कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ भरत, वाचता आले नाही. अस्पष्ट आहे किंवा मग माझा चष्म्याचा नंबर वाढलाय 🙈

@ आंबा अपडेट

दरवर्षी करतो तसे यावर्षी फस्त केलेल्या आंब्यांच्या कोयी कुंड्यांमधून पेरल्या नाहीत, म्हणून यंदा आंब्याची रोपे नाहीत.

अशी रोपे तयार करून थोडी मोठी झाली की जमिनीत लावायला इतरांना देणे हे मागची काही वर्ष करतो आहे, पण इच्छुक कुणी नसल्याने यंदा ब्रेक.

युद्धस्य कथा रम्या: म्हणतात. पण “आंबे चोरणे” हे दोन राज्यामधील १२ वर्ष चाललेल्या युद्धाचे कारण ठरले असे कधी वाचलेय तुम्ही ? वाचा ही धमाल कहाणी -

राजाचे आंबे पळवले आणि युद्ध पेटले:

चेऊलचे भोज राजे व ठाण्याचे बिंब राजे यांच्या मधे तंटा होता. शक ११४६ तील युद्ध संपल्या वर चेऊलकर भोजाचा व केशवदेवाचा तह होऊन मित्रभाव उत्पन्न झाला. मित्रत्वाच्या नात्यानें भोजराजानें केशवदेवाला भेट म्हणून आंब्यांची फर्मास पाठविली, ती आंब्यांची डाली मध्यें रस्त्यांत भैसेदुर्गाचा राजा जो जश्वद्या ऊर्फ जसवंतदेव त्यानें जप्त केली.

शक ११४६ तील युद्धांत हा जश्वद्या केशवदेवाच्या हातीं जिवंत सांपडला होता. त्याला केशवदेवानें जीवदान देऊन त्या वेळीं सोडून दिलें. ह्या नंतर जश्वद्या सिंघण यादवाला भेटून देवगिरीकर यादवांचा मांडलिक बनला. केशवदेव अनहिलवाडकर चौलुक्यांचा स्नेही पडला. सबब सम्राट जो सिंघण यादव त्याचें व केशवदेव याचें सहज वैर उद्भवलें. सिंघण यादव आपल्या हाता खालील मांडलिकांचा तोरा चालवून घेणा-या पैकीं नव्हता. सर्व उंचवटे खणून पाडून मैदान सपाट करणा-यां पैकीं होता. अश्या पराक्रमीं व वचकबाज सम्राटाची बगलबच्चेगिरी करणा-या जश्वद्यानें केशवदेवाला पाठविलेले आंबे मध्यें च उर्मंटपणें खाऊन टाकले.

केशवदेवाची हि या काली वाढती कमान होती. त्यानें चेऊलच्या भोजाला पराभूत करून, शिलाहारसत्ता तर अगदी च संपुष्टांत आणून ठेविली होती. अश्या त्या केशवादेवाला आंब्यांची अफरातफर झालेली रित्या वेठ्यांच्या मुखजबानीनें कळली. केशवदेवानें जश्वद्या कडे भाट सांगून. पाठविला कीं तुमच्या सारख्या भल्या लोकांनीं चो-या कराव्या हें युक्त नव्हे, तो निरोप ऐकून जश्वद्यानें उलट निरोप पाठविला कीं, मगदूर असेल तर आमच्या गडाला येऊन, किल्ल्याकुलपें फोडून आपले आंबे परत घेऊन जावे.

निरोप ऐकून केशवदेव कोपला. जश्वद्या वर स्वारी करण्या करितां देशाला हंकारा केला. नगा-या घाव घातला. शेषवंशी, सूर्यवंशी व सोमवंशी, असे सर्व योद्धे मिळाले. भैसेदुर्गा वर चालले. वेढा घातला. बारा वर्षे वेढा पडला. परंतु किल्ला हातीं आला नाहीं ! चिंचांचें चिंचवणी खाऊन त्याच्या चिंचो-या ज्या पडल्या त्या रुजून त्यांचे वृक्ष होऊन त्यांच्या चिंचा केशवदेवाच्या सैनिकांनी खादल्या. पण गड हातीं येता दिसे ना. तेव्हां भेद केला. आंधेरीचा कोणी म्हातरा होता. त्याची वृत्त तेथील देसायानें काढिली होती. तो पळून जाऊन जश्वद्याच्या आश्रयानें भैसेदुर्गा वर पाइकी करून पोट भरी. त्याला स्वदेशाची फार खंत उत्पन्न होऊन, किल्याचे दरवाजे चोरून खोलण्याची कामगिरी आपण करूं अशी इच्छा त्यानें केशवदेवाला कळविली, आणि त्या प्रमाणें तें नीच कृत्य त्या अधमानें बजाविलें. किल्ला केशवदेवाच्या हातीं पडला. जश्वद्या पुनः जिवंत सांपडला.

महिकावती (माहिम)ची बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या दस्तावेजातून साभार.
सदर दस्तावेज आता प्रताधिकारमुक्त आहे.

व्वा!!
तिकडे सोमनाथ वारंवार उध्वस्त होत होतं आणि हे अनहिलवाडकर आपलं शौर्य गाजवत होते नातेवाईकांच्या आंब्याच्या टोपल्या परत मिळवण्यासाठी….

महिकावतीची बखर वाटलीच होती मला, एक प्रत आणून ठेवली आहे मी घरी पण वाचायला मुहूर्त लागेना. आता मात्र काढायलाच हवी.

जेम्स,

मजेदार वाटले म्हणून इथे फक्त आंब्याच्या लढाईबद्दल टंकले, पण तुम्हाला रुची असेल तर पूर्ण बखर जरूर वाचा.

एक तर कितीतरी नवीन (actually जुने) मराठी शब्द समजतात, which is fun. उदा वर आलेले आंब्यांची फर्मास / डाली.

आणि

मुंबई- बृहनमुंबई - ठाणे - कल्याण हाच फोकस एरिया असल्याने आंधारी (अंधेरी), वेसावे, घोडबंदर, सोपारा, मरोळ, वाळकेश्वर, माहीम, मार्वे, मढ, ठाणे, शीळ, कल्याण, वसई, दमण, दीव, जोगेश्वरी, पोवई, पोयसर, कुरार अशी परिचित नावे वारंवार येतात त्याने मजा येते वाचता वाचता तत्कालीन घडामोडींना आजच्या geography शी को-रिलेट करायला. 👍

@ माझेमन,

… तिकडे सोमनाथ वारंवार उध्वस्त होत होतं…

याचाही उहापोह आहे बखरीच्या प्रस्तावनेत. पण युद्धाचे कारण म्हणून “आंबा” मंदिरा पेक्षा सरस ठरला हे ही आहेच

अनिंद्य, रोचक माहिती.

एक प्रत आणून ठेवली आहे मी घरी पण वाचायला मुहूर्त लागेना>>>>>> same here.

Pages