मी वाचलेले पुस्तक -४

Submitted by भरत. on 9 April, 2026 - 01:44

आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.

आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेफ्टनंट जनरल के जे एस "टायनी" ढिल्लों ह्यांचे कितने ग़ाज़ी आए और कितने ग़ाज़ी गए हे आत्मचरित्रपर पुस्तक. आईचे छत्र लहानपणी हरवलेला एक पंजाबी पोरगा, मातुल घरी उत्तम संस्कार होणे, चांगले शिक्षण तिथून NDA आणि आर्मी मध्ये पूर्ण प्रवास करून भारतीय थलसेनेच्या सर्वाधिक डिमांडिंग असणाऱ्या पंधरा कोअर (XV Corps) उर्फ चिनार कोअरचा कमांडिंग ऑफिसर म्हणून निवृत्त होतो त्याची कथा. एका सैनिक, एक प्रेमळ पोरगा/ नातू, एक प्रेमळ पती, एक प्रेमळ बाप अशा सगळ्यांची एकत्र केलेली कथा.

चुकून तीन नंबरच्या धाग्यावर लिहिले होते. इथे पुन्हा लिहितो Proud

प्रकाशफुलाचं बियाणं नावाचा आता विनय हर्डीकरांवर इतरांनी लिबिलेल्या लेखांचा (गौरव्)ग्रंथ प्रकाशित होत आहे (देशमुख आणि कं).
इतके वर्ष स्वतः हर्डीकरांनी स्वतःवर लिहिले. आता त्यांनी दुसर्‍यांना सन्धी दिलेली दिसते.
रॉयची प्रतिक्रिया वाचायला पाहिजे आता

@ टवणे सर,

स्पॉयलर तर मी देणार नाही नक्कीच पण त्यांचे नाव "टायनी" का पडले ही एक मजेशीर कथा आहे जी तुम्हाला वाचायला मिळेल.

सॉरी. चौथा धागा नवीन ते कळलं नाही.

मारुती चितमपल्ली ###१

शब्दांच धन

मारुती चितमपल्ली - अरण्यऋषी
समीकरण ऐकून माहित होतं.
पण गेल्यावर्षी मारुती चितमपल्ली यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी समाज माध्यमांवर इतकं भरभरून वाचायला मिळालं आणि त्यांनंतर खरंतर मी संभ्रमात पडले - इतका मोठा माणूस, इतका लोकप्रिय लेखक आणि आपल्याला केवळ
त्यांचं आणि जंगलाचं कनेक्शन येवढच माहिती आहे आणि ते सुद्धा शाळेत त्यांचा एक धडा होता त्यामुळे.

त्या सखेद आश्चर्यातून मग त्यांच्या अनेक मुलाखती ऐकल्या/ बघितल्या.
त्यांचं वनाधिकारी/ वन्यप्रेमी म्हणून असलेलं पशु, पक्षी, झाडं अरण्य यांविषयीचं ज्ञान थक्क करणारं आहेच. पण त्याव्यतिरिक्त त्यांनी मराठी भाषेला दिलेले शब्दकोश, मराठीत लिहिलेले विपुल साहित्य, त्यासाठी त्यांनी केलेली तपश्चर्या, त्याचं अफाट वाचन, व्रतस्थ- साधं जीवन, विनम्रता असे कितीतरी पैलू समोर येत गेले.
अजून एक गोष्ट त्यावेळी समोरी आली ती म्हणजे,
फॉरेस्ट ऑफिसर किंवा वनअधिकारी ते एका प्रतिथयश लेखकापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक मान्यवर लेखकांच्या, साहित्यिकांच्या मार्गदर्शनातून घडला आहे.

त्यातच दोन एक महिन्यांपूर्वी ‘शब्दांच धन’ हे त्यांचे पुस्तक हाती पडलं.

शब्दांच धन’

हे पुस्तक म्हणजे त्यांच्या साहित्यिक प्रवासातील वाटेवर त्यांना भेटलेले अनेक मार्गदर्शक, लेखक, साहित्यिक, पक्षीतज्ज्ञ, प्रणिततज्ञ, ग्रंथ, वृक्ष ज्यांनी ज्यांनी त्यांना समृद्ध केलं.. त्या सगळ्यांवर लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे.

या लेखन प्रवासाची सुरुवात ज्यांच्याकडून प्रेरणा घेऊन झाली त्या गो. नी. दांडेकरांना त्यांनी गुरु मानलं. आणि त्यांना हे शब्दांच धन अर्पित केलं आहे.

मातृभाषा तेलगु असताना मराठीमध्ये लेखन कसे करावे हे शिकायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनेक जुन्या ग्रंथांचा अभ्यास केला.
संस्कृत भाषा मुळातून पाठशाळेत जाऊन शिकले. त्याचबरोबर जर्मन आणि रशियन भाषेचाही त्यांनी अभ्यास केला.
अनेक भाषांमधील अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी ज्ञान मिळविले, नेटके कसे लिहावे याकरता अनेक थोर लेखकांचे साहित्य वाचून, त्याचे रसग्रहण करून किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन त्यांची स्वतःची अशी लेखन शैली तयार झाली

वाचत असताना जाणवले की एखाद्या तपस्याप्रमाणे अनेक वर्षांची साधना करून अरण्यऋषी पद त्यांनी कमावले आहे.

या पुस्तकात पक्षीतज्ञ डॉ सलीम अली , व्यंकटेश माडगूळकर, जी. ए, नरहर कुरुंदकर, जयवंत दळवी यांसारखे अनेक लेखक/ साहित्यिक, जे कृष्णमूर्ती, रामदास स्वामी, पक्षी शास्त्रज्ञ अरिस्टॉटल, चित्रकार आलमेलकर, त्याशिवाय अनेक ग्रंथराज, वृक्ष , जेन गुडाल, जॉय ॲडमसन यांसारख्या वन्य/ प्राणीप्रेमा खातर आयुष्य वाहून घेतलेल्या व्यक्ती… असे कित्येक जण त्यांच्या नजरेतून आपल्याला भेटत जातात.. या सर्वांनी त्यांना शब्दांच धन वेचायला मदत केली.

हे शब्दांच धन जोडताना त्यांनी विपुल ग्रंथ संपत्तीही गोळा केली होती. पुस्तकात एके ठिकाणी उल्लेख येतो..
“ त्यावेळी जवळ थोडेसे पैसे होते. त्यामुळे त्यांना सापडलेला एक दुर्मिळ ग्रंथ किंवा पत्नी-लेकीची खरेदी यातील एकच करणे शक्य होते.. तेव्हा पत्नी आणि लेकीने दाखवलेला समजूतदारपणा ज्यामुळे तो ग्रंथ त्यांच्या संग्रही आला.”
तेव्हा एकमेकांविषयी आदर, जिव्हाळा असलेलं त्या तिघांचं कुटुंबही नकळत भेटून जात.

२५ पुस्तकांव्यतिरिक्त लिहिलेले पक्षीकोश, वन्य पशुकोश अथवा मृगकोश, मत्स्यकोश, वृक्षकोश म्हणजे त्यांनी मराठी भाषेला दिलेला अमूल्य ठेवा आहे.

जाणवतं, हे (शब्दांच) धन त्यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांवर उधळले.. आणि त्यांना समृद्ध करून सोडले..!

जंगलांबद्दल मराठी जनांना शिकवणारे लोक म्हणजे गो नि दांडेकर, मारुती चितमपल्ली आणि व्यंकटेश माडगूळकर. तिघांच्या तीन शैली, गोनिदा सहज निर्भेळ, चितमपल्ली स्थितप्रज्ञ भावनांना काटेकोर वैज्ञानिक आणि माडगूळकर म्हणजे अरभाट रमता जोगी अंदाजात !

वॉकिंग ऑन द एज- लेखक प्रसाद निक्ते, समकालीन प्रकाशन.
भन्नाट पुस्तक आहे. उत्तरेकडच्या, महाराष्ट्र-गुजरात-मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या, सातपुड्यातल्या 'भराड' गावापासून सुरुवात करून दक्षिणेकडे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवरच्या चोर्ला घाटापर्यंत, मुख्यतः सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून सलग ७५ दिवस केलेल्या वाटचालीची ही कथा आहे.
हे वाक्य लिहितानाच मला दम लागला! Happy
हे नुसतं चालणं नव्हतं, तर अनेक वर्षं उराशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरवणं होतं. त्यामागे खूप मोठं नियोजन होतं. या नियोजनाचं श्रेय निक्ते यांनी सुहास जोशी या मित्राला दिलं आहे. एक अख्खी 'टीम' या मोहिमेसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.
या ७५ दिवसांत काही वेळा लॉजवर राहिलेले दिवस वगळले, तर बहुतेक सगळ्या रात्री त्यांनी कुठल्या ना कुठल्या गावात, कुणाच्या तरी घरी मुक्काम केला. कुणाच्या ना कुणाच्या तरी घरी जेवण केलं. सातपुडा असो किंवा सह्याद्री, या डोंगरांमधे राहणाऱ्या साध्यासुध्या माणसांच्या पोटातली माया त्यांनी अनुभवली. एखाददुसरा अनुभव वगळता बाकी सगळे अनुभव चांगलेच आले.
प्रसाद निक्ते यांची लिहिण्याची शैली मला खूप आवडली. एकदम प्रामाणिक, खुसखुशीत, तरीही काहीशी घरगुती, सहज अशी ही शैली आहे. मोहिमेच्या शेवटी शेवटी आलेला कंटाळा, मधे लोणावळ्याजवळ असताना आपण ठाण्यापासून, म्हणजे आपल्या घरापासून आत्ता सर्वात जवळच्या बिंदूवर आहोत, इथून पुढे परत लांब जाणार, या जाणिवेने आलेला 'होमसिकनेस' त्यांनी एकदम प्रांजळपणे लिहिला आहे. कुठेही कसलंच वायफळ उदात्तीकरण अजिबात नाही! भावनांचे अनावश्यक उमाळेही नाहीत.
इतकं प्रचंड अंतर (एक हजार किलोमीटर) उत्तर-दक्षिण चालताना, बदलणारा निसर्ग दिसतो, बदलणारी भाषा कानावर पडते, प्रदेशानुसार लोकांची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते. हे सगळं डोळसपणे पाहणं चालणाऱ्या माणसाला समृद्ध करतं. सह्याद्रीच्या पठाराच्या काठाने चालत, खालच्या कोकणातला प्रदेश पाहणं, रायगडासारखे किल्ले, कोयनेचा विस्तीर्ण जलाशय पाहणं ही कल्पनाच रम्य आहे. अनेक वर्षे ट्रेकिंग करताना प्रसाद निक्ते यांच्या मनात ही कल्पना रुजली होती. पण एका क्षणी ती प्रत्यक्षात आणण्याचं त्यांनी ठरवलं आणि मित्रमंडळींच्या आणि त्यातून तयार झालेल्या आपल्या टीमच्या साहाय्याने ही मोहीम पूर्ण केली.
मोहीम सुरू असताना दर आठवड्याला ते 'लोकसत्ता'मधे लेख लिहीत होते. पण हे पुस्तक म्हणजे त्या लेखांचं संकलन नाही. मोहीम संपल्यावर सहा वर्षांनी लिहिलेलं, मनात तो अनुभव 'मुरल्यावर' लिहिलेलं हे पुस्तक आहे. मनात आयुष्यभर जपून ठेवावा असाच हा अनुभव आहे. पुस्तकही नक्की वाचावं, असंच आहे!

Unnatural Selection: Choosing Boys Over Girls and the Consequences of a World Full of Men वाचलंय का कुणी?
रेको असेल तर वाचायला घेईन.

वॉकिंग ऑन द एज खूप इंटरेस्टिंग दिसते. अमेरिकेत अ‍ॅपलेशियन ट्रेल आहे तसे वाटते. या व्यक्तीने अशीच एक दुसरी सह्याद्री वर ट्रेल केली होती का? असेच काहीतरी आधीही वाचल्यासारखे वाटते.

नक्कीच इंटरेस्ट आहे वाचण्यात.

असेच काहीतरी आधीही वाचल्यासारखे वाटते. >>>> ह्याच पुस्तकाबद्दल ललिताने लिहीले होते बहुतेक. मी आणलं आहे नुकतच. वाचेन आता. छान परिचय वावे.

ओह मग बरोबर आहे. मला इथेच वाचल्यासारखे वाटत होते.

परवा इथे एका ९१ वर्षाच्या माणसाने अ‍ॅपलेशियन ट्रेल केल्याचे वाचले.

ह्याच पुस्तकाबद्दल ललिताने लिहीले होते बहुतेक. >>>

मी त्यावर नाही लिहिलेलं.... कारण मी त्या पुस्तकाचं कॉपी-एडिटिंग केलंय.
पण पुस्तक खरंच छान आहे. Proud

पराग, वाचलंस की नक्की लिही.

थँक्स फारएण्ड, पराग.
फारएण्ड, मी लिंक 'इन ट्यून विथ द ट्यून'ची आहे का? Proud ( मी अजून क्लिक करून बघितलं नाही. )

@वावे वॉकिंग ऑन द एज बद्दल वाचताना कायम लेविसन वूड ह्या ब्रिटिश एक्सप्लोरर आणि लेखकाची आठवण येत होती.

प्रसाद निक्ते जसे सातपुडा + सह्याद्री पायी चालले तसा हा अवलिया जगभर चालला आहे, ह्याचे काही फेमस प्रवास म्हणजे वॉकिंग द अमेरिकाज (नॉर्थ ते साऊथ अमेरिका पायी) , वॉकिंग द नाईल (नाईल नदी उगम ते अलेक्झांड्रिया) , फ्रॉम रशिया टू ईरान (पूर्ण कॉकेशस पर्वतराजी पायी चालत रशिया, डागेस्तान, अझरबैजान, आर्मेनिया करत ईरान मध्ये प्रवास संपवणे) . ह्याचा एक प्रवास वॉकिंग द हिमालयाज सुद्धा आहे गडी अफगाणिस्तान पासून सुरू करतो, मग भारत पाक बॉर्डर पर्यंत येतो तिथून माघारी वळतो, परत भारतात येतो, काश्मीर मधल्या शेवटच्या गावी जातो अन् तिथून चालत वाया नेपाळ अरुणाचल पर्यंत जातो.

images (40)_1.jpeg

वॉकिंग द हिमालयाज.

फारएण्ड Lol
जेम्स वांड, इंटरेस्टिंग आहे.
sneha1, अरे वा.. वाचायला सुरुवात केली पण!

फा Proud
काल टाइप करताना तेच आठवलं होतं.

>> प्रकाशफुलाचं बियाणं <<

नावातच विनय असणाऱ्या माणसाबद्दल आता कायच बोलावे? पुस्तक एक नेसेसरी ईविल म्हणून वाचावेच लागेल टवणे सर!

महाअनुभव चे ऑगस्ट आणि सप्टेंबर-२०२६ चे दोन अंक वाचले. श्रीनिवास जोशींचे 'चतकोर शतकाच्या पाऊलखुणा' आणि मृद्गंधा दीक्षितचं 'केऑसच्या जंगलात सई आणि तिची पिढी' हे दोन प्रकार विशेष आवडले.

जेम्स वांड - तुमच्यामुळे या ब्रिटिश राज मधल्या ब्रिटिशांच्या जीवनावरील एक दोन पुस्तके आणली आहेत. वाचून झाली तर लिहिन

@टवणे सर, नक्की वाचा आणि आवर्जून लिहा.

ब्रिटिश कलोनियल इतिहास सुरू होतानाचा काळ खूप इंटरेस्टिंग आहे. कारण हा भारतीय इतिहासातील असा कालखंड आहे ज्यात civilizational continuity सोडून नवीन संस्कृतींशी interaction झाले आहेत. मजा वाटते वाचायला, अर्थात त्याकाळी आपल्या असंख्य देशबांधवांना गुलामीत रहावे लागत होते हे फॅक्ट आहेच.

नुकतंच इंदिरा गांधी ह्यांचं सागरिका घोष ह्यांनी लिहिलेलं चरित्र वाचलं.
ह्या आधी कॅथरिन फ्रँक आणि पुपुल जयकर ह्यांनी लिहिलेली चरित्र वाचली आहेत त्यामुळे खूप वेगळं काही हातात नाही आलं पण माझी उजळणी झाली.
अफाट व्यक्तिमत्व होतं इंदिरा गांधींचं.
चांगलं लिहिलं आहे चरित्र.

इंदिरा - इंदिराच तुलनाच नाही ! बाई जगल्या असत्या तर जबर झाले असते, तसेही भक्तांना जिला उठसुठ बदनाम करावे वाटते ती व्यक्ती चांगलीच असते एकंदरीत.

इंदिरा गांधींच्या चरित्रात मी सगळ्यात अस्सल पुपुल जयकारांचे पुस्तक मानतो. शेवटी जवळच्या मैत्रिणीने मांडलेली इंदिरा सगळ्यात जास्त भावली मला तरी.

>>>>>> पुपुल जयकारांचे पुस्तक मानतो. शेवटी जवळच्या मैत्रिणीने मांडलेली इंदिरा सगळ्यात जास्त भावली मला तरी.
ओह!! मिळाल्यास वाचेन. मैत्रिण म्हटल्यावरच्या दृष्टीकोनाचा प्रश्नच नाही. किती प्रेम, आदर आणि सखीभाव असेल. म्हणजे असायला हवा Wink

पुपुल जयकरांचं 'इंदिरा गांधीं' हे चरित्र गेल्या वर्षी वाचलं होतं. पुस्तक हातातून ठेवावसं वाटतं नव्हतं. जवळची मैत्रीण असल्याने पुपुल जयकरांनी इंदिरा गांधींचा निव्वळ राजकीय प्रवास पुस्तकात मांडला नसून त्यांचं वैयक्तिक आयुष्य अतिशय जवळून पाहिलेलं असल्याने इंदिरा गांधी यांच्या मनातील आंदोलने, त्यांची स्वप्ने, त्यांचे खाजगी जीवन आणि त्यांच्या राजकीय आणि खाजगी आयुष्यातले ताणतणाव पुस्तकात अतिशय प्रभावीपणे मांडले आहेत. पुस्तक आवडलं होतं मला..!

सध्या भैरप्पांचे ' काठ ' आणि गो. नी. दांडेकरांचे ' जैत रे जैत ' हि दोन पुस्तके लायब्ररीतून आणून ठेवल्यात .. वाचायला मुहुर्त मिळत नाहीये..

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ChatGPT) वापर करून या धाग्यावरील टॉप-१० पुस्तके व त्यांबद्दल येथील सदस्यांचे मत शोधण्याचा प्रयत्न केला. चांगला परिणाम मिळाला. पुढील लिंक मध्ये हि माहिती आहे.
https://chatgpt.com/share/6aa40e14-8278-83ee-b595-4930eb18f32f

माबो वाचक, उत्सुकतेपोटी तुम्ही दिलेली लिंक वाचली.

एक महत्त्वाचा निष्कर्ष
या धाग्याची गंमत अशी आहे की “सर्वांना आवडणारी लोकप्रिय पुस्तके” अशी यादी इथे तयार होत नाही. सदस्यांची अभिरुची बरीच गंभीर आणि विविध आहे—मराठी साहित्य, चरित्रे, सामाजिक इतिहास, विज्ञान, SF, horror, travel writing, अनुवाद, राजकीय इतिहास इत्यादी.

हे फारच आवडलं.

Pages