मी वाचलेले पुस्तक -४

Submitted by भरत. on 9 April, 2026 - 01:44

आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.

आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hidden Life
ही माधुरी विजय यांची दीर्घकथा त्यांच्यात आवाजात न्यू यॉर्कर वर ऐकली. पुस्तकांत रमणाऱ्या एका टीनेजर मुलीला बेंगलोर होऊन चेन्नईला आपल्या एका आत्याकडे जावे लागते, आणि तिथली माणसे तिच्या कशी अंगावर येतात (!), किंवा तिच्यावर ग्रो होतात असं म्हणू ते माधुरी वियय यांनी कौशल्याने टिपले आहे.

काळजीपूर्वक लिहितात. कदाचित एक स्त्रीच पकडू शकते असे बारकावे टिपत जातात. त्यांची संगती नंतर चेकोवच्या एके ४७ प्रमाणे फटाफट फुटत जात कथेचा कळसाध्याय होतो तोवर कथेतला इंटरेस्ट टिकून राहतो. काही ठिकाणी माधुरी विजय पाश्चात्यांना हव्या असलेल्या गोष्टी अतिशय चलाखीने मधे मधे सोडून देतात (म्हणजे भारतीय कथा आहे त्यात साप नाही?? छे छे), स्त्रियांचे दमन इत्यादी..पण वाहवत जात नाहीत, फोकस ढळत नाही. शब्दांची निवड तीक्ष्ण आहेच पण प्रतिमा देखील अत्यंत सशक्त आहेत. कथेत सुरुवातीला जरा जास्तीच्याच 'बोल्ड' प्रतिमा येतात मात्र उत्तरोत्तर त्यांच्यातली तीव्रता कमी होते. हे प्रतिमा फार्मिंग जरा कृतक वाटले पण एकूण कथा चांगली वाटली.

आता यावरून त्यांचे जे सी बी पुरस्कार मिळालेले फार फील्ड हे पुस्तक वाचावे असे वाटत आहे.

जुनी पिवळी पडलेली जीर्ण पुस्तके अनेकदा सागर आर्केडच्या तळघरातल्या पुस्तकाच्या दुकानातून, डेक्कनच्या फूटपाथवरून किंवा अब चौकातून घेतलेली आहेत. एखादे पुस्तक हवेच असेल आणि ते मिळत नसेल तर पर्याय नसतो. जातक कथाचे प्रकाशन (दुर्गाबाईंचे) १९७५. त्या वेळी ३००० प्रती वाचनालयातून खपवणे अवघड नसावे, आता ३०० पुस्तकांची आवृत्तीही निघालेली पाहिली आहे.

रॉय दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध होत आहेत याबद्दल अभिनंदन. हंस नेहमी वाचला जातोच. यावेळी तुमची कथा वाचण्याबद्दल उत्सुकता असेल.

श्रीमान योगी आणि कुरूंदकरांची प्रस्तावना याबद्दल १००% सहमत. शालेय वयात श्रीमानयोगी आवडलं होतं. त्यावेळी प्रस्तावना वगैरे सिरीअसली वाचायची असते असं डोक्यातही यायचं नाही. पण आता प्रस्तावनाच लक्षात राहिली आहे.

प्रस्तावना विषय निघाला म्हणून...
हल्लीच 'चार शब्द' या पुस्तकातील पु,लंनी लिहिलेली 'विश्रब्ध शारदा - भाग २' या पुस्तकाची प्रस्तावना स्टोरीटेल वर अरुणा ढेर्‍यांच्या आवाजात ऐकली. पूर्वी चार शब्द वाचले होते पण तेव्हा इतकी अपिल झालेली लक्षात नाही.
'विश्रब्ध शारदा' या तीन भागांच्या पुस्तकात हरिभाऊ मोटे यांनी विविध श्रेत्रातील प्रसिद्ध/ त्याक्षेत्रात काम केलेल्या व्यक्तीचा इतरांबरोबर झालेला वैयक्तिक पत्रव्यवहार एकत्र करुन प्रसिद्ध केला आहे. पत्रे अनेक प्रकारची, त्याकाळाचा आरसा दाखवणारी, त्या क्षेत्राची त्या काळची परिस्थिती दाखवणारी, त्या व्यक्तींचा ते क्षेत्र सोडून असलेला तत्कालिन सामाजिक/ राजकीय/ आर्थिक विचार, वकुब, आस्था असं सगळं त्यातुन दिसतं किंवा दिसावं अशी अपेक्षा. ती अपेक्षा अनेकदा पूर्ण होत नाही, आणि ते तसं का झालं असेल याचं विश्लेषण पुलं करतात. या दुसर्‍या भागात संगीत आणि नाट्यक्षेत्रातील व्यक्तींची पत्रे आहेत.
एरवी पुलंच्या लेखनात बालगंधर्व म्हटले अगदी विभूती प्रकारची भाषा वाचली आहे. यात पुलं, एकुण संगीत रंगभूमी, त्यातले प्रश्न, पतनाची संभाव्य कारणे, उतरती कळा, व्यक्तींची स्वभाववैशिष्ये आणि त्यांचा त्या परिस्थितीवर कळत नकळत पडलेला प्रभाव इ. अनेक अंगांनी उहापोह करतात. रंगभूमीच्या सुरुवातीला विष्णुदास भाव्यांनी पैसे देऊन ब्राह्नणांच्या मुलांना कसं आमिश दाखवलं पासून संगीत रंगभूमीचा उतरता काळ, सिनेमाचा उदय, पुन्हा नाट्यानुभवाची आस, रंगभूमी समुहाने फुलवायची असुनही त्याचे आपल्याकडे कायमच झालेले एकखांबी तंबू, त्या एका खांबा शिवाय कुणालाच नसलेले महत्त्व तर इतके की त्यांनी (इतरांनी) कुणाला पत्रे तरी लिहिली का? त्यांचे विचार, त्यांचे अंतरंग कधी उलगडलं तरी गेलं का? असे प्रश्न वाचले की विद्ग्ध व्हायला होतं.
या व्यतिरिक्त पुलं अनेक मुद्दे उपस्थित करुन त्याच्या खोलात जाऊन उहापोह करतात.
मला ही प्रस्तावना फार आवडली आणि परत एकदा शांत चित्ताने मनन करण्यासारखी त्यातुन आपल्याला ही काही सापडेल अशी आहे.
'विश्रब्ध शारदा' पुस्तक कुणाकडे असेल तर मला वाचायची उत्सुकता आहे. आऊट ऑफ प्रिंट असावं असं शोधुन वाटलं.

अमित, परिचय आवडला.
विश्रब्ध शारदा च्या निर्मितीबद्दलचा एक लेख बहुतेक ललित दिवाळी अंकात वाचला होता. थक्क करणारं होतं ते सगळं. म्हणजे वि.का. राजवाडे यांच्या पातळीचं.
ह. वि . मोटे आणि मालतीबाई बेडेकर - विभावरी शिरूरकर यांचं नातं होतं. मालतीबाईंच्या भगिनी या मोट्यांच्या पत्नी.
कळ्यांचे निश्वास मोट्यांनी प्रकाशित केलं.

अ‍ॅमेझॉन इन्डिया वर ऑडिओ बूक फॉर्ममध्ये उपलब्ध आहे असे दिसते. अरुणा ढेरेंच्या आवाजात आहे. (बाकीच्यांसाठी ज्यांना ऐकावयाची आहे)
https://amzn.in/d/0aG5AKx0

ह. वि . मोटे आणि मालतीबाई बेडेकर - विभावरी शिरूरकर यांचं नातं होतं. मालतीबाईंच्या भगिनी या मोट्यांच्या पत्नी.
कळ्यांचे निश्वास मोट्यांनी प्रकाशित केलं.
>>>
तिसरी बहिण वि म दांडेकरांची बायको.

कोसला ला पुलंची प्रस्तावना नाहिये पण ब्लर्बवर पुलंनी लिहिलेला कौतुकाचा परिच्छेद आहे का? कोसला वर त्यांनी लेख लिहिला होता का?

दया पवारांच्या 'बलुतं'वर नक्की लेख लिहिला होता. तो त्यांच्या 'दाद' पुस्तकात आहे. कोसला वरही त्यांचं वाचलं आहे. कुठे लक्षात नाही, कदाचित पेपर मध्ये असेल.
आणि मला बरोबर आठवत असेल तर 'कोल्हाट्याचं पोर' वरही लिहिलेलं. किशोर शांताबाई काळे. ते पुस्तक वाचुन तेव्हा गदगदुन आलेलं आठवतं.

श्रीमान योगी, राधेय, मृत्युंजय अशा अनेक कादंबर्‍या शाळेत वाचल्या. पण एकाचीही प्रस्तावना नव्हती वाचली.
श्रीमान योगी तेव्हां आवडलेलं. आता मृत्युंजय वगळता एकही वाचवणार नाही.

मला या कादंबऱ्यां का कोण जाणे, कधीच वाचाव्याशा वाटल्या नाहीत. कॉलेज लायब्ररीत मुलं यांच्यासाठी क्लेम लावून ठेवत तेव्हा मी चिं त्र्यं वाचायचो. त्यांच्या कादंबऱ्या नाटकं वाचली. आणि कवितासंग्रह.हे मी तुच्छतेने किंवा आढ्यतेनेही म्हणत नाही. पण तसं झालं खरं.

आता या वयात त्या कादंबऱ्या मला वाचवतील का?

त्या वेळी या कादंबर्‍या मुलांना वाचायला देणं ही मोठी गोष्ट वाटायची. मुलांना मात्र कटाक्षाने दूर ठेवलं.
त्या वेळचं साहित्य, सिनेमे, टिव्हीचे कार्यक्रम हे सगळं भाबडं करून सोडणारं मटेरिअल होतं.
(मा़झ्यावर झालेला त्या वेळचा अनिष्ट परिणाम म्हणजे जडशीळ भाषा आणि भरजरी शब्दांचा अनाठायी सोस. यांत्रिक वाटतं त्याने.)

>> आता या वयात त्या कादंबऱ्या मला वाचवतील का? <<
सगळ्याच नाहीत वाचवणार. श्रीमान योगी त्यातल्या त्यात बरी आहे. म्हणजे एका पारड्यात पुरंदरेकृत शिवपुराण ठेवले तर श्रीमान योगी बरेचसे सुसह्य आहे.

सावंतकृत महाभारताचे कॅरॅक्टर कव्हर्स : यातल्या काही वाचवतील. मृत्युंजय तशी वाईट नाही. अशा गोष्टींतून अचानक काहीतरी स्पेसिफिक सापडून जाते. उदा मला आठवते त्याप्रमाणे कृष्णाला चंडोल पक्ष्याचे मटण आवडत होते. मी हा पक्षी खाण्यासाठी शोधला पण नाही सापडला. पर्यावरणद्वेषी बकेट लिस्ट मधे हा आइटम अजूनही तसाच आहे.

पण काही वाचवतील.

मी देखील तुच्छतेने कधी वपुलं वाचले नव्हते. ते बटाट्याची चाळ, म्हैस वगैरे वगैरे तर एवढे डोक्यात जाणारे प्रकरण होते की विचारू नका. त्यात ते झी मराठी वर पुलंचे अभिवाचनाचे/ स्टँड अप कार्यक्रम लागत त्याचे सुरुवातीचे हरीशचंद्राच्या फॅक्टरी चित्रपटातल्या BGM सारखे म्युझिक सोडल्यास पाहवले देखील नाहीत. त्यात प्रेक्षक खोखो हसत असताना आम्ही मित्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहायचो. एकतर ते भयाण आउटडेटेड जोक्स, त्यात ते संपूर्णपणे अपरिचित असलेले चाळीचे वातावरण आणि त्याचा लोकांच्या लिहिण्यात असलेला अशक्य उबग आणणारा नोस्टाल्जिया. पण पुल प्रॉक्सी ने वाचले. एक्चुअली आधी सुनीताबाई वाचल्यावर पुलंचे 'एक शून्य मी' वाचवले. एकूणच असले 'आनंदयात्री' छापाचे लेखन करण्याचा कसलासा अदृश्य दबाव त्यांच्यावर होता कुणास ठाऊक, आपल्या क्षमतेच्या कैकपट मचूळ लिहिणे त्यांनी का पसंत केले होते देव जाणे. बरं यांना चांगल्या आकाशवाणी वगैरे असल्या ठिकाणी नोकऱ्या मिळायच्या अगदीच प्रेक्षकशरण लिहावे असे त्यांनी का केले असावे त्यात आता पडण्यात हशील नाही. अख्ख्या यूनिवर्सभराचे साहित्य वाचणाऱ्या जीएंच्या मैत्रीण आणि स्वतः अर्थात जगभरचे साहित्य वाचणाऱ्या सुनीताबाईंनी त्यांच्याकडून किमान तसे काही लिहून घ्यावे तर तेही नाही. तुज आहे तुजपाशी किंवा ती फुलराणी सारखी सामान्य दर्जाची नाटकं? असो. परंतु आता कदाचित ते त्यांचे बटाटाचाळ छाप काही मला अजिबातच वाचवणार नाही मात्र चिंतनपर, ऑनेस्ट, रसाळ किंवा थंड सुरीने चिरावे तसे विश्लेषणात्मक धारधार असे काही लिहिले असेल ते नक्की वाचायला आवडेल.
तसेच आता कदाचित वपुंचे करावे असे वाटत आहे. यांना बाय प्रॉक्सी देखील कधी हात लावला नाही. मात्र त्यांचे बेस्ट ऑफ, किमान एकदा वाचावे असे ठरवले आहे. आता तसा एक अधाशी पणा नाही. आवड निवड काय आहे हे स्पष्ट माहीत असल्यावर येणाऱ्या ताटस्थ्याने हे वाचले तर उलट जास्त मजा देतील असे वाटते. Too bad, good प्रकारची मजा नसली तरी जिच्यावर नेमके बोट ठेवता येणार नाही अशी मजा.

मला आवडतात हं पुलं. पूर्वरंग सगळ्यांत जास्त आवडतं.‌
बटाट्याची चाळमधलं पण बरंच काही आवडतं.
हसायला आवडतं मला.

वपुपण मी अजिबात नाही वाचलेत.
पण शिरीष कणेकर आवडायचे. काढा माझं पॅकेज.

कोण तो देशपांड्यांच्या लक्ष्मणचा पोरगा होय?
अरे लिहिता वाचता येत नव्हतं, तेव्हां मीच हात धरून पाटी पेन्सिल घेऊन शिकवला, म्हणून म्हमईत जाऊन पोटापाण्याच्या उद्योगाला लागला.
पण तिकडे मला न विचारता काहीतरी लिहीण्याचे उद्योग केले आणि मुंबईकरांना भिऊन पळ काढला तो थेट पुण्यातच मुक्काम हलवला हो.

बाकि पुण्याच्या लोकांत काही म्हणता काही सत्व शिल्लक नाही. डोक्यावर घेतात कुणालाही, एव्हढंच बोलतो, नाहीतर म्हणाल म्हातारा काहीही बोलतो. हो बोलतो. भीत नाही कुणाला. रत्नागिरीचा आहे.

असे व्हॉटसअ‍ॅप मेसेजेस बापटांच्या पूर्वजांच्या नावे आले तर नवल नाही.

मीवापु चा पुकवा व्हायच्या आधी शुभरात्री.

बाकि एके काळी वपु (न वाचाव्या अशा वयात) वाचलेले. त्यांच्यामुळे चावट गोष्टींना सात्विक मुलामा देणारे सगळेच डोक्यात जाऊ लागतात. त्यांच्या पेक्षा ग्रामीण बाजात ऊसातली गंमत लिहीणारे प्रामाणिक वाटतात.

पुलंनी माझे व्यक्तिचित्र (गणगोत छाप) लिहिले नाही त्यामुळे माझ्यावर त्यांचे कौतुक करायची सक्ती नाही. शिवाय परंतु एकवेळ पुलप्रेमी परवडले (काही अंशी तसे कुणीच नाही म्हणा), महाराष्ट्राचे साडेतिनावे लाडके व्यक्तिमत्त्व कणेकर आवडतात त्यामुळे तुम्हाला कोंडूऱ्याची तीस पारायणे करावी लागतील प्रायश्चित्त म्हणून.

आता या वयात त्या कादंबऱ्या मला वाचवतील का? >>>> नाही. आता श्रीमानयोगी मलाही आवडणार नाही. मृत्यूंजय परत वाचले नाही त्यामुळे मला स्वतःला आवडेल का अंदाज नाही. पुरंदरेलिखित राजा शिवछत्रपती आवडते.

मला पु. ल. आवडतात. त्यांची बरीच पुस्तके माझ्या संग्रही आहेत.
शिरीष काणेकरांच लिखाण पण आवडतं.
आता बऱ्याच वर्षात ह्या दोघांचही काही वाचलं नाही.

ह्या दोन लेखकांमुळे आणि बोक्या सातबंडे ह्या पुस्तकांमुळे मुलाला मराठीची गोडी खूपच लहान वयात लागली.
पुस्तकातले उतारेच्या उतारे त्याला पाठ असायचे.

करेक्शन - मला कणेकरांचं डोळे हे फिल्मी गडे आवडतं. त्यांचं सगळंच लेखन आवडतं असं नाही.

मी वाचलेली आणि मला आवडलेली एक कथा,
प्रथम लेखका विषयी.
Damon Knight. डॅमन नाईटची ओळख म्हणजे, "तोच ना, तो रस्त्यावर पुस्तक वाचत जाणारा?"
पण तसातो लेखक नव्हता. अन्थनी बाउचर निवृत्त झाल्यावर साय फाय आणि फँटसी कथांचा टीकाकार म्हणून वाचक त्याच्या कडे बघू लागले. अश्या ह्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या लेखणीतून उतरलेली ही कथा.
कथेचे शीर्षक आहे " हँडलर"
आता कथा थोडक्यात
नायक बार मध्ये प्रवेश करतो आणि वातावरण एकदम बदलते. पियानो बडवणारा हात आखडते घेतो. बिअरचे ग्लास हातात घेणारे सुंदर तरुण तरुण थबकतात. आपला नायक HANDSOMER THAN HANDSOMEST.
उंचापुरा देखणा हसतमुख. दोनी बाहूंवर दोन तरुणींचे गोड ओझे, कोणीतरी त्याच्या समोर मार्टिनीचा ग्लास ठेवतो. आता एक तरुणी मांडीवर आणि एक पाठी.
"पीट, कार्यक्रम कसा झाला?":
"झकास, स्पॉन्सर एव्हढा खुश झाला की अजून एक प्रोग्रॅम साईन केला."
एक टकलू समोर बसला होता," पीट जेव्हा तू ते फिश बाउल स्टेजवर टाकलेस तेव्हा माझा जीव टांगणीला लागला."
पीट गदगदून हसला. "हा हा , मी बघत होतो."
"पीट ते गाणे म्हण ना." सगळीकडून जोरदार आग्रह झाला.
"ओके ओके, पण संगीत ताल?"
ताबडतोब पियानो वाल्याने चार सूर छेडले.
बार मध्ये अशी धमाल चालली होती.
"इथे काही नवीन चेहरे दिसत आहेत. त्यांच्यासाठी मी माझ्या टीमची ओळख करून देतो."
हा म्युजिक डायरेक्टर. हा रायटर, हा अमुक हा तमुक...
"दोस्तहो तुमच्या शिवाय मी अधुरा आहे." पीटने सगळ्यांचे आभार मानले.
आणि तो निश्चल झाला.
"आणि माझ्या मित्रांनो आता माझ्या हँडलरची ओळख करून देतो."
पिटच्या पाठीतून पीटचे जाकेट फाडून एक बुटका माणूस बाहेर पडला. पीट इज व्हर्च्युअली डेड.
हा फ्रेड असणार, कुणीतरी कुजबुजले.
"अरे किती गरम आहे .कुणीतरी मला थंड द्या रे."
"काय घेणार? बिअर?"
लोकांचा उत्साह ओसरला आहे. जे उभे होते ते आता खाली बसले. काही जण दाराकडे सरकले. जायच्या तयारीत.
एक मुलगी उठून जायच्या तयारीत.
"रुथी, तू ते फिश बाउल पडताना बघितलेस. that was quite a moment there, क्या बोलतेस. "उम, फ्रेड काय बोललास? माझे लक्ष नव्हते."
"सोडून दे. विशेष महत्वाचे नव्हते ते,"
रुथी जवळ येऊन त्याच्या खांद्यावर थोपटते.
"फ्रेड, मी जरा घाईत आहे... नंतर केव्हातरी हा,"
आता फक्त तो टकलू आणि तो बटबटीत डोळ्याचा माणूस असे दोघेच त्याच्या जवळ बसले आहेत. बाकी सगळे पांगले आहेत.
फ्रेडने बोलायला सुरवात केली. "आता आपल्याला नवीन शोची तयारी क..."
टकलू, हा रायटर आहें, त्याने त्याला मधेच अडवले, "फ्रेड, मला वाटतय तू आता परत जायला पाहिजे."
बुटक्याने टकलू कडे पाहिले. त्याच्या डोळ्यात उदासीनतेची एक छाया तरळली.
एक आवंढा गिळून तो म्हणाला, "वेल मला वाटत होते की ह्या वेळेला तरी ..."
त्याच्याचाने पुढे बोलवेना. त्याने कशाचा तरी आधार घेतला, एकेक पाउल पिटच्या पोकळीत टाकले. काही जण बघत होते, बघ्यांच्या चेहर्यावर काहीही भाव नव्हते.
"ह्याही वेळेला मी हलकेच घेईन, दर वेळी घेतो तसा,"
पीट जागा झाला.
"अरे हे काय? तुम्ही गप्प का. चला मजा करुया, पार्टीमे जान डालो."
त्याने हाताने ठेका धरला,
पुन्हा वातावरण बदलले,
it was a great party, and everything was all right far into the night.
१९५३ सालची कथा.
ही साय फाय आहे,

मी कालच " Secret Window" नावाचा पिचर बघितला. स्टीफन किंग च्या ह्याच नावाच्या कथेवर बेतलेला आहे. जॉनी डेप ची प्रमुख भूमिका आहे. सिनेमा आवडला म्हणून पुस्तक वाचायला घेतले.
कथेच्या सुरवातीलाच अडकलो. प्रस्तावनेतच.
"And this story is, I think, the last story about writers and writing and the strange no man’s land which exists between what’s real and what’s make-believe."

"Last year I published The Dark Half, where I tried to explore the converse: the powerful hold fiction can achieve over the writer."
नायक लेखक आहे.
काही कारणामुळे तो शहर सोडून बाहेर जंगलात राहायला गेला आहे,
तिथे त्याला एक "पाहुणा" अनोळखी माणूस भेटतो आणि त्याच्या वर आरोप करतो की तू माझी कथा चोरली आहेस. पुढे काय होते?
त्यासाठी पुस्तक वाचा किंवा सिनेमा पहा.
साय्कॉलॉजिकल थ्रिलर आहे.

ManD ManDAnna, sci Fi
- Dichkoo
कुणी वाचली का?

दिवाळी अंकांचे मालक प्रकाशकच ठरवतात कोणतं साहित्य छापायचं, घ्यायचं आणि कोणतं नाही. ज्यांचा कारभार प्रचंड आहे त्यांच्याकडे पगारी संपादक असतात. सगळेच आलेले लेखन मालक कसे वाचणार दोन महिन्यांत?
त्यामुळे फार नाराज होऊ नये लेखकांनी. ( हे माझे ठाम मत आहे.) बाकी थोड्याच लेखकांना अंकातर्फे यावर्षीच्या अंकासाठी लेखन पाठवाचा निरोप जात असेल.

कोसला - ऐकायचं असेल, वाचायचं नाही, ऐकायचं असेल तर स्टोरीटेलवर गिरीष कुलकर्णीने फारच मस्त वाचलेले आहे.
सध्या ह्या लेखकरावांची मुक्ताफळे बघता पांडुरंग सांगवीकर सारखा यांचा ही आता गावातला निस्तेज रहाटगाडगे हाकणारा बोटचेपा पांड्या झालाच आहे, ते ही एक वर्तुळ पूर्ण झालं आहे.

पण पुस्तक ऐकताना फार मजा आली. गिकुने जसं बेपर्वाईने, लहेजा सांभा़ळून, कुठे गाणं वगैरे आलं तर तशा पद्धतीने फार सुरेख वाचलं आहे.

>> लेखकरावांची मुक्ताफळे <<

नेमाडे काहीही चुकीचे, असंबद्ध किंवा विस्कळीत बोललेले नाहीत. नेमाडे संदर्भाशिवाय काही बोलत नसतात. हिंदू मराठी मधली नि:संशय श्रेष्ठतम कादंबरी आहे. विस्तृत आशय असलेल्या, स्वतःची भाषा असलेल्या (मृत्युंजय छाप एपिक फिक्शन, स्वामी छाप ऐतिहासिक फिक्शन नसलेल्या) अशा कादंबरीच्या लाखाच्या वर प्रती खपण्याचे भाग्य खूप कमी लेखकांना लाभते.
हिंदुत्वखोरांच्या सभेत हिंदुत्वाची संकुचित व्याख्या करू नका असे थेट सांगणाऱ्या नेमाडेंचे कौतुकच करायला पाहिजे.
आता मी हिंदूचे पुनर्वाचन करणार.
म्हातारं हिंदूचे पुढचे भाग येणार येणार असं सगळीकडे सांगत फिरतेय. जाता जाता मराठी साहित्यविश्वावर काहीतरी मेगा प्रॅक्टिकल जोक (प्रँक) करून जायचं प्लॅनिंग करतय का कुणास ठाऊक.

Pages