गूळपोळी

Submitted by मनःस्विनी on 7 January, 2010 - 02:40
gulpoli
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

सारणः
अर्धा वाटी गूळ किसलेला नाहीतर चुरा गूळ,
चार चमचे बारीक बेसन,
१ चमचा दूध,
२ चमचे शुद्ध तूप,
२ चमचे सफेद तीळ,
२ चमचे सुखे पांढरे खोबरे(काळी पाठ नसलेले) नाहीतर चुरा,
२ चमचे खसखस्(एच्छिक आहे. सर्वच जण टाकत नाहीत)
वेलची,
केसर,
तव्याला चुना

पारी:
१ वाटी कणीक,
२ चमचा बारीक रवा,
४ चमचे बारीक बेसन
४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन,
पाणी लागेल तसे,
मिठ चवीला.

क्रमवार पाककृती: 

पारी कृती:
१. सगळी पिठ व रवा एक करून मध्ये खड्डा करून मिठ घालून मध्ये मोहन घालायचे व मस्त क्रम्स करायचे.
२. मग पाणी लागेल तसे घालून घट्ट भिजवून झाकून अर्धा एक तास तरी ठेवावे. रवा भिजतो.
३. एक तासाने हाताला जरासेच तेल घेवून एकदम मळायचे मस्त. तेल ओतायचे नाही पुन्हा. रवा एक्जीवे झाला पाहिजे. पुन्हा झाकून ठेवायचे.

सारणः
१. तीळ, सुखे खोबरे कीस, खसखस कोरडे असे वेगवेगळे मंद आचेवर जरासेच भाजून घ्यायचे,रंग बदलला नाही पाहिजे. बेसन ही तूपात खरपूस भाजावे वास येइपर्यन्त. मग जरासाच दूधाचा हबका मारावा.
२. मग सर्व(बेसन व गूळ सोडून) बर्‍यापैकी थंड करायचे व वाटायचे वेगवेगळे. ह्याचसाठी वेगळे वाटायचे की तेल सुटून मिक्सी खराब होवू शकतो. मध्ये मध्ये थांबून चमचा फिरवून अंदाज घेत वाटायचे नाहीतर तेल निघून पातं अडकते व मिक्सी खराब होइल. हि पूड तयार ठेवणे.
३. आता आधी गूळ व बेसन हातानेच वेगळा मिक्स करून घेवून मळणे व वरील पूड टाकणे. फूड प्रोसेसर असेल तर मस्त. पण खूप फिरवू नये गूळ उष्णतेने वितळेल. व मिश्रण खूप कोरडे करू नये थोडेसे ओलसर असेल तर गोळे करायला बरे पडते. असे गोळे करून झाकून ठेवावे. कोरडे करू नये.
४. वेलची पूड्,केसर कुस्करून टाकावे.

लाटणे:
एकतर उंडा करून मध्ये भरून लाटणे.
पण ह्याच्यापेक्षा दोन पातळ चपाती करून सारण सर्व बाजूने पसरवायचे पण कडे पर्यन्त मिश्रण भरू नये. गूळ वितळून बाहेर येतो. मग आधी कडेकडेने लाटावे.( साधनाच्या मांडे कृती मध्ये दाखवलेय ना तसेच).
१.कडेने पातळ असा उंडा करायचा. त्याने कडा पातळ रहातात.
gupo1.jpg
२.मोदकासारखा उंडा करून जितके ज्यास्त सारण भरता येइल तितके भरायचे,
gulpoli.jpggupo2.jpg
३. हातानेच मग मोदकासारखा जवळ आणून तोंड बंद करून हातानेच जरा चपटा करायचा कडेने पातळ ठेवत.
gupo3.jpg
४.मग हलक्या हाताने लाटायचा, मी पातळच लाटते. गूळ जर मस्त मिक्स असेल तर नाही येत बाहेर.
gupo4.jpg
५. पोळी एका बाजूने भाजली की पलटायची.
gupo5.jpg
६. मस्त फुगते.
gupo6.jpg
७. खुसखुशीत पोळी मध्ये तोडून बरी पडते..
gupo9_0.jpggupo8.jpg

अधिक टिपा: 

१.तवा हा खूप गरम नाही पण योग्य गरम पाहिजे. नाहितर चिकटते. दिनेश ह्यांनी मला गेल्यावेळेला चुना लावायला सांगितला तव्याला. मी चुना लावूनही केल्या व चुना न लावता. फक्त गॅस नीट ठेवायचा व तव्याचे तापमान नीट सांभाळायचे. एक बाजू भाजली की दुसरी पलटून भाजायची. ज्यास्त वेळा उलट पलट करु नये. गूळ बाहेर आल्याने चिकटतो व उलटत नाही गॅस खूपच गरम झाला तर व पोळी कच्ची रहाते.
एकदा सवय झाली दोन तीन पोळी झाली की होते मग नीट.
२. गूळ कडक असेल तर स्टील डब्यात घालून कूकरमध्ये शिटी शिवाय १० मिनीटे घालायचा व मग लगेच बाहेर काढून फोडायचा.
३. तीळाचे प्रमाण व खोबरे आपल्या आवडीप्रमाणे कमी ज्यास्त करु शकतो.
४.जर तीळ्,खसखस ,खोबरे भाजले ना की आपोआप तेल सुटते वाटताना मग गूळ अ‍ॅड केला की लगेच ते तेलच बाईंडिंग सारखे काम करते. मी बघ असे लाडू वळून ठेवलेत. मस्त तेलकट व आपोआप वळतात. मग पोळीत लाटले की पसरतात देखील मस्त जराशा दाबाने.

माहितीचा स्रोत: 
माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए खरच छान दिसतायत का?? Happy मला वाटलेल गंडलय प्रकरण.
निबंध सुरवातीला बिघडु शकतात पण धीर न सोडता तवा परत परत पुसुन धुवुन पुढची पोळी कर. माझी पोळी तरी चिकटली नाही पण गुळ बाहेर निघुन तवा मात्र करपत होता. एक एक पोळी नंतर आपण हुशार होत जातो Proud

सशल, आईच्या हातची सर येणार नाही ग पण 'परतोनी' चा निर्णय होत नसेल तर इथे ये. माझ्या हातच्या खाउ घालेन Wink

मी आत्ता केलेलं सारण खुपच कोरड दिसत आहे पोळ्या परवा १४ तारखेला करणार आहे. त्या सारणाचे गोळे झाले नाहीत. भुसभुशीत दिसत आहे. परवा पर्यंत आणखिन कोरडे पडेल का?? अश्या कोरड्या सारणाच्या पोळ्या कश्या करु?

अमया, काहि होत नाही गं. मी गेल्या शनिवारी सारण केले मग वेळच नाही झाला काहीतरी काम आले म्हणून. आता ह्या शनिवारी करणार आहे. लाडू करून ठेव एका बंद डब्यात. रहातात मस्त.
करायच्या आधी मळ मग हाताला दूध लावून घे लाडू हातात. होतील छान.

मी सारख्या मापाच्या कणकेच्या २ व गुळाची १ अशा गोळ्या करुन घेते. तिन्हीच्या सारख्या आकाराच्या छोट्या पुर्‍या हाताने थापून किंवा लाटून करते. खाली वर कणिक आणि मधे गूळ अशी लगोरी लावून तळहातावर ठेवते व दुसर्‍याहाताने हलकेच कणकेच्या कडा एकमेकींना चिकटवते. नंतर पोळपाटावर पिठी घेवून त्यावर लाटते. उलटत नाही. तव्यावर टाकल्यावरसुद्धा प्रत्येक बाजू एका पलटीतच शेकवते. सगळ्या पोळ्या एकसारख्या, गूळ बाहेर न आलेल्या तरीही कडेपर्यंत गूळ पसरलेल्या होतात.

उषा पुरोहित यांच्या संपुर्ण पाककला मधे बरीच पाने खर्ची घातलीत या प्रकरणावर (पण वाचून काही बोध होत नाही )
सारणातला गुळ खुप बारीक करणे महत्वाचे आहे. जरा जरी खडा राहिला तर तेवढा भाग भाजताना वितळतो. गुळाचे प्रमाण कमी करून दाण्याचे व तीळाचे कूट वाढवले तरी पोळ्या चांगल्या होतात. त्या कमी गोड होतात. हे साऱण घट्ट गोळा न होता जरा कोरडे असते व ते नीट पसरता येते.
या पोळीला थोडेफार काठ राहतातच ( पोळी बघावी काठात आणि मुलगी बघावी ओठात, अशी एक म्हण आजी वापरायची ) म्हणून त्या कातण्याने कापतात, पण असे केले तर बर्‍याच वेळा काठाने गूळ बाहेर येतो. (भाजताना)
नॉन स्टीक तव्यावर भाजले तर चूना लावायला नको पण जर गूळ चिकटला तर ओल्या फडक्याने तेवढा भाग पुसून घ्यावा, नाहीतर नंतरच्या पोळ्या नेमक्या तिथेच चिकटतात.
खास म्हणजे या पोळ्या गरम खायच्या नसतात. (तोंड भाजते ) थंड पोळी त्यावर तूप फासून खायची !!!

....

हे मनःस्विनी,

तुझ्या पद्धतीने पोळ्या केल्या खुप छान झाल्या आहेत. मला वाटत होत की गुळाच्या पोळ्या म्हणजे कटकट असते. पण तुझ्या पद्धतीने फटकन झाल्या. थँक्स.

मनु, मी अगदी आत्ता पोस्ट करायला आले की पोळ्या खुप मस्त झाल्या. नवरा, पोरगी खुश झाले. मी तंतोतंत मनुची रेसीपी फॉलो केली , फक्त मी दोन पोळ्या न लाटता, उंडा करुन केल्या पण जमल्या. मिनोती, मनु आणि सर्व जणींना खुप खुप थॅंक्स !!

अच्छा! छान.
हि माझ्या आईची रेसीपी आहे ,तिलाच सांगते. मग मला मिळणार का? मला सारण करून दिवस झाले पण वेळ मिळत नाहीये. आधी तुझ्या हातच्या खाते.:)
पिठात रवा घालून मस्त लागते ना अमया?

मी उद्या रात्री करेन. पिठ पण तयार आहे कालपासून. रवा घातलाच मी रोजच्या सवयीने पिठात.खरेतर मी सुद्धा उंडाच करून करते,तेच आवडते. तिळाचे लाडू करण्यात वेळ गेला.

you are most welcome! मी रवा घालुन केल्या! खुसखुशीत होतात मस्त !!

मनु,
पीठ १ तासाने फुड प्रोसेसर मधे मळले तर चालेल का?? सारण झाले आहे! आता उद्या पोळ्या करायचा विचार आहे!!
बाकी तु म्हन्जे खरी सुगरण आहेस बघ्!!!तुझ्या पासून प्रेरणा घेऊनच मी पण अनेक पदार्थ केलेत!!
आता पोळ्या बघु कशा जमतात ते!!!!

रोचीन,हो चालेल. मग हाताने जरासेच मळ. जेवढे ज्यास्त मळशील तेवढा रवा भिजेल व पोळी खुसखुशीत होइल. रवा नसला जरी तरे एमस्त होइल पोळी एकदम मऊ तलम. Happy

दिनेश, ते नोकरी असल्यानेच एका आठवड्याला सारण व दुसर्‍या आठवड्याला पोळी असे झालेय ना.(असे रोज नाही होत पण जसा वेळ मिळेल तसे होते.) Happy

हुर्रे. जमल्या एकदाच्या.
मनःस्विनी, पूनमवैनी, स्वातीकाकु यांना टींपांबद्दल आणि अमृताला फोटू टाकल्याबद्दल थॅक्यु थँक्यु.
अत्यंत आभारी आहे.

हुश्श.... जमल्या बरं का मलाही.... अगदी काटेकोरपणे एक वाटी कणिक घेतली त्याच्या फक्त चारच पोळ्या झाल्या. पण त्या नीट झाल्याचे बघुन मला आता नवा हुरुप आला. आता उद्या माझ्या लेकीने त्या खाल्ल्या की बस.. सार्थक झाले आजच्या अख्ख्या संध्याकाळचे.. Happy

मनु आणि अश्विनी के तुम्हा दोघांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. अश्विनी तु मुद्दाम फोन करुन मी काही चुकू नयेत म्हणुन परत्परत सांगत राहिलीस त्याचे आभार तरी कसे मानु?? उद्या माझ्या ऐशुला सांगते आईच्या गुळपोळ्यांमागे कोणाकोणाचे हात आहेत ते....

फोटो टाकायला खरेच वेळ नाहीये आता.. पुढच्या वेळॅस टाकते..

...

जमल्या जमल्या मलापण जमल्या. अगदी एकही पोळी चकटलि नाहि. सर्वांचे टीप्स कामाला आले. मी ओले कापड हाताशि ठेउनच होते. पण गरजच पड्ली नाही. आणि साधनाची नोट वाचुन मी प्रमाण दुप्पट घेतले त्यामुळे १० पोळ्या झाल्यात. मनःस्विनी थँक्य. काल रात्री १० पर्यंत हेच करत होते. Happy

गुळपोळीचे दिवस परतले... Happy परवाच आठवण काढत होते गुळपोळीची. ह्या वर्षी दुप्पट प्रमाण घेऊन करेन. जमतील याची खात्री आहे.

गूळपोळी करून बघायची अजून हिंमत झाली नाहिये. जेव्हा होईल तेव्हा या बाफचं पारायण करणार हे नक्की Happy

Pages