लहानपणापासून ते आतापर्यंत वाचन हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. बालपणी त्याची सुरवात छोट्याशा रंगीबेरंगी गोष्टीच्या पुस्तकांनी झाली. पुढे माध्यमिक शाळेत अभ्यासेतर अवांतर वाचन चालू झाले. तेव्हापासून ते थेट कमावता होईपर्यंत जे काही असे वाचन झाले त्यासाठी विविध वाचनालयांचा आधार घेतला. पुढे कमावता झाल्यानंतर काही प्रमाणात पुस्तक खरेदी करीत राहिलो. तरीही पुस्तकांचा मुख्य स्त्रोत हा वाचनालय हाच राहिला होता. ३०-४० वर्षांपूर्वी वाचनालये ही सुसंस्कृत शहरांचे वैभव असायची. आज त्यांचे प्रमाण आणि सर्वसाधारण दुरवस्था आपण जाणतोच. त्या अनुषंगाने माझा आजपर्यंतचा वाचनालय-प्रवास आणि तिथले काही अनुभव सादर करतो. ते वाचकांना रोचक वाटतील अशी आशा आहे.
माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर मोठ्या व आकर्षक अक्षरात लिहिलेले ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन नजरेत भरे. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. त्या काळात वयानुरूप असे वाचन झाले, जसे की अद्भूत गोष्टी, प्रवासवर्णने, इ. तिथल्या कपाटांत काही भले मोठे ग्रंथ देखील रचून ठेवलेले असायचे. ‘गीतारहस्य’, ‘ कर्हेचे पाणी ’सारखी पुस्तके लांबून पाहिली पण त्यांना हात लावायचे काही धाडस झाले नाही. एका नियतकालिकाने मात्र तेव्हा चांगलेच आकर्षून घेतलं होते. त्या मासिकाचे नाव ‘अमृत’. त्याच्या मुखपृष्ठावर ‘ज्ञान आणि मनोरंजन’ हे ब्रीदवाक्य अगदी ठळकपणे लिहीले असायचे. त्या वाक्यास अनुसरून सर्व वयोगटांना आवडेल असे काही ना काही त्यात होते. पुढे मोठे झाल्यावर समजले की अमृतला मराठीतील ‘डायजेस्ट’ (RD च्या धर्तीवर) म्हटले जाई. हे मासिक सुमारे ६३ वर्षे चालल्यावर बंद पडले तेव्हा हळहळ वाटली. माझ्या शालेय वयात वाचायला सुरवात केलेले हे मासिक मी माझ्या मुलांचे कॉलेजचे शिक्षण संपून गेल्यावरही वाचत होतो. इतका त्याचा दीर्घ सहवास होता.
त्या वयात असेच एकदा रस्त्याने भटकत होतो आणि एक मित्र भेटला. म्हणाला, काय करतो आहेस ? मी म्हणालो, काही खास नाही. त्यावर तो म्हणाला की चल माझ्याबरोबर, आपण जरा पुस्तके पाहू आणि वाचत बसू. तिथे जवळच एका इमारतीवर ‘शासकीय विभागीय ग्रंथालय’ अशी भली मोठी पाटी होती. मी जरा बुचकळ्यात पडलो आणि त्याला सांगितले, की मी काही याचा सभासद नाही. त्यावर तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, “अरे येड्या, मी तरी कुठे आहे. अरे, हे नुसते तिथे बसून वाचायला फुकट असते, अगदी कुणाला पण !” तेव्हा मला अगदी धक्काच बसला होता. जनतेसाठी असे फुकटचे वाचनालय असू शकते, हे प्रथमच समजले. मग आम्ही तिथे आत गेलो. एका मोठ्या नोंदणी वहीत फक्त आपले नाव, पत्ता आणि आल्याची वेळ असे लिहायचे होते. आत खूप मोठी जागा, त्यात असंख्य पुस्तके मांडून ठेवलेली होती. ते बघून अगदी हरखून गेलो. ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांची सूची देखील बघायला उपलब्ध होती. पुन्हा ३-४ कर्मचारी आपल्याला हवे ते पुस्तक शोधून देण्यासाठी हजर होते. एकंदरीत त्या ग्रंथालयावर खूष झालो.
पुढे लवकरच घरच्यांनी त्याचे सभासदत्व घेतले, जे अगदी नाममात्र शुल्कात मिळाले आणि ते शुल्कही फक्त एकदाच भरायचे होते ! इथली बहुतेक पुस्तके जुनीपानी होती. अगदी नवे पुस्तक मी क्वचितच पाहिले. आपल्याला हवे ते पुस्तक मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीत नाव नोंदवण्याची सोयही होती. पण त्या योजनेचा अनुभव यथातथाच आला. कालांतराने शासनाने तो कायम- सभासदत्व प्रकार रद्द केला. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी काही अटी घातल्या – अमुकतमुक दाखला जोडा वगैरे. तसेही एकूण त्या वाचनालयावर कायम (सरकारी) उदासीनतेची छाया असायची. मग मी त्या वाचनालयाला रामराम करून टाकला. पण त्याला मला एक मोठे श्रेय नक्की द्यावे लागेल. माझ्या किशोरावस्थेतील वाचनाची बैठक या ग्रंथालयामुळे झाली. तत्कालीन दिग्गज लेखक – अत्रे, खांडेकर, फडके, इत्यादी हे वाचायला लागलो. त्याचे स्वतःला फार अप्रूप वाटायचे. अत्र्यांची नाटके वाचताना उत्स्फूर्तपणे मोठमोठ्यांदा हसू आलेले आजही आठवते.
आता आमच्या कुटुंबाने वाट धरली एका खाजगी वाचनालयाची. ते तर प्रेमात पडावे असेच होते. सुसज्ज दुमजली इमारत आणि प्रसन्न वातावरण. तिथे एका वेळेस दोन पुस्तके मिळायची. मग एक मोठ्यांसाठी तर एक मुलांसाठी आणले जाई. मोठ्यांचे बहुतेक करून असायचे एखादी रहस्य कादंबरी, तर मुलांसाठी ऐतिहासिक, बोधप्रद वगैरे ! मला आजही त्या रहस्यकथांची पुस्तके आठवतात. तेव्हा बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक ही मंडळी जोरात होती. कुणाच्या ‘झुंजार’ तर कुणाच्या ‘गरुड’ कथा असायच्या. आमच्या घरी मात्र हे असले काही मुलांना वाचायला बंदी होती. आता कुठलीही बंदी घातली की चोरटा उद्योग सुरु होणारच की ! सगळे मोठे घराबाहेर गेले की हळूच त्या रहस्यकथांवर झडप घातली जाई. कधीकधी तर मोठे घरात असतानाही आम्ही अभ्यासाच्या पुस्तकात ते पुस्तक लपवून वाचत असू. आजही मला त्या पुस्तकांतील शृंगार वर्णने, नग्नता आणि हिंसा व्यवस्थित आठवते. हे असले काही आम्ही त्या वयात वाचू नये, यासाठी मोठ्यांचा तो आटापिटा. आता हे वाचून सध्याची मुले तर खो खो हसतील की नाही? असो. जी पुस्तके आम्ही वाचावीच असा मोठ्यांचा आग्रह होता त्यानुसार नाथमाधवांचे ऐतिहासिक ठोकळे आणि भा रा भागवतांची अनेक पुस्तके डोळ्यांखालून गेलेली आठवतात. शेरलॉक होम्सचे अनुवाद प्रा. भालबा केळकरांनी केलेले असल्याने ही पुस्तके मुलांसाठी अगदी ‘कुटुंबमान्य’ अशी होती.
अशा तऱ्हेने हे सुंदर ग्रंथालय इयत्ता १०वीची उन्हाळी सुटी संपेपर्यंत उपभोगता आले. पुढे ११वीत विज्ञान शाखेला गेल्यामुळे “आता २ वर्षे फक्त अभ्यास एके अभ्यास, आता बास झाली गोष्टींची पुस्तके”, असा वटहुकूम घरून निघाला. तो गुमान आचरणात आणावा लागला.
यापुढचा दीर्घ शैक्षणिक टप्पा होता वैद्यकीय महाविद्यालय. त्या अभ्यासाचे एक वैशिष्ट्य असते. आता एका विषयासाठी फक्त एकच पुस्तक असे वाचून चालत नाही. अनेक संदर्भग्रंथ चाळावे लागतात. मग वरिष्ठांनी सल्ला दिला की आता ‘ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी” (बीसीएल, सध्या फक्त ब्रिटीश लायब्ररी म्हणतात) लावलीच पाहिजे. त्याची एक विशेष आठवण सांगतो. तेव्हा या ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना सभासदत्व घेताना, कॉलेजच्या प्राचार्यानी दिलेला ‘चांगल्या वर्तणुकीचा’ दाखला देणे आवश्यक होते. त्या धोरणाला एक सामाजिक घटना कारणीभूत ठरली होती. तेव्हा महाराष्ट्रात एक भयानक हत्याकांड घडले होते. त्यातील आरोपींनी पोलीस जबाबात सांगितले होते, की खून करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी ‘बीसीएल’ मधील पुस्तकांतून वाचल्या होत्या !
अशा प्रकारे सर्व सोपस्कार करून बीसीएलचे सभासदत्व घेतले. विद्यार्थ्यांसाठी शुल्कात थोडी सवलत होती. अतिशय शिस्तबद्ध आणि नीटनेटके असे हे ग्रंथालय होते. इथे अर्थातच फक्त ब्रिटीश साहित्य ठेवले होते. त्यात अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्याचाही समावेश होता. बऱ्याच जगप्रसिद्ध इंग्लीश लेखकांची पुस्तके उपलब्ध होती. सभासदाला एका वेळेस ३ पुस्तके मिळत आणि ती २६ दिवसांत परत करायची असत. ही मुदत टळून गेल्यास दर दिवसाला ठराविक दंड होता (बहुतेक १-२ रुपये). तो दंड भरण्यासाठी मुख्य काउंटरवर एक मजेदार सोय होती. एका टेबलावर २ इंच आकाराची खाच पाडलेली होती. त्यातून दंडाची रक्कम टाकायची असायची. यातून त्यांनी पावती फाडा वगैरे कारकुनी वाचवली होती. या खाचेचे तेव्हा फार अप्रूप वाटले होते. ग्रंथालयातील शांतता वाखाणण्याजोगी होती. जरी बरेच मराठी भाषिक इथले सभासद असले, तरी इथे असणाऱ्या ग्राहक आणि कर्मचारी यांनी एकंदरीत देहबोलीतून ‘इंग्लीश वातावरणाचा’ आभास निर्माण केलेला असायचा ! आपल्याला हवे ते पुस्तक मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादीची सोय अर्थातच होती आणि आपला नंबर लागल्यावर शिस्तीत त्यांचे पोस्टकार्ड घरी येई.
हे ग्रंथालय शहरातील प्रतिष्ठित भागात होते. त्याच्या आजूबाजूस एक प्रसिद्ध कॉलेज आणि खास खवय्यांची उपाहारगृहे होती. एकूणच त्या वातावरणात तरुणाई नुसती सळसळत असायची. तेव्हा पुस्तकांच्या २६ दिवसांच्या मुदतीची कोण वाट पाहत बसणार? दर १५ दिवसाला इथे चक्कर मारणे नक्कीच सुखावह होते. पुस्तके घेण्याबरोबरच तिथली रंगीबेरंगी तरुणाई ‘वाचणे’ हाही आम्हा मित्रांचा एक कार्यक्रम असायचा !
सुमारे ५ वर्षे मी या ग्रंथालयाचा सभासद होतो. त्या काळात ठरवून ३ इंग्लिश लेखकांचा फडशा पाडला. ते लेखक असे:
१. शेक्सपिअर
२. सॉमरसेट मॉम
३. पी. जी. वुडहाउस
शेक्सपिअरबद्दल मनात खूप कुतूहल होतेच आणि आता तर सुरेख संधी चालून आलेली. त्यांची तिथे असलेली बहुतेक नाटके वाचली. वाचन अजिबात सोपे नव्हते. वाचताना you shall विसरून जायचे असते आणि thou shalt ची सवय लावावी लागते !
सॉमरसेट मॉम यांच्याबद्दल दोन कारणांनी कुतूहल होते. ते स्वतः वैद्यकीय पदवीधर होते पण त्यांनी लेखन हाच व्यवसाय केला. अजून एक कारण असे. माझे एक नातेवाईक मराठी कथालेखक होते. ते स्वतःला मार्गदर्शक म्हणून
मॉम यांची पुस्तके वाचत. त्यांनी मला एकदा वाढदिवसाला मॉमचे पुस्तक भेट दिले होते. त्यामुळे ती उत्सुकता. मॉम त्यांच्या कथांतून वाचकाला जगाच्या पश्चिम ते पूर्व अशा दोन्ही टोकांना नेऊन आणत. तसेच मानवी स्वभावाचे अनेक पैलू छान उलगडून दाखवत.
पी. जी. वुडहाउस हे प्रसिद्ध विनोदी लेखक. मला काही बुजुर्गांनी सांगितले, की ज्यांना पुलं आवडतात त्यांनी ‘पीजी’ जरूर वाचावेत. म्हणून मग त्यांची पुस्तके आवडीने वाचून काढली. तो अगदी प्रसन्न विनोदाचा शिडकावा असतो. त्यातल्या ‘जीव्ज’ या व्यक्तीच्या तर आपण प्रेमातच पडतो.
अशा तऱ्हेने ‘बीसीएल’ चे हे तारुण्यातील गोडगुलाबी दिवस मजेत गेले. त्यातून इंग्लीश साहित्याची झलक चाखता आली. पदवीचे शिक्षण संपल्यावर माझे राहायचे ठिकाणही बदलले होते. तिथून हे ग्रंथालय फारच लांब असल्याने आता ते बंद केले.(अलीकडे हे ग्रंथालय निव्वळ छापील पुस्तकांचे राहिलेले नसून तिथे अनेक इ-सुविधाही उपलब्ध असतात). माझ्या तेव्हाच्या ५ वर्षांच्या कालावधीत वेगळे मराठी वाचनालय लावायला मात्र घरून परवानगी नव्हती कारण इथले शुल्क बऱ्यापैकी होते. मग मित्रपरिवारात जी काही मराठी पुस्तके होती, ती एकमेकांत फिरवून वाचत असू. अशा या ‘फिरत्या’ आणि फुकट वाचनालयातून काही वाचन झाले. त्यापैकी ‘ययाती’ आणि ‘कोसला’ आठवतात. हा लेख लिहिताना कोसलामधल्या ‘लायब्री’ ची आठवण येणे अपरिहार्य आहे !
पुढे लग्नानंतर शहराच्या उपनगरात स्थिरावलो. आता सांसारिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असल्याने वाचनालय घरानजीकचेच शोधणे भाग होते. असेच फिरताना त्याचा शोध लागला. आमच्या जवळच्याच एका गृहसंकुलात एका कुटुंबाने त्यांच्या घरातच वाचनालय चालवले होते. त्या जोडप्यातील गृहस्थ नोकरीत होते आणि त्यांची पत्नी गृहिणी. आपल्या ३ खोल्यांच्या सदनिकेतील बाहेरच्या खोलीत त्यांनी वाचनालय उभे केले होते. दिवसातील ४ तास ही खोली ग्राहकांसाठी उघडी असायची. त्यांच्या या पुस्तक प्रेमाबद्दल मला मनापासून कौतुक वाटले. त्या जागेच्या मर्यादेत त्यांनी जी पुस्तकांची निवड केली होती ती पांढरपेशांना अगदी अनुरूप होती. त्यामध्ये ‘पुलं- वपु -हमो- सुशि’ अगदी उठून दिसणारे होते. जोडीला नारायण धारप- रत्नाकर मतकरी हे गूढखाद्यही होते. त्याचबरोबर ‘व्यंमा- दमा- शंपा’ यांचाही एक सुरेख कप्पा होता. उच्च मध्यम वर्गाला आवडणारे खुशवंतसिंगांचे अनुवादित साहित्यही इथल्या संग्रहाला चविष्ट बनवायचे. वपुंचे एखादे नवे पुस्तक जर आपल्या हाती ६ महिन्यांनी पडले, तर त्यात त्या खास ‘वाक्यां’च्या खाली पेनाने ओढलेल्या रेघा असायच्या. असे सगळे पुस्तक शाईमय करून टाकणार्यांचा अगदी राग यायचा.
इथला अजून एक मुद्दा दखलपात्र आहे. त्या सुमारास उपनगरांत अशी जी घरगुती वाचनालये चालवली जात, त्यांना फक्त पुस्तके ठेवून चालणार नव्हते. त्याला नियतकालिकांची जोड देणे आवश्यक होते. नियतकालिके ही बऱ्याच गृहिणी सभासदांची विशेष आवड होती. इथे सभासदांना एका वेळेस एक पुस्तक आणि दोन नियतकालिके दिली जात. वाचनालय जरी मराठी पुस्तकांचे असले तरी नियतकालिकांत मात्र मराठीच्या जोडीने हिंदी व इंग्लीशमधले चित्रपट व सौदर्यप्रसाधनविषयक अंक हटकून ठेवावे लागत. हे जरी घरात चालवलेले वाचनालय असले, तरी त्यांनी त्यात ‘Debonair’ चे अंक ठेवण्याचे धाडस दाखवले होते. ते मासिक उघडून पाहिल्यावर पहिल्याच पानावर
“कृपया पाने फाडू नयेत, अंक जुना झाल्यावर विकत घ्यावा !"
ही प्रेमळ सूचना पेनाने लिहिलेली असायची. आमच्या कॉलेजच्या दिवसांत हे मासिक ठरवून वसतिगृहातच ‘बघावे’ लागे; ते वाचण्यात कुणालाच रस नसायचा ! अर्थातच ते घरी आणायची कुणाची टाप नव्हती. आता या वाचनालयात ते खुले आम मिळत असल्याने त्याच्याबद्दल उगाचच वाटणारा चोरटेपणा नष्ट झाला. त्यात आता विवाहित असल्याने ते घरी आणण्यात संकोच तो कसला ? या वाचनालयाच्या मालक असलेल्या त्या बाई पुस्तक नोंदणी वगैरे कामे घरकाम सांभाळून अगदी मन लावून करत. पुस्तक बदलण्यास आलेल्या माणसांना त्यांच्या स्वयंपाकघरातील फोडण्यांचे वास अगदी पाठ झालेले होते ! संध्याकाळच्या वेळात कधीकधी त्यांची आठवीत असलेली मुलगी ग्राहकाच्या पुस्तक नोंदीचे काम करी. कार्डावर लिहिताना मराठी पुस्तकाचे नाव देखील ती हटकून रोमन लिपीत लिही. तिच्या या कृतीतून लिखित मराठीला भविष्यात ओहोटी लागणार असल्याची झलक दिसून आली.
या वाचनालयामुळे आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. साधारण १९९५च्या सुमारास तिथे पुस्तक बदलायला गेलो असता एका नव्या मासिकावर नजर पडली. त्याचे मुखपृष्ठ आकर्षक होते आणि मासिकाचे नावही उत्कृष्ट सुलेखानात होते. ते मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ तेव्हा ते नव्याने सुरु झाले होते. ते सहज चाळताना एक गोष्ट नजरेत भरली. या ४२ पानी मासिकात तब्बल ६ पाने ही वाचकांच्या प्रतिसादासाठी राखलेली होती. या प्रतिसाद सदराचे प्रारंभी अशी संपादकीय टीप होती:
‘वाचकांच्या प्रतिसादांना या मासिकात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. वाचकांनी आपले प्रतिसाद सविस्तर आणि मोकळेपणाने लिहावेत”.
हा भाग माझ्यासाठी फारच आकर्षक होता कारण तोपर्यंत मी दैनिकांतील पत्रलेखन आवडीने व हिरीरीने करीत होतोच. आता हे मासिक तिथून दरमहा घेऊन वाचू लागलो. मग त्यात नियमित प्रतिसाद लिहीले. त्यातूनच स्वतंत्र लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे वाचकांच्या प्रोत्साहनातून त्यात गती येत गेली. यास्तव या घरगुती प्रेमळ वाचनालयाचा मी कायम ऋणी आहे. कालांतराने हे संचालक कुटुंब ते घर सोडून दुसरीकडे गेले. त्यामुळे हे २० वर्षे चाललेले वाचनालय बंद झाले. या घटनेने याच्या सभासद असलेल्या एक वाचनप्रेमी गृहिणी खूपच अस्वस्थ झाल्या. त्यांनी १-२ महिने कसेबसे काढले. मग त्यांनी स्वतःच नवे वाचनालय स्वतंत्र जागेत काढले. मग माझ्यासह बहुतेक सगळे पूर्वीचे सभासद त्यांना मिळाले. त्यांनी याचे नावही छान ठेवले – ‘आपले वाचनालय’. इथेही पूर्वीची लेखक परंपरा जपलेली होती. आता कालानुरूप त्यात काही विशेष भर घातली गेली. त्यात चरित्रे, वलयांकित व्यक्तींचे अनुभवकथन, माहितीपर आणि प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश होता. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इथे ‘अमृत’ मासिक देखील होते. बऱ्याच काळाने त्याची पुनर्भेट झाली. इथल्या एका छोट्या कप्प्यात त्यांनी जुनीपानी इंग्लीश पुस्तके कोंबून ठेवली होती. ती सर्व त्यांनी ओळखीच्यांकडून गोळा केलेली होती. ती वाचण्यासाठी दर उन्हाळी शालेय सुटीत २-४ मुले फिरकत. एरवी तो कप्पा उदास आणि धुळीने माखलेला असायचा.
सुमारे १० वर्षे मी इथला सभासद होतो. इथे सभासदांसाठी एक विशेष सोय अशी होती. जर आपल्याला नव्याने प्रकाशित झालेले एखादे पुस्तक वाचायची इच्छा असल्यास आपण त्या संचालकांना सुचवायचे. मग त्यांना जर ते पटले तर ते खरेदी करत. अशी पाच पुस्तके मी त्यांना माझ्या शेवटच्या २ वर्षांच्या काळात सुचवली होती. पण, त्यांनी एकदाही माझी मागणी पुरी केली नाही. एव्हाना मी त्यांच्या निवडीच्या पुस्तकांना कंटाळलो होतो. वयानुरूप आता ठराविक पठडीतील साहित्य वाचायचा कंटाळा येत होता. तरी पण वाचनालय या संस्थेशी दीर्घकाळ असलेला संपर्क एकदम तोडवत नव्हता. दरम्यान अंतर्नाद, अमृत आणि अन्य काही मासिके बंद पडली. माझे पुस्तकांचे दीर्घवाचन आता होईनासे झाले. दिवाळी अंकांचेही अप्रूप वाटेना. दुसरीकडे आंतरजालावरचे निवडक वाचन वाढू लागले होते. हे सर्व पाहता निव्वळ साप्ताहिकांसाठी हे वाचनालय चालू ठेवण्यात मतलब नव्हता. तशीही ती जालावर बघता येतातच. आता आपल्या आवडीचे एखाद दुसरे पुस्तक अधूनमधून विकत घेतलेले बरे, असे प्रकर्षाने वाटू लागले. एक वर्षभर विचार करीत अखेर ते वाचनालय बंद करण्याचा निर्णय घेतला.
आज समाजात अनेक प्रकारे इ-माध्यमे ओसंडून वाहत आहेत. शहरी तरुण पिढी मराठी छापील वाचनापासून बरीच दुरावली आहे. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत काही उत्साही लोक व्यक्तिगत पातळीवर वाचनालये चालवत आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. त्या कृतज्ञतेपोटी मी माझ्या शेवटच्या वाचनालयाकडून ते बंद करताना माझी अनामत रक्कम परत घेतली नाही. ज्येष्ठ पिढीतील थोड्याफार लोकांसाठी अशी वाचनालये – पुस्तकांची घरे- अजूनही गरजेची आहेत. ती शक्य तितका काळ टिकोत, या सदिच्छेसह या लेखाचा समारोप करतो.
………..
तुमचेही अनुभव वाचण्यास उत्सुक.
***********************************************************************************************
छान की !
छान की !
भविष्यात अजून अशी पुस्तकांची गावे छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एक गावात उभारण्यात येणार आहेत.
https://pudhari.news/maharashtra/pune/728149/a-village-of-books-is-being...
गाव ते नाही आमचं पण तालुका
गाव ते नाही आमचं पण तालुका देवगड, मोठे दिर पुस्तकप्रेमी आहेत, त्यांना आवडेल असं.
आजीचं पुस्तकांचं हॉटेल :
आजीचं पुस्तकांचं हॉटेल : ऑर्डर दिल्यावर जेवण येईपर्यंत स्मार्टफोनऐवजी पुस्तक वाचलं तर...?
https://www.esakal.com/premium-article/saptahik/grandmas-book-hotel-read...
रोचक !
The Brautigan Library,
The Brautigan Library, अमेरिका
अप्रकाशित इंग्लिश ‘पुस्तकां’चे ग्रंथालय !!
हे सन 1990 पासून कार्यरत आहे. इथे इंग्लिशमध्ये लिहिलेले आणि कुठल्याही कारणास्तव पुस्तकरूपात प्रसिद्ध होऊ न शकलेले व कोणत्याही दर्जाचे साहित्य स्वीकारले जाते ( “साभार परत” सह). त्याच्या टंकलिखित प्रतीची व्यवस्थित बांधणी करून ती ग्रंथालयात ठेवली जाते. वाचकांना प्रत्यक्ष तिथे बसूनच वाचावे लागते.
https://www.toddrlockwood.com/the-brautigan-library.html
लेखाचे नाव आवडले. लेखही
लेखाचे नाव आवडले. लेखही सुंदरच.
लेखाचे नाव आवडले. लेखही
लेखाचे नाव आवडले. लेखही सुंदरच..... +१.
वर आजीचं पुस्तकांचं हॉटेल या
वर 'आजीचं पुस्तकांचं हॉटेल' या सकाळच्या लेखाची लिंक आहे. त्याच आजी आणि हॉटेलबद्दल हा बीबीसी मराठीचा व्हिडियो रिपोर्ट
https://fb.watch/sjQhB32_O8/
बीबीसी मराठीचा व्हिडियो
बीबीसी मराठीचा व्हिडियो
>>
अरे वा ! सुंदर आहे.
लोकांची जेवणाची आणि वाचनाची भूक भागवणाऱ्या भीमाबाई खूप आवडल्या
त्यांचे अभिनंदन !
मुदतपूर्व जन्म झालेल्या
मुदतपूर्व जन्म झालेल्या बाळाच्या बौद्धिक विकासासाठी आता ‘बेबीज विथ बुक्स’ ही संकल्पना रुग्णालयात राबविली जात आहे. . .
आता पुण्यातील भारती रुग्णालयात ही मोहीम सुरू झाली आहे. . .
. . . या उपक्रमासाठी कोणाला पुस्तके दान करायची असतील तर भारती रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
https://www.loksatta.com/pune/mothers-to-read-books-to-newly-born-as-bab...
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब
सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील ‘फ्रेंड्स सलून’ हे निव्वळ केशकर्तनालय नसून वाचनालय सुद्धा आहे. इथला एक नियम आहे :
आधी वाचन, मगच केशकर्तन !
तिथे तीनशे पन्नासहून अधिक पुस्तके ठेवली असून त्यात ब्रेल लिपीतलीही पुस्तके आहेत.
(बातमी : छापील मटा 8 सप्टेंबर).
>>आधी वाचन, मगच केशकर्तन !>>>
>>आधी वाचन, मगच केशकर्तन !>>>
छान उपक्रम
वाचन संस्कृती रुजतेय!https:/
वाचन संस्कृती रुजतेय!
https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/patipencil/reading-culture/
‘आजकाल वाचतो कोण,’ असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी ही आकडेवारी. ‘निलेसन इंडिया बुक मार्केट’च्या एका अहवालानुसार आणखी बरोबर एक वर्षानं म्हणजे २०२४च्या अखेरीस भारतातील पुस्तकांची बाजारपेठ एक लाख कोटी रुपयांची होईल आणि ती त्या वेळी जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असेल. दुसऱ्या एका आकडेवारीनुसार, देशातील २६.४ टक्के लोक पुस्तकं वाचतात. याचा अर्थ असा, की दर चार जणांमागं एक जण वाचणारा आहे
संयुक्त वाचनाचे चांगले उपक्रम
संयुक्त वाचनाचे चांगले उपक्रम :
‘लेट्स रीड इंडिया’ ( नवी मुंबई) आणि
‘ज्ञान विकास प्रतिष्ठान’, विसरवाडी (नंदुरबार)
https://www.loksatta.com/sampadkiya/features/government-jobs-for-youth-d...
माझे आयुष्य पिंपरी चिंचवड
माझे आयुष्य पिंपरी चिंचवड मध्ये गेले. चिंचवड मध्ये असताना महानगर पालिकेच्या वाचनालयात काही मौलिक मराठी पुस्तके वाचली. पण पिंपरी चिंचवड ला पुणे सारखी वाचन संस्कृती नाही. इथे बगाड बैलपोळा आणि बेरकी राजकारण आहे.
आजीचं पुस्तकांचं हॉटेल >>>
आजीचं पुस्तकांचं हॉटेल >>>
नाशिकजवळील हे पुस्तक संग्रहालय व खानावळ चालवणाऱ्या भीमाबाई जोंधळे यांना राज्य शासनाचा 'मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक' पुरस्कार मिळाला आहे
अभिनंदन !
‘पुस्तकांचा काळाबाजार’
‘पुस्तकांचा काळाबाजार’
या शीर्षकाचा राजीव बर्वे यांचा लेख आजच्या मटात आला आहे. बर्वे हे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष आहेत. हा लेख पुस्तक विकत घेणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
आज बाजारातील 20% पुस्तके त्यांच्या छापील किमतीवर वाढीव किमतीचे स्टिकर्स लावून येत आहेत. हा उद्योग ऑनलाईन पुस्तक विक्री संस्थलांवर बऱ्याच प्रमाणात दिसून येत आहे. मुळात असा वाढीव किमतीचा स्टिकर लावण्याचा अधिकार फक्त मूळ प्रकाशकाला आहे. ऑनलाइन विक्रेते त्यांची इच्छा असल्यास पुस्तकाच्या छापील किमतीपेक्षा कमी किमतीचा स्टिकर शेजारी लावू शकतात.
वाढीव किमतीच्या अशा स्टिकरबाबत वाचकांनी मूळ प्रकाशकाकडे तक्रार करावी असे त्यांनी म्हटले आहे. तसेच वाचकांनीच अशा बेकायदा स्टिकरयुक्त पुस्तकांवर बहिष्कार टाकणे उत्तम.
Alexa
Alexa
एका प्रख्यात माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे हे नाव बहुपरिचित आहे. ते ठेवण्यामागे काही कारणे असून त्यातील एक कारण एका प्राचीन ग्रंथालयाशी संबंधित आहे.
प्राचीन इजिप्तमध्ये ग्रेट लायब्ररी ऑफ अलेक्झांड्रिया हे भव्य ग्रंथालय होते. त्याला तत्कालीन ज्ञानाचा महासागर असे म्हटले जाई. आंतरजालाच्या शोधानंतर हा ज्ञानाचा नवा महासागर उपलब्ध झाला व त्याचे Alexa हे नाव ठेवून त्या प्राचीन ग्रंथालयाला मानवंदना दिलेली आहे.
(ग्रेट लायब्ररीत एका वेळेस २००० वाचक बसू शकत).
रोचक
रोचक
नालंदा नाव कुणी घेतले का?
नालंदा नाव कुणी घेतले का?
भारतात ग्रंथालय, शैक्षणिक
भारतात ग्रंथालय, शैक्षणिक संस्था इत्यादीची उदाहरणे सापडतील.
'नालंदा लायब्ररी' पिंपरी चिंचवडात आहे :
https://www.google.com/search?q=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82%E0%...
विद्यार्थ्यांच्या काही खाजगी वसतिगृहांची नावे पण तशी आहेत असे ऐकले आहे.
आंतरजालाच्या शोधानंतर हा
आंतरजालाच्या शोधानंतर हा ज्ञानाचा नवा महासागर उपलब्ध झाला व त्याचे Alexa हे नाव ठेवून त्या प्राचीन ग्रंथालयाला मानवंदना दिलेली आहे.
>>> वॉव! ही माहिती नवीन आहे
मधु लिमये यांचा प्रदीर्घ जुना
मधु लिमये यांचा प्रदीर्घ जुना लेख :
पुणे नगर वाचन मंदिर व पुस्तकांच्या विश्वात परिभ्रमण
https://www.weeklysadhana.in/view_article/Pune-Nagar-Vachan-Mandir-and-T...
त्यातील काही निवडक :
" . . . गद्यातील काव्यमयता किंवा जीवनाकडे पाहण्याची काव्यदृष्टी यांचा मी चाहता आहे, पण एकूण काव्यप्रकाराला मी सर्वश्रेष्ठ साहित्यप्रकार मानत नाही. इतिहासाच्या वाचनाने असे आढळून येते की, कोणत्याही संस्कृतीच्या आणि समाजाच्या उत्क्रांतीच्या काळात सुरुवातीच्या खंडात सुसंस्कृत होऊ पाहणाऱ्या मानवाची प्रतिभा प्रथम काव्यरूपाने प्रस्फुटित होते. संस्कृतीचा पुरेसा विकास झाल्यानंतर ती गद्यरूपाने परिपक्व होते. . .
. . . पु. य. देशपांडे आणि विभावरी शिरूरकर हे दोघे एकाच कादंबरीच्या जोरावर त्या वेळी साहित्यसृष्टीत चमकून गेलेले तारे होते".
“पु.य”. देशपांडे या लेखकांबद्दल प्रथमच वाचले.
मौन वाचन उपक्रम !
मौन वाचन उपक्रम !
पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी सलग नऊ तास फोन आणि लॅपटॉप पूर्ण बंद ठेवून फक्त छापील पुस्तकांचे वाचन केले. त्यामध्ये पाठ्यपुस्तके, व्यक्तिमत्व विकासविषयक पुस्तके आणि विविध संशोधन प्रबंधांचा समावेश होता.
अभिनंदन !
एरवी तंत्रस्नेही असणारे काही
एरवी तंत्रस्नेही असणारे काही लोक पुस्तकांच्या बाबतीत मात्र ‘इ’ पेक्षा छापील पुस्तकेच पसंत करतात. अशा लोकांचे काही गुण मानसशास्त्रीय संशोधनातून पुढे आले आहेत. त्याची एक झलक : https://vegoutmag.com/lifestyle/z-if-you-still-prefer-printed-books-over...
आग्रहाने छापील वाचणारे लोक अंतर्मुख असतात, वाचनातून व्यक्तिमत्व विकास घडवून इच्छितात आणि चिकित्सक असतात, इत्यादी . . .
अशा निरीक्षणांकडे गंमत म्हणून पाहायला हरकत नाही.
"मानवी ग्रंथालय"
"मानवी ग्रंथालय"
या अनोख्या उपक्रमाचे आयोजन आयआयटी पालक्कडमध्ये जानेवारी 2026मध्ये केले जाणार आहे. या ग्रंथालयात पुस्तके नसून कथा आणि व्यथा असलेली माणसेच असतात. ही माणसे आपल्यावर गुदरलेला प्रसंग, यशोगाथा, दुःख, आनंद इत्यादी स्वतःच इतरांना सांगतील. तसेच या अडचणींवर आपण कशी मात केली हे देखील त्यांनी सांगणे अपेक्षित आहे.
उपक्रम रोचक असेल !
Human library चे प्रयोग मुंबई
Human library चे प्रयोग मुंबई, पुण्यात झालेत. याविषयी सिम्बा यांनी मायबोलीवर लिहिलं आहे. त्यातल्या एका 'पुस्तका'शी झालेल्या प्रश्नोत्तरांचा गोषवाराही लिहिला आहे.
दोन्ही लेखांच्या लिंक्स
माणसे वाचताना
माणसे वाचताना -२
अच्छा ! माहितीबद्दल धन्यवाद
अच्छा ! माहितीबद्दल धन्यवाद
अमेरिकेतील एका ग्रंथालयातून
अमेरिकेतील एका ग्रंथालयातून एकेकाळी वाचायला दिलेले पुस्तक 82 वर्षांनी परत करण्यात आले आहे. त्यासोबत एक विनंती-चिठ्ठी आहे की आता आम्ही त्याचा दंड भरू शकणार नाही.
या प्रकारचा गिनीज बुक विक्रम याहूनही खूप मोठा आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या ग्रंथालयात एक पुस्तक 288 वर्षानंतर परत आले होते !!
https://pudhari-news.cdn.ampproject.org/v/s/pudhari.news/amp/story/vishw...
>>>>>>>अमेरिकेतील एका
>>>>>>>अमेरिकेतील एका ग्रंथालयातून एकेकाळी वाचायला दिलेले पुस्तक 82 वर्षांनी परत करण्यात आले आहे. त्यासोबत एक विनंती-चिठ्ठी आहे की आता आम्ही त्याचा दंड भरू शकणार नाही.
रोचक किस्सा आहे. सॅन अँटॉनिओ का.... वाह!!
सामो,
सामो,
तुम्हाला माहिती आहे वाटतं ते ग्रंथालय ?
Pages