठेक्यानी?"
"८. एकदंत भालचंद्र -
राग - मूळ तोंड शंकरा, (धैवताचा ही वापर म्हणून हंसध्वनी वाटेल पण पकड शंकराची आहे) कडव्यांमधे विविध राग: भिन्न षड्ज, भूप, सरस्वती,  
ताल -झपताल
मला वाटतं की हे तिसरं गाणं असावं झालेलं. झपतालाचा विचार चालू होता आणि जसं सुचलं तसं करत गेलो."
"९. जय हेरंब -
राग: मिश्र , तोंड वृ. सारंग, नारायणी, जयजयवंती, मल्हार
ताल -आडा चौताल
जसं मत्त तालासाठी मला प्रेरणा मिळाली डॊ. आश्विनी भिडें च्या बंदिशीतून तसं आडा चौतालासाठी डॊ. वीणा सहस्रबुद्धेंच्या बंदिशी ऐकून. सर्वात पहिल्यांदा मी ऐकलेली आडा चौताल बंदिश म्हणजे त्यांची जोगकौंस मधली ’गोपिका चली सुरनवन’ अफलातून आहे. जरूर ऐका. हे गाणं आधी झालं. सुरुवातीला मी सम हेरंब मधल्या ’रं’ वरती ठेवली होती. तसही मस्तं वाटतं. अजय च्या सूचनेवरून बदल केला त्यात."

दाद - तुम्हाला मनापासून दाद, आणि इतर विजेत्यांचे मनापासून अभिनंदन!!

इतक्या सविस्तर निकालाबद्द्ल, धन्यवाद, मनोज! (उपासक). क्या बात है.!

लोकहो, गेले १० वर्षे मी मनोजला ओळ्खतोय आणि त्याची संगीत दिलेली गाणी ऐकतोय. मग बे एरियामधील एखाद्या एकांकीकेसाठी केलेले २ ओळींचे गाणे असो किंवा बहीणाबाईंवरचा पूर्ण कार्यक्रम असो, मनोजच्या चाली केवळ उच्चच राहिल्या आहेत. गाण्यात दोन किंवा जास्ती रागांचे बेमालूम मिश्रण ही तर त्यांची स्पेश्यालिटी आहे! पुन्हा एकदा या अप्रतिम सीडीबद्द्ल अभिनंदन, आणि आगामी आल्बमसाठी शुभेच्छा!!! (म्हणजेच दुसरा आल्बम काढा लवकर.. Happy )

अभिजित, अभिनंदन! मनोजनी बर्‍याच गुगल्या टाकल्या होत्या, नाही? खूप मजा आली ओळखताना.
वीणा सहस्त्रबुद्धेंची ती बंदिश ऐकली नाहिये... आता मिळवून ऐकेन.

परज मधलं, वसंतरावांचं मी ऐकलय. माझ्याकडच्या लाईव्ह रेकॉर्डिंगमधे त्यांनी जोगकौस, (लाल आये - झपतालात), मग दृत तीन्तालात पवन चलत आली कियो, मग सावरे अय जैयो...
सगळ्याला झकिरने जे काही वाजवलय ते केवळ केवळ अप्रतिम. तालाशी गंमत करीत, तालाला खेळवत वसंतरावांनी आणि झकिरने मिळून निव्वळ आतिषबाजी केलीये.
धन्यवाद मी तुम्हाला द्यायचे, मनोज. काहीतरी वेगळं करण्याची उर्मी प्रत्येक कलाकाराला असतेच. पण "लोकाभिमुख" म्हणून जी तडजोड करतो, करावी लागते... ती तुम्ही टाळलीये.
माझ्या अनेकानेक शुभेच्छा... (खरतर स्वार्थंच माझा)
तुमच्याकडून असंच सकस ऐकायला मिळो.

खरच दाद, मनोजनी मस्त गुगल्या टाकल्या होत्या, त्या मुळे ओळखायला जाम मजा आली.
मनोज , परज मधे बांधलेल गाण केवळ अप्रतिम, अर्थात सगळीच गाणी अप्रतिम आहेत

तुम्हाला खुप खुप धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेली सविस्तर माहिती, केवळ लाजवाब
अभिजित तुम्हाला १००% अनुमोदन!!
दाद तुमचही मना पासुन अभिनंदन !!

ग्रेट! Happy
सर्व स्पर्धकान्चे मनःपूर्वक अभिनन्दन! Happy
अशी "अफलातून" स्पर्धा ठेवल्याबद्दल सन्योजकान्ना पेशल शाबासकी Happy