इथे पुस्तके राहतात ...

Submitted by हेमंतकुमार on 27 January, 2020 - 08:25

लहानपणापासून ते आतापर्यंत वाचन हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. बालपणी त्याची सुरवात छोट्याशा रंगीबेरंगी गोष्टीच्या पुस्तकांनी झाली. पुढे माध्यमिक शाळेत अभ्यासेतर अवांतर वाचन चालू झाले. तेव्हापासून ते थेट कमावता होईपर्यंत जे काही असे वाचन झाले त्यासाठी विविध वाचनालयांचा आधार घेतला. पुढे कमावता झाल्यानंतर काही प्रमाणात पुस्तक खरेदी करीत राहिलो. तरीही पुस्तकांचा मुख्य स्त्रोत हा वाचनालय हाच राहिला होता. ३०-४० वर्षांपूर्वी वाचनालये ही सुसंस्कृत शहरांचे वैभव असायची. आज त्यांचे प्रमाण आणि सर्वसाधारण दुरवस्था आपण जाणतोच. त्या अनुषंगाने माझा आजपर्यंतचा वाचनालय-प्रवास आणि तिथले काही अनुभव सादर करतो. ते वाचकांना रोचक वाटतील अशी आशा आहे.

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर मोठ्या व आकर्षक अक्षरात लिहिलेले ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन नजरेत भरे. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. त्या काळात वयानुरूप असे वाचन झाले, जसे की अद्भूत गोष्टी, प्रवासवर्णने, इ. तिथल्या कपाटांत काही भले मोठे ग्रंथ देखील रचून ठेवलेले असायचे. ‘गीतारहस्य’, ‘ कर्‍हेचे पाणी ’सारखी पुस्तके लांबून पाहिली पण त्यांना हात लावायचे काही धाडस झाले नाही. एका नियतकालिकाने मात्र तेव्हा चांगलेच आकर्षून घेतलं होते. त्या मासिकाचे नाव ‘अमृत’. त्याच्या मुखपृष्ठावर ‘ज्ञान आणि मनोरंजन’ हे ब्रीदवाक्य अगदी ठळकपणे लिहीले असायचे. त्या वाक्यास अनुसरून सर्व वयोगटांना आवडेल असे काही ना काही त्यात होते. पुढे मोठे झाल्यावर समजले की अमृतला मराठीतील ‘डायजेस्ट’ (RD च्या धर्तीवर) म्हटले जाई. हे मासिक सुमारे ६३ वर्षे चालल्यावर बंद पडले तेव्हा हळहळ वाटली. माझ्या शालेय वयात वाचायला सुरवात केलेले हे मासिक मी माझ्या मुलांचे कॉलेजचे शिक्षण संपून गेल्यावरही वाचत होतो. इतका त्याचा दीर्घ सहवास होता.

त्या वयात असेच एकदा रस्त्याने भटकत होतो आणि एक मित्र भेटला. म्हणाला, काय करतो आहेस ? मी म्हणालो, काही खास नाही. त्यावर तो म्हणाला की चल माझ्याबरोबर, आपण जरा पुस्तके पाहू आणि वाचत बसू. तिथे जवळच एका इमारतीवर ‘शासकीय विभागीय ग्रंथालय’ अशी भली मोठी पाटी होती. मी जरा बुचकळ्यात पडलो आणि त्याला सांगितले, की मी काही याचा सभासद नाही. त्यावर तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, “अरे येड्या, मी तरी कुठे आहे. अरे, हे नुसते तिथे बसून वाचायला फुकट असते, अगदी कुणाला पण !” तेव्हा मला अगदी धक्काच बसला होता. जनतेसाठी असे फुकटचे वाचनालय असू शकते, हे प्रथमच समजले. मग आम्ही तिथे आत गेलो. एका मोठ्या नोंदणी वहीत फक्त आपले नाव, पत्ता आणि आल्याची वेळ असे लिहायचे होते. आत खूप मोठी जागा, त्यात असंख्य पुस्तके मांडून ठेवलेली होती. ते बघून अगदी हरखून गेलो. ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांची सूची देखील बघायला उपलब्ध होती. पुन्हा ३-४ कर्मचारी आपल्याला हवे ते पुस्तक शोधून देण्यासाठी हजर होते. एकंदरीत त्या ग्रंथालयावर खूष झालो.

पुढे लवकरच घरच्यांनी त्याचे सभासदत्व घेतले, जे अगदी नाममात्र शुल्कात मिळाले आणि ते शुल्कही फक्त एकदाच भरायचे होते ! इथली बहुतेक पुस्तके जुनीपानी होती. अगदी नवे पुस्तक मी क्वचितच पाहिले. आपल्याला हवे ते पुस्तक मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीत नाव नोंदवण्याची सोयही होती. पण त्या योजनेचा अनुभव यथातथाच आला. कालांतराने शासनाने तो कायम- सभासदत्व प्रकार रद्द केला. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी काही अटी घातल्या – अमुकतमुक दाखला जोडा वगैरे. तसेही एकूण त्या वाचनालयावर कायम (सरकारी) उदासीनतेची छाया असायची. मग मी त्या वाचनालयाला रामराम करून टाकला. पण त्याला मला एक मोठे श्रेय नक्की द्यावे लागेल. माझ्या किशोरावस्थेतील वाचनाची बैठक या ग्रंथालयामुळे झाली. तत्कालीन दिग्गज लेखक – अत्रे, खांडेकर, फडके, इत्यादी हे वाचायला लागलो. त्याचे स्वतःला फार अप्रूप वाटायचे. अत्र्यांची नाटके वाचताना उत्स्फूर्तपणे मोठमोठ्यांदा हसू आलेले आजही आठवते.
आता आमच्या कुटुंबाने वाट धरली एका खाजगी वाचनालयाची. ते तर प्रेमात पडावे असेच होते. सुसज्ज दुमजली इमारत आणि प्रसन्न वातावरण. तिथे एका वेळेस दोन पुस्तके मिळायची. मग एक मोठ्यांसाठी तर एक मुलांसाठी आणले जाई. मोठ्यांचे बहुतेक करून असायचे एखादी रहस्य कादंबरी, तर मुलांसाठी ऐतिहासिक, बोधप्रद वगैरे ! मला आजही त्या रहस्यकथांची पुस्तके आठवतात. तेव्हा बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक ही मंडळी जोरात होती. कुणाच्या ‘झुंजार’ तर कुणाच्या ‘गरुड’ कथा असायच्या. आमच्या घरी मात्र हे असले काही मुलांना वाचायला बंदी होती. आता कुठलीही बंदी घातली की चोरटा उद्योग सुरु होणारच की ! सगळे मोठे घराबाहेर गेले की हळूच त्या रहस्यकथांवर झडप घातली जाई. कधीकधी तर मोठे घरात असतानाही आम्ही अभ्यासाच्या पुस्तकात ते पुस्तक लपवून वाचत असू. आजही मला त्या पुस्तकांतील शृंगार वर्णने, नग्नता आणि हिंसा व्यवस्थित आठवते. हे असले काही आम्ही त्या वयात वाचू नये, यासाठी मोठ्यांचा तो आटापिटा. आता हे वाचून सध्याची मुले तर खो खो हसतील की नाही? असो. जी पुस्तके आम्ही वाचावीच असा मोठ्यांचा आग्रह होता त्यानुसार नाथमाधवांचे ऐतिहासिक ठोकळे आणि भा रा भागवतांची अनेक पुस्तके डोळ्यांखालून गेलेली आठवतात. शेरलॉक होम्सचे अनुवाद प्रा. भालबा केळकरांनी केलेले असल्याने ही पुस्तके मुलांसाठी अगदी ‘कुटुंबमान्य’ अशी होती.

अशा तऱ्हेने हे सुंदर ग्रंथालय इयत्ता १०वीची उन्हाळी सुटी संपेपर्यंत उपभोगता आले. पुढे ११वीत विज्ञान शाखेला गेल्यामुळे “आता २ वर्षे फक्त अभ्यास एके अभ्यास, आता बास झाली गोष्टींची पुस्तके”, असा वटहुकूम घरून निघाला. तो गुमान आचरणात आणावा लागला.

यापुढचा दीर्घ शैक्षणिक टप्पा होता वैद्यकीय महाविद्यालय. त्या अभ्यासाचे एक वैशिष्ट्य असते. आता एका विषयासाठी फक्त एकच पुस्तक असे वाचून चालत नाही. अनेक संदर्भग्रंथ चाळावे लागतात. मग वरिष्ठांनी सल्ला दिला की आता ‘ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी” (बीसीएल, सध्या फक्त ब्रिटीश लायब्ररी म्हणतात) लावलीच पाहिजे. त्याची एक विशेष आठवण सांगतो. तेव्हा या ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना सभासदत्व घेताना, कॉलेजच्या प्राचार्यानी दिलेला ‘चांगल्या वर्तणुकीचा’ दाखला देणे आवश्यक होते. त्या धोरणाला एक सामाजिक घटना कारणीभूत ठरली होती. तेव्हा महाराष्ट्रात एक भयानक हत्याकांड घडले होते. त्यातील आरोपींनी पोलीस जबाबात सांगितले होते, की खून करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी ‘बीसीएल’ मधील पुस्तकांतून वाचल्या होत्या !

अशा प्रकारे सर्व सोपस्कार करून बीसीएलचे सभासदत्व घेतले. विद्यार्थ्यांसाठी शुल्कात थोडी सवलत होती. अतिशय शिस्तबद्ध आणि नीटनेटके असे हे ग्रंथालय होते. इथे अर्थातच फक्त ब्रिटीश साहित्य ठेवले होते. त्यात अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्याचाही समावेश होता. बऱ्याच जगप्रसिद्ध इंग्लीश लेखकांची पुस्तके उपलब्ध होती. सभासदाला एका वेळेस ३ पुस्तके मिळत आणि ती २६ दिवसांत परत करायची असत. ही मुदत टळून गेल्यास दर दिवसाला ठराविक दंड होता (बहुतेक १-२ रुपये). तो दंड भरण्यासाठी मुख्य काउंटरवर एक मजेदार सोय होती. एका टेबलावर २ इंच आकाराची खाच पाडलेली होती. त्यातून दंडाची रक्कम टाकायची असायची. यातून त्यांनी पावती फाडा वगैरे कारकुनी वाचवली होती. या खाचेचे तेव्हा फार अप्रूप वाटले होते. ग्रंथालयातील शांतता वाखाणण्याजोगी होती. जरी बरेच मराठी भाषिक इथले सभासद असले, तरी इथे असणाऱ्या ग्राहक आणि कर्मचारी यांनी एकंदरीत देहबोलीतून ‘इंग्लीश वातावरणाचा’ आभास निर्माण केलेला असायचा ! आपल्याला हवे ते पुस्तक मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादीची सोय अर्थातच होती आणि आपला नंबर लागल्यावर शिस्तीत त्यांचे पोस्टकार्ड घरी येई.

हे ग्रंथालय शहरातील प्रतिष्ठित भागात होते. त्याच्या आजूबाजूस एक प्रसिद्ध कॉलेज आणि खास खवय्यांची उपाहारगृहे होती. एकूणच त्या वातावरणात तरुणाई नुसती सळसळत असायची. तेव्हा पुस्तकांच्या २६ दिवसांच्या मुदतीची कोण वाट पाहत बसणार? दर १५ दिवसाला इथे चक्कर मारणे नक्कीच सुखावह होते. पुस्तके घेण्याबरोबरच तिथली रंगीबेरंगी तरुणाई ‘वाचणे’ हाही आम्हा मित्रांचा एक कार्यक्रम असायचा !

सुमारे ५ वर्षे मी या ग्रंथालयाचा सभासद होतो. त्या काळात ठरवून ३ इंग्लिश लेखकांचा फडशा पाडला. ते लेखक असे:
१. शेक्सपिअर
२. सॉमरसेट मॉम
३. पी. जी. वुडहाउस

शेक्सपिअरबद्दल मनात खूप कुतूहल होतेच आणि आता तर सुरेख संधी चालून आलेली. त्यांची तिथे असलेली बहुतेक नाटके वाचली. वाचन अजिबात सोपे नव्हते. वाचताना you shall विसरून जायचे असते आणि thou shalt ची सवय लावावी लागते !

सॉमरसेट मॉम यांच्याबद्दल दोन कारणांनी कुतूहल होते. ते स्वतः वैद्यकीय पदवीधर होते पण त्यांनी लेखन हाच व्यवसाय केला. अजून एक कारण असे. माझे एक नातेवाईक मराठी कथालेखक होते. ते स्वतःला मार्गदर्शक म्हणून
मॉम यांची पुस्तके वाचत. त्यांनी मला एकदा वाढदिवसाला मॉमचे पुस्तक भेट दिले होते. त्यामुळे ती उत्सुकता. मॉम त्यांच्या कथांतून वाचकाला जगाच्या पश्चिम ते पूर्व अशा दोन्ही टोकांना नेऊन आणत. तसेच मानवी स्वभावाचे अनेक पैलू छान उलगडून दाखवत.

पी. जी. वुडहाउस हे प्रसिद्ध विनोदी लेखक. मला काही बुजुर्गांनी सांगितले, की ज्यांना पुलं आवडतात त्यांनी ‘पीजी’ जरूर वाचावेत. म्हणून मग त्यांची पुस्तके आवडीने वाचून काढली. तो अगदी प्रसन्न विनोदाचा शिडकावा असतो. त्यातल्या ‘जीव्ज’ या व्यक्तीच्या तर आपण प्रेमातच पडतो.

अशा तऱ्हेने ‘बीसीएल’ चे हे तारुण्यातील गोडगुलाबी दिवस मजेत गेले. त्यातून इंग्लीश साहित्याची झलक चाखता आली. पदवीचे शिक्षण संपल्यावर माझे राहायचे ठिकाणही बदलले होते. तिथून हे ग्रंथालय फारच लांब असल्याने आता ते बंद केले.(अलीकडे हे ग्रंथालय निव्वळ छापील पुस्तकांचे राहिलेले नसून तिथे अनेक इ-सुविधाही उपलब्ध असतात). माझ्या तेव्हाच्या ५ वर्षांच्या कालावधीत वेगळे मराठी वाचनालय लावायला मात्र घरून परवानगी नव्हती कारण इथले शुल्क बऱ्यापैकी होते. मग मित्रपरिवारात जी काही मराठी पुस्तके होती, ती एकमेकांत फिरवून वाचत असू. अशा या ‘फिरत्या’ आणि फुकट वाचनालयातून काही वाचन झाले. त्यापैकी ‘ययाती’ आणि ‘कोसला’ आठवतात. हा लेख लिहिताना कोसलामधल्या ‘लायब्री’ ची आठवण येणे अपरिहार्य आहे !

पुढे लग्नानंतर शहराच्या उपनगरात स्थिरावलो. आता सांसारिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असल्याने वाचनालय घरानजीकचेच शोधणे भाग होते. असेच फिरताना त्याचा शोध लागला. आमच्या जवळच्याच एका गृहसंकुलात एका कुटुंबाने त्यांच्या घरातच वाचनालय चालवले होते. त्या जोडप्यातील गृहस्थ नोकरीत होते आणि त्यांची पत्नी गृहिणी. आपल्या ३ खोल्यांच्या सदनिकेतील बाहेरच्या खोलीत त्यांनी वाचनालय उभे केले होते. दिवसातील ४ तास ही खोली ग्राहकांसाठी उघडी असायची. त्यांच्या या पुस्तक प्रेमाबद्दल मला मनापासून कौतुक वाटले. त्या जागेच्या मर्यादेत त्यांनी जी पुस्तकांची निवड केली होती ती पांढरपेशांना अगदी अनुरूप होती. त्यामध्ये ‘पुलं- वपु -हमो- सुशि’ अगदी उठून दिसणारे होते. जोडीला नारायण धारप- रत्नाकर मतकरी हे गूढखाद्यही होते. त्याचबरोबर ‘व्यंमा- दमा- शंपा’ यांचाही एक सुरेख कप्पा होता. उच्च मध्यम वर्गाला आवडणारे खुशवंतसिंगांचे अनुवादित साहित्यही इथल्या संग्रहाला चविष्ट बनवायचे. वपुंचे एखादे नवे पुस्तक जर आपल्या हाती ६ महिन्यांनी पडले, तर त्यात त्या खास ‘वाक्यां’च्या खाली पेनाने ओढलेल्या रेघा असायच्या. असे सगळे पुस्तक शाईमय करून टाकणार्‍यांचा अगदी राग यायचा.

इथला अजून एक मुद्दा दखलपात्र आहे. त्या सुमारास उपनगरांत अशी जी घरगुती वाचनालये चालवली जात, त्यांना फक्त पुस्तके ठेवून चालणार नव्हते. त्याला नियतकालिकांची जोड देणे आवश्यक होते. नियतकालिके ही बऱ्याच गृहिणी सभासदांची विशेष आवड होती. इथे सभासदांना एका वेळेस एक पुस्तक आणि दोन नियतकालिके दिली जात. वाचनालय जरी मराठी पुस्तकांचे असले तरी नियतकालिकांत मात्र मराठीच्या जोडीने हिंदी व इंग्लीशमधले चित्रपट व सौदर्यप्रसाधनविषयक अंक हटकून ठेवावे लागत. हे जरी घरात चालवलेले वाचनालय असले, तरी त्यांनी त्यात ‘Debonair’ चे अंक ठेवण्याचे धाडस दाखवले होते. ते मासिक उघडून पाहिल्यावर पहिल्याच पानावर
“कृपया पाने फाडू नयेत, अंक जुना झाल्यावर विकत घ्यावा !"
ही प्रेमळ सूचना पेनाने लिहिलेली असायची. आमच्या कॉलेजच्या दिवसांत हे मासिक ठरवून वसतिगृहातच ‘बघावे’ लागे; ते वाचण्यात कुणालाच रस नसायचा ! अर्थातच ते घरी आणायची कुणाची टाप नव्हती. आता या वाचनालयात ते खुले आम मिळत असल्याने त्याच्याबद्दल उगाचच वाटणारा चोरटेपणा नष्ट झाला. त्यात आता विवाहित असल्याने ते घरी आणण्यात संकोच तो कसला ? या वाचनालयाच्या मालक असलेल्या त्या बाई पुस्तक नोंदणी वगैरे कामे घरकाम सांभाळून अगदी मन लावून करत. पुस्तक बदलण्यास आलेल्या माणसांना त्यांच्या स्वयंपाकघरातील फोडण्यांचे वास अगदी पाठ झालेले होते ! संध्याकाळच्या वेळात कधीकधी त्यांची आठवीत असलेली मुलगी ग्राहकाच्या पुस्तक नोंदीचे काम करी. कार्डावर लिहिताना मराठी पुस्तकाचे नाव देखील ती हटकून रोमन लिपीत लिही. तिच्या या कृतीतून लिखित मराठीला भविष्यात ओहोटी लागणार असल्याची झलक दिसून आली.

या वाचनालयामुळे आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. साधारण १९९५च्या सुमारास तिथे पुस्तक बदलायला गेलो असता एका नव्या मासिकावर नजर पडली. त्याचे मुखपृष्ठ आकर्षक होते आणि मासिकाचे नावही उत्कृष्ट सुलेखानात होते. ते मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ तेव्हा ते नव्याने सुरु झाले होते. ते सहज चाळताना एक गोष्ट नजरेत भरली. या ४२ पानी मासिकात तब्बल ६ पाने ही वाचकांच्या प्रतिसादासाठी राखलेली होती. या प्रतिसाद सदराचे प्रारंभी अशी संपादकीय टीप होती:

वाचकांच्या प्रतिसादांना या मासिकात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. वाचकांनी आपले प्रतिसाद सविस्तर आणि मोकळेपणाने लिहावेत”.

हा भाग माझ्यासाठी फारच आकर्षक होता कारण तोपर्यंत मी दैनिकांतील पत्रलेखन आवडीने व हिरीरीने करीत होतोच. आता हे मासिक तिथून दरमहा घेऊन वाचू लागलो. मग त्यात नियमित प्रतिसाद लिहीले. त्यातूनच स्वतंत्र लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे वाचकांच्या प्रोत्साहनातून त्यात गती येत गेली. यास्तव या घरगुती प्रेमळ वाचनालयाचा मी कायम ऋणी आहे. कालांतराने हे संचालक कुटुंब ते घर सोडून दुसरीकडे गेले. त्यामुळे हे २० वर्षे चाललेले वाचनालय बंद झाले. या घटनेने याच्या सभासद असलेल्या एक वाचनप्रेमी गृहिणी खूपच अस्वस्थ झाल्या. त्यांनी १-२ महिने कसेबसे काढले. मग त्यांनी स्वतःच नवे वाचनालय स्वतंत्र जागेत काढले. मग माझ्यासह बहुतेक सगळे पूर्वीचे सभासद त्यांना मिळाले. त्यांनी याचे नावही छान ठेवले – ‘आपले वाचनालय’. इथेही पूर्वीची लेखक परंपरा जपलेली होती. आता कालानुरूप त्यात काही विशेष भर घातली गेली. त्यात चरित्रे, वलयांकित व्यक्तींचे अनुभवकथन, माहितीपर आणि प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश होता. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इथे ‘अमृत’ मासिक देखील होते. बऱ्याच काळाने त्याची पुनर्भेट झाली. इथल्या एका छोट्या कप्प्यात त्यांनी जुनीपानी इंग्लीश पुस्तके कोंबून ठेवली होती. ती सर्व त्यांनी ओळखीच्यांकडून गोळा केलेली होती. ती वाचण्यासाठी दर उन्हाळी शालेय सुटीत २-४ मुले फिरकत. एरवी तो कप्पा उदास आणि धुळीने माखलेला असायचा.

सुमारे १० वर्षे मी इथला सभासद होतो. इथे सभासदांसाठी एक विशेष सोय अशी होती. जर आपल्याला नव्याने प्रकाशित झालेले एखादे पुस्तक वाचायची इच्छा असल्यास आपण त्या संचालकांना सुचवायचे. मग त्यांना जर ते पटले तर ते खरेदी करत. अशी पाच पुस्तके मी त्यांना माझ्या शेवटच्या २ वर्षांच्या काळात सुचवली होती. पण, त्यांनी एकदाही माझी मागणी पुरी केली नाही. एव्हाना मी त्यांच्या निवडीच्या पुस्तकांना कंटाळलो होतो. वयानुरूप आता ठराविक पठडीतील साहित्य वाचायचा कंटाळा येत होता. तरी पण वाचनालय या संस्थेशी दीर्घकाळ असलेला संपर्क एकदम तोडवत नव्हता. दरम्यान अंतर्नाद, अमृत आणि अन्य काही मासिके बंद पडली. माझे पुस्तकांचे दीर्घवाचन आता होईनासे झाले. दिवाळी अंकांचेही अप्रूप वाटेना. दुसरीकडे आंतरजालावरचे निवडक वाचन वाढू लागले होते. हे सर्व पाहता निव्वळ साप्ताहिकांसाठी हे वाचनालय चालू ठेवण्यात मतलब नव्हता. तशीही ती जालावर बघता येतातच. आता आपल्या आवडीचे एखाद दुसरे पुस्तक अधूनमधून विकत घेतलेले बरे, असे प्रकर्षाने वाटू लागले. एक वर्षभर विचार करीत अखेर ते वाचनालय बंद करण्याचा निर्णय घेतला.

आज समाजात अनेक प्रकारे इ-माध्यमे ओसंडून वाहत आहेत. शहरी तरुण पिढी मराठी छापील वाचनापासून बरीच दुरावली आहे. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत काही उत्साही लोक व्यक्तिगत पातळीवर वाचनालये चालवत आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. त्या कृतज्ञतेपोटी मी माझ्या शेवटच्या वाचनालयाकडून ते बंद करताना माझी अनामत रक्कम परत घेतली नाही. ज्येष्ठ पिढीतील थोड्याफार लोकांसाठी अशी वाचनालये – पुस्तकांची घरे- अजूनही गरजेची आहेत. ती शक्य तितका काळ टिकोत, या सदिच्छेसह या लेखाचा समारोप करतो.
………..
तुमचेही अनुभव वाचण्यास उत्सुक.
***********************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* पेपरही होणार डिजिटल, पुस्तकांचं काय?
>>>> चित्रफीत पाहिली.
या संदर्भात दोन-तीन प्रतिसाद मागील पानांवर लिहिले आहेत. एकंदरीत जागतिक - विशेषतः प्रगत देशांमधील- निरीक्षण असे आहे की, आता लोकांना नियतकालिके छापीलपेक्षा ऑनलाईन पसंत पडू लागलेली आहेत. परंतु पुस्तकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती तशी नाही; कित्येक ठिकाणी ती उलटी असल्याचे आढळले आहे. मागच्याच पानावर भारतातील पुस्तक प्रकाशनाबद्दल या एका इंग्लिश लेखाचा उल्लेख आहे :
“If Reading Is Dead, Why Is Publishing Thriving?”

मागे २-३ वर्षांपूर्वी एक पुस्तकांच्या यादी चे पुस्तक आलेले.... मराठीतच होते, कुणाला नाव आणि लेखक माहीत आहेत का?

व्यवसायाने पुस्तकांचे मुखपृष्ठ चित्रकार असलेले Oliver Munday जेव्हा स्वतः कथासंग्रह लिहितात तेव्हा त्याचे मुखपृष्ठ मात्र संपादकाच्या सूचनेनुसार अन्य चित्रकाराकडून तयार करून घेतले जाते ! संबंधित मुखपृष्ठ निर्मितीची ही सचित्र कथा रोचक वाटली :
https://lithub.com/when-a-book-cover-designer-writes-a-book-who-designs-...

( “एखाद्या पुस्तकावर भाष्य करण्यासाठी सर्वात अयोग्य व्यक्ती म्हणजे त्या पुस्तकाचा लेखक” असे म्हटले जाते, त्याची आठवण यावरून झाली).

राधिका अग्रवाल या लेखिकेने स्वतःच लिहिलेल्या पुस्तकाच्या बेकायदा प्रती दिल्लीतील रस्त्यावर विक्रीस ठेवलेल्या पाहिल्या. त्या पाहिल्यावर तिने विक्रेत्याला तसे सांगितले व " मला ती प्रत स्वस्तात देणार का?" असे विचारले !
मग या विक्रेत्याने ते साडेतीनशे रुपयांचे पुस्तक तिला शंभर रुपयाला विकले !!

https://www.hindustantimes.com/trending/author-bargains-for-pirated-copy...

इंग्रजीचे शिक्षक असलेले कालिदास हलदर यांनी कलकत्त्यातील रस्त्यांवर 19 वाचनालये उघडलेली आहेत. त्यातून ते विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकसेवा देतात. भविष्यात अशा ग्रंथालयांची संख्या 100 वर नेण्याचा त्यांचा मानस आहे.

https://www.telegraphindia.com/my-kolkata/people/patuli-teacher-kalidas-...

राधिका अग्रवाल यांचे पुस्तक.....
चलती असणाऱ्या पुस्तकाच्या ऑफसेट प्रिंटिंग पद्धतीने प्रती काढून कुणीतरी विक्रेत्यांना देऊन मोकळा होतो. त्यांना पकडणार कुठं आणि कसं? विक्रेतेही रस्त्यावरचे पत्ता नसलेले.

हेमंतकुमार, आमच्या भागात दामले काकांनी अशी मोफत लायब्ररी डीपी रोड गांधीभवन येथे चालवली होती. काही काळानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती बंद पडली पण त्यांनी ती पुस्तके नंतर ग्रामीण भागात देउन टाकली. अशा उपक्रमांची गरज आहे

प्र घा
होय, त्यांच्याबद्दल मागे वाचले होते. चांगला उपक्रम.

@ फा वि
* पुस्तकांच्या यादीचे पुस्तक
>>>>
मराठीतील साहित्यलेणी
दीपक घारे
ग्रंथाली प्रकाशन, १९८६

हे एक जुने असून त्यात संबंधित पुस्तकांचा अल्प परिचय पण आहे.

जागतिक पातळीवर ‘तरुणांना वाचनासाठी काय हवे आहे’ याचा परामर्श घेणारा एक चांगला लेख

https://www.timesnownews.com/lifestyle/books/why-literary-fiction-feels-...

श्रेष्ठ किंवा अभिजात कादंबरी, अमुकतमुक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते किंवा गाजलेले पुस्तक, अशा गोष्टींमध्ये तरुणांना बिलकुल रस नसून त्यांच्या हृदयाला थेट हात घालणारी पुस्तके त्यांना हवी आहेत.

डोंबिवलीत दरवर्षीप्रमाणे पुस्तके आदान प्रदान सोहळा सुरू आहे. फ्रेंड्स लायब्ररी ( पांडुरंग पै) आणि इतर प्रायोजकांचा उपक्रम. यावर्षीचा उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकरांना समर्पित.IMG-20260410-WA0003.jpg
कुठे: शिवमंदिर रस्ता, गोयंका हायस्कूल पटांगण. डोंबिवली पूर्व.
केव्हा : सकाळी नऊ ते रात्री नऊ, १४ एप्रिलपर्यंत.
कसे : पुस्तकाची विक्री नाही. एक जुने तुमच्याकडचे पुस्तक आणि दहा रुपये द्यायचे आणि प्रदर्शनात मांडलेल्या पुस्तकांतून कोणतेही एक घ्यायचे. ( शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके घेत नाहीत.) इंग्रजी हिंदी मराठी कोणतीही आणा.IMG-20260410-WA0004.jpgIMG-20260410-WA0005.jpg

अनेक शतकांपूर्वीची दुर्मिळ पुस्तके, हस्तलिखिते आणि नकाशांचा संग्रह असलेले दिल्लीतील जैन कुटुंबीयांचे दुर्मिळ पुस्तकांचे दुकान :
https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/delhi...

रोचक कथा.

पुस्तकांचे घर म्हणले अन् आप्पा बळवंत चौक व कॉलेज स्ट्रीट कोलकाता ह्यांची नावे घेतल्याशिवाय प्रतिक्रिया अर्धवट वाटते.

* कॉलेज स्ट्रीट कोलकाता
>>>>
कोलकाता म्हणजे पुस्तकांची पंढरीच ! तिथले असंख्य अनोखे उपक्रम अधूनमधून वाचनात येत असतात :
https://timesofindia.indiatimes.com/life-style/people/a-broken-refrigera...

या फ्रिजमधील पुस्तकालयाबद्दल पूर्वी मागच्या पानावरती लिहिलेले होते.

कोलकाता म्हणजे पुस्तकांची पंढरीच !

गरियाहाट बाजारातून फेरफटका मारत अस्सल सरसो तेलात बनवलेले काठी कबाब रोल खाता खाता कॉलेज स्ट्रीट वर मारलेली एक जुनी फेरी आठवली एकदम !

कित्येक दुकाने अन् अगणित विषय अन् लाखो पुस्तके ! एका दुकानात तर मराठी पुस्तके (ज्ञानपीठ विजेत्या पुस्तकांचे बंगाली भाषांतर) पाहून मौज वाटली होती, ययाती सारखी कादंबरी सुंदर वळणाच्या बंगाली अक्षरात वाचून महाराष्ट्राच्या महान साहित्यिक परंपरांनी देशाला मुक्तहस्ते काहीतरी चांगले दिल्याचे पाहून अभिमान पण वाटला होता, एक विविक्षित दुकान तर पार हॅरी पॉटर मधल्या ऑलिव्हांडर्स वांड शॉप सारखे भासले होते, तिथे काचेच्या कपाटात ठेवलेली काही रेअर पुस्तके पाहून छाती दडपली होती ! त्यातील सगळ्यात स्वस्त पुस्तक अगदी मिजासीने कातडी बाइंडिंग, प्रत्येक पानावर डॉक्युमेंट कॉन्सर्वेशनची रासायनिक ट्रीटमेंट करून परत सुबक कातडी वेष्टनात बांधून रीस्टोअर केलेले दिसले, किंमत मात्र ₹ ६०,०००/- (अक्षरी साठ हजार फक्त) !

आपल्याकडे मुंबईला पण अख्खी स्ट्रीट नाही तर फ्लोरा फाऊंटन/ हुतात्मा चौकात असेच काही विक्रेते बसलेले आढळतात.

एकदा तर एशियाटिक सोसायटीने त्यांचे आर्काइव्ह साफ करून काही जुनी पुस्तके, जर्नल, मासिके इत्यादींचा सेल लावला होता ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांत जुनी पुस्तके.

माझे एक पुस्तकप्रेमी वरिष्ठ आणि मी दोघे तिथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर धावत सुटलो होतो, पण आम्ही तिथं पोचण्यापूर्वी खजिना बऱ्यापैकी मोकळा झाला होता.

एक किर्लोस्कर स्त्री मनोहरचा अंक दुरून पाहूनच धावलो होतो तोवर एका अजून रसिक ताईंनी फर्स्ट मुवर्स अडवांटेज किंवा अर्ली बर्ड होऊन तो अंक पळवला होता.

खट्टू होऊन फिरता फिरता दोन जुनी गॅझेट सापडली होती, बॉम्बे प्रेसिडेन्सी (मुंबई इलाखा) आणि सी. पी. अँड बेरार गॅझेट एक्स्ट्रॉर्डिनरी, महाराष्ट्रात तत्कालीन किती जिल्हे होते, तिथे त्या काळात (बहुतेक १८९८-१९००) कोण कलेक्टर होते, ते इंग्लंड मधून भारतात कधी आले, किती दिवस रजा घेतल्या, त्याकाळी जिल्ह्याची सांख्यिकी माहिती इत्यादी मजेशीर माहिती त्यात नोंदलेली होती.

पुढेमागे त्यावर एखाद लेखमाला मायबोलीवर लिहायची ईच्छा आहे, वेळ अन् मूड कसा लागतो त्यावर अवलंबून आहे मात्र !

* ₹ ६०,०००/- (अक्षरी साठ हजार फक्त) ! >>>> अबब !
जुन्या पुस्तकांच्या किमती संदर्भात विक्रेता आणि दर्दी खरेदीदार यांच्यातली जुगलबंदी कशी चालते याचे अनेक नमुने अरुण टिकेकर यांनी त्यांच्या अक्षरनिष्ठांची मांदियाळी' (https://www.maayboli.com/node/80912) या पुस्तकात दिलेले आहेत. त्यातले काही किस्से व वादावादी पण मस्त आहेत.

काही पुस्तकप्रेमी असेही असतात की ज्यांना पुस्तकांचा साठा करायला खूप आवडते परंतु प्रत्यक्ष त्यांना वाचण्यासाठी काही वेळ होत नाही. तरीदेखील या वाचनातून पुढे कधीतरी आपल्याला नक्की आनंद मिळेल या भावनेपोटी ते पुस्तके खरेदी करीत राहतातच. या प्रकारच्या वृत्तीप्रवृत्तीला जपानी भाषेत tsundoku असा एक मस्त शब्द आहे.

या मागचे मेंदूविज्ञान सांगणारा एक चांगला लेख : https://scroll.in/article/1094474/why-you-keep-buying-books-you-dont-rea...

tsundoku
माहिती आवडली.
आधी वाचलेली किंवा कुणीतरी सुचविलेली पुस्तके आपल्याकडे हवीच असे माझ्या बाबतीत बरेचदा झाले आहे.
आताशा बरेचदा मी वाचकापेक्षा संग्राहक जास्त झालो आहे की काय असे वाटू लागले आहे.
याविषयी एक बोलके व्यंगचित्र:
Screenshot_20260801_105500_Photos.jpg

ऋतुराज. >>>चित्र भारीच !
..
पुस्तके विकत घेऊन न वाचणार्‍यांचे दोन प्रकार इंग्रजीत आहेतच : bibliophile & bibliomane.
वरच्या चित्राला अनुरूप असा एका लेखकाचा भारी किस्सा नंतर लिहितो . . .

Umberto Eco या महान लेखकांचा खूप मोठा पुस्तकसंग्रह होता. त्यांच्याकडे आलेले लोक तो संग्रह पाहून त्यांना विचारायचे,
"तुम्ही ही सगळी पुस्तकं वाचली आहेत का?"
त्यावर ते खाडकन उत्तर द्यायचे,
"नाही. या महिना अखेरीपर्यंत जी पुस्तकं मला वाचून संपवायची आहेत तेवढीच इथे ठेवली आहेत. बाकीची पुस्तकं मी माझ्या कार्यालयात ठेवतो !"

संरक्षण खाते आणि इतर काही खाजगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना रीडींग अलाउन्स असतो. बुक स्टॉलवाले त्यांना नवीन पुस्तके पाठवतात. त्यातली ते कित्येक उघडतही नाहीत. मग काही महिन्यांनी नियमितपणे घेऊन जातात. ती येतात फुटपाथवरच्या विक्रेत्यांकडे. स्टीव जॉबचे चरित्र ( आइझॅक्सनने लिहिलेले) याच्या अगणित प्रतींचे गठ्ठे पाहिले होते. काहींचे वेष्टनही काढलेले नव्हते. तसेच कलामचे विंग्झ ओफ फायर, योगी चरित्र इत्यादी.

sundoku हा प्रकार आवडला. मी कधी कधी अशीच पुस्तके खरेदी करायचो. आत्ता घेतल नाही व नंतर नाही मिळाले तर? ही भिती वाटायची. या भिती पोटी मी काही पुस्तकांच्या दोन प्रति विकत घेतल्या. ही भिती रास्त देखील आहे.माझा होर्डिंग ओसीडी मधे ते लिहल आहे.
उपक्रमावर मी ज्योतिषाच्या माझ्या पुस्तकाची लेखमाला लिहित होतो. त्यात एक संदर्भ साप्ताहिक सकाळ 1989 चा होता. मी तो लिहून ठेवला होता. पुस्तक लिहिताना तो लिहिला होता. उपक्रमाचे वाचक चिकित्सक. किस पाडणारे. कुणी मागितलाच तर तयार ठेवा म्ह्णुन कागदपत्रे शोधू लागलो. मूळ तो लेख मला सापडलाच नाही. . त्यावेळी मी तो अंक उगीच सारखे पैसे का खर्च करा म्ह्णुन घेतला नव्हता असे लक्षात आले.मग अस्वस्थ झालो. लगेच सकाळ कार्यालय गाठले. तिथे तो त्यांच्या ग्रंथालयात मिळाला. त्यांच्या नियमानुसार प्रतिवर्षी असलेल्या संदर्भ फी नुसार काहीतरी 110 रुपये भरले व त्या लेखाची झेरॉक्स मिळवली. त्यावेळी वाचवलेले चार रुपये असे वसूल झाले.पण शांत झोप लागली. पुढे तो कोणी पुरावा म्हणून मागितलाच नाही ही गोष्ट वेगळी.
खर तर मी जर त्या संबंधित लेखाची झेरॉक्स काढायची ठरवले असते तरी सार्वजनिक ग्रंथालयातून मासिक बाहेर न्यायला परवानगी नसते. शिवाय हा संदर्भ आपल्याला भविष्यात लागणार आहे याची खात्री नव्हती. नंतर संदर्भ गोळा करायला त्रास होतो. तो ही एक किस्सा आहे. मला प.वि.वर्तकांच्या लेखनाचा अचूक संदर्भ हवा होता.
पुर्वी डॉ प.वि.वर्तक हे सूक्ष्म लिंगदेहाने मंगळावर गेले होते व तिथे त्यांना काय काय दिसले हे त्यांनी अमेरिकेने व्हायकिंग यान मंगळावर पाठवण्याच्या अगोदरच लिहिले होते असे अनेक लोक छातीठोकपणे सांगत. व्हायकिंग यानाकडून मिळालेली माहिती ही डॉ वर्तकांनी अगोदरच वर्तवली आहे असे त्यांचे समर्थक व ते स्वत: ही म्हणू लागले.अनेक लेखांमधे तेव्हा साहजिकच "सुक्ष्म लिंगदेहाने मंगळावर हा विषय जेव्हा जेव्हा आला होता तेव्हा तेव्हा प्रासंगिक लेखांत संदर्भ म्हणुन संतकृपा चा एक अंक दिला होता. संदर्भ दिले कि वाचक भारावून जातो . कुणी त्याची शहानिशा करायला जात नाही . संदर्भ जेवढा जुना तेवढी त्याची परिणांमकारकता जास्त. मी संदर्भ गोळा करायला गेलो. कार्यालयात एका आजोबांनी पुणेरी स्वागत(?) केले. मी सखाराम गटणे डोळ्यासमोर आणला. संतकृपेने मी भारावून गेलो आहे असे दाखवले. त्याबरोबर मला बसायला खुर्ची मिळाली. मग आजोबांनी मला "अध्यात्म आणि विज्ञान" या विषयावर लेक्चर मारले. मी पुरेसा "भारावून" गेलो आहे याची आजोबांना खात्री पटल्यावर मी हळुच या अंकाचा विषय काढला. त्यांनी तो तत्परतेने जुन्या गट्ठ्यातून काढला. मग मी जरा झेरॉक्स काढतो असे म्हणुन बघितले. "हो हो पण झेरॉक्स काढल्यावर लगेच परत आणायचा बरं का?" मी पडत्या फळाची आज्ञा घेउन तेथून सटकलो. प्रामाणिकपणे कमी पैशात जिथे झेरॉक्स करुन मिळते असे दुकान शोधून तीन अंकांच्या मंगळ विषयावरील लेखाच्या झेरॉक्स काढल्या व अंक परत केला.

छान माहिती व अनुभव.
. . .
पुस्तके वाचण्याबाबत दोन प्रकारच्या मनोवृत्ती असतात :
१. पहिल्या प्रकारचे लोक 'हाती घ्याल ते तडीस न्या' या घट्ट संस्कारांनी बांधलेले असतात. त्यामुळे ते हाती घेतलेले पुस्तक जरी आवडलं नाही तरी नेटाने वाचून पूर्ण करतात.

२. मात्र वयाच्या चाळीशी पन्नाशी नंतर काही लोकांमध्ये या प्रवृत्तीत बदल होतो आणि ते पुस्तक वाचता वाचता जर रंजक, रोचक किंवा उपयुक्त वाटले नाही तर सरळ मध्येच सोडून देतात. त्याचा विधीनिषेध बिलकुल नाही.

याचे मनोविश्लेषण करणारा हा एक चांगला लेख : https://siliconcanals.com/sc-a-people-who-cant-finish-a-book-they-arent-...

* प्रकार दुसरा. >>>> +१ Happy
माझे धोरण दुहेरी आहे.

विकत घेतलेल्या पुस्तकाच्या बाबतीत बऱ्यापैकी पहिल्या गटात परंतु जालावर मोफत उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांच्या बाबतीत अगदी दुसऱ्या गटात ! अलीकडेच मी the elephant vanishes आणि Invisible cities ही दोन पुस्तके जालावरून वाचता वाचता अर्धवट सोडून दिली कारण काही पाने वाचल्यानंतर, ’हे नक्की काय चाललंय’, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण उगाचच संपूर्ण पुस्तक वाचायचे बंधन कशाला ठेवायचे ?

विकत घेतलेली पुस्तके बहुदा वाचायची म्हणून किंवा चाळून किंवा खात्रीशीर कोणी सुचवली म्हणून घेतलेली असतात
. बहुदा त्यामुळे वाचून होत असावीत.

संकेतस्थळावरील लेख पूर्ण वाचला. पटलं.
====
एक वाक्य आवडले.. जे एक दृष्टी देते , mid life crisis की mid life clarity.
Clarity मिळाली तर गोष्टी थोड्या सोप्या होत जातात.. आपल्यासाठी... Happy

Pages