लहानपणापासून ते आतापर्यंत वाचन हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. बालपणी त्याची सुरवात छोट्याशा रंगीबेरंगी गोष्टीच्या पुस्तकांनी झाली. पुढे माध्यमिक शाळेत अभ्यासेतर अवांतर वाचन चालू झाले. तेव्हापासून ते थेट कमावता होईपर्यंत जे काही असे वाचन झाले त्यासाठी विविध वाचनालयांचा आधार घेतला. पुढे कमावता झाल्यानंतर काही प्रमाणात पुस्तक खरेदी करीत राहिलो. तरीही पुस्तकांचा मुख्य स्त्रोत हा वाचनालय हाच राहिला होता. ३०-४० वर्षांपूर्वी वाचनालये ही सुसंस्कृत शहरांचे वैभव असायची. आज त्यांचे प्रमाण आणि सर्वसाधारण दुरवस्था आपण जाणतोच. त्या अनुषंगाने माझा आजपर्यंतचा वाचनालय-प्रवास आणि तिथले काही अनुभव सादर करतो. ते वाचकांना रोचक वाटतील अशी आशा आहे.
माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर मोठ्या व आकर्षक अक्षरात लिहिलेले ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन नजरेत भरे. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. त्या काळात वयानुरूप असे वाचन झाले, जसे की अद्भूत गोष्टी, प्रवासवर्णने, इ. तिथल्या कपाटांत काही भले मोठे ग्रंथ देखील रचून ठेवलेले असायचे. ‘गीतारहस्य’, ‘ कर्हेचे पाणी ’सारखी पुस्तके लांबून पाहिली पण त्यांना हात लावायचे काही धाडस झाले नाही. एका नियतकालिकाने मात्र तेव्हा चांगलेच आकर्षून घेतलं होते. त्या मासिकाचे नाव ‘अमृत’. त्याच्या मुखपृष्ठावर ‘ज्ञान आणि मनोरंजन’ हे ब्रीदवाक्य अगदी ठळकपणे लिहीले असायचे. त्या वाक्यास अनुसरून सर्व वयोगटांना आवडेल असे काही ना काही त्यात होते. पुढे मोठे झाल्यावर समजले की अमृतला मराठीतील ‘डायजेस्ट’ (RD च्या धर्तीवर) म्हटले जाई. हे मासिक सुमारे ६३ वर्षे चालल्यावर बंद पडले तेव्हा हळहळ वाटली. माझ्या शालेय वयात वाचायला सुरवात केलेले हे मासिक मी माझ्या मुलांचे कॉलेजचे शिक्षण संपून गेल्यावरही वाचत होतो. इतका त्याचा दीर्घ सहवास होता.
त्या वयात असेच एकदा रस्त्याने भटकत होतो आणि एक मित्र भेटला. म्हणाला, काय करतो आहेस ? मी म्हणालो, काही खास नाही. त्यावर तो म्हणाला की चल माझ्याबरोबर, आपण जरा पुस्तके पाहू आणि वाचत बसू. तिथे जवळच एका इमारतीवर ‘शासकीय विभागीय ग्रंथालय’ अशी भली मोठी पाटी होती. मी जरा बुचकळ्यात पडलो आणि त्याला सांगितले, की मी काही याचा सभासद नाही. त्यावर तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, “अरे येड्या, मी तरी कुठे आहे. अरे, हे नुसते तिथे बसून वाचायला फुकट असते, अगदी कुणाला पण !” तेव्हा मला अगदी धक्काच बसला होता. जनतेसाठी असे फुकटचे वाचनालय असू शकते, हे प्रथमच समजले. मग आम्ही तिथे आत गेलो. एका मोठ्या नोंदणी वहीत फक्त आपले नाव, पत्ता आणि आल्याची वेळ असे लिहायचे होते. आत खूप मोठी जागा, त्यात असंख्य पुस्तके मांडून ठेवलेली होती. ते बघून अगदी हरखून गेलो. ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांची सूची देखील बघायला उपलब्ध होती. पुन्हा ३-४ कर्मचारी आपल्याला हवे ते पुस्तक शोधून देण्यासाठी हजर होते. एकंदरीत त्या ग्रंथालयावर खूष झालो.
पुढे लवकरच घरच्यांनी त्याचे सभासदत्व घेतले, जे अगदी नाममात्र शुल्कात मिळाले आणि ते शुल्कही फक्त एकदाच भरायचे होते ! इथली बहुतेक पुस्तके जुनीपानी होती. अगदी नवे पुस्तक मी क्वचितच पाहिले. आपल्याला हवे ते पुस्तक मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीत नाव नोंदवण्याची सोयही होती. पण त्या योजनेचा अनुभव यथातथाच आला. कालांतराने शासनाने तो कायम- सभासदत्व प्रकार रद्द केला. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी काही अटी घातल्या – अमुकतमुक दाखला जोडा वगैरे. तसेही एकूण त्या वाचनालयावर कायम (सरकारी) उदासीनतेची छाया असायची. मग मी त्या वाचनालयाला रामराम करून टाकला. पण त्याला मला एक मोठे श्रेय नक्की द्यावे लागेल. माझ्या किशोरावस्थेतील वाचनाची बैठक या ग्रंथालयामुळे झाली. तत्कालीन दिग्गज लेखक – अत्रे, खांडेकर, फडके, इत्यादी हे वाचायला लागलो. त्याचे स्वतःला फार अप्रूप वाटायचे. अत्र्यांची नाटके वाचताना उत्स्फूर्तपणे मोठमोठ्यांदा हसू आलेले आजही आठवते.
आता आमच्या कुटुंबाने वाट धरली एका खाजगी वाचनालयाची. ते तर प्रेमात पडावे असेच होते. सुसज्ज दुमजली इमारत आणि प्रसन्न वातावरण. तिथे एका वेळेस दोन पुस्तके मिळायची. मग एक मोठ्यांसाठी तर एक मुलांसाठी आणले जाई. मोठ्यांचे बहुतेक करून असायचे एखादी रहस्य कादंबरी, तर मुलांसाठी ऐतिहासिक, बोधप्रद वगैरे ! मला आजही त्या रहस्यकथांची पुस्तके आठवतात. तेव्हा बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक ही मंडळी जोरात होती. कुणाच्या ‘झुंजार’ तर कुणाच्या ‘गरुड’ कथा असायच्या. आमच्या घरी मात्र हे असले काही मुलांना वाचायला बंदी होती. आता कुठलीही बंदी घातली की चोरटा उद्योग सुरु होणारच की ! सगळे मोठे घराबाहेर गेले की हळूच त्या रहस्यकथांवर झडप घातली जाई. कधीकधी तर मोठे घरात असतानाही आम्ही अभ्यासाच्या पुस्तकात ते पुस्तक लपवून वाचत असू. आजही मला त्या पुस्तकांतील शृंगार वर्णने, नग्नता आणि हिंसा व्यवस्थित आठवते. हे असले काही आम्ही त्या वयात वाचू नये, यासाठी मोठ्यांचा तो आटापिटा. आता हे वाचून सध्याची मुले तर खो खो हसतील की नाही? असो. जी पुस्तके आम्ही वाचावीच असा मोठ्यांचा आग्रह होता त्यानुसार नाथमाधवांचे ऐतिहासिक ठोकळे आणि भा रा भागवतांची अनेक पुस्तके डोळ्यांखालून गेलेली आठवतात. शेरलॉक होम्सचे अनुवाद प्रा. भालबा केळकरांनी केलेले असल्याने ही पुस्तके मुलांसाठी अगदी ‘कुटुंबमान्य’ अशी होती.
अशा तऱ्हेने हे सुंदर ग्रंथालय इयत्ता १०वीची उन्हाळी सुटी संपेपर्यंत उपभोगता आले. पुढे ११वीत विज्ञान शाखेला गेल्यामुळे “आता २ वर्षे फक्त अभ्यास एके अभ्यास, आता बास झाली गोष्टींची पुस्तके”, असा वटहुकूम घरून निघाला. तो गुमान आचरणात आणावा लागला.
यापुढचा दीर्घ शैक्षणिक टप्पा होता वैद्यकीय महाविद्यालय. त्या अभ्यासाचे एक वैशिष्ट्य असते. आता एका विषयासाठी फक्त एकच पुस्तक असे वाचून चालत नाही. अनेक संदर्भग्रंथ चाळावे लागतात. मग वरिष्ठांनी सल्ला दिला की आता ‘ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी” (बीसीएल, सध्या फक्त ब्रिटीश लायब्ररी म्हणतात) लावलीच पाहिजे. त्याची एक विशेष आठवण सांगतो. तेव्हा या ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना सभासदत्व घेताना, कॉलेजच्या प्राचार्यानी दिलेला ‘चांगल्या वर्तणुकीचा’ दाखला देणे आवश्यक होते. त्या धोरणाला एक सामाजिक घटना कारणीभूत ठरली होती. तेव्हा महाराष्ट्रात एक भयानक हत्याकांड घडले होते. त्यातील आरोपींनी पोलीस जबाबात सांगितले होते, की खून करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी ‘बीसीएल’ मधील पुस्तकांतून वाचल्या होत्या !
अशा प्रकारे सर्व सोपस्कार करून बीसीएलचे सभासदत्व घेतले. विद्यार्थ्यांसाठी शुल्कात थोडी सवलत होती. अतिशय शिस्तबद्ध आणि नीटनेटके असे हे ग्रंथालय होते. इथे अर्थातच फक्त ब्रिटीश साहित्य ठेवले होते. त्यात अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्याचाही समावेश होता. बऱ्याच जगप्रसिद्ध इंग्लीश लेखकांची पुस्तके उपलब्ध होती. सभासदाला एका वेळेस ३ पुस्तके मिळत आणि ती २६ दिवसांत परत करायची असत. ही मुदत टळून गेल्यास दर दिवसाला ठराविक दंड होता (बहुतेक १-२ रुपये). तो दंड भरण्यासाठी मुख्य काउंटरवर एक मजेदार सोय होती. एका टेबलावर २ इंच आकाराची खाच पाडलेली होती. त्यातून दंडाची रक्कम टाकायची असायची. यातून त्यांनी पावती फाडा वगैरे कारकुनी वाचवली होती. या खाचेचे तेव्हा फार अप्रूप वाटले होते. ग्रंथालयातील शांतता वाखाणण्याजोगी होती. जरी बरेच मराठी भाषिक इथले सभासद असले, तरी इथे असणाऱ्या ग्राहक आणि कर्मचारी यांनी एकंदरीत देहबोलीतून ‘इंग्लीश वातावरणाचा’ आभास निर्माण केलेला असायचा ! आपल्याला हवे ते पुस्तक मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादीची सोय अर्थातच होती आणि आपला नंबर लागल्यावर शिस्तीत त्यांचे पोस्टकार्ड घरी येई.
हे ग्रंथालय शहरातील प्रतिष्ठित भागात होते. त्याच्या आजूबाजूस एक प्रसिद्ध कॉलेज आणि खास खवय्यांची उपाहारगृहे होती. एकूणच त्या वातावरणात तरुणाई नुसती सळसळत असायची. तेव्हा पुस्तकांच्या २६ दिवसांच्या मुदतीची कोण वाट पाहत बसणार? दर १५ दिवसाला इथे चक्कर मारणे नक्कीच सुखावह होते. पुस्तके घेण्याबरोबरच तिथली रंगीबेरंगी तरुणाई ‘वाचणे’ हाही आम्हा मित्रांचा एक कार्यक्रम असायचा !
सुमारे ५ वर्षे मी या ग्रंथालयाचा सभासद होतो. त्या काळात ठरवून ३ इंग्लिश लेखकांचा फडशा पाडला. ते लेखक असे:
१. शेक्सपिअर
२. सॉमरसेट मॉम
३. पी. जी. वुडहाउस
शेक्सपिअरबद्दल मनात खूप कुतूहल होतेच आणि आता तर सुरेख संधी चालून आलेली. त्यांची तिथे असलेली बहुतेक नाटके वाचली. वाचन अजिबात सोपे नव्हते. वाचताना you shall विसरून जायचे असते आणि thou shalt ची सवय लावावी लागते !
सॉमरसेट मॉम यांच्याबद्दल दोन कारणांनी कुतूहल होते. ते स्वतः वैद्यकीय पदवीधर होते पण त्यांनी लेखन हाच व्यवसाय केला. अजून एक कारण असे. माझे एक नातेवाईक मराठी कथालेखक होते. ते स्वतःला मार्गदर्शक म्हणून
मॉम यांची पुस्तके वाचत. त्यांनी मला एकदा वाढदिवसाला मॉमचे पुस्तक भेट दिले होते. त्यामुळे ती उत्सुकता. मॉम त्यांच्या कथांतून वाचकाला जगाच्या पश्चिम ते पूर्व अशा दोन्ही टोकांना नेऊन आणत. तसेच मानवी स्वभावाचे अनेक पैलू छान उलगडून दाखवत.
पी. जी. वुडहाउस हे प्रसिद्ध विनोदी लेखक. मला काही बुजुर्गांनी सांगितले, की ज्यांना पुलं आवडतात त्यांनी ‘पीजी’ जरूर वाचावेत. म्हणून मग त्यांची पुस्तके आवडीने वाचून काढली. तो अगदी प्रसन्न विनोदाचा शिडकावा असतो. त्यातल्या ‘जीव्ज’ या व्यक्तीच्या तर आपण प्रेमातच पडतो.
अशा तऱ्हेने ‘बीसीएल’ चे हे तारुण्यातील गोडगुलाबी दिवस मजेत गेले. त्यातून इंग्लीश साहित्याची झलक चाखता आली. पदवीचे शिक्षण संपल्यावर माझे राहायचे ठिकाणही बदलले होते. तिथून हे ग्रंथालय फारच लांब असल्याने आता ते बंद केले.(अलीकडे हे ग्रंथालय निव्वळ छापील पुस्तकांचे राहिलेले नसून तिथे अनेक इ-सुविधाही उपलब्ध असतात). माझ्या तेव्हाच्या ५ वर्षांच्या कालावधीत वेगळे मराठी वाचनालय लावायला मात्र घरून परवानगी नव्हती कारण इथले शुल्क बऱ्यापैकी होते. मग मित्रपरिवारात जी काही मराठी पुस्तके होती, ती एकमेकांत फिरवून वाचत असू. अशा या ‘फिरत्या’ आणि फुकट वाचनालयातून काही वाचन झाले. त्यापैकी ‘ययाती’ आणि ‘कोसला’ आठवतात. हा लेख लिहिताना कोसलामधल्या ‘लायब्री’ ची आठवण येणे अपरिहार्य आहे !
पुढे लग्नानंतर शहराच्या उपनगरात स्थिरावलो. आता सांसारिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असल्याने वाचनालय घरानजीकचेच शोधणे भाग होते. असेच फिरताना त्याचा शोध लागला. आमच्या जवळच्याच एका गृहसंकुलात एका कुटुंबाने त्यांच्या घरातच वाचनालय चालवले होते. त्या जोडप्यातील गृहस्थ नोकरीत होते आणि त्यांची पत्नी गृहिणी. आपल्या ३ खोल्यांच्या सदनिकेतील बाहेरच्या खोलीत त्यांनी वाचनालय उभे केले होते. दिवसातील ४ तास ही खोली ग्राहकांसाठी उघडी असायची. त्यांच्या या पुस्तक प्रेमाबद्दल मला मनापासून कौतुक वाटले. त्या जागेच्या मर्यादेत त्यांनी जी पुस्तकांची निवड केली होती ती पांढरपेशांना अगदी अनुरूप होती. त्यामध्ये ‘पुलं- वपु -हमो- सुशि’ अगदी उठून दिसणारे होते. जोडीला नारायण धारप- रत्नाकर मतकरी हे गूढखाद्यही होते. त्याचबरोबर ‘व्यंमा- दमा- शंपा’ यांचाही एक सुरेख कप्पा होता. उच्च मध्यम वर्गाला आवडणारे खुशवंतसिंगांचे अनुवादित साहित्यही इथल्या संग्रहाला चविष्ट बनवायचे. वपुंचे एखादे नवे पुस्तक जर आपल्या हाती ६ महिन्यांनी पडले, तर त्यात त्या खास ‘वाक्यां’च्या खाली पेनाने ओढलेल्या रेघा असायच्या. असे सगळे पुस्तक शाईमय करून टाकणार्यांचा अगदी राग यायचा.
इथला अजून एक मुद्दा दखलपात्र आहे. त्या सुमारास उपनगरांत अशी जी घरगुती वाचनालये चालवली जात, त्यांना फक्त पुस्तके ठेवून चालणार नव्हते. त्याला नियतकालिकांची जोड देणे आवश्यक होते. नियतकालिके ही बऱ्याच गृहिणी सभासदांची विशेष आवड होती. इथे सभासदांना एका वेळेस एक पुस्तक आणि दोन नियतकालिके दिली जात. वाचनालय जरी मराठी पुस्तकांचे असले तरी नियतकालिकांत मात्र मराठीच्या जोडीने हिंदी व इंग्लीशमधले चित्रपट व सौदर्यप्रसाधनविषयक अंक हटकून ठेवावे लागत. हे जरी घरात चालवलेले वाचनालय असले, तरी त्यांनी त्यात ‘Debonair’ चे अंक ठेवण्याचे धाडस दाखवले होते. ते मासिक उघडून पाहिल्यावर पहिल्याच पानावर
“कृपया पाने फाडू नयेत, अंक जुना झाल्यावर विकत घ्यावा !"
ही प्रेमळ सूचना पेनाने लिहिलेली असायची. आमच्या कॉलेजच्या दिवसांत हे मासिक ठरवून वसतिगृहातच ‘बघावे’ लागे; ते वाचण्यात कुणालाच रस नसायचा ! अर्थातच ते घरी आणायची कुणाची टाप नव्हती. आता या वाचनालयात ते खुले आम मिळत असल्याने त्याच्याबद्दल उगाचच वाटणारा चोरटेपणा नष्ट झाला. त्यात आता विवाहित असल्याने ते घरी आणण्यात संकोच तो कसला ? या वाचनालयाच्या मालक असलेल्या त्या बाई पुस्तक नोंदणी वगैरे कामे घरकाम सांभाळून अगदी मन लावून करत. पुस्तक बदलण्यास आलेल्या माणसांना त्यांच्या स्वयंपाकघरातील फोडण्यांचे वास अगदी पाठ झालेले होते ! संध्याकाळच्या वेळात कधीकधी त्यांची आठवीत असलेली मुलगी ग्राहकाच्या पुस्तक नोंदीचे काम करी. कार्डावर लिहिताना मराठी पुस्तकाचे नाव देखील ती हटकून रोमन लिपीत लिही. तिच्या या कृतीतून लिखित मराठीला भविष्यात ओहोटी लागणार असल्याची झलक दिसून आली.
या वाचनालयामुळे आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. साधारण १९९५च्या सुमारास तिथे पुस्तक बदलायला गेलो असता एका नव्या मासिकावर नजर पडली. त्याचे मुखपृष्ठ आकर्षक होते आणि मासिकाचे नावही उत्कृष्ट सुलेखानात होते. ते मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ तेव्हा ते नव्याने सुरु झाले होते. ते सहज चाळताना एक गोष्ट नजरेत भरली. या ४२ पानी मासिकात तब्बल ६ पाने ही वाचकांच्या प्रतिसादासाठी राखलेली होती. या प्रतिसाद सदराचे प्रारंभी अशी संपादकीय टीप होती:
‘वाचकांच्या प्रतिसादांना या मासिकात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. वाचकांनी आपले प्रतिसाद सविस्तर आणि मोकळेपणाने लिहावेत”.
हा भाग माझ्यासाठी फारच आकर्षक होता कारण तोपर्यंत मी दैनिकांतील पत्रलेखन आवडीने व हिरीरीने करीत होतोच. आता हे मासिक तिथून दरमहा घेऊन वाचू लागलो. मग त्यात नियमित प्रतिसाद लिहीले. त्यातूनच स्वतंत्र लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे वाचकांच्या प्रोत्साहनातून त्यात गती येत गेली. यास्तव या घरगुती प्रेमळ वाचनालयाचा मी कायम ऋणी आहे. कालांतराने हे संचालक कुटुंब ते घर सोडून दुसरीकडे गेले. त्यामुळे हे २० वर्षे चाललेले वाचनालय बंद झाले. या घटनेने याच्या सभासद असलेल्या एक वाचनप्रेमी गृहिणी खूपच अस्वस्थ झाल्या. त्यांनी १-२ महिने कसेबसे काढले. मग त्यांनी स्वतःच नवे वाचनालय स्वतंत्र जागेत काढले. मग माझ्यासह बहुतेक सगळे पूर्वीचे सभासद त्यांना मिळाले. त्यांनी याचे नावही छान ठेवले – ‘आपले वाचनालय’. इथेही पूर्वीची लेखक परंपरा जपलेली होती. आता कालानुरूप त्यात काही विशेष भर घातली गेली. त्यात चरित्रे, वलयांकित व्यक्तींचे अनुभवकथन, माहितीपर आणि प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश होता. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इथे ‘अमृत’ मासिक देखील होते. बऱ्याच काळाने त्याची पुनर्भेट झाली. इथल्या एका छोट्या कप्प्यात त्यांनी जुनीपानी इंग्लीश पुस्तके कोंबून ठेवली होती. ती सर्व त्यांनी ओळखीच्यांकडून गोळा केलेली होती. ती वाचण्यासाठी दर उन्हाळी शालेय सुटीत २-४ मुले फिरकत. एरवी तो कप्पा उदास आणि धुळीने माखलेला असायचा.
सुमारे १० वर्षे मी इथला सभासद होतो. इथे सभासदांसाठी एक विशेष सोय अशी होती. जर आपल्याला नव्याने प्रकाशित झालेले एखादे पुस्तक वाचायची इच्छा असल्यास आपण त्या संचालकांना सुचवायचे. मग त्यांना जर ते पटले तर ते खरेदी करत. अशी पाच पुस्तके मी त्यांना माझ्या शेवटच्या २ वर्षांच्या काळात सुचवली होती. पण, त्यांनी एकदाही माझी मागणी पुरी केली नाही. एव्हाना मी त्यांच्या निवडीच्या पुस्तकांना कंटाळलो होतो. वयानुरूप आता ठराविक पठडीतील साहित्य वाचायचा कंटाळा येत होता. तरी पण वाचनालय या संस्थेशी दीर्घकाळ असलेला संपर्क एकदम तोडवत नव्हता. दरम्यान अंतर्नाद, अमृत आणि अन्य काही मासिके बंद पडली. माझे पुस्तकांचे दीर्घवाचन आता होईनासे झाले. दिवाळी अंकांचेही अप्रूप वाटेना. दुसरीकडे आंतरजालावरचे निवडक वाचन वाढू लागले होते. हे सर्व पाहता निव्वळ साप्ताहिकांसाठी हे वाचनालय चालू ठेवण्यात मतलब नव्हता. तशीही ती जालावर बघता येतातच. आता आपल्या आवडीचे एखाद दुसरे पुस्तक अधूनमधून विकत घेतलेले बरे, असे प्रकर्षाने वाटू लागले. एक वर्षभर विचार करीत अखेर ते वाचनालय बंद करण्याचा निर्णय घेतला.
आज समाजात अनेक प्रकारे इ-माध्यमे ओसंडून वाहत आहेत. शहरी तरुण पिढी मराठी छापील वाचनापासून बरीच दुरावली आहे. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत काही उत्साही लोक व्यक्तिगत पातळीवर वाचनालये चालवत आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. त्या कृतज्ञतेपोटी मी माझ्या शेवटच्या वाचनालयाकडून ते बंद करताना माझी अनामत रक्कम परत घेतली नाही. ज्येष्ठ पिढीतील थोड्याफार लोकांसाठी अशी वाचनालये – पुस्तकांची घरे- अजूनही गरजेची आहेत. ती शक्य तितका काळ टिकोत, या सदिच्छेसह या लेखाचा समारोप करतो.
………..
तुमचेही अनुभव वाचण्यास उत्सुक.
***********************************************************************************************
Mid life crisis की mid life
Mid life crisis की mid life clarity. >> छान वाक्य आहे.
मी पण दुसऱ्या गटातला. महागडे विकत घेतले गेले असो की कुणी आवर्जून भेट दिलेले असो. नाही आवडले तर पूर्ण नाही वाचत सोडून देतो. (पूर्वी अगदीच बंडल असल्याशिवाय वाचणे सोडत नसे.)
त्यामुळे किंडल सब्स्क्रिप्शन बरे वाटते.
चांगले अनुभव. वाचतोय.
चांगले अनुभव. वाचतोय.
काही वेळेस असं होतं की, लेखक थोर किंवा पुस्तक श्रेष्ठ म्हणून नावाजले गेलेले असतात आणि म्हणून आपण वाचायला घेतो. परंतु आवडनिवड सापेक्ष असल्यामुळे आपल्याला असे एखादे पुस्तक आवडत नाही. मग त्यावरची जालचर्चा वाचली की दोन्ही बाजूंनी व्यक्त झालेली साधारण समसमान मते देखील वाचायला मिळतात.
आपल्याला न आवडलेले पुस्तक अर्धवट सोडून देण्याच्या बाबतीत मला सॉमरसेट मॉम यांचे खालील वचन अगदी मार्गदर्शक वाटते :
“No reading is worthwhile unless you enjoy it”.
मी पण दुसऱ्या गटात.
मी पण दुसऱ्या गटात.

कुमार सर, तुम्हाला सॉमरसेट मॉम फारच आवडते.
मस्त वाक्य मी स्वच्छंदी.
हल्ली कुणी कितीही भारी म्हणो, फार काही फोमो येत नाही. आधी वाटायचं जग किती पुढे गेलेय आपलं काही खरं नाही, आपण काही वाचत नाही, पण दिवसेंदिवस जग वर्तुळात फिरतंय कुणी पुढे नाही कुणी मागे नाही असं वाटतंय. पुस्तक तुम्हाला स्वतः शोधायला मदत करतं यासाठी त्याचं अप्रूप.
त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे आवडते. आपल्याला मजा येते तेवढंच वाचायचं. मी पण किंडल घेतलं नुकतंच.
अगदी एकाच लेखकाची दोन पुस्तके सुद्धा एखादं आवडतं तर दुसरं इतकं बंडल वाटतं की पहिलं सुद्धा भावनेच्या भरात आवडलंय की काय वाटतं.
कधीकधी पुस्तक साधारण वाटूनही पुस्तकातलं एखादं वाक्य महिनोन्महिने विचार करायला भाग पाडतं. असे वेगवेगळे अनुभव येत राहतात.
अस्मिता, छान प्रतिसाद.
अस्मिता, छान प्रतिसाद.
चला, दुसऱ्या गटातील मंडळींचे बहुमत होणार तर ! चांगलच आहे.
* मॉम फारच आवडते >>>> हो ना, वयाच्या विशीत बसलेलं सॉ.मॉमप्रेम अजून काही कमी व्हायला तयार नाही. (87 वर्षांचे माझे एक स्नेही वाचनातले बापमाणूस आहेत. ते म्हणतात, “Maugham was a great thinker”).
* पुस्तक साधारण वाटूनही पुस्तकातलं एखादं वाक्य महिनोन्महिने विचार करायला >>> अगदी अगदी !
एखाद्या देशातील पुस्तके
एखाद्या देशातील पुस्तके मोठ्या प्रमाणात जाळण्याचे उद्योग इतिहासात अनेकदा झालेले असून त्याची पुनरावृत्ती होताना दिसते. रशिया युक्रेन युद्धात युक्रेनची सुमारे एक कोटी पुस्तके आतापर्यंत जळून नष्ट झाली आहेत :
https://www.reuters.com/world/millions-burnt-books-show-how-war-enduranc...
पुस्तके जाळून टाकण्याचं कारण
पुस्तके जाळून टाकण्याचं कारण बहुतेक "ती ढोंगी मनोवृत्ती उघड्यावर पाडतात." या रागाने.
Publishers say more than 10
Publishers say more than 10 million books have been destroyed in attacks on warehouses in recent months, threatening an industry that initially benefited from rising demand for Ukrainian-language literature at the start of the conflict. >>
मला आधी वाटलं होतं तशी ही काही दुर्मिळ पुस्तके नाहीत. प्रकाशकांचे आणि पुस्तक व्यवसायाचे नुकसान झाले, हे युद्धातील कोलेटेरल डॅमेज आहे.
पुस्तक प्रेमींसाठी एक चांगली
पुस्तक प्रेमींसाठी एक चांगली बातमी.
भारतात एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया विद्यमाने Flybrary नावाची एक योजना सुरू झाली आहे असे नुकतेच एका ठिकाणी वाचण्यात आले.
फ्लायब्ररी हे विमानतळाच्या आत असलेले एक विनामूल्य, स्व-सेवा ग्रंथालय आहे. प्रवाश्यांना फ्लायब्ररीच्या शेल्फवर ठेवलेली पुस्तके पाहता येतात आणि त्यांना आवडणारे पुस्तक निवडून आपल्या विमानाची वाट पाहताना ते पुस्तक वाचू शकतात किंवा विमानात सोबत नेऊन प्रवासादरम्यान देखील वाचता येतात. एकदा ते त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचल्यावर, त्यांना तेथील फ्लायब्ररीमध्ये पुस्तक परत करणे अपेक्षित आहे.
काही विमानतळांवर, प्रवाश्यांना पुस्तके घरी घेऊन जाता येतात आणि पुढच्या विमानतळ भेटीदरम्यान ती परत करू शकतात. वाचनाचे हे चक्र चालू ठेवण्यासाठी प्रवाश्यांना स्वतःची पुस्तके देखील दान करता येतात.
सध्याच्या जमान्यात डिजिटल फ्लाईट एंटरटेनमेंटचे इतके विविध पर्याय उपलब्ध असताना ह्या योजनेला कसा प्रतिसाद मिळेल हे बघणे औत्सुक्यपूर्ण आहे.
* फ्लायब्ररी >>>
* फ्लायब्ररी >>>
खूप छान उपक्रम !
कालच मी त्या ऑनलाईन बातमीचे शीर्षक वाचले होते परंतु त्यावर टिचकी मारली नव्हती.
आज तुम्ही लिहिलेत हा सुंदर योग !
मुंबईतील एशियाटिक लायब्ररी :
मुंबईतील एशियाटिक लायब्ररी : छाती दडपून टाकणारी वास्तू !
या विशाल व बहुआयामी ग्रंथालयाची सुंदर माहिती देणारी आणि अंतरंगाचे दर्शन घडवणारी ही मुलाखत https://www.youtube.com/watch?v=oO3BGoAuUtw
सुमारे अडीच लाखांहून अधिक पुस्तके असणाऱ्या या महाग्रंथालयात दुर्मिळ नकाशे, नाणी आणि हस्तलिखितांचाही समावेश आहे. इथले सर्वात जुने पुस्तक सन 1495 मधील असून ते ग्रीक व्याकरणावरील आहे.
तिकडे कधी गेला आहात काय?
तिकडे कधी गेला आहात काय?
नाही हो. काय विशेष ?
नाही हो. काय विशेष ?
Pages